[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सन्मानपूर्वक यथाविधी भक्ष्य पदार्थ अर्पण करून राजाने सहा दिवसापर्यंत सुदर्शनाला भक्तीने भोजन घातले. त्याचा यथायोग्य सत्कार केला. ह्याप्रमाणे विवाहसंबंधी सर्व कृत्ये केल्यानंतर लवाजमा देऊन त्याची मानाने पाठवणी करण्यासंबंधाने सुबाहूराजा मंत्र्यांसह विचार करू लागला. तो इतक्यात राजेलोकांनी मार्ग अडवून धरल्याची वार्ता, दूतमुखातून त्याने श्रवण केली. तो महातेजस्वी सुबाहूराजा खिन्न झाला. तेव्हा ज्याचे आचरण स्तुत्य आहे, असा तो सुदर्शन राजकुमार श्वशुराला म्हणाला, "आपण आम्हाला जाण्याची सत्वर अनुज्ञा द्या. आम्ही निर्भयपणे जाऊ. हे राजा, पवित्र भारद्वाजाश्रमाप्रत गेल्यानंतर आम्ही स्वस्थ होऊ आणि कोठे वास्तव्य करावे ह्यासंबंधी तेथे सर्व प्रकारे विचार करू. हे निष्पाप, त्या राजांचे आपण यत्किंचितही भय धरू नका. जगन्माता भवानी मला साहाय्य करील."
हे त्या जामात्याचे मत ऐकून, नृपश्रेष्ठ सुबाहूने द्रव्य देऊन त्याला जाण्याची अनुज्ञा दिली. तो सुदर्शनही तेथून सत्वर निघाला. नंतर मोठे सैन्य बरोबर घेऊन, नृपश्रेष्ठ सुबाहूही त्याच्या मागोमाग निघाला. अशा रीतीने शशिकलेने वरलेला सुदर्शन निर्भयपणे मार्गाला लागला. दूर गेल्यानंतर रथांनी परिवेष्टित असलेला तो शूर योद्धा, रघुकुलनंदन सुदर्शन, भार्येसह रथारूढ होऊन जाऊ लागला. तेव्हा राजांची सैन्ये त्याच्या दृष्टीस पडली.
सैन्ययुक्त असलेल्या त्या राजांना अवलोकन करून सुबाहू चिंताक्रांत झाला. परंतु तो सुदर्शन आनंदाने मनामध्ये जगदंबेला यथाविधि शरण गेला. नवोढा पत्नीसह काहीएक काळजी न करता, तो निर्भय राहिला. कामराजसंज्ञक एकाक्षरी उत्कृष्ट मंत्राचा त्याने जप केला.
त्यावेळी सर्व भूपती गडबड करून कन्येला हरण करण्याकरिता सैन्यासह त्याच्यावर चालून गेले. त्यांना अवलोकन करताक्षणीच काशीराजाने त्यांचा वध करण्याचे मनामध्ये आणले. परंतु विजयेच्छु रघुकुलनंदन सुदर्शनाने त्याचे निवारण केले. त्या ठिकाणी सुबाहू व इतर राजे परस्परांचा वध करण्यास उद्युक्त झाले. शंख, भेरी व आनकदुंदुभी ही वाद्ये वाजू लागली. शत्रुजित सैन्याच्या योगाने परिवेष्टित होऊन, सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने तेथे उभा राहिला, युधाजितही त्याच्या मदतीकरता तयार होताच. काही प्रेक्षकही त्यांच्या सैन्यासह तेथे उभे राहिले होते.
युधाजित अग्रभागी जाऊन सुदर्शनासमीप उभा राहिला. त्याच्याबरोबर ज्येष्ठ भ्रात्याचा वध करण्याकरिता कनिष्ठ भ्राता शत्रुजितही तयार झाला. नंतर क्रोधाने व्याप्त झालेले ते वीर परस्परांना बाणांनी जखमा करू लागले. तेव्हा तीक्ष्ण बाणांच्या योगाने, त्या ठिकाणी फारच मोठे युद्ध सुरू झाले. विपुल सैन्याने युक्त असलेला काशीपती सुबाहू, हा आपल्या निरपराधी जामात्याच्या साहाय्याकरता सत्वर त्याच्याकडे गेला.
ह्याप्रमाणे शरीरावर रोमांच उठवणारा दारुण संग्राम सुरू झाला. इतक्यात एकाएकी सिंहावर बसलेली देवी प्रगट झाली. त्या मनोहर देवीने नानाप्रकारची आयुधे धारण केली होती. श्रेष्ठ भूषणांनी ती भूषित झाली होती. दिव्य वस्त्रे तिने परिधान केली होती. मंदार पुष्पांच्या माला तिने घातल्या होत्या. तिला अवलोकन करताक्षणीच, 'सिंहारूढ झालेली ही कोण आहे ? अहो, अकस्मात ही कोठून आली ?' असे म्हणून सर्व भूपाल अत्यंत विस्मित झाले. तिचे दर्शन झाल्यावर सुदर्शन सुबाहूला म्हणाला, "हे राजा, दिव्य मुद्रेने युक्त अशी ही महादेवी येथे आलेली आपण अवलोकन करा. ही दयाळू देवी, खरोखर माझ्यावर अनुग्रह करण्याकरताच येथे प्रकट झाली आहे. हे महाराज, मी आता निर्भयपेक्षाही निर्भय झालो आहे." असे बोलून सुदर्शनाने व सुबाहूने तिचे दर्शन घेतले. तिला त्यांनी प्रणाम केला. तिच्या दर्शनाने उभयताही आनंदित झाले.
तेव्हा देवीच्या सिंहाने गर्जना केली. त्यामुळे गज त्रस्त होऊन कापू लागले. महाभयंकर वायू वाहू लागले आणि दिशाही अति भयंकर झाल्या.
तेव्हा सुदर्शन आपल्या सेनापतीला म्हणाला, "तू जिकडे भूपाल उभे आहेत त्या मार्गाकडे वेगाने चल. दुष्टबुद्धी राजे क्रुद्ध होऊन काय करणार आहेत ? भगवती देवी आपल्या रक्षणाकरता प्रगट झाली आहे. आपण राजांनी गजबजलेल्या ह्या मार्गातून निर्भयपणे जाऊ. मी स्मरण केल्यामुळे, ही महादेवी रक्षणाकरिता आली आहे." हे भाषण ऐकून सेनापति त्या मार्गाने जाऊ लागला असता, तेथे युधाजित अत्यंत क्रुद्ध होऊन त्या इतर भूपतीना म्हणाला, "तुम्ही भयग्रस्त होऊ नका. कन्येसह सुदर्शनाचा वध करा. हे बलहीन पोर, बलाने अधिक असलेल्या आपणापैकी कोणालाही न जुमानता निर्भयपणे कन्या घेऊन, वेगाने जात आहे. अहो, सिंहावर बसलेली स्त्री अवलोकन करून तुम्ही भयभीत झाला आहात काय ?
हे महाभाग्यवान भूपालहो, ह्याची उपेक्षा न करता, सावध राहून आपल्याला ह्यांचा वध केलाच पाहिजे. ह्याचा वध करून आपण मनोहर भूषणांनी युक्त असलेल्या त्या कन्येचा स्वीकार करू. अहो, सिंहाने रोखून ठेवलेल्या ह्या सुबाहूकन्येला हरण करून नेण्यास, हा सुदर्शन कोल्हा योग्य आहे काय ? असे बोलून युधाजित सैन्यासह क्रोधाने व्याप्त होऊन युद्ध करण्याकरिता अग्रभागी प्राप्त झाला. वध करण्याचा उद्देश मनात धरून त्या अत्यंत दुष्टबुद्धि युधाजिताने सुदर्शनावर कानापर्यंत धनुष्य ओढून सत्वर बाण सोडले. ते बाण लोहाराने तीक्ष्ण केलेले होते, शिळेवर घासलेले होते. त्यांचे पिच्छ भाग फार सुंदर व सरळ होते. परंतु सुदर्शनाने ते आपल्यावर पडणारे बाण आपल्या बाणांच्या योगाने एका क्षणामध्ये तोडून टाकले.
ह्याप्रमाणे युद्ध सुरू झाले असता चंडिकेला अतिशय क्रोध आला, त्या दुर्गादेवीने युधाजितावर बाण टाकण्याला आरंभ केला. अनेक रूपे व अनेक शस्त्रे धारण करून ती जगदंबा कल्याणी जेथे तुमूल युद्ध चालले होते तेथे प्राप्त झाली. तिने शत्रूजित व राजा, ह्या उभयतांचाही येथे वध केला. ते उभयताही मृत होऊन रथावरून जमिनीवर पडले असता जयघोष सुरू झाला आणि ते मृत झालेले अवलोकन करून, सर्व भूपाल अतिशय विस्मयचकित झाले. मामा व भाचा ह्या उभयतांना त्या युद्धामध्ये मरण प्राप्त झाले. ते अवलोकन करून अतिशय संतुष्ट झालेला सुबाहू दुर्गतिनाशक दुर्गेचे स्तवन करू लागला.
"हे देवी, जगद्धात्री, शिवा, दुर्गा, भगवती आणि कामदा अशा तुला सर्वदा, नमस्कार असो, हे जगन्माते कल्याणी, शिवा, शांति, मोक्षदायक विद्या, विश्वव्यापिनी व जगद्धात्री जी तू तुला नमस्कार असो. हे देवी, मी सगुण असल्यामुळे बुद्धिपूर्वक चिंतन करीत असतानाही निर्गुण मातेचे स्वरूप जाणण्यास समर्थ नाही. ह्यास्तव हे विश्वजननी, भक्तदुःखनाशाविषयी तत्पर, प्रखर प्रभावाने युक्त आणि परम शक्तिरूप अशा तुझे मी काय बरे स्तवन करावे ? वाग्देवता, सर्वव्यापिनी बुद्धी, विद्या, मती आणि प्राणिमात्रांची गती तूच असून सर्वांच्या मनाचे नियमन करणारीही तूच आहेस.
सर्वव्यापक जे मी तुझे आत्मरूप त्याचे खरोखर स्तवन करावे कसे ? ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे सुरश्रेष्ठ एकसारखे स्तवन करीत असतानाही तुझ्या गुणांचा अंत त्यांना लागला नाही. तस्मात हे अंबे, गुणांनी युक्त, अप्रसिद्ध व चंचलमति असा मी तुझे चरित्र वर्णन करण्यास कोठून समर्थ होणार ? अहो, सत्संगती काही प्रसंगाने जरी प्राप्त झालेली असली, तरी ती मनोरथ परिपूर्ण करीत नाही काय ? करीतच असते. तिच्या योगाने चित्तशुद्धीही सहजच होते. हा जामात्याचा मला जो हा अल्प समागम घडून आला, त्याच्या योगाने मला हे तुझे अद्भूत दर्शन झाले आहे.
ब्रह्मा, विष्णू महेश्वर, इंद्रासह इतर देव आणि आत्मतत्त्ववेते मुनी, हेही सर्वदा तुझ्या दर्शनाची इच्छा करीत असतात. परंतु हे जननी, केवढे हे माझे भाग्य, तुझे दुर्लभ दर्शन शमदमादि साधने व समाधि ह्यांशिवाय मला प्राप्त झाले आहे. हे देवी, मी अतिमंदमति कोणीकडे ? आणि भवमुक्तीचे अद्वितीय औषध असे हे तुझे अकस्मात झालेले दर्शन कोणीकडे ? खरोखर देवगणांना पूज्य असलेली तू भक्तांवर प्रेम करणारी असून त्यांच्यावर दया करण्याविषयी सतत तत्पर असतेस, म्हणूनच खरोखर तुझे मला दर्शन झाले आहे.
हे देवी, तुझ्या ह्या चरित्राचे मी काय बरे वर्णन करावे ? ह्या माझ्या सुदर्शनाचे तू ह्या संकटामध्ये रक्षण केले आहेस. दोन महाबलाढ्य शत्रूंचाही तू वेगाने वध केला आहेस. भक्तानुकंपेने युक्त असे हे तुझे चरित्र परम पवित्र आहे. हे देवी वस्तुस्थितीचा विचार केला असता, हे काही आश्चर्य नव्हे, असे मला वाटते. सर्व चराचर जगताचे तू रक्षण करीत असतेस. म्हणूनच दयेमुळे तू सांप्रत शत्रूंचा वध करून ह्या ध्रुवसंधिपुत्राचे रक्षण केले आहेस.
हे भवानी, सेवेविषयी तत्पर असलेल्या भक्ताची कीर्ती अतिशय विख्यात करण्याकरिताच तू हे चरित्र रचले आहेस. असे नसते तर हा सुशील सुदर्शन माझी कन्या घेऊन, ह्या युद्धामध्ये कसा बरे सुरक्षित राहिला असता ? जन्ममरणादि भयाचा नाश करण्यासही ज्या अर्थी तू समर्थ आहेस त्या अर्थी भक्तजनांचे मनोरथ परिपूर्ण करण्यास तू समर्थ आहेस, ह्यात खरोखर आश्चर्य ते काय ? हे जननी, तुला भक्तजन, अनंत, पापपुण्यरहित, सगुण व निर्गुण म्हणत असतात.
हे देवी, हे भुवनेश्वरी, तुझ्या दर्शनामुळे मी आज पुण्यवान व कृतार्थ झालो असून माझ्या जन्माचेही साफल्य झाले आहे. हे माते, तुझे बीज व भजन ह्यापैकी मी खरोखर काही जाणीत नसूनही, आज तुझा महिमा मला समजून आला आहे. त्याचा प्रभावही प्रकट झाला आहे." ह्याप्रमाणे सुबाहूने देवीचे स्तवन केले असता ती कल्याणी देवी प्रसन्न मुद्रेने त्या राजाला म्हणाली, 'हे सुव्रता वर माग.'