[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
आपल्या कन्येचे भाषण श्रवण केल्यानंतर शुद्ध मनाने युक्त असलेला, तो सुबाहूराजा स्वयंवर मंडपात जमलेल्या राजांकडे गेला आणि म्हणाला, "हे भूपालहो, आपण आपापल्या शिबिरात जावे. आजचा स्वयंवरसमारंभ उदईक होईल. आपण सर्व माझ्यावर प्रसन्न व्हा. मी अर्पण केलेल्या भक्ष्य व पेय पदार्थांचा स्वीकार करा. ह्या मंडपामध्येच खरोखर उदयीक आजचे कार्य होईल. ते आपण सर्व मिळून पार पाडा. खरोखर मंडपामध्ये आज कन्या येत नाही. हे भूपालहो, आता येथे मी तिला काय बरे सांगू ? कन्येची समजूत घालून मी तिला प्रातःकाली येथे घेऊन येईन. राजांनी आता शिबिरात जावे. विचारी लोकांचा आपल्या आश्रित जनांशी कधी कलह होत नाही. अपत्यावर सर्वदा कृपाच केली पाहिजे. ह्यास्तव आपण तिच्यावर कृपा करा.
मी त्या कन्येला सकाळी येथे आणीन. हे भूपालहो, आपण आता यथेष्ट गमन करावे. इच्छापण अथवा शोर्यपण ह्यांपैकी काही तरी मनामध्ये ठरवून मी प्रातःकाळी कन्येचा विवाह करीन. ह्यास्तव सर्व राजांनी मिळून उदयीक येथे यावे. सर्वांच्या मताने स्वयंवरसमारंभ शेवटास न्यावा." हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतर राजांना ते खरे वाटले.
ते आपापल्या निवासस्थानाप्रत परत गेले आणि नगराभोवती बंदोबस्त ठेवून त्यांनी माध्यन्ह कालाला विहित असलेली कर्मे केली.
सुबाहूने इकडे आर्यजनांसह अत्यंत गुप्त अशा घरामध्ये, वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरोहितांसह कन्येला बोलावून आणून, विवाहकाली योग्य असलेली कर्मे करवली. वराला स्नान वगेरे घालून, त्या राजाने त्याला विवाहयोग्य अलंकार घातले आणि ज्यात विवाहवेदी घातली आहे, अशा गृहामध्ये आणून त्याने त्याचे पूजन केले. विधियुक्त आचमनीय, अर्घ्य, दान, वस्त्रे, गाय, व दोन कुंडले, इत्यादी त्याने त्याला यथाविधी अर्पण केली. नंतर त्या महाशय राजाने विधिपूर्वक कन्यादान केले. त्या महाभाग्य सुदर्शनानेही ते सर्व स्वीकारले. तेव्हा सुदर्शनमाता जी मनोरमा, तिची काळजी नाहीशी झाली. उत्कृष्ट केशांनी युक्त असलेल्या त्या कन्येला सुदर्शन, कुबेराच्या कन्येप्रमाणे समजू लागला व स्वतःलाही उत्कष्ट मानू लागला.
नंतर भूषणे वस्त्रे देऊन, त्याचे चांगल्या रितीने पूजन केले आहे, अशा त्या उत्कष्ट वराला आनंदाने व निर्भयपणे, सर्व सचिव त्या वेळी मंगलमंडपामध्ये घेऊन गेले.
इकडे विधिवेत्त्या स्त्रियांनाही त्या राजकन्येला यथाविधी श्रृंगारून व चांगल्या यानामध्ये बसवून, बोहले घातलेल्या त्या मंडपामध्ये वरासमीप तिला घेऊन गेल्या. तेव्हा पुरोहिताने अग्नीची स्थापना करून, यथाविधि हवन केले, नंतर शुचिर्भूत, कंकण धारण केलेल्या व परस्परांवर अत्यंत प्रेम करणार्या, त्या वधूवरांना बोलावून आणून, त्या विवाह-वेदीवर बसवले. त्या उभयतांनी यथाविधी लाजाहोम करून अग्नीला प्रदक्षिणा केली आणि कुल व गोत्र ह्यांना उचित असे इतरही सर्व काही विधी त्यांनी यथायोग्य केले.
त्याप्रसंगी बाणयुक्त, उत्कृष्ट रीतीने अलंकृत व अश्वांनी युक्त असे दोनशे रथ, मोठ्या आदराने, लवाजमा म्हणून, त्या नृपश्रेष्ठाने सुदर्शनाला दिले. तसेच पर्वतशिखरांप्रमाणे ज्याची शरीरे आहेत, असे सुवर्णविभूषित व मदमस्त सव्वाशे गज त्या राजाने प्रेमपूर्वक त्या राजपुत्राला अर्पण केले.
त्याचप्रमाणे विवाहसमयी अत्यंत आनंदित झालेल्या त्या राजाने सुवर्णालंकारांनी विभूषित अशा, अति मनोहर शंभर दासी व शंभर हत्तिणी वराला अर्पण केल्या. त्यानंतर सर्व आयुधांनी संपन्न व अलंकृत असे हजार दास, रत्ने आणि दिव्य, अद्भूत व लोकरीची यथायोग्य वस्त्रे त्याने त्याला दिली. तदनंतर रम्य, विस्तृत व चित्रविचित्र रंगांनी भूषित अशी निवासगृहे अर्पण करून सिंधु देशातील अतिशय मनोहर असे दोन हजार उत्कृष्ट अश्व त्याने त्याला दिले. त्याचप्रमाणे ओझी उचलणारे तीनशे मनोहर उंट, आणि धान्य व रस यांनी भरलेले असे दोनशे उत्कृष्ट गाडेही त्याने त्याच्या स्वाधीन केले. तदनंतर त्या सुबाहूने वरमाता जी मनोरमा तिच्याकडे जाऊन तिला प्रणाम केला. हात जोडून तो तिच्या अग्रभागी उभा राहिला. तो म्हणाला, "हे श्रेष्ठ राजकन्ये, वधुवरांना माझ्या सामर्थ्याप्रमाणे अलंकार - भूषणे वगैरे आंदण देऊन अर्पण केले. आता वरमातेचा सत्कार करणे, हे माझे मुख्य उचित कर्तव्य आहे. हे भाग्यशाली वरमाते, मी तुझा दास आहे, यास्तव, तुझ्या मनात जे असेल ते तू सांग."
तेव्हा मनोहर भाषण करणार्या त्या राजाला ती मनोरमाही म्हणाली, "हे भूपाला, आपले कल्याण असो, निरंतर आपले कुल वृद्धिंगत होवो. ज्या अर्थी आपण स्वतःचे श्रेष्ठ कन्यारत्न माझ्या पुत्राला अर्पण केले आहे, त्याअर्थी आपल्या हातून माझा चांगलाच मान झाला आहे. हे कृपा, मी भाटाची अथवा स्तुतीपाठकाची कन्या नाही. मी कोणाचीही निरर्थक स्तुती करीत नाही. यथार्थच सांगत आहे की, यासंबंधाने आपणासारख्या स्वजनाची मी काय बरे जास्त प्रशंसा करू ? तुझ्यासारख्या उत्कृष्ट भूपतीशी संबंधी झाल्यामुळे आज माझा पुत्र मेरुपर्वताप्रमाणे उच्च झाला आहे.
अहाहा ! आपले पवित्र, उत्कृष्ट व अत्यंत अद्भूत नृपचरित्र मी काय बरे वर्णावे ? कारण, राज्यापासून भ्रष्ट झालेल्या माझ्या पुत्राला, आपण आपली श्रेष्ठ व परम प्रिय
कन्या आज अर्पण केली आहे. येथे आलेले हे सर्व भूपति सोडून देऊन, वनवासी, निर्धन, पिता, सैन्य व साधन नसलेला व फलांवर उपजीविका करणारा, माझा पुत्र असून त्याला तू आपली कन्या अर्पण केलीस. द्रव्याने, कुलाने व बलाने तुल्य असलेल्या वराला, राजाने आपली कन्या देणे योग्य आहे.
हे भूपाला, माझ्या द्रव्यहीन पुत्राला कोणीही आपली गुणसंपन्न व रूपवती कन्या देणार नाही. सर्व बलाढ्य व वरिष्ठ राजांशी वैर संपादन करून माझ्या सुदर्शनाला आपण आपली कन्या अर्पण केली. म्हणून आपल्या धैर्याला मी काय बरे वर्णन करावे ?"
ही तिची वाक्ये श्रवण करून राजा संतुष्ट झाला. पुनरपी हात जोडून तो तिला म्हणाला, "हे मनोरमा, माझ्या सुप्रसिद्ध व समृद्ध अशा ह्या राज्याचा तू स्वीकार कर. मी आज तुझा सेनापति होतो. अथवा हे संमत नसेल तर अर्धे राज्य स्वीकारून पुत्रासह तू राज्यसुखाचा उपभोग घे. वाराणशीतील वास्तव्य सोडून वनामध्ये अथवा दुसर्या शहरामध्ये माझे आता वास्तव्य होणे शक्य नाही. राजे तर कुद्ध झाले आहेत. परंतु मी प्रथम जाऊन त्यांचे सांत्वन करीन. सांत्वनानंतरही दान व भेद हे दोन उपाय मी योजीन. एवढ्यानेही कार्यभाग न झाल्यास मी युद्ध करीन. जयपराजय जरी दैवाधीन आहेत, तरी धर्माच्याच बाजूला यश प्राप्त होत असते, अधर्माकडे जय येत नाही, म्हणून खरोखरच त्या अधर्मनिष्ठ राजांचे मनोरथ कसे बरे सिद्धीस जाईल ?"
हे यथार्थक भाषण श्रवण केल्यानंतर त्याच्यापासून सन्मान प्राप्त झाल्यामुळे मनामध्ये सर्वस्वी प्रसन्न व आनंदीत झालेली मनोरमाही हितकारक शब्दांनी त्याला म्हणाली. हे नृपा, आपले कल्याण असो. आपण निर्भय असा. हा पुत्र आपले राज्य मिळवील आणि पूर्ववत अरोध्यानगरीमध्ये राहील. आपण स्वस्थानी जाण्याविषयी आम्हाला अनुज्ञा द्या. भवानी आपले कल्याण करील. ते भूपाला, मी श्रेष्ठ अंबिकेचे चिंतन करीत आहे, त्यायोगे मला कोणतीही काळजी वाटत नाही."
अशी नानाप्रकारांची सरळ भाषणे व शब्द रचना आणि एकमेकांच्या भाषणातील अमृततुल्य वाक्यरचना ह्यामध्येच त्यांची रात्र निघून गेली.
इकडे प्रातःकाली सर्व राजांना विवाह झाल्याची बातमी. लागली. तेव्हा ते कुद्ध होऊन नगराबाहेर गेले आणि म्हणाले, "नृप ह्या नावाला कलंक लावणार्या ह्या सुबाहूचा आणि त्याचप्रमाणे विवाहाला खरोखर योग्य नसलेल्या त्या पोराचा वध करून, आपण ती शशिकला व राज्यलक्ष्मी हरण करू. असे न झाल्यास अपयश व अपमान ह्यांनी लज्जित होऊन आपण स्वगृही कसे बरे परत जावे ? हे होत असलेले तूर्यध्वनी तुम्ही ऐका. मृदंग शब्दांना मागे टाकणारे शंखांचे नाद नीट ऐका. त्याचप्रमाणे नानाप्रकारचे गीतध्वनी व वेदघोषही तुम्ही श्रवण करा. ह्यावरून राजाने कालरात्री त्या ठिकाणी कन्येचा विवाह केला, असे मला वाटते. गोडगोड भाषणांनी आम्हाला फसवून विवाहविधीने ह्याने आपल्या कन्येचा सुदर्शनाबरोबर पाणिग्रहण संस्कार केला आहे. तेव्हा हे भूपहो, सांप्रत काय करणे उचित आहे, याचा आपण विचार करा. एकमेकांच्या विचाराने जे निश्चित होईल ते एकजुटिने करा."
याप्रमाणे राजाचे भाषण चालले असतानाच, ज्यांचे सामर्थ्य प्रसिद्ध आहे. अशा आपल्या काही सुहृदांसह अतुल सामध्यनि युक्त असा, तो काशीपती सुबाहूराजा, कन्येचा विवाहसंस्कार पुरा करून त्या राजांना निमंत्रण करण्याकरिता, सत्वर शहराच्या बाहेर आला. परंतु तो काशीपती येत आहे, असे अवलोकन करून, त्याच्याशी काहीएक भाषण न करता राजे क्रोधाने मौन धारण करून राहिले.
इतक्यात तो सुबाहू त्यांच्याजवळ गेला आणि प्रणिपात करून, हात जोडून त्यांना म्हणाला, "आज सर्व भूपतींनी भोजनाकरता माझ्या घरी चलावे. माझ्या कन्येने त्या सुदर्शन राजकुमाराला वरले आहे. आता आपले हित अथवा अहित करण्याचे माझ्या हाती काय बरे आहे ? आपण शांतीचे अवलंबन करावे. कारण महात्मे पुरुष दयाळू असतात."
हे त्याचे भाषण श्रवण करून राजे क्रोधाने अगदी व्याप्त होऊन गेले, आणि म्हणाले, "हे राजा, आमचे भोजन झाले. तू आता आपल्या घरी जा. संपूर्ण विवाहासंबंधी कार्ये उरकून घे. आपण आज हे फार चांगलेच कृत्य केले आहे. आता आम्ही सर्व राजांनी आपापल्या घरी जावे हेच बरे."
हे भाषण ऐकून सुबाहूही आपल्या घरी गेला आणि खिन्न व क्रुद्ध झालेले हे नृप आता करणार तरी काय ? म्हणून चिंताक्रांत होऊन विचार करू लागला.
इकडे तो गेल्यानंतर, ते भूपाल पुनरपी बेत करू लागले. काही म्हणाले, "मार्ग आडवून धरून आपण सुदर्शनाचा वध करू आणि कन्येला हरण करून घेऊ." ह्यावर दुसरे काही म्हणाले अहो, आपणाला त्या राजाशी काय कर्तव्य आहे ? आपण सर्व मंगलसंमारंभ अवलोकन करून आल्या वाटेने परत जाऊ."
ह्याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर ते सर्वही राजे सुदर्शनाचा मार्ग रोखून राहिले. इकडे घरी गेल्यावर सुबाहूने पुढली कृत्ये उरकून घेतली.