[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हे महाभगयशाली जनमेजया, ह्याप्रमाणे केरलदेशाधिपति भूपाल बोलू लागला असता, युधाजित राजाही उपरोधिकपणाने उलट त्याला म्हणाला, "हे भूपाला, आपण जे येथे भाषण करीत आहा, हे नीतिचे आहे ! राजसमाजामध्ये सत्यवचनी व जितेंद्रिय असे आपणच आहात. हे कुलधुरंधरा, योग्य वर विद्यमान असताना अयोग्य भूपतीच कन्येला योग्य ठरणे, हा न्याय आपल्यालाच रुचत आहे ! अहो, सिंहाच्या भागाचा उपभोग घेण्यास कोल्हा योग्य आहे काय ? हा सुदर्शन हे कन्यारत्न प्राप्त करून घेण्यास योग्य आहे काय ! आपणच सांगा.
हे महाराज, वेद हे विप्रांचे बल असून राजांचे बल चापजन्य होय. सांप्रत ह्या ठिकाणी मी काय बरे अन्यायाचे भाषण करीत आहे ? ज्या अर्थी राजांच्या विवाहामध्ये बल हेच शुल्क सांगितले आहे, त्या अर्थी बलवानानेच कन्या स्वीकारणे योग्य आहे. बलहीन पुरुषाला ती प्राप्त होणे कधीही योग्य नाही. असा पण करून, ह्या विचाराने मला इष्ट असलेल्या न्यायाचेच अवलंबन केले पाहिजे. असे न होईल तर राजांमध्ये कलह उपस्थित होईल.
ह्याप्रमाणे त्या ठिकाणी राजांमध्ये परस्पर विवाद उपस्थित झाला असता, नुपश्रेष्ठ सुबाहूला तेथे आवाहन झाले. त्याला बोलावल्यानंतर तत्त्वाकडे दृष्टी देणारे ते सर्व राजे त्याला म्हणाले, "हे राजा, या विवाहामध्ये निर्दोष नीतीचे तू अवलंबन केले पाहिजेस. हे नृपा, आपण या विवाहाच्या बाबतीत काय मनामध्ये ठरवले आहे ते स्वस्थपणे कथन करावे. हे भूपते, कोणाला कन्यादान करणे आपल्या मनाला बरे वाटत आहे ?"
सुबाहू म्हणाला, "खरोखर माझ्या कन्येने मनापासून यथेष्ट सुदर्शनाला वरले आहे. मी जरी तिचे अतिशय निवारण केले, तरी ती माझे म्हणणे ऐकत नाही. मी काय करू ? माझ्या कन्येचे मन माझ्या स्वाधीन नाही. शिवाय, सुदर्शनही निर्भयपणे एकटाच येथे आला आहे."
नंतर प्राप्त झालेल्या सर्व भूतींनी सुदर्शनाला तेथे आवाहन केले, आणि तो शांत सुदर्शन एकटा तेथे आल्यावर ते कर्तव्य दक्ष राजे त्याला म्हणाले, 'हे महाभाग्यवान राजपुत्रा, सुव्रता, राजसमाजामध्ये, तू न बोलता एकटा आला आहेस, तुला कोणी आवाहन केले आहे ? हे महाविचारी सुदर्शना, सैन्य, कोश व प्रचंड सामर्थ्य यांपैकी काहीच तुझ्यापाशी नसताना तू येथे कशाकरिता आला आहेस.
आम्ही सर्व राजे त्या कन्येकरता या समाजामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने, सैन्यासह आलो आहोत. या ठिकाणी तू काय करण्याचे मनामध्ये आणले आहेस. ते सांग. तुझा शूर व बलाढ्य भ्राता कन्या स्वीकारण्याच्या उद्देशाने येथे प्राप्त झाला आहे व महापराक्रमी युधाजित, त्याचे साहाय्य करण्याकरता आला आहे. आता हे राजेंद्रा, तू जा अथवा रहा, हवे ते कर. हे सुव्रता, तू सैन्यहीन आहेस. तुला आम्ही येथील इत्थंभूत वर्तमान कळविले आहे."
सुदर्शन म्हणाला, "हे नृपहो, सैन्य साहाय्य, कोश, किल्याचा आश्रय, मित्र, सुहृदय व रक्षक ह्यांपैकी माझ्यापाशी काही एक नाही, हे खरे, परंतु स्वयंवराची वार्ता ऐकून मी ते पाहण्याकरिता येथे आलो आहे व तसे करण्याविषयी मला भगवतीने स्वानामध्ये सांगितले आहे. त्याशिवाय आज दुसरे काही एक मी मनामध्ये योजलेले नाही. तिने जे ठरवले असेल तेच आज निःसंशय घडून येईल.
भूपालहो, सर्व ठिकाणी आज भवानी जगदंबिका अवलोकन करणार्या मला, ह्या जगतामध्ये कोणीही शत्रू नाही. हे राजकुमारहो, जो माझ्याशी शत्रूत्व करील त्याला ती महाविद्या शासन करील.
हे नृपश्रेष्ठहो, जे भवितव्य असेल ते होईल. अन्यथा काही होणार नाही. ह्यासंबंधाने चिंता करण्याचे प्रयोजन काय ? मी सर्वदा दैवाधीन आहे. देव, भूते, मनुष्य व इतरही सर्व प्राणी ह्या सर्वांचे ठिकाणी जी शक्ती आहे, ती तिनेच निर्माण केलेली आहे. तिच्याशिवाय कोठेही शक्ती उपलब्ध होणे शक्य नाही.
हे नृपाधिपिहो, खरोखर भूपतिति, निर्धन अथवा सधन करण्याची ती इच्छा करते, त्याला ती तसा करून सोडते. मला चिंता करण्याचे कारण काय ? त्या परम शक्तीवाचून ब्रह्मा, विष्णू महेश्वर इत्यादी देवही हालचाल करण्यास समर्थ नाहीत. तेव्हा हे नृपहो, असे जर आहे, तर मल्ला काळजी करण्याचे कारण काय ? हे नृपहो, अशक्त असो अथवा सशक्त असो, जसा आहे तसाच, देवीच्या आज्ञेप्रमाणे मी आज स्वयंवराकरता येथे प्राप्त झालो आहे. तिची जे करण्याची इच्छा असेल ते ती करील. माझ्या चिंतनाचा उपयोग काय होणार आहे ? मी सत्य तेच सांगत आहे. ह्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. हे भूपहो, जयपराजयाविषयी मला यत्किंचितही लज्जा वाटत नाही. लज्जा भगवतीला आहे आणि मी सर्वदा तिच्या स्वाधीन आहे."
सर्व नृपश्रेष्ठांनी त्याचे ते भाषण श्रवण केले आणि पुढील परिणाम जाणणारे ते भूपती होते, ते परस्परांकडे पाहू लागले. ते म्हणाले, "हे साधो, तुझे भाषण सत्य आहे ते कधीही मिथ्या होणार नाही. पण उज्जयिनीनाथ युधाजित तुझा वध करण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. हे महाविचारी सुदर्शना, तुझ्या वर्तनाने आमचे ठिकाणी दया उत्पन्न झाल्यामुळे आम्ही तुला हे सांगत आहोत. हे निष्पापा, तू मनामध्ये विचार करून जे योग्य असेल ते कर."
सुदर्शन म्हणाला हे नृपश्रेष्ठ हो ! आपण दयाळू सुहृदांनी केलेले भाषण खरे आहे. परंतु
एकदा सांगितल्यानंतर मी तरी आता पुनरपी काय बरे सांगू ? कोणाचाही मृत्यू कोणालासुद्धा कधीहि आणता येत नाही. हे सर्व चराचर जगत देवाधीन आहे. हा जीव स्वतंत्र नसून सर्वदा स्वकर्माधीन असतो. ते कर्म तत्त्ववेत्त्या विद्वानांनी तीन प्रकारचे सांगितले आहे.
संचित, वर्तमान व तिसरे प्रारब्ध, काल, कर्म व मुलभूत प्रकृती ह्मांच्या अधीन हे सर्व जगत आहे. यास्तव काळ प्राप्त झाल्याशिवाय देवही मानवाचा वध करण्यास समर्थ नाही. संचितपूर्व कर्मामध्ये निश्चित असलेल्या निमित्तमात्रांनी मृत्यु आलेल्यालाच हा सनातन काळ वध करीत असतो. ज्याप्रमाणे शत्रूंना जेरीस आणणार्या माझ्या पित्याचा सिंहाने वध केला त्याप्रमाणे माझ्या मातामहाचाही संग्रामामध्ये युधाजिताने वध केला आहे.
कोट यत्न करणार्याही पुरुषाचा दैवयोगाने वध होत असतो व रक्षणावाचून ही एखादा पुरुष हजारो वर्षे जिवंत रहात असतो. तेव्हा हे धर्मनिष्ठ नृपहो ! युधाजिताला मी कधीहि भीत नाही. दैवच श्रेष्ठ समजून मी सर्वदा स्वस्थ असतो. भगवतीचे एकसारखे निरंतर स्मरण करीत असतो. ती विश्वमाता देवी माझे कल्याण करील. शुभ अथवा अशुभ असो, जे पूर्वार्जित असेल ते भोगलेच पाहिजे. स्वतः केलेल्या कर्माचे फल प्राप्त झाले असता ज्ञानी पुरुषांना शोक कोठून होणार ? स्वकर्माचे फल प्राप्त झाल्याच्या योगाने मूढ पुरुषाला दुःख झाले असता दुःखाचे जे निमित्त कारण त्याच्याशीच खरोखर तो अल्पमती वैर धरू लागतो. तशाप्रकारचे वैर, शोक अथवा भय मला ठावूक नाही.
मी येथे राजसमाजामध्ये उत्कृष्ट स्वयंवर अवलोकन करण्याकरता निर्भयपणे एकटा आलो आहे. आता जे व्हायचे असेल ते होईल. मी चंडिकेच्या आशेने येथे आलो आहे, भगवतीचे वाक्यच मला प्रमाण आहे, तिच्याच वाक्यावर निष्ठा ठेवणार्या मला दुसरे काही माहीत नाही. सुखदुःख तिने दिले तरच प्राप्त होत असते, नाही तर प्राप्त होत नाही. हे नृपश्रेष्ठहो, युधाजिताला सुख प्राप्त होवो. माझे त्याच्याशी वैर नाही. जो माझ्याशी वैर धरील त्याला त्याचे फल प्राप्त होईल.
ह्याप्रमाणे सुदर्शनाने सांगितले असता ते भूपती संतुष्ट होऊन स्वस्थ बसले, तोही आपल्या निवासस्थानामध्ये जाऊन स्वस्थ राहिला.
नंतर दुसर्या दिवशी शुभ काली सुबाहूराजाने आपल्या मनोहर मंडपामध्ये सर्व राजांना आवाहन केले. दिव्य आस्तरणांनी युक्त अशी सिंहासने मांडून ठेवलेली होती, त्यावर अलंकार धारण केलेले ते राजे येऊन बसले. दिव्य वेष धारण करून स्वयंवर अवलोकन करण्याच्या उद्देशाने तेथे यथेष्ट बसलेले ते राजे जणू काय विमानात बसलेले देवांप्रमाणे झळकू लागले.
राजकन्या केव्हा येईल. ज्याचे पुण्य प्रसिद्ध आहे अशा कोणत्या भाग्यवान नुरपप्रत्रेष्ठाला ती वरील ? अशी सर्वानाही चिंता लागली. जेव्हा ह्या ठिकाणी ती सुदर्शनाला दैवयोगाने माळ घालील, तेव्हा राजामध्ये कलह उपस्थित होईल हाता संशय नाही. ह्याप्रमाणे सिंहासनावर बसलेले ते राजे चिंतन करू लागले असता, राजाच्या मंडपामध्ये वाद्यांचा प्रचंड घोष सुरू झाला.
नंतर जिने स्नान करून उत्कुष्ट अलंकार धारण केले आहेत, मधूक-मालेने जी युक्त आहे. पैठणी नेसून विवाहसंबंधी आभूषणे जिने धारण केलेली आहेत व जी दिव्य देहाने युक्त असल्यामुळे लक्ष्मीचीच उपमा जिला योग्य आहे, उत्कृष्ट वस्त्र धारण केलेली व चिंताक्रांत झालेली अशी जी आपली कन्या शशिकला, तिला काशीराज हसतमुखाने म्हणाला, "हे कन्ये हातात शुभमाला घेऊन तू मंडपामध्ये जा, राजसमाजाकडे दृष्टी दे. गुणी, रूपवान व कुलीन असा जो नृपश्रेष्ठ तुझ्या मनामध्ये येईल, त्याला हे सुंदरी तू वर. हे सुंदरी अनेक देशातील राजे सिंहासनावर बसलेले आहेत, ते तू अवलोकन कर आणि आपल्या आवडीप्रमाणे पती वर."
ह्याप्रमाणे तो सांगत असताना, मितभाषण करणारी ती बाला राजाशी मनोहर व धर्मयुक्त भाषण करू लागली. शशिकला म्हणाली, "हे तात, नराधिपति जे कामुक राजे, त्यांच्या दृष्टीचे टप्प्यात जाणार्या स्त्रिया दुसर्या असतात. मी खरोखर तेथे जाणार नाही. हे तात, स्त्रीने एकच वर अवलोकन करणे योग्य आहे. दुसरा अवलोकन करणे योग्य नाही. हे धर्मशास्त्रातील वचन योग्य आहे. ते मी ऐकले आहे. जी पुष्कळांच्या समोर जाते, तिचे सतीत्व नष्ट झाले म्हणून समजावे. कारण ती दृष्टीस पडताक्षणीच, "ही मला प्राप्त होवो." म्हणून ते सर्वही इच्छा करू लागतात.
स्वयंवरसमयी हातात माळ घेऊन जेव्हा स्त्री मंडपामध्ये जाते, तेव्हा ती एखाद्या जारिणी स्त्रीप्रमाणे सर्वसाधारण स्त्री होते, वेश्या बाजारामध्ये जाते आणि तेथे असलेले पुरुष अवलोकन करून आपल्या मनामध्ये, गुणी कोण व गुणहीन कोण ह्याचा निश्चय करते. एकावरतीच भाव न ठेवता, वेश्या व्यर्थ कामुक पुरुष शोधीत असते. तस्मात वेश्येने केलेले कृत्य मंडपामध्ये जाऊन मी कसे बरे करू ? काही लोकांनी जरी हा धर्म आचरलेला असला, तरी सांप्रत मी तो आचरणार नाही. व्रतस्थ राहिलेली मी, इच्छेप्रमाणे पतिव्रताचेच आचरण करीन. साधारण स्त्री प्रथम सभेमध्ये जाते आणि पुरुषसमुदाय मनामध्ये आणून शेवटी कोणाला तरी एकाला वरते, मी पतिव्रता आज त्याप्रमाणे कसा बरे पती वरू ? हे तात, सुदर्शनाला मी पूर्वी अगदी मनापासून वरले आहे. हे नृपश्रेष्ठा, त्या शिवाय दुसरा पती वरण्याची माझी इच्छा नाही. हे आपणाला विदित आहे. हे भूपते, आपल्याला जर माझ्या कल्याणाची इच्छा असेल तर शुभ दिवशी सुदर्शनाला विवाहविधीने आपण कन्यादान करा."