[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, "याप्रमाणे भर्त्याने् सांगितले असता, त्या राणीने आपल्या अल्पवयी कन्येला मांडीवर बसवले. त्या सुहास्थवदनेचे सांत्वन करून ती तिच्याशी मधुर भाषण करू लागली.
ती म्हणाली, "हे सुमति मला अप्रिय असे हे भाषण तू कशाकरिता करीत आहेस ? हे सुव्रते, या भाषणाने तुझ्या पित्याला दुःख होत आहे. सुदर्शन अतिशय दुर्देवी आहे. राज्यापासून तो भ्रष्ट झाला आहे. त्याला कोणाचा आश्रय नाही. सैन्य किंवा कोश यांपैकी त्याच्यापाशी काहीच नाही. बांधवांनाही त्याचा त्याग केला आहे. तो मातेसह वनामध्ये जाऊन फलमूलावर उपजीविका करीत आहे. तो सुदर्शन सांप्रत कृश झाला आहे. हा भाग्यहीन वनवासी राजपुत्र तुला योग्य वर नाही.
हे कन्यके, बुद्धिमान, रूपवान अत्यंत मान्य आणि राजचिन्हांनी अलंकृत असे इतर राजपुत्र तुला योग्य आहेत. ह्या सुदर्शनाचाही; मनोहर, रूपवान व सर्वलक्षणसंपन्न असा भ्राता असून तो कोशलदेशामध्ये राज्य करीत आहे. हे सुभ्रु, दुसरेही ह्या सुदर्शनाला न वरण्याचे जे एक कारण मी श्रवण केले आहे ते तू ऐकून घे. युधाजित राजा सर्वदा ह्याच्या वधाची इच्छा करीत असतो. त्याने सचिवांसह मसलत करून मोठे युद्ध केले आणि वीरसेन राजाचा वध करून आपल्या कन्येचा पुत्र राज्यावर बसविला. इतकेच नव्हे, परंतु सुदर्शनाचा वध करण्याकरिता भरद्वाजमुनीच्या आश्रमामध्येही तो गेला. परंतु मुनीने निवारण केल्यामुळे तो आपल्या घरी परत गेला."
शशिकला म्हणाली, "हे माते, तो राजकुमार वनवासी जरी आहे, तरी तोच मी मनामध्ये पति योजिला आहे. म्हणून हे तुझे मागणे माझ्या काय उपयोगी आहे ? शर्यातीच्या वचनावरूनच पतिव्रता सुकन्या च्यवन पती प्राप्त करून घेऊन त्याच्या शुश्रूषेविषयी तत्पर होऊन राहिली. पती शुश्रुषाच स्त्रियांना स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. खरोखर स्त्रीचे अकृत्रिम प्रेमच सुखदायक होत असते. वास्तव भगवतीने स्वप्नामध्ये जो उत्कृष्ट वर मला कथन केला आहे. त्याशिवाय दुसर्या राजकुमाराचा मी कसा बरे आश्रय करीन ? माझ्या चित्तरूप भिंतीवर भगवतीने सुदर्शनच रेखून ठेवला आहे. त्या प्रिय कांताला सोडून मी दुसरा पती करणार नाही.
ह्याप्रमाणे तिने पुष्कळ उदाहरणे देऊन वैदर्भीचा निषेध केला असता, तिने कन्येने केलेले सर्व भाषण भर्त्याला अत्यंत उत्सकुतेने कळविले. नंतर स्वयंवराच्या पूर्व दिवशी आप्त व बहुश्रुत असा एक द्विज शशिकलेने सुदर्शनाकडे सत्वर पाठवला. तेव्हा ती त्याला म्हणाली, "माझ्या पित्याला समजू न देता आपण भरद्वाज मुनींच्या, आश्रमामध्ये सुदर्शनाकडे जा. हे प्रभो, वेगाने जाऊन त्याला माझा निरोप कळवा, त्याला सांगा की ' माझ्या पित्याने खरोखर माझ्याकरिता स्वयंवराची तयारी केली आहे. तेथे बलाढ्य राजे अनेक येणार आहेत. परंतु प्रेमपूर्वक मी सर्वस्वी आपल्यालाच मनामध्ये वरले आहे. हे देवतुल्य राजकुमारा, भगवतीने स्वप्नामध्ये आपलाच निर्देश माझ्यापाशी केला आहे. मातापितरांनी जरी मला सांगितले, तरीही मी आपल्या शिवाय दुसर्याला वरणार नाही. तसा प्रसंग आल्यास मी विष प्राशन करीन वा प्रदीप्त अग्नीमध्ये उडी घालीन. मनाने, कृतीने व वाचेने मी आपणालाच पती वरले आहे. भगवतीच्या प्रसादाने आपल्याला यश प्राप्त होईल.
दैवाचे उत्कृष्ट बल आहे असे समजून आपण त्वरित या ठिकाणी यावे. चराचर जगत, दैव, व शक्तीवरच अवलंबून आहे. भगवतीने जे सांगितले आहे, ते कधीही मिथ्या होणार नाही. कारण 'शंकरादि सर्व देवताही तिच्याच आधीन आहेत.' हे ब्राह्मणा, याप्रमाणे आपण त्या राजपुत्राला एकांतामध्ये माझा निरोप सांगा. हे निष्पापा, हे माझे कार्य सिद्धीस जाईल असे आपण करा."
ह्याप्रमाणे सांगून व दक्षिणा देऊन, तिने तो द्विज पाठविला असता त्याने तिथे जाऊन सुदर्शनाला, सर्व निवेदन केले व तो सत्वर परत आला, ते समजल्यावर सुदर्शनाने तेथे जाण्याचा निश्चय केला. त्या भरद्वाज मुनींनीही त्याला मोठ्या आदराने पाठविले.
ह्याप्रमाणे जाण्याविषयी उद्यत झालेल्या त्या पुत्राला, मनोरमा अतिशय दुःखाकूल व त्रस्त होऊन नेत्रांमध्ये अश्रू आणून कापत म्हणाली, "तू खरोखर काय विचार करून त्या राजसमाजामध्ये स्वयंवराकरिता आज एकटा जात आहेस ? तुझ्याशी दुसर्याचे वैर घडलेले आहे. युधाजित राजा तुझा वध करण्याच्या उद्देशाने तेथे येईल. तुला दुसरा कोणी आश्रय देणार नाही. म्हणून हे बाळा, तेथे जाऊ नकोस अरे, तू माझा एकुलता एक मुलगा असून मी तुझ्या आधारावर राहिले आहे. आता मला कोणाचा आश्रय नसून मी दीन झाले आहे. ह्यास्तव हे महाभाग्यशाली बाळा, नको रे तू आज माझी निराशा करू ? अरे, ज्याने माझ्या पित्याचा वध केला, तो युधाजित राजाही तेथे गेला आहे. तू एकटा तेथे गेलास म्हणजे तो तुझा वध करील.
सुदर्शन म्हणाला, "जे भवितव्य असेल ते घडून येईलच, ह्याविषयी विचार करण्याचे
कारण नाही. जगन्मातेच्या आज्ञेने मी आज स्वयंवराला जात आहे. हे कल्याणी, तू शोक करू नकोस. हे सुमुखि तू जातीने क्षत्रिय आहेस. भगवतीच्या प्रसादामुळे मला केव्हाही भय वाटत नाही."
ह्याप्रमाणे बोलून व रथारूढ होऊन सुदर्शन जाण्यास उद्युक्त झाल्याचे दृष्टीस पडल्यावर, मनोरमेने आशीवार्दाच्या योगाने आपल्या पुत्राला आनंदीत केले. ती म्हणाली, "अग्रभागी अंबिका व पृष्ठभागी पार्वती तुझे रक्षण करो. त्याचप्रमाणे विषम मार्गामध्ये वाराही, दुर्गम प्रदेशामध्ये दुर्गा व घोर कलहसमयी परमेश्वरी कालिका तुझे रक्षण करो. त्या ठिकाणी मंडपामध्ये मातंगी, स्वयंवरामध्ये सौम्या व भूपांमध्ये भवमोचनी भवानी तुझे रक्षण करो. गिरीवरील दुर्गम स्थलामध्ये गिरिजा, चौकामध्ये चामुंडा व अरण्यामध्ये स्वेच्छेने संचार करणारी सनातनी, तुझे रक्षण करो. हे रघुवंशजश्रेष्ठा, विवादामध्ये वैष्णवी शक्ती तुझे रक्षण करो. हे सौम्या, रणामध्ये शत्रूंशी समागम झाला असता भैरवी तुझे रक्षण करो. सर्व देशांमध्ये महामाया जगन्माता व सच्चिदानंदरूपी भुवेनश्वरी तुझे रक्षण करो.
असे आशीर्वाद देऊन भयाने व्याकूळ झालेली ती माता कापत कापत त्याला म्हणाली, " काहीही झाले तरी मी तुझ्योबर येईन. तुझ्यावाचून येथे अर्धे निमिषही राहाण्याची माझी इच्छा नाही. हे वत्सा, जेथे जाण्याचे तुझ्या मनामध्ये असेल तेथे तू मला बरोबर ने." असे बोलून ती माता दासीसह आश्रमाबाहेर पडली. ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला असता, ते सर्वही हर्षयुक्त होऊन चालू लागले.
नंतर तो रघुवंशज सुदर्शन केवळ एका रथासह वाराणसीमध्ये प्राप्त झाला असता, सुबाहूला हे समजल्यावर त्याने त्याचा पूजनादिकांनी सत्कार केला. वास्तव्य करण्याकरता एक मंदिर दिले. अन्नपानादिकांची व्यवस्था केली. शुश्रूषेकरता सेवाकाला आज्ञा करून त्याची तजवीज ठेवली.
नंतर अनेक देशांचे राजे तेथे जुळले असता युध्गजितही आपल्या नातवाला बरोबर घेऊन तेथे आला. त्याचप्रमाणे करूषदेशाधिपति, मद्रदेशाधिपति, वीर सिंधुराज, योद्धा महिष्मती, पांचालराज, पर्वतीय, अति वीर्यवान कामरूपदेशाधिपति, कर्नाटकदेशाधिपति, चोलदेशपति व महाबलाढ्य विदर्भदेशाधिपति हेही तेथे आले. त्रेसष्ठ अक्षौहिणी सैन्य तेथे जुळले व सर्व बाजूंनी तळ देऊन राहिलेल्या सैन्यामुळे ती नगरी फुलून गेली होती. असे अनेक राजे, श्रेष्ठ गज, अश्व इत्यादी, सैन्य बरोबर घेऊन स्वयंवर अवलोकन करण्याच्या उद्देशाने तेथे जुळले होते.
नंतर तेथे जुळलेले ते राजकुमार एकमेकांना म्हणाले, "महामुनीच्या आश्रमात राहणारा हा सुदर्शन, मातेसह रथारूढ होऊन एकटाच निर्भयपणे येथे आला आहे हे योग्य आहे काय ? सेन व आयुधे यासह आलेल्या या आम्हा राजपुत्रांचा त्याग करून ती राजकन्या महापराक्रमी परंतु सैन्यही नसलेल्या अशा हा सुदर्शनाला वरणार आहे काय ?"
नंतर महाराज युधाजित त्या भूपतींना म्हणाला, त्या राजकन्येकरता मी त्याचा वध करीन यात संशय नाही."
तेव्हा नितिमान केरलदेशाधिपति त्याला म्हणाला, हे राजा, ह्या इच्छास्वयंवरामध्ये युद्ध करण्याचे कारण नाही. बलात्काराने कन्या हरण करणे हा प्रकार येथे नाही. तो शौर्यशुल्क स्वयंवरामध्येच असतो. परंतु येथे हे शुल्कस्वयंवर नाही. येथे कन्येचे स्वयंवर व्हावयाचे आहे, म्हणून विवाद उपस्थित होण्याचे कारण काय ? प्रथमतः आपण ह्याला अन्यायाने राज्यावरून हाकलून लावले आहे.
हे नृपश्रेष्ठा, ते प्रचंड राज्य आपण आपल्या दौहित्राला अर्पण केले आहे. हे भाग्यशाली भूपते, हाही ककुस्थकुलोत्पन्न सुदर्शन कोसलदेशाधिपतिचाच पुत्र आहे. म्हणून ह्या निरपराधी राजपुत्राचा वध आपण काय म्हणून करणार ? हे नृपश्रेष्ठा, ह्या अपराधाचे फल खरोखर आपल्याला प्राप्त होईल. ह्या जगताच्या कोणीतरी दीर्घायुषी जगदीश शास्ता आहे. हे राजेंद्रा, परिणामी धर्माचा व सत्याचाच जय होत असतो. अधर्माचा आणि असत्याचा जय होत नाही.
म्हणून आपण खरोखर अनीतीने वागू नका. पाप बुद्धी सोडून द्या. आपला नातूही येथे आला आहे. तोही रुपवान, श्रीमान व राज्याधिपति आहे. ह्यास्तव कदाचित त्याला तरी ती राजकन्या का वरणार नाही ? त्याचप्रमाणे, त्याच्यापेक्षा बलाढ्य असे, इतर राजपुत्र हवे तितके पडले आहेत. परंतु ह्या स्वयंवरामध्ये ती राजकन्या योग्य वाटेल त्याचा स्वीकार करील. त्याप्रमाणे पति वरल्यानंतर विवाद तो कोणता राहिला ? हे भूपतींनो तुम्हीच सांगा की, समंजस पुरुषाने ह्या प्रसंगी परस्परविरोध धरणे योग्य आहे काय ? असे कधीही होणार नाही."