श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
सप्तदशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


विश्वामित्रकथोत्तरं राजपुत्रस्य कामबीजप्राप्तिवर्णनम्

व्यास उवाच
इत्याकर्ण्य वचस्तस्य मुनेस्तत्रावनीपतिः ।
मन्त्रिवृद्धं समाहूय पप्रच्छ तमतन्द्रितः ॥ १ ॥
किं कर्तव्यं सुबुद्धेऽत्र मयाऽद्य वद सुव्रत ।
बलान्नयामि तां कामं सपुत्राञ्च सुभाषिणीम् ॥ २ ॥
रिपुरल्पोऽपि नोपेक्ष्यः सर्वथा शुभमिच्छता ।
राजयक्ष्मेव संवृद्धो मृत्यवे परिकल्पयेत् ॥ ३ ॥
नात्र सैन्यं न योद्धास्ति यो मामत्र निवारयेत् ।
गृहीत्वा हन्मि तं तत्र दौहित्रस्य रिपुं किल ॥ ४ ॥
निष्कण्टकं भवेद्राज्यं यताम्यद्य बलादहम् ।
हते सुदर्शने नूनं निर्भयोऽसौ भवेदिति ॥ ५ ॥

प्रधान उवाच
साहसं न हि कर्तव्यं श्रुतं राजन् मुनेर्वचः ।
विश्‍वामित्रस्य दृष्टान्तः कथितस्तेन मारिष ॥ ६ ॥
पुरा गाधिसुतः श्रीमान्विश्‍वामित्रोऽतिविश्रुतः ।
विचरन्स नृपश्रेष्ठो वसिष्ठाश्रममभ्यगात् ॥ ७ ॥
नमस्कृत्य च तं राजा विश्‍वामित्रः प्रतापवान् ।
उपविष्टो नृपश्रेष्ठो मुनिना दत्तविष्टरः ॥ ८ ॥
निमन्त्रितो वसिष्ठेन भोजनाय महात्मना ।
ससैन्यश्‍च स्थितो राजा गाधिपुत्रो महायशाः ॥ ९ ॥
नन्दिन्याऽऽसादितं सर्वं भक्ष्यभोज्यादिकं च यत् ।
भुक्त्वा राजा ससैन्यश्‍च वाञ्छितं तत्र भोजनम् ॥ १० ॥
प्रतापं तञ्च नन्दिन्याः परिज्ञाय स पार्थिवः ।
ययाचे नन्दिनीं राजा वसिष्ठं मुनिसत्तमम् ॥ ११ ॥
विश्‍वामित्र उवाच
मुने धेनुसहस्रं ते घटोध्नीनां ददाम्यहम् ।
नन्दिनीं देहि मे धेनुं प्रार्थयामि परन्तप ॥ १२ ॥
वसिष्ठ उवाच
होमधेनुरियं राजन्न ददामि कथञ्चन ।
सहस्रञ्चापि धेनूनां तवेदं तव तिष्ठतु ॥ १३ ॥

विश्‍वामित्र उवाच
अयुतं वाथ लक्ष्यं वा ददामि मनसेप्सितम् ।
द्देहि मे नन्दिनीं साधो ग्रहीष्यामि बलादथ ॥ १४ ॥
वसिष्ठ उवाच
कामं गृहाण नृपते बलादद्य यथारुचि ।
नाहं ददामि ते राजन्स्वेच्छया नन्दिनीं गृहात् ॥ १५ ॥
तच्छ्रुत्वा नृपतिर्भृत्यानादिदेश महाबलान् ।
नयघ्वं नन्दिनीं धेनुं बलदर्पसुसंस्थिताः ॥ १६ ॥
ते भृत्या जगृहुस्तां तु हठादाक्रम्य यन्त्रिताम् ।
वेपमाना मुनिं प्राह सुरभिः साश्रुलोचना ॥ १७ ॥
मुने त्यजसि मां कस्मात्कर्षयन्ति सुयन्त्रिताम् ।
मुनिस्तां प्रत्युवाचेदं त्यजे नाहं सुदुग्धदे ॥ १८ ॥
बलान्नयति राजाऽसौ पूजितोऽद्य मया शुभे ।
किं करोमि न चेच्छामि त्यक्तुं त्वां मनसा किल ॥ १९ ॥
इत्युक्ता मुनिना धेनुः क्रोधयुक्ता बभूव ह ।
हम्भारवं चकाराशु क्रूरशब्दं सुदारुणम् ॥ २० ॥
उद्‍गतास्तत्र देहात्तु दैत्या घोरतरास्तदा ।
सायुधास्तिष्ठ तिष्ठेति ब्रुवन्तः कवचावृताः ॥ २१ ॥
सैन्यं सर्वं हतं तैस्तु नन्दिनी प्रतिमोचिता ।
एकाकी निर्गतो राजा विश्‍वामित्रोऽतिदुःखितः ॥ २२ ॥
हन्त पापोऽतिदीनात्मा निन्दन् क्षात्रबलं महत् ।
ब्राह्मं बलं दुराराध्यं मत्वा तपसि संस्थितः ॥ २३ ॥
तप्त्वा बहूनि वर्षाणि तपो घोरं महावने ।
ऋषित्वं प्राप गाधेयस्त्यक्त्वा क्षात्रं विधिं पुनः ॥ २४ ॥
तस्मात्त्वमपि राजेन्द्र मा कृथा वैरमद्‌भुतम् ।
कुलनाशकरं नूनं तापसैः सह संयुगम् ॥ २५ ॥
मुनिवर्यं व्रजाद्य त्वं समाश्‍वास्य तपोनिधिम् ।
सुदर्शनोऽपि राजेन्द्र तिष्ठत्वत्र यथासुखम् ॥ २६ ॥
बालोऽयं निर्धनः किं ते करिष्यति नृपाहितम् ।
वृथा ते वैरभावोऽयमनाथे दुर्बले शिशौ ॥ २७ ॥
दया सर्वत्र कर्तव्या दैवाधीनमिदं जगत् ।
ईर्ष्यया किं नृपश्रेष्ठ यद्‌भाव्यं तद्‌भविष्यति ॥ २८ ॥
वज्रं तृणायते राजन् दैवयोगान्न संशयः ।
तृणं वज्रायते क्वापि समये दैवयोगतः ॥ २९ ॥
शशको हन्ति शार्दूलं मशको वै तथा गजम् ।
साहसं मुञ्च मेधाविन् कुरु मे वचनं हितम् ॥ ३० ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्य युधाजिन्नृपसत्तमः ।
प्रणम्य तं मुनिं मूर्घ्ना जगाम स्वपुरं नृपः ॥ ३१ ॥
मनोरमाऽपि स्वस्थाऽभूदाश्रमे तत्र संस्थिता ।
पालयामास पुत्रं तं सुदर्शनमृतव्रतम् ॥ ३२ ॥
दिने दिने कुमारोऽसौ जगामोपचयं ततः ।
मुनिबालगतः क्रीडन्निर्भयः सर्वतः शुभः ॥ ३३ ॥
एकस्मिन्समये तत्र विदल्लं समुपागतम् ।
क्लीबेति मुनिपुत्रस्तमामन्त्रयत्तदन्तिके ॥ ३४ ॥
सुदर्शनस्तु तच्छ्रुत्वा दधारैकाक्षरं स्फुटम् ।
अनुस्वारयुतं तच्च प्रोवाचापि पुनः पुनः ॥ ३५ ॥
बीजं वै कामराजाख्यं गृहीतं मनसा तदा ।
जजाप बालकोऽत्यर्थं धृत्वा चेतसि सादरम् ॥ ३६ ॥
भावियोगान्महाराज कामराजाख्यमद्‌भुतम् ।
स्वभावेनैव तेनेत्थं गृहीतं बालकेन वै ॥ ३७ ॥
तदाऽसौ पञ्चमे वर्षे प्राप्य मन्त्रमनुत्तमम् ।
ऋषिच्छन्दोविहीनञ्च ध्यानन्यासविवर्जितम् ॥ ३८ ॥
प्रजपन्मनसा नित्यं क्रीडत्यपि स्वपित्यपि ।
विसस्मार न तं मन्त्रं ज्ञात्वा सारमिति स्वयम् ॥ ३९ ॥
वर्षे चैकादशे प्राप्ते कुमारोऽसौ नृपात्मजः ।
मुनिना चोपनीतोऽथ वेदमध्यापितस्तथा ॥ ४० ॥
धनुर्वेदं तथा साङ्गं नीतिशास्त्रं विधानतः ।
अभ्यस्ताः सकला विद्यास्तेन मन्त्रबलादिना ॥ ४१ ॥
कदाचित्सोऽपि प्रत्यक्षं देवीरूपं ददर्श ह ।
रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तसर्वाङ्गभूषणम् ॥ ४२ ॥
गरुडे वाहने संस्थां वैष्णवीं शक्तिमद्‌भुताम् ।
दृष्ट्वा प्रसन्नवदनः स बभूव नृपात्मजः ॥ ४३ ॥
वने तस्मिंस्थितः सोऽथ सर्वविद्यार्थतत्त्ववित् ।
मातरं सेवमानस्तु विजहार नदीतटे ॥ ४४ ॥
शरासनञ्च सम्प्राप्तं विशिखाश्‍च शिलाशिताः ।
तूणीरकवचं तस्मै दत्तं चाम्बिकया वने ॥ ४५ ॥
एतस्मिन्समये पुत्री काशिराजस्य सुप्रिया ।
नाम्ना शशिकला दिव्या सर्वलक्षणसंयुता ॥ ४६ ॥
शुश्राव नृपपुत्रं तं वनस्थञ्च सुदर्शनम् ।
सर्वलक्षणसम्पन्नं शूरं काममिवापरम् ॥ ४७ ॥
बन्दीजनमुखाच्छ्रुत्वा राजपुत्रं सुसङ्गतम् ।
चकमे मनसा तं वै वरं वरयितुं धिया ॥ ४८ ॥
स्वप्ने तस्याः समागम्य जगदम्बा निशान्तरे ।
उवाच वचनं चेदं समाश्‍वास्य सुसंस्थिता ॥ ४९ ॥
वरं वरय सुश्रोणि मम भक्तः सुदर्शनः ।
सर्वकामप्रदस्तेऽस्तु वचनान्मम भामिनि ॥ ५० ॥
एवं शशिकला दृष्टा स्वप्ने रूपं मनोहरम् ।
अम्बाया वचनं स्मृत्वा जहर्ष भृशभामिनी ॥ ५१ ॥
उत्थिता सा मुदा युक्ता पृष्टा मात्रा पुनः पुनः ।
प्रमोदे कारणं बाला नोवाचातित्रपान्विता ॥ ५२ ॥
जहास मुदमापन्ना स्मृत्वा स्वप्नं मुहुर्मुहुः ।
सखीं प्राह तदान्यां वै स्वप्नवृत्तं सविस्तरम् ॥ ५३ ॥
कदाचित्सा विहारार्थमवापोपवनं शुभम् ।
सखीयुक्ता विशालाक्षी चम्पकैरुपशोभितम् ॥ ५४ ॥
पुष्पाणि चिन्वती बाला चम्पकाधःस्थिताबला ।
अपश्यद्‍ब्राह्मणं मार्गे आगच्छन्तं त्वरान्वितम् ॥ ५५ ॥
तं प्रणम्य द्विजं श्यामा बभाषे मधुरं वचः ।
कुतो देशान्महाभाग कृतमागमनं त्वया ॥ ५६ ॥
द्विज उवाच
भारद्वाजाश्रमाद्‌बाले नूनमागमनं मम ।
जातं वै कार्ययोगेन किं पृच्छसि वदस्व मे ॥ ५७ ॥
शशिकलोवाच
तत्राश्रमे महाभाग वर्णनीयं किमस्ति वै ।
लोकातिगं विशेषेण प्रेक्षणीयतमं किल ॥ ५८ ॥
ब्राह्मण उवाच
ध्रुवसन्धिसुतः श्रीमानास्ते सुदर्शनो नृपः ।
यथार्थनामा सुश्रोणि वर्तते पुरुषोत्तमः ॥ ५९ ॥
तस्य लोचनमत्यन्तं निष्फलं प्रतिभाति मे ।
येन दृष्टो न वामोरु कुमारस्तु सुदर्शनः ॥ ६० ॥
एकत्र निहिता धात्रा गुणाः सर्वे सिसृक्षुणा ।
गुणानामाकरं द्रष्टुं मन्ये तेनैव कौतुकात् ॥ ६१ ॥
तव योग्यः कुमारोऽसौ भर्ता भवितुमर्हति ।
योगोऽयं विहितोऽप्यासीन्मणिकाञ्चनयोरिव ॥ ६२ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
विश्वामित्रकथोत्तरं राजपुत्रस्य कामबीजप्राप्तिवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥


शशिकलेला स्वप्नात देवीचा दृष्टांत

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, ह्याप्रमाणे त्या मुनींचे भाषण श्रवण केल्यानंतर तो स्वकर्तव्यदक्ष भूपति वृद्ध मंत्र्यासह हाक मारून म्हणाला, "हे सुबुद्धे, हे सुव्रता, ह्या प्रसंगी मी आज काय करावे, ते तू सांग. मनोहर भाषण करणारी ती मनोरमा, पुत्रासह मी बलात्काराने घेऊन जावे काय ? कल्याणेच्छु पुरुषाने शत्रु जरी बाल असला, तरी त्याची कधीही उपेक्षा करू नये. कारण तो क्षयरोगाप्रमाणे वृद्धिंगत होऊन मृत्यूला कारणीभूत होतो. ह्या ठिकाणी कोणाचे सैन्य नाही व माझे निवारण करणारा प्रतिपक्षी योद्धाही कोणी नाही. म्हणून माझ्या नातवाचा शत्रू जो सुदर्शन त्याला मी खरोखर ठार करतो, म्हणजे नातवाचे राज्य निष्कंटक होईल. म्हणून मला आज स्वसामर्थ्यानुरूप प्रयत्‍न केलाच पाहिजे. सुदर्शनाचा वध झाला असताच माझा नातू खरोखरच निर्भय होईल."

प्रधान म्हणाला, "हे राजा, साहस करू नये मुनीचे वचन तू ऐकले आहेस. हे आर्या, त्याने विश्वामित्राचा दृष्टांत संक्षेपाने तुला सांगितला आहे. तो सविस्तर मी तुला सांगतो. त्यावरून ह्या प्रसंगी कसे वागावे हे तुझ्या ध्यानी येईल.

पूर्वी विश्वामित्र म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेला वैभवशाली नृपश्रेष्ठ गाधिनंदन, एकदा वसिष्ठमुनींच्या आश्रमात आला व मुनींना नमस्कार करूना तो प्रतापी नृपश्रेष्ठ विश्वामित्रराजा, मुनींनी आसन दिल्यावर तेथे बसला. महात्मा वसिष्ठांनी भोजनाकरिता निमंत्रण केले असता तो महायशस्वी गाधिपुत्र विश्वामित्रराजा सैन्यासह भोजनाकरता तेथे राहिला. वसिष्ठमुनींच्या आश्रमात नंदिनीनामक कामधेनूची कन्या होती. त्या नंदिनीने त्या ठिकाणी भक्ष्य, भोज्य वगैरे सर्व अन्न उत्पन्न केले होते. ते वांछित अन्न सैन्यासह त्या ठिकाणी राजाने भक्षण केले.

तो सर्व नंदिनीचा प्रभाव आहे, असे कळल्यावर, त्या विश्वमित्रराजाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठांपाशी तिची याचना केली. वसिष्ठ म्हणाला, "हे राजा, ही माझी कामधेनू आहे. मी ही कधी देणार नाही. ह्या तुझ्या सहस्र धेनू तुझ्यापाशीच राहोत. त्या मला नकोत."

विश्वामित्र म्हणाला, "आपल्या मनात वाटतील त्या दहा हजार अथवा लक्ष धेनूही मी आपणाला देतो. परंतु हे साधो, मला आपण धेनू द्या, नाही तर मी बलात्काराने हिला घेऊन जाईन."

वसिष्ठ म्हणाले, "हे राजा, तू आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या घरातून नंदिनीला बलात्काराने खुशाल घेऊन जा. हे राजा, मी तुला स्वेच्छेने ती देणार नाही."

हे श्रवण केल्यानंतर, राजा महाबलाढ्य सेवकांना म्हणाला, "तुम्ही नंदिनी धेनू घेऊन जा. तुम्ही बलाढ्य, अभिमानी व दृढनिश्चयी आहात."

ह्या नंतर त्या सेवकांनी हट्टाने दांडगाई करून ती धेनू जखडून बांधली व ते घेऊन जाऊ लागले.

तेव्हा डोळ्यांमध्ये अश्रू आणून ती सुरभी कापत कापत वसिष्ठ मुनींना म्हणाली, "हे मुने, आपण माझा का बरे त्याग करीत आहा ? मला जखडून टाकून हे का ओढीत आहेत ?"

यावर वसिष्ठ मुनि तिला म्हणाले, "हे सुदुग्धदे, मी तुझा त्याग करीत नाही. हे कल्याणी, राजाचे मी आज आदरातिथ्य केले असूनही, तो केवळ लोभाने तुला बलात्काराने नेत आहे. मी काय बरे करू ? खरोखर मनापासून तुझा त्याग करण्याची माझी इच्छा नाही."

याप्रमाणे मुनीनी सांगितल्यानंतर ती धेनू क्रुद्ध झाली आणि अत्यंत भयंकर व क्रूर स्वराने युक्त असा एक हंबरडा तिने फोडला. तेव्हा तिच्या देहापासून आयुधे धारण केलेले व कवच घातलेले अतिघोर दैत्य "थांब थांब" असे म्हणत बाहेर पडले. त्यांनी त्या सर्व सैन्याचा वध केला आणि नंदिनीला सोडविले. हे पाहून अति दुःखित झालेला तो विश्वामित्र राजा एकटाच तेधून निघून गेला. तो पापी, मनामध्ये अतिशय खिन्न झाला.

क्षत्रियांच्या प्रचंड सामर्थ्याची तो निंदा करू लागला. ते ब्राह्मणाचे सामर्थ्य आपणास प्राप्त होणे दुर्घट आहे, असे समजून, ते प्राप्त होण्याकरिता तो तपश्चर्या करू लागला.

महावनामध्ये त्याने पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली आणि क्षात्रधर्माचा त्याग करून, त्या गाधिनंदनाने ऋषित्व प्राप्त करून घेतले. हे राजेंद्रा, तूही खरोखर युद्ध करून कुलनाशक असे अद्‌भुत वैर तापसांबरोबर न करता सांत्वनपूर्वक आज त्या तपोनिधी मुनिश्रेष्ठाला शरण जा. हे राजेंद्रा, सुदर्शनही खुशाल येथेच असू दे, हा बालक, निर्धन सुदर्शन तुजे काय बरे अहित करणार आहे ? हे राजा, अनाथ व दुर्बल अशा या बालकाविषयी तू व्यर्थ वैरभाव केला आहे.

अरे, सर्वांवर दया करावी. हे जगत दैवाधीन आहे. हे नृपश्रेष्ठा, ईर्षेचा काय बरे उपयोग आहे ? जे होणे असेल ते होईल. हे राजा दैवयोगाने कोठे कोठे वज्र निःसंशय तृणतुल्य होते; आणि काही प्रसंगी दैवयोगाने तृणही वज्रतुल्य होते. हे बुद्धिमान राजा, दैवयोगामुळे सशाच्या हातून वाघाचा व मशकाच्या हातून गजाचा वध होत असतो, म्हणून तू हे साहस सोडून दे. हा माझा हितोपदेश ऐक.

ते त्याचे भाषण श्रवण करून नृपश्रेष्ठ युधाजिताने त्या मुनीला शरण जाऊन,

नम्रतापूर्वक प्रणाम केला. त्यांची आज्ञा घेऊन तो राजा आपल्या राजधानीला निघून गेला. तेव्हा आश्रमामध्ये असलेली ती मनोरमाही स्वस्थ झाली. सत्यव्रताचे अवलंबन केलेल्या त्या आपल्या सुदर्शन संज्ञक पुत्राचे परिपालन करू लागली. पुढे दिवसानुदिवस तो शुभ कुमार वृद्धिंगत होऊ लागला. ऋषीपुत्राबरोबर निर्भयपणे चोहोकडे क्रीडा करू लागला.

एकदा विदल्ल मंत्री तेथे आला असता सहज थट्टेने "हे क्लीबा", म्हणून एका मुनिपुत्राने त्या विदल्लाला जवळ जाऊन हाक मारली. सुदर्शनाने ते ऐकून त्याचे पहिले अक्षर क्ली, म्हणजे अनुस्वार रहित कामबीज हे मात्र स्पष्टपणे त्याने लक्ष्यात ठेवले आणि सहज लीलेने तो वारंवार त्याचा उच्चार करू लागला.

भगवती देवीचे कामबीज जो ऐकतो. ते हेच असावे असे समजून मनामध्ये ते कामबीज नावाचे बीज वारंवार आदराने लक्षात ठेवून तो बालक त्याचा एकसारखा जप करू लागला.

हे महाराज, भवितव्यतेमुळे, त्या बालकाने सहज ते कामबीजसंज्ञक अद्‌भूत बीज ह्याप्रमाणे चित्तामध्ये धारण केले. ऋषी, छंद, ध्यान व न्यास यांनी विरहित असा उत्कृष्ट मंत्र पाचवे वर्षी त्या बालकाला प्राप्त झाला असता, मनाने नेहमी त्याचा जप करीत करीतच, तो खेळत असे व शयन, भोजन करीत असे. पूर्वसुकृताचे, हेच सार आहे. असे आपोआपच त्याच्या मनाने घेतले असल्यामुळे, त्याला त्या मंत्राची विस्मृती झाली नाही.

अकरावे वर्ष प्राप्त झाल्यानंतर, त्या नृपनंदन बालकाचे मुनींनी उपनयन केले आणि वेद, सांग धनुर्वेद त्याला यथाविधि शिकविले. त्याने त्या मंत्रसामर्थ्यांमुळे तो लवकर सर्व विद्यांचा अभ्यास करीत असता, एकदा प्रत्यक्ष देवीचे त्याला दर्शन झाले.

ते रूप, रक्तवर्ण वस्त्र, रक्तवर्ण कांति, रक्तवर्ण सर्व अवयव आणि रक्तवर्ण भूषणे यांनी युक्त होते. गरुड वाहनावर आरूढ झालेली ती अद्‌भूत वैष्णवी शक्ति दृष्टीस पडताच त्या राजपुत्राचे मुखकमल प्रसन्न झाले. नंतर त्या वनामध्ये राहात असता, सर्व विद्यांचे रहस्य जाणणारा तो राजकुमार, मातेची शुश्रूषा करीत करीत नदीतीरी क्रीडा करू लागला. एके दिवशी वनामध्ये एकटाच खेळत असता धनुष्य, शिळेवर घासलेले बाण, भाता व कवच ही त्याला अंबिकेने दिली. ह्याप्रमाणे तो अंबिकेच्या प्रसादाने शूरवीर व सर्वगुणसंपन्न झाला.

हे राजा, याच काळात एक महावैभवशाली सुबाहू नामक काशीराजा राजा राज्य करीत होता. त्याला सर्वलक्षणसंपन्न एक शशिकला नावाची कन्या होती. ती काशीराजाला फारच प्रिय होती. एकदा तिने, सर्वलक्षणसंपन्न, शूर व दुसरा मदनच की काय, अशा त्या वनस्थ राजपुत्र सुदर्शनाविषयी वृत्तांत श्रवण केला. कोणी एका भाटाच्या मुखातून हे श्रवण केल्यानंतर अत्यंत संमत झालेल्या, त्या श्रेष्ठ राजपुत्राला वरण्याविषयी तिने विचारपूर्वक मनामध्ये निश्चय केला.

एकदा रात्री तिच्या स्वप्नामध्ये जगदंबा आली, स्वस्थ उभी राहून सांत्वनपूर्वक तिला म्हणाली, "हे सुंदरी, तुझ्यावर मी प्रसन्न आहे; तू वर माग. हे भामिनी, माझ्या वरप्रसादाने माझा भक्त सुदर्शन, तुझे सर्व मनोरथ परिपूर्ण करणारा पति तुला प्राप्त होईल." याप्रमाणे स्वप्नामध्ये मनोहर रूप अवलोकन केल्यावर ती जागी झाली असताही अंबेच्या वचनाचे स्मरण झाल्यामुळे, त्या अत्यंत मानी शशिकलेला फारच हर्ष झाला. ती आनंदयुक्त होऊनच शय्येवरून उठली. तेव्हा मातेने आनंदाचे कारण वारंवार विचारले असता, अतिशय लज्जित झालेल्या त्या बालेने, तिच्याशी काही एक भाषण केले नाही. नंतर वारंवार स्वप्नाची आठवण होऊन आनंदित झालेली ती बाला, मनातल्या मनात हसू लागली. तो स्वप्नातील वृत्तांत आपल्या एका सखीला तिने सविस्तर कथन केला.

एकदा ती विशालनयना राजकन्या, चंपक वृक्षांनी सुशोभित असलेल्या एका शुभ उपवनामध्ये सखीसह क्रीडा करण्याकरिता गेली. ती अबला चंपकवृक्षाखाली फुले वेचू लागली. त्यावेळी मार्गाने सत्वर येत असलेला एक ब्राह्मण तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्या द्विजाला प्रणाम करून ती तरुणी म्हणाली, "हे महाभाग्यवान विप्रा, कोणत्या देशातून आपले येणे झाले ?" असा मधुर शब्दांनी प्रश्न केला असता, तो द्विज म्हणाला, "हे बाले, खरोखर काही महत्त्वाच्या कार्याकरिताच भारद्वाजाश्रमापासून माझे आगमन झाले आहे. हे मुली, मी कोठून आलो हे तुला कळले. आता तेथील तुला काय विचारावयाचे असेल ते मला विचार."

शशिकला म्हणते, "हे महाभाग्यवान, त्या आश्रमामध्ये खरोखर अत्यंत प्रेक्षणीय, वर्णनीय व विशेषतःअलौकिक असे काय बरे आहे ?"

ब्राह्मण म्हणाला, "ध्रुवसंधीचा पुत्र श्रीमान सुदर्शन राजा तेथे आहे. हे सुंदरी, हे त्या पुरुषश्रेष्ठाचे नाव यथार्थ आहे. हे सुंदरी, ज्याने सुदर्शन राजकुमाराला, अवलोकन केले नाही, त्याची दृष्टी अत्यंत निष्फल, असे मला वाटते. जगत उत्पन्न करण्याची इच्छा करणार्‍या विधात्याने गुणांची खाण अवलोकन करण्याकरिताच की काय, उत्सुकतेने सर्व गुण तेथे एकत्र करून ठेविले आहेत, असे मला वाटते. तो राजकुमार तुला योग्य आहे व तोच तुझा भर्ता असणे उचित आहे, इतकेच नव्हे, परंतु सुवर्ण व रत्‍न यांचा योग जसा रमणीय असतो, त्याप्रमाणे हा तुम्हा उभयंताचा संयोग विधात्याने ठरविला आहे."



अध्याय सतरावा समाप्त

GO TOP