[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, "इकडे वीरसेनाचा वध झाल्यानंतर महाबलाढ्य युधाजित समरांगणातून अयोध्येमध्ये गेला आणि सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने मनोरमेची चौकशी करू लागला. "ती कोठे गेली ?" असे वारंवार विचारीत विचारीत त्याने तिच्या शोधाकरिता दूत बाहेर पाठविले. त्याने शुभ दिवशी आपल्या नातवाला सिंहासनावर बसविले. मंत्री व वसिष्ठ मुनी ह्यांनी आथर्वणवेदोक्त शुभ मंत्र म्हणून जलपूरित संपूर्ण कलशांनी, त्याला अभिषेक केला. नौबती, शंख आणि तूर्य वाद्ये वाजू लागली.
हे कुरुवंशश्रेष्ठ जनमेजया, अशा रीतीने त्या नगरीमध्ये राज्यारोहणाचा उत्सव सुरू झाला. विप्रांचे वेदपाठ, बंदिजनांच्या स्तुती व मंगलकारक विजयध्वनि ह्यांच्या योगाने अयोध्यानगरी आनंदीत झाली. धष्ट व पुष्ट जनांनी व्याप्त झालेल्या त्या नगरीमध्ये जिकडे तिकडे स्तुती व वाद्ये ह्यांचा घोष सुरू झाला. इतकेच नव्हे तर तो नूतन भूपाल सिंहासनारूढ झाला असता, ती नगरीही जशी काही नूतनच भासू लागली.
राजधानीमध्ये जे काही साधुजन होते, ते मात्र घरातच राहिले आणि सुदर्शना संबंधाने चिंतन करून शोक करू लागले.
"आज हा राजपुत्र कोठे गेला आहे ? ती महासाध्वी मनोरमा पुत्रासह कोठे बरे गेली ? राज्याचा लोभ धरून वैर्याने संग्रामामध्ये हिच्या पित्याचाही वध केला." ह्याप्रमाणे सर्वत्र समदृष्टी ठेवणारे ते साधुजन चिंतन करू लागले. शत्रुजिताच्या आधीन झाल्यामुळे ते तेथे दुःखाने राहू लागले.
नातवाला यथाविधी गादीवर बसविल्यानंतर युधाजितही मंत्र्याच्या स्वाधीन राज्य करून स्वतःच्या राजधानीकडे निघून गेला.
इकडे मुनींच्या आश्रमामध्ये सुदर्शन राहिला आहे, अशी बातमी लागताक्षणीच तो युधाजित त्याचा वध करण्याच्या उद्देशाने चित्रकूटपर्वताकडे जाण्यास निघाला. एका बल नावाच्या शूर निषादराजाला पुढे रवाना करून, तो सत्वर शृंगवेरपुराधिपतीकडे गेला.
इकडे सैन्यासह युधाजित येत आहे अशी मनोरमेला बातमी लागली. बालपुत्राने युक्त असलेली ती मनोरमा भयभीत होऊन अतिशय दुःखित झाली. नंतर शोकाने अतिशय व्याकूल झालेली ती मनोरमा नेत्रात अश्रू आणून त्या मुनींना म्हणाली, "युधाजित येत आहे. आता मी काय करू ? कोणीकडे जाऊ ? ह्याने माझ्या पित्याचा वध करून आपला नातू राजा केला आहे. आता माझ्या पुत्राचा वध करण्याकरिता सैन्यासह हा इकडे येत आहे. हे प्रभो, पूर्वी पांडव वनवासामध्ये असताना मुनींच्याच पुण्य आश्रमामध्ये द्रौपदीसह रहात होते. असे माझ्या ऐकण्यात आहे.
एकदा ते पाचही भ्राते पांडव मृगयेला गेले असता, द्रौपदी एकटीच मुनींच्या शुभ आश्रमामध्ये राहिली होती. धौम्य, अत्रि, गालव, जाबाली, गौतम, भृगू, च्यवन, अत्रिगोत्र, कण्व, वीतिहोत्र, सुमंत, यज्ञदत्त, वत्सल, राशासन, कहोड, यवक्री, यज्ञकृत व ऋतु हे व इतरही वेदपठण करणारे भरद्वाजप्रभृति सर्व शुभ मुनी, त्यावेळी, त्या आश्रमामध्ये होते. हे मुने, याप्रमाणे मुनींना भरलेल्या त्या आश्रमामध्ये सर्व मनोहर अवयवांनी युक्त असलेली ती द्रौपदी दासीसह निर्भयपणे राहिली होती.
इकडे शत्रूंना ताप देणारे ते पाचही पांडव वीर धनुर्बाण धारण करून मृगांच्या मागोमाग हिंडता हिंडता एका वनातून दुसर्या वनात गेले. इकडे सैन्याने युक्त असलेला तो श्रीमान सिंधुराजही मार्गाने जाता जाता, त्या आश्रमाजवळ आला असता, वेदघोष त्याचे कानी पडताक्षणीच मुनींचे दर्शन घेण्याकरिता तो राजा रथातून सत्वर खाली उतरला. दोन सेवकांसह तो आश्रमात आला. वेदपठन करणार्या मुनींना अवलोकन करून तो उद्योगशील जयद्रथराजा हात जोडून उभा राहिला. नंतर तो नृप मुनींनी वास्तव्य केलेल्या आश्रमामध्ये काही वेळ थांबला.
तेव्हा त्या राजाला अवलोकन करण्याकरिता मुनिभार्या व इतर स्त्रियाही तेथे जमल्या, "हा कोण ?" म्हणून त्या नृपाविषयी चौकशी करू लागल्या. त्यामध्ये सुंदरी द्रौपदीही आली होती. रूपाने दुसरी लक्ष्मीच की काय ? अशी ती द्रौपदी जयद्रथाच्या दृष्टीस पडली, कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त व दुसरी देवकन्याच, अशा त्या द्रौपदीला अवलोकन करून जयद्रथ राजा धौम्यमुनींना म्हणाला, "उत्कृष्ट मुद्रेने युक्त अशी ही तरुणी कोण आहे ? ही कोणाची भार्या ? कोणाची कन्या ? ह्या श्रेष्ठ स्त्रीचे नाव काय ? सौंदर्य, कांती ह्यांनी संपन्न असलेली ही स्त्री पृथ्वीवर आलेली जणू इंद्राणी, बाभूळ वनामध्ये असलेली लवंगालात. राक्षसांच्या समुदायामध्ये असलेली खरोखर रंभाच की काय अशी भासत
आहे. हिने आपल्या सौंदर्याने सर्व स्त्रिया मागे टाकल्या आहेत. हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ही अबला कोणाची प्रिया आहे, हे आपण मला सत्य सांगा. ही राजपत्नीप्रमाणे दिसत आहे. ही ऋषिपत्नी आहे."
धौम्य म्हणतात, "हे सिंधुराजेंद्रा, ही शुभ लक्षणांनी युक्त असलेली पांडवांची प्रिय भार्या द्रौपदी आहे. ही ह्या श्रेष्ठ आश्रमामध्ये वास्तव्य करीत आहे."
जयद्रथ म्हणतो, "ते शूर व प्रख्यात पाच पांडव सांप्रत कोणीकडे गेले ? ते महाबलाढ्य वीर ह्या वनामध्ये सुखाने राहात आहेत ना ?"
धौम्य म्हणाले, "पाचही पांडव रथारूढ होऊन मृगयेकरिता गेले आहेत. ते भूपती मृग घेऊन मध्यान्हसमयी येतील.
हे त्यांचे भाषण श्रवण केल्यावर तो जयद्रथराजा उठला. द्रौपदीचे सन्निध गेला आणि प्रणाम करून तिला म्हणाला, "हे सुंदरी, तू खुशाल आहेस ना ? तुझे पती कोणीकडे गेले आहेत ? तुम्ही वनामध्ये वास्तव्य करू लागल्यापासून आज खरोखर अकरा वर्षे झाली. "
ह्यानंतर द्रौपदी त्याला म्हणाली, "हे राजपुत्रा, तुझे कल्याण असो. आश्रमासमीप तू विश्रांती घे. पांडव एका क्षणामध्ये येतील. "
ह्याप्रमाणे ती बोलू लागली असता लोभाविष्ट झालेल्या त्या वीर भूपतीने मुनिश्रेष्ठांची पर्वा न करिता, द्रौपदीला हरण करून नेले. सूज्ञ जनांनी कसाही प्रसंग आला तरी कोणावरही विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवणार्याला दुःख प्राप्त होते. असे बली म्हणतो.
विरोचनाचा पुत्र बली श्रीमान, धर्मनिष्ठ, सत्यवचनी, यज्ञकर्ता, दाता, शरण जाण्यास योग्य व साधुजनांना संमत असा होता. तो प्रल्हादाचा पौत्र अधर्माविषयी कधीही तत्पर नसे. दक्षिणेने युक्त असे नव्व्याणव यज्ञ त्याने केले. तथापि सत्वमूर्ति महायोगिजनांना सर्वदा सेव्य, आणि निर्विकार असा जो भगवान विष्णू, त्याने देवकार्य शेवटास नेण्याकरिता त्याच्याशी कपट केले ? कपटाने वामनरूप धारण करून तो विष्णू कश्यपापासून उत्पन्न झाला. बलीचे राज्य व सागरासह पृथ्वी ही त्याने कपटाने हरण केली. तो विरोचनपुत्र बलिराजा सत्यवचनी होता. परंतु इंद्राकरिता विष्णूने त्याच्याशी कपट केले. असे माझ्या ऐकण्यात आहे. यज्ञघात करण्याच्या उद्देशाने सत्वमूर्ति विष्णूनेही वामनरूप धारण करून जर असे कपट केले तर दुसरा कोण बरे करणार नाही ? हे प्रभो, कसाही प्रसंग आला तरी कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये. अंतःकरणामध्ये जर लोभ असेल तर पापाचे भय कोठून जाणार ? हे मुने, लोभग्रस्त प्राणी खरोखर पातके करीत असतात व त्यापैकी कोणालाही परलोकभीती कधीसुद्धा वाटत नाही. ज्यांचे अंतःकरण लोभाने ग्रस्त झाले आहे, असे लोक मनाने, कायेने व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात पडतात. देवांचे आराधन करून लोक धन प्राप्तीची सतत इच्छा करीत असतात. परंतु ते धन घेऊन एखाद्याला देण्यास संमत नसतात. व्यापार, दान, चौर्य आणि सामर्थ्य ह्यांपैकी कोणत्या तरी एका साधनाने, इष्ट द्रव्ये आणून दुसर्याला देत असतात. विकण्यासाठी वैश्य धान्य, वस्त्र वगैरे पुष्कळ माल खरेदी करतो आणि मला मोठा लाभ व्हावा म्हणून देवांचे पूजन करीत असतो. कारण व्यापाराने वैश्याला परवित्त हरण करण्याची इच्छा नसते काय ?
द्रव्य घेण्याचा प्रसंग आला म्हणजे मूळ किंमतीपेक्षा आपल्या मालाची किंमत जास्त यावी, अशी तो इच्छा करीतच असतो. हे ब्रह्मनिष्ठ मुने ह्याप्रमाणे सर्वही प्राणी सर्वदा परधन-हरणाविषयी तत्पर असतात. तस्मात विश्वास तरी कशा प्रकारचा कोणी, कोणावर ठेवावा ? लोभ व मोह ह्यांनी ग्रस्त झालेल्या पुरुषांनी केलेली तीर्थयात्रा, दिलेले दान व अभ्यासलेला वेद, हे सर्व व्यर्थ होते. म्हणजे करून न केल्यासारखे होते. म्हणून हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ह्या युधाजिताला आपण घरी पाठवा. म्हणजे जानकीप्रमाणे मी पुत्रासह ह्या आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करीन."
ह्याप्रमाणे तिने त्या प्रतापी भारद्वाज मुनींना सांगितले. युधाजित राजा जेव्हा त्यांच्याकडे गेला. तेव्हा ते त्याला म्हणाले, "हे राजा तू खुशाल आपल्या राजधानीला परत जा. जिचा पुत्र बालक आहे अशी ही अत्यंत दुःखित झालेली मनोरमा, हे नृपश्रेष्ठा, तुजकडे येत नाही. तिचा पुत्रही तुला मिळत नाही.
युधाजित म्हणाला, "हे सौम्य मुने, आपण हट्ट सोडा आणि मनोरमेला मजकडे पाठवा. मी तिच्यावाचून जाणार नाही. मी आज तिला बलात्कारानेही घेऊन जाईन."