[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा म्हणाला, "हे व्यासमुने, भक्तांचे दुःख परिहार करणारा जो जगत्कारणरूप विजयशील विष्णू त्याने पूर्वी यज्ञ कसा केला ? हे महाविचारी मुने, हे महातपस्वी मुने, त्या यज्ञामध्ये ऋत्विज ह्या नात्याने वेदतत्त्व जाणणारे कोण ब्राह्मण साहाय्य करणारे होते ? हे आपण मला कथन करा म्हणजे विष्णूने केलेला तो अंबिकेचा यज्ञ स्वस्थपणे ऐकून त्याप्रमाणे मीही अनुष्ठानपूर्वक यज्ञ करीन."
व्यास म्हणाले, "हे महाभाग्यशाली राजा, भगवानाने विधिपूर्वक यज्ञ कसा केला हे अति अद्भूत वृत्त तू सविस्तर श्रवण कर. देवीने शक्ती देऊन त्या ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांना जाण्याची अनुज्ञा दिली. ते तिघेही पुरुष झाले. श्रेष्ठ विमानामध्ये बसले. नंतर ते तिघेही सुरश्रेष्ठ घोर महासागरासमीप आले आणि पृथ्वीवर राहून त्यांनी उत्पादनपूर्वक आपापली वसतिस्थाने तयार केली. त्यामुळे देवीने स्वतः अचल आधारशक्ती पाठविल्यामुळे मेदाने युक्त असलेली ती पृथ्वी त्या शक्तीच्या आधाराने राहिली. मधुकैटभांच्या मेदांचा संयोग झाल्यामुळे भूमीला मेदिनी असे नाव पडले. ती चराचर प्राणी धारण करणारी असल्यामुळे, धरा हे नाव तिला प्राप्त झाले आहे. विस्तारयुक्त असल्यामुळे पृथ्वी या नावाने ती प्रसिद्ध झाली. पूज्य असल्यामुळे मही असे तिचे नाव पडले.
शेषाने मस्तकावर तिला धारण केलेले आहे. तिच्या धारणाकरिता सर्व मोठे मोठे पर्वत उत्पन्न केलेले आहेत. हे महाराज, काष्ठामध्ये ज्याप्रमाणे लोखंडाचा खिळा बसविलेला असतो त्याप्रमाणे पृथ्वी धारण करण्याकरिता ते पर्वत करून ठेविलेले आहेत असे प्राज्ञजन म्हणत असतात. या पर्वतांपैकी अनेक योजने विस्तीर्ण असा एक सुवर्णमय मेरु पर्वत केलेला असून रत्नमय शृंगांच्या योगाने त्याला शोभा आणली असल्यामुळे तो अत्यंत अद्भूत झाला आहे.
मरीची, नारद, अत्री, पुलस्त्य, पुलह, ऋतु, दक्ष आणि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध पुत्र होत. मरीचीपासून कश्यपमुनी झाले. तेरा दक्षकन्या त्या कश्यपमुनींच्या भार्या होत. त्यांच्यापासून अनेक देव आणि दैत्य उत्पन्न झाले. तदनंतर पशु, सर्प इत्यादी भिन्न भिन्न जातीमुळे अनेक प्रकारची अति विस्तृत काश्यपी सृष्टी सुरु झाली. ब्रह्मदेवाच्या अर्ध्या देहापासून स्वयंभुव मनु झाला व डाव्या भागापासून शतरूपा नावाची स्त्री उत्पन्न झाली. प्रियव्रत व उत्तानपाद हे दोन पुत्र तिला झाले आणि अत्यंत सुंदर व उत्कृष्ट अवयवांनी युक्त अशा तीन कन्या झाल्या.
याप्रमाणे सृष्टी केल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने मेरुपर्वताच्या शिखरावर मनोहर ब्रह्मलोक निर्माण केला. लक्ष्मीला आनंद देणारे रमणीय व उत्कृष्ट असे वैकुंठसंज्ञक क्रीडास्थान भगवान विष्णूने निर्माण केले हे स्थान सर्व स्थानांपेक्षा उच्च आहे. शिवानेही कैलास नावाचे उत्कृष्ट स्थान निर्माण केले. भूतगणांचा स्वीकार करून तो त्या ठिकाणी यथेच्छ क्रीडा करू लागला.
त्रिविष्टप म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गलोक मेरुपर्वताच्या शिखरावरच निर्माण केलेला आहे. नानाप्रकारच्या रत्नांनी सुशोभित असे देवराज इंद्राचे स्थान आहे. उत्कृष्ट वृक्ष, पारिजात, चार दंतांनी युक्त असलेला ऐरावत, मनोरथ परिपूर्ण करणारी कामधेनु, उच्चैःश्रवा अश्व आणि रंभाप्रभृति अप्सरा ही सर्व समुद्रमंथनापासून प्राप्त झाली व स्वर्गाला भूषणरूप झालेल्या ह्या सर्वांचा इंद्राने स्वीकार केला. धन्वंतरी व चंद्रमा हे उभयता देव सागरापासून उत्पन्न झालेले आहेत. अनेक गणांसह ते स्वर्गामध्ये विराजमान झालेले आहेत. हे नृपश्रेष्ठा, देव, तिर्यक्, मनुष्ये इत्यादी भेदांमुळे नानाप्रकारची सृष्टी ह्याप्रमाणे उत्पन्न झाली. ह्या सृष्टीमध्ये खरोखर अंडज, स्वेदज, उद्भिज व जरायूज असे चार प्रकारचे कर्मबद्ध जीव उत्पन्न झाले.
ह्याप्रमाणे सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे सर्वही आपापल्या स्थानांमध्ये यथेच्छ क्रीडा करू लागले तसेच सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान अच्युत प्रभूही स्वकीय स्थानामध्ये महालक्ष्मीसह क्रीडा करू लागला.
पूर्वी एकदा विष्णू वैकुंठामध्ये असताना सुधासागरामध्ये स्थित असलेल्या रत्नभूषित द्वीपाचे त्याला स्मरण झाले. त्याच ठिकाणी महामायेचे दर्शन होऊन शुभ मंत्र त्याला प्राप्त झालेला होता. जिच्यामुळे त्याला स्त्रीत्व प्राप्त झाले होते त्या उत्कृष्ट शक्तीचे त्याला
स्मरण झाले. त्या लक्ष्मीपतीने अंबिकेचा यज्ञ करण्याचे मनामध्ये आणिले. नंतर आपल्या त्या स्थानापासून तो उठला आणि महेश्वर, ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, कुबेर, अग्नि, यम, वसिष्ठ, कश्यप, दक्ष, वामदेव व बृहस्पति ह्यांना बोलावून आणून त्याने यज्ञाकरिता फारच मोठी सामग्री जुळविली.
मोठ्या ऐश्वर्याने युक्त असा मनोहर, सात्विक व विशाल मंडप शिल्पिजनांकडून त्याने तयार करविला. नंतर सदाचरणसंपन्न असलेले सत्तावीस ऋत्विज त्याने वरले. सुंदर चिति विस्तीर्ण वेदी त्याने करविली. देवीच्या बीजांनी युक्त अशा मंत्राचा जप ब्राह्मणांनी केला. सिद्ध केलेल्या अग्नीवर त्यांनी यथाविधि इच्छेप्रमाणे हवन केले. ह्याप्रमाणे होम सुरु झाला असता त्यावेळी अकस्मात सुस्वर आणि मधुर अक्षरांनी युक्त अशी आकाशवाणी झाली. ती अशी,
"हे विष्णो, हे हरे, तू देवांमध्ये सर्वदा अत्यंत श्रेष्ठ, मान्य, पूज्य व समर्थ होशील. इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी सर्व तुझे पूजन करतील. हे विष्णो, भूतलावरील मानव तुझ्या भक्तीच्या योगाने सर्वप्रकारे समर्थ होतील. सर्व देवांचे मनोरथ परिपूर्ण करणारा मुख्य परमेश्वर तूच होशील. कोणताही याज्ञिक मुख्यतः तुझे पूजन करील. लोक तुझे आराधन करतील. तू त्यांना वर देशील. दानवांनी देवांना अतिशय पीडा दिली असता ते तुझा आश्रय करतील.
हे पुरुषोत्तमा, सर्वांचे रक्षण करणारा तूच होशील. सर्व पुराणे व विस्तृत वेद ह्यामध्ये खरोखर अत्यंत पूज्य असा तूच आहेस व तुझीच कीर्ती खरोखर होईल.
भूतलावर जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होईल तेव्हा तेव्हा अंशाने अवतीर्ण होऊन तू सत्वर धर्मरक्षण करीत जा. महात्म्यांना पूज्य व अत्यंत विख्यात असे तुझे वेगळे अवतार पृथ्वीवर प्रख्यात होतील. हे माधवा, हे मधुसूदना, अनेक योनीमध्ये व सर्व लोकांमध्ये जे तुझे अवतार होतील त्या सर्व अवतारासंबंधाने तुझी ख्यातीच होईल. प्रत्येक अवतारामध्ये शक्ती तुझी सहचारिणी होईल आणि माझ्या अंशाने ती तुझी सर्व कार्ये साधील.
वाराही, नारासिंही इत्यादी अनेक प्रकारच्या शक्ती नाना प्रकारची आयुधे व शुभ रूपे धारण करून आणि सर्व अलंकारांनी भूषित होऊन तुझ्या संन्निध राहतील. हे विष्णो, हे माधवा, त्यांनी तू सर्वदा युक्त होऊन देवकार्ये सिद्धीस नेशील आणि हे सर्व माझ्या वरदानामुळे घडेल. परंतु गर्वाच्या अंशाचे अवलंबन करून तू कधी त्यांचा अवमान करीत जाऊ नकोस. तू सर्वथा प्रयत्नाने त्यांचे पूजन करीत जा आणि त्यांना मान देत जा.
ह्या भरतखंडामध्ये त्या शक्तींच्या प्रतिमांचे पूजन केले असता त्या मनुष्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण करतील. हे सुरेश्वरा, भूमंडलातील सर्व सप्तद्वीपांमध्ये त्यांची व तुझी मोठी कीर्ती होईल. हे महाभाग्यशाली हरे, सकाम मानव भूमंडलावर मनोरथ परिपूर्ण होण्याकरिता त्यांचे व तुझे सर्वदा पूजन करतील. पूजासमयी अनेक प्रकारच्या कामना मनामध्ये आणून वेदोक्त मंत्र, नाम, मंत्रज आणि उपहार ह्यांच्या योगाने तुझे पूजन करतील. त्या पूजनामुळे, हे देवाधिदेवा मधुसूदना, पृथ्वी आणि स्वर्ग ह्या दोन्ही लोकांमध्ये तुझे माहात्म्य मानवांच्या योगाने वृद्धिंगत होईल."
व्यास म्हणाले, ह्याप्रमाणे वर देऊन ती आकाशवाणी थांबली व ती श्रवण करून भगवान विष्णूचेही मन प्रसन्न झाले. नंतर समर्थ भगवान श्रीहरीने तो यज्ञ यथाविधी समाप्त करून त्या देवांना व ब्रह्मपुत्र मुनींना जाण्याची अनुज्ञा दिली.
आपल्या अनुयायांसह तो गरुडध्वज वैकुंठलोकाला गेला. नंतर सर्व देवही आपापल्या स्थानाप्रत गेले आणि मुनीही विस्मयचकित व आनंदित होऊन परस्पर संभाषण करीत करीत सुखाने आपल्या पवित्र आश्रमाप्रत परत गेले. श्रवणेन्द्रियाला आनंद देणारी अशी अतिशय स्पष्ट आकाशवाणी श्रवण करताक्षणीच सर्वांचे ठिकाणी प्रकृतीविषयी भक्तिभाव उत्पन्न झाला आणि द्विजगण, मुनिगण व मुनींद्र ह्या सर्वांनी भक्तियुक्त होऊन तिचे वेदविहित व सर्वफलप्रद असे पूजन मनापासून केले. हा देवीयज्ञ सर्व ठिकाणी लोकप्रिय झाला.