[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा म्हणाला, "हे प्रभो, त्या देवीच्या यज्ञाचा उत्कृष्ट विधी आपण पूर्णपणे मला कथन करा म्हणजे मी तो श्रवण करून दक्षतेने यथाशक्ति यज्ञ करीन. त्याचप्रमाणे पूजाविधी, मंत्र, होमद्रव्य, ब्राह्मणाची संध्या व दक्षिणा आपण मला कथन करा.
व्यास म्हणाले, "हे राजा, विधीपूर्वक देवीचा यज्ञ कसा करायचा हे मी कथन करतो, तू श्रवण कर. सात्विक, राजस व तामस असे तीन प्रकार कर्माच्या पद्धतीचे आहेत हे सर्वदा लक्षात ठेविले पाहिजे. मुनीचा यज्ञ सात्विक, नृपाचा राजस, राक्षसाचा तामस, ज्ञानवानाचा निर्गुण आणि मुक्त पुरुषांचा ज्ञानमय असतो. आता हेच मी तुला सविस्तर कथन करतो.
देश, काल, द्रव्य, मंत्र, ब्राह्मण व श्रद्धा ही ज्या ठिकाणी असतात त्यास सात्विक यज्ञ म्हणतात. हे भूपते, द्रव्यशुद्धी आणि मंत्रशुद्धी जर असेल तरच पूर्ण फल प्राप्त होते नाहीतर होत नाही. म्हणून न्यायाने संपादिलेल्याच द्रव्याने सर्वदा पुण्यकर्म करावे म्हणजे कीर्ती, परलोक व सुखही प्राप्त होतात.
हे नृपश्रेष्ठा, विपुल व उत्कृष्ट दक्षिणेने युक्त आणि ऋतुमध्ये श्रेष्ठ असा राजसूय यज्ञ पांडवांनी केला, हे तुलाही प्रत्यक्ष विदित आहेच. त्या यज्ञामध्ये यादवांचा राजा जो महाशय श्रीहरि कृष्ण व द्रोणाचार्यासारखे सर्वविद्यासंपन्न ब्राह्मण होते. परंतु यज्ञ समाप्त झाल्यावर एक महिन्यानेच पांडवांना अतिशय कष्ट होऊन भयंकर वनवास प्राप्त झाला. द्रौपदीचा छळ, द्यूतामध्ये पराजय आणि वनवास असे मोठे दुःख त्यांना प्राप्त झाले.
त्या यज्ञाचे फल गेले तरी कोठे ? महात्मे सर्व पांडव विराटाचे दास झाले, युवतिजनामध्ये श्रेष्ठ असलेल्या द्रौपदीला कीचकापासून अतिशय क्लेश भोगावे लागले. मनाने शुद्ध असलेल्या त्या ब्राह्मणांचे आशीर्वाद आणि वासुदेवाची भक्ति ही दोन्हीही त्या संकटसमयी कोणीकडे गेली होती ? श्रेष्ठ लोकांच्याही वर्णनास पात्र अशा त्या साध्वी द्रौपदीची वेणी जेव्हा दुःशासनाने धरली तेव्हा त्या बालेचे रक्षण कोणीही केले नाही. सुरेश्वर केशव आणि धर्मपुत्र युधिष्ठिर हे यज्ञामध्ये असताना धर्म वैगुण्याचे कारण तरी काय बरे मनामध्ये आणावे ? आता भवितव्य तसे होते असे जर म्हटले तर यज्ञविधायक श्रुति आणि इतरही वेदमंत्र ह्यांना निःसंशय वैयर्थ्य येईल. भवितव्य जर टळतच नसेल तर फलप्रतिपादक वेदवचन असूनही उपयोग काय आहे ?
सर्वही साधने निष्फल असून उपायही व्यर्थच होत. विधायक श्रुतिही अर्थवादच ठरू लागेल. सर्वही कर्मे निरर्थक ठरतील. स्वर्गप्राप्तीकरिता तपही निरूपयोगी ठरेल. कर्मधर्माचाही काहीएक उपयोग नाही असे होऊ लागेल. भवितव्य मनामध्ये निश्चितच केल्याने सर्व प्रमाणे व्यर्थ होतील.
म्हणून दैव आणि उपाय ही दोन्ही मिळून फलसिद्धीचे कारण असे मानले पाहिजे. कर्म केल्यानंतर जर विपरीत फल येऊ लागले तर पंडितश्रेष्ठ प्राज्ञ-जनांनी "त्या कर्मात काही तरी वैगुण्य झाले आहे "असे मानले पाहिजे.
म्हणून कर्तृभेद, मंत्रभेद व द्रव्यभेद ह्यांच्या योगाने ते कर्म अनुष्ठाननिपुण विद्वानांनी अनेक प्रकाराने कथन केले आहे.
इंद्राने पूर्वी यज्ञामध्ये विश्वरूपाला आचार्यपद दिले होते. परंतु त्या विश्वरूपाने मातृपक्षीय दैत्यांचे हित व्हावे एतदर्थ कर्मानुष्ठान विपरीत केले. असुर हे त्या विश्वरूपाचे मातृपक्षीय होते.
"देवापासून दानवांचे कल्याण होवो"अशा अर्थाचे शब्द वारंवार उच्चारून त्याने त्या असुरांचे रक्षण केले. तेव्हा दैत्य अतिशय पुष्ट झाल्याचे अवलोकन करून इंद्र क्रुद्ध झाला. त्याने वज्र घेऊन त्या विश्वरूपाचा वेगाने शिरच्छेद केला. ह्या इंद्राच्या यज्ञामध्ये कर्त्याचा उद्देश भिन्न असल्यामुळे कर्मवैगुण्य निःसंशय झाले होते. कर्मवैगुण्य जर नसते तर विपरीत फल प्राप्त झाले नसते.
पंचालराज द्रुपदाने द्रोणाचार्यांचा नाश व्हावा म्हणून पुत्र उत्पन्न करण्याकरिता क्रोधाने जरी कर्मानुष्ठान केले, तरी वेदीमधून धुष्टद्युम्न व द्रौपदी ही दोन अपत्ये उत्पन्न झाली. पूर्वी दशरथानेही पुत्रेष्टि केली असता त्या निपुत्रिकाला चार पुत्र उत्पन्न झाले. म्हणून हे नृपश्रेष्ठा, योग्य रीतीने कर्मानुष्ठान केले असता ते सर्वथा फलप्रद होते, परंतु अयोग्य रीतीने केले असता सर्वथा विपरीत होते.
हे राजा, धर्मपुत्र युधिष्ठिर सत्यवादी, द्रौपदी साध्वी आणि इतर कनिष्ठ बंधूही आचरणाने पवित्र असताना द्यूतामध्ये पराजय असे ज्याअर्थी विपरीत फल प्राप्त झाले त्याअर्थी त्या पांडवांच्या यज्ञामध्ये काहीतरी वैगुण्य झाले असले पाहिजे. त्या यज्ञामध्ये राजाचा वध वगैरे करून संपादन केलेल्या निंद्य द्रव्याचा विनियोग झाल्यामुळे अथवा अभिमानयुक्त असलेल्या पांडवांनी तो केला असल्यामुळे दोष उपस्थित झाला असावा, असे वाटते.
हे महाराज, सात्विक यज्ञ दुर्लभ आहे व तो श्रेष्ठ यज्ञ वैखानस मुनीच्याच हातून होणे संभवनीय आहे. वनात उत्पन्न झालेले हितकारकच व शुभ संस्कारांनी युक्त असे सात्विक भोजन वैखानसमुनी नित्य करीत असतात. पुरोडाश हेच हविद्रव्य ज्यात नित्य असते, पशुवधस्तंभ ज्यात नसतो, ज्याचे अनुष्ठान समंत्रक असते आणि श्रद्धा ज्यात मुख्य असते तेच उत्कृष्ट सात्विक यज्ञ होत.
विपुल हविद्रव्य, युप आणि शुभ संस्कार ह्यांनी युक्त असलेले यज्ञ राजस होत. हे यज्ञ अभिमानयुक्त असतात. क्षत्रिय आणि वैश्य यांच्या हातून ते होत असतात.
दानवांचे यज्ञ तामस असे महात्म्यांनी सांगितले आहे. हे असंस्कारयुक्त यज्ञ मद वृद्धिंगत करणारे असतात आणि क्रोध, असहिष्णुता व क्रूरता हीही त्या यज्ञामध्ये असतात.
आता मुमुक्षू व विरक्त असे जे महात्मे मुनी त्यांना सर्वसाधनसंपन्न असा मानसिक यज्ञच उक्त आहे. द्रव्य, श्रद्धा, ब्राह्मण, देश, काल आणि भिन्न भिन्न पदार्थांनी होणारी सर्व साधने ह्या सर्व अंगाच्या योगाने मानस यज्ञ जसा पूर्ण तसा दुसरा कोणताही यज्ञ होत नाही. प्रथमतः मनाची शुद्धी करावी म्हणजे तीन गुणांपैकी कोणताही गुण त्याचे ठिकाणी राहू देऊ नये. ह्याप्रमाणे मन शुद्ध झाले असता देह शुद्धच होतो, ह्यात संशय नाही.
जेव्हा मन शुद्ध म्हणजे निर्विषय होते, तेव्हा तशा शुद्ध मनाने युक्त असलेला पुरुष त्या मानस यज्ञाचा अधिकारी होतो. नंतर त्याने यज्ञिय वृक्षापासून तयार केलेल्या
मोठमोठ्या गुळगुळीत स्तंभाच्यायोगाने उभारलेल्या जो अनेक योजने विस्तीर्ण मंडप, त्यामधे विशाल वेदी आहे, अशी मनामध्ये कल्पना करावी आणि खरोखर मनाच्या योगाने त्या वेदीवर अग्नीचीही यथाविधी स्थापना करावी.
त्याचप्रमाणे ब्राह्मणांचीही यथाविधी स्थापना करून ब्रह्मा, अध्वर्यु, होता, प्रस्तोत, उद्गाता, प्रतिहर्ता व इतर सभ्य द्विजश्रेष्ठ ह्यांचे मनानेच प्रयत्नपूर्वक यथापूजन करावे. प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पाच अग्नींची वेदीवर यथाविधी स्थापना करावी. हेच अति उत्कट अग्नि गार्हपत्य, अहवनीय दक्षिणाग्नि, सभ्य व अव-सभ्य म्हणून अनुक्रमे प्रसिद्ध आहेत. निर्गुण आणि अत्यंत शुद्ध द्रव्याची मनामध्ये कल्पना करावी.
मन हाच 'होता' व 'यजमान' सनातन व निर्गुण ब्रह्म हीच यज्ञाची अधिदेवता, सर्वदा वैराग्य उत्पन्न करणारी व निर्गुण अशी जी कल्याणी शक्ति तीच फल देणारी आणि सर्वत्र व्यापून राहिलेली ब्रह्मविद्याच सर्वाला आधारभूत अशी कल्पना करून त्या मायाविशिष्ट ब्रह्माच्या उद्देशाने प्राणाग्नीमध्ये ब्राह्मणाने त्या द्रव्याचे हवन करावे.
नंतर चित्त निराश्रय करून कुंडलीनी मुखाच्या मार्गाने शाश्वत ब्रह्माचे ठिकाणी प्राणांचेही हवन करावे. नंतर साक्षात स्वानुभूत असलेली जी महेश्वरी तिचे स्वस्थ राहून स्वानुभव आणि समाधी ह्यांच्यायोगाने अंतःकरणामध्ये ध्यान करावे. आपण सर्व भूतांच्या ठिकाणी असून सर्व भूते आपल्या ठिकाणी आहेत असे जेव्हा अनुभवाला येऊ लागते तेव्हा भूतरूप झालेल्या पुरुषाला त्या कल्याणी देवीचे दर्शन होते. त्या सच्चिदानंदस्वरूप देवीचे दर्शन झाले असता पुरुष ब्रह्मवेत्ता होतो.
हे राजा, तेव्हा मायादिक सर्व दग्ध होऊन जाते. देहपात प्राप्तकर्म मात्र राहते. या ज्ञानयज्ञाने पुरुष जीवन्मुक्त होतो व मरणानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो.
हे भूपते, जगदंबेचे जो पूजन करतो तो मुक्त होतो. तस्मात गुरुपदेशाला अनुसरून सर्व प्रयत्नाने श्रीभुवनेश्वरीचे ध्यान, श्रवण व मनन करावे. हाच मुख्य यज्ञ होय.
हे राजा, याप्रमाणे हा ज्ञानयज्ञ केला असता तो निःसंशय मोक्षप्रद होतो. इतर सकाम यज्ञ फल दृष्टीने पाहू गेले असता विनाशी होत.
'स्वर्गेच्छु पुरुषाने यथाविधी अग्नी होमयाग करावा' अशी वेदांची आज्ञा पंडित सांगत असतात. 'स्वर्गास गेलेला पुरुष पुण्य क्षीण झाले असता मर्त्यलोकी प्रवेश करतो' असेही वेदानुशासन तेच यथामति सांगत असतात. मानस यज्ञ श्रेष्ठ आहे व तोच अक्षय आहे. विषयेच्छु राजाच्या हातून हा मानस यज्ञ होणे शक्य नाही.
सांप्रत जो तू प्रथम सर्पयज्ञ केलास तो तामस होय. हे राजा, त्या दुरात्म्या तक्षकाचे वैर तू उगविलेस आणि त्याकरिता तू अग्नीमध्ये मोठा देवी यज्ञ कर. हे नृपश्रेष्ठा, सृष्टीचे आरंभी पूर्वी विष्णूने हाच यज्ञ केला होता त्याप्रमाणे तूही कर. हे राजेंद्रा, मी त्याचे विधान तुला कथन करतो.
हे नृपश्रेष्ठा, जे वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ व विधिज्ञ ब्राह्मण आहेत आणि जे मंत्रशास्त्रामध्ये निपुण असल्यामुळे देवीच्या बीजांचे विधानही जाणत आहेत ते तुझे याजक होतील व तू स्वतःच यजमान हो. हे महाराज, यथाविधी यज्ञ करून संपादन केलेले पुण्य तू दुर्गति झालेल्या आपल्या पित्याला दे आणि त्याचा उद्धार कर.
हे निष्पाप जनमेजयराजा, दुस्तर असे नरकप्रद शापजन्य दोष तुझ्या पित्याला प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे त्या राजाला सर्पदंशाने मरण प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर भूमीवर दर्भासनाचे ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला नाही. हे कुरुवंशजश्रेष्ठा जनमेजयराजा, संग्रामात अथवा गंगातीरी तुझ्या पित्याला मरण प्राप्त झाले नसून स्नान, दान वगैरे काही एक हातून न घडता त्या राजवाड्यामध्ये अधरस्थानी त्याला मृत्यू आला आहे.
हे नृपश्रेष्ठा, ह्या सर्वही निंद्य गोष्टी नरकाचे साधन असून उद्धार होण्याचे पवित्र साधन एकही त्याच्या हातून झालेले नाही.
प्राणी कोठेही जरी असला आणि अभाव म्हणून अति संकटात सापडल्यामुळे तो जरी अगदी दीन झालेला असला तरी मरणसमय प्राप्त झाला असे समजल्यावर जर त्याला निर्मल मनाच्या योगाने वैराग्य उत्पन्न झाले तर तोही मुक्त होतो.
"देह पंचमहाभूतात्मक आहे. मला दुःख देणारे ह्या जगात काय बरे आहे ? हा देह आज खुशाल पडो ! मी निर्गुण व अविनाशी आहे ! तत्त्वे नाशरूप आहेत. तेव्हा त्यांच्या संबंधाने शोक करण्यास काय बरे अर्थ आहे ? मी ब्रह्मच आहे, संसारी नाही. मी सर्वदा मुक्त व सनातन आहे. कर्माने देहाशी माझा संबंध जोडलेला आहे. परंतु त्या सर्वही बर्या वाईट कर्माची मी मनुष्य देहाच्या योगाने उपभोग घेतलेला आहे. ह्यास्तव सुखदुःखाचे साधन असे जे हे अतिभयंकर व घोर संसार संकट ह्यापासून मी मुक्त झालो आहे." ह्याप्रमाणे ज्याचे चिंतन चालले असेल त्याला स्नान, दान वगैरे काहीएक हातून न घडतानाही जरी मृत्यू प्राप्त झाला तरी जन्म मरण दुःखापासून तो मुक्त होतो. परंतु ही पराकाष्ठेची अंतःकरणाची स्थिती योगीजनांनाही दुर्लभ आहे.
हे नृपश्रेष्ठा, द्विजाने दिलेला शाप श्रवण केल्यानंतरही तुझ्या पित्याने देहाचे ठिकाणी ममत्वबुद्धीच धारण केली. त्याला वैराग्य प्राप्त झाले नाही. उलट "हा माझा देह रोगरहित असून माझे राज्यही निष्कंटक आहे. परंतु मी खरोखर वाचणार कसा ? ह्यास्तव तुम्ही मांत्रिक घेऊन या." असेच विचार त्याच्या मनामध्ये घोळू लागले. औषध, मणि, मंत्र व सर्वोत्कृष्ट यंत्र ह्यांविषयी खटपट करून त्या राजाने राजवाड्यावर आरोहण केले.
दैव बलवत्तर आहे असे समजून त्याने स्नान, दान, देवीचे स्मरण, भूमीवर शयन ह्यांपैकी काही एक केले नाही. कलीशी संबंध झाल्यामुळे तापसाचा अवमान करून त्याने पाप जोडले आणि मोहसागरामध्ये तो मग्न झाला. तो राजा सर्पदंश होऊन राजवाड्यात मृत झाला. अशा ह्या आचरणामुळे नरकप्राप्ती होणे आवश्यक आहे म्हणून हे नृपश्रेष्ठा, पातकांपासून तू आपल्या पित्याचा उद्धार कर.
सूत म्हणाले, "ह्याप्रमाणे त्या महातेजस्वी व्यासमुनींचे भाषण श्रवण करताक्षणीच जनमेजय दुःखाने व्याकुळ झाला. अश्रूंनी त्याच कंठ दाटून आला आणि तो म्हणाला, माझे हे जीवन व्यर्थ आहे. माझा धिक्कार असो. पिता सांप्रत नरकात पडला आहे आणि त्या उत्तरापुत्राला स्वर्ग प्राप्त असेच मला केले पाहिजे."