[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
लोमेश म्हणतात, "वेदाध्ययन, जप, देवतांचे ध्यान व आराधन ह्यापैकी त्याला काहीएक माहीत नसून आसन, प्राणायाम, प्रत्याहार, भूतशुद्धि व आचमन ह्यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते. मंत्र, कीलक, जाप्य, गायत्री, शौच, स्नानविधि व आचमन ह्यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते. प्राणग्निहोत्र, बलिदान, अतिथी, संध्या व समिधांचा होम ह्यापैकी त्या मुनीला कशाचीच ओळख नव्हती.
प्रातःकाली उठून तो दात घाशीत असे व गंगेमध्ये शूद्राप्रमाणे मंत्ररहित स्नान करीत असे. माध्यान्हसमयी सहज प्राप्त होणारी वनातील फळे आणून तो सेवन करीत असे. परंतु तो शठ भक्ष्याभक्ष्य मुळीच जाणत नसे. तथापि त्या ठिकाणी राहून तो कधीही असत्य भाषण न करता सत्य भाषणच करीत असे. ह्यामुळे लोकांनी त्या द्विजाचे नाव सत्यव्रत किंवा सत्यवान असे ठेविले होते. तो कोणाचे हित अथवा अहित करीत नसे आणि पुढे सांगितल्याप्रमाणे चिंतन करीत तो निर्भयपणे रात्री खुशाल निद्रा घेत असे.
तो मुनि म्हणत असे, मला मरण केव्हा बरे येणार आहे ! वनामध्ये माझे वास्तव्य दुःखाने होत आहे. धिक्कार असो मज मूर्खाच्या जीविताला ! मूर्ख राहून जगण्यापेक्षा तडकाफडकी मरण येणे निःसंशय चांगले. दैवाने मला मूर्ख केले आहे. माझ्या मूर्खत्वाचे कारण दैवाशिवाय इतर कोणीही नसावे. उत्तम जन्म प्राप्त होऊन सांप्रत हा माझा जन्म मूढपणामुळे व्यर्थ झाला आहे. रूपवती वंध्येप्रमाणे किंवा निष्फळ वृक्षाप्रमाणे अथवा दूध न देणार्या धेनूप्रमाणे दैवाने मला निष्फळ केले आहे. परंतु मी दैवाची तरी का बरे निंदा करावी ? खरोखर माझे कर्मच अशा प्रकारचे आहे. पुस्तक लिहून महात्म्या ब्राह्मणाला मी दिले नाही आणि पूर्वजन्मी मी कोणाला निर्मल विद्याही दिलेली नाही. त्या कर्माच्या योगाने मी शठ व अधम द्विज झालो आहे. तीर्थाचे ठिकाणी मी तप केले नाही. साधूंची सेवा माझ्या हातून घडली नाही आणि द्रव्यद्वारा द्विजपूजनही मी केलेले नाही. त्यामुळे मी मूढमति उत्पन्न झालो आहे. वेदशास्त्रातील रहस्यामध्ये पारंगत असे माझ्या बरोबरीचे मुनिपुत्र आहेत. परंतु काही दैवयोगामुळे मी मात्र अति मूढ जन्मलो आहे. तपश्चर्या कशी करावी हे मला ठाऊक नाही. तस्मात् मी आता कोणत्या बरे चांगल्या साधनाचे अवलंबन करू ? किंवा खरोखर माझे दैवच नीट नसल्यामुळे हा माझा पश्चातापही व्यर्थच आहे. निरुपयोगी असलेल्या त्या पौरुषाला धिक्कार असो !
दैवच श्रेष्ठ असे मला वाटते. पौरुषाने केलेले कार्य दैवाने सर्वथा व्यर्थ होऊन जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर व इंद्रप्रभूति देव हे सुद्धा खरोखर सर्व कालाधीन आहेत व कालाचे उल्लंघन होणे दुर्घट आहे असे मला वाटते."
ह्याप्रमाणे रात्रंदिवस तर्क करीत करीत तो ब्राह्मण जान्हवीचे तीरावरील पवित्र स्थळी असलेल्या त्या आश्रमामध्ये राहिला. तो द्विज काही दिवसांनी अतिशय विरक्त झाला आणि शांतपणे राहून त्या निर्जन वनामध्ये आपले आयुष्याचे दिवस घालवू लागला. निर्मल उदकाने युक्त असलेल्या त्या वनामध्ये ह्याप्रमाणे तो द्विज राहू लागला असता खरोखर त्याची एकंदर चवदा वर्षे लोटली. पूजन, जप व मंत्र ह्यापैकी काहीएक न जाणता वनामध्ये त्याने आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ घालविला.
हा मुनि सत्य भाषण करीत असल्यामुळे ह्याचे तेवढेच प्रसिद्ध व्रत लोक जाणीत होते. त्यामुळेच खरोखर त्याला सत्यव्रत हे नाव पडले होते. इतकेच नव्हे तर "हा सतत सत्य भाषणच करीत असून कधीही अनृत भाषण करीत नाही."अशी खरोखर सर्व लोकांमध्ये त्याची कीर्ती झाली होती.
एकदा कोणी एक मृगयेमध्येच रममाण होणारा शठ निषाद, हा राहात होता त्या अति विपुल वनामध्ये मृगया करीत करीत प्राप्त झाला. त्याचा देह यमासारखा असून मुद्रा क्रूर होती. हातामध्ये त्याने धनुष्य व बाण धारण केले होते आणि प्राणिवध करण्याविषयी तो अतिशय तत्पर होता. त्या धनुर्धर भिल्लाने अतिशय आकर्ण करून मारलेला बाण एका वराहाला लागला असता भयाने विव्हल होऊन तो वराह पळू लागला व पळता पळता त्या मुनीचे समीप आला.
ज्याचे शरीर रक्ताने भरून गेलेले आहे असा तो वराह कापत कापत जेव्हा आश्रमामध्ये आला तेव्हा त्याची दीन मुद्रा अवलोकन करून त्या उतथ्यमुनीचे अंतःकरण दयेने आर्द्र झाले. जोराने विद्ध झाल्यामुळे रक्ताने ज्याचे शरीर भिजून गेले आहे असा तो वराह पुढे पळत असलेला अवलोकन करिताक्षणी उतथ्य दयेच्या आवेशामुळे थरथर कापू लागला.
' ऐ ऐ ' ह्या सारस्वत बीजाचा त्याने स्वाभाविकच उच्चार केला. पूर्वी कधीही श्रुत व ज्ञान नसलेले ते सारस्वत बीज सुदैवाने त्यावेळी त्याच्या मुखामध्ये आले. परंतु तो महात्मा मुनि अत्यंत मोहित होऊन शोकसागरामध्ये मग्न झाला होता. त्यामुळे किंवा अज्ञानपणामुळे त्याच्या ते ध्यानी आले नाही.
इतक्यात आश्रमामध्ये प्रवेश करून तो वराह एका झाडीमध्ये दडला व सुटून जाण्यास मार्ग न सापडल्यामुळे तो अतिशय खिन्न झाला. तो बाणप्रहरांनी पीडित झाल्यामुळे थरथर कापू लागला. तदनंतर कानापर्यंत ओढिलेले धनुष्य व अतिशय उग्र देह धारण करणारा आणि खरोखर कालाप्रमाणे असलेला तो निषादराज वराहाला शोधीत शोधीत एका क्षणामध्ये त्या सत्यव्रत ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुनीजवळ आला. त्या अद्वितीय मुनीला दर्भासनावर बसला असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा संमुख होऊन व्याधाने त्यास प्रणाम केला व तो त्याला म्हणाला, "हे द्विजराज, वराह कोणीकडे गेला ?
मी आपले प्रसिद्ध व उत्कृष्ट सत्य व्रत जाणीत आहे. म्हणून माझ्या बाणाने विद्ध झालेला वराह कोठे गेला हे आपणाला विचारीत आहे. माझे सर्व कुटुंब क्षुधाने व्याकुल झाले आहे. त्याचे पोषण व्हावे एतदर्थ खरोखर शिकार करण्याकरिता मी येथे आलो आहे. हे विप्रश्रेष्ठा, विधात्याने हेच माझ्या उपजीविकेचे साधन नेमलेले आहे. दुसरे साधन नाही हे मी आपणाला सत्य सांगत आहे. कोणत्या तरी बर्यावाईट उपायाने मला कसे तरी कुटुंबपोषण केलेच पाहिजे.
हे द्विज, तू सत्यव्रत आहेस. ह्यास्तव मी तुला आता पुनः सत्य सांगतो की पोष्यवर्ग क्षुधेने व्याकुल झालेला आहे. तस्मात् बाण लागलेला तो वराह कोणीकडे गेला हे मी आपणाला विचारीत आहे. हे विप्रा, मला आपण सत्वर सांगा."
ह्याप्रमाणे त्याने विचारला असता तो महात्मा मुनि खरोखर वितर्कांमध्ये मग्न होऊन गेला व विचार करू लागला, वराह माझ्या दृष्टीस पडला नाही असे म्हटल्याने माझे सत्यव्रत तप भग्न होणार नाही ना ? शरीराला बाण लागलेला वराह इकडे गेला असे मी आज खरे तरी कसे बोलावे ? अथवा असत्य भाषण तरी कसे करावे ? ज्याअर्थी हा क्षुधेने व्याकुल होऊन विचारीत आहे त्या अर्थी वराह दृष्टीस पडताक्षणी हा त्याचा वध करीलच.
ज्या यथार्थ भाषणाने हिंसा होत असेल ते सत्य नसून दयेने युक्त असलेले अनृत भाषणच सत्य होय. ज्याच्या योगाने प्राणिमात्राचे हित होत असेल तेच सत्य होय, ज्याच्या योगाने अकल्याण होत असेल तर सत्यच नव्हे. तस्मात् परस्पर विरुद्ध असलेल्या ह्या उभयतांचे हित व्हावे कसे ? आणि ज्यात असत्य भाषण नाही असे उत्तर तरी मी काय द्यावे ? "
ह्याप्रमाणे धर्माच्या अडचणीसंबंधाने तो उतथ्य विचार करू लागला असता, हे विप्रा जमदग्ने, योग्य उत्तर काय द्यावे हे त्याला काहीएक सुचेना.
हे जमदग्ने, बाणाने विद्ध आणि म्हणूनच दयेला पात्र असा वराह दृष्टीस पडल्यावर त्या उतथ्याच्या मुखातून ' ऐ ऐ ' असा उच्चार आला. तो स्वतःच्या बीजाचा उच्चार झाला असे समजून कल्याणी देवी प्रसन्न झाली तिने त्याला दुर्लभ विद्या दिली. देवीच्या बीजाचा उच्चार झाल्यामुळे त्याला संपूर्ण विद्येची स्फूर्ति झाली. पूर्वी होऊन गेलेल्या वाल्मीकीप्रमाणे तो उतथ्य कवि झाला.
नंतर धनुष्य घेऊन संमुख स्थित असलेल्या व्याधाला अनुलक्षून त्या धर्मात्म्या व दयाळू सत्यकाम द्विजाने सांगितले की, "जी पहात आहे तिला बोलता येत नाही व जिला बोलता येत आहे तिला दिसत नाही. तस्मात् हे स्वकार्यसाधु व्याधा, फिरून फिरून तू का बरे विचारीत आहेस ? "
ह्याप्रमाणे तेथे येऊन विचारीत असलेल्या व्याधाला त्याने सांगितले असता तो पशुघातकी व्याध त्या वराहाविषयी निराश झाला आणि आपल्या घरी परत गेला.
इकडे तो ब्राह्मण उतथ्य दुसरा वाल्मिकीच की काय असा कवि झाला आणि सत्यव्रत ह्या नावाने सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. तदनंतर सारस्वत बीजाचा त्याने यथाविधी जप केला असता तो द्विज भूतलावर अतिविख्यात पंडित झाला. प्रत्येक पर्वाचे पहिल्या दिवशी ब्राह्मण सर्वदा त्याची कीर्ती गात असतात. मुनीजनहो ते त्या अतिविस्तृत आख्यानाची प्रशंसा करीत असतात.
ते वृत्त श्रवण केल्यानंतर ज्या पित्याने त्याचा प्रथम त्याग केला होता तो त्याच आश्रमामध्ये त्याच्या पर्णकुटिकेत आला आणि मोठ्या मानाने त्याला घरी घेऊन गेला. म्हणून हे राजा, परा देवी जी आदिशक्ती तिचेच सर्वदा भक्तिने सेवन व पूजन केले पाहिजे. कारण तीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. हे महाराज, वैदिक अनुष्ठानाने तू तिचे यजन कर. तिचे यजन सर्वदा सर्व मनोरथ परिपूर्ण करणारे आहे असा सिद्धांत पूर्वीच कथन केला आहे. भक्तिने तिचे स्मरण, पूजन, ध्यान, नामोच्चारण अथवा स्तवन केले असता ती इच्छित प्राप्त करून देते. म्हणून तिला कामप्रदा असे म्हणतात.
हे राजा, असे पुढे दर्शविलेले अनुमान विचारी लोकांना सर्वथा करणे अवश्य आहे. रोगी, दीन, क्षुधित, निर्धन, शठ, आर्तजन, मूर्ख, शत्रूंनी सर्वदा पीडित, दास, आज्ञांकित, क्षूद्र, विकल, विव्हल, अधाशी, भोगाविषयी वखवखलेले, अजितेंद्रिय, लोभाविष्ट, अशक्त, सर्वदा काळजीने झुरणारे असे लोक दृष्टीस पडले असता त्याचप्रमाणे वैभवसंपन्न, पुत्रपौत्रांनी वंशवृद्धी करणारे, पुष्ट, संभोगयुक्त, वेदवेत्ते, राजश्रीविराजित, शूर, ज्यांनी लोक आपलेसे करून घेतले आहेत, स्वजनांशी ज्यांचा वियोग होत नाही व सर्वलक्षणसंपन्न असे लोक दृष्टीस पडले असता असे अनुमान करावे.
पहिले सर्व मनोरथ सफल करणार्या कल्याणी देवीचे पूजन केले नाही असे दुःखी आहेत आणि दुसरे सर्वदा अंबिकेचे पूजन केलेले आहेत, कारण ते सर्व ह्या संसारामध्ये सुखी आहेत. असे अन्वयव्यतिरेक प्रमाणाने विचारी लोकांनी निःसंशय समजावे.
व्यास म्हणाले, "हे राजा, त्या ठिकाणी मुनिसमाजामध्ये लोमेशाच्या मुखातून ह्याप्रमाणे देवीचे उत्कृष्ट माहात्म्य खरोखर मी श्रवण केले आहे. हे पुरुषश्रेष्ठा, हे राजेंद्रा ह्याचा विचार करून परमभक्तीने व आनंदाने सर्वदा देवीचे पूजन कर.