[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय राजाने प्रश्न विचारला, "हे मुने, कोण हा सत्यव्रत ब्राह्मण ? हा द्विजश्रेष्ठ कोणत्या देशामध्ये उत्पन्न झाला होता ? तो कसा होता ? हे सर्व आपण मला कथन करा. त्याचप्रमाणे त्याच्या कानावर शब्द कसा आला ? त्याने त्याचा पुनः कसा उच्चार केला ? त्या विप्राला तत्क्षणी कशाप्रकारची सिद्धी प्राप्त झाली ? सर्वत्र असलेली सर्वज्ञ भवानी त्याच्यावर कशी संतुष्ट झाली ? ही मनोहर कथा आपण मला आज सविस्तर कथन करा.
सूत म्हणाला, "याप्रमाणे राजाने प्रश्न केला असता त्याच्याशी सत्यवती पुत्र व्यास मुनींनी अतिशय उदार, शुद्ध व सुरस भाषण केले.
व्यास म्हणाले, "हे राजा, हे कुरुवंशश्रेष्ठा, मुनिसमाजांमध्ये पूर्वी श्रवण केलेली ही शुभ पौराणिक कथा मी कथन करतो, तू श्रवण कर. हे कुरुश्रेष्ठा, एकदा मी पवित्र तीर्थयात्रा करीत करीत मुनींनी सेवित व पवित्र अशा नैमिषारण्यामध्ये आलो आणि तेथील सर्व मुनींना प्रणाम करून मी त्या श्रेष्ठ आश्रमामध्ये काही काळ राहिलो. त्या ठिकाणी महातपस्वी व जीवन्मुक्त ब्रह्मपुत्रही होते. एकदा तेथे विप्रसमाजामध्ये अनेक विषयांवर गोष्टी सुरू झाल्या असता तेथे असलेल्या जमदग्नीने मुनींना प्रश्न केला."
जमदग्नि म्हणाले, "हे महाभाग्यशाली तपस्वीजनहो ! माझ्या अंतःकरणामध्ये एक संशय आहे. या मुनिसमाजामध्येच त्या माझ्या संशयाची निवृत्ती होईल म्हणून मी विचारतो, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, इंद्र, वरुण, अग्नि, कुबेर, पवन, त्वष्टा, षडानन, गणपती, सूर्य, अश्विनीकुमार, भृग, पूषा, चंद्र व ग्रह यांमध्ये सर्वोत्कृष्ट पूज्य कोण ? इष्ट कोण ? इष्ट मनोरथ सफल करणारा कोण ? कोणाची सेवा नेहमी सुखाने होणे शक्य आहे ? आणि हे मान्यहो, सत्वर कोण संतुष्ट होत असतो ? हे निर्मल आचरणाने युक्त असलेल्या सर्वज्ञ मुनींनो, मला हे सत्वर कथन करा."
ह्याप्रमाणे जमदग्नीने प्रश्न केला असता तेथे लोमेश मुनी म्हणाले, "हे जमदग्ने, आपण जो प्रश्न केला आहे त्याचे हे उत्तर मी सांगतो, आपण श्रवण करा. सर्व शुभेच्छूंना शक्तिच सर्वांपेक्षा अधिक सेव्य होय. तीच परा, प्रकृती, श्रेष्ठ, सर्वव्यापी व सर्वदा कल्याण करणारी आहे. महात्म्या ब्रह्मादि देवांची जननी तीच असून संसारवृक्षाचे मूळ असलेली आदिप्रकृती तीच होय. त्या देवीचे स्मरण केले असता आणि तिच्या नावाचा उच्चार केला असता ती खरोखर मनोरथ परिपूर्ण करते. तिचे चित्त दयेने सर्वदा आर्द्र असून तिचे पूजन केले असता ती वर देते. अक्षराचा उच्चार होताक्षणीच एका द्विजाला फल कसे प्राप्त झाले ह्याविषयी हे मुनिजनहो मी एक इतिहास कथन करतो. तुम्ही श्रवण करा.
पूर्वी देवदत्त म्हणून एक विख्यात द्विज कोसल देशामध्ये होऊन गेला. तो निपुत्रिक असल्यामुळे त्याने पुत्रप्राप्तीकरिता विधिपूर्वक इष्टी करण्याचे मनामध्ये आणले. तमसा नदीचे तीरी उत्कृष्ट मंडप उभारून त्याने सत्कर्मामध्ये निपुण असलेले वेदवेत्ते द्विज तेथे बोलाविले. यथाविधी वेदी करून त्याने अग्नि स्थापन केला आणि त्याठिकाणी त्या द्विजश्रेष्ठाने यथाविधी पुत्रेष्टि केली. मुनिश्रेष्ठ सुहोत्राला त्याने ब्रह्मत्व दिले. याज्ञवल्क्यास अध्वर्युत्व, बृहस्पतीला हौत्र, पैलाला प्रस्तोतृत्व व गोभीलाला उद्गातृत्व देऊन त्याने इतर मुनींना सभ्य म्हणून वरले आणि त्यांची यथाविधी पूजा करून त्यांना विपुल द्रव्यदक्षिणा अर्पण केली. सामगायन करणार्यामध्ये श्रेष्ठ असल्याने उद्गात्याने सप्तस्वर आणि स्वरित यांनी युक्त अशा सामाचे गायन सुरू केले असता वारंवार श्वास टाकावा लागल्यामुळे त्यांच्या हातून स्वरभंगदोष घडला. तेव्हा यजमान देवदत्त तत्क्षणी क्रुद्ध होऊन गोभिलाला म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, तू मूर्ख आहेस. अरे, पुत्राकरिता यजन करणारा मी आणि माझे हे कार्यक्रम सुरू झाले असताना तू आज स्वर भंगदोष केला आहेस."
यावर गोभिल, अत्यंत क्रुद्ध होऊन देवदत्ताला म्हणाला, "ज्याअर्थी तू मला मूर्ख म्हणालास त्याअर्थी तुला मूर्ख शठ व अक्षरशत्रु असा पु्र होईल. अरे, कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये श्वासोच्छवास आवरून धरणे फार कठीण आहे. तस्मात् महाअविचारी देवदत्ता, या स्वरभंगासंबंधाने माझा काहीएक अपराध नाही."
हे महात्मा गोभीलाचे भाषण श्रवण केल्यानंतर अतिशय दुःखीत झालेला देवदत्त शापाला भिऊन त्याला म्हणाला, "हे विप्रश्रेष्ठा, मज निरपराध्यावर आपण का बरे व्यर्थ क्रुद्ध झाला आहा ? मुनि सर्वदा क्रोधरहित व सुख देणारे असतात. हे विप्रश्रेष्ठा, क्षुल्लक अपराधाकरिता आपण मला कसा बरे शाप दिला ? मी निपुत्रिक असल्यामुळे अगोदरच फार दुःखी होतो व आपण तर आता मला अधिकच दुःखी केले आहे. कारण मूर्ख पुत्र होण्यापेक्षा निपुत्रिकपणाच उत्तम, असे वेदवेत्यांचे म्हणणे आहे आणि ब्राह्मणकुलामध्ये उत्पन्न झालेला मूर्ख तर सर्वांच्याच निंदेस पात्र होणारा आहे. तो पुत्र पशूप्रमाणे अथवा क्षुद्राप्रमाणे असल्यामुळे कोणत्याही कर्माला योग्य होत नाही. हे द्विजश्रेष्ठा, मूर्ख पुत्राचा मला ह्या जगतामध्ये काय बरे उपयोग आहे ? मूर्ख ब्राह्मण शूद्रतुल्य होय याविषयी संशय नाही. तो पूजन व दान यास पात्र नसून सर्व कर्माविषयी निंद्यच आहे. देशामध्ये वास्तव्य करणार्या वेदाक्षरशून्य ब्राह्मणाला शूद्राप्रमाणे समजून राजाने त्यांपासून कर घ्यावा.
फलेच्छु पुरुषाने त्या मूर्ख द्विजाला हव्यकव्यामध्ये आसनही देऊ नये. राजाने त्याला शूद्रतुल्य समजावे व कोणत्याही कर्माकडे त्याची योजना करू नये. उपनयन झालेल्या वेदरहित ब्राह्मणाकडून राजाने नांगर धरवावा. दर्भाचे चट मांडून विप्ररहित श्राद्ध करावे, परंतु मूर्ख विप्र बोलावून कधीही श्राद्ध करू नये. कारण, आहारापेक्षा अविद्वान ब्राह्मणाला अधिक अन्न दिल्यास देणारा नरकात जातो. घेणारा तर विशेषच दोषी होतो. ज्याच्या देशामध्ये अज्ञानी लोक व मूर्ख ब्राह्मण यांचे दान, मान इत्यादिकांच्या योगाने पूजन होत असते त्या राज्याच्या राजाचा धिक्कार असो !
आसन, पूजन व दान यास बंधाने मुळीच भेद नसतो. प्राज्ञ पुरुषाने मूर्ख व पंडीत यातील भेद समजणे अवश्य आहे. ज्या देशामध्ये दान, मान व सत्कार यांच्या योगाने मूर्ख लोक गर्विष्ठ झालेले असतील, त्या देशामध्ये पंडिताने कधीही वास्तव्य करू नये. दुर्जनांच्या ऐश्वर्यापासून दुर्जनांनाच लाभ होत असतो. निंबवृक्ष जरी फलांनी पूर्ण भरला असला तरी काकपक्षीच त्याच उपभोग घेत असतात. वेदवेत्ता ब्राह्मण अन्नभक्षण करून वेदाभ्यास करीत असतो, त्यामुळे अन्न देणाराचे पूर्वज आनंदित होऊन खरोखर स्वर्गामध्ये क्रीडा करू लागतात. तस्मात्, हे वेदवेत्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या गोभिला, तुझ्या तोंडातून हे काय निघाले ? अरे ! संसारामध्ये मूर्ख पुत्र होणे हे मरणापेक्षाही अत्यंत निंद्य आहे.
म्हणून हे महाभाग्यशाली मुने, कृपा करून आपण शापाचा अनुग्रह करा. आपण दीनाचा उद्धार करण्यास समर्थ आहा. मी आपल्या चरणावर लोटांगण घालतो."
याप्रमाणे प्रार्थना करून देवदत्त त्या गोभिलमुनींच्या पाया पडला. त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले, अंतःकरण खिन्न झाले व स्वतः दीन होऊन तो स्तुती करू लागला. तेव्हा दीन अंतःकरणाने युक्त असलेल्या त्या देवदत्ताला अवलोकन करून गोभिल मुनींना दया आली.
महात्म्यांचा कोप क्षणभर टिकणारा असून अत्यंत पापी लोकांचा कोप कल्पपर्यंतही कायम राहात असतो. उदक स्वभावतःच थंड आहे व अग्नी किंवा सूर्यकिरण याच्या तपामुळे जरी ते उष्ण झाले तरी तापाचा संबंध नाहीसा होताक्षणी गार होत असते.
दयाळू गोभिलमुनी अत्यंत दुःखित झालेल्या त्या देवदत्ताला म्हणाले, "तुझा पुत्र प्रथम मूर्ख निपजून नंतर विद्वानही होईल."
याप्रमाणे गोभिलमुनींनी वर दिला असता तो द्विजश्रेष्ठ देवदत्त आनंदित झाला आणि यथाविधी इष्टि समाप्त करून त्याने विप्रांना जाण्याची अनुज्ञा दिली.
पुढे काही काल लोटल्यानंतर त्याची ती रूपवती, साध्वी व रोहिणीतुल्य भार्या रोहिणी ॠतुकाली गर्भिणी झाली. तेव्हा गर्भादान ज्या संस्कारात प्रथम असून मुख्य आहे असे गर्भधानापुढील पुंसवनादि इतर संस्कार त्या द्विजाने यथाविधी केले. पुंसवन, शृंगारकरक, सीमंतोन्नयन हे संस्कार त्याने वेदोक्त विधीने केले. इष्टि सफल झाली असे त्याला वाटू लागले आणि आनंदित होऊन त्याने दाने दिली.
नंतर रोहिणीनक्षत्राने युक्त अशा शुभदिवशी अत्यंत शुभ लग्नावर त्या रोहिणीला पुत्र झाला असता त्या देवदत्ताने त्याचा जातकर्मसंस्कार केला. नंतर पुत्रमुखदर्शन करून त्याने नामकरणसंस्कार केला. तेव्हा पुरातन इतिहास जाणणार्या त्या द्विजाने आपल्या पुत्राचे नाव उतथ्य असे ठेविले. पुढे आठवे वर्ष लागल्यानंतर त्या पित्याने त्या पुत्राचा शुभ दिवशी उपनयनसंस्कार यथाविधी केला. नंतर ब्रह्मचर्यव्रताने राहिलेल्या त्या उतथ्याला गुरूने वेदाध्ययन सांगितले. परंतु मुग्धाप्रमाणे असलेल्या त्या उतथ्याने वेदाच्या एका अक्षराचा देखील उच्चार केला नाही. पित्याने पुष्कळ प्रकारांनी त्याला पढविले असताही तिकडे लक्ष न देता तो शठ जेव्हा मूढाप्रमाणे स्वस्थ बसू लागला तेव्हा पित्याला त्याच्याबद्दल फारच वाईट वाटू लागले.
ह्याप्रमाणे एकसारखा त्याच्या अभ्यासाबद्दल पित्याचा प्रयत्न चालला असताना उतथ्य बारा वर्षांचा झाला. तरीही संध्यावंदनही त्यास कसे करावे हे समजले नाही. लोकामध्ये तो अतिशय मूर्ख म्हणून प्रसिद्ध झाला. ती वार्ता सर्व ब्राह्मण, तपस्वी व इतर लोक यामध्ये अतिशय वेगाने पसरली. तेव्हा तो वनामध्ये जेथे जाई तेथे लोक त्याला हसू लागले व अतिशय निर्भत्सना करू लागले.
मातापितरही त्याची निंदा करू लागले. ह्याप्रमाणे लोक, मातापितर व बंधुजन निंदा करू लागले असता तो विप्र उतथ्य विरक्त होऊन वनामध्ये जाऊ लागला. कारण, 'आंधळा अथवा पांगळाही मुलगा बरा, परंतु मूर्ख पुत्र बरा नव्हे 'असे मातापितरांनी म्हटले असता ते त्याला सहन झाले नाही. त्यामुळे तो वनामध्ये प्रविष्ट झाला. गंगातीरी पवित्र ठिकाणी त्याने एक उत्कृष्ट पर्णकुटिका तयार केली व वनातील फळमूळावर उपजीविका करून तो तेथे स्वस्थ राहिला. 'मी असत्य भाषण करणार नाही 'असा मोठा नियम त्याने धारण केला. याप्रमाणे ब्रह्मचर्य व्रताने वागणारा तो उतथ्य त्या रम्य आश्रमामध्ये राहिला.