[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाला, "हे तात, आपण गुणांची लक्षणे सांगितलीत, पण तरीही आपल्या मुखातून स्त्रवलेला मधुररस सेवन करून माझी तृप्ती झाली नाही. म्हणून अंतःकरणामध्ये मला पराकाष्ठेची शांति प्राप्त होईल अशा रीतीने गुणांविषयी इत्थंभूत वर्णन आपण मला सांगावे."
व्यास म्हणाले, "ह्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली असता रजोगुणांपासून उत्पन्न झालेला तो जगत्कर्ता ब्रह्मदेव त्याला सांगू लागला. ब्रह्मदेव म्हणाला, "हे नारदा, गुणांचे वर्णन मी तुला कथन करतो. केवळ सत्वगुण कोठेही दृष्टीस पडत नाही. ह्या गुणांचे रूप मिश्र असल्याने त्यांचे मिश्रत्वच भासत असते. ज्याप्रमाणे सर्व अलंकारांनी भूषित व हावभावांनी युक्त अशी एखादी श्रेष्ठ स्त्री भर्त्याला त्याच्या मनाप्रमाणे आनंद देत असते, मातापितरांना व बंधुवर्गाला ज्याप्रमाणे तीच आनंदीत करीत असते आणि ज्याप्रमाणे सवतींना दुःख व मोह होण्यासही तीच कारणीभूत होत असते, त्याप्रमाणे स्त्रीत्व प्राप्त झालेल्या त्या सत्वगुणाच्या योगाने रजोगुण व तमोगुण ह्यांची वृत्तीही वेगळ्या वेगळ्या प्रकारची होते. तसेच स्त्रीत्व प्राप्त झालेल्या रजोगुणाच्या योगाने सत्वगुण तमोगुण व रजोगुण ह्यांच्याही वृत्तीमध्ये अंतर पडते.
परस्पर संयोगामुळे सत्वप्रभृती गुण वेगवेगळ्या रीतीने भासू लागतात. गुण परस्परमिश्र न होता जर अलग रहात असते तर त्या गुणांची जी स्वरूपावस्था होते, त्यातच ते कायम असतात व त्यामुळे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या जाती दृष्टीस पडल्या नसत्या. परंतु हे नारदा, परस्परांचा संयोग होत असल्यामुळे गुणांमध्ये विपरीत प्रकार दृष्टीस पडत आहेत. रूप, लज्जा, वचन, माधुर्य व विनय ह्यांनी युक्त, यौवनाने भूषित, कामशास्त्रातील प्रकाराविषयी सूज्ञ आणि धर्मशास्त्राचाही परिचय असलेली स्त्री ज्याप्रमाणे भर्त्याला आनंद देणारी होऊन सवतीला दुःख देणारी होते आणि पतीला मोह पाडणे हा तिचा स्वभाव असूनही ज्याप्रमाणे लोक तिला सत्वस्थ असे म्हणत असतात त्याप्रमाणे सत्वगुण इतरांच्या संयोगाने विकारयुक्त होऊ लागला असता, त्याचे स्वरूपही वेगळेच भासू लागते. जशी एकच सेना चोरांनी गांजलेल्या साधूंना सुखकारक होत असून तिच्याच योगाने चोरांना काही सुचेनासे होऊन दुःख प्राप्त होते त्याचप्रमाणे गुण मिश्र असल्यामुळे आपले स्वरूपही विपरीत भासवत असतात. अथवा जसे आकाश दिवसा मोठ्या मोठ्या मेघांनी आच्छादित, विजेच्या गडगडाटाने युक्त व अंधःकाराने व्याप्त होऊन भूमीवर वृष्टी होऊ लागली असता लोक त्या प्रकाराला अंधःकारमय दुर्दिन असे म्हणत असतात.
परंतु बीज वगैरे सामुग्री ज्यांच्यापाशी सिद्ध आहे अशा शेतकर्यांना ते अतिशय दुर्दिनच सुखप्रद होत असतात, आणि तेच दुर्दिन ज्यांनी घरे आच्छादिलेली नाहीत व ज्यांच्या घरातील गवत संपूर्ण भिजून गेले आहे अशा दुर्दैवी कुटुंब पुरुषांना दुःखकारक होत असतात व ज्यांचे पति प्रवासाला गेलेले आहेत अशा स्त्रियांना मोह उत्पन्न करू लागतात याप्रमाणे स्वरूपावस्थेमध्ये असलेले सर्व गुण मिश्र असल्यामुळे विपरीत भासत असतात.
हे पुत्रा, पुनः मी त्यांची लक्षणे कथन करतो ती तू श्रवण कर. सत्वगुण सर्वदा, निर्मल, विशद, लघु व प्रकाशक असतो. हस्तपादादि अवयव व नेत्रादि इंद्रिये ही जेव्हा हलकी व दोषरहित असतात तेव्हा पुढे झालेल्या विषयाचे निर्मल अंतःकरणाला आकलन होते. तेव्हा शरीरामध्ये सत्वगुण उत्कट झाला आहे असे समजावे.
जांभया, जाड्य व तंद्रा ही जेव्हा प्रकट होऊ लागतात तेव्हा चंचल रजोगुण उत्कट झाला आहे असे समजावे. ज्या कोणाच्या देहामध्ये रजोगुण उत्कट होतो तो कलहाचे कारण शोधू लागतो. ग्रामांतरास जाण्याचे मनामध्ये आणतो. त्याचे चित्त अतिशय चंचल होते. विवाद करण्यास तो उद्युक्त होतो. खरोखरच जड व आच्छादनरूप असा जो तमोगुण तो जेव्हा उत्कट होतो तेव्हा अवयव व इंद्रिये सत्वर जड होऊन आच्छादित झाल्यासारखी होतात. मन ज्ञानशून्य होते. निद्रेची इच्छासुद्धा मुळीच होत नाही. हे नारदा, याप्रमाणे गुणांची लक्षणे समजावीत."
नारद म्हणाला, "हे पितामह आपण तिन्ही गुणांची लक्षणे भिन्न भिन्न सांगितलीत.
ते एकत्र झाले असताना नेहमी टिकणारे कार्य कसे करतात ? परस्परांपासून भिन्न असलेले शत्रू एकत्र होऊन कधीही कार्य करीत नाहीत. परंतु हे गुण परस्परशत्रु असताना एकत्र युक्त होऊन कार्य करतात हे मोठे आश्चर्य आहे. तेव्हा हे आपण मला कथन करा. मी श्रवण करतो.
ब्रह्मदेव म्हणाला, "हे पुत्रा, मी कथन करतो. तू श्रवण कर. त्या गुणांची वृत्ती दीपाप्रमाणे आहे. तेल, वात आणि ज्योती ही परस्पर विरुद्ध असूनही ज्याप्रमाणे एकत्र झाली असता दीपरूप होतात व तो दीप वस्तुदर्शनरूप कार्य करतो, त्याचप्रमाणे गुणांचा प्रकार आहे. ज्याप्रमाणे अग्नीशी व वातीशी विरुद्ध नसलेले तेल व या उभयतांशी विरुद्ध असलेला अग्नी, ही परस्पर एकत्र झाली असता पदार्थ दाखवितात, त्याचप्रमाणे परस्परविरुद्ध गुण एकत्र होऊन कार्य करतात."
नारद म्हणाला, "हे सत्यवतीपुत्र व्यासमुने, याप्रमाणेच प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांची हकीकत आहे. हे गुण विश्वाचे कारण आहेत असे मी पूर्वीही ऐकले आहे."
व्यास म्हणतात, "याप्रमाणे नारदमुनींनी गुणांची लक्षणे व कार्ये हे सर्व विभागशः मला सविस्तर कथन केले. सारांश, जिने हे सर्व विश्व निर्माण केले त्याच परम शक्तीचे आराधन केले पाहिजे. मोक्ष व्यतिरिक्त कार्ये असल्यास तिच्या सगुण रूपाचे आराधन करावे आणि तद्भिन्न कार्य असल्यास म्हणजे मोक्षरूप असल्यास सर्वदा त्या निर्गुण शक्तीचेच चिंतन करावे.
पुरुष हा पूर्ण, निरीच्छ, उत्कृष्ट व अविनाशी असून काही एक करीत नाही. ही महामाया स्थूल व सूक्ष्म विश्व उत्पन्न करीत असते. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, सूर्य, चंद्र, इंद्र, अश्विनीकुमार, अष्टवसु, त्वष्टा, कुबेर, वरुण, अग्नी, वायु, पूषा, कार्तिकेय व विनायक हे सर्व शक्तीने संयुक्त झाले असताना आपापली कार्ये करण्यास समर्थ होतात. शक्तीचा संयोग झाल्यशिवाय ते कार्ये करण्यास अशक्त, इतकेच नव्हे तर चलनवलन करण्यासही समर्थ नसतात.
हे जनमेजय राजा, ती परमेश्वराची जगताचे कारण आहे. म्हणून हे प्रजाधिपते भूपाल, तू तिचे आराधन व यजन कर. मोठ्या भक्तीने तिचे यथाविधी पूजन कर. जिला महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती असे म्हणतात तीच सर्व भूतांची स्वामिनी असून सर्व कारणांचेही कारण आहे. ती शांत, दयाळू, सुखाने सेव्य आणि सर्व मनोरथ परिपूर्ण करणारी आहे. केवल नामोच्चाराच्याच योगाने मनोरथ सफल करणारी आहे.
ब्रह्मा, विष्णू व महेश ह्या देवांनी आणि जितेंद्रिय व मुमुक्षू अशा नाना प्रकारच्या तपस्व्यांनी पूर्वी तिचेच आराधन केले आहे. प्रसंगाने चुकून तिच्या नावाचा जरी अस्पष्ट उच्चार झाला तरी प्राप्त होण्यास सर्वस्वी दुर्घट अशाही वस्तू ती देते.
फार कशाला ? ती वनामध्ये व्याघ्रादिकांना अवलोकन करून भयभीत झालेल्या पुरुषाने अनुस्वार रहित जरी "ऐ ! ऐ ! "असा बीजांचा उच्चार केला तरी सुद्धा ती मनोरथ परिपूर्ण करते.
ह्याविषयी, हे नृपश्रेष्ठा, सत्यव्रताचेच उदाहरण आम्हा जितेंद्रिय मुनींना प्रत्यक्ष ठाऊक आहे. हे राजा, ब्राह्मणांच्या समाजामध्ये त्याचे उदाहरण प्राज्ञजन नेहमी कथन करीत असतात व मी ते सर्व सविस्तर श्रवण केले आहे.
सत्यव्रत नावाचा एक महामूर्ख अक्षरशत्रू ब्राह्मण वराहमुखातून सहज "ऐ ! "असे बिंदुहीन अक्षर श्रवण करून व त्याप्रमाणे स्वतः उच्चारून ज्ञानवंतांमध्ये श्रेष्ठ झाला आणि उच्चार झाल्यामुळेच भगवतीदेवी संतुष्ट झाली व दर्याद्र होऊन त्या परमेश्वराने त्याला कविराज केले.