श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


गुणानां रूपसंस्थानादिवर्णनम्

ब्रह्मोवाच
सर्गोऽयं कथितस्तात यत्पृष्टोऽहं त्वयाऽधुना ।
गुणानां रूपसंस्थां वै शृणुष्वैकाग्रमानसः ॥ १ ॥
सत्त्वं प्रीत्यात्मकं ज्ञेयं सुखात्प्रीतिसमुद्‌भवः ।
आर्जवं च तथा सत्यं शौचं श्रद्धा क्षमा धृतिः ॥ २ ॥
अनुकम्पा तथा लज्जा शान्तिः सन्तोष एव च ।
एतैः सत्त्वप्रतीतिश्च जायते निश्चला सदा ॥ ३ ॥
श्वेतवर्णं तथा सत्त्वं धर्मे प्रीतिकरः सदा ।
सच्छ्रद्धोत्पादकं नित्यमसच्छ्रद्धानिवारकम् ॥ ४ ॥
सात्त्विकी राजसी चैव तामसी च तथापरा ।
श्रद्धा तु त्रिविधा प्रोक्ता मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ॥ ५ ॥
रक्तवर्णं रजः प्रोक्तमप्रीतिकरमद्‌भुतम् ।
अप्रीतिर्दुःखयोगत्वाद्‌भवत्येव सुनिश्चिता ॥ ६ ॥
प्रद्वेषोऽथ तथा द्रोहो मत्सरः स्तम्भ एव च ।
उत्कण्ठा च तथा निद्रा श्रद्धा तत्र च राजसी ॥ ७ ॥
मानो मदस्तथा गर्वो रजसा किल जायते ।
प्रत्येतव्यं रजस्त्वेतैर्लक्षणैश्च विचक्षणैः ॥ ८ ॥
कृष्णवर्णं तमः प्रोक्तं मोहनं च विषादकृत् ।
आलस्यं च तथाऽज्ञानं निद्रा दैन्यं भयं तथा ॥ ९ ॥
विवादश्चैव कार्पण्यं कौटिल्यं रोष एव च ।
वैषम्यं वातिनास्तिक्यं परदोषानुदर्शनम् ॥ १० ॥
प्रत्येतव्यं तमस्त्वेतैर्लक्षणैः सर्वथा बुधैः ।
तामस्या श्रद्धया युक्तं परतापोपपादकम् ॥ ११ ॥
सत्त्वं प्रकाशयितव्यं नियन्तव्यं रजः सदा ।
संहर्तव्यं तमः कामं जनेन शुभमिच्छता ॥ १२ ॥
अन्योन्याभिभवाच्चैते विरुध्यन्ति परस्परम् ।
तथोऽन्योन्याश्रयाः सर्वे न तिष्ठन्ति निराश्रयाः ॥ १३ ॥
सत्त्वं न केवलं क्वापि न रजो न तमस्तथा ।
मिलिताश्च सदा सर्वे तेनान्योन्याश्रयाः स्मृताः ॥ १४ ॥
अन्योन्यमिथुनाच्चैव विस्तारं कथयाम्यहम् ।
शृणु नारद यज्ज्ञात्वा मुच्यते भवबन्धनात् ॥ १५ ॥
सन्देहोऽत्र न कर्तव्यो ज्ञात्वेत्युक्तं मया वचः ।
ज्ञातं तदनुभूतं यत्परिज्ञातं फले सति ॥ १६ ॥
श्रवणाद्दर्शनाच्चैव सपद्येव महामते ।
संस्कारानुभवाच्चैव परिज्ञातं न जायते ॥ १७ ॥
श्रुतं तीर्थं पवित्रञ्च श्रद्धोत्पन्ना च राजसी ।
निर्गतस्तत्र तीर्थे वै दृष्टं चैव यथाश्रुतम् ॥ १८ ॥
स्नातस्तत्र कृतं कृत्यं दत्तं दानं च राजसम् ।
स्थितस्तत्र कियत्कालं रजोगुणसमावृतः ॥ १९ ॥
रागद्वेषान्न निर्मुक्तः कामक्रोधसमावृतः ।
पुनरेव गृहं प्राप्तो यथापूर्वं तथा स्थितः ॥ २० ॥
श्रुतं च नानुभूतं वै तेन तीर्थं मुनीश्वर ।
न प्राप्तं च फलं यस्मादश्रुतं विद्धि नारद ॥ २१ ॥
निष्पापत्वं बलं विद्धि तीर्थस्य मुनिसत्तम ।
कृषेः फलं यथा लोके निष्पन्नान्नस्य भक्षणम् ॥ २२ ॥
पापदेहविकारा ये कामक्रोधादयः परे ।
लोभो मोहस्तथा तृष्णा द्वेषो रागस्तथा मदः ॥ २३ ॥
असूयेर्ष्याक्षमाशान्तिः पापान्येतानि नारद ।
न निर्गतानि देहात्तु तावत्पापयुतो नरः ॥ २४ ॥
कृते तीर्थे यदैतानि देहान्न निर्गतानि चेत् ।
निष्फलः श्रम एवैकः कर्षकस्य यथा तथा ॥ २५ ॥
श्रमेणापीडितं क्षेत्रं कृष्टा भूमिः सुदुर्घटा ।
उप्तं बीजं महार्घं च हिता वृत्तिरुदाहृता ॥ २६ ॥
अहोरात्रं परिक्लिष्टो रक्षणार्थं फलोत्सुकः ।
काले सुप्तस्तु हेमन्ते वने व्याघ्रादिभिर्भृशम् ॥ २७ ॥
भक्षितं शलभैः सर्वं निराशश्च कृतः पुनः ।
तद्वत्तीर्थश्रमः पुत्र कष्टदो न फलप्रदः ॥ २८ ॥
सत्त्वं समुत्कटं जातं प्रवृद्धं शास्त्रदर्शनात् ।
वैराग्यं तत्फलं जातं तामसार्थेषु नारद ॥ २९ ॥
प्रसह्याभिभवत्येव तद्‌रजस्तमसी उभे ।
रजः समुत्कटं जातं प्रवृत्तं लोभयोगतः ॥ ३० ॥
तत्तथाभिभवत्येव तमःसत्त्वे तथा उभे ।
तमस्तथोत्कटं भूत्वा प्रवृद्धं मोहयोगतः ॥ ३१ ॥
तत्सत्त्वरजसी चोभे सङ्गम्याभिभवत्यपि ।
विस्तरं कथयाम्यद्य यथाभिभवतीति वै ॥ ३२ ॥
यदा सत्त्वं प्रवृद्धं वै मतिर्धर्मे स्थिता तदा ।
न चिन्तयति बाह्यार्थं रजस्तमःसमुद्‌भवम् ॥ ३३ ॥
अर्थं सत्त्वसमुद्‌भूतं गृह्णाति च न चान्यथा ।
अनायासकृतं चार्थं धर्मं यज्ञं च वाञ्छति ॥ ३४ ॥
सात्त्विकेष्वेव भोगेषु कामं वै कुरुते तदा ।
राजसेषु न मोक्षार्थं तामसेषु पुनः कुतः ॥ ३५ ॥
एवं जित्वा रजः पूर्वं ततश्च तमसो जयः ।
सत्त्वं च केवलं पुत्र तदा भवति निर्मलम् ॥ ३६ ॥
यदा रजः प्रवृद्धं वै त्यक्त्वा धर्मान् सनातनान् ।
अन्यथाकुरुते धर्माच्छ्रद्धां प्राप्य तु राजसीम् ॥ ३७ ॥
राजसादर्थसंवृद्धिस्तथा भोगस्तु राजसः ।
सत्त्वं विनिर्गतं तेन तमसश्चापि निग्रहः ॥ ३८ ॥
यदा तमो विवृद्धं स्यादुत्कटं सम्बभूव ह ।
तदा वेदे न विश्वासो धर्मशास्त्रे तथैव च ॥ ३९ ॥
श्रद्धां च तामसीं प्राप्य करोति च धनात्ययम् ।
द्रोहं सर्वत्र कुरुते न शान्तिमधिगच्छति ॥ ४० ॥
जित्वा सत्त्वं रजश्चैव क्रोधनो दुर्मतिः शठः ।
वर्तते कामचारेण भावेषु विततेषु च ॥ ४१ ॥
एकं सत्त्वं न भवति रजश्चैकं तमस्तथा ।
सहैवाश्रित्य वर्तन्ते गुणा मिथुनधर्मिणः ॥ ४२ ॥
रजो विना न सत्त्वं स्याद्‌रजः सत्त्वं विना क्वचित् ।
तमो विना न चैवैते वर्तन्ते पुरुषर्षभ ॥ ४३ ॥
तमस्ताभ्यां विहीनं तु केवलं न कदाचन ।
सर्वे मिथुनधर्माणो गुणाः कार्यान्तरेषु वै ॥ ४४ ॥
अन्योन्यसंश्रिताः सर्वे तिष्ठन्ति न वियोजिताः ।
अन्योन्यजनकाश्चैव यतः प्रसवधर्मिणः ॥ ४५ ॥
सत्त्वं कदाचिच्च रजस्तमसी जनयत्युत ।
कदाचित्तु रजः सत्त्वतमसी जनयत्यपि ॥ ४६ ॥
कदाचित्तु तमः सत्त्वरजसी जनयत्युभे ।
जनयन्त्येवमन्योन्यं मृत्पिण्डश्च घटं यथा ॥ ४७ ॥
बुद्धिस्थास्ते गुणाः कामान्बोधयन्ति परस्परम् ।
देवदत्तविष्णुमित्रयज्ञदत्तादयो यथा ॥ ४८ ॥
यथा स्त्रीपुरुषश्चैव मिथुनौ च परस्परम् ।
तथा गुणाः समायान्ति युग्मभावं परस्परम् ॥ ४९ ॥
रजसो मिथुने सत्त्वं सत्त्वस्य मिथुने रजः ।
उभे ते सत्त्वरजसी तमसो मिथुने विदुः ॥ ५० ॥
नारद उवाच
इत्येतत्कथितं पित्रा गुणरूपमनुत्तमम् ।
श्रुत्वाप्येतत्स एवाहं ततोऽपृच्छं पितामहम् ॥ ५१ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे गुणानां रूपसंस्थानादिवर्णनं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


गुणांविषयी बोध

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेवाच्या तोंडून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे ऐकण्यात नारद तल्लीन झाला होता. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, "हे नारदा, तू विचारल्याप्रमाणे मी तुला प्रकृति-पुरुषातील भेद स्पष्ट करून ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगितली. आता तुला गुणांच्या स्वरूपाची स्थिती कशी असते हे कथन करतो. तू एकाग्र होऊन ऐक.

हे नारदा, सत्वगुण आनंद रूप आहे. कारण सुखामुळेच आनंद निर्माण होत असतो आणि सत्वगुणाच्या योगानेच सुखाची प्राप्ती होते, असा हा परस्पर संबंध आहे.

सरलता, सत्य, शौच, श्रद्धा, क्षमा, धैर्य अन् कंपा, लज्जा, शांती व संतोष या लक्षणावरून निश्चल असलेला सत्वगुण उत्पन्न झाला आहे, हे नक्कीच. सत्वगुणाचा वर्ण श्वेत आहे. त्यामुळे सत्वगुणी पुरुष धर्मावर नितांत प्रेम करणारा आणि अत्यंत श्रद्धाळू अंतःकरणाचा असतो. सत्वगुणामुळेच पुरुषाच्या मनातील हे भाव उचंबळून येतात. सत्वगुण मनाला निंद्य वस्तूंपासून परावृत्त करतो. श्रद्धेचे तीन प्रकार सांगितले आहेत. ते असे, सात्विकी श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा.

तसेच हे नारदा, आता गुणांचे वर्णन ऐक. रजोगुणाचा रक्त वर्ण असतो. हा गुण अद्‌भूत अप्रीती उत्पन्न करतो. कारण शेवटी रजोगुणामुळे दुःखाचाही अनुभव घ्यावा लागतो. म्हणून रजोगुणाचा दुःखाशी संयोग असल्याने त्याच्यापासून अप्रीती निश्चितच उत्पन्न होते. द्वेष, द्रोह, मत्सर, दुराग्रह, उत्कंठा, निद्रा, राजसी श्रद्धा, अभिमान, निग्रह, गर्व हे सर्व गुणावगुण रजोगुणापासूनच निर्माण झाले आहेत. म्हणूनच वरील सर्व लक्षाणांवरून बुद्धिमान लोकांनी रजोगुणांची ओळख पटवून घ्यावी.

हे नारदा, तमोगुण कृष्णवर्णाचा असल्या कारणाने त्यापासून पुरुषाला विषाद उत्पन्न होत असतो. त्यामुळे आळस, निद्रा, दैन्य, भय, विवाद, कृपणता, कौटिल्य, रेत, वैषम्य तसेच कमालीचा नास्तिक भाव, दुसर्‍याचे दोष शोधण्याची वृत्ती हे सर्वच तमोगुणाचे निदर्शक असल्याने ज्ञानवंताला या लक्षणावरून ओळखता येईल.

मुळातच हा तामसी श्रद्धेने परिपूर्ण असल्याने नित्य दुसर्‍यांना त्यापासून दुःख उत्पन्न करून देत असतो, म्हणून शुभ इच्छिणार्‍या पुरुषाने नित्य सत्वगुणाची वृत्ती ठेवावी, रजोगुण अत्यंत संयमाने पाळावा आणि शक्यतो तमोगुण नाहीसा होईल अशी कार्ये करण्याचा प्रयत्‍न करावा. हे सर्व गुण एकमेकांचे परस्पर पराजय करीत असतात. त्यामुळे दोन गुणांची निग्रहपूर्वक जोपासना करावी. तमोगुण नष्ट करण्याचा प्रयत्‍न करावा. हे तिन्ही गुण एकमेकांना नेहमी विरोध करीत असतात. म्हणून सर्वच गुण एकमेकांच्या आश्रयाने आहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

हे नारदा, केवळ सत्वगुणच सापडेल अथवा तमोगुणच दृष्टीस पडेल असे कोठेही असू शकत नाही. कुठेही शोधले तरी या सर्व गुणांचे मिश्रणच आढळेल. म्हणूनच हे गुण परस्परावलंबी आहेत व हे एकमेकांशी संलग्न असून ते परस्परांच्या आश्रयाने आहेत असे मी म्हणतो.

हे देवर्षे, आता गुणांविषयी तुला अधिक विस्तारपूर्वक मी निवेदन करतो. कारण या गुणांविषयी संपूर्ण ज्ञान जरी प्राप्त झाले तरीही पुरुष सर्वांतून मुक्त होतो. म्हणून हे नारदा या तिन्ही गुणांविषयी सर्व भाव तू नीट लक्षपूर्वक ऐक. मी बोलत असताना तू मनात कोणताही संशय ठेवू नकोस. तुला शंका आली तर तो सत्वर निवारण करून घे.

हे महाविचारी नारदा, श्रवण आणि दर्शन यामुळे दोहोतही निश्चित फलप्राप्ती होत असते. कारण श्रवण आणि दर्शन हे फलदायी असल्याने शास्त्र सांगते आणि तसा फलप्राप्तीविषयी सत्वर अनुभव देखील येतो, तेव्हा यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

हे पुत्रा, संस्कारामुळे जेव्हा एखादेवेळी स्मरण होते, त्यायोगाने आपल्याला सर्व समजल्यासारखे वाटते. पण वास्तविक पहाता ते खरोखरीच समजलेले नसते. आता मी असे का म्हणतो तेच तू पाहा.

हे नारदा, समज आपल्या कानावर वार्ता येते की अमुक एक तीर्थ अत्यंत पवित्र आहे. ती वार्ता ऐकून आपली श्रद्धा बसते. त्या श्रद्धेपोटी एखादा पुरुष घरातून निघतो आणि त्या तीर्थावर जाऊन पोहोचतो. तेथे गेल्यावर त्या तीर्थाचे दर्शन होताच आपण ऐकल्याप्रमाणे हे तीर्थ आहे असे त्याला वाटते. नंतर तो त्या तीर्थावर समाधानाने स्नान करतो. स्वतः पवित्र झालो असे वाटून तो दान करतो. हे राजस दान आहे. रजोगुणांनी परिपूर्ण असलेला पुरुष तेथेच पुण्य क्षेत्राचा सहवास मिळावा म्हणून काही दिवसपर्यंत वास्तव्य करतो. पण तीर्थाचे स्नान घडले म्हणून तो रोग, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया इत्यादीपासून मुक्त होतोच असे मात्र नाही. किंबहुना तो मुक्त होत नाही. म्हणून काम क्रोधांनी हा पुरुष युक्त असल्यामुळे तीर्थक्षेत्रे करीत तीर्थ स्नाने करीत आपल्या घरी परत येतो. पूर्वीप्रमाणे सर्व भावनांनी युक्त होऊन राहू लागतो.

हे नारदा, याचा अर्थ असा की त्या तीर्थाबद्दल त्याने फक्त कानाने ऐकलेले असते. पण स्वतः त्याने अनुभव घेऊन ह्या तीर्थाची योग्यता पारखून घेतलेली नसते. त्यामुळे अंधश्रद्धेने तो तीर्थयात्रा करतो आणि म्हणून त्यापासून त्याला कसलेही फल प्राप्त होत नाही. असे घडत असल्यामुळे त्या पुरुषाचे श्रवण असले काय नि नसले काय, दोन्हीही उपयोगी नाही. असले नसले तरी ते सारखेच आहेत हे अगदी निश्चित.

हे मुनिश्रेष्ठा, आपण जे अन्न निर्माण करतो ते कृषिकार्य केल्यामुळे निर्माण होते. ते त्याचे फल होय असेच मानतो. मनाला निष्पापत्व प्राप्त होणे हे त्या तीर्थाचे फल असणे आवश्यक आहे. तसे आहे का हे तू पहा. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, तृष्णा, राग, मद, असूया, ईर्षा, असहिष्णुता, अशांतता ही सर्व पातके जर पुरुषाच्या देहापासून बाहेर निघून गेली नसतील तर तो पुरुष पुण्यवान समजता येणार नाही. त्याला पापीच मानावे लागेल. सर्व तीर्थांवरील स्नाने केल्यावरही जर पुरुषाची ही पापे धुवून जात नसतील तर केवळ नामधारी शेतकर्‍याला जसे श्रम होतात तसेच तीर्थयात्रा केल्याने होणार हे व्यर्थ श्रमच होत आणि म्हणून निष्फल होय.

हे नारदमुने, शेताला कुंपण करण्यासाठी श्रम केले नंतर कुंपणांनी बंदिस्त केलेली जमीन अत्यंत कष्ट करून उत्तम प्रकारे नांगरून टाकली. तीत अत्यंत भारी किंमतीचे उत्तम बियाणे पेरले. हे सर्व शेतकर्‍याला कल्याणप्रद असेच वर्तन आहे. पण असे सद्‌वर्तन केल्यावर ऐन हंगामाच्या काळापर्यंत रात्रंदिवस त्याचे रक्षण करण्याकरता झटून त्यातील उत्पन्नाची आशा असलेला शेतकरी जर अगदी शेवटी हेमंत ऋतुमध्ये फलाचे वेळी जरी अनवधानतेने शेतातच झोपी गेला, तरीही त्यामुळे जर व्याघ्रादि इतर अनेक पशूंनी आणि पक्षांनी अथवा टोळांनी सर्व उभ्या पिकाचा नाश केल्यावर फल प्राप्तीच्या वेळी शेतकर्‍याची केवढी बरे घोर निराशा होईल ! तसेच हेही आहे. तीर्थयात्रेचे श्रम करून जर देहापासून पातके जात नसतील तर ती तीर्थयात्रा दुःखाचेच फल देणारी होईल यात काय संशय ! अशी दुःखफल देणारी यात्रा व्यर्थ होय.

म्हणून हे पुत्रा काहीही कारणाने का होईना, पण जर सत्व गुण अत्यंत उत्कट झाला आणि शास्त्राचे ज्ञान प्राप्त होऊन जर तो गुण वृद्धिंगत झाला, तर हे नारदा, ज्या तामस व राजस गुणांनी युक्त अशा भोग्य वस्तु आहेत त्यासंबंधी मनात वैराग्य प्राप्त होते. तेव्हा वैराग्य हे उत्कट सत्वगुणाचे फल आहे आणि तो सत्वगुण बलात्काराने इतर दोन गुणांचा म्हणजे रज आणि तम गुणांचा पराभव करून त्यांचा पूर्णपणे नाश करतो.

पण नारदा, या उलट जर रजोगुण उत्कट होऊन लोभाने तो वृद्धिंगत झाला तर मात्र तो सत्वगुण आणि तमोगुण या दोघांचा पूर्णपणे पराभव करतो हे निश्चित. या दोन्हीप्रमाणे तमोगुणाचेही असेच आहे. तमोगुण उत्कट झाल्यामुळे वृद्धिंगत झाल्यास मोहाच्या योगाने तो फोफावतो आणि तो सत्व व रज या दोन्ही गुणांचा संयुक्तपणे पराभव करतो.

आता हे नारदा, हे तिन्ही गुण एकमेकांचा पराभव कसा करतात हा प्रश्न आहे. तर आता मी तुला त्याविषयी सांगतो. तू ते लक्षपूर्वक श्रवण कर.

ज्यावेळी सत्वगुणाची मोठ्या प्रमाणात वाढ होते तेव्हा धर्मतत्त्वात पुरुषाची मति स्थिर होते. रजोगुणाशी संयोग पावणारी अथवा तमोगुणानी युक्त असलेली कोणतीही भोग्य वस्तू ज्या मनामध्ये किंचितही येत नाही, जेवढे सत्वगुणांनी युक्त असेल तेवढेच विचार व विकार मनामध्ये उद्‌भवत असतात, त्यामुळे इतर गुणांना तेथे शिरकावच मिळत नाही आणि विनासायासाने मिळणारा अर्थ धर्म व यज्ञ अशी सात्विक भावाचीच इच्छा प्राप्त होते. सर्व भोगही सात्विक स्वरूपाचे असावेत अशी वासना निर्माण होते आणि तो पुरुष मोक्षाची अपेक्षा करू लागतो. त्याचे मन राजस व तामस भोगाकडे चुकूनही वळत नाही. तामस भोग तर त्याला शिवतही नाहीत.

हे पुत्रा, अशा तर्‍हेने सत्वगुण हा रजोगुणांचा पूर्णपणे पराभव करतो आणि नंतर तमोगुणांचा नाश करतो व अखेर त्या पुरुषापाशी फक्त सत्वगुणच शिल्लक राहतो आणि तो निर्लेप होऊन अत्यंत निर्मळ होतो, शुद्ध होतो.

हे नारदा, सत्वगुणाचे जसे आहेत तसेच रजोगुणाचे तू समजून घे. रजोगुणाची अत्यंतिक वृद्धी झाली म्हणजे पुरुषाचे मनात राजसी श्रद्धा उत्पन्न होते. त्यामुळे तो पूर्वापार चालत आलेल्या सनातन धर्माचा जवळ जवळ त्याग करतो आणि निर्वेध, कसाही भलत्याच मार्गाने वागू लागतो. राजस साधने उपलब्ध होत असल्याने त्याच्या द्रव्यातही आपोआप भर पडते. त्याला राजस भोग प्राप्त होऊन तो त्यात रममाण होतो. त्यामुळे सत्वगुण पार नाहीसा होतो आणि तमोगुण पूर्णपणे दबला जातो.

हे महर्षे, जेव्हा तमोगुण उत्कट होऊन वृद्धिंगत होतो, त्यावेळी वृत्ती अधार्मिक होते व वेद आणि धर्मशास्त्रे यावरील विश्वास उडून जातो. तामसी श्रद्धांची निर्मिती होते आणि पुरुष द्रव्याच्या व्यय करण्यास प्रवृत्त होतो. सर्व ठिकाणी त्याची द्रोहबुद्धी निर्माण होते. त्यामुळे त्याच्या मनाला कधीही शांतता लाभत नाही. सत्वगुण व रजोगुण यांचा पराजय होऊन नाश होतो. त्यामुळे पुरुष रागीट बनतो. त्याची दुष्ट बुद्धी वाढते व तो पूर्णपणे वेडा होतो. तो महत्वाच्या गोष्टीतही स्वैराचाराने वागू लागतो. मन मानेल तसा तो राहतो.

अशा तर्‍हेने सत्व, रज आणि तम ह्यापैकी कोणताही गुण एकटा राहत नाही. हे गुण संयोग धर्माने युक्त असतात म्हणून हे गुण नेहमी एकमेकांच्या आश्रय करून राहात असतात. रजोगुणावाचून सत्वगुण राहील, किंवा सत्वगुणविरहित रजोगुण असेल, किंवा दोहोवाचून तमोगुण आढळेल, असे कधीही आणि कोठेही संभवत नाही. ही गोष्ट, हे पुरुषश्रेष्ठा, तू समजून घे. ते सर्व गुण परस्परावलंबी आहेत.

सारांश, सत्व व रज याशिवाय तमोगुण संभवत नाही. सर्व गुणांचे कार्य भिन्न असले तरी ते मिश्रच असतात यात शंका नाही. तेव्हा एवढेच लक्षात ठेव की, सर्व गुण परस्परांच्या आश्रयाने राहात असल्याने एकमेकांपासून ते विमुक्त होत नाहीत. इतकेच नव्हे तर त्या सर्वही गुणांचे ठिकाणी उत्पादन हा धर्म आहे. त्यामुळे ते तिघेही एकमेकांचे जनक आहेत.

कधी कधी तर, हे नारदमुने, सत्वगुण हाच तमोगुण व रजोगुण ह्यांना उत्पन्न करीत असतो. तर काही वेळेला सत्वगुण रजोगुण ह्यांना प्रत्यक्ष तमोगुणही उत्पन्न करू शकतो. हे मुने, ज्याप्रमाणे मृत्‌पिंड आणि घट हे जसे परस्परांना उत्पन्न करतात, तसेच हे गुणही परस्परांना निर्माण करतात.

देवदत्त, विष्णूमित्र आणि यज्ञदत्त इत्यादीप्रमाणे बुद्धीमुळे स्थित झालेले हे गुण परस्पर वासना निर्मिती करीत असतात. जसे पुरुष आणि स्त्री हे परस्परांशी संयुक्त होतात तसेच रजोगुणाला सत्वगुणाच्या योगाने मिथुनावस्था निःसंशय प्राप्त होत असते. तसेच सत्वगुणाला रजोगुणामुळे मिथुनावस्था प्राप्त होते आणि तमोगुणाला रजोगुण व सत्वगुण या दोघांच्याही योगाने मिथुनावस्था प्राप्त होते हे तू ध्यानात ठेव.

अशा प्रकारे गुणांविषयीचे विस्तारपूर्वक निवेदन श्रवण केल्यावर नारद म्हणाले, "अशा प्रकारे माझ्या पित्याने मला गुणांच्या अनुपम रूपाविषयी विस्ताराने कथन केले आणि मीही एकाग्र होऊन श्रवण केले नंतर मी पित्याला पुढे प्रश्न विचारू लागलो."





अध्याय आठवा समाप्त

GO TOP