श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


तत्त्वनिरूपणवर्णनम्

ब्रह्मोवाच
एवंप्रभावा सा देवी मया दृष्टाथ विष्णुना ।
शिवेनापि महाभाग तास्ता देव्यः पृथक्पृथक् ॥ १ ॥
व्यास उवाच
इत्याकर्ण्य पितुर्वाक्यं नारदो मुनिसत्तमः ।
पप्रच्छ परमप्रीतः प्रजापतिमिदं वचः ॥ २ ॥

नारद उवाच
पुमानाद्योऽविनाशी यो निर्गुणोऽच्युतिरव्ययः ।
दृष्टश्चैवानुभूतश्च तद्वदस्व पितामह ॥ ३ ॥
त्रिगुणा वीक्षिता शक्तिर्निर्गुणा कीदृशी पितः ।
तस्याः स्वरूपं मे ब्रूहि पुरुषस्य च पद्मज ॥ ४ ॥
यदर्थञ्च मया तप्तं श्वेतद्वीपे महातपः ।
दृष्टाः सिद्धा महात्मानस्तापसा गतमन्यवः ॥ ५ ॥
परमात्मा न सम्प्राप्तो मयाऽसौ दृष्टिगोचरः ।
पुनः पुनस्तपस्तीव्रं कृतं तत्र प्रजापते ॥ ६ ॥
भवता सगुणा शक्तिर्दृष्टा तात मनोरमा ।
निर्गुणा निर्गुणश्चैव कीदृशौ तौ वदस्व मे ॥ ७ ॥
व्यास उवाच
इति पृष्ठः पिता तेन नारदेन प्रजापतिः ।
उवाच वचनं तथ्यं स्मितपूर्वं पितामहः ॥ ८ ॥

ब्रह्मोवाच
निर्गुणस्य मुने रूपं न भवेद्‌दृष्टिगोचरम् ।
दृश्यञ्च नश्वरं यस्मादरूपं दृश्यते कथम् ॥ ९ ॥
निर्गुणा दुर्गमा शक्तिर्निर्गुणश्च तथा पुमान् ।
ज्ञानगम्यौ मुनीनां तु भावनीयौ तथा पुनः ॥ १० ॥
अनादिनिधनौ विद्धि सदा प्रकृतिपूरुषौ ।
विश्वासेनाभिगम्यौ तौ नाविश्वासेन कर्हिचित् ॥ ११ ॥
चैतन्यं सर्वभूतेषु यत्तद्विद्धि परात्मकम् ।
तेजः सर्वत्रगं नित्यं नानाभावेषु नारद ॥ १२ ॥
तञ्च ताञ्च महाभाग व्यापकौ विद्धि सर्वगौ ।
ताभ्यां विहीनं संसारे न किञ्चिद्वस्तु विद्यते ॥ १३ ॥
तौ विचिन्त्यौ सदा देहे मिश्रीभूतौ सदाव्ययौ ।
एकरूपौ चिदात्मानौ निगुणौ निर्मलावुभौ ॥ १४ ॥
या शक्तिः परमात्माऽसौ सा योऽसौ सा परमा मता ।
अन्तरं नैतयोः कोऽपि सूक्ष्मं वेद च नारद ॥ १५ ॥
अधीत्य सर्वशास्त्राणि वेदान्साङ्गांश्च नारद ।
न जानाति तयोः सूक्ष्ममन्तरं विरतिं विना ॥ १६ ॥
अहङ्कारकृतं सर्वं विश्वं स्थावरजङ्गमम् ।
कथं तद्‌रहितं पुत्र भवेत्कल्पशतैरपि ॥ १७ ॥
निर्गुणं सगुणः पुत्र कथं पश्यति चक्षुषा ।
सगुणं च महाबुद्धे चेतसा संविचारय ॥ १८ ॥
पित्तेनाच्छादिता जिह्वा चक्षुश्च मुनिसत्तम ।
कटु पित्तं विजानाति रसं रूपं न तत्तथा ॥ १९ ॥
गुणैः समावृतं चेतः कथं जानाति निर्गुणम् ।
अहङ्कारोद्‌भवं तच्च तद्विहीनं कथं भवेत् ॥ २० ॥
यावन्न गुणविच्छेदस्तावत्तद्दर्शनं कुतः ।
तं पश्यति तदा चित्ते यदाऽहङ्कारवर्जितः ॥ २१ ॥

नारद उवाच
स्वरूपं देवदेवेश त्रयाणामेव विस्तरात् ।
गुणानां यत्स्वरूपोऽस्ति ह्यहङ्कारस्त्रिरूपकः ॥ २२ ॥
सात्त्विको राजसश्चैव तामसश्च तथापरः ।
विभेदेन स्वरूपाणि वदस्व पुरुषोत्तम ॥ २३ ॥
यज्ज्ञात्वा विप्रमुच्येऽहं ज्ञानं तद्वद मे प्रभो ।
गुणानां लक्षणान्येव विततानि विभागशः ॥ २४ ॥
ब्रह्मोवाच
त्रयाणां शक्तयस्तिस्त्रस्तद्‌‌ब्रवीमि तवानघ ।
ज्ञानशक्तिः क्रियाशक्तिरर्थशक्तिस्तथापरा ॥ २५ ॥
सात्त्विकस्य ज्ञानशक्ती राजसस्य क्रियात्मिका ।
द्रव्यशक्तिस्तामसस्य तिस्रश्च कथितास्तव ॥ २६ ॥
तेषां कार्याणि वक्ष्यामि शृणु नारद तत्त्वतः ।
तामस्या द्रव्यशक्तेश्च शब्दस्पर्शसमुद्‌भवः ॥ २७ ॥
रूपं रसश्च गन्धश्च तन्मात्राणि प्रचक्षते ।
शब्दैकगुणमाकाशं वायुः स्पर्शगुणस्तथा ॥ २८ ॥
सुरूपैकगुणोऽग्निश्च जलं रसगुणात्मकम् ।
पृथ्वी गन्धगुणा ज्ञेया सूक्ष्माण्येतानि नारद ॥ २९ ॥
दशैतानि मिलित्वा तु द्रव्यशक्तियुतानि वै ।
तामसाहङ्कारजः स्यात्सर्गस्तदनुवृत्तिकः ॥ ३० ॥
राजस्याश्च क्रियाशक्तेरुत्पन्नानि शृणुष्व मे ।
श्रोत्रं त्वग्रसना चक्षुर्घ्राणं चैव च पञ्चमम् ॥ ३१ ॥
ज्ञानेन्द्रियाणि चैतानि तथा कर्मेन्द्रियाणि च ।
वाक्पाणिपादपायुश्च गुह्यान्तानि च पञ्च वै ॥ ३२ ॥
प्राणोऽपानश्च व्यानश्च समानोदानवायवः ।
पञ्चदश मिलित्वैव राजसः सर्ग उच्यते ॥ ३३ ॥
साधनानि किलैतानि क्रियाशक्तिमयानि च ।
उपादानं किलैतेषां चिदनुवृत्तिरुच्यते ॥ ३४ ॥
ज्ञानशक्तिसमायुक्ताः सात्त्विकाच्च समुद्‌भवाः ।
दिशो वायुश्च सूर्यश्च वरुणश्चाश्विनावपि ॥ ३५ ॥
ज्ञानेन्द्रियाणां पञ्चानां पञ्चाधिष्ठातृदेवताः ।
चन्द्रो ब्रह्मा तथा रुद्रः क्षेत्रज्ञश्च चतुर्थकः ॥ ३६ ॥
इत्यन्तःकरणाख्यस्य बुद्ध्यादेश्चाधिदैवतम् ।
चत्वार्येव तथा प्रोक्ताः किलाधिष्ठातृदेवताः ॥ ३७ ॥
मनसा सह चैतानि नूनं पञ्चदशैव तु ।
सात्त्विकस्य तु सर्गोऽयं सात्त्विकाख्यः प्रकीर्तितः ॥ ३८ ॥
स्थूलसूक्ष्मादिभेदेन द्वे रूपे परमात्मनः ।
ज्ञानरूपं निराकारं निदानं तत्प्रचक्षते ॥ ३९ ॥
साधकस्य तु ध्यानादौ स्थूलरूपं प्रचक्षते ।
शरीरं सूक्ष्ममेवेदं पुरुषस्य प्रकीर्तितम् ॥ ४० ॥
मम चैव शरीरं वै सूत्रमित्यभिधीयते ।
स्थूलं शरीरं वक्ष्यामि ब्रह्मणः परमात्मनः ॥ ४१ ॥
शृणु नारद यत्‍नेन यच्छ्रुत्वा विप्रमुच्यते ।
तन्मात्राणि पुरोक्तानि भूतसूक्ष्माणि यानि वै ॥ ४२ ॥
पञ्चीकृत्य तु तान्येव पञ्चभूतसमुद्‌भवः ।
पञ्चीकरणभेदोऽयं शृणु संवदतः किल ॥ ४३ ॥
प्रथमं रसतन्मात्रामुपादाय मनस्यपि ।
कल्पयेच्च तथा तद्वै यथा भवति चोदकम् ॥ ४४ ॥
शिष्टानां चैव भूतानामंशान्कृत्वा पृथक्पृथक् ।
उदके मिश्रयेच्चांशान्कृते रसमये ततः ॥ ४५ ॥
तदा भूतविभागे च चैतन्ये च प्रकाशिते ।
चैतन्यस्य प्रवेशात्तु तदाऽहमिति संशयः ॥ ४६ ॥
प्रतीयमाने तेनैव विशेषेणाभिमानतः ।
आदिनारायणो देवो भगवानिति चोच्यते ॥ ४७ ॥
घनीभूतेऽथ भूतानां विभागे स्पष्टतां गते ।
वृद्धिं प्राप्य गुणैश्चेत्थमेकैकगुणवृद्धितः ॥ ४८ ॥
आकाशस्य गुणश्चैकः शब्द एव न चापरः ।
शब्दस्पर्शौ च वायोश्च द्वौ गुणौ परिकीर्तितौ ॥ ४९ ॥
अग्नेः शब्दश्च स्पर्शश्च रूपमेते त्रयो गुणाः ।
शब्दस्पर्शरूपरसाश्चत्वारो वै जलस्य च ॥ ५० ॥
स्पर्शशब्दरसा रूपं गन्धश्च पृथिवीगुणाः ।
एवं मिलितयोगैश्च ब्रह्माण्डोत्पत्तिरुच्यते ॥ ५१ ॥
सर्वे जीवा मिलित्वैव ब्रह्माण्डांशसमुद्‌भवाः ।
चतुरशीतिलक्षाश्च प्रोक्ता वै जीवजातयः ॥ ५२ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे तत्त्वनिरूपणवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


विश्व ब्रह्मांडाची उत्पत्ती

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारदाने हे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकून घेतले. नंतर ब्रह्मदेव पुढे सांगू लागला. तो म्हणाला, "हे महाभाग्यवान नारदा, अशा तर्‍हेने ती आदिमाया व सर्वांचे कारण असलेली ती देवी तिला आम्ही प्रत्यक्ष पाहिले."

आपल्या पित्याचे भाषण ऐकून नारद अत्यंत आनंदित झाले. ते अद्‌भूत चरित्र श्रवण करून उल्हासित मनाने नारद आपल्या प्रजापती पित्याला म्हणाले, "हे तात, तो आदिपुरुष जो अविनाशी आहे, निर्गुण, निराकार असून ज्याला च्युति नाही, जो अव्यक्त आहे, असा तो आद्य पुरुष परमात्मा आपणास कशा प्रकारचा भासला तेवढे कृपा करून आता कथन करा. हे कमलोद्‌भवा, आपण त्रिगुणात्मक शक्ती अवलोकन केल्यात. पण ती निर्गुणात्मक शक्ती कशी आहे ? तिचे व पुरुषाचे स्वरूप, हे तात, सांप्रत मला सांग. मी पूर्वी याचसाठी श्वेतद्वीपामध्ये दारूण तप केले होते. तेव्हा ज्याला कामक्रोध नाहीत आणि जो सिद्ध आहे अशा महात्म्या तपस्व्याचे दर्शन मला झाले. हे प्रजापते, पण त्यानंतर मी पुनः पुनः तशा प्रकारची अत्यंत तीव्र तपे केली. पण मला मात्र परत परमात्म्याचे दर्शन कधीच झाले नाही.

हे तात, आपणास ती दिव्य व मनोहर अशी सगुण शक्ती दर्शन देती झाली. पण निर्गुण परमात्मा हा कशा प्रकारचा आहे, हे ऐकण्याची माझी अनिवार इच्छा आहे. म्हणून आपण निर्गुण देवी व निर्गुण परमात्मा यांच्या स्वरूपाविषयी विस्ताराने सांगा."

अशा रीतीने नारदमुनींनी आपल्या पित्याला सूक्ष्म प्रश्न केला. तेव्हा तो प्रजापती ब्रह्मदेव आपल्या पुत्राकडे पाहून आनंदित झाला. तो नारदाला म्हणाला, हे पुत्रा, हे वत्सा, हे मुने तुला आता सत्य तेच मी सांगतो आहे. हे महर्षे, निर्गुण परमात्म्याचे स्वरूप दृष्टीला कधीच जाणवत नाही. कारण जे जे दृष्टीला दिसते ते ते नश्वर असते. त्यामुळे अविनाशी परमात्मा हा अदृश्यच असतो. तो निराकार असल्याने रूपरहित असतो. यात संशय नाही. तेव्हा जे रूपाशिवाय व गुणाशिवाय असते ते दृष्टीला कोठून दिसणार ? निर्गुण शक्ती व निर्गुण पुरुष हे मानवी दृष्टीच्या पलीकडचे आहे. तो कोणालाही दृष्टीस पडणे शक्य नाही.

मुनी व तपस्वी यांना केवळ ज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्याची जाणीव होते इतकेच, प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्यांची फक्त प्रतीती येते. म्हणून नित्य नेमाने त्याचे चिंतन करावे. यापेक्षा दुसरा मार्ग नाही.

त्या निर्गुण निराकार प्रकृति-पुरुषांना जन्ममरण कधीही प्राप्त होत नाही, याबद्दल तू खात्री बाळग आणि केवळ श्वासाच्या साहाय्याने त्यांचे ज्ञान होत असते, पण श्रुतीवर विश्वासच नसेल तर त्यांचे ज्ञानही होणे अशक्यप्राय आहे.

हे नारदा, या त्रैलोक्यातील चराचर वस्तू व इतर प्राणीजन यांच्यात जे जे चैतन्य आहे ते सर्व प्रकृतिपुरुषांचे स्वरूप आहे. तसेच या सर्वांचे ठिकाणी असलेले तेज हेही प्रकृती पुरुषात्मकच आहे याबद्दल तुला शंका असू नये. हे महाभाग्यशाली पुत्रा, म्हणून ती प्रकृती व तो पुरुष हे सर्वथा सर्वव्यापी व सर्वगामी आहेत हे निश्चित आहे. त्यांच्या स्वरूपाशिवाय या जगतामध्ये, काही वस्तू आपल्याला सापडणार नाही. सर्व वस्तुजात त्यांचेच स्वरूपमय असे आहे.

अक्षय, एकरूप, चिन्मय, निर्गुण व निर्मळ असे त्या उभयतांच्या देहांचे स्वरूप असून ते दोघेही परस्पर मित्र आहेत. म्हणून त्यांचे ध्यान फक्त जाणीवपूर्वक आहे. तसेच ते समजून करावे. खरोखरच हे नारदा, जी शक्ती आहे त्यालाच परमात्मा व जो परमात्मा आहे त्यालाच परा शक्ती असे एकरूपत्वाने आपण जाणून घ्यावे. कारण हे पुत्रा, या उभयतांमधील अत्यंत सूक्ष्म असलेले अंतर समजणे कोणालाही शक्य नाही. हे बुद्धीच्या पलीकडचे आहे हे खात्रीने सांगतो.

हे नारदा, सांग वेद व शास्त्रपुराणे जरी अगदी मुखोद्‌गत केली तरी प्रत्यक्ष वैराग्य आल्याशिवाय त्या दोघातील सूक्ष्म भेद कदापीही अनाकलनीयच आहे. हे सर्व स्थावर व जंगम असे, दृश्य स्वरूपात असलेले जगत् केवळ अहंकारमय झालेले आहे. तेव्हा हे पुत्रा, शेकडो कल्प इतका काळ लोटला तरी हे सर्व अहंकाररहित कसे बरे होणार आणि जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत त्या पुरुषाला निर्गुण निराकाराचे ज्ञान कसे बरे प्राप्त होईल ?

म्हणून हे महाबुद्धिशाली नारदा, तुला निर्गुण उपासनेचा अधिकार जोपर्यंत प्राप्त झाला नाही. तोपर्यंत तू निःशंक मनाने सगुण स्वरूपाची उपासना करीत जा. योग्य वेळी ज्ञान होताच निर्गुणाची उपासना करण्याचा अधिकार तुला प्राप्त होईल.

हे मुनिश्रेष्ठा, रसनेन्द्रिय व चक्षुरेन्द्रिय ही दोन्हीही पित्ताने आच्छादित आहेत. त्यामुळे रसनेन्द्रियाला रसाचे व चक्षुरेंद्रियाला रूपाचे यथार्थ ज्ञान कधीही प्राप्त होत नाही आणि म्हणून हे अंतःकरणही गुणांनी व्यापून टाकले असल्याने त्यांना निर्गुणाचे ज्ञान कधीही होत नाही. शिवाय दुसरी गोष्ट अशी की हे अंतःकरणच मुळी अहंकारविरहित होण्याची अपेक्षा तरी कशी करावी ? जोपर्यंत गुणांचा नाश झाला नाही तोवर निर्गुणाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य कसे प्राप्त होणार ? त्याची प्रतीती कशी येणार ? जेव्हा पुरुष अहंकारविरहित होईल तेव्हाच त्याला त्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव येईल, तोपर्यंत येणार नाही."

नारदांनी आपल्या पित्याला विचारले, "हे तात, हे प्रजापते, हे सुरेश्वर, आपण या तिन्ही गुणांच्या स्वरूपाविषयी मला पूर्णपणे ज्ञान करून द्यावेत. तसेच सात्विक, राजस, तामस या गुणांनी व्यापलेला तिन्ही प्रकारचा अहंकार कशा प्रकारचा असतो, ह्याचेही मला विस्ताराने कथन करावे.

हे पुरुषोत्तम, त्या अहंकाराची भिन्न भिन्न रूपे आपण मला समजावून द्या. हे प्रभो, आपण मला त्या त्रिगुणांची सर्व लक्षणे विस्ताराने सांगून अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त करून द्या की त्यायोगे मी या संसारतापापासून सत्वर मुक्त होईन."

नारदाच्या बोलण्याने संतुष्ट झालेला ब्रह्मदेव म्हणाला, "हे नारदा, हे निष्पापा, आता तू विचारलेल्या सर्व प्रश्नांविषयी मी तुला कथन करतो. तिन्ही अहंकारांचे ठिकाणी तीन शक्ति वास करीत असतात. त्या पुढील प्रमाणे आहेत. एक ज्ञानशक्ती, दुसरी अर्थशक्ती, तिसरी क्रियाशक्ती होय.

सात्विक अहंकाराचे ठिकाणी ज्ञानशक्तीचे वास्तव्य असते तर राजस अहंकार हा क्रियाशक्तीने व्याप्त असून तामस अहंकाराचे ठिकाणी द्रव्यशक्ती आहे.

हे नारदा, या तीन शक्ती तर मी तुला सांगितल्या. यानंतर तिन्ही शक्तींची कार्ये कोणती व कशी आहेत हे मी आता तत्त्वतः तुला निवेदन करतो. तू एकाग्र मनाने ऐक.

हे पुत्रा, तू तामसी स्वरूपाच्या द्रव्यशक्तीपासून शब्द व स्पर्श हे गुण उत्पन्न होतात. तसेच त्याबरोबर रूप, रस, गंध हेही गुण तिच्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. याच पाच गुणांपासून हे सर्व विश्व व्यापून राहिलेली पंचमहाभूते उत्पन्न झाली आहेत असे आजवर ज्ञानी सांगत आले आहेत.

हे महाभाग्यवान, हे जे सूक्ष्म आकाश आपल्याला भासते आहे ते शब्द गुणाने युक्त आहे आणि वायू हा स्पर्श गुणाने आपल्या अनुभवास येतो. रूप हा तेजाचे ठिकाणचा गुण असून उदकाचे ठिकाणी रस हा गुण असतो, गंध हा गुण पृथ्वीचे ठिकाणी स्थित आहे.

हे नारदा, अशाप्रकारे ही सूक्ष्म भूतेच होत. ही महाभूते जेव्हा द्रव्य शक्तीने युक्त होतात तेव्हा तामस गुणात्मक अहंकाराने व्याप्त झालेली ही सृष्टी प्रकट करीत असतो. म्हणून या सृष्टीमध्ये सर्वत्र तामस अहंकार भरून राहिला आहे.

आता हे मुने, मी तुला राजस गुणाच्या अंगी असलेल्या क्रियाशक्तीच्या कार्याचे निवेदन करतो ते तू ऐक.

हे महर्षे, कर्ण, त्वचा, रसना, चक्षु व घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत हे तू जाणतोस. वाक्, हस्त, पाद, उपस्थ आणि गुद ही पाच कर्मेन्द्रिये असल्याचे विदीतच आहे. तसेच प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच प्रकारचे वायु प्रसिद्ध आहेत. या एकंदर पंधरांना म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच वायु या सर्वांना मिळून राजस सृष्टी असे नाव आहे. या ज्ञानेंद्रियांनी त्यांच्या क्रियेप्रमाणेच ती ती नावे पडली आहेत. म्हणून ती सर्व क्रियेने व्याप्त आहेत आणि या सर्वांचे उपादान कारण चैतन्य हेच आहे.

हे नारदा, सात्विक अहंकारापासून दिशा, वायू, सूर्य, वरुण व अश्विनीकुमार ह्या पाच देवता उत्पन्न झाल्या असून त्या पाचही ज्ञानेंद्रियांच्या अधिदेवता आहेत असे सत्य सांगितलेले आहे. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व पाच प्राण ही पंधरा व मन सोळावे असे सोळा सात्विक भाव अहंकारापासून उत्पन्न झाले असून हीच सात्विक सृष्टी होय.

सूक्ष्म व स्थूल भेदाने मुक्त अशी परमात्म्याची दोन रूपे आहेत. त्यापैकी जे निराकार रूप आहे त्याला कारण म्हणतात. साधकाला तपस्या अथवा ध्यान करणे सोईचे व्हावे म्हणून परमात्म्याचे स्थूल रूप आहे असे म्हटले आहे. लिंगदेहापेक्षाही सूक्ष्म शरीर हेच परमात्म्याचे स्वरूप होय. ते मानलेले असते.

हे नारदा, आता या स्थूल रूपाच्या परमात्म्याचे शरीर कसे आहे याबद्दल तुला माहिती सांगतो. हे तू प्रयत्‍नपूर्वक श्रवण कर. कारण याच्या केवळ श्रवणानेही पुरुष संसारतापापासून मुक्त होतो म्हणून यासाठी तुला मी जी पूर्वी सूक्ष्म भूते कथन केली आहेत त्यांचेच पंचीकरण केल्यावर पंच महाभूतांची उत्पत्ती होते. आता हा पंचीकरण भेद मी तुला कथन करतो. तू नीट ध्यान देऊन ऐक.

हे पुत्रा, प्रथम रसतन्मात्रा मनात आणावी. त्याचे बरोबर दोन भाग केले आहेत अशी कल्पना करावी. नंतर त्यातील एक भाग जलरूपाने स्थित झाला असे मनात कल्पावे आणि दुसरा भाग त्याच स्थितीत आहे असा विश्वास ठेवावा. आता याशिवाय जी चार भुते शिल्लक राहिली आहेत त्यांचेही निरनिराळे प्रत्येकी दोन दोन भाग करावेत. त्यापैकी प्रत्येकाचा एक भाग तसाच ठेवून दुसर्‍या भागाचे पुनः चार चार भाग करावेत. रस या भूत मात्राच्या दोन भागांपैकी एक जो उदकरूप कल्पिलेला आहे त्यात ते प्रत्येकाचे एकेक पोट भाग मिळवावेत.

अशा प्रकारे रसतन्मात्रेच्या ठिकाणी उदक म्हणून कल्पिलेल्या भागात इतर चार भूतांच्या एकेका पोटभागाचे मिश्रण करावे. हे सर्व कल्पनेने समजून घ्यावे. अशा प्रकारे हे रसमय उदक तयार झाले असता इतर भूतांचेही असेच विभाग करावेत. पंचीकरणाने इतरही चारी भूतांचे विभाग झाल्यावर अधिष्ठान या नात्याने त्या पंचीकृत भूतांमध्ये चैतन्याचा प्रवेश झाल्यावर प्रतिबिंबरूपानेही पुनरपि चैतन्याचा प्रवेश होत असतो.

हे नारदा, असा हा प्रतिबिंबरूप चैतन्याचा प्रवेश झाल्यावर पंचमहाभूतात्मक देहामध्ये अहं (मी) अशा तादात्म्यरूप संशयाची म्हणजे पंचमहाभूतात्मक देह तो मीच आहे. अशी मनात कल्पना करावी, म्हणजे आपणाला त्याची प्रचीती येऊ लागल्यासारखे वाटते. त्याच विशेष मनोवृत्तींनी युक्त अशा चैतन्याचा अनुभव येऊ लागला म्हणजे आदिनारायण, देव, भगवान या नावांनी ते प्रचलित होत असतात.

हे मुने, तुला सांगायचे इतकेच की स्थूल देहाभिमानाने युक्त असलेले चैतन्य त्यालाच वैश्वानर, आदिनारायण देव, भगवान अशा संज्ञा दिलेल्या आहेत. ह्याप्रमाणे पंचभूतांचे वेगवेगळे विभाग पंचीकरणाच्या साह्याने दृढ होतात आणि आकाश वगैरे इतर रूपांनी ते स्पष्ट होतात. यानंतर प्रथम सांगितलेली कारणीभूत तन्मात्रारूप गुण यांच्या योगाने हे विभाग वृद्धिंगत झाल्यावर पुढील भूतांचे ठिकाणी एकेक गुण जास्तच वृद्धिंगत होत असतो.

हे पुत्रा, आकाशाचे ठिकाणी शब्द या गुणाशिवाय दुसरा गुण नाही. शब्द व स्पर्श असे दोन्ही गुण वायूचे ठिकाणी असल्याचे मी तुला सांगितलेच आहे. अग्नीचे ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप असे तीन गुण आहेत तर शब्द, स्पर्श, रूप, रस असे चार गुण उदकाचे ठिकाणी आढळतात. पण पृथ्वीचे ठिकाणी मात्र शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाचही गुण आढळतात.

तेव्हा हे महाभाग्यवान वत्सा, अशा प्रकारे या भूतांचे संयोग झाल्यावर हे ब्रह्मांड निर्माण होत असते. ब्रह्मांडाच्या अंशरूपाने उत्पन्न झालेले हे सर्व जीव यांनी युक्त होऊन, मग ह्याला ब्रह्मांड ही संज्ञा मिळते. शास्त्रात असे सांगितले आहे की या ब्रह्मांडातील जीवांच्या चौर्‍याऐंशी लक्ष जाती आहेत.





अध्याय सातवा समाप्त

GO TOP