[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, " हे द्विजश्रेष्ठा, विष्णूने केलेला यज्ञ मी सविस्तर श्रवण केला. आता अंबेचा महिमा आपण मला सविस्तर कथन करा. हे विप्रश्रेष्ठा, देवीचे चरित्र श्रवण केल्यानंतर मी तिचा उत्कृष्ट यज्ञ करीन आणि आपल्या प्रसादाने पावन होईल."
व्यास म्हणाले, "हे राजा, देवीचे उत्कृष्ट चरित्र मी तुला सांगतो. एक पूर्वीचा इतिहासही मी तुला सविस्तर कथन करतो, तू श्रवण कर.
कोसल देशामध्ये ध्रुवसंधी म्हणून प्रसिद्ध असलेला एक महातेजस्वी, सूर्यवंशी राजाचा पुत्र असा श्रेष्ठ राजा होऊन गेला. तो धर्मात्मा, सत्यवचनी आणि ब्राह्मणादि वर्ण व ब्रह्मचारी प्रभृति ह्यांच्या हिताविषयी तत्पर असून आचरणाने शुद्ध होता.
हे द्विजहो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र आणि इतरही जन त्याच्या राज्यामध्ये आपापल्या वृत्तीचे अवलंबन करून धर्माने राहात असत. त्याच्या राज्यामध्ये चोर, चहाडखोर, वंचक, दांभिक, कृतघ्न व मूर्ख लोक खरोखर कोठेही वास्तव्य करीत नव्हते.
हे कुरुवंशज सज्जनश्रेष्ठा, ह्याप्रमाणे वागणार्या त्या राजाला इच्छेप्रमाणे विषयसुख देणार्या अशा दोन सौंदर्यसंपन्न भार्या होत्या. धर्मपत्नी मनोरमा सुस्वरूप असून अतिशय चतुर होती आणि दुसरी लीलावतीही सौंदर्य व गुण ह्यांनी संपन्न होती. ह्या भार्यांसह तो राजा गृह, उपवने, क्रीडा पर्वत, वापी आणि नाना प्रकारचे महाल ह्यांमध्ये क्रीडा करीत असे.
शुभ काली मनोरमेला एक उत्कृष्ट पुत्र झाला. तो पुत्र राजलक्षणांनी संपन्न होता. त्याचे सुदर्शन हे नाव ठेवले होते. त्यानंतर त्याच्या सौंदर्यसंपन्न लीलावती पत्नीलाही एक महिन्याने शुक्ल पक्षातील शुभ दिवशी एक सुंदर पुत्र झाला. तेव्हा राजाने दोन्ही पुत्रांचे जातकर्मादि संस्कार केले व पुत्रजन्माच्या योगाने आनंदित होऊन त्याने विप्रांना बहुत दाने दिली. त्याने दुसर्या पुत्राचे शत्रुजित असे नाव ठेवले. हे नृपा, तो राजा, त्या दोन्ही पुत्रांचे ठिकाणी प्रथमतः सारखेच प्रेम करू लागला. त्या भूपतीने प्रेमामध्ये कधीही अंतर केले नाही.
पुढे शत्रूंना ताप देणार्या त्या पुत्रवत्सल नृपश्रेष्ठाने आपल्या ऐश्वर्याप्रमाणे त्यांचा यथाविधी चुडासंस्कार केला. चूडाकरण झाल्यानंतर ते पुत्र खरोखर राजाचे मन आपल्याकडेच ओढून घेऊ लागले. इतकेच नव्हे तर ते उभयता सुंदर पुत्र क्रीडा करीत असताना लोकांनाही आनंद देऊ लागले. तथापि त्या उभयतांमध्ये जरी सुदर्शन ज्येष्ठ होता तरी लीलावतीच्या शत्रुजित नावाच्या शुभ पुत्राचे भाषण फारच आल्हाददायक असे. मंजूळ भाषण करणारा व मनोहर मुद्रेने युक्त असलेला तो शत्रुजित राजाचे ठिकाणी स्वतःविषयी अधिक प्रेम उत्पन्न करू लागला. प्रजेलाही तो आवडू लागला आणि मंत्रिजनांचेही प्रेम त्याच्यावर बसले. गुणांमुळे राजा जसे त्याच्यावर प्रेम करीत असे तसे सुदर्शनावर करीत नसे. सुदर्शनाच्या मंदभाग्यामुळेच राजाचेही प्रेम त्याच्याविषयी कमी कमी होत चालले.
असे होता होता एके दिवशी मृगयेविषयी सर्वदा रत असलेला तो नृपश्रेष्ठ ध्रुवसंधि मृगयेकरिता वनात गेला. मृग, रुरु, कंबु, गवय, सूकर, शश, महिष, शरभ वगैरेंचे वध करीत करीत तो वनात क्रीडा करू लागला. ह्याप्रमाणे त्या घोर व दारुण वनामध्ये राजा क्रीडा करीत असताना अकस्मात् एका जाळ्यातून एक महाक्रोधी सिंह बाहेर निघाला. तेव्हा शिलीमुख बाणाने प्रथमतः राजाने त्याचा वेध केला.
तो सिंह फारच क्रोधाधीन झाला. तो समोर राजा दृष्टीस पडताक्षणी मेघासारखी गर्जना करू लागला. पुच्छ वर करून त्याने आपली आयाळ उभारली आणि राजाला मारण्याकरिता त्या अति क्रुद्ध सिंहाने एकदम त्याच्या समीप उडी मारली. हे पाहून राजानेही वेगाने उजव्या हातामध्ये तलवार घेतली व डाव्या हातात ढाल घेऊन प्रति सिंहच की काय असा तो त्याच्यासमोर उभा राहिला. तेव्हा संतापून गेलेल्या त्याच्या
सर्व सेवकांनीही वेगळे वेगळे बाण क्रुद्ध झालेल्या सिंहावर सोडले. त्यावेळी भयंकर युद्ध सुरू झाले. त्या उग्र सिंहाने राजावर झेप टाकिली. परंतु त्याची झेप पडत आहे असे अवलोकन करताक्षणीच राजाने त्यावर तलवारीचा वार केला. सिंहाच्या नखाग्रांनी राजाचे शरीर विदीर्ण होऊन गेले. नखांचा तडाखा बसल्यामुळे राजा तेथेच गतप्राण होऊन पडला. तेव्हा त्याचे सैनिक आक्रोश करू लागले व त्यांनी बाणांच्या योगाने सिंहाचा वध केला. याप्रमाणे सिंह व राजा उभयताही मरून पडले असता सैनिकांनी श्रेष्ठ मंत्र्यांकडे जाऊन हे वृत्त कळविले.
राजा परलोकी गेल्याचे श्रवण करताक्षणीच त्या श्रेष्ठ मंत्र्यांनी वनामध्ये येऊन त्याचे और्ध्वदेहिक संस्कार केले. वसिष्ठ मुनींनी परलोकी सुखावह होणारे त्याचे सर्व पारलौकिक कृत्ये यथाविधी करवली. नंतर प्रजानन मंत्री व महामुनि वसिष्ठ सुदर्शनाला राज्यावर बसविण्याविषयी आपसात वाटाघाटी करू लागले.
हा सुदर्शन शांत पुरुष असून धर्मपत्नीचा पुत्र व सुलक्षणी आहे आणि म्हणून हा राज्यासनाला योग्य आहे असे श्रेष्ठ मंत्र्यांनी आपले मत दिले.
"हा राजपुत्र योग्य आहे व राजा बालक असूनही धार्मिक आहे, म्हणून हाच गादीवर बसण्यास पात्र आहे." अशी वसिष्ठ मुनींची संमति पडली. त्याप्रमाणे वृद्ध मंत्र्यांनी विचार ठरविला. उज्जनियीचा राजा आपला जामात मृत झाल्याचे श्रवण करताक्षणीच नातवाचे हित करण्यासाठी दोन्हीही राजपुत्राचे मातुल राजे तेथे उपस्थित झाले.
"दोन पुत्रांपैकी गुणांनी ज्येष्ठ कोण आहे त्याच पुत्राला राज्य प्राप्त होत असते, गुणांनी कनिष्ठ अशा पुत्राला ते कधीही प्राप्त होत नाही." असे युधाजित बोलला असता, 'हे राजा, धर्मपत्नीपासून झालेला पुत्र खरोखरच राज्याला योग्य होय. असे मी शास्त्रवेत्यांपासून श्रवण केले आहे." असे वीरसेनानेही सांगितले.
"हा शत्रुजित जसा गुणांनी ज्येष्ठ व राजलक्षणांनी युक्त आहे तसा हा सुदर्शन नाही. "
ह्या संकटसमयी संदेह निवृत्ती करण्यास कोण समर्थ आहे ? असा प्रश्न उपस्थित होऊन त्या उभयता लोभी राजांमध्ये चांगलाच विवाद सुरू झाला.
युधाजित मंत्र्यांना म्हणाला, "तुम्ही खरोखर स्वार्थसाधु आहा. सुदर्शनाला राजा करून द्रव्याचा यथेष्ट उपभोग घेण्याची तुमची इच्छा आहे. हा तुमचा विचार तुमच्या हालचालीवरून मला समजून चुकला आहे. परंतु त्या सुदर्शनापेक्षा शत्रूजितच गादीला अधिक योग्य आहे. तोच तुम्हाला संमत झाला पाहिजे. मी जिवंत असताना गुणांनी ज्येष्ठ, सेनेने युक्त आणि म्हणूनच राज्यासनाला पात्र असलेल्या पुत्राला खरोखर कोण बरे राज्य देणार नाही ? त्याच्याकरिता मी युद्ध करीन माझ्या तलवारीच्या धारेने पृथ्वीही दुभंग होऊन जाईल. तेथे तुमची गोष्ट पाहिजे कशाला ?"
हे श्रवण केल्यानंतर हे विचारी राजा, दोघांही बालकांची बुद्धी सारखीच आहे, त्यांच्यात काय बरे भेद आहे ? असे वीरसेन युधाजिताला म्हणू लागला.
ह्याप्रमाणे ते उभयता राजे एकसारखे वादविवाद करीत राहिले असता प्रजानन व ऋषि ह्यांची मने उदासीन झाली. हा प्रसंग पाहून स्वार्थसाधू व दुसर्याला क्लेश देण्याविषयी तत्पर असलेले मांडलिक राजेही परस्परात युद्ध व्हावे ह्या इच्छेने सैन्यासह तेथे आले. ही संधी पाहून शृंगवेरपुराचा आश्रय करून राहिलेले भिल्लही भूपति मृत झाल्याचे श्रवण करताक्षणी राज्यद्रव्याचा अपहार करण्याकरता तेथे येऊन थडकले. राजपुत्र बालक असून हल्ली परस्परात कलह उपस्थित झाला आहे अशी वार्ता कानी पडताक्षणी त्या इतर वेशातील चोरही तेथे जुळले, ह्याप्रमाणे कलह उपस्थित झाला असता तेथे दंगल उडून गेली. युधाजित व वीरसेन हे उभयता एकमेकांशी युद्ध करण्यास उत्सुक झाले.