श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


हरब्रह्मकृतस्तुतिवर्णनम्

ब्रह्मोवाच
इत्युक्त्वा विरते विष्णौ देवदेवे जनार्दने ।
उवाच शङ्करः शर्वः प्रणतः पुरतः स्थितः ॥ १ ॥
शिव उवाच
यदि हरिस्तव देवि विभावज-
     स्तदनु पद्मज एव तवोद्‌भवः ।
किमहमत्र तवापि न सद्‌गुणः
     सकललोकविधौ चतुरा शिवे ॥ २ ॥
त्वमसि भूः सलिलं पवनस्तथा
     खमपि वह्निगुणश्च तथा पुनः ।
जननि तानि पुनः करणानि च
     त्वमसि बुद्धिमनोऽप्यथ हङ्कृतिः ॥ ३ ॥
न च विदन्ति वदन्ति च येऽन्यथा
     हरिहराजकृतं निखिलं जगत् ।
तव कृतास्त्रय एव सदैव ते
     विरचयन्ति जगत्सचराचरम् ॥ ४ ॥
अवनिवायुखवह्निजलादिभिः
     सविषयैः सगुणैश्च जगद्‌भवेत् ।
यदि तदा कथमद्य च तत्स्फुटं
     प्रभवतीति तवाम्ब कलामृते ॥ ५ ॥
भवसि सर्वमिदं सचराचरं
     त्वमजविष्णुशिवाकृतिकल्पितम् ।
विविधवेषविलासकुतूहलै-
     र्विरमसे रमसेऽम्ब यथारुचि ॥ ६ ॥
सकललोकसिसृक्षुरहं हरिः
     कमलभूश्च भवाम यदाऽम्बिके ।
तव पदाम्बुजपांसुपरिग्रहं
     समधिगम्य तदा ननु चक्रिम ॥ ७ ॥
यदि दयार्द्रमना न सदाम्बिके
     कथमहं विहितश्च तमोगुणः ।
कमलजश्च रजोगुणसंभवः
     सुविहितः किमु सत्त्वगुणो हरिः ॥ ८ ॥
यदि न ते विषमा मतिरम्बिके
     कथमिदं बहुधा विहितं जगत् ।
सचिवभूपतिभृत्यजनावृतं
     बहुधनैरधनैश्च समाकुलम् ॥ ९ ॥
तव गुणास्रय एव सदा क्षमाः
     प्रकटनावनसंहरणेषु वै ।
हरिहरद्रुहिणाश्च क्रमात्त्वया
     विरचितास्त्रिजगतां किल कारणम् ॥ १० ॥
परिचितानि मया हरिणा तथा
     कमलजेन विमानगतेन वै ।
पथिगतैर्भुवनानि कृतानि वा
     कथय केन भवानि नवानि च ॥ ११ ॥
सृजसि पासि जगज्जगदम्बिके
     स्वकलया कियदिच्छसि नाशितुम् ।
रमयसे स्वपतिं पुरुषं सदा
     तव गतिं न हि विद्म वयं शिवे ॥ १२ ॥
जननि देहि पदाम्बुजसेवनं
     युवतिभागवतानपि नः सदा ।
पुरुषतामधिगम्य पदाम्बुजा-
     द्विरहिताः क्व लभेम सुखं स्फुटम् ॥ १३ ॥
न रुचिरस्ति ममाम्ब पदाम्बुजं
     तव विहाय शिवे भुवनेष्वलम् ।
निवसितुं नरदेहमवाप्य च
     त्रिभुवनस्य पतित्वमवाप्य वै ॥ १४ ॥
सुदति नास्ति मनागपि मे रति-
     र्युवतिभावमवाप्य तवान्तिके ।
पुरुषता क्व सुखाय भवत्यलं
     तव पदं न यदीक्षणगोचरम् ॥ १५ ॥
त्रिभुवनेषु भवत्वियमम्बिके
     मम सदैव हि कीर्तिरनाविला ।
युवतिभावमवाप्य पदाम्बुजं
     परिचितं तव संसृतिनाशनम् ॥ १६ ॥
भुवि विहाय तवान्तिकसेवनं
     क इह वाञ्छति राज्यमकंटकम् ।
त्रुटिरसौ किल याति युगात्मतां
     न निकटं यदि तेऽङ्‌घ्रिसरोरुहम् ॥ १७ ॥
तपसि ये निरता मुनयोऽमला-
     स्तव विहाय पदाम्बुजपूजनम् ।
जननि ते विधिना किल वञ्चिताः
     परिभवो विभवे परिकल्पितः ॥ १८ ॥
न तपसा न दमेन समाधिना
     न च तथा विहितैः क्रतुभिर्यथा ।
तव पदाब्जपरागनिषेवणा-
     द्‌भवति मुक्तिरजे भवसागरात् ॥ १९ ॥
कुरु दयां दयसे यदि देवि मां
     कथय मन्त्रमनाविलमद्‌भुतम् ।
समभवं प्रजपन्सुखितो ह्यहं
     सुविशदं च नवार्णमनुत्तमम् ॥ २० ॥
प्रथमजन्मनि चाधिगतो मया
     तदधुना न विभाति नवाक्षरः ।
कथय मां मनुमद्य भवार्णवा-
     ज्जननि तारय तारय तारके ॥ २१ ॥
इत्युक्ता सा तदा देवी शिवेनाद्‌भुततेजसा ।
उच्चचाराम्बिका मन्त्रं प्रस्फुटं च नवाक्षरम् ॥ २२ ॥
तं गृहीत्वा महादेवः परां मुदमवाप ह ।
प्रणम्य चरणौ देव्यास्तत्रैवावस्थितः शिवः ॥ २३ ॥
जपन्नवाक्षरं मन्त्रं कामदं मोक्षदं तथा ।
बीजयुक्तं शुभोच्चारं शङ्करस्तस्थिवांस्तदा ॥ २४ ॥
तं तथाऽवस्थितं दृष्ट्वा शङ्करं लोकशङ्करम् ।
अवोचं तां महामायां संस्थितोऽहं पदान्तिके ॥ २५ ॥
न वेदास्त्वामेवं कलयितुमिहासन्नपटवो
    यतस्ते नोचुस्त्वां सकलजनधात्रीमविकलाम् ।
स्वधाभूता देवी सकलमखहोमेषु विहिता
    तदा त्वं सर्वज्ञा जननि खलु जाता त्रिभुवने ॥ २६ ॥
कर्ताऽहं प्रकरोमि सर्वमखिलं ब्रह्माण्डमत्यद्‌भुतं
    कोऽन्योस्तीह चराचरे त्रिभुवने मत्तः समर्थः पुमान् ।
धन्योऽस्म्यत्र न संशयः किल यदा ब्रह्माऽस्मि लोकातिगो
    मग्नोऽहं भवसागरे प्रवितते गर्वाभिवेशादिति ॥ २७ ॥
अद्याहं तव पादपङ्कजपरागादानगर्वेण वै
    धन्योऽस्मीति यथार्थवादनिपुणो जातः प्रसादाच्च ते ।
याचे त्वां भवभीतिनाशचतुरां मुक्तिप्रदां चेश्वरीं
    हित्वा मोहकृतं महार्तिनिगडं त्वद्‌भक्तियुक्तं कुरु ॥ २८ ॥
अतोऽहञ्च जातो विमुक्तः कथं स्यां
     सरोजादमेयात्त्वदाविष्कृताद्वै ।
तवाज्ञाकरः किङ्करोऽस्मीति नूनं
     शिवे पाहि मां मोहमग्नं भवाब्धौ ॥ २९ ॥
न जानन्ति ये मानवास्ते वदन्ति
     प्रभुं मां तवाद्यं चरित्रं पवित्रम् ।
यजन्तीह ये याजकाः स्वर्गकामा
     न ते ते प्रभावं विदन्त्येव कामम् ॥ ३० ॥
त्वया निर्मितोऽहं विधित्वे विहारं
     विकर्तुं चतुर्धा विधायादिसर्गम् ।
अहं वेद्मि कोऽन्यो विवेदातिमाये
     क्षमस्वापराधं त्वहङ्कारजं मे ॥ ३१ ॥
श्रमं येऽष्टधा योगमार्गे प्रवृत्ताः
     प्रकुर्वन्ति मूढाः समाधौ स्थिता वै ।
न जानन्ति ते नाम मोक्षप्रदं वा
     समुच्चारितं जातु मातर्मिषेण ॥ ३२ ॥
विचारे परे तत्त्वसंख्याविधाने
     पदे मोहिता नाम ते संविहाय ।
न किं ते विमूढा भवाब्धौ भवानि
     त्वमेवासि संसारमुक्तिप्रदा वै ॥ ३३ ॥
परं तत्त्वविज्ञानमाद्यैर्जनैर्यै-
     रजे चानुभूतं त्यजन्त्येव ते किम् ।
निमेषार्धमात्रं पवित्रं चरित्रं
     शिवा चाम्बिका शक्तिरीशेति नाम ॥ ३४ ॥
न किं त्वं समर्थाऽसि विश्वं विधातुं
     दृशैवाशु सर्वं चतुर्धा विभक्तम् ।
विनोदार्थमेवं विधिं मां विधाया-
     दिसर्गे किलेदं करोषीति कामम् ॥ ३५ ॥
हरिः पालकः किं त्वयाऽसौ मधोर्वा
     तथा कैटभाद्रक्षितः सिन्धुमध्ये ।
हरः संहृतः किं त्वयाऽसौ न काले
     कथं मे भ्रुवोर्मध्यदेशात्स जातः ॥ ३६ ॥
न ते जन्म कुत्रापि दृष्टं श्रुतं वा
     कुतः सम्भवस्ते न कोऽपीह वेद ।
किलाद्यासि शक्तिस्त्वमेका भवानि
     स्वतन्त्रैः समस्तैरतो बोधिताऽसि ॥ ३७ ॥
त्वया संयुतोऽहं विकर्तुं समर्थो
     हरिस्त्रातुमम्ब त्वया संयुतश्च ।
हरः सम्प्रहर्तुं त्वयैवेह युक्तः
     क्षमा नाद्य सर्वे त्वया विप्रयुक्ताः ॥ ३८ ॥
यथाऽहं हरिः शङ्करः किं तथाऽन्ये
     न जाता न सन्तीह नो वाऽभविष्यन् ।
न मुह्यन्ति केऽस्मिंस्तवात्यन्तचित्रे
     विनोदे विवादास्पदेऽल्पाशयानाम् ॥ ३९ ॥
अकर्ता गुणस्पष्ट एवाद्य देवो
     निरीहोऽनुपाधिः सदैवाकलश्च ।
तथापीश्वरस्ते वितीर्णं विनोदं
     सुसम्पश्यतीत्याहुरेवं विधिज्ञाः ॥ ४० ॥
दृष्टादृष्टविभेदेऽस्मिन्प्राक्त्वत्तो वै पुमान्परः ।
नान्यः कोऽपि तृतीयोऽस्ति प्रमेये सुविचारिते ॥ ४१ ॥
न मिथ्या वेदवाक्यं वै कल्पनीयं कदाचन ।
विरोधोऽयं मयाऽत्यन्तं हृदये तु विशङ्‌कितः ॥ ४२ ॥
एकमेवाद्वितीयं यद्‌‌ब्रह्म वेदा वदन्ति वै ।
सा किं त्वं वाप्यसौ वा किं सन्देहं विनिवर्तय ॥ ४३ ॥
निःसंशयं न मे चेतः प्रभवत्यविशङ्‌कितम् ।
द्वित्वैकत्वविचारेऽस्मिन्निमग्नं क्षुल्लकं मनः ॥ ४४ ॥
स्वमुखेनापि सन्देहं छेत्तुमर्हसि मामकम् ।
पुण्यभोगाच्च मे प्राप्ता सङ्गतिस्तव पादयोः ॥ ४५ ॥
पुमानसि त्वं स्त्री वासि वद विस्तरतो मम ।
ज्ञात्वाऽहं परमां शक्तिं मुक्तः स्यां भवसागरात् ॥ ४६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे हरब्रह्मकृतस्तुतिवर्णनं पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


देवीची स्तुती

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अशा रीतीने देवाधिदेव भगवान जनार्दन विष्णूंनी देवीची नम्र भावाने स्तुती करून तो तेथेच हात जोडून स्थिर राहिला. त्यानंतर सर्वांचे कल्याण करणारा भगवान रुद्र देवीच्या संमुख आला. त्याने विनम्र होऊन देवीपुढे हात जोडले आणि तिच्या समोर उभा राहून तो देवीला म्हणाला, हे देवी, साक्षात् भगवान् विष्णूही तुझ्याचपासून जन्मास आलेला आहे हे मला आता समजले. तुझ्यापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मदेव अशी ही उत्पत्ती आहे. म्हणजे ब्रह्मदेवही तुझ्याचपासून उत्पन्न झाला आहे असे म्हटले तरी चालेल. हे देवी, हे दोघेही जर तुझ्यापासून झाले असतील तर सगुण असलेला मी सुद्धा तुझ्यापासून झालो नाही असे कसे होईल ? हे कल्याणी, तू अत्यंत चतुर असून आपल्या मायेने ही सर्व ब्रह्मांडे उत्पन्न करतेस. तेव्हा असा सर्वंकश असलेल्या तुझ्यापासून आमची उत्पत्ती झाली आहे यात आश्चर्य ते कसले.

हे मातृदेवते, पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, इंद्रिये, मन, बुद्धि आणि अहंकार हे सर्वकाही तूच आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व जगताचे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहेत असे जे मानतात, ते तुझे सामर्थ्य ओळखत नाहीत, ते अज्ञ आहेत. त्यांना शास्त्रसिद्धांताची जाण नाही. कारण ब्रह्मा, विष्णू, महेषादि सर्वांना तूच उत्पन्न करतेस. त्यानंतर ते हे चराचर प्राण्यांनी भरलेले जगत् तुझ्या प्रेरणेने उत्पन्न करतात.

हे अंबे, पृथ्वी, उदक, अग्नि, वायू आणि आकाश व या पंचमहाभूतांचे विषय आणि गंधासारखे इतर गुण यांच्याच योगाने हे जगत् उत्पन्न झाले आहे असे जर मानले तरी एक गोष्ट निश्चित आहे, की ही पंचमहाभूते तुझ्या अति सूक्ष्म अंशातूनच प्रकट होत असतात. म्हणून सर्वस्वाची खरोखर तूच कर्ती आहेस.

ब्रह्मा, विष्णू, शिव यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले हे सर्व जगत् म्हणजे वास्तविक तूच आहेस. नानाप्रकारच्या प्रकृती वेषांमुळे होणार्‍या सर्व क्रीडांचे ठिकाणी तूच उत्कंठापूर्ण रममाण होतेस आणि हे सर्वस्व तूच असल्याने प्रलयकाली तूच तुझ्यात विराम पावतेस.

हे देवी अंबे, आम्ही, ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व जगत् उत्पन्न करण्याची इच्छा धरली म्हणून जगताचे कर्ते झालो. पण हे भगवती, तुझ्या चरणकमलाच्या केवळ धुळीचा लाभ झाल्यावरच आम्हाला हे जगत् उत्पन्न करण्याची शक्ती प्राप्त होते.

हे अंबे, तुझे मन सर्वदा दयेने भरलेले असते म्हणून तर अनुक्रमाने सत्व, रज, तम ह्या गुणांनी युक्त असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश यांची तू प्रथम उत्पत्ती केलीस. तू दयाळू नसतीस तर हे कशाला केले असतेस ?

तसेच प्राण्यांच्या कर्मवैचित्र्यावरून असे वाटते की तुझी बुद्धी विषम आहे. तसे नसते तर हे अंबे, राजे, प्रधान, मंत्री, सेवकवर्ग ह्यांनी व्याप्त, आणि दरिद्री व धनिक यांनी गजबजलेले विविध प्रकारचे जगत् तू कशाला बरे उत्पन्न केले असतेस ? या जगताची उत्पत्ती, स्थिती, लय हे केवळ तुझ्याच सत्व, रज, तम या गुणांमुळे होत असते, म्हणूनच या त्रैलोक्याचे जे कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांना तूच उत्पन्न केलेस हे निश्चित.

हे भवानी, आम्ही तिघेही ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या विमानातून आकाशमार्गाने जात असता आम्हाला अनेक नवीन विश्वब्रह्मांडे दृष्टीस पडली. आता हे देवी, ती ब्रह्मांडे आणि त्यांच्या उत्पती, स्थिती, लय करणारे ते दुसरे ब्रह्मा, विष्णू, महेश हे कोणी उत्पन्न केले ते मला सांगा.

हे जगदंबे, तूच आपल्या अंशात्मक रूपातून हे जगत् उत्पन्न करीत असतेस. तूच दयार्द्र होऊन त्याचे रक्षण करतेस आणि मनात येताच त्याचा संहार करण्याचे सामर्थ्यही तुझ्याच ठिकाणी असते आणि हे देवी, तू आपल्या पुरुषरूप पतीशी नित्य रममाण होत असतेस. म्हणून तर हे कल्याणी, तुझ्या अद्‌भूत सामर्थ्याची लीलाच आम्हाला समजत नाही.

हे देवी, आम्हाला सांप्रत स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. तेव्हा हे भगवती, आता आम्हाला नित्य याच रूपात ठेवून तू आमच्याकडूनही या दासीप्रमाणे सेवा करून घेत जा. कारण केवळ पुरुषत्व प्राप्त होण्यामुळे जर आम्ही तुझ्या चरणकमलाच्या सेवेपासून अंतरणार असू तर ते पुरुषत्व नको कारण तुझ्या सेवेच्या वियोगामुळे आम्हाला खरे सुख कसे बरे प्राप्त होईल ?

हे अंबे, हा नरदेह प्राप्त झाल्यावर मला जरी कुणी त्रैलोक्याचे आधिपत्य दिले तरीही हे कल्याणी, तुझे चरणकमल सोडून इतर संपन्न त्रैलोक्य मला तुच्छ असून तेथे कोठेही राहण्याची मला इच्छा नाही.

हे सुनेत्री अंबे, केवळ तुझ्या सेवेचा अद्‌भूत लाभ प्राप्त होत असल्यामुळे मला स्त्रीत्व प्राप्त झाल्याबद्दल यत्किंचितही दुःख होत नाही. कारण तुझ्या चरणदर्शनाशिवाय पुरुषत्वामुळे चांगल्या रितीने सुखप्राप्त होईल हे मानणे मूढपणाचे आहे. तुझ्या दर्शनाशिवाय इतरत्र कोठेही सुखप्राप्ती होणार नाही. हे अंबे, रुद्राला स्त्रीत्व प्राप्त होऊन त्याला महेश्वरी देवीची, त्या आदिशक्तीची नित्य नेमाने सेवा करायला मिळाली, अशीच सर्व त्रिखंडात माझी कीर्ती होवो. हे भवानी अशीच माझी इच्छा आहे. अशीच माझी कीर्ती चिरंतन व्हावी.

देवी, तुझ्या चरणापासून दूर गेल्याने मला जर या त्रैलोक्यात निष्कंटक राज्य प्राप्त होणार असेल तरीही ते नको आहे. त्याची मी कधीच इच्छा करणार नाही. हे देवी, तुझ्या चरण कमलाचा वियोग अत्यंत सूक्ष्म क्षणभर जरी घडला तरीही तो क्षणांश अनेक युगांप्रमाणे वाटत असतो.

हे भगवती, तुझ्या चरणाचे निरंतर ध्यान करायचे सोडून जे ऋषी, मुनी तपश्चर्येत मग्न होऊन विनाकारण कालपव्यय करतात ते केवळ दुर्दैवाने फसलेले असतात. पण तरीही अशाप्रकारे झालेल्या पराभवालाच ते आपला विजय मानतात.

हे जन्मरहित देवी अंबे, तुझ्या चरण कमलांच्या सेवेचे सूक्ष्म पराग सेवन केल्याने जशी संसार सागरापासून मुक्ती मिळते तशी तपश्चर्येने, इंद्रियदमनाने, समाधीने किंवा विहित कर्मे केल्याने मुक्ती मिळत नाही.

म्हणून हे देवी, तू जर खरोखर दयानिधी असशील तर माझ्यावर कृपावंत हो आणि निर्दोष अद्‌भूत आणि अत्यंत निर्मल असा तो अनुपम नवाक्षर मंत्र तू मला सांग म्हणजे मी त्याचा नित्य जप करून सुखी होईन.

हे संसारापासून तारण करणारे देवी, पूर्व जन्मी मला तो नवाक्षर मंत्र प्राप्त झाला होता. पण तो सांप्रत स्मरत नाही. म्हणून हे मंगल माते, तू आजच मला तो नवाक्षर मंत्र दे आणि मला या भवसागरातून तार. ब्रह्मदेव नारदाला पुढे सांगू लागले, हे नारदा, हे पुत्रा याप्रमाणे शिवाने त्या जगदंबेची स्तुती केली. त्या अद्‌भूत आणि तेजस्वी रुद्राची ती नम्र प्रार्थना ऐकून त्या मनोहर देवीने आपल्या मधुर व अत्यद्‌भूत वाणीने अत्यंत स्पष्ट स्वरात त्या नवाक्षर मंत्राचा पूर्णपणे उच्चार केला.

देवीने उच्चारलेल्या नवाक्षर मंत्राचा महादेवाने स्वीकार केला. नवाक्षर मंत्रामुळे महादेव पराकाष्ठेचा आनंदित झाला. त्याने समाधानाने देवीच्या चरणांना प्रणाम केला व तेथेच उभा राहिला. त्याने तेथेच उभ्यानेच भुक्ती मुक्ती देणार्‍या त्या नवाक्षर मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. बीजासह तो मंत्र जपू लागला. अशाप्रकारे लोककल्याण करण्यास तत्पर असलेल्या शिवाला उभ्या स्थितीत अवलोकन करून मीही त्या महामायेच्या चरणासमीप गेलो आणि तिच्या समोर उभा राहून हात जोडून म्हणालो, हे महामाये, हे देवी, तूच सकल लोकांची अखंड माता आहेस हे मला पटले आहे. म्हणून वेदांनी तुझी योजना यज्ञसंबंधात पूर्णपणे न करता तुझ्याच अंशापासून उत्पन्न झालेली स्वाहारूप देवीची योजना यज्ञामधील संपूर्ण हवनामध्ये केली आहे. म्हणून ते तुझे रूप जाणण्यास असमर्थ आहेत असे नाही.

कारण प्रत्यक्ष कर्माचे ठिकाणी तुझी परिपूर्ण योजना न करता तुझ्या अंशभूत शक्तीची योजना त्यांनी केली. यावरून तुमचे सामर्थ्य सिद्ध होते.

हे देवी, हे माते, खरोखर तूच त्रैलोक्यात सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी आहेस हे सर्वत्र विदितच आहे. खरोखर मीच या सर्वस्वाचा कर्ता आहे, हे अत्यंत अद्‌भूत असे ब्रह्मांड मीच उत्पन्न केले आहे, हे चराचर वस्तुमात्र उत्पन्न करण्यास माझ्याशिवाय दुसरा कोण समर्थ आहे ? म्हणून हे सर्व निर्माण करणारा मीच असून खरोखरच मी धन्य आहे आणि मीच ब्रह्मदेव या जगतापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा गर्व केवळ भवसागरात मग्न झाल्यामुळेच मला झाला होता. माझ्या अहंकारामुळे मीच याचा निर्माता आहे असे मी समजत होतो.

पण हे भगवती, आज तुझ्या चरणकमलाच्या धुळीने मी पवित्र झालो आहे. तुझी चरणधूळ प्राप्त झाल्यामुळे सांप्रत मला अभिमान वाटत असून तुझ्या प्रसादामुळे मी आज धन्य झालो आहे असे यथार्थ शब्द उच्चारण्यास मी आता समर्थ झालो आहे आणि त्या मोहरुपाने युक्त असलेल्या त्या प्रचंड बेडीतून आता तूच माझी मुक्तता कर असे मी आपल्या भक्तियुक्त मनाने तुला कथन करीत आहे. हे देवी, मी तुझी प्रार्थना करीत आहे.

कारण हे कल्याणी, या संसार तापाच्या भीतिपासून माझे रक्षण करणारी तूच एकमेव चतुर व मुक्तीप्रद अशी साक्षात् परमेश्वरी आहेस. हे देवी, तूच मला कमलापासून उत्पन्न केले आहेस. म्हणून तुझ्या कृपेशिवाय मी संसारापासून कसा बरे मुक्त होईन अशा प्रकारची नित्य चिंता मला भासत आहे. म्हणून हे देवी, मी सदैव तुझी आज्ञा पालन करून तुझ्याच चरणकमलाचा दास होऊन राहण्यातच मला सुख आहे. खरोखर हे देवी, मला निःसंशय असेच वाटते. हे शिवे, याचसाठी आता भवसागरात व्यग्र झालेल्या माझे खरोखरच रक्षण कर. हे देवी, खरोखर मी सर्वज्ञ नाही. पण तुझ्या चरित्राविषयी न जाणणारे पुरुषच मला प्रभू म्हणून संबोधतात. इतकेच नव्हे तर स्वर्गप्राप्तीची इच्छा करणारे यजमानही यज्ञ करतात. पण त्यांना तुझ्या प्रभावाची अजूनपर्यंत जाणीव नाही.

हे देवी, आदिमाये, तूच मजकडून ही सृष्टी उत्पन्न करून घेतलीस आणि तो सृष्टीचा विहार उत्पन्न करण्यासाठी तूच मला विधी ह्या नावाने संबोधून मला निर्माण केलेस. पण या गोष्टीची मला जाणीव न राहिल्याने या चारी प्रकारची आदिसृष्टी मी निर्माण केली आणि त्या नंतर मीच काय तो सारसर्वज्ञ असून सर्व काही मलाच कळते आहे. माझ्याशिवाय जाणणारा दुसरा कोण आहे अशा प्रकारचा अहंकार प्राप्त होऊन मी भारावून गेलो.

पण हे कृपावती महामाये, त्या माझ्या अहंकाररूप अपराधाबद्दल मी सांप्रत तुझी क्षमा याचना करीत आहे. हे भगवती माझ्या गर्वाबद्दल मला क्षमा कर.

श्रमाने प्राप्त होणारे आठ प्रकारचे योगमार्ग आहेत. त्यामध्ये एकचित्त होऊन जे लोक समाधिस्थ झालेले आहेत, ते केवळ तुझी जाणीव नसल्यामुळेच या अन्य मार्गाचा अवलंब करतात. पण हे देवी वस्तुतः कपटाने जरी तुझ्या नावाचा उच्चार केला तरी मोक्ष प्राप्त होतो हे त्यांना समजत नाही. मूढ आहेत.

तसेच दुसरे मोक्षप्राप्तीसाठी, ज्यात तत्त्वसंख्येचे विधान केलेले आहे, अशाच प्रकारच्या विचारात गढून जातात, म्हणजे जे सांख्ययोगात मग्न होऊन स्वर्गाची अपेक्षा करतात. कारण ते तुझ्याच पदांचे बाबतीत मोहमय झालेले असतात. त्यामुळे त्या मोहावश स्थितीत ते तुझे नाव उच्चारण्याचे सोडून दुसर्‍या मार्गाचा अवलंब करतात, म्हणून ते नित्य भवसागरातच मग्न झालेले आहेत असेच म्हणावे लागेल.

हे भवानी, पण संसारतापापासून मुक्ती देणारी तूच आहेस. पण याची प्रचीती ज्या पूर्वीच्या पुरुषांना आलेली आहे ते निमिषार्धात देखील तुझ्याच नावरूपांवाचून दुसर्‍या कशाचाही विचार करीत नाहीत. ते नित्य तुझ्या शिवा, अंबिका, शक्ती, ईशा याच नावाचा जप करीत राहतात.

हे देवी, हे विश्व चार प्रकारांनी युक्त असले तरी हे सर्व ब्रह्मांड तू केवळ दृष्टीच्या एका कटाक्षानेच उत्पन्न करण्यास समर्थ नाहीस काय ? खरोखरच, परमेश्वरी, हे केवळ विनोद करण्याची लहर आल्यामुळेच तूच स्वेछेने या आदिसृष्टीत मला उत्पन्न करून ठेवलेस आणि माझ्याकडून हे विश्व निर्माण करवून घेतलेस.

हे देवी, त्याचप्रमाणे हरि हाच जर सर्व जगत्‌सृष्टीचे पालन करण्यास समर्थ असता तर समुद्रात त्याचे संरक्षण करण्यासाठी तुला प्रयत्‍न करण्याचे काय कारण होते ? त्याचप्रमाणे रुद्र संहारकर्ता आहे असे मानावे तर प्रलयकाली तू त्यांचा संहार केला नसतास. बरे रुद्राचा संहार झाला नाही असे जर म्हटले तर तो पुनः प्रत्यक्ष माझ्याच भ्रूमध्यभागापासून कसा बरे उत्पन्न झाला ?

पण हे जगदंबे, तुझी उत्पत्ती आणि लय हे मात्र कोठून झाली हे ऐकण्यात नाही आणि कोठेही पाहण्यात नाही. खरोखरच हे देवी, तू कोठून उत्पन्न झालीस हे कोणालाही माहीत नाही. म्हणून हे भवानी, तूच साक्षात् आदि शक्ति आहेस. म्हणूनच स्वतःच प्रमाण असलेल्या सर्व वेदांनी तुझेच ज्ञान करून दिले आहे.

हे अंबे, तुझ्या कृपा साहाय्यामुळेच मी सृष्टी उत्पन्न करण्यास समर्थ झालो, विष्णूला तिचे पालन करण्याचे सामर्थ्य तुझ्यामुळेच प्राप्त झाले आणि तुझ्या प्रेरणेनेच रुद्र सर्वस्वाचा संहार करण्यास समर्थ झाला.

पण हे देवी, तुझा वियोग झाल्यामुळे सांप्रत आम्ही सर्वच आपापली कर्तव्य कर्मे करण्यास संपूर्णपणे असमर्थ झालो आहोत. मी, विष्णू आणि महेश्वर याप्रमाणेच आणखी इतर किती तरी ब्रह्मा, विष्णू, महेश तू आजपर्यंत निर्माण केले असशील याची गणती नाही. तसेच आताही आमच्यासारखेच कितीतरी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर विद्यमान असतील याची कल्पना आम्हा पामरांना येणेच शक्य नाही. तसेच पुढेही तू असे तिघेजण कित्येकदा निर्माण करशील याविषयीही कल्पना करणे अशक्य आहे.

पण तुझ्या अद्‌भूत विनोद निर्मितीमुळे मंदमती लोकांच्या वादविवादाचे कारण मात्र निर्माण झाले असल्याने ते मोहीत झाले आहेत.

कर्तृत्व, गुण, इच्छा, उपाधि, कला ह्यापासून तो तेजोमय ईश्वर जरी अलिप्त असला तरी तुझ्या मोठ्या विनोदाचा तो साक्षी असतो असे शास्त्र व पंडित सांगत असतात.

हे देवी, या सृष्टीचे, या संसाराचे दृष्ट, अदृष्ट असे दोन विभाग होतात. पण त्या दोन्ही विभागामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे आणि तोच फक्त तुझ्यातही निर्माण झालेला आहे. सर्व शास्त्रीय विधानांचा जर नीटपणे विचार केला तर तो परमात्मा आणि तू या तुम्हा उभयतांशिवाय तिसरा कोणीही आदि नाही हेच सिद्ध होते.

हे भगवती, वेदांतील वाक्ये खोटी आहेत असे कधीही समजणे योग्य नाही. पण हा परस्पर विरोध जाणून माझे मन शंकाभयाने व्याप्त झाले आहे. कारण वेदांचे म्हणणे असे की ब्रह्म एकच आहे आणि ते अद्वितीय आहे.

पण ते ब्रह्म तूच असून किंवा तो परमात्मा जो पुरुष आहे, असा संदेह माझ्या मनात निर्माण झाला आहे त्याची तू निवृत्ती कर. माझे मन किती क्षुद्र आहे. ते खरोखरच निशंक होत नाही. एकत्व अथवा द्वित्व या असल्या नीच विचारात ते निमग्न झाले आहे. म्हणून हे देवी, केवळ तुझ्या मुखातून बाहेर पडलेल्या वाणीने तो संदेह नाहीसा होईल. कारण फक्त तूच त्यासाठी समर्थ आहेस. केवळ आमच्या पुण्यबलामुळेच आज आम्हाला तुझे दर्शन घडून तुझ्या चरणकमलाजवळ उभे राहण्याचे भाग्य लाभले आहे. म्हणून हे महेश्वरी, तू स्त्री आहेस की पुरुष आहेस हे मला अगदी विस्तारपूर्वक सांग म्हणजे परमशक्तीची जाणीव होऊन मी या संसारातून सत्वर मुक्त होईन.





अध्याय पाचवा समाप्त

GO TOP