[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः


विष्णुना कृतं देवीस्तोत्रम्

ब्रह्मोवाच
इत्युक्त्वा भगवान्विष्णुः पुनराह जनार्दनः ।
वयं गच्छेम पार्श्वेऽस्याः प्रणमन्तः पुनः पुनः ॥ १ ॥
सेयं वरा महामाया दास्यत्येषा वरान् हि नः ।
स्तुवामः सन्निधिं प्राप्य निर्भयाश्चरणान्तिके ॥ २ ॥
यदि नो वारयिष्यन्ति द्वारस्थाः परिचारकाः ।
पठिष्यामश्च तत्रस्थाः स्तुतिं देव्याः समाहिताः ॥ ३ ॥
ब्रह्मोवाच
इत्युक्ते हरिणा वाक्ये सुप्रहृष्टौ सुसंस्थितौ ।
जातौ प्रमुदितौ कामं निकटे गमनाय च ॥ ४ ॥
ओमित्युक्त्वा हरिं सर्वे विमानात्त्वरितास्त्रयः ।
उत्तीर्य निर्गता द्वारि शङ्कमाना मनस्यलम् ॥ ५ ॥
द्वारस्थान् वीक्ष्य तान्सर्वान्देवी भगवती तदा ।
स्मितं कृत्वा चकाराशु तांस्त्रीन्स्त्रीरूपधारिणः ॥ ६ ॥
वयं युवतयो जाताः सुरूपाश्चारुभूषणाः ।
विस्मयै परमं प्राप्ता गतास्तत्सन्निधिं पुनः ॥ ७ ॥
सा दृष्ट्वा नः स्थितांस्तत्र स्त्रीरूपांश्चरणान्तिके ।
व्यलोकयत चार्वङ्गी प्रेमसम्पूर्णया दृशा ॥ ८ ॥
प्रणम्य तां महादेवीं पुरतः संस्थिता वयम् ।
परस्परं लोकयन्तः स्त्रीरूपाश्चारुभूषणाः ॥ ९ ॥
पादपीठं प्रेक्षमाणा नानामणिविभूषितम् ।
सूर्यकोटिप्रतीकाशं स्थितास्तत्र वयं त्रयः ॥ १० ॥
काश्चिद्‌रक्ताम्बरास्तत्र सहचर्यः सहस्रशः ।
काश्चिन्नीलाम्बरा नार्यस्तथा पीताम्बराः शुभाः ॥ ११ ॥
देव्यः सर्वाः शुभाकारा विचित्राम्बरभूषणाः ।
विरेजुः पार्श्वतस्तस्याः परिचर्यापराः किल ॥ १२ ॥
जगुश्च ननृतुश्चान्याः पर्युपासन्त ताः स्त्रियः ।
वीणामारुतवाद्यानि वादयन्तो मुदान्विताः ॥ १३ ॥
शृणु नारद वक्ष्यामि यद्‌दृष्टं तत्र चाद्‌भुतम् ।
नखदर्पणमध्ये वै देव्याश्चरणपङ्कजे ॥ १४ ॥
ब्रह्माण्डमखिलं सर्वं तत्र स्थावरजङ्गमम् ।
अहं विष्णुश्च रुद्रश्च वायुरग्निर्यमो रविः ॥ १५ ॥
वरुणः शीतगुस्त्वष्टा कुबेरः पाकशासनः ।
पर्वताः सागरा नद्यो गन्धर्वाप्सरसस्तथा ॥ १६ ॥
विश्वावसुश्चित्रकेतुः श्वेतश्चित्राङ्गदस्तथा ।
नारदस्तुम्बुरुश्चैव हाहाहूहूस्तथैव च ॥ १७ ॥
अश्विनौ वसवः साध्याः सिद्धाश्च पितरस्तथा ।
नागाः शेषादयः सर्वे किन्नरोरगराक्षसाः ॥ १८ ॥
वैकुण्ठो ब्रह्मलोकश्च कैलासः पर्वतोत्तमः ।
सर्वं तदखिलं दृष्टं नखमध्यस्थितं च नः ॥ १९ ॥
मज्जन्मपङ्कजं तत्र स्थितोऽहं चतुराननः ।
शेषशायी जगन्नाथस्तथा च मधुकैटभौ ॥ २० ॥
ब्रह्मोवाच
एवं दृष्टं मया तत्र पादपद्मनखे स्थितम् ।
विस्मतोऽहं ततो वीक्ष्य किमेतदिति शङ्‌कितः ॥ २१ ॥
विष्णुश्च विस्मयाविष्टः शङ्करश्च तथा स्थितः ।
तां तदा मेनिरे देवीं वयं विश्वस्य मातरम् ॥ २२ ॥
ततो वर्षशतं पूर्णं व्यतिक्रान्तं प्रपश्यतः ।
सुधामये शिवे द्वीपे विहारं विविधं तदा ॥ २३ ॥
सख्य इव तदा तत्र मेनिरेऽस्मानवस्थितान् ।
देव्यः प्रमुदिताकारा नानाभरणमण्डिताः ॥ २४ ॥
वयमप्यतिरम्यत्वाद्‌बभूविम विमोहिताः ।
प्रहृष्टमनसः सर्वे पश्यन्भावान्मनोरमान् ॥ २५ ॥
एकदा तां महादेवीं देवीं श्रीभुवनेश्वरीम् ।
तुष्टाव भगवान्विष्णुर्युवतीभावसंस्थितः ॥ २६ ॥
श्रीभगवानुवाच
नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नमः ।
कल्याणै कामदायै च वृद्ध्यै सिद्ध्यै नमो नमः ॥ २७ ॥
सच्चिदानन्दरूपिण्यै संसारारणये नमः ।
पञ्चकृत्यविधात्र्यै ते भुवनेश्यै नमो नमः ॥ २८ ॥
सर्वाधिष्टानरूपायै कूटस्थायै नमो नमः ।
अर्धमात्रार्थभूतायै हृल्लेखायै नमो नमः ॥ २९ ॥
ज्ञातं मयाऽखिलमिदं त्वयि सन्निविष्टं
     त्वत्तोऽस्य सम्भवलयावपि मातरद्य ।
शक्तिश्च तेऽस्य करणे विततप्रभावा
     ज्ञाताऽधुना सकललोकमयीति नूनम् ॥ ३० ॥
विस्तार्य सर्वमखिलं सदसद्विकारं
     सन्दर्शयस्यविकलं पुरुषाय काले ।
तत्त्वैश्च षोडशभिरेव च सप्तभिश्च
     भासीन्द्रजालमिव नः किल रञ्जनाय ॥ ३१ ॥
न त्वामृते किमपि वस्तुगतं विभाति
     व्याप्यैव सर्वमखिलं त्वमवस्थिताऽसि ।
शक्तिं विना व्यवहृतो पुरुषोऽप्यशक्तो
     वम्भण्यते जननि बुद्धिमता जनेन ॥ ३२ ॥
प्रीणासि विश्वमखिलं सततं प्रभावैः
     स्वैस्तेजसा च सकलं प्रकटीकरोषि ।
अत्स्येव देवि तरसा किल कल्पकाले
     को वेद देवि चरितं तव वै भवस्य ॥ ३३ ॥
त्राता वयं जननि ते मधुकैटभाभ्यां
     लोकाश्‍च ते सुवितताः खलु दर्शिता वै ।
नीताः सुखस्य भवने परमां च कोटिं
     यद्दर्शनं तव भवानि महाप्रभावम् ॥ ३४ ॥
नाहं भवो न च विरिंचि विवेद मातः
     कोऽन्यो हि वेत्ति चरितं तव दुर्विभाव्यम् ।
कानीह सन्ति भुवनानि महाप्रभावे
     ह्यस्मिन्भवानि रचिते रचनाकलापे ॥ ३५ ॥
अस्माभिरत्र भुवने हरिरन्य एव
     दृष्टः शिवः कमलजः प्रथितप्रभावः ।
अन्येषु देवि भुवनेपु न सन्ति किं ते
     किं विद्म देवि विततं तव सुप्रभावम् ॥ ३६ ॥
याचेऽम्ब तेऽङ्‌घ्रिकमलं प्रणिपत्य कामं
     चित्ते सदा वसतु रूपमिदं तवैतत् ।
नामापि वक्त्रकुहरे सततं तवैव
     सन्दर्शनं तव पदाम्बुजयोः सदैव ॥ ३७ ॥
भृत्योऽयमस्ति सततं मयि भावनीयं
     त्वां स्वामिनीति मनसा ननु चिन्तयामि ।
एषाऽऽवयोरविरता किल देवि भूया-
     द्व्याप्तिः सदैव जननी सुतयोरिवार्थे ॥ ३८ ॥
त्वं वेत्सि सर्वमखिलं भुवनप्रपञ्चं
     सर्वज्ञता परिसमाप्तिनितान्तभूमिः ।
किं पामरेण जगदम्ब निवेदनीयं
     यद्युक्तमाचर भवानि तवेङ्‌गितं स्यात् ॥ ३९ ॥
ब्रह्मा सृजत्यवति विष्णुरुमापतिश्च
     संहारकारक इयं तु जने प्रसिद्धिः ।
किं सत्यमेतदपि देवि तवेच्छया वै
     कर्तुं क्षमा वयमजे तव शक्तियुक्ताः ॥ ४० ॥
धात्री धराधरसुते न जगद्‌बिभर्ति
     आधारशक्तिरखिलं तव वै बिभर्ति ।
सूर्योऽपि भाति वरदे प्रभया युतस्ते
     त्वं सर्वमेतदखिलं विरजा विभासि ॥ ४१ ॥
ब्रह्माऽहमीश्वरवरः किल ते प्रभावा-
     त्सर्वे वयं जनियुता न यदा तु नित्याः ।
केऽन्ये सुराः शतमखप्रमुखाश्च नित्या
     नित्या त्वमेव जननी प्रकृतिः पुराणा ॥ ४२ ॥
त्वं चेद्‌भवानि दयसे पुरुषं पुराणं
     जानेऽहमद्य तव संनिधिगः सदैव ।
नोचेदहं विभुरनादिरनीह ईशो
     विश्वात्मधीरिति तमःप्रकृतिः सदैव ॥ ४३ ॥
विद्या त्वमेव ननु बुद्धिमतां नराणां
     शक्तिस्त्वमेव किल शक्तिमतां सदैव ।
त्वं कीर्तिकान्तिकमलामलतुष्टिरूपा
     मुक्तिप्रदा विरतिरेव मनुष्यलोके ॥ ४४ ॥
गायत्र्यसि प्रथमवेदकला त्वमेव
     स्वाहा स्वधा भगवती सगुणार्धमात्रा ।
आम्नाय एव विहितो निगमो भवत्यै
     सञ्जीवनाय सततं सुरपूर्वजानाम् ॥ ४५ ॥
मोक्षार्थमेव रचयस्यखिलं प्रपञ्चं
     तेषां गताः खलु यतो ननु जीवभावम् ।
अंशा अनादिनिधनस्य किलानघस्य
     पूर्णार्णवस्य वितता हि यथा तरङ्गाः ॥ ४६ ॥
जीवो यदा तु परिवेत्ति तवैव कृत्यं
     त्वं संहरस्यखिलमेतदिति प्रसिद्धम् ।
नाट्यं नटेन रचितं वितथेऽन्तरङ्गे
     कार्ये कृते विरमसे प्रथितप्रभावा ॥ ४७ ॥
त्राता त्वमेव मम मोहमयाद्‌भवाब्धे-
     स्त्वामम्बिके सततमेमि महार्तिदे च ।
रागादिभिर्विरचिते वितथे किलान्ते
     मामेव पाहि बहुदुःखकरे च काले ॥ ४८ ॥
नमो देवि महाविद्ये नमामि चरणौ तव ।
सदा ज्ञानप्रकाशं मे देहि सर्वार्थदे शिवे ॥ ४९ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे विष्णुना कृतं देवीस्तोत्रं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


मणिद्वीपाचे वर्णन

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव नारदाला म्हणाला, अशाप्रकारे तो सर्व भक्तजनांचे दुःख निवारण करणारा भगवान विष्णू, 'ती आपली जननी आहे' असे सांगून पुढे म्हणाला, "आपण विनम्र भावाने एक सारखे तिला प्रणाम करीत करीत, तिच्याजवळ जाऊ. हीच ती सर्वश्रेष्ठ महामाया असल्यामुळे आपण हिला शरण गेल्यास ही आपणाला वर देईल. आपण अत्यंत निर्भय मनाने हिच्या चरणाजवळ जाऊ आणि मुक्त कंठाने तिचे स्तवन करू. समजा, तेथे द्वारावर उभ्या असलेल्या परिचारिकांनी जर आपणाला देवीपर्यंत जाण्यासाठी मध्येच अडवून थांबविले तर तेथे दाराजवळ उभे राहूनच आपण त्याच ठिकाणाहून तिची स्तुती करू."

ब्रह्मदेव म्हणाला, "श्री भगवान विष्णूंनी असे आम्हाला सांगितल्यावर आम्ही उभयता अत्यंत हर्षभारित झालो आणि अत्यंत व्यवस्थित स्थानापन्न झालो. त्या देवी भगवतीच्या सान्निध जाण्यासाठी आम्ही फारच उत्सुक झालो होतो. त्यामुळे श्रीहरीने आम्हाला तिच्याकडे जाण्यासंबंधी सुचवताच आम्ही म्हणालो, "बरे, ठीक तर. आपण जाऊ."

त्यानंतर आम्ही तिघेही अत्यंत आदराने त्या अद्‌भूत विमानातून खाली उतरलो आणि त्या देवीकडे जाण्यास सत्वर सिद्ध झालो. पण आमच्या मनात एकसारखी शंका येत होती की तेथे पोहोचल्यावर आम्हाला दारातच प्रतिबंध केला जाईल. पण तरीही आम्ही तिच्याकडे जाण्यास निघालो.

आम्हाला सर्वांना तिच्या द्वारापाशी आल्याचे देवीने क्षणातच पाहिले तेव्हा तत्‌क्षणी देवी भगवती स्वतःशीच गालातल्या गालात हसली आणि आमच्या लक्षात येण्यापूर्वीच आम्हा तिघांनाही तिने सत्वर स्त्रीरूपधारी बनविले. त्याचवेळी सुंदर अलंकारांनी विभूषित, बहुमोल वस्त्रे परिधान केलेल्या, अत्यंत सुंदर नवयौवन प्राप्त झालेल्या अशा सुतनू तरुणी आम्ही झालो होतो. त्यामुळे अत्यंत विस्मित नेत्रांनी आम्ही एकमेकांकडे लाजेने पाहिले आणि भयचकित होऊन आम्ही तिघेही त्या देवी भगवतीच्या जवळ जाऊन पोहोचलो.

आमचे देहांना स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर आम्ही त्या देवीच्या अगदी चरणांजवळ जाऊन पोहोचल्याचे अवलोकन करून, मनोहर अवयवांनी संपन्न असलेल्या त्या देवी भगवतीने आमच्यावर प्रेमकटाक्षांचा वर्षाव केला. तेव्हा आम्ही तिघांनीही त्या महादेवीला प्रणाम केले. त्या स्त्रीचे म्हणजे त्या भगवती देवीचे समोरच आम्ही तिघेही स्त्रीवेषधारी असलेले, एकमेकांकडे कुतूहलाने पाहू लागलो. नंतर देवीचे ते नाना रत्‍नांनी जडविलेले आणि कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते सुवर्णमय सिंहासन अवलोकन करून आम्ही तिघेही भगवतीच्या अगदीच जवळ जाऊन नम्रतेने उभे राहिलो. तिच्या सभोवतीच्या सख्यांपैकी काहींनी रक्त वस्त्रे परिधान केली होती. काही शुभ स्त्रिया नील वस्त्रे परिधान करून तिची सेवा करीत होत्या. तर काही सख्या पीत वर्णाची वस्त्रे घेऊन भगवतीची सुश्रुषा करीत होत्या.

त्या देवीच्या सर्वच सख्या म्हणजे सर्वांग सुंदर देवताच होत्या. त्या सर्व देवतारूपी सख्यांनी अमूल्य व अत्यंत सुशोभित असे सौंदर्यालंकार आपल्या देहावर ल्यालेले होते. त्यांनी परिधान केलेल्या त्या उत्कृष्ट वस्त्रामुळे आणि बहुमोल अलंकारांमुळे त्या सर्व देवता विलक्षण तेजाने झळकत होत्या.

काही स्त्रिया सुस्वर स्वरात गायन करीत होत्या. तर काही जणी उत्तम पदन्यास करून नृत्य करीत होत्या. अशा तर्‍हेने नृत्य व गायन यांच्या सहाय्याने त्या देवीची सेवा करण्यात तत्पर झाल्या होत्या आणि काहींनी वायूंच्या योगाने वाजणारी वाद्ये घेतली होती. अशाप्रकारे तेथे गायन, वादन, नृत्य यांच्या साह्याने सर्वजणी देवीची उपासनाच करीत होत्या.

आता हे नारदा, त्यानंतर तेथे जो अत्यंत अद्‌भूत असा प्रकार मी प्रत्यक्ष पाहिला तोच तुला मी सांगणार आहे. तू शांतचित्ताने ऐकून घे !

देवीच्या चरणकमलातील प्रत्येक बोटावरील नख आरशाप्रमाणे भासत होते व त्या नखरूपी दर्पणात सर्व चराचर ब्रह्मांडच भरून राहिल्याचे माझ्या दृष्टीस पडले. मी विष्णू, रुद्र, वायू, अग्नि, यम, वरुण, चंद्र, त्वष्टा, कुबेर, इंद्र पर्वतसागर, नद्या, गंधर्व, अप्सरा, विश्ववसु, चित्रकेतु, श्वेत, चित्रांगद, नारद, तुंबरु, हाहा, हूहू, अश्विनीकुमार, वसु, साध्य, पितर, शेषासहवर्तमान सर्व नाग, किन्नर, उरग, राक्षस वैकुंठ, ब्रह्मलोक व उत्कृष्ट असे पर्वत आणि कैलास लोक हे सर्वच्या सर्व पूर्णपणे त्या देवीच्या चरणाच्या नखाग्रात सामावले असलेले मी अवलोकन करून अत्यंत विस्मित झालो.

ज्यापासून मी उत्पन्न झालो ते कमलही मला त्या नखाग्रात दिसले. तेथेच मीही चतुर्मुखाने वावरत होतो. शेषावर नित्य शयन करणारा जगन्नाथ तेथे होताच, पण शिवाय ते दुष्ट महाबलाढ्य मधुकैटभ राक्षसही तेथेच होते.

हे नारदा, अशाप्रकारे मी शुभावलोकन केल्यानंतर त्या भगवती महेश्वरी देवीच्या चरणकमलांच्या नखांतच स्थित असलेले हे सर्व विश्वब्रह्मांड मला दिसले आणि ते सर्व चराचर विश्व तेथे अवलोकन केल्यावर मी अत्यंत शंकाकुल झालो. मनात निरनिराळे संशय निर्माण होऊन मी विस्मयचकित झालो आणि मनाशीच म्हणालो, "हे काय अद्‌भूत पाहतो आहे मी ! हे कसे शक्य आहे ! मला भ्रम तर झाला नाही ना ?"

विष्णूही हे पाहून आश्चर्यचकित होऊन विस्फारित नेत्रांनी आजूबाजूला पाहू लागला. आमच्याप्रमाणेच शंकराचीही तीच विस्मयकारक अवस्था होऊन गेली आणि हे सर्व निरीक्षण केल्यावर ती भगवती देवी हीच या सर्व विश्वाची माता आहे असे आमच्या मनाला निःसंशय पूर्णपणे पटले.

त्यानंतर त्या सुमधूर आणि कल्याणरूप मणिद्विपात आम्ही त्या देवीच्या नाना प्रकारच्या क्रीडा अवलोकन करू लागलो. ते सर्व पाहण्यात आम्ही मग्न झालो. आम्हाला कशाचेही भान राहिले नाही, पूर्णपणे शंभर वर्षे आम्ही एकाग्र चित्ताने देवी भगवतीच्या क्रीडा अवलोकन करीत होतो. विविध तर्‍हेच्या वस्त्राभरणांनी आम्ही युक्त असल्यामुळे व स्त्रीरूपाने तेथे उभे असल्यामुळे देवांच्या सभोवतालच्या सर्व देवता, आम्हालाही त्या देवीच्या आम्ही सख्यांच आहोत असे समजू लागल्या आणि आम्ही तिघेही तो सर्व प्रकार अवलोकन करीत आनंदाने तेथेच उभे राहिलो. ते स्थळ, तेथील सौंदर्य आणि देवीच्या सभोवतालचे शुभ वातावरण त्यामुळे आम्हीही मोहीत होऊन तेथेच गुंगून गेलो. अशाप्रकारे काळ जात असता तरुण स्त्रीमध्ये रूपभरीत झालेला तो भगवान विष्णू एकदा, त्या भुवनेश्वरी नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीची, निर्मल मनाने व निर्भय अंतःकरणाने स्तुती करू लागला. भगवान विष्णू म्हणाला, "हे देवी, प्रकृती, विधाती, कल्याणी, कामदा, वृद्धी व अशा रुपांनी युक्त असलेल्या तुला, हे देवी नमस्कार असो. तूच देवी भगवती, तूच सृष्टी, स्थिती, संहार, निरोधन व अनुग्रह हा पाचही कृत्यांची कर्ती आहेस. म्हणून या सर्वाला कारण असलेल्या तुला, हे भुवनेश्वरी कोटी कोटी प्रणाम असोत. या सर्व जगताचे तूच अधिष्ठान आहेस. हे व्यापून राहिलेले निर्विकार चैतन्यही हे देवी तूच आहेस, अर्धमात्रेचा अर्थ असे जे परब्रह्म ते तुझ्याच रुपाने वास करते. तसेच प्रत्यगामात्व स्वरूपही तूच आहेस. हे निःसंशय."

हे माते सर्व तुझ्याच ठिकाणी स्थित आहे. या विश्वाची उत्पत्ती तूच करतेस आणि संहार काली तूच त्याचा लय करतेस हेच सत्य आहे. हे जगत् उत्पन्न करण्यासाठी लागणारी माया नावाची जी कारण शक्ती आहे, तिचा एवढा मोठा प्रभाव प्रसिद्ध आहे. हे देवी, खरोखर तूच हे सर्व ब्रह्मांड व्यापून राहिली असल्यामुळे, तू सर्व विश्वमय आहेस ह्याबद्दल माझी आता पूर्णपणे खात्री झाली आहे.

हे देवी, तुझ्याच परिणामाच्या रूपाने व प्रेरणेने तूच मूर्त व अमूर्त अशी सर्व भूते निर्माण करतेस आणि सर्व पुरुषांना स्थितीचे वेळी तू ते दाखवीत असतेस. तसेच लोकरंजनासाठी तू षोडष-तत्त्व-रूप धारण करतेस आणि स्वतः तत्त्वरूपही स्वीकारतेस म्हणून खरोखरच आम्हाला तू एखाद्या जादूप्रमाणेच दिसत आहेस.

तुझ्या रूपाशिवाय, हे देवी, वस्तूमात्राचे ठिकाणी दुसरे काही एक आढळत नाही. म्हणजेच आम्ही म्हणतो, तूच हे सर्व जगत् व्यापूनही राहिलेली आहेस. पण हे जननी, ज्ञानी लोक म्हणतात, की कोणत्याही शक्तीशिवाय पुरुष कसलाही व्यवहार करण्यास असमर्थच होत असतो.

हे देवी, खरोखर आमच्या प्रभावाने आणि कृपा दृष्टीने तू ह्या संपूर्ण विश्वाला संतुष्ट करून सोडतेस. तूच आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाचे हे स्वरूप हवे तेव्हा प्रकट करीत असतेस आणि कल्पांत समय प्राप्त झाल्यावर निःशंक मनाने आणि सत्वर गतीने तू या सर्व विश्वाचा संहार करतेस.

म्हणूनच हे भगवती, तुझ्या कार्याचा आणि औदार्याचा अंत कोणालाही लागणे शक्य नाही. हे देवी, महादुष्ट, पराक्रमी मधुकैटभ नावाच्या दैत्यापासून खरोखर तूच आमचे रक्षण केले आहेस. तसेच मनाला विस्मयचकित करून सोडणारे अतिशय विस्तृत आणि मनोहर असे लोक तूच आम्हाला दयाबुद्धीने युक्त होऊन दाखविलेस.

तूच तयार केलेल्या मंदिरामध्ये आम्हाला पराकाष्ठेच्या सुखाच्या कळसावर नेऊन पोहोचविले आहेस यात संशय नाही. हे देवी भवानी, केवळ तुझ्या दर्शनाचे सामर्थ्यही फारच मोठे आहे. हे सामर्थ्यसंपन्न माते, अशी किती ब्रह्मांडे आणि चराचर विश्वांचे समूह तुझ्या चरित्रात उत्पन्न केले आहेस हे मला, शंकराला आणि ब्रह्मदेवालाही विदीत होणे शक्य नाही. जे चरित्र आम्ही जाणू शकत नाही असे तुझे अतर्क्य चरित्र दुसरा कोण बरे जाणण्यास समर्थ आहे ?

हे देवते, ज्याअर्थी आम्ही ह्या ब्रह्मांडात आमच्याच सामर्थ्याप्रमाणे सिद्ध असलेले व अत्यंत प्रसिद्ध असलेले असे दुसरेच ब्रह्मदेव, विष्णू आणि श्री महेश अवलोकन केले, कारण तूच ते आम्हाला दाखविलेस. त्याअर्थी असे हे ब्रह्मा-विष्णू-महेश असलेले, अशी कितीतरी ब्रह्मांडे तू निर्माण केली असावीस असेच आम्हाला सांप्रत वाटत आहे. कारण प्रत्यक्ष आम्ही अनुभवानेच पाहिले आहे.

म्हणून हे भगवती देवी, असा हा सामर्थ्यसंपन्न असलेला तुझा प्रभाव कोण बरे जाणू शकेल ? म्हणून हे देवी, हे तुझे शुभदायी स्वरूप नित्य माझ्या अंतःकरणात वास्तव्य करो; माझ्या मुखरंध्रामध्ये तुझ्याच नावाचा उच्चार व जप सतत घोळत राहो आणि सर्वलक्षणसंपन्न अशा या तुझ्या चरणाचेच नित्य दर्शन आम्हाला घडो."

तुझ्या चरणकमलाजवळही अशीच आमची नम्र विनंती आम्ही प्राणिपात करून करीत आहोत. हे अंबे, आम्ही केलेल्या या याचनेचा तू स्वीकार कर आणि आम्हाला अभय दे.

हे देवी, 'हा आपलाच सेवक आहे, असेच तू माझ्याबद्दल नित्य मनात ठेव.' 'तू माझी स्वामिनी आहेस' असेच तुजबद्दलचे चिंतन मी मनात ठेवीत असतो. हे आर्ये, तुझा नि माझा, माता पुत्राप्रमाणे आलेला संबंधच कायम राहो.' तशी माझी तुला विनंती आहे.

हे देवी, या ब्रह्मांडातील संपूर्ण उलाढाली तू जाणतेस आहेस. या सर्वच पराकाष्ठेचा शेवटही तूच करणारी आहेस. शेवटी सर्वच तुझ्याप्रत प्राप्त होत असते.

म्हणून हे अंबे, मी पामराने यापेक्षा तुला अधिक काय बरे निवेदन करावे. तेव्हा हे भवानी, हे माते तुला जे योग्य वाटेल ते कर. हे देवी लोकांत असे प्रसिद्ध आहे की, ब्रह्मदेव सृष्टीचा उत्पादक असून विष्णू तिचे प्रतिपालन करीत असतो. आणि अखेर योग्य काली उमापती तिचा संहार करतो. पण हे देवी विद्वानांचे हे मत सत्य आहे काय ? तसे त्यांचे हे म्हणणे सत्य नाही. कारण हे अंबे, ते तुझे सामर्थ्य जाणीत नाहीत.

पण हे देवी, खरी स्थिती अशी आहे की, केवळ तुझ्या सामर्थ्याने आणि प्रेरणेने ब्रह्मा, विष्णू, महेश हे उत्पत्ति, स्थिती आणि लय यांचे कारक होतात. केवळ तुझ्यामुळेच ते ही कार्ये करण्यास समर्थ होतात.

हे पार्वती, पृथ्वी हा या जगातील सर्व वस्तु मात्रांचा आधार नसून, तुझीच आधारभूत झालेली शक्ती हे सर्व धारण करीत असते. हे वरदे, सूर्यसुद्धा तुझ्या प्रभेपासून प्रेरणा घेऊन प्रकाश देण्यास युक्त झाला आहे. तेव्हा सर्वांचे निर्गुण स्वरूप तूच असूनही तूच या सर्व जगाच्या स्वरूपात भासमान होत असतेस.

मी, विष्णू व ईश्वरश्रेष्ठ शंकर असे आम्ही तिघेही केवळ तुझ्याच प्रभावामुळे नित्य जन्मास येत असतो. मग असे असताना इंद्र वगैरे इतर देव तरी शाश्वत स्वरूपाचे कसे असणार ? तूच विश्वाची जननी असून नित्य सनातन प्रकृति आहेस. तेव्हा हे देवी, हे भवानी, तू जर सांप्रत या पुराण पुरुषावर दया करणार असशील, तर मी तुझ्या सन्निध उभा असलो, तरी तुझ्या कृपेमुळे माझे स्वरूप जाणण्यास समर्थ होऊ शकेन, नाहीतर मला अहंकार प्राप्त होण्याची शक्यता आहे.

'मी विभू आहे, मीच अनादि असून, मी निरिच्छ आहे. मीच तो ईश असून विश्वात्माही मीच आहे.' असा अहंकार माझ्यात उत्पन्न, होऊन मी नित्य मूढ प्रकृतीच राहील.

हे देवी खरोखरच, विद्यासंपन्न पुरुषाची विद्या तूच आहेस. तसेच बलवान पुरुषाची साक्षात शक्ती तूच आहेस. कीर्ती, कांती, लक्ष्मी व निरलस संतोष ही तुझीच रूपे आहेत असे मला वाटते. मनुष्यलोकांना मुक्ती देणारे ते वैराग्य हे देखील तुझेच स्वरूप आहे. तूच गायत्री असून, वेदांच्या उत्कृष्ट अंशरूपाने तू गायत्रीत स्थित आहेस, स्वधा, भगवती, सगुणा व अर्धमात्रा मात्रा ही तुझीच सर्व रूपे आहेत, हे मला पटले आहे. केवळ सर्व देवांच्या पूर्वजांचे रक्षण व्हावे, म्हणून तूच वेदरूप शास्त्रे निर्माण करून ठेवली आहेस.

उदकाने परिपूर्ण भरलेल्या तुडुंब समुद्राच्या विशाल लाटांप्रमाणे, खरोखरच उत्पत्ति व विनाश या विरहित निष्पाप ब्रह्माचे जे अंश जीवत्व पावत असतात, ते नित्य मुक्त व्हावेत, या सद्‌भावनेने तू हे विश्व पुनः पुनः उत्पन्न करीत असतेस हे निर्विवाद आहे.

अत्यंत चमत्कृतिपूर्ण असे असत्य कार्य झाल्यावर नटाने रचलेले नाटक ज्याप्रमाणे थांबते त्याप्रमाणे प्रत्येक जीव जेव्हा सर्व तुझेच कर्तृत्व आहे असे जाणून तुला ओळखतो आणि या संपूर्ण जगताचा संहार करण्यास तूच सर्वस्व कारण आहेस हे तो जाणतो, अशाप्रकारे तुझे सामर्थ्य त्याला उमजते तेव्हा त्या जीवाच्या रूपाने वास्तव्य करीत असलेली तू आपल्या कृत्यापासून तुझ्यातच विराम पावत असतेस.

म्हणून हे देवी, या मोहरूपी महासागरात अडकलेल्या मला तूच तारणार आहेस. तेव्हा हे अंबिके, याचसाठी मी तुलाच सांप्रत शरण येत आहे. म्हणून हे सकल-दुःख-नाशिनी रागादि विकारांमुळे जो काल उत्पन्न झाला आहे तो अत्यंत दुःख देणारा काल व अत्यंत व्यर्थ असूनही प्राप्त झाली असताही अखेर शेवटी माझे रक्षण तूच नित्य करीत राहा.

हे महाविद्ये देवी, तुला माझा विनम्र नमस्कार असो. हे सर्व मनःकामना परिपूर्ण करणारे देवी, हे कल्याणी, तूच मला नित्य ज्ञानरूपाचा प्रकाश दाखव."





अध्याय चवथा समाप्त

GO TOP