श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


विमानस्थैर्हरादिभिर्देवीदर्शनम्

ब्रह्मोवाच
विमानं तन्मनोवेगं यत्र स्थानान्तरे गतम् ।
न जलं तत्र पश्यामो विस्मिताः स्मो वयं तदा ॥ १ ॥
वृक्षाः सर्वफला रम्याः कोकिलारावमण्डिताः ।
मही महीधराः कामं वनान्युपवनानि च ॥ २ ॥
नार्यश्च पुरुषाश्चैव पशवश्च सरिद्वराः ।
वाप्यः कूपास्तडागाश्च पल्वलानि च निर्झराः ॥ ३ ॥
पुरतो नगरं रम्यं दिव्यप्राकारमण्डितम् ।
यज्ञशालासमायुक्तं नानाहर्म्यविराजितम् ॥ ४ ॥
प्रत्यभिज्ञा तदा जाताप्यस्माकं प्रेक्ष्य तत्पुरम् ।
स्वर्गोऽयमिति केनासौ निर्मितोस्ति तदाद्‌भुतम् ॥ ५ ॥
राजानं देवसङ्काशं व्रजन्तं मृगयां वने ।
अस्माभिः संस्थिता दृष्टा विमानोपरि चाम्बिका ॥ ६ ॥
क्षणाच्चचाल गगने विमानं पवनेरितम् ।
मुहूर्ताद्वा ततः प्राप्तं देशे चान्ये मनोहरे ॥ ७ ॥
नन्दनं च वनं तत्र दृष्टमस्माभिरुत्तमम् ।
पारिजाततरुच्छायासंश्रिता सुरभिः स्थिता ॥ ८ ॥
चतुर्दन्तो गजस्तस्याः समीपे समवस्थितः ।
अप्सरसां तत्र वृन्दानि मेनकाप्रभृतीनि च ॥ ९ ॥
क्रीडन्ति विविधैर्भावैर्गाननृत्यसमन्वितैः ।
गन्धर्वाः शतशस्तत्र यक्षा विद्याधरास्तथा ॥ १० ॥
मन्दारवाटिकामध्ये गायन्ति च रमन्ति च
दृष्टः शतक्रतुस्तत्र पौलोम्या सहितः प्रभुः ॥ ११ ॥
वयं तु विस्मिताश्चास्म दृष्ट्वा त्रैविष्टपं तदा ।
यादःपतिं कुबेरं च यमं सूर्यं विभावसुम् ॥ १२ ॥
विलोक्य विस्मिताश्चास्म वयं तत्र सुरान्स्थितान् ।
तदा विनिर्गतो राजा पुरात्तस्मात्सुमण्डितात् ॥ १३ ॥
देवराज इवाक्षोभ्यो नरवाह्यावनौ स्थितः ।
विमानस्था वयं तच्च चचाल तरसागतम् ॥ १४ ॥
ब्रह्मलोकं तदा दिव्यं सर्वदेवनमस्कृतम् ।
तत्र ब्रह्माणमालोक्य विस्मितौ हरकेशवौ ॥ १५ ॥
सभायां तत्र वेदाश्च सर्वे साङ्गाः स्वरूपिणः ।
सागराः सरितश्चैव पर्वताः पन्नगोरगाः ॥ १६ ॥
मामूचतुश्चतुर्वक्त्रः कोऽयं ब्रह्मा सनातनः ।
ताववोचमहं नैव जाने सृष्टिपतिं पतिम् ॥ १७ ॥
कोऽहं कोऽयं किमर्थं वा भ्रमोऽयं मम चेश्वरौ ।
क्षणादथ विमानं तच्चचालाशु मनोजवम् ॥ १८ ॥
कैलासशिखरे प्राप्तं रम्ये यक्षगणान्विते ।
मन्दारवाटिकारम्ये कीरकोकिलकूजिते ॥ १९ ॥
वीणामुरजवाद्यैश्च नादिते सुखदे शिवे ।
यदा प्राप्तं विमानं तत्तदैव सदनाच्छुभात् ॥ २० ॥
निर्गतो भगवाञ्छम्भुर्वृषारूढस्त्रिलोचनः ।
पञ्चाननो दशभुजः कृतसोमार्धशेखरः ॥ २१ ॥
व्याघ्रचर्मपरीधानो गजचर्मोत्तरीयकः ।
पार्ष्णिरक्षौ महावीरौ गजाननषडाननौ ॥ २२ ॥
शिवेन सह पुत्रौ द्वौ व्रजमानौ विरेजतुः ।
नन्दिप्रभृतयः सर्वे गणपाश्च वराश्च ते ॥ २३ ॥
जयशब्दं प्रयुञ्जाना व्रजन्ति शिवपृष्ठगाः ।
तं वीक्ष्य शङ्करं चान्यं विस्मितास्तत्र नारद ॥ २४ ॥
मातृभिः संशयाविष्टस्तत्राहं न्यवसं मुने ।
क्षणात्तस्माद्‌गिरेः शृङ्गाद्विमानं वातरंहसा ॥ २५ ॥
वैकुण्ठसदनं प्राप्तं रमारमणमन्दिरम् ।
असम्भाव्या विभूतिश्च तत्र दृष्टा मया सुत ॥ २६ ॥
विसिष्मिये तदा विष्णुर्दृष्ट्वा तत्पुरमुत्तमम् ।
सदनाग्रे ययौ तावद्धरिः कमललोचनः ॥ २७ ॥
अतसीकुसुमाभासः पीतवासाश्चतुर्भुजः ।
द्विजराजाधिरूढश्च दिव्याभरणभूषितः ॥ २८ ॥
वीज्यमानस्तदा लक्ष्म्या कामिन्या चामरैः शुभैः ।
तं वीक्ष्य विस्मिताः सर्वे वयं विष्णुं सनातनम् ॥ २९ ॥
परस्परं निरीक्षन्तः स्थितास्तस्मिन् वरासने ।
ततश्चचाल तरसा विमानं वातरंहसा ॥ ३० ॥
सुधासमुद्रः सम्प्राप्तौ मिष्टवारिमहोर्मिमान् ।
यादोगणसमाकीर्णश्चलद्वीचिविराजितः ॥ ३१ ॥
मन्दारपारिजाताद्यैः पादपैरतिशोभितः ।
नानास्तरणसंयुक्तो नानाचित्रविचित्रितः ॥ ३२ ॥
मुक्तादामपरिक्लिष्टो नानादामविराजितः ।
अशोकबकुलाख्यैश्च वृक्षैः कुरुबकादिभिः ॥ ३३ ॥
संवृतः सर्वतः सौ‌म्यैः केतकीचम्पकैर्वृतः ।
कोकिलारावसङ्घुष्टो दिव्यगन्धसमन्वितः ॥ ३४ ॥
द्विरेफातिरणत्कारैरञ्जितः परमाद्‌भुतः ।
तस्मिन्द्वीपे शिवाकारः पर्यङ्कः सुमनोहरः ॥ ३५ ॥
रत्‍नालिखचितोऽत्यर्थं नानारत्‍नविराजितः ।
दृष्टोऽस्माभिर्विमानस्थैर्दूरतः परिमण्डितः ॥ ३६ ॥
नानास्तरणसंछन्न इन्द्रचापसमन्वितः ।
पर्यङ्कप्रवरे तस्मिन्नुपविष्टा वराङ्गना ॥ ३७ ॥
रक्तमाल्याम्बरधरा रक्तगन्धानुलेपना ।
सुरक्तनयना कान्ता विद्युत्कोटिसमप्रभा ॥ ३८ ॥
सुचारुवदना रक्तदन्तच्छदविराजिता ।
रमाकोट्यधिका कान्त्या सूर्यबिम्बनिभाखिला ॥ ३९ ॥
वरपाशाङ्कुशाभीष्टधरा श्रीभुवनेश्वरी ।
अदृष्टपूर्वा दृष्टा सा सुन्दरी स्मितभूषणा ॥ ४० ॥
ह्रीङ्कारजपनिष्ठैस्तु पक्षिवृन्दैर्निषेविता ।
अरुणा करुणामूर्तिः कुमारी नवयौवना ॥ ४१ ॥
सर्वशृङ्गारवेषाढ्या मन्दस्मितमुखाम्बुजा ।
उद्यत्पीनकुचद्वन्द्वनिर्जिताम्भोजकुड्‌मला ॥ ४२ ॥
नानामणिगणाकीर्णभूषणैरुपशोभिता ।
कनकाङ्गदकेयूरकिरीटपरिशोभिता ॥ ४३ ॥
कनकच्छ्रीचक्रताटङ्कविटङ्कवदनाम्बुजा ।
हृल्लेखा भुवनेशीति नामजापपरायणैः ॥ ४४ ॥
सखीवृन्दैः स्तुता नित्यं भुवनेशी महेश्वरी ।
हृल्लेखाद्याभिरमरकन्याभिः परिवेष्टिता ॥ ४५ ॥
अनङ्गकुसुमाद्याभिर्देवीभिः परिवेष्टिता ।
देवी षट्‌कोणमध्यस्था यन्त्रराजोपरि स्थिता ॥ ४६ ॥
दृष्ट्वा तां विस्मिताः सर्वे वयं तत्र स्थिताऽभवन् ।
केयं कान्ता च किं नाम न जानीमोऽत्र संस्थिताः ॥ ४७ ॥
सहस्रनयना रामा सहस्रकरसंयुता ।
सहस्रवदना रम्या भाति दूरादसंशयम् ॥ ४८ ॥
नाप्सरा नापि गन्धर्वी नेयं देवाङ्गना किल ।
इति संशयमापन्नास्तत्र नारद संस्थिताः ॥ ४९ ॥
तदाऽसौ भगवान्विष्णुर्दृष्ट्वा तां चारुहासिनीम् ।
उवाचाम्बां स्वविज्ञानात्कृत्वा मनसि निश्चयम् ॥ ५० ॥
एषा भगवती देवी सर्वेषां कारणं हि नः ।
महाविद्या महामाया पूर्णा प्रकृतिरव्यया ॥ ५१ ॥
दुर्ज्ञेयाऽल्पधियां देवी योगगम्या दुराशया ।
इच्छा परात्मनः कामं नित्यानित्यस्वरूपिणी ॥ ५२ ॥
दुराराध्याऽल्पभाग्यैश्च देवी विश्वेश्वरी शिवा ।
वेदगर्भा विशालाक्षी सर्वेषामादिरीश्वरी ॥ ५३ ॥
एषा संहृत्य सकलं विश्वं क्रीडति संक्षये ।
लिङ्गानि सर्वजीवानां स्वशरीरे निवेश्य च ॥ ५४ ॥
सर्वबीजमयी ह्येषा राजते साम्प्रतं सुरौ ।
विभूतयः स्थिताः पार्श्वे पश्यतां कोटिशः क्रमात् ॥ ५५ ॥
दिव्याभरणभूषाढ्या दिव्यगन्धानुलेपनाः ।
परिचर्यापराः सर्वाः पश्यतां ब्रह्मशङ्करौ ॥ ५६ ॥
धन्या वयं महाभागाः कृतकृत्याः स्म साम्प्रतम् ।
यदत्र दर्शनं प्राप्तं भगवत्याः स्वयं त्विदम् ॥ ५७ ॥
तपस्तप्तं पुरा यत्‍नात्तस्येदं फलमुत्तमम् ।
अन्यथा दर्शनं कुत्र भवेदस्माकमादरात् ॥ ५८ ॥
पश्यन्ति पुण्यपुञ्जा ये ये वदान्यास्तपस्विनः ।
रागिणो नैव पश्यन्ति देवीं भगवतीं शिवाम् ॥ ५९ ॥
मूलप्रकृतिरेवैषा सदा पुरुषसङ्गता ।
ब्रह्माण्डं दर्शयत्येषा कृत्वा वै परमात्मने ॥ ६० ॥
द्रष्टाऽसौ दृश्यमखिलं ब्रह्माण्डं देवताः सुरौ ।
तस्यैषा कारणं सर्वा माया सर्वेश्वरी शिवा ॥ ६१ ॥
क्वाहं वा क्व सुराः सर्वे रम्भाद्याः सुरयोषितः ।
लक्षांशेन तुलामस्या न भवामः कथञ्चन ॥ ६२ ॥
सैषा वराङ्गना नाम या वै दृष्टा महार्णवे ।
बालभावे महादेवी दोलयन्तीव मां मुदा ॥ ६३ ॥
शयनं वटपत्रे च पर्यङ्के सुस्थिरे दृढे ।
पादाङ्गुष्ठं करे कृत्वा निवेश्य मुखपङ्कजे ॥ ६४ ॥
लेलिहन्तञ्च क्रीडन्तमनेकैबालचेष्टितैः ।
रममाणं कोमलाङ्गं वटपत्रपुटे स्थितम् ॥ ६५ ॥
गायन्ती दोलयन्ती च बालभावान्मयि स्थिते ।
सेयं सुनिश्चितं ज्ञातं जातं मे दर्शनादिव ॥ ६६ ॥
कामं नो जननी सैषा शृणु तं प्रवदाम्यहम् ।
अनुभूतं मया पूर्वं प्रत्यभिज्ञा समुत्थिता ॥ ६७ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे विमानस्थैर्हरादिभिर्देवीदर्शनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


'भगवती देवीच सर्वांची जननी आहे,' याचे विष्णूस स्मरण

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव नारदाला पुढे सांगू लागले. ते म्हणाले, "देवीच्या आज्ञेने आम्ही विमानात बसल्यावर मनाच्या वेगाप्रमाणे वेग असलेले ते अद्वितीय विमान तेथून निघाले व दुसर्‍या ठिकाणी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी आम्हाला विस्तृत असे जल कुठेच दिसले नाही. त्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो. तेथे अनेक सुंदर वृक्ष होते. ते वन कोकिल पक्षांच्या आलापांनी नादमय झाले होते. सर्व वृक्ष उत्तम फळाफुलांनी लगडून आणि मोहरून गेले होते. तेथे पृथ्वी होती, तीवर हवे तेवढे पर्वत, पुष्कळ वने, विपुल उपवने, यांनी भूषित होते. तेथे स्त्रिया, पुरुष, पशू, मोठमोठ्या दिव्य नद्या, मोठमोठ्या विहिरी, कूप, विस्तृत तडाग, सुंदर तळी व उत्तम, मनोहर प्रवाह होते. तसेच अत्यंत दिव्य प्रासादांनी विभूषित असे निरनिराळ्या प्रकारच्या सुंदर गृहांनी सुशोभित असलेले आणि यज्ञशलाकांनी युक्त असे एक नयनमनोहर नगर होते. त्या नगरातील एक देवतुल्य राजा, रुबाबदार पण मृगयेस जात असलेला, अवलोकन करून 'हा स्वर्गच आहे' अशी आमच्या तिघांच्याही मनात प्रेरणा झाली."

त्याचवेळी आम्ही संशयात पुनः गुरफटलो. हा स्वर्ग असेल तर तो कोणी निर्माण केला ? असा प्रश्न आमच्या मनात उत्पन्न झाला आणि आम्ही विस्मित झालो. तेथे पोहोचल्यावरही विमानाच्याही वर आकाशात स्थिर असलेली देवी अंबिका आमच्या दृष्टीस पडली. पण इतक्यात आकाशात जोराने वायू वाहू लागल्यामुळे ते विमान वेगाने पुढेच जाऊ लागले. नंतर थोडा वेळ असेच पुढे गेल्यावर एका मुहूर्ताने ते दुसर्‍या सुंदर प्रदेशात येऊन पोहोचल्याचे आम्हाला आढळले.

त्या ठिकाणचे ते उत्तम सुंदर नंदनवन पाहून आम्ही मोहीत झालो. तेथे पारिजात वृक्षाच्या छायेत असलेली कामधेनु सुरभि उभी असलेली आम्ही पाहिली. तिच्या जवळच एक रुबाबदार चतुर्दंत गज उभा होता. तेथेच मेनका वगैरे अनेक सुंदर अप्सरांचे समुदाय नृत्यगायनात मग्न झाले होते व निरनिराळ्या प्रकारचे हावभाव करीत त्या ठिकाणी क्रीडा करीत होते. तेथे शेकडो गंधर्व, यक्ष आणि विद्याधर मंदारवाटिकेत सुमधुर गायन व वादन करीत क्रीडारत झालेले होते. तोच तेथे इंद्राणीसह उपस्थित असलेला सुरराज्य इंद्र आम्हाला दिसला.

अशा प्रकारचा हा स्वर्ग पाहताच आमच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. वरुण, कुबेर, यम, सूर्य, अग्नी हे सर्वच देव तेथे वास्तव्य करीत असलेले पाहून आम्ही फारच मंत्रमुग्ध झालो. अशा प्रकारे आम्ही ह्या सर्व शृंगारलेल्या नगरातून पहात असता, एक देवराजाप्रमाणे भासणारा अजिंक्या राजा, सुशोभित केलेल्या पालखीत बसून बाहेर आला. पालखी भोई लोकांनी उचलली होती. तेच खांद्यावरून पालखी वाहून नेत होते. त्यावेळी हे सर्व दृश्य आम्ही विमानात बसून पाहात होतो. इतक्यात ते विमान वेगाने पुढे जाऊन लागले आणि सर्व देवांनाही अत्यंत पूज्य अशा त्या ब्रह्मलोकाप्रत येऊन पोहोचले. पण त्या ठिकाणीही ब्रह्मदेवाला तेथे असल्याचे पाहून विष्णू व शंकर यांना फारच आश्चर्य वाटले.

तेथील ब्रह्मसभेत सर्व संपन्न असे, सांग व मूर्तिमंत असलेले वेद अवलोकन करून आम्ही चकित झालो. सागर, नद्या, पर्वत, पन्नग, उरग ह्यांनी तो लोक संपन्न होता. नंतर हरि व हर मला म्हणाले, "हे ब्रह्मदेवा, हा सनातन ब्रह्मदेव कोण आहे ?"

मी म्हणालो, "हे प्रभो, खरोखरच सर्व सृष्टीचा अधिपति असलेला हा प्रभू कोण आहे ? हे मला अजूनही माहीत नाही. मी कोण ? हा कोण ? आणि आम्ही कसे आणि कशासाठी उत्पन्न झालो ? या सर्व प्रश्नांमुळे हे ईश्वरांनो, मला फारच मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे."

अशा प्रकारे आम्ही बोलत होतो. इतक्यात मनाप्रमाणे वेग असलेले ते विमान पुनः वेगाने पुढे जाऊ लागले आणि द्रुतगतीने ते कैलास शिखरावर सत्वर प्राप्त झाले. तो कैलास यक्षगणांनी युक्त होता. त्याचा संपूर्ण परिसर अत्यंत सौंदर्य संपन्न होता. मंदार वाटिकांनी तो भूभाग युक्त असून अत्यंत रमणीय होता. शुक व कोकिल पक्षांचे तेथे अखंड कूजन चालू होते. वीणा व मूरज या वाद्यांच्या नादाने तेथील वातावरण मुग्ध झाले होते. त्या सुखद आणि कल्याणकारक कैलासावर आमचे विमान प्राप्त होताच, आणखी एक चमत्कार आमच्या दृष्टीस पडला. कैलासावरील आपल्या शुभ निवासस्थानापासून त्रिलोचन, पंचानन, दशभुज आणि अर्धचंद्ररूपी शिरोभूषणांनी युक्त असा, भगवान शंकर सुंदर वृषभावर आरूढ होऊन, त्वरेने बाहेर पडला. त्याने व्याघ्रचर्म परिधान केले होते आणि गजचर्म त्याने पांघरले होते. त्याचे पृष्ठरक्षक म्हणून त्या भगवान शिवासह जात असलेले ते दोन महावीरपुत्र गजानन व षडानन, स्वतेजाने झळकत होते आणि नंदी वगैरे सर्व गण शिवाचा जयजयकार करीत शिवाच्या मागून चाललेले होते.

तेव्हा हे नारदा, आपणांसहवर्तमान तो प्रत्यक्ष दुसरा शंकर अवलोकन केल्यावर मात्र आमचे आश्चर्यात अधिकच भर पडली. आम्ही पूर्णपणे गोंधळून गेलो.

हे नारदमुनी, मी तर संशयाने पूर्णपणे पीडित झालो. माझे विचारचक्र सुरू होते न होते तोच क्षणातच ते विमान वायू वेगाने कैलासाच्या पर्वतशिखरावरून सत्वर निघाले. ते थेट वैकुंठावर येऊन पोहोचले. तेथेच त्या रमापती विष्णूचे अत्यंत सुंदर मंदिर आहे.

हे पुत्रा, त्या ठिकाणी आल्यावर विष्णूची असंभाव्य विभूती मी स्वनेत्रांनी पाहिली आणि मी अत्यंत विस्मयाच्या पलीकडे गेलो. इतक्यात अतसी पुष्पांप्रमाणे ज्याची शरीर कांति आहे, ज्याने पीत वस्त्र परिधान केले आहे, तो चतुर्भुज आणि कमलाप्रमाणे मनोहर, नेता असलेला तो दुसरा भगवान विष्णू त्या मंदिरापुढे प्राप्त झाला. तो पक्षीराज गरुडावर आरुढ झाला होता. अनेक दिव्य आभरणांनी तो सुशोभित दिसत होता. त्याची दिव्य भूषणे चमकत होती आणि कोमलांगी कामिनी लक्ष्मी शुभ चामरांनी त्याला वारा घालीत होती. अशा प्रकारे त्या दुसर्‍या सनातन विष्णूला पाहिल्यावर, आम्ही तिघेही अत्यंत आश्चर्ययुक्त नेत्रांनी त्या श्रेष्ठ विमानात बसूनच एकमेकांकडे पाहातच राहिलो. हा चमत्कार आमच्या कल्पनेपलीकडचा होता. हे कसे उत्पन्न झाले ? हा एकच प्रश्न आमच्या समोर होता.

अशा प्रकारे आम्ही आश्चर्याने भारावून गेलो असताना विमान पुन्हा वेगाने गमन करू लागले. लवकरच ते मधुर असे उदक आणि पर्वतप्राय लाट यांनी युक्त असलेल्या सागराजवळ आले. तो अमृत सागर होता. विविध प्रकारच्या जलचर प्राण्यांनी तो व्याप्त झाला होता. उसळणार्‍या प्रचंड लाटांमुळे तो चमचम करीत होता.

मंदार, पारिजात इत्यादी मनोहर वृक्षांनी युक्त असलेल्या त्या मणिद्वीपाला अत्यंत शोभा प्राप्त झाली होती. नाना प्रकारच्या आस्तरणांनी ते द्वीप विलोभनीय दिसत होते. अनेकविध चित्रांनी ते शृंगारलेले होते. द्वीपाच्या चोहोबाजूंनी मोत्यांचे सर गुंफले होते. असेच नाना प्रकारच्या सुंदर माळांनी त्याला एक अवर्णनीय शोभा प्राप्त झाली होती. अशोक, बकुल, केतकी, चंपक, कुरुबक, इत्यादी सौम्य वृक्षांमुळे ते सर्वबाजूंनी आच्छादित होऊन गेले होते. कोकिळ पक्षांच्या मधुर आवाजाने ते संपूर्ण द्विप जणू नादमय झाले होते. ते दिव्य गंधांनी युक्त होते. ते अत्यंत अद्‌भूत असे मणिद्विप भ्रमरांच्या गोड गुंजारवामुळे अधिकच आकर्षक भासत होते. त्या द्वीपामध्ये अल्प, अत्यद्‌भूत आकृति असलेला एक सुमंगल असा नयनमनोहर व आल्हाददायक मंचक होता. अनेक अमूल्य रत्‍नांनी तो जडवलेला होता. नाना प्रकारच्या रत्‍नमण्यांनी तो अत्यंत तेजाने झळकत होता. आम्ही विमानात बसल्याबसल्याच तो शृंगारलेला सर्वोत्कृष्ट रंगमंच दुरूनच अवलोकन केला. किती तरी विविध नमुन्याच्या आस्तरणांनी तो मंचक विभूषित केला होता. अशा त्या मंचकाला इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे अनेक वर्णांची रत्‍ने मढवली होती, आणि त्या अद्‌भूत मंचकावर एक अत्यंत सुंदर व श्रेष्ठ स्त्री विराजमान झाली होती.

तिची वस्त्रे, गंध अनुलेपन व पुष्पे ही सर्व आरक्त वर्णाची होती. त्या नेत्राल्हादक स्त्रीचे सुंदर नयनही उत्तम अशा आरक्त वर्णांचे होते. तिच्या अगकांतीची प्रभा कोट्यवधी

विद्युल्लता एकाच वेळी तळपाव्यात अशी दिव्य होती. तिचे मुख अत्यंत सुखावह आणि मनोहर होते. चेहर्‍यावर आरक्त वर्णाचे ओष्ठद्वय शोभून दिसत होते, आणि त्यामुळे ती सुंदरी स्वतेजाने झळकत होती.

लक्ष्मीपेक्षाही कोटी पटीने तिची कांती अधिक सतेज होती. ती सूर्याच्या बिंबाप्रमाणे त्या ठिकाणी तळपत होती. त्या सर्वेश्वरीच्या हस्तकमलावरील वरदमुद्रा, पाश, अंकुश व मनोरथपूरक मुद्रा ह्या उठावदारपणे दिसत होत्या. अशी चिन्हांनी तिचे शुभ हस्त युक्त होते.

खरोखर, हास्य हेच तिचे भूषण होते. अशी ती सुतनु आम्ही पूर्वी कधीही व कोठेही पाहिलेली नव्हती. तेथे र्‍हींकाराचा जप करण्याविषयी पक्षीगण तत्पर राहून, योग्यप्रकारे तिच्या सेवेत व्यग्र झालेले होते. ती नवयौवना व कुमारी असून तिचा वर्ण अरुणाप्रमाणे आल्हाददायक होता आणि जणू काय कृपेची, दयेची एकमेव मूर्तीच असावी असे भाव तिच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

तिने परिपूर्ण शृंगारवेष धारण केला होता. तिच्या चेहर्‍यावर मधुर व मंद हास्य झळकत होते. तिच्या देहावर नाना तर्‍हेच्या रत्‍नांनी मढविलेले विविध प्रकारचे अलंकार ठायी ठायी शोभून दिसत होते. सुवर्णाच्या वाकी, बाजूबंद आणि रत्‍नजडित मुकूट ह्यांनी तिच्या सौंदर्यात अवर्णनीय भर पडली होती. तिच्या कानातील रत्‍नकुंडले फारच दैदीप्यमान असल्याने त्यांच्या नाजूक प्रकाशात तिचे मुखकमल अत्यंत मनोहर दिसत होते.

र्‍हल्लेखा व भुवेनशी या नावांनी तिच्या भोवतालच्या अनेक सख्यांचा परिवार अखंड जप करीत होता. त्या सर्व सख्या त्या जपाच्या योगाने महादेवी महेश्वरीचे स्तवन करीत होत्या. र्‍हल्लेखासारख्या कित्येक देवकन्या तिच्या आजूबाजूला नम्रतेने सेवा तत्पर उभ्या होत्या. अनंगकुसूमा वगैरे आणखीही मनोहर देवता तिच्या सर्व बाजूंना बसल्या होत्या. त्यांनी जणू त्या देवीला वेढून टाकले होते. सर्वात श्रेष्ठ असलेल्या षट्‌कोणाचे यंत्रावरील मध्यभागी ती देवी महेश्वरी स्थित झाली होती.

अशा प्रकारे सर्व लक्षणांनी युक्त असलेल्या त्या देवीला आम्ही तिघांनीही सूक्ष्म रीतीने अवलोकन केले. त्या अद्‌भूत विमानातील आपापल्या जागेवर बसून आम्ही विस्मयभरित नेत्रांनी ते दृश्य पाहात होतो. आमच्या तिघांच्याही मनात सारखाच संदेह निर्माण झाला.

"खरोखरच ही सर्वांगसुंदर देवी कोण ? हिचे नाव काय असावे बरे ! येथे ही कशा प्रकारे उत्पन्न झाली आहे ? या देवीचे या सुंदर ठिकाणी कसे वास्तव्य निर्माण झाले.

यापैकी आम्हाला खरोखरच काहीही माहीत नव्हते. आम्ही दुरूनच तिच्याकडे पाहात होतो. तिला हजारो मस्तके, हजारो हात, हजारो नेत्र आहेत हे आम्हाला लांबूनही दिसत होते. तिची हजारो मुखेही आम्हाला निःसंशय स्पष्टपणे दिसत होती आणि तसेच ती अप्सरा, गंधर्व स्त्री अथवा देवकन्या किंवा देवांगना यांपैकी कोणीही नव्हती याबद्दल आमचा विश्वास होता. खात्री होती की यापैकी ती सुंदरी कोणीही नव्हे. मग ही कोण असावी ? अशा प्रकारे विमानात बसलेले आम्ही पूर्णपणे संभ्रमात गुरफटलो होतो. पण आम्हाला काही उत्तर सापडेना.

पण त्याचवेळी सर्वेश्वर भगवान विष्णू मनोहर हास्य करणार्‍या महादेवी अंबेला पाहून निश्चयाने काहीतरी आठवल्यासारखे करून म्हणाला, "ही भगवती देवीच सर्वांची कर्ती आहे. तीच आमचीही उत्पत्ति कर्ती आहे. आम्हा सर्वांचे कारण असलेली, ती हीच महाविद्या, महामाया, हीच संपूर्णा असून अवयव व प्रकृति हीच आहे. पण अल्पबुद्धी लोकांना हिचे सामर्थ्य व ज्ञान असणे अत्यंत दुर्घट आहे."

ही या सर्वांची का उत्पत्ति करते ? याबद्दलचा तिचा उद्देश कोणालाही समजणे शक्य नाही. नित्य व अनित्य स्वरूपाची ही देवी युक्त आहे आणि हीच त्या परमात्म्याची खरोखरच इच्छाशक्ति आहे. ह्या विश्वेश्वरीचे, ह्या देवी कल्याणीचे पूजन, स्तवन, संकीर्तन भाग्यहीन लोकांच्या हातून कधीही होणार नाही. कारण ही विशाल नेत्रा, सुनयना हीच स्वतः वेदजननी आहे आणि सर्वांची आदि माता आहे.

प्रलयकाल प्राप्त होताच सर्वांची लिंगशरीरे तसेच सर्व सृष्टीजात ही आपल्या शरीरात विलीन करून टाकते आणि या संपूर्ण विश्वाचा लय करते. अशा प्रकारे उत्पत्ति, पालन आणि संहार यांनी ती यथेच्छ क्रीडा करीत असते.

हे देवांनो, ही सर्वस्वाचे बीज असून सांप्रत आपल्यापुढे तीच झळकत आहे. ती पहा, तिच्या कोट्यवधी विभूती क्रमाक्रमाने योजनेनुसार आजूबाजूला उभ्या आहेत. त्या सर्वच विभूतीही दिव्यवस्त्रे व उत्कृष्ट आभारणे यांनी नित्य युक्त आहेत. त्या सर्व गुणसंपन्न असून, दिव्य गंध, आणि दिव्य अनुलेपन ह्यांनीही युक्त आहेत.

हे ब्रह्मा, हे शंकरा, ह्या सर्व विभूती पहा बरे, तिच्या सेवेत अत्यंत तत्पर आहेत. तिची शुश्रुषा करण्यात सर्वजणी मग्न झाल्या आहेत. खरोखरच आपण तिघांनाही अत्यंत दुर्लभ असे त्या देवी भगवतीचे अतिशय शुभ असलेले सुंदर दर्शन सांप्रत घडलेले आहे.

तिच्या या मंगल दर्शनामुळे आज आपण फारच भाग्यवान ठरलो आहोत. आज आपण कृतार्थ झालो आहोत. आपण पूर्वी कधी काळी जी तपे अथवा यज्ञ केले असतील त्याचे पुण्य म्हणून देवीच्या कृपेने फलरूपी शुभ दर्शन आपणाला झालेले आहे. अन्यथा इतक्या आदरपूर्वक, हे दर्शन आम्हाला कसे बरे घडले असते !

जे उदार असतात, जे उत्कृष्ट तपाने पुनीत झालेले असतात आणि ज्यांच्याजवळ पुण्यराशींचा अमोल ठेवा असतो अशा शुभ पुरुषांनाच ह्या कल्याणरूप महादेवी भगवती, ही महेश्वरी, हिचे दर्शन होत असेल. नित्य संसाराच्या सुखोपभोगात गुंतून आसक्त बनलेल्या पुरुषांना हिचे दर्शन कदापीही होणे शक्य नाही.

खरोखर पुरुषांची संयुक्त असलेली नित्याची मूल प्रकृती ही देवी स्वतःच आहे. हीच हे संपूर्ण विश्वब्रह्मांड निर्माण करीत असते व असे हे उत्पन्न केलेले विस्तृत ब्रह्मांड ती परमात्म्याला दाखवते.

हे देवयांनी, हाच परमात्मा द्रष्टा असून हे संपूर्ण ब्रह्मांड, ह्या देवता, हे सर्व दृश्य आहे आणि सर्वस्वरूप असलेली, सर्वेश्वरी, कल्याणी व माया अशी हीच देवी भगवती या ब्रह्मांड विश्वाचे उत्पत्तिचे कारण आहे. तिच्या या प्रभावापुढे, मी, सर्व देव आणि लक्ष्मी वगैरे सर्व देवांगना कुणीकडे ? काहीही केले तरी तिच्या लक्षांशाची आम्हाला सर येणार नाही. हिच्याशी तुलना करता आम्ही कस्पटासारखे आहोत.

मी प्रथम बाल्यावस्थेत होतो. त्यावेळी हीच देवी मला आनंदी मनाने सुंदर सुंदर झोके देत होती. हीच ती महाश्रेष्ठ देवी प्रथम त्या महासागरामध्ये माझ्या दृष्टीस पडली होती. त्या वेळी मी एका वटपत्रावर पायाचा अंगठा हाताने तोंडात धरून निश्चल, स्थितीत पहुडलो होतो. अशा प्रकारे माझ्या बालपणच्या क्रीडा चालू असताना हीच ती शुभ देवी मला गाणी म्हणून झोके देऊन हलवीत होती. हिच्या आताच्या दर्शनावरून मला आता निःसंशय रीतीने हिची पूर्वीची ओळख पटत आहे.

तेव्हा हे ब्रह्मा - शंकरहो, हीच ती देवी आपणा सर्वांची जननी आहे याबद्दल मी अगदी निश्चयाने सांगतो, मी जे म्हणत आहे, यावर तुम्ही दृढ विश्वास धरा. कारण मी पूर्वी हिच्या सहवासाचा अनुभव घेतला असून सांप्रत मला आता त्या सर्व आठवणी स्मरत आहेत. म्हणून हीच आपली जननी आहे.





अध्याय तिसरा समाप्त

GO TOP