ब्रह्मोवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्याः पेशलं सुखदं मृदु ॥ ३४ ॥
अब्रूम तामशक्तिः स्मः कथं कुर्मस्त्विमाः प्रजाः ।
न मही वितता मातः सर्वत्र विततं जलम् ॥ ३५ ॥
न भूतानि गुणाश्चापि तन्मात्राणीन्द्रियाणि च ।
तदाकर्ण्य वचोऽस्माकं शिवा जाता स्मितानना ॥ ३६ ॥
झटित्येवागतं तत्र विमानं गगनाच्छुभम् ।
सोवाचास्मिन्सुराः कामं विशध्वं गतसाध्वसाः ॥ ३७ ॥
विमाने ब्रह्मविष्ण्वीशा दर्शयाम्यद्य चाद्भुतम् ।
तन्निशम्य वचस्तस्या ओमित्युक्त्वा पुनर्वयम् ॥ ३८ ॥
समारुह्योपविष्टाः स्मो विमाने रत्नमण्डिते ।
मुक्तादामसुसंवीते किङ्किणीजालशब्दिते ॥ ३९ ॥
सुरसद्मनिभे रम्ये त्रयस्तत्राविशङ्किताः ।
सोपविष्टांस्ततो दृष्ट्वा देव्यस्मान्विजितेन्द्रियान् ॥ ४० ॥
स्वशक्त्या तद्विमानं वै नोदयामास चाम्बरे ॥ ४१ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे ब्रह्मादीनाङ्गतिवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देवी विमानातून घेऊन जाते !
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास जनमेजयाला म्हणाले, "हे कुरुवंशश्रेष्ठा, हे महापराक्रमी, हे राजेश्वरा, जशी तुझ्या मनात शंका निर्माण झाली तसेच त्यावेळी माझेही मन अत्यंत शंकाकुल झाले होते. अशा रीतीने मीही संभ्रमात पडलो होतो. तेव्हा मी नारदांना ह्याविषयी विचारले. नारदांनी जे मला सांगितले, ते तू श्रवण कर."
नारद मला म्हणाले, "हे मुनीश्रेष्ठ व्यास, आता यावेळी मी तुला काय सांगणार ! मला तू फारच अवघड प्रश्न विचारलास. हे ऋषे, पूर्वी मीही असाच संशयाने पीडित झालो होतो. माझे अंतःकरण अनेक शंकांनी व्यग्र झाले होते. त्या संदेहरूपी प्रचंड सृष्टीमुळे मी अत्यंत त्रस्त झालो होतो. अखेर मी अत्यंत दीन होऊन सत्यलोकी नित्य वास्तव्य करणार्या माझ्या महातेजस्वी पित्याकडे - ब्रह्मदेवाकडे गेलो. अन् हे व्यास महर्षे, आज तू जो उत्तम प्रतीचा प्रश्न मला विचारलास, तो प्रश्न मी पिता ब्रह्मदेवाला विचारला."
मी म्हणालो, "हे तात, हे प्रभो खरोखरच हे संपूर्ण ब्रह्मांड कोणापासून उत्पन्न झाले आहे ? हे ब्रह्मांड आपल्या खटपटींनी निर्माण केले आहे; किंवा हे तात हे सर्व विश्वब्रह्मांड या रूद्राने निर्माण केले आहे ? हे विश्वात्मा, हे जगत्पते, जे सत्य असेल तेच खरोखर मला कथन करा. या सगळ्याचा कर्ता कोण आहे ? कोणाची नित्य आराधना करावी ? सर्वात श्रेष्ठ असा प्रभू कोण ? हे ब्रह्मन्, हे सर्व मला सविस्तर सांगा. हे निष्पाप, आपण समर्थपणे माझ्या संशयाची निवृत्ती करा. अहो, खरोखरच मी अमृततूल्य व दुःखमय अशा संसारात विनाकारण मग्न होऊन पडलो आहे. संदेहामुळे झोके खात असलेल्या माझ्या या चित्ताला कोठेही समाधान प्राप्त होत नाही. क्षेत्रे, देवता व इतर साधनांनीही चित्त शांत होत नाही. हे तपोनिधी त्याचे कारण असे की, उत्तम आत्मतत्त्व समजल्यावाचून शांतता कशी बरे मिळणार ! अनेक संशयामुळे निरनिराळ्या ठिकाणी व्याप्त झालेले चित्त एके ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. त्याला काय करू ?"
"म्हणून हे सर्वाधिपते, सर्व ईश्वरांचाही ईश्वर कोण ? मी कोणाची आराधना करू ? कोणत्या देवाचे भजन करू ? कोणत्या सुरेश्वराला शरण जाऊ ? आणि कोणाचे पूजन करू ? अथवा कोणाचे स्तवन करू ? संभ्रमामुळे हेच मला समजेनासे झाले आहे. म्हणून हे तात, आपण सत्वर मला या संशयपिशाचापासून मुक्त करा."
हे सत्यवतीपुत्रा, अशा तर्हेने मी अत्यंत कठीण व महत्वाचा असा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा तो लोकपितामह ब्रह्मा म्हणाला, "हे महाभाग्यवान सुपुत्रा, खरोखरच तू दुर्घट प्रश्न विचारला आहेस. अरे, या दुर्बोध आणि सर्वोत्तम प्रश्नाचे उत्तर साक्षात विष्णुलाही देता येत नाही. या प्रश्नामुळे तो देवाधिदेव लक्ष्मीपतीही निरूतर होतो. तेथे मी या प्रश्नाचे काय उत्तर देणार ? हे महाविचारी पुत्रा संसारात नित्य रममाण झालेल्या पुरुषाला हे ज्ञान नाही. खरोखरच जो निरिच्छ, निर्मत्सर, विरक्त असा जो कोणी असेल तोच या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. तोच ह्याचा ज्ञाता होय."
पूर्वी एकदा सर्व चराचर जग सागरात संपूर्ण बुडून गेले आणि नाहीसे झाले. तेव्हा केवळ पंचमहाभूतेच फक्त सत्वर उत्पन्न झाली. त्यावेळी हे सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत ह्यांपैकी काहीही उत्पन्न झालेले मला दिसले नाहीत. म्ह्णून मी त्या कमलकर्णिकेत अत्यंत चिंताव्यग्र होऊन बसलो होतो आणि स्वतःशीच विचार करू लागलो.
"ह्या उदकाने परिपूर्ण भरलेल्या महासागरात मी कुठून बरे उत्पन्न झालो ? कोण माझे रक्षण करणारा आहे ? कोणी बरे मला या ठिकाणी जन्म दिला ? किंवा पुढे प्रलयकाल प्राप्त झाल्यावर माझा संहार कोणता प्रभू करणार आहे ? हे उदक जिच्या आधारावर स्थिर राहायला पाहिजे, ती भूमी मला कुठेच कशी बरे दिसत नाही ! ती स्पष्ट का बरे भासत नाही ? अक्षरांचा अर्थ आणि रूढी या दोन्हीही हे कमल प्रसिद्ध आहे. पण हे पंकज तरी कसे बरे निर्माण झाले ! आता हे कमल ज्या चिखलातून उगवले असेल त्या चिखलाचा मी शोध करतो म्हणजे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत पृथ्वीचाही मला तेथे शोध लागेल."
अशा प्रकारे मी मनात विचार केला आणि एक हजार वर्षेपर्यंत मी या उदकावर इकडून तिकडे फिरलो. पण अत्यंत शोध करूनही मला ती पृथ्वी कोठेच आढळली नाही. कमालाचे उगमस्थानच सापडले नाही. तेव्हा मी चिंता करू लागलो. तोच आकाशवाणी झाली.
"तपश्चर्या कर. तपश्चर्या कर."
ती आकाशवाणी ऐकून मी त्या कमलामध्येच हजार वर्षेपर्यंत बसून तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी पुनः आकाशवाणी ऐकली.
"उत्पन्न कर. उत्पन्न कर."
अशाप्रकारची वाणी पुनः प्रकट झाल्यावर मी अत्यंत गोंधळून गेलो आणि स्वतःशीच विचार करू लागलो, आता मी काय उत्पन्न करू ! कसे उत्पन्न करू ?
अशा तर्हेचे विचार मनामध्ये घोळत असताच मधुकैटभ नावाचे दोन दैत्यबंधू समुद्रात माझ्यासमोर युद्धासाठी येऊन उभे राहिले त्यांचा तो भयंकर अजस्त्र अवतार पाहून माझ्या मनात कमालीचे भय उत्पन्न झाले. अखेर कालाचे अवलंबन मी केले आणि सत्वर उदकात उतरलो. इतक्यात अद्भूत असा एक श्रेष्ठ पुरुष माझ्या दृष्टीस पडला.
त्याची देहयष्ठी मेघाप्रमाणे शामल वर्णाची होती. त्याने पीत वस्त्र परीधान केले होते. त्या जगन्नाथाने शरीरावर वनमाला धारण केल्यामुळे तो सुशोभित दिसत होता. तो चतुर्भुज व सुंदर होता. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधांनी तो अत्यंत झळकत होता. तो योगनिद्रेत आधीन झालेला होता. त्यामुळे त्याची हालचाल थांबलेली होती. असा तो निश्चल महाविष्णू अच्युत, शेषरूपी मंचकावर शयन करीत होता. या निद्रिस्त विष्णूला पाहून मी पुनः विवंचनेत पडलो.
"आता काय करावे ?"अशा प्रकारची अद्भूत चिंता मनात निर्माण झाल्यावर मी विष्णूला जागृत करण्याकरता, त्या योगनिद्रारुपिणी देवीचेच मनात स्मरण करून स्तवन केले. तेव्हा माझ्या स्तवनामुळे ती योगनिद्रा विष्णूच्या देहापासून बाहेर पडली आणि ती कल्याणी देवी आकाशात निघून गेली. ती अतर्क्य शरीराने युक्त होती. दिव्य भूषणांनी ती सालंकृत दिसत होती. अशी ती वर्णनास शब्दांच्या पलीकडे रूप असलेली देवी, विष्णूचा देह सोडून आकाशात गेल्यावर, स्वतेजाने तेथे झळकू लागली.
अशा रीतीने तिने विष्णूला सोडल्यावर तो महात्मा जनार्दन सत्वर उठला आणि माझ्या विनंतीवरून माझ्या संरक्षणासाठी त्याने पाच हजार वर्षे त्या दैत्यबंधूंशी युद्ध केले. अत्यंत दारुण युद्ध करून महाविष्णूने त्या दैत्यांना मारलेले मी पाहिले. आपली मांडी विस्तृत व निर्मल करून त्या भूमीवर विष्णूने त्यांचा पराक्रमाने वध केला.
आम्ही दोघेही त्या ठिकाणी असतानाचा रुद्र तेथे येऊन पोहोचला. आम्ही तिघांनीही त्या मनोहर आणि निराकार आकाशात स्थिर झालेल्या त्या मनोहर देवीची मुक्तकंठाने स्तुती केली. त्या दिव्य शक्तीची आम्ही उपासना केली. तेथे उदकात स्थिर असलेल्या आम्हा तिघांवर तिने आपल्या पवित्र कृपाकटाक्षांचा वर्षाव केला. त्यामुळे आम्ही फार आनंदीत झालो. अशाप्रकारे आम्ही हर्षित झालेले पाहून ती म्हणाली,
"हे ब्रह्मदेवा, हे विष्णो, हे महेश्वरा, आता तुम्ही नित्य सावधान रहा. ब्रह्माने सृष्टीची उत्पत्ति करावी, विष्णूने तिचे रक्षण करावे आणि योग्य काली महेश्वराने तिचा संहार करावा. हे देवेश्वरांनो, तुम्ही तिघेही आता आपापली ही नित्याची कार्ये करीत रहा. या दुष्ट महादैत्यांचा तर आता वध झालाच आहे, आता सत्वर तुम्ही स्वतःसाठी आपापली योग्य ती स्थाने तयार करा आणि निश्चिंत मनाने तेथे जाऊन वास्तव्य करा. आपापल्या विभूतींच्या योगाने म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा या चारी प्रकारच्या सर्व प्रजा तुम्ही निर्माण करा आणि आपल्या कार्यामध्ये सत्वर स्थिर व्हा."
हे नारदा, असे तिचे हे मृदु, सुखदायक व मनोहर भाषण ऐकल्यावर आम्ही तिघेही तिला म्हणालो, "हे महामाये, खरोखरच आम्ही असमर्थ आहोत. कारण आम्ही या प्रजा कशा उत्पन्न करायच्या ? हे माते, येथे तर सर्वत्र उदकच विस्तृतपणे पसरलेले दिसत आहे. कोठेही भूमी आढळत नाही. शिवाय प्रजा उत्पन्न करण्यास आवश्यक लागणारी भूते, गुण, तन्मात्रे, इंद्रिये ह्यांचाही कुठे पत्ता दिसत नाही. तेव्हा आम्ही असहाय आहोत. हे देवी, आम्हाला क्षमा कर."
आमचे हे असहाय भाषण ऐकून ती देवी प्रसन्न वदनाने हर्षयुक्त झाली आणि ती अत्यंत संतुष्ट झाली. इतक्यात आकाशातून एक अद्भूत व शुभ विमान तेथे आले. ती देवी हसत मुखाने म्हणाली, "हे ब्रह्मा, हे विष्णू, हे महेश्वरा, तुम्ही आता कोणतीही भीती मनात न बाळगता ह्या विमानात सत्वर प्रवेश करा. मी आजच तुम्हाला एक अवर्णनीय चमत्कार दाखवीन."
तिचे ते वत्सल भाषण ऐकून आम्ही "बरे"असे म्हणालो. ते विमान आम्ही अवलोकन केले, ते मोत्यांच्या रसांनी आच्छादिलेले होते. त्याला जोडलेल्या घंटांचा मधुर नाद ऐकू येत होता. ते रत्न जडवून सुशोभित केले होते आणि अत्यंत नयनमनोहर असे होते. अशा त्या देवांच्या सुंदर गृहाप्रमाणे शोभून दिसणार्या विमानात आम्ही तिघेही निःशंक मनाने चढलो आणि तेथील स्थानावर बसलो. अशाप्रकारचे आम्ही तिघेही जितेंद्रिय विमानात बसताच, ते अवलोकन करून त्या देवीने आपल्या शक्तीच्या बलावर ते विमान आकाशातून चालविले.