त्याचवेळी तक्षक नावाचा श्रेष्ठ नाग, राजाला शाप झाल्याचे ऐकून घरातून वेगाने बाहेर पडला. वृद्ध ब्राह्मणाचा वेष घेऊन राजाकडे जात असता, वाटेत त्याची व कश्यपची भेट झाली. तक्षकाने वेगाने चाललेल्या कश्यपला विचारले, "आपण कोणीकडे व कशासाठी जात आहात ?"
"मी शाप झालेल्या नृपश्रेष्ठ परीक्षिताकडे जात आहे. तक्षकाने त्याला दग्ध केल्यावर मी निश्चितपणे माझ्या मंत्र सामर्थ्याने त्याला जिवंत करणार आहे." कश्यप म्हणाला.
"हे ब्राह्मणा, मी भुजंग असून, मी राजाला दग्ध करणार. माझ्या विषावर उपाय करण्यास तू असमर्थ आहेस मागे फिर." तक्षक म्हणाला.
"हे सर्वश्रेष्ठा, तू विषाने राजाला दग्ध केलेस, तरी मी निश्चित त्याला पुनरपि जीवन देईन."
कश्यप उतरला, "असे आहे तर दाखव तुझे मंत्रसामर्थ्य. तू नृपश्रेष्ठाला जिवंत कसा करणार ? मी आता या वटवृक्षाला माझ्या विषारी दाढांनी भस्म करुन टाकतो." भुजंग म्हणाला,
कश्यप म्हणाला, "तू दग्ध केलेल्या अथवा दंश केलेल्याला, मी निश्चित जिवंत करीन."
तक्षकाने वृक्षाला दंश करुन भस्म केले. "हे द्विजा, कर या वृक्षाला सजीव." तक्षक कश्यपाला म्हणाला. विषाग्नीने भस्म झालेल्या वृक्षाचे सर्व भस्म एकत्र करुन कश्य्प म्हणाला, "पहा माझे मंत्रसामर्थ्य, तुझ्यासमक्ष हा वृक्ष मी सजीव करीन."
कश्यपाने हातातले उदक मंत्र म्हणून त्या भस्मावर शिंपडताच तो शुभ वृक्ष पुन: सजीव झाला. ते पाहताच तक्षक विस्मयचकित झाला. तो कश्यपाला म्हणाला, "आपण राजाकडे जाण्याचे श्रम का घेत आहात ? आपला उद्देश मला सांगा मी आपली इच्छा पूर्ण करीन.
कश्यप म्हणाला,"हे सर्वश्रेष्ठा, केवळ द्रव्याची इच्छा धरुन मी राजाकडे जात आहे. शापभ्रष्ट राजावर, विद्येच्या बळाने उपकार करण्यासाठी मी जात आहे."
तक्षक म्हणाला, "आपणाला राजाकडून जेवढे द्रव्य हवे, तेवढे मी आपणाला देतो. आपण परत जा. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल."
हे ऐकून महापंडित कश्यप विचार करु लागला. आता काय करावे? हे धन घेऊन जरी घराकडे परत गेलो, तरी लोभिष्ठ म्हणून माझी अपकीर्ती होणार. पण नृपश्रेष्ठास जिवंत केल्यास माझी चिरकीर्ती होईल व भरपूर द्रव्य मिळून पुण्यही लागेल. कीर्तीसाठीच पूर्वी रघुराजाने आपले सर्वस्व ब्राह्मणांना अर्पण केले. राजा हरिश्चंद्र, कर्ण यांनी देखील कीर्तीकरता महत्कार्ये केली. शिवाय राजाला जिवंत केल्यास प्रजा सुखी होईल. पण राजाच्या पश्चात अराजक माजून प्रजेचा नाश होईल व ते मोठे पातक मला लागेल. धन लोभाने अपकीर्ती होईलच."
कश्यपाने मनात खूप विचार केला व त्याचे ध्यान करुन राजाचे आयुष्य खरोखरच संपले आहे, हे आपल्या विद्येच्या बळावर ओळखले आणि तक्षकाकडून विपुल धन घेऊन तो स्वगृही परतला.
कश्यप परतल्यावर राजाच्या सातव्या दिवशी वध करण्यासाठी तो त्वरेने निघाला व हस्तिनापूररला आला. तेथे नगरासमीप वाड्यात बंदोबस्ताने परीक्षिती राजा राहिला आहे असे तक्षकाला समजले. तेथे मणी, मंत्रज्ञ ब्राह्मण आहेत हे त्याला समजताच तो चिंतामग्न झाला.
आपणाला राजवाड्यात कसा प्रवेश मिळणार, या चिंतेने व्याकूळ झाला. ह्या पापी म्हणून विप्रशापाने ग्रस्त झालेल्या राजाला मी कोणत्या मार्गाने फसवावे ? असा तो विचार करु लागला. तो स्वत:शी म्हणाला,"विप्राच्या गळ्यात सर्प बांधण्याचे पाप करणारा पांडव कुळात याच्याशिवाय कोणीही जन्माला येणार नाही. अत्यंत निंद्य कृत्य करुनही त्याने स्वत:साठी रक्षक ठेवले आहेत व प्रासादावर उच्च भागी राहून हा राजा प्रत्यक्ष मृत्यूला फसवीत आहे.. विप्रवचनाने मी बद्ध आहे. मी राजाला आता कसा दग्ध करु? मरणावर इलाज नाही, हे न समजल्यामुळे हा राजा रक्षकाची योजना करुन आनंदाने तेथे राहात आहे. पण महा तेजस्वी दैवाने जर याचा मृत्यू योजिला असेल तर कोट्यावधी प्रयत्न करुनही तो टळणार नाही. पांडवकुलउत्पन्न हा राजा मृत्यूच्या जबड्यात सापडूनही जीवनाची आशा धरुन सुरक्षित ठिकाणी राहिला आहे."
धर्मामुळे व्याधीचा परिहार होतो. याकल्पनेने त्याने खूप दानधर्म केला आहे. वास्तविक स्वर्ग प्राप्तीसाठी मृत्यूची वाट पाहात बसणेच त्याला योग्य आहे. कारण सर्व कर्मावाचून राहून नरकाचे साधन होते, पण काहीही न करता मी मृत्यूला जिंकले आहे, अशी त्याची समजूत झालेली दिसते. त्याचा मृत्यू जवळ आल्यानेच त्याने ब्राह्मणाला पीडा देण्याचे पातक केले व शापभ्रष्ट झाला. पण मूर्ख राजाला हे कळत नाही. राजाला अशा प्रकारचा उपदेश देणारा ब्राह्मणही तेथे नाही. त्याअर्थी विध्यात्याने योजलेल्या मृत्यू टळणे शक्य नाही, हेच खरे. असा विचार करुन तक्षकाने काही नागांना तपस्व्यांचे रुप देऊन त्यांचेबरोबर उत्तमोत्तम फळे देऊन राजाकडे पाठविले. स्वत: तक्षक एका लहानशा किटकाचे रुप घेऊन एका फळात शिरला. ती फळे घेऊन नाग तपस्वी रुपाने नवीन प्रासादाजवळ आले.
तपस्व्यांना पाहून रक्षकानी येण्याचे कारण विचारताच ते नाग म्हणाले, "आम्ही तपस्वी असून राजाच्या दर्शनासाठी तपोवनातून आलो आहोत. पांडवकुलातील सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या त्या अभिमन्यू पुत्राला, आथर्वण मंत्रानी आशिर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणून मुनी दर्शनासाठी आले आहेत व मिष्ट फळे राजाला अर्पण करुन व अभिषेक करुन परत जाणार आहोत; हे राजाला सांग. भारतकुलात राजाला कधीही रक्षकांची आवश्य्कता लागली नाही. राजाचे दर्शन होत नाही, असे आम्ही पूर्वी कधी ऐकले नाही. तेव्हा परीक्षिती राजाकडे जाऊन त्याला आशीर्वाद देऊन आम्ही परत जाणार आहोत."
तपस्व्यांचे भाषण ऐकून रक्षक राजाकडे गेले व परत येऊन म्हणाले, "हे तपस्वी जनहो, आज राजाचे दर्शन तुम्हाला होणार नाही. उद्या सर्व तपस्व्यांनी या राजवाड्यात यावे. विप्रशापाच्या भीतीने सर्व ब्राह्मणांनाही राजवाड्यात जाण्यास बंधन आहे." ते विप्र म्हणाले, "ठिक तर ही फळे व आशीर्वाद रक्षकांनी राजाला पोहोचवावेत. हे ऐकून रक्ष पुन: राजाकडे गेले. राजा म्हणाला,"फळे वगैरे तुम्ही घेऊन या व उद्या पुन: अवश्य येण्यास तपस्व्यांना सांगा आज मी भेटणार नाही."
राजाचा निरोप घेऊन रक्षकांनी तपस्व्यांकडून फळेमुळे यांचा स्वीकार करुन राजाला अर्पण केली. नंतर ब्राह्मणाचे रुपधारी नाग निघून गेले, राजा तेथील मंत्र्यांना म्हणाला, "सुह्र्दांनी दिलेली सर्व फळे आपण भक्षण करावी. मी यातील हे एक मोठे फळ भक्षण करतो." असे म्हणून त्या उत्तरापुत्राने सर्व फळे मंत्र्यांना अर्पण करुन एक फळ स्वत:साठी घेऊन फोडले. तोच त्यातून लालवर्णाची व काळ्या डोळ्याची आळी बाहेर आली. ती पाहताच आश्चर्यचकित होऊन तो मंत्र्यांना म्हणाला, "सूर्य आस्ताला चालला आहे. आजवर मला विषामुळे भय प्राप्त झाले नाही. म्हणून मी शापाचा स्वीकार करतो हा कृमी मला दंश करो." असे म्हणून राजेंद्राने ती आळी आपल्या मानेवर ठेवली. सूर्य आस्ताला जाताच आळीने आपले पूर्वरुप धारण केले. त्या तक्षकाने भूपती परीक्षिताला वेढले व दंश केला. सर्व मंत्री विस्मयचकित होऊन रोदन करु लागले व तो भयंकर सर्प पाहून भीतीने पळू लागले. सर्व रक्षकही आक्रोश करु लागले. सर्वत्र हाहा:कार उडाला. तक्षकाने राजाला संपूर्ण वेढल्यामुळे त्याला बोलताही येईना. त्याची हालचाल बंद झाली.
तक्षकाच्या मुखांतून भयंकर विषारी अग्निज्वाला बाहेर पडली व तिने राजाला दग्ध करुन टाकले. राजाचा प्राण घेऊन तक्षक आकाश मार्गाने निघून गेला. एखाद्या प्रचंड वृक्षाप्रमाणे राजा दग्ध होऊन कोसळला. राजा मृत्यू पावताच सर्व प्रजा आक्रोश करु लागली.