अशा तर्हेने कामविव्हल झालेला मुनी रुरु परत स्वगृही आला आणि कोणाशी काही न बोलता मुकाट्याने निजला. त्याचे नैराश्य अवलोकन करुन त्याने रुरुला विचारले, "हे पुत्रा, तू असा खिन्न का ?" तेव्हा रुरुने सांगितले, "स्थूलकेश मुनीच्या आश्रमात असलेल्या प्रमद्वरा नावाच्या कन्येशी माझा विवाह व्हावा." हे ऐकून रुरुचा पिता प्रमति स्थूलकेश ऋषींकडे गेला व आपल्या मधुर वाणीने मुनींना संतुष्ट करुन आपल्या पुत्रासाठी त्याने प्रमद्वरेची मागणी केली. स्थूलकेशींनी योग्य शुभ दिवस पाहून कन्येला अर्पण करु असे प्रमतिस सांगितले. याप्रमाणे जवळ जवळ आश्रम असलेल्या तेथील ऋषीमुनींनी दोन्ही बाजूंनी विवाहाची जुळवाजुळव करण्यास सुरवात केली.
एकदिवस ती सुंदर वदना प्रमद्वरा खेळत होती. इतक्यात अनवधानाने तिचा पाय एका निद्रिस्त सर्पावर पडला. तो सर्प तिच्या पायाला कडकडून चावला. प्रमद्वरा मृत्यू पावली. सर्वच मुनी शोक करु लागले. त्याशोकाचे काय कारण असावे याचा विचार करुन रुरु सुद्धा तेथे येऊन प्राप्त झाला. त्याला प्रमद्वरेचा मृत्यू झाल्याचे कळताच, तो विरहाने व्याकूळ होऊन विलाप करु लागला. तो वारंवार म्हणू लागला.
"अहो माझ्या दैवाने, ह्या अदभूत सर्पाला माझ्यावर दु:ख कोसळण्याकरिता पाठविले आहे. सर्पच माझ्या दु:खाचे कारण आहे. आता मी करु तरी काय? माझी प्राणप्रिया मृत्यू पावली. आता मी कोठे जाऊ? मी तर या सुंदरीला अलिंगनही दिले नाही. तिच्या मुखाचे चुंबनही घेतले नाही. भाग्यहीन अशा मी तिचे प्राणीग्रहण केले नाही. अजून हिच्यासह अग्नीपुढे माझा लाजाहोम झाला नाही. खरोखरच मनुष्यत्त्वाला धिक्कार असो. मलाही मृत्यू येवो. पण दु:खी पुरुषाला इच्छेप्रमाणे मृत्यू कसा येणार! पण हिच्याशिवाय या भूतलावरील सुख मला कसे प्राप्त होणार? म्हणून मी भयंकर डोहात अथवा अग्नीत उडी टाकीन. विष प्राशन करीन किंवा गळफास लावून प्राण देईन." अशाप्रकारे दु:ख व्याप्त रुरुने पुन: विचार केला.
"मी स्वत: मरुन काय करणार ? आत्महत्त्या भयंकर पाप आहे. त्यामुळे माझा पिता व माता अतिशय दु:खी होतील. माझ्या प्राण त्यागाने देवाला मात्र आनंद होईल. माझा नाश झाल्याने माझे शत्रू आनंदित होतील, शिवाय जिच्यासाठी प्राण द्यायचा त्या प्रियेवर तरी परलोकात कोणते उपकार होणार आहेत? विरहाने व्याकूळ होऊन मी जर आत्मघात केला तर परलोकात माझ्यासारख्या आत्मघातक्याचा, माझी प्रिया कसा स्वीकार करील? म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मरण्यात दोष अधिक आहेत." असा विचार करुन रुरुचे आचमन केले. शूचिर्भूत होऊन तो बसला. हातात उदक घेऊन तो म्हणाला,"देवपूजादि जे पुण्य आजवर माझ्या हातून घडले असेल, भक्तिपूर्वक केलेली गुरुसेवा, होमहवन, जप, तप, वेदाध्यायन, गायत्री स्मरण, सूर्याची आराधना अशा प्रकारचे जे पुण्य घडले आहे. त्यामुळे माझी प्रिया जिवंत होवो. ती जिवंत न झाल्यास मी प्राण त्याग करीन." असे म्हणून व देवतांचे स्मरण करुन रुरुने हातातील उदक खाली सोडले.
त्यावेळी देवदूत येऊन रुरुला म्हणाला, "हे ब्राह्मणा, असे धाडस करु नकोस. मृत झालेली स्त्री जिवंत कशी होणार ? गंधर्व व अप्सरा यांपासून झालेल्या या कन्येचे आयुष्य संपले आहे. म्हणून तू दुसरी एखादी स्त्री स्वीकार. शिवाय अजून ती कुमारी आहे. त्यामुळे तू का रोदन करीत आहेस ? असे काय प्रेम आहे तुझे तिच्यावर ?
रुरु म्हणाला,"मी दुसरी स्त्री वरणार नाही. ही स्त्री जिवंत न झाल्यास मला मरणे अवश्य आहे."
देवदूत आनंदीत होऊन म्हणाला, "द्विजश्रेष्ठा, देवांनी पूर्वी एक उपाय सांगून ठेवला होता. तो ऐक. आपले अर्धे आयुष्य देऊन तू प्रमद्वरेला जिवंत कर."
रुरु म्हणाला,"मी माझे अर्धे आयुष्य प्रियेला देण्यास तयार आहे. पण तू सत्वर तिला उठव."
त्याचवेळी आपली कन्या मृत झाल्याचे ऐकून विश्ववसू विमानाने स्वर्गलोकी गेला. नंतर तो गंधर्वराज सज्जन देवदूताला घेऊन धर्मराजाकडे गेला व म्हणाला,"हे सूर्यनंदना, रुरुची भावी पत्नी व प्रत्यक्ष विश्ववसूची कन्या सर्पदंशाने मृत झाली आहे. रुरु आपले अर्धे आयुष्य तिला देत आहे. म्हणून त्याच्या तपश्चर्येच्या प्रभावाने तिला जिवंत कर."
तेव्हा यमधर्म म्हणाला,"रुरुच्या अर्ध्या आयुष्याने ती जिवंत होईल. ती अविवाहीत आहे. म्हणून सत्वर जाऊन ती रुरुला अर्पण कर."
याप्रमाणे यमदर्माने देवदूताला सांगितले. देवदूत सत्वर तेथे आला व त्याने प्रमद्वरेला जिवंत करुन रुरुला अर्पण केली. नंतर शुभ दिवशी रुरुने यथाविधी तिच्याशी विवाह केला.
परीक्शिती म्हणाला, "अशाप्रकारे उपाययोजना झाल्याने प्रमद्वरा जिवंत झाली. म्हणून मी म्हणतो, प्राणरक्षणाकरता, मणी, मंत्र, व औषध या योगाने अवश्य उपाय योजला पाहिजे." असे आपल्या मंत्रेगणांना सांगितल्यावर परीक्षिताने स्वरंक्षणासाठी एक सातमजली उत्कृष्ट वाडा तयार केला, व आपल्या सचिवांसह तो तेथे वास्तव्य करु लागला. मणी, मंत्र जाणणार्या शूरांची त्याने आपल्या भोवती योजना केली.
"सेवकाला क्षमा करावी." असा निरोप राजाने गौरख मुनींना पाठवून त्याची कृपा संपादन व्हावी म्हणून इच्छा केली. सिद्धि व मंत्र जाणणारे ब्राम्हण त्याने जवळ ठेवून घेतले. गजांनी वेढून, राजवाड्यावर मंत्रीपुत्रांचा पहारा बसविला. अत्यंत बंदोबस्त असल्याने त्या वाड्यात कोणालाही प्रवेश नव्हता. प्रत्यक्ष वायुसुद्धा जास्त प्रवेश करु लागल्यास त्याचेही निवारण होत होते. राजा नित्य तेथेच भोजन आहार घेत असे. आपली नैमित्तिक कर्मेही तो तेथेच करीत असे. मंत्र्यांसह तेथे राहून राजकारणातील विचारविनिमयही तेथेच करीत असे, व आयुष्याचा एकेक दिवस मोजीत असे.
राजाला शाप मिळाल्याची वार्ता, कश्यप नावाच्या एका श्रेष्ठ पण दरिद्री ब्राह्मणाला समजली द्रव्येच्छेने तो राजाकडे येण्यास निघाला. तो विद्वान मांत्रिक, धनाची इच्छा धरुन घरातून बाहेर पडला.