अशा या दिव्य दर्शनानंतर तिसरे दिवशी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती हे सर्वजण वनास लागलेल्या अग्नीत जळून गेले. संजय पूर्वीच तीर्थयात्रेला गेला होता. नारदमुनींनी ही घटना सांगताच, युधिष्ठिरादि पांडवांना दारुण दु:ख झाले. कौरवांचा क्षय झाल्यावर, छत्तीस वर्षांनी प्रभास क्षेत्रात केवळ विप्रशापामुळे सर्व यादवांचा नाश झाला. यादव मदिरा प्राशन करुन परस्परात लढले आणि नाश पावले.
बलरामाने देह त्याग केला. भक्तवत्सल कृष्ण ब्राह्मणाचा शाप खरा व्हावा म्हणून व्याधाकडून बाण लागून मरण पावला. कृष्णाच्या मृत्यूची घटना ऐकून वसुदेवाने भुवनेश्वरीचे स्मरण केले व प्राणशुद्ध करुन देहत्याग केला. नंतर दु:खमग्न अर्जुन प्रभासला गेला. तेथे जाऊन त्याची उत्तरकार्य यथाविधी उरकली. काष्ठे एकत्र करुन आठ पत्न्यांसह कृष्णाच्या देहाचे अर्जुनाने दहन केले.
रेवतीसह बलरामाचा देह दहन करुन अर्जुन द्वारकेस आला, तेथील जन बाहेर काढून त्याने ती नगरी समुद्रात बुडविली. सर्वांना घेऊन तो इंद्रप्रस्थास येत असता वाटेत चोरांनी श्रीकृष्णाच्या भार्याना लुटून सर्व धन गेले त्यावेळी अर्जुन निस्तेज झाला होता. इंद्रप्रस्थास आल्यावर अनिरुद्धाचा पुत्र व्रज यास त्याने यादवांच्या राज्यावर बसविले. नंतर ही सर्व दु:खद घटना अर्जुनाने व्यासांना कथन केली. व्यास म्हणाले,
"हे अर्जुना तू व श्रीकृष्ण पुन्हा अवतार घ्याल तेव्हा पुन्हा तुला पूर्वीचे तेज प्राप्त होईल."
नंतर अर्जुन हस्तिनापुरास आला, त्याने पांडवांना ही घटना सांगितली. ती ऐकून युधिष्ठिराने छत्तीस वर्षाचा उत्तरेचा पुत्र परीक्षित याला राज्यावर बसवून तो आपल्या भ्रात्यांसह व द्रौपदीसह हिमालयाकडे निघून गेला. हिमालय पर्वतावर गेल्यावर पाच पांडव व द्रौपदी या सहाही जणांनी देहत्याग केला.
इकडे परीक्षित राजाने साठ वर्षापर्यंत सर्व प्रजेचे धर्माप्रमाणे पालन केले. पण त्याला मृगयेचे व्यसन लागले. तो वनात मृगयेला गेला असता मध्यान्ह वेळी बाण लागलेला मृग शोधीत हिंडत होता. तो तहानेने व्याकूळ झाला. सूर्याच्या तापामुळे तो संतप्त झाला. जवळच एक मुनी ध्यानस्थ बसलेला त्याला दिसला. राजाने त्याला जाऊन ‘पाणी कोठे आहे, असे विचारले. पण मौन धारन केल्यामुळे मुनीने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे चिडून जाऊन राजाने बाणाच्या टोकाने एक मृत सर्प उचलून मुनींच्या गळ्यात घातला. कलीने राजाचे मन व्याप्त झाले होते. पण मुनी तरीही निश्चल राहिला. कारण तो समाधीमध्ये होता. नंतर राजा आपल्या घरी गेला.
इतक्यात मुनींचा महातेजस्वी व देवीचा उपासक पुत्र त्याला इतरांकडून,मुनींच्या गळ्यात मृत साप घातल्याची घटना, मित्रांकडून कळली. तो अत्यंत क्रुद्ध झाला. त्याने सत्वर उदक घेऊन शाप दिला."ज्याने माझ्या ध्यानमग्न, पित्याच्या कंठात मृत सर्प घातला, त्या पापी पुरुषाला आजपासून सात दिवसात तक्षक दंश करील."
मुनींचा एक शिष्य राजाकडे आला व हा शाप दिल्याची घटना त्याच्या कानावर घातली,ते ऐकून त्याने आपल्या मंत्रिगणांना बोलावून सांगितले,"माझ्या अपराधामुळे प्रत्यक्ष मृत्यूच द्विजरुपाने शापवाणी वदला आहे. म्हणून मी आता काय करु? मृत्यू अनिवार्य आहे पण तो टाळण्यासाठी काही तरी शास्त्रशुद्ध उपाय करावा अस पंडित सांगतात. विचार पुरुषाच्या उपायाने कार्यसिद्धी होते. मणि, मंत्र व औषधी यांचे उपाय उत्कृष्ट आहेत ते हे, त्यामुळे काय बरे प्राप्त होणार नाही ? पूर्वी सर्पदंश होऊन मृत झालेली एका मुनीची भार्या आपले अर्धे आयुष्य देऊन त्याने जिवंत केली.म्हणून दैवावर हवाला ठेवून ज्ञानी पुरुषांनी राहू नये. हे सर्वांनी विचारात घ्यावे. दैवावर विश्वास ठेवून निरुद्योगी राहणारा पुरुष एखादाच आढळेल यति विरक्त होऊनही आमंत्रण नसताना देखील भिक्षेस घरोघर जातो. जरी कुणी मुखात भक्ष घातले तरी प्रयत्नाशिवाय ते उदरात कसे जाणार ? म्हणून प्रयत्न करीत रहावे व तरीही यश आले नाही तर दैव समजून समाधान मानावे."
राजाचे बोलणे ऐकून मंत्री विचारतात, "राजा अर्धे आयुष्य देऊन पत्नीला जिवंत करणारा मुनी कोण? तिला कसा मृत्यू आला हे आम्हाला विस्ताराने सांग."
राजा ही घटना सांगू लागला.
भृगुमुनींची भार्या पुलोमा ही अत्यंत देखणी होती. तिला च्यवनमुनी नावाचा प्रसिद्ध पुत्र झाला. त्या च्यवनऋषींची पत्नी सुकन्या नावाची होती. तिचा पुत्र प्रमति हा प्रसिद्धी पावला होता. त्याला प्रतापी नावाच्या भार्येपासून रुरु नावाचा महातेजस्वी पुत्र झाला. त्याकाळी स्थूलकेश नावाचे धर्मात्मा व सत्यनिष्ठ तपस्वी होते. श्रेष्ठ अप्सरा मेनका ही एकदा क्रीडा करीत होती. विश्ववसू गंधर्वापासून गर्भधारणा झाल्यावर ती अप्सरा स्थूलकेश मुनीच्या आश्रमात आली व तेथे प्रसूत झाल्यावर आपल्या सुम्दर कन्येला नदीकाठी सोडून ती निघून गेली. स्थूलकेशमुनींनी ती अनाथ कन्या पाहून पोषण केले, व प्रमद्वरा असे तिचे नाव ठेवले. पुढे तिला यौवनावस्था प्राप्त झाली. रुरुच्या नजरेस पडताच तिचे सौंदर्य पाहून रुरु मदन विव्हल झाला.