राजा तर मृत्यू पावला. राजकुमार जनमेजय अत्यंत लहान म्हणून मंत्रीगणांनी राजाला परलोक प्राप्त व्हावा म्हणून राजाचे और्ध्वदेहिक कर्मे यथाविधी केली. तक्षकाने दंश केल्यामुळे भस्म झालेल्या परीक्षितीला गंगातीरावर अगुरु काष्ठांनी युक्त असलेल्या चितेवर ठेवून वेदमंत्रासमवेत, राजाच्या सर्व उत्तरक्रीया पूर्ण केल्या. उत्तमप्रकारची दाने दिली. सुग्रास अन्नदान केले. नानाप्रकारची वस्त्रे वाटली आणि एका सुमुहूर्तावर हस्तिनापूरच्या शुभसिंहासनावर बाल जनमेजयाची स्थापना करुन त्याला राज्याभिषेक केला. दाई राजाचे पालनपोषण करीत असे. तिने राजपुत्राला दरबारचे रीतिरिवाज समजावून सांगितले. हळूहळू राजा मोठा होऊ लागला.
राजा अकरा वर्षाचा झाल्यावर कुलपुरोहितांनी त्याला यथायोग्य विद्या शिकवण्यास सुरवात केली. कृपाचार्यांनी त्याला धनुर्वेद शिकविला. राजा जनमेजयाला विद्या प्राप्त होऊन तो राजशास्त्र जाणू लागला. तो वेद व धनुर्विद्या यात पारंगत झाला. तो धर्मशास्त्र निपुण असल्याने त्याने धर्माप्रमाणे राज्य केले. त्याची कीर्ती ऐकून सुवर्णवमक्षि नावाच्या काशिपती राजाने आपली सुंदर कन्या वपुष्टमा जनमेजयाला दिली. सुंदर पत्नीचा लाभ झाल्याने राजालाही आनंद झाला व सुनेत्रा वपुष्टमेसह जनमेजय राजा वनात व उपवनात येथेच्छ क्रीडा करु लागला. तो प्रजाहितदक्ष असल्याने प्रजा राजावर संतुष्ट होती मंत्रीही स्वकार्यदक्ष होते. आपापली कामे ते प्रामाणिकपणे करीत होते.
याचवेळी पूर्वी तक्षकाने त्रस्त केलेला उत्तंक मुनी तक्षकाच्या सूडाचा विचार करीत हस्तिनापूरला आला. तेथील राजा परीक्षितीचा पुत्रच आहे. हे ऐकून मुनी राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला,"हे राजा, योग्य वेळी कोणते कार्य करावे, हे तुला समजत नसल्याने नको ते कर्तव्य तू पार पाडीत आहेस. खरोखर उद्योगरहित, अभिमानशून्य व्यवहारशून्य, पोरचेष्टेत मग्न होऊन, वैर न जाणणार्या तुला, मी कशी प्रार्थना करावी."
हे ऐकून विस्मित झालेला जनमेजय, नम्रतेने म्हणाला,"कोणते वैर न समजल्यामुळे मी त्याचा प्रतिकार केला नाही, ते आपण मला सांगा, मी योग्य ते करीन."
उत्तंक म्हणाला,"राजा, दुष्ट तक्षकाने तुझ्या पित्याचा वध केला. हवे तर तुझ्या मंत्रीगणांना ही घटना विचार की पित्याचा वध कोणी केला ?
हे ऐकून जनमेजयाने आपल्या मंत्र्यांना बोलावून आपल्या पित्याच्या वधाची माहिती विचारली. तेव्हा विप्राचा शाप व पुढे झालेला सर्पदंश यामुळे राजाला कसा मृत्यू आला ते त्यांनी विस्ताराने राजाला सांगितले.
तेव्हा राजाने उत्तंक मुनीला सांगितले, "महाराज, विप्राच्या शापामुळे मला वाटते पित्याचा वध तक्षकाने केला. यात तक्षक दोषी कसा !"
तेव्हा उत्तंकाने कश्यपाला विपुल धन देऊन तक्षकाने कसे परत पाठवले ते सांगितले व तक्षक दोषी असल्याचे पटवून दिले. उत्तंक पुढे म्हणाला, "पूर्वी रुरुची पत्नी सर्पदंश होऊन अविवाहित मृत्यू पावली. रुरुने स्वसामर्थ्याने तिला जिवंत केले. पण दिसेल त्या सर्पाचा मी नाश करीन, अशी भयंकर प्रतिज्ञा करुन, हातात शस्त्र घेऊन तो सर्प मारीत सुटला. पुढे एका वनात भयंकर पण जर्जर झालेला अजगर त्याला दिसला. त्याच्यावरही रुरुने प्रहार केला.
तेव्हा अजगर म्हणाला, "हे विप्रा मी तुझा कोणताही अपराध केला नसता, तू माझा का वध करीत आहेस ?"
रुरु म्हणाला, "माझ्या प्रियेला सर्पदंशाने मृत्यू आल्याने संतप्त होऊन मी सर्पांचा संहार करीत आहे."
अजगर म्हणाले, "मी दंश करीत नाही, दंश करणारे भुजंग वेगळे आहेत. माझे शरीर त्यांच्या सारखे आहे. म्हणून तू माझी हिंसा करणे न्याय्य नाही."
सर्प मनुष्यवाणीने बोलला, हे ऐकून रुरु म्हणाला, "तू कोण आहेस ? तुला अजगर योनी कशी प्राप्त झाली ?"
सर्प म्हणाला, "मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो. पण खमग नावाच्या धर्मनिष्ठ, सत्यवादी, जितेंद्रिय अशा माझ्या विप्रमित्राला मी मुर्खपणामुळे तृणाचा सर्प करुन फसविले. तेव्हा भीतीने थराथरा कापत असलेल्या त्याने शाप दिला व मी सर्प झालो. शापामुळे घाबरुन मी त्याची क्षमा मागितली. तेव्हा त्याने उ:शाप दिला. प्रमतीचा पुत्र रुरु तुझी यातून सुटका करील. तू रुरु आहेस मी तो सर्प आहे. पण अहिंसा हा विप्रांचा धर्म आहे. यज्ञाव्यतिरिक्त हिंसा करणे हा दोष आहे. यज्ञातील हिंसा, ही हिंसा होत नाही."
नंतर रुरुने त्या ब्राह्मणाला शापातून मुक्त केले. सर्पवधाचा त्याग केला व मृत झालेली बाला जिवंत करुन, त्याने तिच्याशी विवाह केला.
उतांकाने ही कथा सांगून पुढे म्हटले,"हे भरतश्रेष्ठा, तू मात्र वैर विसरुन भुजंगाशी वागत आहेस तू वैराचा त्याग करुन, क्रोध सोडून दिला आहेस. हे राजा, स्नानादि कर्माशिवाय तुझा पिता अंतरिक्षात मृत झाला. म्हणून भुजंगाचा वध करुन तू त्याचा उद्धार कर. पित्याच्या वैराचा जो सूड घेत नाही, तो पुत्र जिवंत असून मृतच होय. जोवर तू पितृवधाचा सूड घेत नाहीस, तोवर तुझ्या पित्याला उत्तम गति प्राप्त होणार नाही. तेव्हा वैराचे स्मरण ठेवून अंबा यज्ञाच्या निमित्ताने तू सर्प सत्र नावाचा यज्ञ कर."
हे ऐकून जनमेजयाला दु:ख झाले तो रोदन करु लागला. तो स्वत:ला म्हणाला, "धिक्कार असो माझा. भुजंग दंशामुळे मृत्यू येऊन माझ्या पित्याला भयंकर गति प्राप्त झाली., मी व्यर्थ अभिमान बाळगतो आहे. आजच मी यज्ञाला आरंभ करुन निश्चित मनाने यज्ञातील अग्नीत सर्पाचा वध करीन. आणि पितृऋणांतून मुक्त होईन." असा विचार करुन त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले व सांगितले,
"यज्ञाची उत्कृष्ट समग्री जमा करा. द्विजश्रेष्ठांकडून गंगा तीरावर भूमी मोजून घ्या. तेथे शंभर स्तंभांचा सुंदर मंडप उभारा. आजच माझी यज्ञवेदी तयार झाली पाहिजे, कारण विस्तृत अनुष्ठनांनी युक्त असे सर्पसत्र मला करावयाचे आहे. तक्षक हा त्या सत्रातील मुख्य पशू आहे व मुख्य हवन उत्तंक महर्षी करणार आहेत. तेव्हा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना त्वरित निमंत्रणे द्या.
राजाच्या आज्ञेप्रमाणे मंत्र्यांनी सर्व सिद्धता केली. यज्ञ सुरु होऊन सर्पाचे हवन सुरु झाले. तेव्हा तक्षक भयभीत झाला व संरक्षणासाठी इंद्राकडे गेला. इंद्राने त्याला धीर देऊन आपल्या आसनावर बसवून निर्धास्त राहण्यास सांगितले. अशा प्रकारे तक्षकाला इंद्राने संरक्षण दिलेले जेव्हा उत्तंग मुनींना समजले तेव्हा इंद्रासह ऊह करुन त्या उद्विग्न झालेल्या उत्तंकाने तक्षकासह अवाहन केले. त्यावेळी भयभीत होऊन तक्षकाने जरतकारुचा पुत्र अस्तिकाचे स्मरण केले. तेव्हा अस्तिक मुनी यज्ञ मंडपात आले. त्यांनी जनमेजयाची व उत्तंकाची स्तुती केली. महापंडित अस्तिकाला पाहून, जनमेजयाने त्याचे पूजन केले. आणि इच्छा असेल ते मागण्यास सांगितले.
तेव्हा त्या मुनींनी हा यज्ञ येथेच थांबव असेच सांगितले. सत्यवचनी राजाची पुन्हा अस्तिकाने सर्प सत्र थांबवण्याबद्दल प्रार्थना केली. मुनीवचनाचा मान राखून जनमेजयाने सर्पाचे हवन पूर्ण केले.
त्यावेळी वैशंपायन मुनींनी जनमेजयाला संपूर्ण भारत कथन केले. पण तरीही राजाच्या मनाची शांती होईना. तो पुनरपि व्यासांना म्हणाला, "हे मुनीवर्य, माझ्या मनाची तळमळ थांबत नाही. काय करावे ? अर्जुनाचा नातू माझा पिता क्षत्रिय असूनही रणात किंवा गृहात यथावकाश मरण न येता अंतरिक्षात मृत्यू पावला. तेव्हा त्याला ज्यायोगे स्वर्गप्राप्ती होईल असा उपाय सांगा."