ऋषींनी विचारले, " हे सूता, आता शंतनूने कोळ्याची कन्या व व्यासांची माता सत्यवती इजबरोबर का विवाह केला ? ते आता विस्ताराने सांग."
सूत ती कथा सांगू लागले.
"महाराज शंतनू नित्य मृगयेस जात असे. भीष्मासह त्याची चार वर्षे सुखात गेली. एकदा राजा मृगया करीत यमुनातीरावर आला. इतक्यात अवर्णनीय सुवास येऊ लागला. तो कोठून येतो याचा तपास करीत राजा वनात भटकू लागला.
मंदार, कस्तुरी, चंपक, मालती, केतकी यांचा हा सुगंध नसून, आजपर्यंत अनुभवाला न आलेला हा सुवास येतो. हा मोहक गंध कोणाकडून येत आहे ? यांचा शोध करीत हिंडत असताना एके ठिकाणी सुंदर वदना, बांधेसूद, पण मलिन वस्त्रे परिधान केलेली यौवना त्याला दिसली तो आश्चर्यचकित झाला. हिच्याच शरीरापासून सुगंध दरवळत आहे, याबद्दल त्याची खात्री झाली. ही शुभ तरुणी कोण ? कुठली ? का आली ? हे समजून घेण्याची त्याला इच्छा झाली. अखेर तो कामातूर झाला. ही गंगा तर नसेल ना ? अशी त्याला शंका आली. तो त्या सुंदरीला म्हणाला, "हे प्रिये तू कोण आहेस ? तू कुणाची कन्या ? या वनात तू एकटी का आलीस ? हे मनोहरनयने तू विवाहित आहेस का ? तुजे सौंदर्य पाहून मन कामव्याकूळ झाले आहे. तुजबद्दल मला सर्व काही सांग."
ती कमलनेत्रा, सुहास्यवदना गालातच हसली व म्हणाली ," महाराज, मी कोळ्याची मुलगी. पितृ आज्ञेत असते व अविवाहित आहे. पित्यासाठी धर्म म्हणून मी पाण्यात नौका वहन करते. माझा पिता सांप्रत घरी गेला आहे."
हे ऐकून कामविव्हल होऊन राजा म्हणाला, "मी कुरुवंशातील राजा असून, तू माझा पति म्हणून स्वीकार कर. म्हणजे तुझे यौवन व्यर्थ जाणार नाही. तू माझी धर्मपत्नी हो. मला दुसरी पत्नी नाही, मी तुझ्या आज्ञेत राहीन. माझी पूर्वीची प्रिया मला सोडून गेली आहे. मी विधुर असून तुला पाहताच मी कामातुर झालो आहे."
हे मधुर भाषण ऐकून ती कोळ्याची कन्या म्हणाली, "राजा तुझे भाषण मला मान्य आहे. पण मी स्वतंत्र नाही. आपण माझ्या पित्याची प्रार्थना करा. मी स्वैरिणी नाही. कुलवान कोळ्याची मी मुलगी आहे. मी नित्य पित्याच्या आज्ञेत असते. म्हणून पित्याच्या अनुमतीने आपण माझे पाणिग्रहण करावे, मी तुम्हाला स्वीकारले आहे. मलाही यौवनामुळे मदनाची पीडा होत आहे. पण कुलाचाराप्रमाणे संयम ठेवला पाहिजे.
नंतर राजा कामविव्हल होऊन तिला मागणी घालण्यासाठी धीवराकडे गेला. राजाला आपल्याकडे येताना पाहून, तो आश्चर्यचकित झाला. राजाला नमस्कार करुन तो नम्रतेने म्हणाला,
"महाराज, या दासाकडे आपले का आगमन झाले ? मी आज कृतार्थ झालो. काय आज्ञा आहे ?"
राजा म्हणाला, "हे निष्पापा, तू आपली कन्या मला दिलीस तर मी तीला धर्मपत्नी करीन. हे सत्य सांगतो."
"राजा केव्हातरी कन्या द्यायचीच आहे. मी तुला देईन. तिला काही माझ्या घरात कायमची ठेवता येणार नाही. पण तिच्याच पुत्राला तुम्ही राज्याभिषेक केला पाहिजे. तुझ्या दुसर्या पुत्राने राज्यस्वीकार करता उपयोगी नाही."
हे धीवराचे भाषण ऐकताच राजा काळजीत पडला. भीष्माच्या स्मृतीने तो व्याकूळ झाला व काही न बोलता तो कामविव्हल व चिंताव्यग्र होऊन तो घरी आला. त्याने स्नान, शय्या, भोजन वर्ज केले. खिन्न वदन राजाला पाहून देवव्रत भीष्म त्याला म्हणाला,
"हे महाराज, आपला कोणताही अजेय शत्रू मी तुमच्या स्वाधीन करतो. पण आपणाला कसली चिंता लागली आहे, ते सत्वर सांगा. पित्याच्या दु:खाचा परिहार करता न येणारा पुत्र काय उपयोगी ? पूर्वजाचे ऋण फेडण्यासाठी पुत्र जन्माला येतो. पित्याच्या आज्ञेंकरता दाशरथी रामाने राज्य त्याग केला व लक्ष्मण व सीता यासह चित्रकुट पर्वतावर राहिला. हरिश्चद्रांने आपला पुत्र रोहित यास एखाद्या वस्तूप्रमाणे ब्राह्मणास विकले असता, तो ब्राह्मणाचे घरी राहिला. अजिगर्ताचा पुत्र शुनशेफ, यास पित्याने विकल्यावर तो यूपाला बद्ध झाला. विश्वामित्राने त्याला सोडविले. पित्याच्या आज्ञेसाठी जमदग्निपुत्र परशुरामाने मातेचा वध केला. कारण पितृ आज्ञा श्रेष्ठ आहे. म्ह्णून हे राजा, हे शरीर आपले आहे. आपल्या इच्छेविना मी स्वतंत्र काही एक करीत नाही.
पुत्राचे आशा तर्हेचे भाषण ऐकून शंतनुराजा काहीसा लाजत पुत्राला म्हणाला, "हे पुत्रा, तू हा माजा एकूलता एक पुत्र असुन, शूर, बलाढ्य व मानी आहेस. तू युद्धापासून कधीही परावृत्त होणर नाहीस. म्हणून मला चिंता वाटते. तू एकच माझे अपत्य असल्यामुळे, हे माझे जीवन व्यर्थ आहे. एखाद्या संग्रामात तुला मृत्यू आल्यास मी निराश्रित होणार, हीच माझ्या मनातील चिंता आहे व मी दु:खी झालो आहे."
हे ऐकून भीष्म वृद्ध मंत्र्याकडे जाऊन म्हणाला, "केवळ लज्जेमुळे पिता मला खरे सांगत नाही. तरी आपण त्याचे मनोगत ऐकून मला सांगा. मी राजाच्या इच्छेप्रमाणे करीन."
नंतर मंत्र्यांनी राजाचा उद्देश समजावून घेऊन भीष्माला कळविला. तेव्हा पूर्ण विचार करुन तो गंगानंदन आपल्या मंत्र्यासह धीवराकडे जाऊन म्हणाला,
"हे तेजस्वी धीवरा, तू आपली कन्या माझ्या पित्याला दे. ही कन्या माझी माता असल्याने मी तीच्या आज्ञेत राहिन."
धीवर म्हणाला, "हे भाग्यशाली राजपुत्रा, तूच हिचा स्वीकार करुन हिला पत्नी म्हणून वर, कारन ही जर तुझी माता झाली तर तू युवराज असल्याने, हिचा पुत्र कधीही राजा होणार नाही."
भीष्म म्हणाला, "धीवरा, राजाचे हिच्यावर मन बसले आहे. म्हणून ही माझी माताच व्हावी. मी स्वत: राज्य न करता हिचाच पुत्र राज्य करील. असे मी वचन देतो."
धीवर उत्तरला, "राजपुत्रा तू म्हणतोस ते सत्य आहे. पण तुझा पुत्र बलाढ्य झाल्यास तो आपल्या पराक्रमाने राज्य बळकावून घेईल याबद्दल मला खात्री आहे."
भीष्म विचारपूर्वक व निश्चयी स्वरात म्हणाला,
धीवरा, मी कधीही स्त्रीचा स्वीकार करणार नाही. मी अविवाहित राहण्याचे व्रत आतापासून स्वीकारले आहे. यावर तू विश्वास ठेव. म्हणजे तुझ्या मनात शंका राहणार नाही.
ह्याप्रमाने भीष्माने प्रतिज्ञा केल्यावर धीवराने आपली कन्या शंतनूला अर्पण केली. त्याने सत्यवतीचा स्वीकार केला. पण राजाला व्यासजन्मीची वार्ता कधीही समजली नाही. शंतनूला सत्यवतीच्या प्राप्तीमुळे अपार आनंद झाला.