"अशा तर्हेने हे राजा, शंतनूने राज्य ग्रहण केल्यावर, तो नित्य मृगयेस जाऊ लागला. व्याघ्र हरिण यांची शिकार करीत तो संचार करु लागला. असाच एकदा गंगेच्या काठावरुन हिंडत असता एक हरिणाप्रमाणे डोळा असलेली रुपसंपन्न तरुणी त्याच्या दृष्टीस पडली राजचे मन मोहित झाले. पित्याने सांगितलेली यौवना हीच असावी असे त्याला वाटले तो अतृप्त नेत्रांनी तिच्याकडे पाहात राहिला. ती स्त्री त्याच्याकड अनिमिष नजरेने पाहू लागली. हाच पूर्वीचा महाभिषराजा आहे, हे ओळखून ती स्त्री शंतनूच्या पुढे येऊन उभी राहिली.
कृष्णवर्ण नैत्रप्रदेश असलेल्या त्या स्त्रीकडे पहाताच राजा प्रसन्न चित्त झाला आणि मधुर भाषणाने व हेतु गर्भ शब्दांनी तो म्हणाला, "हे सुमुखी, देव, मनुष्य, गंधर्व, यक्ष, नग, अप्सरा, ह्यांपैकी तू कोणाचीही कन्या असलीस तरी काही चिंता नाही. हे सर्व लक्षण संपन्न स्त्रिये, तू माझी भार्या हो. कारण प्रीती असल्यामुळेच तू मिस्किल हास्य करीत आहेस. तू माझी धर्मपत्नी हो."
राजाने ही गंगाच आहे हे ओळखले. असा पूर्वप्रेमाचा संबंध असल्याने ती सुवदना मधुर शब्दात म्हणाली, "हे राजेश्वरा, आपण प्रतीप राजाचे पुत्र आहात. स्त्रीला मनोहर अवयवांनी युक्त असा पति लाभला तरी तो का बरे स्वीकारणार नाही ? मी काही अटीवर तुझा स्वीकर करीन. हे राजा, विवाहानंतर मी जी काही शुभ अथवा अशुभ कृत्य करीन त्याबद्दल तू माझा निषेध करु नयेस. तसेच माझ्याशी कधीही अप्रिय भाषण करु नये. जेव्हा तू माझ्या या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीस, तेव्हा त्याचक्षणी मी तुला सोडून देईन आणि स्वेच्छेने कुठेही जाईन." वसूंची विनंती मान्य करण्याकरता तिने या अटी राजाला सांगितल्या. शंतुनीराजाने त्याला संमति दिली. नंतर गंगादेवीने त्याला पति म्हणून वरले. ती सुंदरी राजाच्या मंदिरात आली. राजाने तिच्यासह सुंदर उपवनात क्रीडा केली. त्या स्त्रीनेही पतीच्या मनाप्रमाणे त्याला सुखविले. शचीसह रममाण होणार्या इंद्राप्रमाणे हा राजाही त्या हरिणाक्षीसह कित्येक कालपर्यंत क्रीडा करीत राहिला. त्यांना काळाचे भान राहिलेच नाही. ते या सुरत क्रीडेत निपुण होते. म्हणून अत्यंत अनुरुप असलेल्या त्या दोघांनी, लक्ष्मी नारायणाप्रमाणे क्रीडा केली. योग्य वेळी तीला गर्भ राहिला. तिने दिवस पूर्ण होताच, पुत्ररुप वसुला जन्म दिला. पण पुत्र होताच तिने तो उदकात टाकून दिला. अशाप्रकारे तिने सातही वेळा आपल्या पुत्रांना जन्मत:च उदकात टाकले त्यामुळे राजा चिंताक्रांत झाला. तो मनात म्हणाला,
"आता अशाप्रकारे माझा अंश कसा वाढेल ? काय करावे ? पण सातही पुत्र नाहीसे केले तरी मी जर हिला अडविले, तर ती त्याग करुन निघून जाईल. बरे तसेच हे चालू ठेवले तर होणार्या पुत्रालाही ही तशीच सोडून देणार. असे सुंदर पुत्र पुन: होतील की नाही ? आणि झाला तरी, ही दृष्टा त्याचे रक्षण करील कशावरुन ? तेव्हा आता योग्य विचार करुन वंश रक्षण केलाच पाहिजे. ज्या वसूने स्त्रीसाठी कामधेनुचे हरण केले, तो आठवा वसू यावेळी गंगेच्या पोटी जन्माला आला. त्या सुलक्षणी पुत्राला पाहून शंतनूने पत्नीच्या पायावर डोके ठेवले व म्हणाला, "हे सुंदरी, मी तुझा दास आहे. हा पुत्र जिवंत स्थितीत माझ्या स्वाधीन कर. एका तरी पुत्राचे पोषण माझ्या हातून व्हावे. तू आजवर सात पुत्र नाहीसे केलेस. पण आठव्याचे रक्षण कर. तू दुसरी कोणतीही दुर्लभ गोष्ट माग, मी तुला देईन. पण पाया पडून सांगतो. या पुत्राचे रक्षण कर."
राजा अशी विनंती करीत असताही ती आपल्या पुत्राला घेऊन निघाली. तेव्हा मात्र राजा क्रुद्ध झाला व दु:खाने म्हणाला, "महापापिणि, तुझे आता काय करु ? तुला नरकाचेही भय नाही. तू पातक्याची कन्या असावीस. म्हणून पापतत्पर राहतेस. तू इच्छेला येईल तिकडे जा किंवा रहा. पण माझा पुत्र मला दे. तुझ्यासारख्या कुलनाशिनीशी मला कर्तव्य नाही."
तान्ह्या मुलाला घेऊन जात असताना ती स्त्री अडवणुकीमुळे संतप्त झाली. "हे राजा मला पुत्र हवा आहे. तू माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागल्यामुळे मी कोठेही निघून जाईन. केवळ देव कार्यासाठी मी गंगा आपल्या घरी आले. वसूना वसिष्ठांनी मनुष्य योनीत जन्म पावाल म्हणून शाप दिला होता. त्या चिंताक्रांत वसूंनी विनंता केल्यावर मी त्यांची माता झाले. त्यांना वर देऊन मी तुझी पत्नी झाले. देवकार्यासाठी मी उत्पन्न झाल्यामुळे तुझे पुत्र म्हणजे सात वसू शापमुक्त झाले आहेत. आता हा पुत्र मात्र दीर्घकाल राहील. मी त्याला घेऊन जाईन. त्याचे पालन करीन. हा आठवा वसू आहे. हा बलाने तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ होईल. हे भाग्यशाली राजा, मी जेथे तुला प्रथम वरले तेथे याला घेऊन जाते. त्याचा सांभाळ करुन हा यौवनात आला की तुझ्या स्वाधीन करीन. मातेवाचून पुत्र जिवंत राहणार नाही." असे सांगून पुत्रासह गंगा तेथेच गुप्त झाली. राजा दु:खी अंत:करणाने स्वगृही परतला. राज्य करीत असतानाही भार्या व पुत्र यांच्या वियोगामुळे तो नेहमी दु:खी असे.
असाच बराच काळ लोटल्यावर तो एकदा मृगयेसाठी बाहेर पडला. मृग, महिष, सूकर यांचा बाणांनी वध करीत शंतनुराजा गंगातीरावर आला. नदीत पाणी अत्यंतच कमी असलेले पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो जरा पुढे जाताच, त्याला एक बालक धनुष्यातून नदीच्या पात्रात बाण सोडीत असल्याचे दिसले. त्यामुळे नदीचे पाणी अडविले गेले होते. ते पाहून तो जास्तच चकित झाला. या बालकाचा प्राक्रम स्तिमित करणारा होता. त्याची शीर्घगति व मदनासारखे रुप पाहून राजाने विचारले.
"तू कोणाचे पुत्र ?" पण बाण सोडण्यात मग्न झालेल्या वीराने उत्तर दिले नाही आणि तो अकस्मात दिसेनासा झाला. तेव्हा चिंतातूर राजा विचार करु लागला. त्याने स्वस्थचित्त होऊन गंगेची स्तुति केली. पूर्वीसारखे आकर्षक रुप घेऊन गंगा राजापुढे उभी राहिली. सुंदर गंगेला राजा म्हणाला, "हे गंगे हा माझाच पुत्र काय ? तो मला दाखव."
गंगा म्हणाली, " राजा तुझा पुत्र आठवा वसू जिवंत आहे. त्याला मी तुझे हाती देते. तो सर्व वेद व धनुर्वेद यात निष्णात आहे व वसिष्ठ मुनींच्या आश्रमात याचे शिक्षण झाल्याने हा व्युत्पन्न आहे. सर्व व्यवहारात हा तरबेज आहे. प्रत्यक्ष परशुरामइतका याचा अभ्यास आहे. हा घे तुझा पुत्र."
असे म्हणून त्या बालकाला राजाच्या स्वाधीन करुन गंगा गुप्त झाली.
राजाने आनंदित होऊन बालकाच्या मस्तकाचे अवघ्राण केले व त्याला रथावर बसवून राजवाड्यात आणले. हस्तिनापुरात गेल्यावर राजाने पुत्रप्राप्तीमुळे संतुष्ट होऊन मोठा उत्सव केला. दैवज्ञ बोलावून शुभदिन विचारला व सर्व मंत्री, प्रतिष्ठित पौरजनांना जमवून त्या गंगानंदनाला राजाने युवराज्याभिषेक केला. नंतर तो सुखाने राहू लागला. त्याला गंगेचे स्मरणही नाहीसे झाले."
अशाप्रकारे गंगावतरण व अष्ट वसूंची उत्पत्ती ह्याबद्दल सविस्तर कथा सूताने ऋषींना सांगितली.