सूताने सांगितलेली घटना ऐकून ऋषींनी त्याला विचारले, "हे सूता, व्यासांची माता सत्यवती ही शंतनूला कशी प्राप्त झाली, याबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून ती कथा तू आम्हाला विस्ताराने सांग. धर्मनिष्ठ शंतनूने चारित्र्य हीन, कुलहीन अशा निषाद कन्येला कसे वरले ? शंतनूची पहिली पत्नी कोण ? भीष्माला वसूचा अंश कसा म्हणतोस ? तसे बुद्धीमान, शूर व जेष्ठ असूनही भीष्माने चित्रांगदाला व त्याच्या वधानंतर विचित्रवीर्याला का गादीवर बसवले ?
भीष्म व्युत्पन्न असताना धाकट्या भावाला राज्य का दिले ? अशाप्रकारचे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत. सुंदर सत्यवतीने भीष्माला राज्य दिले नाही. आपल्या सुनांकडून गोळकपुत्र निर्माण केले. भीष्माने विवाह केला नाही. धाकट्या भावांच्या पत्नीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करण्याचा अधर्म व्यासांनी केला. पुराणकर्ते व धर्मनिष्ठ व्यासांनी प्रत्यक्ष भ्रात्यांच्या स्त्रीचे सेवन केले. याची कारणे काय ? का तोही एक अधर्मच होता ? तेव्हा तू व्यासांचा शिष्य असल्याने, हे सर्व तू आम्हाला विस्ताराने सांग व आमच्या शंकांची निवृत्ती कर."
ऋषींचे हे बोलणे ऐकून सूत म्हणाला, "इक्ष्वाकू वंशात सत्यवान , धर्मशील, व चक्रवर्ती असा महाभिष नावाचा राजा होऊन गेला. त्याने हजार अश्वमेघ व शंभर वाजपेय यज्ञ केले. त्यामुळे इंद्र संतुष्ट झाला. शेवटी राजाला स्वर्गप्राप्ती झाली. तो एकदा ब्रह्मलोकी गेला होता. ब्रह्मदेवाच्या सेवेसाठी सर्व देव जमले होते. महानदी गंगाही तेथे उपस्थित होती.
इतक्यात जोराचा वारा आला आणि तिच्या शरीरावरचे वस्त्र उडू लागले. देवांनी माना खाली घातल्या पण माहाभिष राजा त्या गंगेकडे पहात राहिला. गंगाही प्रेमातुर होऊन त्याच्याकडे पाहात राहिली. ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या लक्षात येताच तो क्रुद्ध झाला व दोघांनाही शाप दिला की, मृत्युलोकावर तुम्ही जन्म पावाल व अनेक पुण्य करुन पुन: स्वर्गाला याल. तो शाप ऐकताच दोघेही खिन्न झाले व तेथून निघून गेले. राजाने विचार करुन कुरुवंशातील धर्मनिष्ठ अशा प्रतीप राजाचा पुत्र होण्याचे मनात योजले.
याचवेळी आपल्या स्त्रियासह अष्ठवसू क्रीडा करण्याकरता वसिष्ठांच्या आश्रमात आले होते. त्यांच्यातील श्रेष्ठ वसू द्यौ याच्या पत्नीने वसिष्ठांच्या नंदीनी नावाच्या गाईला पाहाताच, आपल्या पतीस विचारले, "ही गाय कुणाची ?" द्यौ म्हणाला,
"हे सुंदरी, ही वसिष्ठ मुनींची गाय आहे, स्त्री अथवा पुरुष दूध पिइल तो नित्य यौवन संपन्न राहतो व दहा हजार वर्षे जगतो.
हे ऐकताच ती स्त्री म्हणाली, "मृत्युलोकातील उशीनर राजाची कन्या माझी मैत्रीण आहे. तिच्यासाठी ही मनोरथ पूर्ण करणारी धेनु वत्सासह आपल्या आश्रमात आणा. म्हणजे इचे दूध पिऊन माझी मैत्रीण मनुष्यलोकीही सदा रोगरहित राहील."
आपल्या पत्नीचे भाषण ऐकून पृथिप्रभृति इतर वसूंच्या साहाय्याने, द्यौने ती गाय हरण केली. त्याच वेळी भगवान वसिष्ठ फळे घेऊन आश्रमात आले. तेव्हा धेनु व वत्स त्यांना दिसेनात. त्यांनी गुहा व डोंगर यातून शोध केला, पण ती सापडेना त्यांनी ध्यानाच्या योगाने वसूंनी नंदिनीचा अपहार केल्याचे ताडले. "वसूंनी माझा अपमान करुन धेनूचे हरण केले म्हणून ते सर्व मनुष्य जन्मास जातील."
धर्मात्मा वसिष्ठांचा शाप ऐकताच सर्व वसू दु:खाने परत फिरले व ऋषींची कृपा संपादन करुन उ:शाप मिळावा म्हणून वसिष्ठांकडे आले. त्यांना शरण गेले. नतमस्तक झालेल्या त्या दोन वसूंना मुनी म्हणाले," तुम्ही शापमुक्त व्हाल. एक वर्षही तुम्हाला मनुष्य योनीत राहावे लागणार नाही. पण दौ मात्र माझी नंदीनी हरण केली म्हणून दीर्घकाल मनुष्य योनीत राहील."
सर्व वसु शापभ्रष्ट झाल्यानंतर जाऊ लागले. वाटेत गंगानदीला नमस्कार करुन ते म्हणाले, "देवी नित्य अमृत सेवन करणार्या आम्हा देवांचे मनुष्याच्या उदरात कसे वास्तव्य होईल, याची आम्हाला चिंता वाटते. म्हणून हे देवी तू मनुष्यरुप धारण कर व आम्हाला जन्म दे. हे गंगे तू शंतनूची भार्या हो, आणि आमचा जन्म होताच, तू प्रत्येकाला नदीत टाकून दे. म्हणजे आम्ही शापमुक्त होऊ."
गंगेने ‘बरे’ म्हणून सांगताच सर्व वसू स्वस्थानी गेले. गंगाही विचार करुन निघून गेली. इकडे महाभिष प्रतीप राजाचा पुत्र झाला व शंतनू या नावाने प्रसिद्ध पावला.
प्रतीप राजा महातेजस्वी सूर्याची स्तुती करीत होता. इतक्यात समोरच्या उदकातून एक नयनमनोहर स्त्री प्रगट होऊन प्रतिपाच्या उजव्या मांडीवर बसली. मांडीवर बसलेल्या त्या स्त्रीकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहून राजा म्हणाला,"हे सुवदने तू माझ्या मांडीवर का येऊन बसली आहेस."
तेव्हा ती रुपयौवना म्हणाली, " राजा मी तुजवर प्रेम करते म्हणून तु माझा उपभोग घे."
राजा हसत मुखाने म्हणाला, "उत्कृष्ट पतीची अभिलाषा धरुन तू आली आहेस. पण मी काम वासनेने परस्त्रीगमन करणार नाहीच. शिवाय तु उजव्या मांडीवर बसलीस. हे स्थान अपत्यांचे व स्नुषांचे आहे म्हणून मला जेव्हा पुत्र होईल तेव्हा तू माझी स्नुषा हो. तुझ्या पुण्यामुळे मला निश्चित पुत्र होईल."
हे राजाचे बोलणे ऐकून, "ठीक" असे सांगून ती दिव्य कामिनी निघून गेली. राजाही त्याबद्द्ल विचार करीत घरी गेला. पुढे त्याला सुलक्षणी पुत्र झाला. तो तारुण्यात आल्यावर राजा एकदा वनात जाण्यास निघाला. तेव्हा त्याने पुत्राला पूर्वीची घटना सांगितली व म्हणाला, " ती रुपसंपन्न, सुलक्षणी यौवना जर तुझ्या दृष्टीस पडली व ती तुजकडे अभिलाषा धरुन आली तर तू नि:संशय तिचा स्वीकार कर. तू कुठली! कोण ? असे प्रश्न तिला विचारु नकोस. तू तिला धर्मपत्नी कर, अशी माझी आज्ञा आहे. तू निश्चित सुखी होशील.
अशाप्रकारे पुत्राला उपदेश देऊन व सर्व राज्य त्याच्या स्वाधीन करुन तृप्त मनाने राजा वनात गेला. तेथे त्याने महादेवीची आराधना केली व तिला प्रसन्न करुन घेतले. देहत्याग करुन शेवटी तो स्वतेजाने स्वर्गात गेला.
इकडे शंतनूने अत्यंत धर्माने राज्य केले व प्रजेला सुख दिले."