एकदा महातेजस्वी पराशर मुनी तीर्थ यात्रेला जात असता, यमुनेच्या काठावर आले. कोळी तिथे भोजन करीत बसला होता. त्याला पराशरांनी, 'मला पलीकडे पोहोचव' असे सांगितले. तेव्हा मुनींच्या शब्दाला मान देण्यासाठी तो कोळी आपल्या मुलीला म्हणाला, ''मत्स्यगंधे, तू या मुनीला पैलतीरावर पोहोचव. कारण यांना पलीकडे जायचे आहे.''
पित्याचे हे शब्द ऐकताच ती मत्स्यकन्या होडक्यात बसवून पराशर मुनींना पैलतीरावर नेऊ लागली. परंतु पराशर त्य सुंदर युवतीला पाहून कामविव्हल झाले आणि यौवनात परीपूर्ण पदार्पण केल्यामुळे जिचे स्तन पुष्ट झाले आहेत, अशा त्या मत्स्यगंधेच्या हाताला त्यांनी स्पर्श केला. तेव्हा ती सुहास्यवदना म्हणाली, ''आपण वसिष्ठपुत्र असून आपल्या कुलाला विद्येला व तपाला हे योग्य आहे का ? आपण मदनाने पीडित होऊन काय करण्याचे ठरविले आहे ? हे विप्रश्रेष्ठ, दुर्लभ अशा मानव जन्मात ब्राह्मणत्व मिळणे अधिक दुर्लभ. तेव्हा आपण व्युत्पन्न असूनही माझ्यासारख्या मत्स्यगंधेला पाहून, आपली बुद्धी विचलित का झाली ? हे अमोघज्ञानी द्विजा, माझ्याजवळ असे काय पाहिलेत म्हणून आपण कामातुर होऊन माझ्याजवळ येत आहात. शिवाय आपण धर्माकडेही लक्ष देत नाही.'' असे ती मुनींना म्हणाली.
ती मनात विचार करू लागली. '' पाण्यामध्येच हे मुनी माझा उपभोग घेण्यासाठी शृंगार मग्न होऊन मला स्पर्श करीत आहेत. बरे, त्यांना विरोध केला तर शाप मिळाल्यास पुन: तरणोपाय नाही, असा खोल विचार करून ती नम्रतेने मुनींना म्हणाली, ''हे महाभाग्यवान मुने, आपण पैलतीरावर जाईपर्यंत तरी धीर धरा.''
ते योग्य कारण ऐकताच पराशरांनी तिचा हात सोडला, ते नदीच्या पलीकडे गेले. मदनविव्हल मुनींनी पुनः मत्स्यगंधेचा हात धरला, ती थरथर कापू लागली आणि म्हणाली, ''हे मुनीवर्य, माझ्या देहाला येणार्या दुर्गंधीमुळे आपणाला शंका कशी येत नाही. स्त्री पुरुषाचे रूप सारखे असेल तरच रतिसंयोग सुखावह होतो. ''
तिचे भाषण ऐकताच पराशर मुनींनी एका क्षणात तिला सर्वांग सुंदर व खूप दूरवर सुगंध पसरेल असे दिव्य व संपन्न केले. अशाप्रकारे कस्तुरी प्रमाणे सुगंधित केल्यावर पराशरांनी पुनरपि तिचा हात धरला. पण शुभलक्षणी व सत्यवादी म्हणून प्रसिद्धी पावलेली ती सुंदरी म्हणाली, हे मुनवर्य, लोक पाहात आहेत. शिवाय पिताही पलीकडे आहे. तेव्हा हे पशुतुल्य सुख आनंद देत नाही. म्हणून आपण रात्र होईपर्यंत थांबा. कारण मनुष्याला धर्माप्रमाणे रात्री संभोग सांगितला आहे. दिवसा समागम केल्यास महादोष लागतो आणि इतर माणसेही पाहात आहेत. रात्र पडेपर्यंत आपली कामवासना आवरून धरा.''
हे तिचे भाषण ऐकताच, पराशरमुनींनी आपल्या बलाने तिथे धुके उत्पन्न करून अंधार केला. तेव्हा ती सुवदना म्हणाली, ''महाराज, मी कुमारी आहे. आपण माझा उपभोग घेऊन निघून जाल. आपले वीर्य निश्चितच वाया जाणार नाही. तेव्हा मला गर्भ राहिल्यावर मी पित्याला व इतरांना कसे तोंड दाखवू ? पुढे माझी काय अवस्था होईल ? तेव्हा मी कसे वागावे हे मला सांगा.''
पराशर म्हणाले, ''माझी इच्छा पूर्ण केल्यावरही तू कन्याच राहशील. हे भित्र्या स्त्रिये, तूर इच्छेस येईल तो वर माग.''
"हे मुनीश्रेष्ठ, जगात, माझ्या पितरांनाही न समजेल व माझ्या कौमार्याची हानी न होईल, असे आपण करा. तसेच मला आपल्यासारख्या अद्भूत वीर्यवान पुत्र व्हावा. तसेच मी सर्वदा असेच सुस्थितीत असावे, माझी यौवनावस्था नित्य नवी असावी.
'' हे सुंदरी, विष्णूच्या अंशापासून तुझ्या ठिकाणी शुभ पुत्र होईल. तो त्रैलोक्यात ख्याति पावेल मी ज्या अर्थी तुझ्याविषयी कामातुर झालो आहे, त्या अर्थी तसेच काहीतरी न सांगता येण्यासारखे कारण असले पाहिजे. दैव कुणालाही ओलांडता येत नाही. दुर्गंध-युक्त असूनही मला तुझा मोह का व्हावा ? असो. तुझा पुत्र पुराण कवी होईल. वेदवेत्ता होऊन वेदांचे विभाग करील.''
असे सांगून त्या सुंदरीला वश करून घेऊन पराशरमुनींनी तिचा उपभोग घेतला. नंतर यमुनेच्या पाण्यात स्नान करून ते वेगाने निघून गेले. व सत्यवती त्या चक्षणी गर्भिणी झाली. योग्यसमयी मदनालाही मागे सारील असा सुंदर पुत्र यमुनेच्या बेटामध्येच तिला प्राप्त झाला. थोडा मोठा झाल्यावर तो महाबली पुत्र मातेला म्हणाला, ''हे माते तू यथेष्ट गमन कर. मी कुठेतरी तपश्चर्या करण्याकरता जातो. तू केव्हांही स्मरण करताच, हे माते, मी तुला दर्शन देईन. ''
सत्यवतीचे कल्याण चिंतून व्यास निघून गेले. द्वीपातच त्यांचे बालपण गेल्यामुळे त्यांना द्वैयापन हे नाव मिळाले. सत्यवती आपल्या पित्याकडे पूर्ववत राहू लागली होती. विष्णूचा अंश व्यासांचे ठिकाणी असल्याने तो जन्मतःच वृद्धिंगत झाला. निरनिराळ्या तीर्थांची स्थाने करून त्यांनी तपश्चर्येस सुरुवात केली. पुढे कलियुग आल्यानंतर त्यांनी वेदांचे भाग केले. विभागावर वेदांचा विस्तार केल्यामुळे त्यांना लोक व्यास म्हणू लागले. त्यांनी पुराण संहिता व महाभारताची रचना केली. असित, देवल पुत्र शुक, सुमंत, जेमिनी, पैल, वैशंपायन, या शिष्यांना व्यासांनी वेदांचे विभाग शिकविले. अशाप्रकारे सत्यवती व तिचा सुपुत्र यांची निर्मिती झाली. सर्वांनी मुनींचा वागण्यातील गुणच उचलले पाहिजेत. कारण न सांगता येणार्या भवितव्यासाठीच काही गोष्टी घडत असतात. नाही तर मत्स्योदरामध्ये सत्यवती जन्माला येऊन पराशरांशी तिचा संयोग व्हावा व पुढे तिचे शंतनूनी पाणिग्रहण करावे, ह्या घटना कशा संभवतील ? शिष्टसंमत नसलेले कार्य त्या मुनिवर्यांच्या हातून घडले कसे ? म्हणूनच ही आश्चर्यकारक घटना मी तुम्हाला विस्ताराने कथन करीत आहे.''
असे सूत ऋषींना म्हणाला. हे कथानक जो ऐकेल तो पापमुक्त होतो.