[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासांचे वेदाभ्यासाविषयी तत्पर असलेले असित, देवल, वैशंपायन, जेमिनी, सुमंतु इत्यादी शिष्य व्यासांची आज्ञा घेऊन भूतलावर गेले, शुकालाही उत्तम गती प्राप्त झाल्यामुळे शोक विव्हल होऊन न्यासांनी आपले ठिकाण सोडण्याचे ठरविले. पूर्वी व्यासांनी जान्हवीच्या तीरावर मातेला शोकाकल अवस्थेत सोडले होते. तिची त्यांना आठवण झाली. निषाद कन्या सत्यवतीची स्मृति येताच ते पुनः आपल्या जन्मभूमीकडे जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर माता सत्यवती कोठे गेली, याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा निषादाने त्यांना सांगितले की ती राजाला दिली. नंतर निषाद राजानेही व्यासांची पूजा केली व सत्कार करून, तो हात जोडून म्हणाला, “ हे मुने, आज मी धन्य झालो. देवदुर्लभ असे आपले दर्शन मला माझे कुलही पावन झाले. तेव्हा हे द्विजश्रेष्ठा, आपण का येणे केले ते सांगा. हे प्रभो, भार्या, धन, पुत्र हे सर्व आपल्याच हातात आहे.
राजाचे समाधान केल्यावर, मन स्वस्थ करून व्यासांनी सरस्वतीच्या तीरावर एक आश्रम स्थापन केला व तेथेच ते राहू लागले. अत्यंत तेजस्वी सत्यवतीला शंतनुराजापासून दोन पुत्र झाले. ते आपले भाऊ आहेत, हे समजल्यावर व्यासाना आनंद झाला. चित्रांगद हा राजाचा मोठा मुलगा व विचित्रवीर्य हा धाकटा. हे दोन्ही पुत्र सर्वगुणसंपन्न होते. त्यामुळे शंतनू सुखी झाला. महापराक्रमी व गंगानंदन भीष्म हा राजाचा सर्वात ज्येष्ठ पुत्र. तसेच सत्यवतीपासून झालेले पुत्रही महापराक्रमीच होते. ही शूर मुले पाहून राजाला वाटले आपण देवांनाही हार जाणार नाही. काही कालानंतर शंतनूने देहाचा त्याग केला.
राजा मृत्यू पावल्यावर भीष्माने सर्व विधी धर्माप्रमाणे पार पाडले. नाना तर्हेची दाने दिली. नंतर चित्रांगदाची गादीवर स्थापना केली. पण स्वतः राज्याधिकारी झाला नाही. म्हणून त्याला देवव्रत हे नाव मिळाले. आपला बलाचा गर्व झाल्याने चित्रांगद राजा इतरांना त्रास देऊ लागला. एकदा तो प्रचंड सैन्य घेऊन ररू, मृगांचा वध करीत अरण्यात संचार करीत होता. त्याचवेळी चित्रांगद गंधर्व, श्रेष्ठ अशा विमानांतून चालला होता. पण राजाला अवलोकन, करताच तेथेच जवळ उतरला. तेव्हा कुरुक्षेत्रावर त्या तुल्यबल असलेल्या उभयतांमध्ये दारुण युद्ध तीन वर्षेपर्यंत झाले. शेवटी गंधर्वाने चित्रांगद राजाचा वध केला व तो इंद्रलोकी निघून गेला. हे भीव्याला समजताच त्याला अतीव दुःख झाले. भावाचे क्रियाकर्म करून भीष्माने धाकटा भाऊ विचित्रवीर्य याला राज्याभिषेक केला. सत्यवती दुःखी होती. पण सर्व मुनी व इतर श्रेष्ठ जनांनी तिचे सांत्वन केले व दुसर्या पुत्राला गादीवर बसवलेला पाहून ती काहीशी शांत झाली. भाऊच राजा झाला म्हणून व्यासांनाही समाधान वाटले.
विचित्रवीर्य यौवनावस्थेत आल्यावर त्याच्या विवाहाची चिंता भीष्मांना वाटू लागली. काशी राजाला तीन सुंदर कन्या होत्या त्यांचा विवाह स्वयंवर पद्धतीने करावा, असे राजाने प्रसिद्ध केले होते. त्यासाठी सर्व राजे व राजपुत्रांना निमंत्रणे दिली होती. तेथे गेल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येत होता. तेथे जाऊन महापराक्रमी भीष्माने स्वतःचा एक रथ बरोबर घेऊनही, तेथील सर्व उपस्थित राजांचा पराभव केला व त्या कन्यांचे हरण केले. ते हस्तिनापूरला परत आले. त्या तिन्हीही मुली आपल्या माता, भगिनी, कन्याच आहेत याच भावनेने भीष्मांनी त्यांना आणले होते. त्यांना सत्यवतीचे स्वाधीन करून विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून भीष्माने आपल्या विचित्रवीर्य नावाच्या भावाबरोबर त्यांचा विवाह ठरविला. तेव्हा सर्वात थोरली व सुंदर मुलगी पुढे येऊन लाजत लाजत भीष्माला म्हणाली, “हे गंगानंदना, हे श्रेष्ठा, मी मनाने शाल्व राजाला वरले आहे, आणि त्यानेही मला अंतःकरण पूर्वक वरले आहे. तेव्हा आपण योग्य दिसेल तसे करा. तू धर्मनिष्ठ आहेस. तेव्हा इच्छेला येईल तसे कर.
धर्मवेत्या भीष्माने आपल्या सचिवांशी विचारविनिमय केला व त्या मुलीला सांगितले, “हे सुंदरी तू आपल्या इच्छेप्रमाणे जा.” हे ऐकताच ती सुंदरवदना शाल्व राजाकडे गेली व म्हणाली, "महाराज, मी आपल्याला मनापासून वरले आहे; असे समजल्यावर भीष्माने धर्मबुद्धीने वागून मला मुक्त केले. आपण माझे पाणीग्रहण करावे. मी आपली धर्मपत्नी होईन. मी पूर्वीपासून आपल्याच विषयी मनात चिंतन करीत होते व आपणही तसेच केले आहेत. हे सत्य आहे."
शाल्व म्हणाला, “ हे सुंदरी, भीष्माने माझ्या समक्ष तुला आपल्या रथावर घेतले म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही. दुसर्याच्या उच्छिष्टाचा कोण स्वीकार करील ? तुला भीष्माने टाकून दिले आहे. दुसर्याचे धन म्हणून तू माता आहेस. असे मी समजतो.”
अशा प्रकारे शाल्वराजाने त्याग केल्यावर ती पुनः रडत आक्रोश करीत भीष्माकडे आली व म्हणाली, "शाल्व माझा स्वीकार करीत नाही, तेव्हा आपणच माझा स्वीकार करावा. आपण धर्मज्ञ आहात. आपण स्वीकार न कराल तर मला काही भलतेच करावे लागेल.” भीष्म म्हणाले, “हे सुंदरी, जिचे मन दुसर्याचे ठिकाणी स्थिर आहे. तिचा मी भावाकरता का होईना पण कसा स्वीकार करू ? तेव्हा तू पित्याकडे जा.”
हे ऐकताच ती सी वनात जाऊन अतिपवित्र अशा तीर्थावर तपश्चर्या करू लागली.
काशी राजाच्या शुभ कन्या अंबालिका आणि अंबिका या दोघी विचित्रवीर्याबरोबर विवाहबद्ध झाल्या. तो राजा आपल्या स्त्रियांसह क्रीडा, उद्योग यामध्ये मग्न झाला. अशा तर्हेने सुख भोगत असलेला राजा विचित्रवीर्य, एक वर्षांनी क्षय रोगाने मरण पावला. सत्यवती अत्यंत दुःखी झाली. पुत्राची उत्तरक्रिया व सर्व संस्कार तिने करून घेतले व दुःखित होऊन ती भीष्माकडे आली. ती त्याला म्हणाली, “हे भाग्यवान शंतनुपुत्रा, तू आता राज्यावर बैस किंवा नियोगविधीने भ्रात्यांच्या भार्येचा स्वीकार करून, तू त्यांच्या वंशाचे रक्षण कर. म्हणजे ययातीचा वंश नष्ट होणार नाही."
भीष्म म्हणाले, “माते, मी राज्य अथवा विवाह करणार नाही, अशी प्रतिज्ञा पित्याकरता केली आहे, हे तुला माहीतच आहे.” हे ऐकताच आता मला सुख प्राप्त होणार नाही असा विचार करून सत्यवती चिंताक्रांत झाली. तेव्हा भीष्म म्हणाले, “है माते, काळजी करू नको. विचित्रवीर्याला क्षेत्रज पुत्र होईल अशी व्यवस्था कर. म्हागजे कुलीन द्विजाकडून आपल्या सुनांशी त्यांचा संबंध कर. अशाप्रकारे कुलरक्षणासाठी वेदात दोष सांगितला नाही. असे नातू उत्पन्न करून तू त्याला राज्य दे. मी त्याचीच आज्ञा पाळून राहीन."
सत्यवतीने कुमारी अवस्थेत झालेला आपला पुत्र द्वैपायन व्यास, याचे मनात स्मरण केले. तेव्हा व्यास तेथे आले व मातेला त्यांनी प्रणाम केला. भीष्माने त्यांची यथासांग पूजा केली. सत्यवतीनेही त्यांना योग्य तो मान दिला. त्यानंतर प्रति अग्नी असलेले व्यास, नम्रतेने उभे राहिले. तेव्हा व्यासमाता म्हणाली, “तू विचित्रवीर्याच्या स्त्रियांच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर."
मातेची इच्छा शिरसावंद्य मारुन, व्यास ऋतुकालाची वाट पाहात थांबले. नंतर विचित्रवीर्याची पत्नी अंबिका हिचे ऋतुरनान, झाल्यावर व्यासांशी तिचा समागम झाला. पराक्रमी पण अंध असा पुत्र तिचे ठिकाणी उत्पन्न झाल्याने सत्यवतीला दुःख आले. ती व्यासांना म्हणाली, “दुसर्या सुनेला पुत्र होईल असे कर.” नंतर ऋतुकालानंतर अंबालिकेशी समागम केला. तिला पांढुरवर्णाचा पुत्र झाला. तो राज्याला योग्य म्हणून मान्य होईना. अखेर सत्यवतीने वर्षानंतर व्यासांना पुनः बोलावले व सुशोभित शयन मंदिरात त्यांना पाठविले, व आपल्या सुनेला पुनः पुत्रप्राप्तीसाठी जाण्यास सांगितले. पण तेथे सत्यवतीच्या सुनेने स्वतः न जाता आपली दासी पाठविली. तिच्या ठिकाणी विदुर उत्पन्न झाला. हा शुभ व यमधर्माचा अंश होता. अशाप्रकारे व्यासमुनींनी वंशकुल रक्षणार्थ तीन महाबलाढ्य पुत्रांना उत्पन्न केले. भ्रातृधर्म जाणून व्यासमुनींनी कुलाचे रक्षण केले.
॥ प्रथमः स्कन्धः समाप्तः ॥ अध्याय विसावा समाप्त स्कन्ध पहिला समाप्त