[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शुकाने विचारले," महाराज मायेत गुरफटलेला पुरुष नि:स्पृह कसा ? ही शंका माझ्यामनात निर्माण झाली आहे. शास्त्रांचे ज्ञान मिळाले तरी नित्यानित्य विवेक जोवर साधला नाही तोपर्यंत मन मोहरहोत होत नाही. तेव्हा असा पुरुष मुक्त कसा ? नुसत्या दिव्याची गोष्ट सांगितली, म्हणजे काही अंधार नाहीसा होत नाही. तसेच केवळ ज्ञानप्राप्त झाले म्हणजे अंत:करणातील अज्ञानरुप अंधार नाहीसा होणार नाही; म्हणून ज्ञानी पुरुषांनी कधीही प्राण्याचा द्रोह करु नये. पण गृहस्थाला हे कसे जमणार? संपत्तीची लालसा, राज्यसुखाची लालसा व युद्धात विजयाची लालसा ह्या जर तुझ्या ठिकाणच्या नष्ट झाल्या नाहीत तर हे राजा, तू मुक्त कसा ? चोर व तपस्वी यातील भेद अजूनही तुझ्याजवळ आहे, हे निश्चित आहे; तर तू विदेही कसा ? तिखट, तुरट, आंबट चांगले, वाईट तू जाणतोसच. वाईट माणसाला आवडत नाही. निद्रा, जागृति, सुषुप्ती या अवस्था तुझ्याठिकाणी नित्य कशा ? पदाति, अश्व, रथ व गज हे सर्व तुझ्या आधीन असून तूच सर्वांना प्रभू आहेस. हे तर तुला वाटते ना? तसेच तू नेहमी मिष्टान्न भोजन करीत असतोस. कधी तू उदास होतोस, तर कधी आंनदीत. माळ व साप यांना तू एकच मानत नाहीस. अशा अवस्थेत तुला समदृष्टी कशी प्राप्त होणार ? हे राजा मातीचे ढिकूळ, दगड वा सुवर्ण ही मुक्त माणसाला सारखीच असतात. सर्वा ठिकाणी आत्मा एक आहे, असे ज्याला वाटते, तो सर्व प्राण्यांचे हित करतो.
गृह, भार्या वगैरे गोष्टीत त्याचे मन रमत नाही, एकाकी व अत्यंत निरिच्छ राहून पुण्य संचय करावा असे मला वाटते. कशाचीही आसक्ति न बाळगता, हे माझे, अशी भावना न ठेवता, द्वैताचा त्याग करुन, कोणत्याही उपाधीचा स्वीकार न करता मी शांत राहीन. मी मुळे, फळे यावर उपजीविका करीन. मृगाप्रमाणे विहार करीन. हे राजा, माझी वृत्ती विरक्त झाल्यामुळे गुणांचा माझ्याशी संबंध राहिला नाही. म्हणून गृह, भार्या, वित्त यांशी मला काय कर्तव्य? नाना इच्छा आणि अनेक आकारांनी युक्त अशा गृहाचे तू चिंतन करतोस. पण ‘मी मुक्त आहे’ असे सांगतोस. तेव्हा हे तुझे ढोंग असावेसे वाटते. तुला शत्रू, धन, वा सैन्य यांबद्दल कधी ना कधी चिंता असणारच. मग तू नि:श्चिंत केव्हा असतोस ?
मित आहारी, आपले स्वीकृत कृत्य निष्ठेने करणारे, वैखानसमुनी संसाराची अस्थिरता जाणूनही संसारात मोहित होतात. तेव्हा तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्यांना विदेह हे नाव थट्टेने दिलेले असावे. विद्याधर नावाचा मूर्ख, दिवाकर नावाचा अंध, लक्षीधर नावाचा दरिद्री हे जसे, असावेत तसे तुझ्या वंशातील पुरुषांचे नांवही निरर्थक आहे. तुझ्या वंशात उत्पन्न झालेले विदेह नावाचे राजे हे कृतीने नसून फक्त नावानेच विदेह होत असे ऐकतो. तुझ्याच कुलात निमी म्हणून एक राजा होऊन गेला. त्याने आपले गुरु वसिष्ठ यांना यज्ञाकरता निमंत्रण दिले. तेव्हा वसिष्ठ राजाला म्हणाले, "देवराज इंद्रानेही मला आताच यज्ञाकरता निमंत्रण दिले आहे. म्हणून त्याचा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी तुझा यज्ञ करीन. तोपर्यंत तू सामानाची जुळवाजुळव कर."
वसिष्ठमुनी यज्ञासाठी इंद्राकडे गेले असता इकडे निमीने अन्य गुरु करून आपला उत्कृष्ट यज्ञ पूर्ण केला. हे समजताच वसिष्ठांना राग आला, त्यांनी शाप दिला, "हे गुरुलोपका तुझा देह पतन पावो." हे ऐकताच राजानेही शाप दिला, "आपलाही देह पतन पावो." एकमेकांच्या शापामुळे त्या दोघांचेही देह पतन पावले असे मी ऐकतो.
पण राजा, जो निमीराजा विदेही होता त्याने गुरुला कसा शाप दिला ? हे नृपश्रेष्ठा, हे विदेही हे नाव मला तरी विनोदाप्रमाणे वाटते."
यावर जनक म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, तू सत्य बोललास, यात संशय नाही. पण माझे गुरु व्यास ही मान्यवर व्यक्ती आहे हे लक्षात ठेव. त्यांनी सांगितले ते सत्यच आहे. पित्याचा सहवास डावलून तू वनात जायची इच्छा करतोस. पण तेथे तुझा मृगांशी संबंध जडेल. कारण पंचमहाभूते सर्वत्रच असल्याने तू संगरहित होणार कसा ? तसेच आहारासाठी नित्य चिंता असताना तू निश्चिंत होणार नाहीस. वनातही तुला कंद व अजिन ह्यांची चिंता राहणारच, तेव्हा मला शंका वाटते, संशयाने पीडीत होऊन तू दूरदेशी आलास पण मला विकल्प संदेह नसल्याने मी निर्विकल्प आहे, हे द्विजश्रेष्ठा, मी सुखानेच निद्रासुख, भोजनसुख भोगत असतो, "मी बद्ध नाही." अशी माझी वृत्ती असल्याने मी सुखी आहे, पण ‘मी बद्ध आहे’ असे समजून तू दु:खी झाला आहेस, म्हणून शंका टाकून मन स्थिर कर व सुखी हो, हा देह, हे धन, हे राज्य माझे आहे, हा बंध आहे; व हे माझे नाही; हीच मुक्तता आहे. असा नियमच आहे.
अशाप्रकारे जनकाचे उत्कृष्ट भाषण ऐकून शुकाचे समाधान झाले, शुक प्रसन्न झाला व राजाचा निरोप घेऊन आपल्या पित्याकडे येण्यास निघाला. पुत्र येतो आहे. हे पाहून व्यासांनाही आनंद झाला त्यांनी शुकाला आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले. त्याचे कुशल विचारले. नंतर वेदशास्त्र संपन्न असा तो शुकमुनी पित्याजवळ आश्रमात राहू लागला. विदेही जनकाची उत्तम स्थिती पाहून त्यालाही आश्रमात सुख वाटू लागले. पितरांची पीवरी म्हणून एक सुंदर कन्या होती. तिला शुकाने योगामार्गात असताही पत्नी म्हणून स्वीकारले, शुकापासून तिला कृष्ण, गौरप्रभ, भूरी, देवश्रुत, असे चारपुत्र व कीर्ती नावाची कन्या प्राप्त झाली. शुकाने विभ्रजाचा पुत्र महात्मा अणुह याजबरोबर तिचा विवाह करुन दिला, अणुलाही तिच्यापासून अत्यंत संपन्न, प्रतापी, ब्रह्मदत्ता, भूपाल असा ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला, त्याला पुढे नारदाचा उपदेश होऊन ज्ञानप्राप्ती झाली मग योगमार्गाचा अवलंब करुन व राज्य पुत्रांचे स्वाधीन करुन, तो बद्रिकाश्रमात गेला, तेथे त्याला नारदमुनींच्या प्रसादाने मुक्ती देणारे निर्मल ज्ञान प्राप्त झाले.
इकडे पित्याच्या संगतीचा त्याग करुन व संतति पराङ्मुख होऊन शुक कैलासावर जाऊन समाधी लावून बसला. उत्तम सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तो कैलासावरुन उडाला व आकाशात सूर्याप्रमाणे तळपू लागला. शुक उडून जाताच पर्वत शिखर दुभंगले इतरत्रही उत्पात झाले. पण वायूप्रमाने शुक आकाशात संचार करु लागला. देवही त्याची स्तुती करु लागले. तो जणू प्रति सूर्यच भासू लागला. पण व्यास विरहाने दु:खी झाले. ‘हे पुत्रा’, असे म्हणून ते शोक करु लागले. शुक असलेल्या पर्वत शिखरावर ते गेले. व्यास दीन झालेले पाहून साक्ष म्हणून सर्व भूतांचे ठिकाणी असलेल्या शुकाने प्रतिध्वनि केला. अजूनही त्या पर्वत शिखरावर अस्पष्ट प्रतिध्वनि होत असतो. व्यासांचा आक्रोश ऐकून शिव तेथे आले व व्यासांना म्हणाले,
"हे व्यास, तू शोक करु नकोस. तुझ्या सर्वश्रेष्ठ पुत्राला दुर्लभ गति प्राप्त झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या ब्रह्मवेत्त्याने शोक करणे योग्य नाही. उलट त्या पुत्रामुळे तुझी कीर्ती वाढली आहे."
व्यास म्हणतात, "हे सुरश्रेष्ठा, शोक नाश पावत नाही. मी तरी काय करु ? पुत्रदर्शनावाचून माझे नेत्र तृप्त होत नाहीत."
शिव म्हणाले, "तुझ्याजवळ तुझ्या पुत्राची छाया दृष्टीस पडेल, ती पाहून घे व शोक आवर."
इतक्यात पुत्राची अत्यंत तेजस्वी छाया व्यासांच्या दृष्टीस पडली. व्यासांना वर देऊन शंकर तेथेच गुप्त झाले. त्यानंतर शुक विरहाने संतप्त व दु:खी झालेले व्यास, आपल्या आश्रमात परत आले.