[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
असे सांगून शुक पित्याच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, " हे महाभाग्यवान, आपला उपदेश मी ग्रहण करतो. मी जनकाकडे जाऊन त्याच्या अधिपत्याखालील विदेह देशअवलोकन करुन तो राजा दंडाशिवाय कसे राज्य करतो हे पाहतो माझी माता वंध्या आहे, असे म्हणण्याप्रमाणे मला जनकाचे चरित्र भासत आहे."
जनकाला भेटण्यास उत्सुक असलेल्या आपल्या पुत्राला प्रेमलिंगन देऊन व्यास म्हणाले, "दीर्गायुषी हो. तेथून तू परत इकडे ये. कोणत्याही प्रसंगी तू इतरत्र जाऊ नकोस. कारण तू दृष्टीसमोरुन दुरावलास म्हणजे मला वाईट वाटते. तू माझा प्राण आहेस. जनकाची भेट झाल्यावर तुझा संदेह नाहीसा होईल. मग वेदाध्ययन करुन तू सुखाने येथे राहा."
शुकाने व्यासांना प्रदक्षिणा घातली आणि त्वरेने तो तेथून निघून गेला. वाटेत अनेक देश, अनेक वने, फळफुलांनी संपन्न भूमीप्रदेशाचे दर्शन घेत व ठिकठिकाणच्या ऋषी, मुनी व याचकांना अवलोकन करीत तो निघाला. शैव, पाशुपत, सौर, उक्त वैष्णव पाहात आणि धर्मावर लक्ष स्थिर करुन तो जात असता त्याला क्षणोक्षणी आश्चर्य वाटू लागले. दोन वर्षात मेरु पर्वत त्याने उल्लंघिला व एक वर्षानी तो हिमालयपर्यंत पोहोचला. तेथून मिथिला नगरीत आला. तेथील प्रजा सुखी, सदाचारी व सर्व प्रकारांनी संपन्न होती. मिथिला नगरीजवळ द्वारपालाने त्याला अडविले. " तू कोण? कोठला व कशासाठी आलास?" असा प्रश्न शुकाला विचारला. परंतु शुक काहीच बोलला नाही. द्वारातून बाहेर पडून तो निश्चल उभा राहिला व स्वत:शीच हसू लागला. तेव्हा द्वारपाल म्हणाला, " हे ब्राह्मणा, तू मुका आहेस का? तू काही काम असल्याशिवाय आला नाहीस असे वाटते. हे द्विजा, राजाच्या आज्ञेनेच येथे प्रवेश मिळत नाही. तू तेजस्वी दिसतोस खरा, तरी तुजे कुल व शील सांग आणि नगरात प्रवेश कर."
शुक म्हणाला, " तुझ्या बोलण्यावरुन मी ज्या कामासाठी आलो ते प्राप्त झाले. विदेह नगर पाहण्यासाठी व राजाची भेट घेण्यासाठी दोन पर्वत ओलांडून येथे येण्याची मला दुर्बुद्धी झाली. पण पित्यानेच माझी फसवणूक केल्याने कुणालाही दोष देता येत नाही. निरिच्छ मनुष्य सुखी होतो. तरीही मी ह्या मोहसागरात पडलो. अरे, मेरुपर्वत आणि मिथिला नगरी किती अंतर हे! शेवटी काय फळ मिळाले? दैवाने माझा घात केला हेच खरे. पण आज शुभ वा अशुभ कर्म मला भोगलेच पाहिजे. नशीबच माणसाला उद्योग करायला लावते. त्यात काही तीर्थही नाही व देवही नाही. तेव्हा येथे येण्याचे श्रम मी का घेतले? नगर असून प्रवेश नाही. राजा असून विदेही." असे म्हणून शूक पुन: स्तब्ध राहिला.
त्यावरुन कोणीतरी महाज्ञानी श्रेष्ठ पुरुष आला असावा असे द्वारपालाला वाटले. तो क्षमा मागून म्हणाला, " महाराज आपले इच्छित प्राप्त करुन घेण्यासाठी कोठेही जा. माझा अपराध घडला, तरी क्षमा करावी."
शूक म्हणाले, "यात तुझा दोष नाही. तू परतंत्र आहेस. सेवकाने स्वामीकार्य केलेच पाहिजे. म्हणून तू मला अटकाव केलास. तसे राजाकडेही दोष नाही. कारण राजाने चोर, शत्रू यांची चौकशी केलीच पाहिजे.
मीच दोषी म्हणून येथे आलो. परगृही जाणे हे कमीपणाचे आहे."
द्वारपाल म्हणाला "हे ब्रह्मज्ञ, सुख-दु:ख कोणते ? कल्याणाची इच्छा असणार्याने काय करावे ? शत्रू वा मित्र कोण ? हे आपण मला कथन करा."
शुक म्हणाला, सर्वत्र अनुरक्त व विरक्त असे दोन प्रकारचे जन दृष्टीस पडतात. शास्त्रजन्य व मतिजन्य असे दोन प्रकारचे चातुर्य आहे. ते योग्य व अयोग्य असे असते."
महाराज मी विद्वान नसल्याने आपण सांगितलेत ते आता विस्ताराने कथन करा." द्वारपाल नम्रतापूर्वक म्हणाला.
"ज्याचे संसारात मन असेल, त्याला अनुरक्त म्हणतात. त्याला अनेक प्रकारचे दु:ख आणि दोन प्रकारचे सुख मिळते ते न प्राप्त झाल्यास दु:ख होते. म्हणून योगाने, सुख होणारा उपाय योजावा. जो त्याच्या सुखात विघ्न आणतो तो शत्रू होय. सुख देणारा अनुरक्त पुरुष मित्र होय. चतुर मोह पावत नाहीत. मूर्ख मोहावश होत असतात. आत्म्याविषयी अनुरुक्त असलेला विरक्त पुरुष म्हणजे एकांताचे अवलंबन, आत्मचिंतन, वेदांत विचार असून, संसार कथन हे दु:ख होय.शुभेच्छु ज्ञानी पुरुषाला काम, क्रोध, प्रमाद वगैरे पुष्कळ शत्रू असतात. संतोषासारखा त्रिभुवनात दुसरा बंधू नाही."
शुकाचे हे भाषण ऐकून तो ज्ञानी आहे, असे जाणून द्वारपाल शुकाला घेऊन रमणीय चौकात गेला. तो विधेय वस्तूंनी समृद्ध असा चौक होता. त्यात खरेदी-विक्री करणारे; राग, द्वेश, काम, मोह यांनी व्याप्त असलेले, विवाद करणारे जन अवलोकन करीत, ते महानगर पहात पहात, तो राजमंदिराकडे चालला. प्रतिसूर्यासारखा तेजस्वी शुक राजप्रसादाजवळ आला. तेथेही द्वारपालाने अडविले म्हणून मोक्षाची इच्छा करीत तो तेथेच उभा राहिला. छाया व ऊन हे समान मानणारा तो तेजस्वी एकांतस्थानाप्रमाणेच तेथेही ध्यान करु लागला. थोड्याच वेळात राजाचा अमात्य तेथे येऊन त्याला नम्रतापूर्वक प्रणाम करुन राजवाड्याच्या दुसर्या चौकात घेऊन गेला.
तेथे दिव्य, मनोहर, प्रफुल्ल असे रमणीय वन होते. तेथे शुकाचे अदरातिथ्य करण्यात आले. गानशास्त्र निपुण, कामशास्त्र प्रविण अशा तेथील वारांगनांना शुकाची सेवा करण्याची आज्ञा देऊन आमात्य पुढे गेला. शुक तेथेच थांबला. तेथील स्त्रियांनी त्याचे विधीपूर्वक पूजन करुन नाना प्रकारच्या अन्नाने त्याला संतुष्ट केले. नंतर त्या मदनविव्हल स्त्रियांनी त्याला अंत:पुरातील रमणीय वन दाखविले. शुक तरुन, रुपवान सौदर्यसंपन्न व मनोहर होता. त्याला पाहून त्या स्त्रिया मोहित झाल्या. परंतु मुनी जितेंद्रिय आहे, हे समजल्यावर त्या शुकाची सेवा करु लागल्या. अरणीपुत्र, शुद्ध अंत:करणाच्या शुकाने सर्वांबद्दल मातृभाव मने धरला. क्रोध जिंकून, हर्ष खेदापासून अलिप्त राहिला. उत्कृष्ट शृंगारलेली मोहक शय्या त्याच्यासाठी तयार करण्यात आली. पण दर्भधारी शुक पादप्रक्षालन करुन व सांयसंध्या उरकून ध्यानस्थ राहिला. एक प्रहरानंतर त्याने शयन केले. दोन प्रहर निद्रा घेऊन तो उठला. रात्रीचा शेवटचा प्रहर त्याने ध्यानातच घालविला. स्नानादि प्रात:कृत्ये करुन तो पुन्हा स्वस्थचित्त राहिला.