[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शुक म्हणतात- हे तात, दु:खदायक असलेल्या गृहस्थाश्रमाचा मी स्वीकर करणार नाही. कारण गृहस्थाश्रम हा जाळ्याप्रमाने आहे. द्रव्यचिंतेने व्याप्त झाले असता त्यांना सुख कसे वाटणार ? निर्धन व लोभी जनांना स्वजनांचीच पीडा होत असते. त्रैलोक्याचे वैभव मिळूनही इंद्रही सुखी नाही. मग संसारात कोण सुखी होणार ? एखाद्या तपस्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्र नित्य विघ्ने आणीत असतो. ब्रह्मदेव सुखी नाही. मनोहर लक्ष्मी प्राप्त झाली असूनही विष्णूला सुख नाही. कारण त्याला नित्य असुराशी संग्राम करावा लागतो. तो रमापतीही दुर्धर तपश्चर्या करीत असतो. शंकरालाही दैत्याशी युद्ध करावे लागते म्हणून तपश्चर्या करुनही तो दु:खी आहे. धनवान लोभामुळे सुखाने निद्रा घेत नाहीत. निर्धनाला सुख नसतेच. तेव्हा हे महाभाग्यवान, जाणून बुजून माझ्यासारख्या औरस पुत्राला महाघोर व दु:खद संसारामध्ये का पाडता आहात.
जन्म,जरा,मरण आणि मूत्रपुरीसमयगर्भवासही सर्व दु:खदायक आहेत. तृष्णा लोभामुळे जास्तच दु:ख होते. याचनेमध्ये तर मरणापेक्षा जास्त दु:ख. विप्र प्रतिग्रहाच्या योगाने धनसंचय करतात. बुद्धीसामर्थ्यावर नाहे, पण दुसर्यापासून द्रव्य मिळण्याची आशा करणे हे पराकाष्ठेचे दु:ख आहे. अपमानरुप हे मरण रोज संभवते. वेदशास्त्रे पढूनही ज्ञानी जनांना धनिकांची स्तुती करावी लागते. पण संतोष असला म्हणजे पाने, मुळे, फळे इत्यादी पदार्थामुळे उदराची चिंता कशाला करावी ? काया, पुत्र, पौत्र याच्या पोषणार्थ फारच दु:ख सोसावे लागते. मग त्यात अदभूत सुख आहे कुठे ? हे तात, योगशास्त्र व ज्ञानशास्त्र आपण मला कथन करा. कर्मामध्ये मला बरे वाटत नाही. प्रारब्ध संचित वर्तमानकर्म ज्याच्या योगाने नाहीसे होईल असा उपाय कथन करा. स्त्री ही जळवेप्रमाणे रक्त शोषून घेते. पण मोहवश पुरुषाला हे समजत नाही. कुटील भाषणांनी धन व मन आणि भोगामुळे वीर्य कांता हरण करीत असते. तेव्हा तिच्यासारखा दुसरा चोर कोण ? निद्रासुखाचा नाश करण्याकरता दैवाच्या कचाट्यात सापडल्यामुळे मूर्ख पुरुष स्त्रीचा स्वीकार करतो. पण त्यामुळे दु:ख व सुख काहीही होत नाही.
हे भाषण ऐकून व्यास दु:ख करु लागले व "मी आता काय करु ?" असे म्हणून अश्रू गाळू लागले. त्यांच्या शरीराला कंप सुटून त्यांचे मन खिन्न झाले. दीन दु:खीत होऊन पिता शोक करीत आहे असे पाहून शुकाचे नेत्र विस्मित झाले. तो व्यासांना म्हणाला- आहो काय हे मायेचे सामर्थ्य ? ज्याचे भाषण वेदयुक्त आहे व वेदांतशास्त्राचा जो कर्ता आहे तोसुद्धा मायेने मोहित झाला आहे. या व्यासासारख्या विद्वान महापुरुषाला मोह पाडणारी ही माया खरेच अनिवार्य आहे. तिला जिंकणे दुष्करच पुराणांचा वक्ता, भारताचा निर्माता, वेदाचे विभाग करणारा व्यास तोहि मायेने मोहित झाला आहे. मग इतरांची गोष्ट कशाला ? ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हेही जिला शरण जातात त्या देवीला तोही शरण जातो. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर इत्यादी पुरातन देवही जिच्या योगाने मोहित होतात मग त्या मायेने मोहित न होणारा पुरुष त्रैलोक्यातही आढळणार नाही. खरोखरच हे काय सामर्थ्य व वीर्य देवीने निर्माण केले आहे ? सर्वज्ञ व समर्थ विष्णू यालाही मायेने वश केले. पुराणे म्हणतात व्यासमुनी विष्णूच्या अंशापासून निर्माण झाला आहे. तोही नौकाभग्न झालेल्या व्यापार्याप्रमाणे दु:खाच्या महासागरात मग्न झाला आहे. सामान्य जनाप्रमाणे मोहित होऊन अश्रू ढाळीत आहे, काय हे माया सामर्थ्य ? पंडितही ते दुर करु शकत नाहीत. अहो ? मी कोण ? हा कोण ? आणि पंचमहाभूताच्या देहाविषयी पितापुत्र हा भ्रम कोणत्या प्रकारचा. खरोखरच ही माया बलाढ्य आहे. कारण हिने व्याप्त केल्यामुळे द्विज कृष्णद्वैपायन रोदन करीत आहे.
सर्वांचे कारण असलेल्या त्या देवाला नमस्कार करुन, शोकमग्न, दीन पित्याला उद्देशून अरणीपासून उत्पन्न झालेला शूक म्हणाला, " हे पराशरपुत्र! सर्वांना बोध करणारे तुम्ही स्वत:च का बरे शोकमग्न होता. आज मी आपला पुत्र आहे. पूर्वजन्मी कोण होतो समजत नाही. मी कोण ? आपण कोण ? आपल्या ठिकाणी भ्रम का उत्पन व्हावा ? आपण धैर्याने अवधान द्या . खिन्न न होता या मोहजालाचा त्याग करा. क्षुधा व तृष्णा यांची निवृत्ती अनुक्रमे भक्ष व उदक यांनी होते. पुत्रदर्शनाने होत नाही. सुगंधाच्या योगाने घ्राणेंद्रिय व श्रवणाच्या योगाने कर्णेंद्रियजन्य सुख प्राप्त होते. स्त्रीच्या योगाने स्त्रीसुख प्राप्त होते, पण मी पुत्र आपल्याला कय सुख देणार ? पशुची इच्छा करणार्या हरिश्चंद्र राजाला अजिगर्ताने यज्ञाकरता मौल्य देऊन आपला पुत्र अर्पण केला. म्हणून द्रव्य हे सुखाचे साधन आहे. तेच सुखसमृद्धी करते. तेव्हा सुख हवे असल्यास द्रव्य संपादन करा. ज्ञानोपदेशाने आपण मला जागे करा. म्हणजे मी या गर्भावासापासून भयमुक्त होईन. हे निष्पाप! उत्तम ब्राह्मण कुलात होणारा मनुष्यजन्म दुर्लभ आहे. मी बद्ध आहे अशी बुद्धी मजपासून दूर जात नाही. वृद्धांनाही न सोडणारी बुद्धी संसाररुप वासनाजलात खिळून राहिली आहे.
चतुर्थाश्रमाकडे कल असलेल्या शुकाला व्यास म्हणतो. " हे महाभाग्यवान पुत्रा मी रचलेले पुराण भागवत तू पठण कर. हे वेदतुल्य शुक पुराण फार विस्तृत नाही त्यात बारा स्कंद आहेत. ते पुराणांचे भूषण व पाच लक्षणांनी युक्त आहेत. ते भागवत श्रवण केल्यास या जगात सत्य काय व मिथ्या काय याची समजूत होते व अनुभवाला येते. बालरुप विष्णू वटपत्रावर शयन करीत असता मला बाल्यावस्था का प्राप्त झाली ? हे मला कसे समजेल ? असा विचार करीत असताच भगवतीने त्या महात्म्याला अर्ध्याच श्लोकात सर्व अर्थ असणारे भागवत कथन केले. " मीच सर्व असून माझ्या वाचून दुसरे सनातन चैतन्य नाही." हा तो श्लोकार्थ हा उपदेश जाणूनही ही सत्यवाणी कोणी उच्चारली! म्हणून तो चिंतन करु लागला. ही वाणी उच्चारणारा पुरुष, स्त्री, किंवा नपुसंक अहे हे मी कसे जाणावे ? चिंताक्रांत होऊनही त्या श्लोकार्धाचा त्या मनात विचार केला. वटपत्रावर शयन करुन विष्णूने त्या श्लोकार्धाचा एकचित्त करुन पुन:पुन: उच्चार केला. तेव्हा तो चतुर्भुज भगवती शांतरुपाने प्रकट झाली. त्या कल्याणीने शंखचक्र, गदा, पद्म ही आयुधे धारण केली होती. दिव्य वस्त्रे तिने परिधान केले होती. तिला अनुरुप अशा सख्या, भोवती होत्या. ती शुभवदना महालक्ष्मी हास्य करीत विष्णूपुढे प्रकट झाली. ती मनोहर देवी उदकामध्ये निराधार व स्थिर आहे हे पाहून विष्णू चकित झाला.
रति, भूति, मति, कीर्ती, स्मृति, धृति, श्रद्धा, मेघा, स्वधा, स्वहा, क्षुधा, निद्रा, द्या, गति, तुष्ठि, पुष्टि, क्षमा, लज्जा, जृंभा व तंद्रा ह्या सर्वशक्ती त्या महादेवीच्या आजुबाजूला उभ्या होत्या. त्या सर्वांजवळ श्रेष्ठ आयुधे होती. नाना भूषणांनी त्या भूषित होत्या. मंदारमाला व मोत्यांच्या हारांनी त्या झळकत होत्या. अशाप्रकारे देवीला व त्या शक्तीला उदकामध्ये पाहून विष्णू विस्मयचकित झाला. नंतर तो विष्णू मनात म्हणाला, ह्या सर्व स्त्रिया कोठून प्राप्त झाल्या ? वटपत्रावर शयन करणारा मी कोठून आलो ? ह्या घोर महासागरामध्ये वटवृक्ष कसा उगवला ? शुभरुपानेयुक्त असलेल्या मला शिशु करुन ह्या वटपत्रावर कोणी ठेवले ? ही माझी जननी आहे ? का कुणी माया आहे ? कोणत्या देवाने व कोणत्या हेतूने मला हे दर्शन दिले ? आता मी कय बोलावे ? कोठे गमन करावे ? का कोठेच जाऊ नये ? अथवा बालपणामुळे मौन धारण करुन दक्षतेने राहावे का कसे ?