[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शुकाचा जन्म व व्यासांचा शुकाला उपदेश
ती घृताची नावाची अप्सरा असल्याने मला योग्य नाही. अशाप्रकारे चिंतामग्न झालेले व्यासमुनी आपल्याला शाप देतील अशी भीती वाटून तिने शुकपक्ष्यातील स्त्रीचे रुप धारण केले व ती निघून गेली. पक्षीरुप धारण केलेली ती अप्सरा पाहताच व्यास विस्मय चकित झाले. तिचे प्रथम दर्शन झाल्याबरोबर व्यासांचे ठिकाणी काम निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर सर्व अवयवांचे ठिकाणीही त्याचा प्रादुर्भाव झाला होता. व्यासमुनीनी मनिनिग्रह करण्याचा प्रयत्न केला. पण बेफाम मनाचे संयम करण्यास ते असमर्थ ठरले. घृत:चिने मोहित केल्यामुळे त्यांचे वीर्य एकाएकी अरणीत पडले. परंतु अरणीत वीर्यपात झाल्याचे लक्षात न आल्याने ते तसेच मंथन करीत राहिले.
त्या अरणीपासून व्यासमुनीसारखा पुत्र उत्पन्न झाला. हविर्द्रव्याच्या योगाने यज्ञात प्रज्वलीत झालेला अग्नी जसा विस्मय उत्पन्न करतो, तसा तो अरण्याकाष्ठापासून झालेला शुकबालक विस्मय उत्पन्न करु लागला. व्यासमुनी ह्या पुत्रदर्शनाने विस्मित झाले. पण वरप्रसादानेच हा पुत्र उत्पन्न झाला आहे. असा त्यानी तर्क केला.
अरणीपासून उत्पन्न झालेला शुक जणू दुसरा अग्नीच वाटावा असा तेजरुप झाला. आनंदमय दृष्टीने व्यासांनी पुत्राकडे पाहिले तेव्हा दिव्य तेजाने युक्त असलेला हा पुत्र म्हणजे जणू दुसरा गार्ह्यपत्य अग्नीच असे त्यांना वाटले. नंतर गंगेवर जाऊन त्यांनी स्नान केले. इतक्यात आकाशातून बालकावर पुष्पवृष्टी झाली. व्यासांनी त्या पुत्राचे जातकर्म केले तेव्हा देवांच्या दुदुंभी वाजू लागल्या, अप्सरा नृत्य करु लागल्या. विश्वावसू, नारद, तुंबर व गंधर्वधिपती त्या पुत्र शुकाला अवलोकन करुन त्या दिव्य व्यासपुत्राची स्तुती करु लागले. सर्व देव व विद्याधर त्याची स्तोत्रे गाऊ लागले. त्या महाभाग्यवान शुकाकरता आकाशातून दंड, शुभ कृष्णाजीन व दिव्य कमंडलू खाली पडली. तो अतितेजस्वी बालक जन्मताक्षणीच वृद्धींगत झाला. कर्मज्ञान यात निपुण असलेल्या व्यास मुनींनी त्याचे उपनयन केले त्याबरोबर त्या महात्म्या शुकाला पित्याप्रमाणेच उपनिषदे, सूत्रे यांची स्फूर्ती झाली त्याच्या उत्पत्तीचे वेळी घृताचीने शुकीचे रुप धारण केल्यामुळे व्यासमुनींने त्याचे नाव शुक ठेवले. उपनयन झाल्यावर शुकाने बृहस्पतीला गुरु केले. ब्रह्मचर्यासंबंधीची सर्व व्रते यथायोग्य केली. उपनिषदे, सूत्रे याबरोबरच संपूर्ण वेद, धर्मशास्त्रे याचे शूकाने गुरुगृही अध्ययन केले व गुरुल दक्षिणा देऊन तो पुन: स्वगृही व्यासमुनींकडे आला.
शुक येताच व्यासमुनींनी त्वरेने उठून प्रेमाने त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले व त्याला अलिंगन दिले. त्याला अध्ययनासंबंधी कुशल प्रश्न विचारले. त्याला आश्वासन देऊन शुभ आश्रमात ठेवले. नंतर शुकाचा विवाह करावा असा त्यांनी विचार केला आणि मुनीकन्यांची चौकशी करण्यास सुरवात केली. ते आपल्या पुत्राला म्हणाले, " हे निष्पापा तू वेदासह सर्व धर्मशास्त्रांचे अध्यायन केले आहेस. आता तू विवाह कर. गृहस्थाश्रम स्वीकारुन तू देव व पितर यांना उद्देशून याग कर आणि मनोहर पत्नीचा स्वीकर करुन मला ऋणमुक्त कर. कारण निपुत्रिकाला सद्गती प्राप्त होत नाही, स्वर्गप्राप्ती तर नाहीच. म्हणून तू गृहस्थाश्रमाचे अवलंबन करुन मला सुखी कर. हे महाभाग्यशाली विचारी पुत्रा माझी मोठी आशा तू पूर्ण कर.
हे महाज्ञानी शुका, महाघोर तपश्चर्या केल्यामुळे तू मला अयोनीसंभव व देवरुप पुत्र झाला आहेस. ह्यास्तव मज पित्याचे रक्षण कर, अशा प्रकारे प्रपंचाविषयी अतिशय अनुरुक्त असलेले शुकाचे जनक सन्निध जाऊन शुकाला सांगताच तो विरक्त शुक म्हणाला- हे वेदव्यास, हे धर्मज्ञ, हे महाविचारी, हे आपण काय बोलत आहात! आपण मला तत्वज्ञानाचा उपदेश करा म्हणजे मी आपली इच्छा पूर्ण करीन."
व्यास म्हणाले, "हे पुत्रा, मी तुझ्यासाठी शंभर वर्षे तपश्चर्या केली. मोठे कष्ट सोसले, नंतरच शिवाच्या आराधनेमुळे मला तू प्राप्त झालास. राजाची प्रार्थना करुन मी तुला वित्त देईन. म्हणून महाभाग्यशाली पुत्रा, तारुण्य प्राप्त होताच तू सुखाचा उपभोग घे."
शुक म्हणाला , तात, दु:खरहित सुख मनुष्यलोकात कोणते आहे ते मला सांगा. प्राज्ञजन दु:खयुक्त सुखाला सुख म्हणत नाहीत. स्त्रीचा स्वीकार केल्यावर मला तिच्या अधीन होऊन राहावे लागेल. पराधीन व स्त्रीजित पुरुषाला कसले सुख लाभणार "शृंखलांनी जखडलेला पुरुष मुक्त होऊ शकेल पण स्त्री व पुत्र यांच्या बंधनातील
पुरुष मुक्त होणार नाही. विष्ठ व पुत्र ही ज्यात असतात त्या उदरापासून देहाची उत्पत्ती झाली आहे आणि स्त्रीदेह तर अगदीच तन्मय आहे. असल्या स्त्री देहावर कोण ज्ञानवंत पुरुष प्रेम करील! ब्रह्मर्षे मी अयोनी संभवातून उत्पन्न झालो आहे. तेव्हा योनीसंबंधाचा विचार माझ्या मनात कसा उत्पन्न होईल. मी पुढेही योनीपासून जन्मप्राप्तीची इच्छा करीत नाही. कारण अदभूत आत्मसुखाचा त्याग करुन विष्ठासुखाची इच्छा मी का करु! शिवाय आत्म्याचे ठिकाणी रममाण होणारा पुरुष इतर सुखाविषयी उत्सुक असतो असे नाही. वेदपठण करुन मी त्यांचा विचार केला पण कर्ममार्गप्रवर्तक व हिंसामयच वेद मी पठण केले. बृहस्पती गुरु अज्ञानामुळे व्याप्त होऊन प्रपंचात मग्न झाला आहे तेव्हा दुसर्याचा उद्धार करण्यास तो कसा समर्थ असणार !
रोगग्रस्त वैद्य ज्याप्रमाणे दुसर्याचा रोगाचा चिकित्सक असावा त्याप्रमाणे हा गृहस्थाश्रमी पुरुष मज मुमुक्षूचा गुरु म्हणजे विटंबनाच आहे. म्हणूनच गुरुला प्रणाम करुन मी आपल्या सन्निध आलो. तस्मात संसाररुपी सर्पाला मी भितो म्हणून आपण त्यापासून माझे रक्षण करा. सूर्याला अथवा ज्योतिषचक्राला ज्याप्रमाणे विश्रांती मिळत नाही त्याचप्रमाणे संसारी लोकांचे भ्रमण कधीच थांबत नाही. आत्मतत्वाच्या विचारांचा त्याग करुन संसारात काय सुख मिळणार! हे संसारसुख म्हणजे कीटकांना विष्ठेमध्ये वाटणार्या सुखाप्रमाणे आहे. वेदशास्त्राचे अध्ययन केल्यावरही ते संसाराला अनुरुक्त असतात त्या इतके मूढ कोणीही नाही.
श्वाच, अश्व, सूकर ह्यांच्याप्रमाणेच त्यांची योग्यता समजावी. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन आणि वेदशास्त्राचे अध्ययन करुनही जर पुरुष संसारबद्ध झाला तर मुक्ती प्राप्त होण्याचा संभवच नाही. पुत्र, स्त्री, गृह यात आसक्त होऊन राहिलेल्या पुरुषाला पंडित म्हणतात याचेच आशर्य वाटते. सत्व, रज, तम या तीन मायागुणांनी जो जो पुरुष संसारात बद्ध होत नाही तोच विद्वान बुद्धीमान व शास्त्रपारंगत मानला पाहिजे. संसारातून मुक्ती होईल तेच पठण करावे. संसारबंधने दृढ करणार्या अध्ययनांचा काय उपयोग पुरुषाला ग्रहण म्हनजे बंधन प्राप्त होते म्हणून गृह संज्ञा मिळाली. या गृहरुप कारागारात कोणते सुख आहे? यात काहीच सुख नसल्यामुळे मी याला भीत आहे. दैववशात फसलेले मंदबुद्धी पुन: संसारात गुरफटत असतात."
व्यास म्हणतात, गृह हे बंधनागार नसून बंधने प्राप्त होण्याचे दुसरेही काही कारण नाही. कोणताही गृहस्थ मनाच्या आसक्तीने मुक्त झाला की तो मुक्त होतो . न्यायाने द्रव्य मिळवून वेदोक्त कर्मे यथाविधी करणारा, श्राद्ध करणारा सत्यवचनी शुद्ध गृहस्थासही मुक्ती मिळते. मध्य काली व्रतस्थ ब्रह्मचारी, वानप्रस्थ , यति हे सर्वदा गृहस्थाश्रमी पुरुषाचेच अवलंबन करतात तसेच श्राद्ध, अन्नदान, मधुर भाषण ह्यांनी धर्मनिष्ठ गृहस्थाश्रमी इतरांवर उपकारच करतात. सारांश गृहस्थाश्रमापेक्षा श्रेष्ठ धर्म पाहण्यात व ऐकिवात नाही. वसिष्ठ वगैरे ज्ञानी आचार्यानीही त्याचे अवलंबन केले हे महाभाग्यवान पुत्रा, वेदविहित कर्मे करणार्यास काय बरे असाध्य आहे? स्वर्ग, मोक्ष, उत्कृष्ट जन्म ह्यापैकी ज्याचे इच्छा होईल ते पुरुषाला प्राप्त होते. एका आश्रमातून दुसर्या आश्रमात जावे असेच धर्मावेत्त्यांचे म्हणणे आहे. म्हणून तू अग्नीहोम घे आणि दक्ष राहून सर्व कर्मे कर.
हे धर्मज्ञ पुत्रा, देव, पितर व मनुष्य ह्यांचे यथाविधी संतर्पण करुन पुत्र उत्पन्न करुन त्याला गृहस्थाश्रमी करुन गृहाचा त्याग कर व उत्कृष्ट व्रत कर. वानप्रस्थ आश्रम व संन्यास वृत्तीचे अवलंबन कर. हे पुत्रा अविवाहित पुरुषाची पाचही इंद्रिये अजिंक्य व मद उत्पन्न करणारी आहेत. त्यांचे संयमन व्हावे म्हणून स्त्रीचे पाणीग्रहण करुन वृद्धावस्थेस गेल्यावर तप करावे असे शास्त्रवचन आहे. हे शुका, निराहार व जितेंद्रिय राहून तीन हजार वर्षे दुर्घट तपश्चर्या केल्यावर देखील, महातेजस्वी विश्वामित्र मुनी मेनकेवर मोहित होऊन तिच्यासह वनात राहिला . त्याच्या वीर्यापासून शकुंतला नामक सुकन्या उत्पन्न झाली. धीवरकन्या काली दृष्टी पडताच माझा पिता पराशराने मदन बाणांनी पीडित होऊन नौकेतच त्या कन्येचा स्वीकार केला. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवही आपल्या कन्येला पाहून मदन विव्हल होऊन तिच्यामागे धावू लागला, तेव्हा रुद्राने मूर्च्छित करुन त्याचे निवारण केले. म्हणून हे शुभ पुत्रा तू माझे हिताचे सांगणे ऐक आणि कुलिन कन्यका करुन वेदमार्गाचे अवलंबन कर.