[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ऋषी म्हणाले, हे लोमहर्षणपुत्रा, राजा पुरुरवा कोण ? त्याला कसे संकट प्राप्त झाले ? ही कथा आता आम्हाला सांग. हे सूता तुझी रसवाणी अमृतापेक्षाही मधुर आहे. तुझ्या वचनामृताची आम्हांला तृप्ती होत नाही.
सूत म्हणाला, "व्यासांपासून श्रवण केलेली कथा आता तुम्हाला सांगतो.
"अतिविख्यात, मनोहर अवयव, रुप व लावण्यसंपन्न अशी तारा गुरुची प्रिय भार्या होती. एकदा यजमान चंद्राच्या घरी ती गेली असता, ती चंद्राच्या दृष्टीस पडली. त दोघेही एकमेकांना पाहताच कामविव्हल झाले, कामबाणांनी व मदनाने पीडीत होऊन ते दोघे तारा व चंद्र परस्परांवर प्रेम करु लागले आणि ते मदमत्त होऊन रममाण होऊ लागले. असेच काही दिवस लोटल्यावर बृहस्पतीने दु:खाकुल होऊन तारेला आणण्यासाठी आपला शिष्य पाठवला. परंतु ती चंद्राला वश झाल्यामुळे परत आली नाही. चंद्राने परत शिष्य पाठविलेला पाहून क्रुद्ध होऊन बृहस्पती स्वत:च चंद्राकडे आला. तो महाबुद्धीमान वाचस्पती हसतच चंद्राला म्हणाला.
"हे चंद्रा, धर्मशास्त्राने निंद्य असे कृत्य तू केले आहेस. माझी सुंदर भार्या तू का ठेवून घेतली आहेस ? मी देवगुरु असल्याने तुझा यजमान आहे. हे मूढा, तू गुरुभार्येचा उपभोग कसा घेतलास ? ब्रह्मघातकी, सुवर्णचोर, सुरापान करणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा तू महापातकी, दुराचारी अतिनिंद्य आहेस. तू जर ह्या स्त्रीचा उपभोग घेतला असशील तर देवांच्या निवासस्थानात राहण्यास तू योग्य नाहीस. म्ह्णून तू माझ्या कृष्णवर्ण नेत्र असलेल्या भार्येला सोड, नाही तर हे दुरात्म्या, तू गुरुपत्नीचा अपहार केलास. असे मी म्हणेन." स्त्री विरहाने दु:खीत व क्रोधयुक्त भाषण ऐकून रोहिणीपति चंद्र म्हणाला, "ब्राम्हण क्रोधामुळे अपूज्य होतात व क्रोधरहित धर्मशास्त्रवेत्ते पूज्य होतात. तस्मात ती सुंदरी आपल्या इच्छेने तुझ्या घरी येईल. आता ती बाला येथेच राहिली आहे. ती, येथे राहिल्याने तुझी काय हानी होत आहे ? कारण ती विषयसुखाच्या इच्छेने आपण होऊन येथे राहिली आहे. काही दिवसांनी ती आपल्या इच्छेने तुझ्या घरी येईल. रजोदर्शनाने स्त्रीचा व दैनिक कर्माने विप्रांचा दोष नाहीसा होता, हे धर्मशास्त्र तुच सांगून ठेवले आहेस." हे चंद्राचे बोलणे ऐकून मदनव्याकूळ झालेला गुरु सत्वर स्वगृही गेला.
परंतु काही दिवसांनी पुन: व्यथित होऊन तो ओषधिपती चंद्राकडे गेला. तेथे तो दाराजवळ उभा राहिला असता चंद्राच्या सारथ्याने त्याला प्रतिबंध केला. त्यामुळे तो क्रुद्ध झाला. चंद्रही आला नाही. तेव्हा मनात त्याने विचार केला की मातेसमान असलेल्या गुरुपत्नीचा उपभोग घेणार्या ह्या शिष्याला शिक्षा ही केलीच पाहिजे. बृहस्पती रागाने बाहेरुनच म्हणाला, "हे सुराधमा, मूढा, हे दुराचारी, तू मंदिरात शयन करीत आहेस काय ? माझी स्त्री मला सत्वर दे, नाहीतर तुला शाप देईन. माझी प्रिया परत न देशील तर मी तुला भस्म करीन."
ही शापवाणक्ष ऐकताच द्विजराज चंद्र हसत बाहेर येऊन त्याला म्हणाला, "तू काय फाजील भाषण करीत आहेस. कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त व सर्वलक्षणसंपन्न स्त्री तुला योग्य नाही. तेव्हा हे द्विज, तू एखादी कुरुप स्त्री घे.भिक्षुकाच्या घरी अशी स्त्री योग्य नव्हे.अनुरुप अशाच स्त्रीशी क्रीडा करावी. पण हे मंदबुद्धे, कामशास्त्राचा सिद्धांत तुला विदीत नाही. तू चालता हो. तुला शक्य असेल ते तू कर. ही उत्कृष्ट स्त्री मी परत देणार नाही. तू कर्मात असल्यामुळे तुझा शाप मला बाधणार नाही, हे गुरो, मी स्त्री देत नाही. तुझ्या इच्छेस येईल तसे कर."
हे चंद्राचे भाषण ऐकून गुरु इंद्राकडे गेला. गुरु दु:खाकुल होऊन आलेला पाहताच इंद्राने स्वस्थ मन करुन पाद्य, अर्ध्य, आचमनीय इत्यादी उपचारांनी त्याची पूजा केली. उदार इंद्र खिन्न झालेल्या गुरुला म्हणाला, "हे महाभाग्यशाली महामुने, आपण कोणत्या चिंतेमुळे शोकाकुल झाला आहात ? आपण माझे गुरु आहात. माझ्या राज्यात आपला कुणी अपमान केला ? माझे सर्व सैन्य लोकपालासह आपल्या आधीन आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे तुला सहाय्य करतील. तेव्हा आपली काय चिंता आहे ती कथन करा."
गुरु म्हणतो, "उत्कृष्ट नेत्रांनी युक्त असलेली माझी भार्या तारा चंद्राने हरण केली आहे व तो दुरात्मा वारंवार प्रार्थना करुन ती परत देत नाही. तेव्हा राजा मी काय करु ? तूच आमचे रक्षण कर. हे इंद्रा, मी दु:खीत आहे, मला सहाय्य कर."
हे ऐकून इंद्र म्हणाला, "आपण दु:ख करु नका. मी आपणाला सहाय्य करीन. निरोप पाठवूनही तो दुरात्मा आला नाहीतर सर्व देव सैन्यासह मी त्याच्याशी युद्ध करीन."
असा गुरुला धीर देऊन बोलण्यात चतुर असा दूत इंद्राने चंद्रलोकी सत्वर पाठवला. तो तेथे जाऊन चंद्राला म्हणाला, " हे माहाभाग्यशाली तुला निरोप कळविण्याकरता मी इंद्राकडून येथे आलो आहे. तेव्हा त्याने सांगितलेले मी तुला कथन करतो.
"चंद्रा, तू धर्मवेत्ता आहेस, तू नीती जाणतोस. तुझा पिता अत्रिही धर्मात्मा आहे. म्हणून निंद्य कर्म करणे तुला योग्य नाही. सर्वांनी आपल्या भार्येचे रक्षण केले पाहिजे. त्या भार्येकरता खरोखर कलह होईल यात शंका नाही. स्त्रीच्या रक्षणासाठी तो प्रयत्न करणे योग्य आहे. तू आपल्याप्रमाणेच सर्व प्राणी आहेत असा विचार कर. अठ्ठावीस शुभ दक्ष कन्या तुझ्या भार्या असताना गुरुपत्नीचा उपभोग घेण्याची इच्छा तू का बरे करतोस ? मेनकाप्रभृती इतर सुंदर अप्सरा स्वर्गात आहेत. त्यांचा तू उपभोग घे. गुरुपत्नीला सोड. समर्थ जर अहंपणामुळे निंद्य कर्म करु लागले तर अज्ञजनही त्यांचे अनुकरण करु लागतात व धर्माचा क्षय होतो. तुझ्यामुळे देवांमध्ये कलह होऊ नये म्हणून तू मनोहर गुरुपत्नीला सोड."
हे ऐकून चंद्र क्रुद्ध झाला व त्याने व्याजोक्तीने इंद्राच्या दूताबरोबर उलट निरोप पाठविला. "हे महापराक्रमी इंद्रा, तू धर्मवेत्ता व देवांचा अधिपती आहेस, तुझा पुरोहितही तसाच आहे. तुम्हा उभयतांची बुद्धी सारखीच आहे. दुसर्याला उपदेश करायला सर्व लोक प्रवीण असतात. पण प्रसंग आल्यावर स्वत: तसे वागणारे मात्र दुर्लभ. बृहस्पतीनेच ग्रंथीत केलेले धर्मशास्त्र मानव स्वीकारतात. ह्या धर्मशास्त्राला अनुसरुन स्त्रीचा उपभोग घेणे, यात शास्त्राशी विरोध आहे काय ? बलवानांना सर्व स्वकीयच आहेत. पण दुर्बलांना काहीएक स्वकीय नाही. तारा ज्याप्रमाणे माझ्यावर अनुरुक्त आहेत तशी गुरुवर नाही. तेव्हा धर्माने वा न्यायाने अनुरुक्त स्त्रीचा कसा बरे त्याग करावा ? संसार अनुरुक्त स्त्रीबरोबर होत असतो. विरक्त स्त्रीबरोबर संसार कसा होईल ? संवतनामक कनिष्ठ भ्रात्याच्या स्त्रीची जेव्हापासून बृहस्पती इच्छा करु लागला, तेव्हांपासून तारा बृहस्पतीविषयी विरक्त झालेली आहे. मी त्या सुंदरीला देणार नाही. हे इंद्रा, तुला इच्छा होईल तसे कर."
दूताने इंद्राला चंद्राचा निरोप सांगितल्यावर इंद्रही क्रुद्ध झाला. त्याने गुरुसहाय्यासाठी सैन्याची तयारी केली. कलह उपस्थित झाल्याचे ऐकून शुक्र गुरुद्वेषामुळे चंद्राकडे जाऊन म्हणाला, " हे महाबुद्धीमान चंद्रा, इंद्राशी तुझा संग्राम झाल्यास मी मंत्रसामर्थ्याने तुला सहाय्य करीने. तू गुरुपत्नी देऊ नकोस."
शुक्र गुरुचा शत्रू आहे असे समजून शंकराने गुरुला सहाय्य केले. ताराकासुराच्या संग्रामाप्रमाणे हा संग्राम सत्वर सुरु होऊन पुष्कळ वर्षे टिकला. ह्याप्रमाणे युद्ध अवलोकन करताक्षणीच हंसारुढ होऊन ब्रह्मदेव तेथे आला. तो म्हणाला, " गुरुची भार्या सोड. नाहीतर विष्णूला आव्हान करुन मी क्षय करीन. हे महाबुद्धीमान शुक्राचार्य संगतीच्या दोषामुळे तुझी बुद्धी न्यायविरुद्ध झाली काय ?" असा शुक्राचार्याचा निषेध केला तेव्हा, "गुरुची भार्या सोड, असे सांगण्यासाठी तुझ्या पित्याने आज मला पाठवले आहे." असा शुक्राचार्यांनीही त्या चंद्राचा निषेध केला.
शुक्राचार्याचे ते अदभूत भाषण ऐकून गुरुलाही प्रिय नसलेली ती सुंदर व गर्भिणी गुरुपत्नी चंद्राने परत दिली. अशाप्रकारे पत्नीची प्राप्ती झाल्यावर आनंदीत होऊन गुरु भार्येसह घरी गेला. देव-दैत्यही आपापल्या घरी गेले. ब्रह्मा वशंकर स्वस्थानी गेले. काही कालाने शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर तारेला गुणांनी चंद्राशी बरोबरी करणारा असा शुभ पुत्र झाला. पुत्र झाल्यावर गुरुने सर्व जातकर्म यथाविधी केले. पण ही गोष्ट चंद्राला समजल्यावर त्याने गुरुकडे दूत पाठविला.
"हा पुत्र तुझा नसून माझ्या वीर्यापासून उत्पन्न झालेला आहे तेव्हा तू यथाविधी जातकर्म का केलेस ?"
हा चंद्राचा निरोप ऐकून बृहस्पती म्हणाला,"हा पुत्र माझ्यासारखा असून माझा आहे." असे बृहस्पतीने म्हटल्यावर पुन: वाद निर्माण झाला. पुन: देव-दैत्य संग्रामभूमीवर प्राप्त झाले. तेव्हा शांततेची इच्छा करणारा प्रजापती ब्रह्मदेव देवासंमुख येऊन त्याने युद्धनिवारण केले. ब्रह्मदेवाने तारेलाच विचारले, "हे कल्याणी, तूच सत्य सांग म्हणजे क्लेश होणार नाहीत. हा पुत्र कोणाचा!" तेव्हा ती सुंदरी लाजेने मान खाली घालून हळूच म्हणाली, "चंद्राचा". आणि ती घरात गेली. तेव्हा प्रसन होऊन चंद्राने पुत्राचा स्वीकार केला. त्याचे नाव बुध ठेवले. नंतर सर्वजण स्वस्थानी परत गेले.