[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सुद्युम्नाला स्त्रीत्व प्राप्त होते; पुरूरव्याचा जन्म
फार पूर्वी सुद्युम्न नावाचा एक सत्यवादी व जितेन्द्रीय राजा होऊन गेला. एकदा तो अश्वावर आरुढ होऊन सिंधुप्रदेशातील वनामध्ये मृगया करु लागला. मनोहर कुंडले व कवच परिधान करुन आजगव धनुष्य व अदभूत बाण बरोबर घेऊन आपल्या आमात्यासह तो राजा हिंडता हिंडता करु, मृग, शश, सूकर, गेंडे, वगय, शरभ, महिष, सामर, वनकुक्कुट व यज्ञीक पशू अशा प्राण्यांची शिकार करीत तो मेरु पर्वताच्या पायथ्याशी कुमारवनापर्यंत आला. ते वन मंदार वृक्षांनी भूषित होते. साल, ताल, तमाल, चंपक, फणस, आम्र, नीप, मधूक व चमेलीचे मंडप ह्यांनी ते गजबजले होते. डाळिंब्या, नारळी, केळीच्या फड्यांनी शोभायमान झाले होते. यूथिका, मालती ,कुंन्द या पुष्पवेलींनी मोहोरले होते. हंस व कारंडव पक्ष्यांनी ते व्याप्त झाले होते. कीचक नावाच्या वेणूंच्या ध्वनीने ते नादमय झाले होते.
असे हे सुखदायक वन पाहून राजा आपल्या सेवकांसह आनंदीत झाला, कोकीळ पक्ष्यांच्या रवाने भूषित झालेले ते वन पाहून तो राजा त्या वनात शिरला. तोच त्याला एकाएकी स्त्रीत्व प्राप्त झाले व त्याचा अश्वही घोडी झाली. हे लक्षात येऊन राजा चिंतेने व्यग्र झाला. असे कसे झाले, म्हणून तो सारखा विचार करु लागला. तो अत्यंत लज्जित झाला. स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळे घरी कसे जावे! मला कोणी तरी फसविले! असे म्हणून तो दु:खी झाला.
पण इतक्यात सुवर्तनी राजाला स्त्रीत्व का प्राप्त झाले? त्याची कथा सांगताना सूत म्हणाला,
"आपल्या तेजाने अंधार नाहीसा करीत सनकादि ऋषी शंकराचे दर्शन घेण्याकरता गेले होते. त्यावेळी महादेव शंकर आपल्या तरुण, सुंदर पत्नीसह क्रीडा करीत होते. क्रीडामग्न झालेली पार्वती वस्त्ररहित होऊन आपल्या पतीच्या अंगावर बसली होती, अशा प्रसंगी ते ऋषी आल्यामुळे ती विवस्त्र असलेली पार्वती लज्जित होऊन उठली व वस्त्र परिधान करुन ती मानी अंबा लज्जित होऊन कापत कापत उभी राहिली.
ते ऋषीही उभय स्त्रीपुरुष क्रीडा करीत असलेले पाहून सत्वर फिरुन नरनारायणाच्या आश्रमात गेले. परंतु आपली स्त्री लज्जित झाल्याचे पाहून भगवान शंकर म्हणाले, "तू लज्जेने अगदी घाबरुन गेली आहेस. तुला सुख होईल अशी मी व्यवस्था करतो. हे सुमति, आजपसून जो पुरुष मोहाने ह्या वनात प्रवेश करील तो स्त्रीत्व पावेल." असा शाप शंकरांनी वनाला दिला. ज्या लोकांना हे विदित आहे ते समजून हे वन वर्ज्य करीत असत.
तेव्हा सुद्युम्न तेथे प्रविष्ट झाल्यामुळे त्याला आपल्या सचिवासह स्त्रीत्व प्राप्त झाले. तो लज्जने घरी न जाता वनाबाहेरच इतस्तत: संचार करीत राहिला व त्या महात्म्याला इला हे नाव प्राप्त झाले.
एकदा चंद्राचा तरुण पुत्र बुध हिंडता हिंडता तेथे आला. स्त्रियांच्या परिवारात असलेली ती मनोहर स्त्री पाहून बुधाला तिची इच्छा झाली. तिलाही हा सुंदर सोमपुत्र आपला पति असावा असे वाटू लागले. पुढे तेथेच त्यांचा परस्पर समागम झाला व बुधापासून तिला पुरुरव नावाचा पुत्र झाला.
परंतु पुत्रप्राप्तीनंतर अशीच एकदा ती बाला चिंताक्रांत होऊन बसली असता स्वकुलाचे आचार्य मुनीश्रेष्ठांचे तिला स्मरण झाले. सुद्युम्न्याची ही दयनीय अवस्था पाहून वसिष्ठंना वाईट वाटले. त्यांनी शंकराकडे जाऊन लोककल्याण करणार्या महादेवाल संतुष्ट केले, तेव्हा भगवान शंकराने संतुष्ट होऊन वसिष्ठांना इच्छित वर देण्याचे मान्य केले.
वसिष्ठांनी आपल्या प्रिय राजाला पुरुषत्व प्राप्त व्हावे म्हणून शंकरांना विनंती केली. परंतु आपली वाणी सत्य करण्याकरता शंकर म्हणाले,"हा राजा एक महिना पुरुष व एक महिना स्त्री होऊन राहील."
ह्या प्रमाणे वरप्राप्तीनंतर राजा स्वगृही गेला. वसिष्ठांच्या अनुग्रहामुळे तो पुन्हा राज्य करु लागला. स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर तो घरी बसत असे व राज्यकारभार करीत असे. परंतु ह्यामुळे प्रजानन त्याच्याविषयी उद्विग्न झाले. तो राजा त्यांना आवडेनासा झाला. पुढे कालगतीने पुरुरवा यौवनावस्थेत आल्यावर त्यालाच प्रतिष्ठा नगरीचे आधिपत्य देऊन सर्व राज्य त्याच्या हवाली करुन सुद्युम्न राजा वनात निघून गेला. नानावृक्षांनी व्याप्त असलेल्या त्या वनात नारदमुनीपासून त्याला नवाक्षरी अत्युत्कृष्ट मंत्र प्राप्त झाला. त्याने अतिशय प्रेमपूर्ण मनाने त्या मंत्राचा जप केला. त्यामुळे सर्वकल्याणी व संकटतारिणी देवी त्याला प्रसन्न झाली. इतकेच नव्हे तर मद्यपानात मत्त झालेली, तारवटलेले डोळे आहेत अशी दिव्यरुपधारिणी देवी सिंहारुढ होऊन त्याच्यापुढे येऊन उभी राहिली. ते दिव्यरुप पाहून त्याचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरुन आले. मस्तकाने तिला सादर प्रणाम करुन तिची स्तुती केली. इला म्हणते,
"हे भगवति, तुझे लोककल्याणकारक रुप मी अवलोकन केले. हे देवपूज्य व भुक्तिमुक्तिदायक माते, तुझ्या चरणकमलाला मी वंदन करते. हे अंबे, सर्व देव व मुनीजनांना मोह उत्पन्न करणारे तुझे संपूर्ण ऐश्वर्य व कृपणावर ह्या जगात कोण मानव जाणीत आहे? हे देवी, तुझे ऐश्वर्य पाहताच मला विस्मय झाला. शंभु, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, रवि, कुबेर, अग्नि, वरुण, वायू, चंद्र व अष्टवसु हेही तुझा प्रभाव जाणत नाहीत, तेव्हा गुणहीन मनुष्य कसा बरे जाणील? हे अंबे, महातेजस्वी विष्णू तुला सत्वगुणसंपन्न सकल अर्थ देणारी व समुद्रापासून उत्पन्न झालेली लक्ष्मी समजत आहे. तर ब्रह्मदेव तुला राजस शक्ती समजतो, आणि महेश्वर तुला उमा नावाची तामसी शक्ती मानतो. पण तू निर्गुण आहेस. हे कुणालाही समजले नाही तर मग माझ्यासारख्या मंदमतीची काय कथा? कुणीकडे मी आणि कुणीकडे तुझा हा अत्युत्कृष्ट प्रसाद? तू भक्तवत्सल आहेस एवढेच तुझे दयाशील चरित्र मी जाणतो. लक्ष्मीच्या रुपाने तू श्रीहरीला वरलेस पण हा मधुसूदन ‘मी हिला योग्य आहे’. असे समजू आनंद मानीत नाही. इतकेच नव्हे तर हा आदिपुरुष तुझ्या हाताने आपले पाय पावन व शुभ करीत असतो.
पुराणपुरुष हरी खरोखरच पादताडनाची इच्छा करतो, तो देवमान्य हरी मदन व्याकुल होऊन चरणकमली लीन झाला असता तू क्रुद्ध होऊन तू करतेस, अत्यंत दृढ, भूषित, शांत अशा मंचकाप्रमाणे असलेल्या विष्णूच्या वक्षस्थलावर हे सदाचरण संपन्न देवी विद्युलतेप्रमाणे असलेली तू नित्य वास्तव्य करीत असतेस, तेव्हा हा जगदीश्वर विष्णू हेच तुझे वाहनच नाही काय? तू रागाने जर मधुसूदनाचा त्याग करशील तर तो शक्तीहीन होऊन कोणाच्याही पूजेस प्राप्त होणार नाही, कारण श्रीने त्याग केला असल्याने अत्यंत गुणहीन, शांत, झालेल्या पुरुषाचा त्याग स्वजनही करीत असतातहे सिद्ध आहे हे अनंतसामर्थ्यसंपन्न देवी! तुझ्या चरणकमलाचे नित्य सेवन करणारे ब्रह्मादि देवगण स्त्रीत्व पावले होते, पण तूच त्यांना पुरुष केलेस. ह्यावरुन तुझ्या शक्तीचे काय वर्णन करावे? तू पुरुष आहेस असे म्हणता येत नाही व पुरुष नाहीस हेही म्हणता येत नाही. त्याबाबत माझ्या मनात शंकाच आहे. तरीही हे माते सगुण वा निर्गुण तू कुणी का असेनास मी श्रद्धायुक्त मनाने तुला नमस्कार करीत आहे, तुझे ठिकाणी माझी भक्ति अचल राहावी एवढेच माझे मागणे आहे.
अशा प्रकारे स्तवन करुन तो राजा शरण आल्यावर देवीने संतुष्ट होऊन त्याला आत्मसायुंज्य दिले, ऋषीमुनींनाही दुर्लभ असे हे श्रेष्ठ व स्थिर पद त्या देवीच्या प्रसादाने सुद्युम्नाला प्राप्त झाले.