[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जगदगुरु विष्णूच्या देहापासून निद्रा बाहेर पडू लागल्यावर नेत्र, मुख, नासिका, बाहू, हृदय, वक्षस्थल यामधून ती तामसी शक्ती आकाशामध्ये गेली व विष्णू एकसारखा जांभया देत उठले. तेव्हा भयभीत होऊन उभा राहिलेला ब्रह्मदेव त्याला दिसला. तेव्हा विष्णु म्हणाले, "ब्रह्मदेवा, तप सोडून तू इथे का आलास ? तुझे मन कसल्या चिंतेने व भीतीने ग्रासले आहे ?
ब्रह्मदेव म्हणाला, "तुमच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले बलाढ्य दैत्य मधुकैटभ माझा वध करण्यासाठी आले आहेत. म्हणून भितीने मी तुमच्याकडे आलो. तेव्हा माझे रक्षण करा मी त्रस्त झालो आहे.
विष्णू म्हणाले, "तुम्ही निर्भय झाला आहात. कारण मी त्यांचा खरंच वध करीन. त्यांचे आयुष्य संपले असेल तरच ते युद्धास्तव मजकडे येतील."
ह्याप्रमाणे विष्णू बोलत असताना ब्रह्मदेवाचा शोध घेत ते प्रचंड मधुकैटभ राक्षस तेथे आले. त्या उदकामध्ये ते निर्भयतेने व निराधरपणे उन्मत्त दैत्य उभे राहिले व म्हणाले, "तू येथे पलायन करुन आलास पण त्याचा काय उपयोग आमच्याशी युद्ध कर. ह्याच्यासमक्ष आम्ही तुझा वध करु. नंतर सर्पशय्येवरील ह्याचाही आम्ही समाचार घेऊ. तू आमच्याशी युद्ध कर, अथवा तू आमचा दास आहेस हे मान्य कर."
त्यांचे हे भाषण ऐकून भक्तवत्सल विष्णू म्हणाला, "हे दानवांनो तुम्ही माझ्याशी युद्ध करा, मी तुमचा मद नाहीसा करीन."
हे ऐकून ते दोघेही राक्षस क्रुद्ध व युद्ध प्रवृत्त झाले. मधू त्वरेने युद्धास सिद्ध झाला. कैटभ तेथेच उभा राहिला. दोघांत बाहुयुद्ध सुरु झाले. मधू श्रांत झाल्यावर कैटभ युद्ध करु लागला. अशा प्रकारे क्रोधाने मधुकैटभ आळीपाळीने विजयी विष्णूशी युद्ध करीत होते. ब्रम्हदेव व अंतरिक्षात असलेली देवी हे युद्ध अवलोकन करीत होती. परंतु विष्णूला ग्लानी येऊ लागली. श्रीहरी, पाच हजार वर्षे युद्ध केल्यावर, त्यांच्या मरणाचे कारणासंबंधी विचार करु लागला. "पाच हजार वर्षे युद्ध करुन हे दानव श्रांत न होता मीच श्रांत होऊ लागलो आहे. माझे बल, शौर्य कोठे गेले ? हे अश्रांत राहिल्याचे कारण तरी काय ?"
अशाप्रकारे विष्णूला श्रांत व चिंतातूर झाल्याचे पाहून मदोन्मत्त मधुकैटभ गंभीर स्वराने व अत्यानंदाने म्हणाले, "हे विष्णो, तू थकला असशील व निर्बल झाला असशील तर मस्तकी हात जोडून तू म्हण, "खरोखर मी तुमचा दास आहे." किंवा तू आमच्याशी युद्ध कर. आम्ही प्रथम तुझा वध करु नंतर या चतुर्भुज(ब्रह्मदेव) पुरुषाचाही वध करु."
महासागरात त्याचे भाषण ऐकल्यावर विष्णू स्पष्ट शब्दात म्हणाला, "थकलेला, भयभीत झालेला, शस्त्रत्याग केलेला, पडलेला व बालक ह्यांवर वीर पुरुष प्रहार करीत नाहीत, असा धर्म आहे. मी पाच हजार वर्षे अविश्रांत युद्ध केले आहे. मी एकटा आहे. तुम्ही थोडा वेळ स्वस्थ राहा. मी न्याय्य मार्गानेच युद्ध करीन."
हे ऐकून दोघेही दैत्य विश्वासाने दूर उभे राहिले. ते दूर गेलेले पाहून विष्णू त्यांच्या मरणाच्या कारणांचा विचार करु लागला. तेव्हा त्याला असे कळून आले की, "देवीने वर दिल्याने ते इच्छामरणी झाले आहेत. म्हणून त्यांना ग्लानी आली नाही. म्हणून माझे युद्ध व श्रम व्यर्थ गेले. मला हे पूर्वी समजले असते तर मी युद्धप्रवृत्त झालो नसतो. पण याच्याशी युद्ध न केले तर मदोन्मत्त होऊन नित्य दु:ख देतील. भगवतीचा वरही विचारान्ती दुर्घट आहे. कारण पुरुष मरणाची इच्छा करीत नाहीत. पुरुष रोगग्रस्त, दीन झाला तरी मरण इच्छित नाही. तेव्हा हे मरण कसे इच्छिणार ? तेव्हा आता मनोरथ पूर्ण करणार्या शक्तीलाच शरन जावे. ती प्रसन्न झाल्यास इच्छित पूर्ण होते."
असा विचार चालू आहे तोच आकाशात असलेली ती मनोहर योगनिद्रा त्याचे दृष्टीस पडली तेव्हा विष्णू राक्षस नाशाकरता त्या देवीची स्तुती करु लागला. "हे देवी, महामाये, उत्पत्ती संहारकारिणी, जन्ममरणशून्ये हे चंडी, भुक्ती-मुक्तिदायिनी, कल्याणी, तुला नमस्कार असो. तुझ्या निर्गुण व सगुण रुपाचे मला ज्ञान नाही. तुझ्या असंख्य चरित्रांचे ज्ञान मला कोठून असणार ? मी निद्रेने निश्चेष्ट झालो आहे. तेव्हा तुझा प्रभाव जाणवला.
ब्रह्मदेवाने अनेक प्रकारे खटपट करुनही इंद्रिये लीन झाल्याने मला जाग आली नाही. तुझ्या वरामुळेच हे दानव श्रांत झाले नाहीत. मी स्वेच्छेने त्यांना द्वंद्वाकरता आवाहन केले. तुझ्या अत्युदभूत वरप्राप्तीमुळे ते मरनार नाहीत. म्हणून मी तुला शरण आलो आहे. तू मला सहाय्य कर, मी श्रांत झालो आहे. हे देवदु:खनाशिनी, ते पापी राक्षस वध करण्यास प्रवृत्त झाले आहेत. तेव्हा मी आता काय करु ? कोठे जाऊ ?
ही विष्णूनी केलेली स्तुती ऐकून ती देवी हास्यपूर्वक म्हणाली, "हे विष्णो, तू युद्ध कर. त्यांना फसवून त्यांचा वध कर. वक्रदृष्टीच्या योगाने मी त्यांना मोह पाडीन, व माझ्या मायेने मोहित झालेल्यांचा तू वध कर.
असे ते प्रेमेरसाचे भाषण ऐकून विष्णू महासागरातील युद्धस्थलावर येऊन उभा राहिला. ते युद्धेच्छू महाबलाढ्य दानवही तेथे आले, व हर्षयुक्त होऊन म्हणाले, "हे विषयलंपट चतुर्भुजा उभा राहा. जयपराजय दैवाधीन आहे असे समजून आमच्याशी युद्ध कर. बलवानांना दैवाने जय प्राप्त होतो. निर्बलांचा पराजय होतो. म्हणून जयाने आनंद मानू नये किंवा पराजयने दु:खित होऊ नये. पूर्वी तू पुष्कळ दैत्यांचा वध केला आहेस. सांप्रत तू पराजित झाला आहेस." असे म्हणून दानव युद्धाकरता उभे राहिले.
हे पाहून अदभूत दृष्टीने विष्णूने त्यांच्यावर प्रहार केला, त्यांनी प्रतिप्रहार केले. परस्परात अति भयंकर दारुण युद्धे झाले. इतक्यात विष्णूने आपली मुद्रा दीन केली, हे देवीच्या दृष्टीस पडले. ते करुणावदन पाहून देवीने आरक्तवर्ण नेत्रांनी हसतमुखाने दैत्यांकडे पाहिले. जणू दुसरे कामबाणच. ते विषयसंबंधी प्रेमभाव उत्पन्न करणारे कटाक्षप्रहार करु लागली. ते पाहून दोघेही पापी मोहित झाले.कामबाणांनी ते पीडित झाले व निर्मल प्रभेने युक्त असलेल्या देवीला पाहताच उभे राहिले.
देवीचा उद्देश अवलोकन करुन विष्णू म्हणाले, " हे दानव वीरहो तुमचे युद्धकौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे. पाहिजे तो वर मागा. पूर्वी युद्ध करणारे अनेक दानव मी पाहिले. पण तुमच्यासारखा कोणी दृष्टीस पडला नाही व ऐकण्यातही नाही. तुमच्या सामर्थ्याने संतुष्ट झाल्यामुळे मी तुमचे मनोरथ पूर्ण करीन."
विष्णूंचे हे भाषण ऐकून मदनव्याकुल व पीडीत झालेले अभिमानी दैत्य त्या महामायेकडे दृष्टी लावून विष्णूला म्हणाले, "हे हरे, आम्ही याचक नाही. तू आम्हाला काय देण्याची इच्छा करीत आहेस! आम्ही याचक नसून दाते आहोत, हे ऋषीकेशा, मनात इच्छा असल्यास तूच वर माग. तुझ्या अदभूत युद्धामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत."
त्यावर विष्णू म्हणाला, "तुम्ही संतुष्ट झाला असाल तर तुम्हा उभयतांचाही माझ्या हातून वध व्हावा."
हे वचन ऐकताच दानव विस्मित झाले. आपण फसलो असे समजून व सर्व प्रदेश स्थलरहित आहेत असे पाहून ते उत्तरले, "हे जनार्दना, प्रथम तू वर देण्याचे कबूल केले आहेस. तू सत्यवचनी आहेस. तेव्हा तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केल्यास आम्ही वध्य होऊ."
विष्णूला चक्राचे स्मरण होऊन विष्णू म्हणाले,"मी विशाल व निर्जल स्थलावर तुमचा वध करतो." तेव्हा विष्णूने आपल्या मांड्या विस्तृत करुन उदकावर निर्जल प्रदेश त्यांना निर्माण करुन दाखवला व म्हणाला, "हे दैत्यांनो, येथे उदक नाही, येथे तुम्ही आपली मस्तके ठेवा म्हणजे मी सत्यवचनी होऊन तुम्हाला त्याचप्रमाणे करीन. त्याचे भाषण योग्य आहे असे पाहून त्या दानवांनी आपला देह हजार योजने वाढवला. तेव्हा विष्णूनेही आपल्या मांड्या दुप्पट वाढवल्या. अखेर आश्चर्ययुक्त होऊन दानवांनी आपली मस्तके अत्यंत अद्भूत जघन प्रदेशावर ठेवली. नंतर विष्णूने आपल्या जघन प्रदेशावर परस्पर चिकटून असलेली त्यांची मस्तके चक्राच्या योगाने तोडून टाकली व ते मधुकैटभ दानव गतप्राण झाले. त्यांच्या मेदाने सर्व जग व्याप्त झाले, तेव्हांपासून पृथ्वीला मेदिनी हे नाव प्राप्त झाले आणि म्हणूनच मृतिका भक्षणाला अयोग्य झाली.
सूत म्हणतो, "महाविद्या व महामाया तिचीच सर्वदा प्रज्ञजनांनी सेवा करावी. देवदैत्यांनाही त्या परम शक्तीची आराधना करावी, तीच सर्व श्रेष्ठ आहे. म्हणून निर्गुण अथवा सगुण परम शक्तीचे पूजन केले पाहिजे.