[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हे दानव बलाढ्य आहेत, असे पाहून तंत्रवेत्या ब्रह्मदेवाने साम, दाम, भेद, व युद्ध या सर्व उपायांचा विचार केला. पण ह्या राक्षसांचे बल किती आहे, हे समजल्याशिवाय युद्ध करणे योग्य नव्हे. शिवाय ह्या दुष्टांची स्तुती केली तर आपण निर्बल आहोत असेच प्रकट होईल. तसेच दानरुप उपायही याठिकाणी योग्य नाही, त्याचप्रमाणे या उभयतामध्ये मला भेद करता येणार नाही. तेव्हा शेषावर निद्रासुख भोगीत असलेल्या महावीर्यवान व चतुर्भुज जनार्दनाला उठवतो. तोच माझे दु:ख हरण करील. असा विचार करुन तो मनामध्येच विष्णूला शरण गेला आणि भक्ताचे दु:ख हरण करणारा तो भगवान विष्णू जो योगनिद्रेत निश्चल झाला होता, त्याची ब्रह्मदेवाने मधुर शब्दांनी स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणाला, ‘हे दीननाथ, हे हरे, हे वामना, हे माधवा, हे भवदु:खनाशका, हे ऋषीकेशा, हे सर्वव्यापी जगदीशा ऊठ. हे अंतर्यामी, हे महात्मा, वासुदेव, हे जगत्पते, हे दुष्टशत्रुनाशका, समाधिनिष्ठ, हे चक्रगदा धारण करणार्या, हे सर्वज्ञा, हे सर्वलोकाधिपते हे सर्वशक्तिमान सुरेश्वरा, माझे रक्षण कर. हे विश्वंभरा, विशालनयना, हे जगत्कारण, हे निराकारा, हे उपत्ती स्थिती लय करणार्या, तुझ्या चरित्राचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे. हे महाराज, हे उन्मत्त झालेले दैत्य माझा वध करु इच्छितात. हे माझ्यावरचे संकट तू का जाणत नाहीस ? अत्यंत दु:खी झालेला मी तुला शरण आलेलो आहे, तू मला आधार न देशील तर तुझे पालकत्व खोटे होईल.
अशा प्रकारे स्तुती करुनही तो भगवान विष्णू उठेना. तेव्हा ब्रह्मदेवाला काळजी निर्माण झाली. खरोखरच निद्रेने इतके घेरल्यामुळे भगवान विष्णूंना जाग येत नाही. तेव्हा या ब्रह्मदेवाने आता कोणाकडे जावे ? शरण जाण्यास योग्य असे कोणीही नाही. असा विचार करुन, योगमायेचेच हे कृत्य आहे, असे मनात म्हणून ब्रह्मदेव योगमायेची स्तुती करु लागला. त्याने मनात असा विचार केला की, जिने विष्णूला निद्रिस्त केले आहे तीच शक्ती माझे रक्षण करण्यास समर्थ आहे. मृताला जसे शब्दज्ञान होत नाही, तसेच निद्रिस्त झाल्याने हरीला काही समजत नाही, ज्या अर्थी त्याला निद्रेने वश केले आहे. तस्मात ही योगनिद्रा रमापती हरीची स्वामिनी होय. जिने लक्ष्मीचा स्वामी आपल्या आधीन केला आहे त्या भगवतीने सर्व जग वश करुन घेतले आहे. आम्ही सर्व विष्णू, शंभू, सावित्री, रमा, उमा, या सर्व देवीच्या आधीन आहेत यात संशय नाही. त्यामुळे हरीही आधीन झाला आहे. मग इतरांची काय कथा ? तेव्हा आता त्या देवीचे स्मरण केले तरच हरीची निद्रा जाऊन तो युद्धकार्य करील, असा विचार करुन विष्णूच्या अवयवात असलेल्या योगनिद्रेची त्या ब्रह्मदेवाने स्तुती केली. हे देवी, ज्याअर्थी सर्वविवेकी पुरुषोत्तमाला तू आधीन केलेस त्याअर्थी तू या जगाचे कारण आहेस. हे जननी, मी मूढ झालो असून हरीही पराधीन झाला आहे. तेव्हा सर्वत्र वास्तव्य करणार्या हे देवी कोण बरे. पंडीत तुझ्या निर्गुण विलासरुप लीला जाणण्यास समर्थ होणार आहे. जगतकर्ती असूनही पुरुष तुला अचेतन समजतात. पण तू तशी मुळीच नाहीस. कारण जगन्निवासी विष्णूलाही तू अचेतन करतेस. तू सगूण होऊन नाना प्रकारचे नाटक करतेस . पण तुझ्या ह्या कृत्यांशी असलेला संबध कोणीच जाणत नाही.
हे भवानी, संध्या हे तुझे नाव असून तुझ्या अंगचे तशा प्रकारचे गुण पाहून मुनिजन तुजे त्रिकाल ध्यान करीत असतात. जगाची ज्ञानसाधनारुप बुद्धी तूच आहेस. नित सुख देणारी तू स्त्री आहेस.
तसे कीर्ती, मति धृति, कांती, श्रद्धा व रति ह्या रुपाने तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हरी निद्राधीन झाल्यामुळे तूच सर्व जगताची जननी आहेस हे मला समजले आहे. नाहीतर तुझे रुप जाणण्यासाठी कितीही तर्क केले, तरी काहीच निष्पन्न होत नाही. तुझे रुप वेदवत्तांना व श्रुतींनाही दुर्घट आहे. कारण श्रुतीची उत्पत्ती तुझ्यापासून झाली आहे. सर्व द्वैतभासही तुझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून श्रेउतीचीही उत्पत्ती तुझ्यापासूनच झाली आहे, हे निर्विवाद आहे. असे संपूर्ण चरित्र जाणणारा भूतलावर कोण आहे !
मी, विष्णू, महेश्वर, इतर देव, मुनी, माझे पुत्र, हे सर्व तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत. कारण तुझे महात्म्य वर्णन करणे दुर्घट आहे. यज्ञात ऋत्विजांनी ‘स्वाहा’ हे तुझे नाव उचारल्याशिवाय हवन झालेला हविर्भाग देवांना कधीच प्राप्त होणार नाही. यावरुन तू देवांचाही चरितार्थ चालवितेस. पूर्वीही असुरांपासून तूच आमचे रक्षण केलेस. आताही मधुकैटभापासून मी पुन: घोर संकटात सापडलो आहे. आता विष्णू तुझ्या आधिन झाल्याने तो माझे दु:ख जाणण्यास असमर्थ आहे. तेव्हा हे देवी, विष्णूला निद्रेतून मुक्त कर अथवा माझ्यावरील संकट दूर कर. ह्या दानश्रेष्ठांचा वध कर. हे देवी, जे तुझा प्रभाव न जाणता हरिहराचे ध्यान करतात ते मंदमती होत. विष्णुही निद्रेमुळे पराधीन झाला आहे. हे तुझ्या प्रभावाचे प्रत्यक्षप्रमाण आहे. ज्याअर्थी तुझ्या शक्तीच्या तावडीत सापडलेल्या विष्णूला प्रत्यक्ष लक्ष्मीही उठविण्यास समर्थ नाही, त्याअर्थी तू तिलाही वश करुन निद्रिस्त केले आहेस. म्हणून तीसुद्धा जागी नाही. हे देवी, इतर देवांचे भजन करण्याचे सोडून जे तुझ्या चरणकमलाच्या सेवेविषयी तत्पर असतात ते पुरुष जगतामध्ये धन्य होत. धी, कांती, कीर्ती, शुभवृत्ती हे विष्णूचे गण आज तुला सोडून कोठे गेले आहेत ? हे मानिनी भगवती, तुझ्याच निद्राशक्तीच्या बलामुळे हा हरी निद्रिस्त होऊन बंदिवान झाला आहे. तूच सर्व जगाची शक्ती असून वस्तुमात्र तूच निर्माण केलेल्या या मोहमय नाटकात स्वत: तू क्रीडा करीत आहेस.
कल्पाच्या आरंभी तू विष्णूला प्रकट केलेस तसेच जगतकल्याणासाठी तूच त्याला निर्मल शक्ती दिलीस व जगताचे रक्षण केलेस. त्यालच आज तू वश करुन टाकले आहेस. हे अंबे, तू तुझ्याप्रमाणे सर्व करीत असतेस, हे देवी मला याजगात उत्पन्न करुन मारण्याची तुझी इच्छा नसेल तर मौन सोडून तू माझ्यावर द्या कर. काळाप्रमाणे भासणारे हे दानव तू निर्माण का केलेस ? हे भवानी माझी उपहास करण्याचे तुझी इच्छा आहे का ? तूच संपूर्ण जग निर्माण करतेस व स्वतम्त्र क्रीडा करतेस. पुन: तूच सर्वांचा लय करतेस. हे तुझे अद्वितीयत्व मला आता समजले आहे . तेव्हा माझाही वध करण्याची तू इच्छा करते आहेस यात आश्चर्य कोनते ? हे माते, आज तू खुशाल माझा वध कर. मला मरणाचे दु:ख वाटत नाही. पण तूच जगतकर्मा प्रथम उत्पन्न केलास आणि दैत्यांकडून तूच त्याचा वध करविलास तर तुझी अपकीर्ती होईल. म्हणून तू उठ आणि आपले अदभूत सामर्थ्य वापरुन माझा अथवा त्या दैत्यांचा कोणाचाही वध कर. नाहीतर विष्णूला उठव. तो ह्यांचा वध करील. ही सर्व कार्ये तूच सिद्धीस नेणार आहेस.
ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या देहापासून दूर होऊन जवळच उभी राहिली. विष्णूला चेतना आली. हे पाहून ब्रह्मदेवाला आनंद झाला.