[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्यानंतर ऋषींनी उत्सुकतेने सूताला विचारले, हे सूता, विष्णूंनी पाच हजार वर्षेपर्यंत सागरात राहून मधुकैटभाशी युद्ध केले. पण ते दानव इतके दृष्ट का निपजले ? त्यांचा श्रीहरीने कसा वध केला ? ते अद्भुत चरित्र आता कथन कर. सुदैवाने तू बहुश्रुतवक्ता आहेस आणि आपला येथे समागम झाला आहे. मूर्खाशी होणारा समागम विषापेक्षा भयंकर असतो व ज्ञानवंताशी झालेला समागम हा अमृततुल्य असतो. सर्व पशू जिवंतपणी अन्न खातात, मूत्रोत्सर्ग करतात, मैथुनसुखही त्यांना विदीत असते. पण त्यांना बरे का वाईट हे समजण्याचे ज्ञान नाही. तसेच ज्यांना हरिकथा श्रवण करण्याची इच्छा होत नाही, ते नरपशूच होत.
मृगादि पशू किंवा भुजंगही नादसेवनाने मोहित होत असतात. इंद्रियांमध्ये श्रवणेन्द्रिये व चक्षुरिंद्रिये ही श्रेष्ठ आहेत. प्राज्ञ जनांनी श्रवणाचे सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकार सांगितले आहेत. वेदशास्त्रांचे श्रवण सात्विक व सहित्यशास्त्राचे श्रवण राजस आहे, तर परदोषप्रकारात युद्धवार्ता हे श्रवण तामस आहे. सात्विक श्रवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत. उत्तम, मध्यम व कनिष्ठ. उत्तम हे मोक्षफल देते, मध्यम स्वर्गप्राप्ती विषयोपभोग करुन देणारे अधम, असे निश्चयाने सांगितले आहे. साहित्य तीन प्रकारचे आहे. स्वकीय स्त्रीचे ठिकाणी मध्यम व परस्त्रीचे ठिकाणी अधम.
शास्त्रवेत्त्यांनी तामस श्रवणाचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे सांगितले आहेत. आततायी पुरुषाशी युद्ध हे उत्तम, पांडवांप्रमाणे व शत्रूशी द्वेशाने होणारे मध्यम व विवाद व कलह यांमध्ये निष्कारण होणारे वाग्युद्ध हे अधम आहे. तेव्हा हे महाविचारी सूता, ह्या सर्वात पुराणाचे श्रवण मुख्य असून बुद्धिवर्धक, पुण्यकारक व पापनाशक आहे. म्हणून कृष्ण द्वैपायनापासून श्रवण केलेली शुभ कथा तू आम्हाला सांग.
सूत म्हणाला, तुम्ही सर्व व मीही धन्य आहोत ऐका तर. पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवाधिदेव जनार्दन हे शेषशय्येवर निद्रिस्त झाले होते. त्यावेळी त्यांच्या कानातील मळापासून मधुकैभट दानव निर्माण झाले व ते समुद्र जलामध्ये वाढले. ते इतस्तत: क्रीडा करुन राहू लागले. ते अगदी भावाभावाप्रमाणे राहात. त्यांनी विचार केला.
कारणाशिवाय काही घडत नाही. आधाराशिवाय आधेय कोणत्याही प्रकारे राहणे शक्य नाही. परंतु हा आधार कोणता आहे हे सुचत नाही. हे सुखरुप व विस्तिर्ण जल कोणाच्या आधारावर आहे ?
हे कुणी उत्पन्न केले ? आम्ही जलात मग्न होऊन कसे राहिलो ? आम्ही दोघे कसे निर्माण झालो ? आमचे मातापितर कोठे आहेत हे खरोखरच आम्हाला समजत नाही.
तेव्हा पाण्यात जवळच असलेल्या मधूला कैटभ म्हणाला, " हे भ्रात्या केवळ ज्या शक्तीमुळे आपणाला जलात संचार करता येतो ती अचल शक्ती आपल्या निर्मितीचे कारण असावी. हे जलही तिच्याच आधारावर आहे. तीच देवी सर्वांचे कारण आहे."
अशाप्रकारे त्या असुरांना ज्ञान होऊ लागले. तेवढ्यात त्यांनी मनोहर वाग्बीज आकाशामध्ये श्रवण केले . तोच त्यांनी उपदेश म्हणून स्वीकारुन त्याचाच जप सुरु केला. अशाप्रकारे पुष्कळ जप केल्यावर आकाशात उत्पन्न झालेली शुभ विद्युल्लता त्यांना दिसली.
तेव्हा हा नक्कीच मंत्र आहे, असे म्हणून हे सगुणध्यान आपल्याला दिसले, असा विचार त्यांच्या मनात आला व मधुकैटभ, निराहार, जितेंन्द्रिय राहून त्या ध्यानाकडे एकचित्त होऊन लय लावून जप करीत राहिले. असे हजार वर्षे तप केल्यावर ती परम शक्ती प्रसन्न झाली व त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरिता म्हणाली- हे दैत्यहो, तुम्हाला संमत असा वर मागा. मी तुमच्यावर संतुष्ट झाले आहे. अशा प्रकारे आकाशवाणी ऐकल्यावर ते दानव म्हणाले, " हे सुव्रते देवी, स्वेच्छेने मरण येईल एवढाच आम्हाला वर दे."
" दैत्यांनो, माझ्या प्रसादाने तुम्ही इच्छामरणी व्हाल व सर्व दैत्यांनाही अजिंक्य व्हाल."
ह्याप्रकारे वरप्राप्ती झाल्यामुळे ते दानव उन्मत्त झाले आणि जलचर प्राण्यांसह समुद्रात क्रीडा करु लागले. काही काळानंतर पद्मासनावर बसलेला ब्रह्मदेव त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांना अत्यंत आनंद होऊन ते महाबलाढ्य दैत्य म्हणाले," हे सुव्रता, आमच्याशी युद्ध कर अथवा आसन सोडून कोठेही चालता हो; कारण तू बलहीन असल्यास तुला शुभ आसन कोठून योग्य होणार ? हे वीराचे स्थान आहे. पण तू भित्रा असल्यामुळे ह्या स्थानाचा सत्वर त्याग कर."
दानवांचे हे भाषण ऐकून ब्रह्म्देव चिंताक्रांत झाला. काय करावे, हा एकच विचार तो सारखा करु लागला.