इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
प्रथमस्कन्धे हयग्रीवावतारकथनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
विष्णूचा हयग्रीव अवतार -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ऋषी म्हणतात - हे सूता माधवाचेही मस्तक देहापासून निघून गेले व पुनरपि दुसरे मस्तक प्राप्त होऊन तो सर्वकर्ता जनार्दन हयग्रीव झाला हे आश्चर्यकारक व जगाला विस्मय करणारे आहे व त्यामुळे आम्ही संशययुक्त झालो आहोत. वेदही ज्याचे स्तवन करतात, सर्व देव ज्याचा आश्रय करतात, तो आदिदेव व जगन्नाथ असून सर्वांचे कारण आहे, त्याचेही मस्तक दैवयोगाने तुटून कसे गेले ? हे आम्हाला विस्ताराने कथन कर.
तेव्हा सूत म्हणतो- सर्वांनी सावध चित्ताने विष्णूचे चरित्र श्रवण करावे.
एकदा सनातन देव जनार्दन दहा हजार वर्षेपर्यंत दारुण युद्ध करुन श्रांत झाला असता समप्रदेशावरील शुभस्थानाचे ठिकाणी पद्मासन घालून भूमीवर सज्ज असलेले धनुष्य कंठाला टेकून प्रभू विष्णू बसले . धनुष्याच्या अग्रावर भार देऊन तो रमारमण निद्रिस्त झाला, श्रांत झाल्याने त्याला निद्रेने घेरले. काही काळ लोटल्यावर ब्रह्मदेव, शंकर, इंद्र यांसह सर्व देव यज्ञ करण्यास उद्युक्त झाले. देवकार्य सिद्धीस जावे म्हणून यज्ञाधिपती जो जनार्दन देव ह्याचे दर्शन घेण्यासाठी वैकुंठाला गेले परंतु तो तेथे न दिसल्याने तो कोठे आहे हे ज्ञानदृष्टीने अवलोकन करुन ते भगवान विष्णु जेथे होते तेथे आले तेव्हा प्रभू निश्चेष्ट होऊन योगनिद्रेच्या आधीन झाले होते. म्हणून ते त्या देवापाशी बसले. परंतु देव निद्रिस्तच असल्याने ब्रह्मा, रुद्र प्रभृतीक देव चिंताक्रांत झाले.
तेव्हा इंद्र म्हणाला - हे सुरश्रेष्ठांनो ! आता काय करावे ? विष्णूची झोपमोड कशी करावी ? ह्याचा सर्वांनी विचार करा.
शंकर म्हणाले- निद्राभंग केल्यास दोष लागणार, पण सुरश्रेष्ठांनो आपणास यज्ञ कर्तव्य आहे.
इतके झाल्यावर परमश्रेष्ठी ब्रह्मदेवाने वाळवी उत्पन्न केली. भूमीवर असलेले धनुष्याग्र तिचे भक्षण करावे हा त्याचा उद्देश होता. वाळवीने धनुष्याग्रास भक्षण केले असता वर जाईल व देवाधिदेव निद्रेपासून मुक्त होईल आणि मग देवकार्य नि:संशय पार पडेल, असा विचार करुन त्याने वाळवीला तसे सांगितले. तेव्हा वाळवी म्हणाली, रमारमण व जगदगुरु जो देवाधिदेव तेजस्वी विष्णू त्याच्या निद्रेचा भंग कसा करावा? कारण निद्राभंग, कथेचा विच्छेद, दांपत्त्यातील परस्पर प्रेम नाहीसे करणे, बालकांचा मातेचा वियोग ही पातके ब्रह्महत्येप्रमाणे आहेत, तस्मात या देवाधिदेवाच्या सुखाचा नाश मी कसा करु ? ब्रह्मदेवा भक्षणाने जर माझ्याकडून पातक घडले तर मला कोणते फल प्राप्त होणार? सर्व लोक खरोखरच स्वार्थाकरता पातक करतात. मीही स्वार्थी असेल तर धनुष्याचे अग्र भक्षण करीन.
ब्रह्मदेव म्हणतात- यज्ञामध्ये आम्ही तुला भाग ठेवू. तेव्हा तुला तो भाग मिळणार असल्याने तू आमचे कार्य कर. विलंब न करता विष्णूला उठीव. हवन चालले असता अवदानापैकी जे बाहेर पडेल तो तू आपला भाग समज आणि सत्वर कार्य कर.
सूत म्हणतो-ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितल्यावर वाळवीने भूमीवर टेकलेले धनुष्याचे अग्र भक्षण केले. त्यामुळे त्याची प्रत्यंचा सुटली व वरचे अग्र मोकळे झाले. भयंकर शब्द होऊन त्यायोगे देवही भयभीत झाले. सर्व क्षुब्ध झाले. जलचर प्राणी त्रासून गेले. प्रचंड वायू वाहू लागले, पर्वत हालू लागले, दु:खसूचक मोठमोठे उत्पात होऊ लागले, दिशा भयाण झाल्या, सूर्य दिसेनासा झाला आणि असा दुर्दिन प्राप्त झाल्यामुळे काय अनर्थ गुदरणार आहे ह्याविषयी देव चिंताक्रांत झाले.
तक्यात मुकुट व कुंडले ह्यासह देवाधिदेव विष्णूचे मस्तक कोणीकडच्या कोणीकडे उडून गेले. अंध:कार नाहीसा झाल्यावर ब्रह्मा शंकर यांनी मस्तकरहित विष्णूचे शरीर अवलोकन केले व ते विस्मयचकित झाले. सर्व देव चिंतामग्न झाले. शोकाकुल होऊन ते रडत म्हणाले,‘हे नाथ, प्रभो, हे देवाधिदेव, सर्व देवांना कय हे अति अदभूत भयानक दु:ख प्राप्त झाले आहे? तुझे छेदन, दहन अथवा भेद होणे कधीही शक्य नसता जिने आज तुझे मस्तक हरण केले, ती ही माया तरी कोणत्या देवाची ? हे प्रभो अशी स्थिती प्राप्त झाली असता देवांना मरण येईल. तुझ्या ठिकाणी आमचे प्रेम कशा प्रकारचे आहे. केवळ स्वार्थाकडे लक्ष दिल्यामुळेच आम्हाला रडत बसण्याचा प्रसंग आला आहे हे रमारमण, हे विघ्न दैत्य, यक्ष, राक्षस ह्यांनी उपस्थित केले नसून देवांनीच उपस्थित केले आहे. आता आम्ही दोष तरी कोणाला द्यावा.
परतंत्र झालेल्या आम्ही आता काय करावे? कोणीकडे जावे? हे सुरेश्वर मन गोंधळून गेलेल्या देवाचे रक्षण करणारा आता कुणीही नाही. तू मायाधिपती, जगदगुरुअ असताना जिने आज मस्तक उडविले ती ही माया सात्विक म्हणता येणार नाही राजसही नाही वा तामस म्हणजे योग्य नाही.
ह्याप्रमाणे शिवप्रभुति देव आक्रोश करीत असता वेदवेत्त्यांत श्रेष्ठ असा बृहस्पती सांत्वनन करण्याच्या उद्देशाने म्हणाला- हे देवांनो रडून वा आक्रोश करुन काय उपयोग? आपल्या बुद्धीला सुचणारा ह्याप्रसंगी योजला पाहिजे. हे सुरेश्वरा दैव आणि यत्न हे उभयता सारखेच आहेत म्हणून उपाय अवश्य योजावा. दैवाच्या योगाने तो अवश्य सफल होईल.
इंद्र म्हणाला, "ज्याअर्थी देवांच्या समक्ष विष्णूचाही शिरच्छेद झाला त्याअर्थी देवच श्रेष्ठ असे मला वाटते. निरुपयोगी पुरुष यत्नाचा धिक्कार असो."
ब्रह्मदेव म्हणाला- कालगतीने जे प्राप्त होते ते शुभ असो अथवा अशुभ असो ते अवश्य भोगलेच पाहिजे. कारण दैवाचे अतिक्रमण करण्यास कोण समर्थ आहे ? देहधारी प्राणी सुखदु:खाचा भोगता आहे. कारण शंकराने पूर्वी कालगतीने माझे मस्तक नखानेच तोडून टाकले. शापामुळे महादेवाचे लिंग पतन पावले. त्याचप्रमाणे श्रीहरीचे मस्तक क्षारजलाने युक्त असलेल्या समुद्रात पडले आणि शाचिपती इंद्राला सहस्त्र छिद्रे, स्वर्गच्युती व मानस सरोवरातील कमलामध्ये वास्तव्य, हे दु:ख भोगावे लागले. तेव्हा संसारात कोणाला बरे दु:ख भोगावे लागत नाही? तस्मात हे देवहो, तुम्ही शोक करु नका आणि महामाया व ज्ञानरुप जी पुरातन देवी आहे तिचे ध्यान करा. ती निर्गुण पराप्रकृती आपले कार्य करील. तीच ब्रह्मविद्या सर्वाची जननी व रक्षणकर्ती आहे. तिनेच हे सर्व चराचर त्रैलोक्य व्यापले आहे."
असे सांगून देवकार्य सिद्धीस जाण्याकरता ब्रह्मदेव म्हणाले, "सर्वोत्कृष्ट, गुढ शरीराने युक्त महामाया सर्व कार्य सिद्धीस नेणारी ब्रह्मज्ञानरुप असलेली जी सनातन देवी तिचे तुम्ही स्तवन करा."
ब्रह्मदेवाचे भाषण ऐकल्यावर सर्वांगसुंदर वेद, त्या जगतरुपाने स्थित असलेल्या व ज्ञानाने प्राप्त होणार्या महामायेची स्तुती करु लागले.
वेद म्हणतात, "हे देवी, महामाये, हे जगतरुष्टे हे कल्याणी, निर्गुण माते, हे सर्व भुतस्वामीनी, हे शिवमनोरथ परिपूर्ण करणार्या, तुला नमस्कार असो. सर्व भूतांचा आधार व प्राणांचा प्राण तूच असून धी, श्री, कांति, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती, स्मृती अशी तूच आहेस. प्रणावामध्ये जी अर्धमात्रा ती तूच आहेस आणि गायत्री, व्याह्रती, जया, विजया, धात्री, लज्जा, कीर्ती, स्पृहा, द्या तूच आहेस, हे अंबे त्रैलोक्य उत्पन्न करणारी दक्ष, दयारसाने युक्त लोकमात कल्यानप्रद विद्या, सर्व लोकांना हितकारक, श्रेष्ठ, मंत्राचे ठिकाणी वास्तव्य करण्याविषयी निपुण व संहारनाशक असलेल्या तुझी आम्ही स्तुती करीत आहोत.
ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, सरस्वती, अग्नी व सूर्य हे जगताचे नाथ आहेत. ते तूच केले असल्यामुळे मुख्य नाहीत. कारण चराचर प्राण्यांची माता तूच आहेस. ही जननी, जेव्हा हे संपूर्ण विश्व उत्पन्न करण्याची तुला इच्छा होते तेव्हा विष्णू, रुद्र, ब्रह्मदेव, हे त्यातील मुख्य, त्यांना तू उत्पन्न करतेस. हे देवी, तुझ्या ठिकाणी संसाराचा गंधही नाही. सर्व जगतामध्ये तुझे रुप जाणण्यास असा कोणीही समर्थ नाही. तुझ्या नामाचे परिगणन करण्यास ह्या ठिकाणी कोणीही पुरुष योग्य नाही. अल्प जलाशयातील उदक उल्लंघन करण्यास अशक्य असलेला पुरुष निश्चय करुनही समुद्र उल्लंघन करण्यास कसा समर्थ होणार ?
हे भगवती, तुझे वैभव जाणणारा देवांमध्ये एकही नाही. तुच संसारात भुवनेश्वरी या नावने प्रसिद्ध असून विश्व निर्माण करणारी आहेस. हे देवी तू एकच असूनही मिथ्या असलेले हे संपूर्ण विश्व कसे उत्पन्न करीत असतेस ह्याविषयी वेदवचन प्रमाण आहे. हे भगवती, तू निरीच्छ असून सर्व जगताचे कारण आहेस. तस्मात हे तुझे अदभूत चरित्र आमच्या मनाल मोह उत्पन्न करीत आहे. ज्याचे सर्व गुण सर्व वेदांनाही गोचर नाहीत अशा तुझ्या प्रभावाचे वर्णन आम्हाला कसे बरे करता येईल आणि तू स्वत:च जर आपला उत्कृष्ट प्रभाव जाणीत नाहीस तरी इतरांची गोष्ट पाहिजे कशाला ? हे जननी, मधुसूदनाच्या मस्तकाचे पतन तू जाणीत नाहीस काय, किंवा मधुसूदनाची शक्ती किती आहे हे पाहण्याचे तुझ्या मनात आहे काय ? हे माते, श्रीहरीची ही प्रबल पातकपरंपराच ओढवली काय ? पण तुझ्या चरणकमलाची सेवा करण्यात निपुण असलेल्या विष्णूच्या ठिकाणी पातक कोठून असणार ? देवगणांविषयी ही जी तुझी अयोग्य उपेक्षा दृष्टीस पडत आहे त्याचे कारण काय ? अथवा श्रीहरीच्या, मस्तकाचा नाश हेच तुला मोठे आश्चर्य वाटत आहे काय ? असे असेल तर आम्हाला मोठेच दु:ख प्राप्त झाले आहे.
परंतु हे माते, जननरुप दु:ख नाहीसे करण्यास तू समर्थ आहेस तर मस्तकाची योजना करण्यास तुला विलंब कसा झाला ? हे देवी, सर्व देवसमुदायाने काही पातक केले असे समजून तूच हा शिरच्छेद केलास काय ? देवांनी केलेले पातक तू विष्णूला भोगावयास लावतेस काय ? संग्रामामध्ये विष्णूला काही गर्व उत्पन्न झाल्यामुळे वेगाने त्याचा शिरच्छेद करण्यास तू उद्युक्त झालीस काय ? हे माते, आम्हांला काहीच आशय समजत नाही.
हे भगवती संग्रामात पराजित झालेल्या दैत्यांची अती रमणीय तीर्थावर घोर तपश्चर्या करुन तुजपासून करुन घेतल्यामुळे सांप्रत विष्णूचे मस्तक तू अदृश्य केले आहेस काय ? मस्तकरहित वासुदेवाचे अवलोकन करण्याविषयी हा तुझा विनोद आहे काय ? हे आद्य देवी, सागरकन्येवर आज तू का बरे क्रुद्ध झालीस ? कोणता अपराध तिच्याकडून घडल्यामुळे त्या लक्ष्मीला तू नाथरहित अवलोकन करीत आहेस ? तुझ्याच अंशापासून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीच्या अपराधाला क्षमा करणे हे योग्य आहे. ह्यास्तव विष्णूला जिवंत करुन तू लक्ष्मीला आनंदीत कर. सृष्टिप्रभृति कार्याविषयी मुख्य आधिकारी असलेले हे देव तुला सतत प्रणाम करीत आहेत. ह्यास्तव हे देवी, सर्वाधिपती देवाला उठवून तू देवांना शोभमुक्त कर.
हे अंबे, विष्णूचे मस्तक कोठे गेले, हे आम्ही जाणत नाही आणि तुझ्याशिवाय विष्णूच्या जीवनाला दुसरा उपाय नाही. हे देवी, जिवंत करण्याविषयी दक्ष असलेल्या अमृताप्रमाणे तूच जगताला जीवित देणारी आहेस. तस्मात इच्छेला येईल तसे तू कर.
ह्याप्रमाणे सामगायन करणार्या सांग वेदपुरुषांनी माहेश्वरी व निर्गुण अशा त्या देवीची स्तुती केली असता ती माया प्रसन्न झाली आणि जनांना आनंद देणारी ती शुभदेवी आकाशामध्ये येऊन शरीररहित वाणी होऊन सुखदायक शब्दांनी देवांना म्हणाली, "हे देवांनो, तुम्ही चिंता करु नका हे अमरहो, तुम्ही स्वस्थ राहा. वेदांनी माझी स्तुती केल्यामुळे मी संतुष्ट झाले आहे. मनुष्यलोकात जो पुरुष माझी स्तुती करील आणि माझे भक्तीने सर्वदा कथन करील त्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतील. त्याचप्रमाणे माझे वेदोक्त व वेदतुल्य असलेले स्त्रोत्र जो त्रिकाल भक्तीने श्रवण करील तो दु:खमुक्त होऊन सुखी होईल . आता विष्णूचे मस्तक आज का गेले याचे कारण तुम्ही श्रवण करा. या संसारात कारणाशिवाय कार्य कसे होईल ?"
"सागरकन्या लक्ष्मी समीप बसली असता तिचे मनोहर मुख अवलोकन करुन विष्णूने हास्य केले. परंतु विष्णू कपटाने हासत आहे असा तिचा समज झाला. मनात म्हणाली, "हा प्रभू मला का बरे हसला ? माझे मुख श्रीहरीला विरुप दृष्टीस पडण्याचे कारण काय ? कारणाशिवाय हे हास्य संभवते का, अथवा दुसरी एखादी स्त्री त्याने सवत केली आहे का ?
तदनंतर महालक्ष्मी क्रोधायमान झाली . तामसी शक्तीने तिच्या देहात प्रवेश केला. देवकार्य सिद्धीस जाण्याकरता काही विपरीत काल प्राप्त झाल्यावर तिच्या देहात अतिभयंकर तामसी शक्ती निर्माण झाली आणि ‘हे तुझे मस्तक पडो’, असे ती हळूच म्हणाली. भवितव्यामुळे, स्त्रीस्वभावामुळे व विपरीत काल प्राप्त झाल्यावर लक्ष्मीने विष्णूला विघातक शाप दिला.‘सवतीमुळे होणारे दु:ख वैधव्यापेक्षा अधिक दारुण आहे’, असा विचार तामसी मनोवृत्तीमुळे तिच्या मनात आला.
तेव्हा अनृत, साहस, माया, मूर्खत्व, अतिलोभ, अशीच आणि निदर्यत्व हे दोष स्त्रियांचे ठिकाणी स्वाभाविक आहेत. मी आता पूर्वीप्रमाणे त्या वासुदेवाला मस्तकयुक्त करते. शापामुळे ह्याचे मस्तक क्षारोद समुद्रात बुडून गेले आहे. असे होण्याचे आणखी एक कारण असे की त्यामुळे तुमचे देवकार्य होणार आहे यात संशय नाही.
पूर्वी हयग्रीव म्हणून प्रसिद्ध असलेला महापराक्रमी दैत्य सरस्वतीच्यातीरी मोठे बयंकर तप करु लागला. एकाक्षरुप जे माझे मायाबीज, त्या मंत्राचा तो निराहार, जितेंद्रिय व सर्वबोगरहित होऊन जप करु लागला. सर्व भूषणांनी भूषित असलेली मी तामसी शक्ती आहेअसे समजून तो ध्यान करु लागला. हजार वर्षेपर्यंत त्याने अति ऊग्र तप केले. त्यावेळी त्याने जसे मनात आणले तसे तामसरुप धारण करुन, सिंहारुढ होऊन मी त्याच्या पुढे प्रकट झाले आणि म्हणाले, "हे महाभाग्यशाली वर माग". हे माझे भाषण ऐकून त्या दानवाने मला प्रदक्षिणापूर्वक प्रणिपात केला. माझे रुप अवलोकून तो उत्तेजित झाला व देवीची स्तुती करु लागला. हयग्रीव म्हणाला," हे देवी, जगाची उत्पत्ति, स्थिती व लय सर्व काही तूच करतेस. हे कल्याणि, तुला नमस्कार असो. पृथ्वी, उदक, अग्नि, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे कारण तूच आहेस. तसेच गंध, रस, स्पर्श व शब्द ह्याचेही तूच कारण आहेस. तसेच सर्व कर्मेंद्रियेही तुझ्यापासूनच उत्पन्न होतात."
देवी म्हणाली, "मी प्रसन्न झाले आहे, तेव्हा तुला हवा तो वर माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झाले आहे."
तेव्हा हयग्रीव म्हणाला, "हे माते, मला अमर कर. तसे मी योगी, देव, दैत्य यांना अजिंक्य व्हावे."
देवी म्हणाली, "हे हयग्रीवा, जन्म व मृत्यू हे येणारच. तेव्हा तुला मरण येणार याविषयी खात्री बाळग व दुसरा इच्छित वर माग."
हयग्रीव म्हणाला, " तर मग हे देवी, मला हयग्रीवाशिवाय इतरांकडून मरण न येईल असे कर."
देवीने त्याला वर देऊन सांगितले, " आता जा व सुखाने राज्य कर. तुला हयग्रीवाशिवाय इतरांकडून मृत्यू येणार नाही." असे म्हणून देवी अंतर्धान पावली आणि तो दानव आनंदाने परत गेला.
पुढे तो मुनींना त्रास देऊ लागला. कारण त्याचा वध करणारा त्रैलोक्यात कुणीही समर्थ नव्हता व तो अवध्य आहे, म्हणून विष्णूच्या देहाला त्वष्टा अश्वाचे मस्तक लावील. मग हा हयग्रीव देवहितासाठी त्या पापी व क्रूर अशा दानवाचा युद्धात वध करील."
ह्याप्रमाणे देवांना विस्ताराने कथन केल्यावर देव संतुष्ट झाले व त्यांनी त्वष्ट्याला विष्णूचे मस्तक जोडण्यास सांगितले. त्चष्ट्याने देवकार्यासाठी त्वरेने जवळच असलेल्या अश्वाचे मस्तक तोडून विष्णूच्या देहाला चिकटविले. अशा प्रकारे देवीच्या प्रसादामुळे विष्णू हयग्रीव झाला . नंतर संग्रामात त्याने मदमत्त दानवाचा वेगाने जाऊन वध केला.
देवीच्या कृपेमुळे दानवाचा विष्णूने हयग्रीव होऊन वध केला. ही कथा जो श्रवण करील त्याला पापमुक्ती मिळेल.