इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां
प्रथमस्कन्धे देवीसर्वोत्तमेतिकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
व्यास पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्येस जातात -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ऋषी म्हणाले - हे विनयसंपन्न सूता, व्यास मुनीच्या कोणत्या भार्येपासून शुक उत्पन्न झाला ? तो कसा झाला ? तो उत्कृष्ट संहिता पठण करणारा असून अरणीपासून उत्पन्न झाला असे तुम्ही सांगितलेत. परंतु याविषयी आमच्या मनात शंका आहे, ती तू निवारण कर. शुक नावाचा महान तपस्वी गर्भावासापासून योगी असल्याचे आम्ही श्रवण केले आहे. त्याने हे पुराण कशासाठी पठण केले ?
सूत म्हणाले - पूर्वी सरस्वतीचे तीरी आपल्या आश्रामामध्ये सत्यवतीपुत्र व्यास असताना एक चिमण्यांचे जोडपे पाहून चकित झाले; कारण अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या मनोहर, सुंदर आरक्तवर्णी, पिसांचे अंकुरही न फुटलेल्या पिलाला ते जोडपे आनंदाने घर्षण करीत होते. त्याच्या भक्ष्यासाठी तत्पर राहत होते. त्या पिलाच्या चोचीमध्ये वारंवार अन्न घालीत होते. त्या बालकाच्या शुभमुखाचे चुंबन घेत होते. त्या जोडप्याचे बालकावरील अदभुत प्रेम पाहून व्यास चिंतातूर होऊन विचार करु लागले.
ज्या अर्थी तिर्मग्योनीत उत्पन्न झालेल्या प्राण्यामधेही पुत्रप्रेम दृष्टीस पडते, तर मग‘ पुत्र आपली सेवा करील ’ असे इच्छिणार्या मानवाचे पुत्रप्रेम पाहून आश्चर्य का वाटावे ? सुखाचे साशन असलेल्या बालकाचा विवाह करुन सुनेचे शुभमुख अवलोकन करुन ह्या चिमण्यांना सुख होणार आहे का ? अथवा वृद्धापकाळात पुत्र धर्मनिष्ठ निघून त्यांची सेवा करणार आहे का ? अथवा द्रव्यार्जन करुन पितरांना संतुष्ट करणार आहे का ? ह्यांचा और्ध्वदेहिक संस्कार तरी ह्याच्या हातून होणार आहे का ? गयेस जाऊन श्राद्ध किंवा नीलवृक्षाचा उत्सर्ग हा बालक यथाविधी करणार आहे का ? ह्यातील काही संभवनीय नसताही ज्या अर्थी पक्षी अपल्या पुत्रावर प्रेम करतात त्या अर्थी संसारात पुत्राचे अलिंगन व लालन हेच सर्व सुखातील उत्कृष्ट सुख होय.निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही. पुत्र परलोकप्राप्तीचे साधन आहे.
मन्वादी मुनींनी धर्मशास्त्रात, ‘पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती होत असून निपुत्रिकाला कधीही होत नाही असे सांगितले आहे. सर्व पापक्लेशांपासून पुत्रवान मुक्त होतो, ही गोष्ट अनुमानाने सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही.शिवाय पुरातन आप्तवाक्यही ह्याला प्रमाण आहे. मृत्युसमयी भूमीवर पडलेला पुरुष पुत्ररहित असल्यास दु:खीत होऊन मनामध्ये माझ्या घरात विपुल द्रव्य व उत्तमोत्तम भांडी आहेत. हे मंदिर सुंदर आहे, परंतु आता ह्याचा मालक कोण होईल, असे तो चिंतन करीत असतो.
ज्याअर्थी मृत्युसमयी त्याचे मन दु:खव्याप्त असते, त्याअर्थी पुरुषाला दुर्गतीच होत असते. ह्यात शंका नाही.
अशाप्रकारे विचार करुन व्यास वारंवार दिर्घसुस्कारे सोडीत खिन्न मनाने बसले. खूप विचारपूर्वक त्यांनी निश्चय केला व मेरुपर्वताजवळ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. ते मनात म्हणाले, ‘ आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी ? पाच वर देण्यास समर्थ असा विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रम्हा, सूर्य, गणेश कार्तिकेय, अग्नि, वरुण ह्यापैकी कोण आहे ?
अशी चिंता करीत असतानाच हातात विणा घेतलेले स्वस्थचित्त नारद तेथे आले ते पाहून सत्यवतीपुत्र व्यास संतुष्ट झाले व त्यांना अर्ध्य व आसन देऊन कुशल प्रश्न केला तो कुशल प्रश्न श्रवण करुन मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले, " हे द्वैपायन तू का बरे चिंता करीत आहेस ? ते सांग"
व्यास म्हणतात - निपुत्रिकाला उत्तम गती व सुख प्राप्त होत नसते म्हणून मी दु:ख करीत आहे. तेव्हा इष्ट मनोरथ सिद्धीस नेणार्या कोणत्या देवाची तपश्चर्या करावी ? ही चिंता असल्याने सांप्रत मी आपणाला शरण आलो आहे हे दयासागर महर्षे, मी पुत्र देणार्या कोणत्या देवाला शरण जाऊ ? हे आपण सत्वर सांगा आपण सर्वज्ञ आहात.
ह्याप्रमाणे व्यासांनी विचारले असता वेदवेत्ते नारदमुनी प्रेमाने म्हणाले हे भाग्यशाली पराशरपुत्रा माझ्या पित्याने हाच प्रश्न श्रीहरीला विचारला होता. पण श्रीहरी ध्यानस्थ असल्याचे पाहून माझ्या पित्याने विष्णूला प्रश्न केला. कारण कौस्तुभ रत्नाने उज्ज्वल, दिव्य,
शंख,चक्र, गदा, ही आयुधे धारण करणारा पीत वस्त्र परिधान करणारा, चार बाहू व श्रीवत्सलांच्छन चिन्ह युक्त झालेले वक्षस्थल ह्यांनी संपन्न, सर्व लोकांचा उत्पादक देवाधिदेव जगदगुरु, जगन्नाथ असा जो वासुदेव तो मोठे तप करीत होता.
ब्रह्मदेव म्हणतो, " हे देवाधिदेव, हे जगन्नाथ, कालत्रयप्रभो , जनार्दन, आपण कशास्तव तप करीत आहात ? कोणाचे ध्यान करीत आहात ? हे सुरेश्वर आपणच सर्व जगाचे प्रभु असून ध्यानस्थ व्हावे याहून आश्चर्य कोणते ? त्यामुळे मला विस्मय झाला आहे. आपल्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेला मी सर्व जगताचा कर्ता आहे. ह्या विश्वामध्ये आपणाहून जो कोणी आधिक आहे तो देव, हे रमापते मला कथन करा. हे जगन्नाथ,आपणच आद्य सर्वांचे कारण सर्वकार्यास समर्थ असून उत्पादक, पालक, संहारक, आपणच आहात आपल्या इच्छेमुळेच मी हे सर्वजगत उत्पन्न करीत असतो. प्रलयकारी रुद्र त्यांचा संहार करीत असतो. परंतु तोही आपल्या आज्ञेने वागणारा आहे.
आकाशात सूर्याचे भ्रमण अथवा वायूचे शुभ वा अशुभ वाहणे अग्नीचा ताप व पर्ज्न्याची वृष्टी ही सर्व आपल्याच आज्ञेने होतात, म्हणून आपण कोणत्या देवाचे ध्यान करीत आहात याबद्दल विस्मय वाटतो. त्रैलोक्यात आपणाहून कोणी श्रेष्ठ नाही. हे सुव्रत सांप्रत आपण मला कथन करा. महात्म्यांना योग्य असे प्राय: काही एक नाही अशी स्मृति आहे.
ब्रह्मदेवाचे हे भाषण ऐकून श्रीहरी म्हणाला - हे ब्रह्मन एकचित्ताने श्रवण कर जरी तू मी व शिव जगताचे उत्पादक, पालक,संहारक आहो, असे सर्व देव, असुर, मानव समजत आहेत. तरी वेदांगपारंगत लोक शक्तीच्याच योगाने तू उत्पादक मी पालक व शिव संहारक झाल्याचे अनुमान करीत असतात. तुझ्याठिकाणी जगतउत्पत्तीसाठी राजसी शक्ती रहात असून माझ्या ठिकाणी सात्विकी व रुद्राचे ठिकाणी तामसी शक्ती रहात आहे, ह्या शक्तीचा वियोग झाल्यास आपण कुणीही ही कार्ये करण्यास समर्थ राहणार नाही. आपण सर्व त्या शक्तीचे आधीन असतो . हे प्रथक्ष व परोक्ष व्यवहारात स्पष्ट आहे.
हे सुव्रता, ह्याविषयी मी तुला दृष्टांत सांगतो. मी परतंत्र असून शेषरुप मंचकावर शयन करतो. त्या शक्तीच्या आधीन असतानाच सर्वदा उठतो आणि प्रलयकाली मी कालाचे आधीन होतो. मी तिच्या आधीन राहूनच तपश्चर्या करीत असतो.कधी कधी लक्ष्मीसह यथेष्ट क्रीडा करतो. पूर्वी सर्व जगत समुद्ररुप होऊन गेले असता पाच हजार वर्षेपर्यंत मी तुझ्यासमक्ष बाहुयुद्ध केले आणि कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले दुष्ट व मदमत्त दानव जे मधुकैटभ याचा वध सुराधिष्ठात्री देवीच्या प्रसादाने केला. तेव्हाच सर्व जगताचे शक्तिरुप परात्पर कारण आहे हे तुला समजले नाही का? त्या भगवतीच्याच इच्छेने मी प्रथम स्त्रीरुपाने मणि द्विपात होतो नंतर पुरुष होऊन महासागरात वास्तव्य करु लागलो. त्याचप्रमाणे तिच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक युगात मला कूर्म,वराह, नरसिंह,वामन,इत्यादी अवतार धारण करावे लागतात. तिर्यग्योनीत जन्मास येणे कुणालाही प्रिय नाही व मीही स्वत:च्या इच्छेने वराहादी निंद्य योनीमध्ये जन्मास आलो नाही.
अरे, कोणता स्वतंत्र पुरुष लक्ष्मीसह क्रीडा करण्याचे सोडून मत्स्यादी हीन योनीत जन्म घेईल ? त्याचप्रमाणे कोणता पुरुष शय्येचा त्याग करुन गरुडाचे वाहनावर आरुढ होऊन मोठे युद्ध करील,हे ब्रह्मदेवां धनुष्याची प्रत्यंचा तुटल्यामुळे माझे मस्तकच तुटून कुणीकडे जाऊन पडले हे तू पाहिलेसच व तुझ्याच आज्ञेने महाशिल्पी त्वष्ट्याने अश्वाचे मस्तक पुनरपी माझ्या धडावर चिकटविले व त्यामुळे मला लोक हयग्रीव म्हणू लागले. अरे, ही विटंबना मी स्वतंत्र असतो तर झाली असती का? तेव्हा मी स्वतंत्र नसून सर्वस्वी शक्तीचे आधीन आहे, आणि त्या शक्तीचेच मी निरंतर ध्यान करीत असतो. ह्या देवीपेक्षा श्रेष्ठ असे मला काही एक ठाऊक नाही."
नारद म्हणतात- ह्याप्रमाणे विष्णूने ब्रह्म्याजवळ सांगितले व मला कथन केले. तू तिचे तुझ्या कल्याणार्थ ध्यान कर, म्हणजे तुला जे जे काही ईप्सित असेल तर ते सर्व ती देवी तुला नि:संशय देईल.
नारदमुनींनी ह्याप्रमाणे महर्षीव्यासांना सांगितले असता ते व्यास देवीच्या चरणकमलाविषयी तप्तर राहून तपश्चर्या करण्याकरिता मेरु पर्वतावर गेले.