इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां प्रथमस्कन्धे
पुराणवर्णनपूर्वकतत्तद्युगीयव्यासवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
वेदांची निर्मिती -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हे मुने, व्यासमुनींपासून मी तत्वत: जशी पुराणे श्रवण केली आहेत तशी तुम्हाला सांगतो. मकारादी दोन, भकरादी दोन, ब्रकारादी तीन, वकरादी चार आणि अ, ना प, लि, ग,ग,कू आणि स्का ह्या आद्याक्षरांनी युक्त असलेली वेगवेगळी सात मिळून अठरा पुराणे आहेत. पहिले मत्स्यपुराण चवदा हजार असून, अत्यंत अदभूत मार्केंडेय पुराण नऊ हजार आहे, तत्त्ववेत्या मुनींनी भविष्यपुराण साडे चवदा हजार सांगितले असून पवित्र भागवत अठरा हजात आहे. तसेच ब्राह्मसंज्ञक पुराण दहा हजार म्हटले आहे. ब्रह्मांड पुराण बारा हजार आणि शंभर असून, ब्रह्मवैवर्तपुराण अठरा हजार आहे. वामनपुराण दहा हजार आहे. वायुपुराण चोविस हजार सहाशे आहे. अतिअदभूत विष्णुपुराण तेवीस हजार असून परम आश्चर्यकारक वाराहपुराण चोवीस हजार आहे. अग्निपुराण सोळा हजार आहे व उत्कृष्ट नारदपुराण पंचवीस हजार आहे. प्रचंड पद्मागण पंचावन्न हजार असून अतिविस्तृत लिंगपुराण अकरा हजार आहे. गरुडपुराण एकोणीस हजार असून कूर्मपुराण सतरा हजार आहे. अत्यद्भुत स्कंदपुराण एक्याऐंशी हजार आहे. हे निष्पापहो, पुराणांची नावे व ग्रंथसंख्या मी तुम्हाला सांगितली. आता उपपुराणे श्रवण करा. प्रथम सनतकुमार पुराण, नंतर नृसिंहपुराण, शिवपुराण, अनुपम दुर्वास पुराण, कपिलपुराण,मानवपुराण,औशनसपुराण, वारुणपुराण, कलिकापुराण, सांबपुराण, नंदीकृत शुभपुराण, सौर पुराण,पराशर पुराण,अतिविस्तृत आदित्यपुराण, माहेश्वरपुराण, भागवतपुराण, वसिष्ठपुराण, ही उपपुराणे आहेत.अशी अठरा पुराणे केल्यावर व्यासमुनींनी पुराणांनी वृद्धिंगत असे अनुपम भारत आख्यान ग्रंथित केले, आणि सर्व मन्वंतरातील द्वापर युगामध्ये ते धर्मरक्षणेच्छू व्यासमुनी ह्याचप्रमाणे पुराणे प्रकट करीत असतात. जगताच्या कल्याणाकरता प्रत्येक युगात विष्णू व्यासरुपाने अवतीर्ण होऊन एका वेदाचे अनेक विभाग करतो. त्याचप्रमाणे कलियुगात ब्राम्हण अल्पायुषी व अल्पबुद्धी होतील हे जाणून पवित्र पुराणसंहिता तो प्रत्येक द्वापारयुगात अनेक प्रकारांनी विभक्त करीत असतो. स्त्रिया, शूद्र, द्विजेतर ह्यांना वेद श्रवण शास्त्रसंमत नसल्यामुळे विशेषत: त्यांच्या हिताकरता पुराणे केलेली आहेत.
ह्या सातव्या वैवस्वतसंज्ञक शुभ मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या द्वापारयुगामध्ये धर्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असे व्यास झाले असून एकोणतिसावे द्वापरयुग प्राप्त झाले असता द्रोणपुत्र अश्वत्थामा व्यास होणार आहे. आजपर्यंत सत्तावीस व्यास होऊन गेले व त्यांनी प्रत्येक द्वापारयुगात पुराणसंहिता कथन केल्या.
पूर्वीच्या युगामध्ये उत्पन्न झालेले, प्रत्येक द्वापर युगात कथन करणारे व्यास तू आम्हांला कथन कर, असे ऋषींनी सूताला सांगितले.
सूत म्हणतात - पहिल्या द्वापारयुगामध्ये ब्रह्मदेवांनी स्वत:च वेदविभाग केले. दुसर्यात प्रजापतीने व्यासकार्य केले. तिसर्यात
उशना, चवथ्यात बृहस्पती, पाचव्यात सूर्य, सहाव्यात मृत्यू, सातव्यात इंद्र,
आठव्यात वसिष्ठ, नवव्यात सारस्वत, दहाव्यात त्रिधामा, अकराव्यात त्रिवृत्त, बाराव्यात भारद्वाज, तेराव्यात अंतरिक्ष, चवदाव्यात धर्म, पंधराव्यात त्रय्यारुणी, सोळाव्यात धनंजय, सतराव्यात मेधातिथी, आठराव्यात व्रती, एकोणीसाव्यात अत्री, विसाव्यात गौतम, एकविसाव्यात उत्तम हर्यात्मा, बाविसाव्यात वाजश्रवावेन, तेविसाव्यात अमुष्यायण सोम, चोविसाव्यात तृणबिंदू,नंतर पंचविसाव्यात भार्गव, सव्विसाव्यात शक्ती, सत्ताविसाव्यात जातुकर्ण्य, आणि नंतर अठ्ठाविसाव्यात कृष्णद्वैपायन व्यास झाले. ह्याप्रमाणे अठ्ठावीस व्यास कथन केले.
कृष्णद्वैपायनांनी कथन केलेले श्रीमदभागवतसंज्ञक पवित्रपुराण मी श्रवण केले आहे. ते दु:खाचा नाश करणारे असून, मनोरथ पूर्ण करणारे मुक्तिदायक, वेदार्थांनी वृद्धिगंत, सर्ववेदरहस्यरुप, सौंदर्याने युक्त, मुमुक्षूंना सर्वदा प्रिय आहे. व्यासांनी जे पुराण करुन विरक्त व अरणीपासून जन्मलेल्या आपल्या शुकनामक पुत्राला अत्यंत शुभ समजून पढविले, ते वेदार्थाने संपन्न असलेले पुराण रहस्य मी व्यासमुखापासून गुरुच्या प्रसादामुळे श्रवण करुन यथार्थ समजून घेतले.
अयोनिसंभव, अदभूतबुद्धिमान पुत्राने विचारल्यावरुन द्वैपायनमुनींनी जे संपूर्ण रहस्य त्याला कथन केले ते मी श्रवण केले. संसारसागरातून तरुन जाण्याविषयी उत्सुक असलेल्या शुकाने श्रीमतभागवतरुप कल्पतरुच्या फलाचा आस्वाद घेण्याविषयी तत्पर राहून नानाख्यानरुपरसांचे स्थान असलेले अदभूतपुराण प्रेमाने श्रवण केले. त्यामुळे कलीच्या भीतीपासून मुक्त न होणारा पुरुष पृथ्वीमध्ये कोण असणार ?
भगवतीच्या नावाने युक्त असे हे सर्वोत्कृष्ट सुंदर, वैभवप्रद श्रेष्ठ पुराणे जो श्रवण करतो तो वेदधर्मरहित व सदाचार संस्कारशून्य अंत:करणाने पापी असला तरी संपूर्ण भोगसुखाचा यथेष्ठ उपभोग घेतो व देहावसानानंतर योग्यांना प्राप्त होणार्या श्रेष्ठ पदाला पोहोचतो. जो पुरुष देवीपुराण नित्य श्रवण करतो त्याच्या अंत:करणात ; निर्गुण, हरिहरादिकांनाही अलभ्य,सज्जनांनाही प्रिय, ज्ञानरुप व समाधियोगाने ज्ञात होणारी ब्रह्मरुपिणी भगवती वास्तव्य करते.
परिपूर्ण असा मनुष्यदेह प्राप्त झाला असता व वक्ताही मिळाला असता जो संसारसागरातून तरुन नेणारी जणू नौकाच असे सुखद पुराण श्रवण करीत नाही तो हतभाग्य होय. अरेरे, मनुष्याच्या जन्माला येऊन, सुंदर कर्ण लाभूनही जो पुरुष नेहमी परनिंदा श्रवण करतो तो हतभागी, मंदमती पुरुष मनोरथ पूर्ण करणार्या आनंदसागराचे निर्मल असे पुराण का बरे श्रवण करीत नाही !