श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २४ वा

कपिलदेवांचा जन्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवहूतीने जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली, तेव्हा कृपाळू कर्दम मुनींना भगवान विष्णूंनी सांगितलेल्याचे स्मरण झाले. ते तिला म्हणाले. (१)

कर्दम म्हणाले - "हे स्तुत्य राजकुमारी, तू याविषयी असा खेद करू नकोस. अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील. तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल. आता तू संयम, नियम, तप, आणि द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन कर. अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथीचे छेदन करतील." (२-४)

मैत्रेय म्हणाले - प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार अशा जगद्‌गुरू भगवान श्रीपुरुषोत्तमांची आराधना करू लागली. अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून, लाकडातून, अग्नी प्रगट व्हावा, त्याप्रमाणे प्रगट झाले. त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करीत गडगडाट करून वाद्ये वाजवू लागले, गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या. आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला, सर्व दिशांमध्ये आनंद पसरला, जलाशयांतील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली. याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव आले. शत्रुदमन विदुरा, स्वतःसिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजन्मा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, साक्षात परब्रह्म भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्त्वमय अंशाने अवतीर्ण झाले आहेत. (५-१०)

म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते, त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रगट करीत ते कर्दमांना म्हणाले. (११)

ब्रह्मदेव म्हणाले - प्रिय कर्दमा, माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझे म्हणणे मान्य केलेस, तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने केलेली माझी पूजा आहे. पुत्रांनी ‘ठीक आहे’ असे म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणे, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. वत्सा, तू सुसंस्कृत आहेस. तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशाने ही सृष्टी अनेक प्रकारे वाढवतील. म्हणून तू आता या मरीची आदि मुनिवरांना त्यांच्या स्वभाव आणि आवडीनुसार आपल्या कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव. हे मुनी, सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष श्रीनारायण आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे. हे राजकुमारी, सोनेरी केस, कमलासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमल असणार्‍या बालकाच्या रूपात कैटभासुराला मारणार्‍या साक्षात श्रीहरींनीच, ज्ञान-विज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मूलतः उखडून टाकण्यासाठी, तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. हे अविद्याजनित मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील. हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील. हे ‘कपिल’ नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील. (१२-१९)

मैत्रेय म्हणाले - सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन, आणि सनकादींना बरोबर हंसावर विराजमान होऊन ब्रह्मलोकाकडे गेले. हे विदुरा, ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमांनी मरीची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधिपूर्वक विवाह केला. त्यांनी कला नावाची कन्या मरीचीला, अनसूया अत्रीला, श्रद्धा अंगिराला, आणि हविर्भू पुलस्त्याला दिली. (२०-२२)

पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या, क्रतूला साध्वी क्रिया, भृगूला ख्याती आणि वसिष्ठाला अरुंधती दिली. अथर्वा ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो, ती शांती नावाची कन्या दिली. कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्‍न्यांसह उत्तम सत्कार केला. विदुरा, विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमांकडे गेले. (२३-२५)

कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरींनीच अवतार घेतला आहे, हे जाणून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले. "अहो, आपल्या पापकर्मांमुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणार्‍या लोकांवर देव पुष्कळ काळाने प्रसन्न होतात. परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगीलोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहाण्याचा प्रयत्‍न करतात, तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी, आम्हा विषयलोलुपांकडून होणार्‍या आपल्या अवज्ञेचा काहीही विचार न करता, आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. भक्तांचा मान वाढविणार्‍या आपण आपले वचन सत्य करण्यासाठी आणि सांख्ययोगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे. भगवन, आपण रूपरहित आहात. आपली जी चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत, ती आपल्याला योग्यच आहेत. तसेच जी मनुष्य-सदृश रूपे आपल्या भक्तांना प्रिय वाटतात, तीही आपल्याला आवडतात. तत्त्वज्ञानाची इच्छा करणार्‍या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे आसन नेहमी वंदनीय आहे. तसेच ते ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य, आणि श्री यांनी परिपूर्ण आहे. मी त्याला शरण आलो आहे. भगवन, आपण परब्रह्म आहात. प्रकृती, पुरुष, महत्तत्त्व, काल, त्रिविध अहंकार, समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपणच प्रकट आहात. तसेच आपण सार्‍या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता; म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात. अशा आपणा भगवान कपिलांना मी शरण आलो आहे. (२६-३३)

आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणांतून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत, शोकरहित होऊन विहार करीन. आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात, म्हणून मी आपली आज्ञा मागतो. (३४)

श्रीभगवान म्हणाले - मुनिवर्य, वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मांसाठी जगात माझे म्हणणेच प्रमाण आहे. म्हणून मी तुला जे सांगितले होते की "मी तुझ्या घरी जन्म घेईन." ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे. या लोकांमध्ये माझा हा जन्म, लिंगशरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणार्‍या मुनींना, आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्त्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे. आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बर्‍याच काळापासून लुप्त झाला आहे. याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे, असे समज. मी आज्ञा करतो की, तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर. मी स्वयंप्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात राहाणारा आत्माच आहे. म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात्कार करून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करशील. माता देवहूतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मांपासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईन. त्यामुळे या संसाररूप भयापासून ती पार जाईल. (३५-४०)

मैत्रेय म्हणाले- भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती कर्दम त्यांना प्रदक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनातच निघून गेले. तेथे अहिंसादिक मुनिव्रतांचे पालन करीत ते केवळ श्रीभगवंतांना शरण गेले. तसेच अग्निहोत्र आणि गृहस्थ आश्रमाचा त्याग करून निःसंगभावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले. जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे, सत्त्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्याची प्राप्ती होते, त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले. ते अहंकार, ममता आणि सुख-दुःखादी द्वंद्वांपासून अलग होऊन भेद-दृष्टिरहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले. त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली. त्यावेळी धीरोदात्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते. (४१-४४)

परम भक्तिभावाने सर्वांतर्यामी, सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्यामध्ये चित्त स्थिर झाल्याने ते सार्‍या बंधनातून मुक्त झाले. संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्रीभगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थित असलेले ते पाहू लागले. अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन, सर्वत्र समबुद्धी आणि भगवद्‌भक्तीने संपन्न होऊन श्रीकर्दमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले. (४५-४७)

स्कंध तिसरा - अध्याय चोविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP