|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २३ वा
कर्दम आणि देवहूती यांचा विहार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणाले - माता-पिता निघून गेल्यानंतर पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती, श्रीपार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकरांची सेवा करी, त्याप्रमाणे कर्दमांची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली. हे विदुरा, तिने कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून दक्षतेने आणि चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण आदी गुणांनी आपल्या परम तेजस्वी पतिदेवांना संतुष्ट केले. देवहूती दैवापेक्षाही श्रेष्ठ असणार्या पतीपासून मोठमोठया आशा मनाशी बाळगून त्यांच्या सेवेत तत्पर असे. या प्रकारे पुष्कळ काळपर्यंत सेवा करणार्या मनुपुत्रीला व्रतादींचे पालन केल्याने दुर्बल झालेली पाहून देवर्षी कर्दमांना कळवळा आला आणि प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने ते तिला म्हणाले. (१-५) कर्दम म्हंणाले - "हे मनुपुत्री, तू माझा मोठा आदर केला आहेस. तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परम भक्ती यामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. देह धारण करणार्या सर्वांना आपला देह ही अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असते. परंतु तू माझ्यासाठी त्याच्या क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाहीस. म्हणून आपल्या धर्माचे पालन करीत राहिल्यामुळे मला तप, समाधी, उपासना आणि योगद्वारा भय आणि शोकरहित अशा ज्या भगवत्प्रसादस्वरूप विभूती प्राप्त झाल्या आहेत, त्यांवर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार आहे. मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यायोगे तू त्या पहा. इतर जे भोग आहेत, ते श्रीहरींच्या वक्रदृष्टीने नाहीसे होणारे आहेत. म्हणून यांच्यासमोर ते भोग काहीच नाहीत. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस. आपल्या पतिव्रता धर्माचे पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहेत, ते तू भोग. "आम्ही राजे आहोत, आम्हांला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे." असा अभिमान असणार्या माणसांना या दिव्य भोगांची प्राप्ती होणे कठीण आहे." (६-८) कर्दमांचे हे बोलणे ऐकून, आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहेत, असे जाणून त्या अबलेची सर्व चिंता नाहीशी झाली. तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनय व प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने म्हणाली. (९) देवहूती म्हणाली - "हे द्विजश्रेष्ठ, स्वामी, योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणार्या आपल्याला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे, हे मला माहीत आहे. हे प्रभो, आपण जी प्रतिज्ञा केली होती की, "मी तुझ्याशी गृहस्थसुखाचा एकदा उपभोग घेईन, त्याची पूर्तता करावी. कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त होणे हा पतिव्रता स्त्रीला मोठा लाभ आहे. आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल, ते आपण मला सांगावे, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल. कारण आपणच वाढविलेली माझी ही कामवासना मला त्रस्त करीत आहे. म्हणून स्वामी, या कार्यासाठी योग्य भवनाचाही विचार करावा." (१०-११) मैत्रेय म्हणाले - विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनींनी त्याचवेळी योगसामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले. हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारे, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तींची वाढ होत जाणारे आणि रत्नजडित खांबांनी सुशोभित होते. ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते. त्यात जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती. तसेच ते चित्र-विचित्र रेशमी झुंबरे आणि पताकांनी सजविले होते. ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, अशा रंगी-बेरंगी फुलांच्या माळांनी तसेच अनेक प्रकारच्या सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते. एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसने यांमुळे ते फारच सुंदर वाटत होते. सर्व भिंतीवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती. तेथे पाचूची फरशी आणि पोवळ्याचे सोपे तयार केले होते. पोवळ्यांच्या उंबरठयांवर हिर्यांचे दरवाजे तसेच इंद्रनील मण्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलश बसवले होते. हिरेजडित भिंतींवर पद्मराग मणी लावलेले होते. ते विमानाच्या डोळ्यांसारखे दिसत होते आणि त्यावर रंगीबेरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणांनी ते सजविले होते. त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच समजून पुष्कळसे (खरे) हंस आणि कबुतर त्यांच्याजवळ बसून आपल्या बोलीत बोलत होते. त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे, शयनगृहे, बैठका, अंगणे, आणि चौक बनविले गेले होते. त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमांनाही आश्चर्यचकित करीत होते. (१२-२१) असे सुंदर घर पाहूनसुद्धा जेव्हा देवहूती प्रसन्न झाली नाही, तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव जाणणारे कर्दम स्वतःच म्हणाले - "प्रिये ! तू या बिंदुसरोवरात स्नान करून या विमानात चढ. हे भगवान विष्णूंनी रचलेले तीर्थक्षेत्र मनुष्यांच्या सर्व कामना पुरविणारे आहे." (२२-२३) कमललोचना देवहूतीने आपल्या पतींचे म्हणणे मानून सरस्वतीच्या पवित्र जलाने भरलेल्या त्या सरोवरात प्रवेश केला. त्या वेळी ती मलिन साडी नेसलेली होती, केसांच्या गुंडाळ्या झाल्या होत्या, तिचे शरीर मलिन झाले होते आणि स्तन निस्तेज झाले होते. सरोवरात बुडी मारल्यानंतर तिने तेथे एका महालात एक हजार कन्या पाहिल्या. त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमलपुष्पांसारखा सुगंध येत होता. देवहूतीला पाहताच त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या - "आम्ही आपल्या दासी आहोत. आपण आज्ञा करा. आम्ही आपली काय सेवा करू ? (२४-२७) तेव्हा स्वामिनीचा सन्मान करणार्या त्या स्त्रियांनी बहुमूल्य उटणे आणि सुगंधित द्रव्यांनी मिश्रित अशा पाण्याने मनस्विनी देवहूतीला स्नान घातले. तसेच तिला दोन नवीन आणि निर्मल रेशमी वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. नंतर त्यांनी मौल्यवान, सुंदर आणि तेजस्वी अलंकार, सर्वगुणसंपन्न भोजन आणि पिण्यासाठी अमृतासमान पेय तिला दिले. यावेळी देवहूतीने आरशात पाहिले असता तिला दिसले की, तिने फुलांचा हार घातला आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान केली आहेत, तिचे शरीर निर्मळ असून कांतिमान झाले आहे. तसेच त्या कन्यांनी मोठया आदराने तिचा मंगल श्रृंगार केला आहे. तिने डोक्यावरून स्नान केले आहे. अंगावर सर्व प्रकारचे दागिने घातले आहेत. तसेच गळ्यात हार, हातांमध्ये काकणे, आणि पायात झंकार करणारे सोन्याचे पैंजण आहेत. कमरेला सोन्याचा रत्नजडित कमरपट्टा, गळ्यात बहुमूल्य रत्नहार आणि अंगाला कुंकुमादि मंगलद्रव्ये लावली आहेत. तिचे मुख, सुंदर दंतपंक्ती, मनोहर भुवया, कमळाच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेमकटाक्षमय सुंदर नेत्र आणि काळेभोर केस यांमुळे फारच सुंदर दिसत होते. जेव्हा देवहूतीने आपल्या ऋषिश्रेष्ठ प्रिय पतिदेवांचे स्मरण केले, तेव्हा जेथे ते कर्दम प्रजापती होते, तेथेच सख्यांसहित आपण असल्याचे तिला दिसले. त्यावेळी पतीसमोर हजारो स्त्रियांसह आपण असल्याचे पाहून आणि ते त्यांचे योगसामर्थ्य पाहून देवहूतीला मोठे आश्चर्य वाटले. (२८-३५) हे शत्रुंजय विदुरा, कर्दमांनी जेव्हा पाहिले की, स्नान केल्याने देवहूतीचे शरीर निर्मळ झाले असून पूर्वीसारखेच अपूर्व शोभेने संपन्न झाले आहे, तिचे सुंदर वक्षःस्थळ चोळीने झाकले आहे, हजारो अप्सरा तिची सेवा करीत आहेत, तसेच उंची वस्त्रे तिच्या शरीरावर शोभून दिसत आहेत, तेव्हा त्यांनी मोठया प्रेमाने तिला विमानात बसवून घेतले. त्या वेळी आपल्या प्रियतमेवर अनुरक्त होऊनसुद्धा कर्दमांची महत्ता (मन आणि इंद्रियांवरील संयम) कमी झाली नाही. अप्सरा त्यांची सेवा करीत होत्या. उमललेल्या लाल कमळांनी शृंगार करून अत्यंत सुंदर बनलेले ते, विमानात अशाप्रकारे शोभून दिसत होते की, जणू काही आकाशात तारकांनी वेढलेला चंद्रच. त्या विमानावर निवास करून त्यांनी दीर्घकालपर्यंत कुबेराप्रमाणे मेरुपर्वताच्या दर्यांतून विहार केला. या दर्या आठ लोकपालांच्या विहारभूमी आहेत. यांमध्ये काम वाढविणारा शीतल, मंद, सुगंधी वायू वाहात असतो. आणि गंगानदीच्या स्वर्गातून पडण्याचा मंगलध्वनी नेहमी येत असतो. त्यावेळीसुद्धा दासींचा समुदाय त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होता आणि सिद्धगण त्यांना वंदन करीत होते. (३६-३९) अशा प्रकारे प्राणप्रिया देवहूतीबरोबर त्यांनी वैश्रम्भक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानांतून तसेच मानस सरोवरामध्ये प्रेमपूर्वक विहार केला. त्या तेजस्वी आणि इच्छेनुसार चालणार्या श्रेष्ठ विमानात बसून वायूप्रमाणे वेगाने सर्व लोकांमध्ये भ्रमण करीत कर्दमांनी विमानविहारी देवांवरही मात केली. ज्यांनी भगवंतांच्या भवभयहारी पवित्र चरणांचा आश्रय घेतला आहे, त्या धीर पुरुषांना कोणती वस्तू किंवा शक्ती दुर्लभ आहे ?(४०-४२) अशा प्रकारे महायोगी कर्दमांनी हे सर्व भूमंडल -जे द्वीप, वर्ष इत्यादींच्या विचित्र रचनेमुळे मोठे आश्चर्यमय असे वाटत होते, ते आपल्या प्रियेला दाखवून ते आपल्या आश्रमात परतले. नंतर त्यांनी स्वतःला नऊ रूपात विभक्त करून रतिसुखासाठी अत्यंत उत्सुक अशा मनुकुमारी देवहूतीला आनंदित करीत तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत विहार केला. परंतु एवढा दीर्घ कालावधीसुद्धा एका मुहूर्ताप्रमाणे निघून गेला. त्या विमानातील रतिसुख वाढविणार्या मोठया सुंदर शय्येचा आश्रय घेऊन आपल्या परम रूपवान प्रियतमाबरोबर राहाणार्या देवहूतीला एवढा (दीर्घ) काळ कधी गेला, कळलाच नाही. अशा प्रकारे त्या कामासक्त दांपत्याचा तो काळ आपल्या योगबळाने शेकडो वर्षांपर्यंत विहार करीत असताना सुद्धा अगदी थोडया वेळाप्रमाणे निघून गेला. आत्मज्ञानी कर्दम सर्व प्रकारचे संकल्प जाणत होते. म्हणून देवहूती संतानप्राप्तीसाठी उत्सुक आहे, असे पाहून तसेच भगवंतांच्या आदेशाचे स्मरण करून त्यांनी आपल्या स्वरूपाचे नऊ विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्रचित्ताने अर्धांगरूपाने आपल्या पत्नीची भावना करून तिच्या गर्भात वीर्य स्थापित केले. यामुळे देवहूतीला एकाच वेळी नऊ कन्या झाल्या. त्या सर्व सर्वांगसुंदर होत्या आणि त्यांच्या शरीरातून लाल कमळाच्या सुगंधासारखा सुगंध येत होता. (४३-४८) यावेळी शुद्ध स्वभावाच्या सती देवहूतीने पाहिले की, अगोदर केलेल्या प्रतिज्ञेनुसार तिचे पती संन्यासाश्रम ग्रहण करून वनामध्ये जाऊ इच्छितात. तेव्हा ती आपले अश्रू आवरून धरून शिवाय हास्यवदनाने, व्याकूळ आणि संतप्त हृदयाने, हळुवारपणे, आपल्या मधुर वाणीने बोलू लागली. त्या वेळी मान खाली घालून नखरूप मणिमंडित बोटाने ती जमीन उकरीत होती. (४९-५०) देवहूती म्हणाली - "भगवन, आपण जी प्रतिज्ञा केली होती, ती पूर्ण केली, तरीसुद्धा मी आपल्याला शरण आले आहे, म्हणून आपण मला अभय द्यावे. ब्रह्मन, या कन्यांसाठी सुयोग्य वर शोधावे आणि आपण वनात गेल्यानंतर माझा जन्ममरणरूप शोक दूर करण्यासाठीसुद्धा कोणाची तरी आवश्यकता आहे. प्रभो, आतापर्यंत परमात्म्याशी विन्मुख राहून माझा जो कालावधी इंद्रियसुख भोगण्यात व्यतीत झाला तो निरर्थक गेला. आपल्या अत्युच्च प्रभावाला न जाणल्याने मी इंद्रियांच्या विषयात आसक्त राहिले आणि आपल्यावर प्रेम केले. तथापि आपण माझे संसारभय नाहीसे करावे. अज्ञानामुळे असत्पुरुषांशी केलेला संग संसारबंधनाला कारण होतो, तोच सत्पुरुषांशी केल्याने अनासक्ती प्राप्त करून देतो. संसारात ज्या कर्मामुळे धर्मसंपादन होत नाही, वैराग्य उत्पन्न होत नाही आणि भगवंतांची सेवाही होत नाही, तो मनुष्य जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच होय. मी खरोखरच भगवंतांच्या मायेने पूर्णपणे फसले गेले. कारण आपल्यासारखा मुक्तिप्रदान करणारा पती प्राप्त होऊन सुद्धा मी संसारबंधनातून सुटण्याची इच्छा केली नाही." (५१-५७) स्कंध तिसरा - अध्याय तेविसावा समाप्त |