श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २५ वा

देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनकांनी विचारले - तत्त्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असूनसुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते. मी भगवंतांची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत, परंतु या योगिप्रवर पुरुषश्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही. सर्वथा स्वतंत्र असे श्रीहरी आपल्या योगमायेने ज्या ज्या लीला करतात, त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान मला आपण ऐकवाव्यात. (१-३)

सूत म्हणाले - मुनिवर्य, आपल्याप्रमाणेच जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्मज्ञानविषयक प्रश्न विचारला, तेव्हा श्रीव्यासांचे सुहृद भगवान मैत्रेय प्रसन्न होऊन म्हणाले. (४)

मैत्रेय म्हणाले - पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले. तत्त्वसमूहाचे पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या वचनाचे स्मरण होऊन देवहूती आपल्या मुलाला म्हणाली. (५-६)

देवहूती म्हणाली - हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषयलालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि यांची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञानांधकारात पडले आहे. आता आपल्या कृपेने माझी जन्मपरंपरा समाप्त झाली आहे आणि त्यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झाला आहात. आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तसेच अज्ञानांधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्रस्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रगट झाला आहात. देवा, या देह गृह इत्यादींमध्ये जो मी-माझेपणाचा दुराग्रह असतो, तोही आपणच निर्माण केलात. म्हणून आता आपण माझा हा महामोह नाहीसा करा. आपण आपल्या भक्तांच्या संसाररूप वृक्षासाठी कुर्‍हाडीप्रमाणे आहात. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागतवत्सल आपणास शरण आले आहे. भागवतधर्म जाणणार्‍यांत आपण सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणांस प्रणाम करीत आहे. (७-११)

मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे माता देवहूतीने परम पवित्र आणि लोकांना मोक्षमार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रगट केली. ती ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषांचे गन्तव्य असणारे श्री कपिलमुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणार्‍या मुखाने म्हणाले. (१२)

भगवान कपिल म्हणाले - माते, सुखादुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे, असे माझे मत आहे. माते, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर, सर्व अंगांनी संपन्न अशा योगाचे मी वर्णन केले होते, तेच मी आता तुला सांगतो. (१३-१४)

या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते; तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारण ठरते. ज्यावेळी हे मन ‘मी आणि माझे ’ या अभिमानाने उत्पन्न होणार्‍या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्यावेळी ते सुख-दुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. (१५-१६)

त्यावेळी जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील, अद्वितीय, भेदरहित, स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुख-दुःखरहित असून प्रकृती शक्तिहीन आहे, असा अनुभव करतो. योग्यांना भगवत्प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात. परंतु तीच जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते, तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावी. (१७-२०)

जे लोक सहनशील, दयाळू, सर्व प्राण्यांचे निष्काम हितेच्छू, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे, शांत, सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात. माझ्यासाठी सर्व (सकाम) कर्मांचा तसेच आपल्या सग्या-सोयर्‍यांचा त्याग करतात आणि मत्परायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण, कीर्तन करतात तसेच माझ्यातच चित्त लावतात, त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत. हे साध्वी, अशा रीतीने सर्वसंगपरित्याग केलेले महापुरुषच साधू समजावेत. तू त्यांच्याच सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणार्‍या दोषांचे ते निराकरण करतात. सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणार्‍या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणार्‍या कथा होतात. अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्षमार्गामध्ये श्रद्धा, प्रेम, आणि भक्तीचा क्रमशः विकास होतो. नंतर माझ्या विश्वोपत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक सुखांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गांनी एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्‍न करतो. अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केल्याने, वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीने, अंतरात्मा असलेल्या मला, मनुष्य या देहातच प्राप्त करून घेतो. (२१-२७)

देवहूती म्हणाली - आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे ? आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे ? ज्यायोगे मी सहजपणे आपले निर्वाणपद प्राप्त करू शकेन ? हे निर्वाणस्वरूप प्रभो ! ज्याच्यामुळे तत्त्वज्ञान होते आणि जो लक्ष्याचा वेध घेणार्‍या बाणाप्रमाणे भगवंतांची प्राप्ती करून देणारा आहे, तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याची किती अंगे आहेत ? हे हरे, हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंदबुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेन. (२८-३०)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता, त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह दाटून आला आणि त्यांनी प्रकृती इत्यादी तत्त्वांचे निरूपण करणार्‍या सांख्यशास्त्राचा आणि भक्ती व योग यांचा उपदेश केला. (३१)

श्रीभगवान म्हणाले - माते, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतांमध्येच लागले आहे, अशा माणसांची वेदविहित कर्मांमध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणार्‍या इंद्रियांची जी सत्त्वमूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते, तीच भगवंतांची निर्हेतुक भक्ती होय. ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो, त्याचप्रमाणे हीसुद्धा कर्मसंस्कारांचे भांडार असलेल्या लिंगशरीराला तत्काळ भस्म करते. माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्मे करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमांची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याचीही इच्छा करीत नाहीत. माते, ते साधुपुरुष अरुणनयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपाचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणही करतात की, ज्याच्यासाठी मोठमोठे तपस्वीही उत्सुक असतात. सुंदर अंग-प्रत्यंग, मधुर हास्य-विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात. माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही, त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. (३२-३६)

अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोगसंपत्ती, भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणार्‍या अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत्स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत. तरीसुद्धा माझ्या धामाला पोहोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात. ज्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरू, सुहृद आणि इष्टदेव आहे, ते माझ्याच आश्रयाला राहाणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठधामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगांपासून वंचित राहात नाहीत आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. (३७-३८)

जे लोक इहलोक, परलोक आणि या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणार्‍या वासनामय लिंगदेहाला तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन, पशू तसेच गृह इत्यादी पदार्थ आहेत, त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहालासुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात, त्यांना मी मृत्युरूप संसारसागरातून पार करतो. मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे. तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. माझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्युरूप महाभयापासून सुटका होत नाही. माझ्या भयानेच वारा वाहतो. माझ्या भयानेच सूर्य तापतो. माझ्या भयानेच इंद्र पाऊस पाडतो आणि अग्नी जाळतो. तसेच माझ्याच भयाने मृत्यु आपल्या कार्यात प्रवृत्त होतो.योगीजन ज्ञान-वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतात. संसारात मनुष्यांचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की, त्यांचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून तेथेच स्थिर व्हावे. (३९-४४)

स्कंध तिसरा - अध्याय पंचविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP