शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(५५१)

अहिर्निर्वल्यनीं वायं मुक्त्वा देहं तु तिष्ठति ।
इतस्ततश्चाल्यमानो यत् किंचित् प्राण-वायुना ॥ ५५१ ॥
साप हा जसा कात टाकून राहतो, तसा ब्रह्मवेत्ता देहाला म्हणजे देहाच्या अभिमानाला टाकून राहतो. (या ब्रह्मवेत्त्याचा) देह हा थोडा फार प्राणवायूकडून इकडे-तिकडे फिरविला जातो.(५५२)

स्रोतसा नीयते दारु यथा निम्नोन्नत-स्थलम् ।
देवेन नीयते देहो यथाकालोपभुक्तिषु ॥ ५५२ ॥
पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे लाकडाला उंच-खाली अशा स्थळी घेऊन जातो, तद्वत् ब्रह्मवेत्त्याचा देह हा ज्याचा काळ/समय आला असेल त्या भोगाकडे प्रारब्धाने/ दैवाने नेला जातो.


ब्रह्मवेत्त्याच्या देहाच्या क्रिया या प्राणवायूकडून आणि प्रारब्धकर्मानुसार होत असतात.


(५५३)

प्रारब्ब-कर्म-परिकल्पित-वासनाभिः
संसारिवच्चरति भुक्तिषु मुक्त-देहः ।
सिद्धः स्वयं वसति साक्षिवदत्र तूष्णीं
चक्रस्य मूलमिवं कल्प-विकल्प-शून्यः ॥ ५५३ ॥
ज्याने देहाचा संबंध तोडला आहे/जो देहाच्या ममत्वातून सुटला आहे असा ब्रह्मवेत्ता हा प्रारब्धकर्माने ठरविलेल्या (परिकल्पित) वासनांमुळे संसारी माणसाप्रमाणे भोगांकडे वळत असतो. तथापि, स्वतः सिद्ध झालेला आणि संकल्प-विकल्प-रहित असणारा तो चाकाच्या मुळाप्रमाणे म्हणजे मध्यबिंदूप्रमाणे एखाद्या साक्षी माणसाप्रमाणे मुकाट्याने राहत असतो.


प्रारब्धकर्मजन्य वासनाअंती ब्रह्मवेत्त्याच्या देहाला भोग प्राप्त होतात, पण त्यांत तो केवळ साक्षी/द्रष्टा असतो.


(५५४)

नैवेंद्रियाणि विषयेषु नियुंक्त एष
नैवोपयुंक्त उपदर्शन-लक्षणस्थः ।
नैव क्रियाफलमपीषदवेक्षते स
स्वानंद-सांद्र-रस-पान-सुमत्त-चित्तः ॥ ५५४ ॥
आत्मस्वरूपाच्या घनदाट रसाचे पान केल्यामुळे ज्याचे चित्त हे सुमत्त (म्हणजे धुंद, उन्मत्त, आनंदित) झाले आहे आणि जो द्रष्टा (उपलक्षण) या स्वरूपात आहे, असा तो ब्रह्मवेत्ता हा इंद्रियांना विषयांकडे नेत नाही किंवा त्यांना मागेही खेचीत नाही, तसेच तो देहाकडून झालेल्या क्रियांच्या फळांची थोडीसुद्धा अपेक्षा बाळगीत नाही.(५५५)

लक्ष्यालक्ष्य-गतिं त्यक्त्वा यस्तिष्टेत् केवलात्मना ।
शिव एव स्वयं साक्षादयं ब्रह्मविदुत्तमः ॥ ५५५ ॥
ब्रह्म हे लक्ष्य आहे आणि विषय हे अलक्ष्य आहेत हा विचार (गति) सोडून देऊन, जो केवळ आत्मरूपाने असतो, तो हा श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता स्वतःच साक्षात् शिव शंकर आहे.


शिव म्हणजे कल्याणरूप असाही अर्थ होईल.


(५५६)

जीवन्नेव सदामुक्तः कृतार्थो ब्रह्मवित्तमः ।
उपाधि-नाशाद् ब्रीव सन् ब्रह्माप्येति निर्दयम् ॥ ५५६ ॥
श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता जिवंत असतानाच मुक्त असतो आणि कृतार्थ असतो. उपाधीचा नाश झाल्यावर ब्रह्मच असणारा तो अद्वय अशा ब्रह्मात एकरूप होऊन जातो.


ब्रह्मवेत्ता जिवंतपणीच मुक्त असतो. उपाधिनाशानंतर म्हणजे देहपात झाल्यावर तो ब्रह्मच होऊन जातो.


(५५७)

शैलूषो वेश-सद्भावाभावयोश्च यथा पुमान् ।
तथैव ब्रह्मविच्छ्रेष्ठः सदा ब्रह्मैव नापरः ॥ ५५७ ॥
नटाने (स्त्रीचा) वेष घेतला अगर घेतला नाही तरी तो नेहमी पुरुषच असतो. त्याप्रमाणे श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता हा (जिवंतपणी अथवा मरणोत्तर) ब्रह्मच असतो, अन्य कोणी नाही.


पूर्वकाळी पुरुषच स्त्री-पात्र म्हणून काम करीत.


(५५८)

यत्र क्वापि विशीर्णं सत् पर्णमिव तरोर्वपुः पतनात् ।
ब्रह्मीभूतस्य यतेः प्रागेव तच्चिदग्निना दग्धम् ॥ ५५८ ॥
झाडाचे पान कोठेही गळून पडो, त्याप्रमाणे (ब्रह्मभूताचे) जिवंत शरीर जीर्ण होऊन कोठेही पडो (त्याला त्याचे काहीच वाटत नाही). कारण त्याचे शरीर पूर्वीच चैतन्यरूपी अग्नीत जळून गेलेले असते.(५५९)

सदात्मनि ब्रह्मणि तिष्ठतो मुनेः पूर्णाद्वयानंदमयात्मना सदा ।
न देश-कालाद्युचित-प्रतीक्षा त्वङ्-मांस-विट्-पिंड-विसर्जनाय ॥ ५५९ ॥
नेहमी पूर्ण, अद्वितीय आनंदमय स्वरूपाने असणाऱ्या आणि नेहमी सद्‌रूप आत्मा/ब्रह्म या स्वरूपात असणाऱ्या (ब्रह्मवेत्त्या) मुनीला त्वचा, मांस, विष्ठा यांचा गोळा (पिंड) असणारा देह विसर्जन करण्यासाठी योग्य स्थळ आणि काळ यांची अपेक्षा नसते.(५६०)

देहस्य मोक्षो न मोक्षो न दंडस्य कमंडलोः ।
अविद्या-हृदय-ग्रंथर्मोक्षो मोक्षो यतस्ततः ॥ ५६० ॥
देह, दंड (हातातील काठी) आणि कमंडलू यांचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे तर, हृदयातील अविद्येची गाठ सुटणे (मोक्ष) म्हणजे खरा मोक्ष आहे.(५६१)

कुल्यायामथ नयां वा शिव-क्षेत्रेऽपि चत्वरे ।
पर्ण पतति चेत् तेन तटोः किंनु शुभाशुभम् ॥ ५६१ ॥
कालव्यामध्ये अथवा नदीत किंवा शंकराच्या देवळात (अथवा पवित्र क्षेत्री) किंवा चव्हाट्यावर जर पान पडले तर त्यामुळे झाडाला काही शुभ अथवा अशुभ असते काय ? (उत्तर – नाही).


या पानाप्रमाणे ब्रह्मवेत्त्याचा देह कुठेही मृत होऊन पडला तरी त्यात शुभ आणि अशुभ असे काही नाही.


(५६२)

पत्रस्य पुष्पस्य फलस्य नाशवद् देहेंद्रिय-प्राण-धियां विनाशः ।
नैवात्मनः स्वस्य सदात्मकस्यानंदाकृतेवृक्षवदस्ति चैषः ॥ ५६२ ॥
पान, फूल आणि फळ यांच्या नाशाप्रमाणे देह, इंद्रिये, प्राण आणि बुद्धी यांचा नाश होतो. पण ज्याप्रमाणे पान इत्यादींच्या नाशाने वृक्षाचा नाश होत नाही, त्याप्रमाणे शरीर इत्यादींच्या नाशाने स्वतःच्या सत्-स्वरूप आणि आनंद-स्वरूप असणाऱ्या आत्म्याचा नाश होत नाही.


शरीरात असणारा सच्चिदानंद आत्मा अविनाशी आहे.


(५६३)

प्रज्ञान-घन इत्यात्म-लक्षणं सत्य-सूचकम् ।
अनूद्योपाधिकस्यैवं कथयति विनाशनम् ॥ ५६३ ॥
आत्मा हा प्रज्ञानघन/चिद्घन आहे, असे आत्म्याचे सत्य-सूचक लक्षण (श्रुती) सांगतात. त्याचाच अनुवाद करून श्रुती सांगतात की (आत्म्याला येणाऱ्या देह इत्यादी) उपाधींचा नाश होतो.


श्रुती सांगते "प्रज्ञानघन एव एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय ...." आत्मा हा चिद्धन आणि नित्य आहे. त्याला जरी अनेक उपाधी येत असल्या तरी त्या नाशवंत आहेत; आत्मा मात्र अविनाशी आहे.


(५६४)

अविनाशी वा अरेऽयमात्मेति श्रुतिरात्मनः ।
प्रव्रवीत्यविनाशित्वं विनश्यत्सु विकारिषु ॥ ५६४ ॥
विकार/बदल पावणाऱ्या पदार्थांचा नाश होत असतानाही, आत्म्याचे अविनाशित्व हे "अरे, हा आत्मा अविनाशी आहे", हे श्रुतीचे वचन सांगते.


देह इत्यादी उपाधी या बदलणाऱ्या आणि नाशवंत आहेत. पण त्यांच्याशी संबंधित झालेला आत्मा मात्र नाश न पावणारा आहे. बृहदारण्यक उपनिषद् ही श्रुती सांगते, "अविनाशी वा अरे अयमात्मा अनुच्छित्ति-धर्मा".


(५६५)

पाषाण-वृक्ष-तृण-धान्य-कडंगराद्या
दग्धा भवंति हि मदेव यथा तथैव ।
देहेंद्रियासु-मन-आदि-समस्त-दृश्यं
ज्ञानाग्नि-दग्धमुपयाति परात्म-भावम् ॥ ५६५ ॥
दगड, वृक्ष, गवत, धान्य, भुस्कट (कडंगर) इत्यादी जळून गेल्यावर ते मातीच होतात. त्याप्रमाणे देह, इंद्रिये, प्राण, मन इत्यादी सर्व दृश्य वस्तु (आत्म -) ज्ञानरूपी अग्नीने दग्ध झाल्या असताना; त्या परमात्म-स्वरूपाला प्राप्त होतात.


पाषाण इत्यादी तसेच देह इत्यादी दृश्य विश्व हे अध्यारोपित, अध्यास्त आहे. ज्या अज्ञानामुळे ते भासते ते अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट होते आणि मग अध्यस्त विश्व हे अधिष्ठानरूप परमात्म्यापेक्षा वेगळे उरत नाही म्हणजे ते परमात्मरूप होते.


(५६६)

विलक्षणं यथा ध्वांतं लीयते भानु-तेजसि ।
तथैव सकलं दृश्यं ब्रह्मणि प्रविलीयते ॥ ५६६ ॥
प्रकाशाहून वेगळा असणारा अंधार हा सूर्याच्या प्रकाशात लय पावतो, त्याप्रमाणे (ब्रह्मापेक्षा वेगळे भासणारे) सर्व दृश्य-विश्व हे (आत्मज्ञानरूपी प्रकाशाने) ब्रह्मात विलीन होऊन जाते.


सर्व दृश्य-विश्व हे अध्यस्त आहे. अधिष्ठानाचे ज्ञान होताच अध्यस्त पदार्थ अधिष्ठान ब्रह्मात विलीन होतो.


(५६७)

घटे नष्टे यथा व्योम व्योमैव भवति स्फुटम् ।
तथैवोपाधि-विलये ब्रह्मैव ब्रह्मवित् स्वयम् ॥ ५६७ ॥
घट नष्ट झाला असता त्यातील आकाश हे स्पष्टपणे आकाशच होते वा असते त्याप्रमाणे उपाधींचा लय झाल्यावर ब्रह्मवेत्ता स्वतःच ब्रह्म होतो.


ब्रह्मवेत्ता हा मूलतः ब्रह्मच होता. त्याला अध्यस्त उपाधी आल्या. ब्रह्म-ज्ञानाने अज्ञानजन्य उपाधींचा नाश झाला असता मुळात ब्रह्म असणारा ब्रह्मवेत्ता ब्रह्म होऊनच राहतो.


(५६८)

क्षीरं क्षीरे यथा क्षिप्तं तैलं तैले जलं जले ।
संयुक्तमेकतां याति तथात्मन्यात्मविन्मुनिः ॥ ५६८ ॥
दुधात दूध, तेलात तेल, पाण्यात पाणी फेकले असता, ते मिसळून जाऊन एकरूप होते, त्याप्रमाणे आत्मवेत्ता मुनी आत्म्यात मिसळून त्याच्याशी एकरूप होतो.


मूलतः आत्मा असणारा आत्मवेत्ता हा उपाधींचा नाश होताच आत्मरूप होऊन जातो.


(५६९)

एवं विदेह-कैवल्यं सन्मात्रत्वमखंडितम् ।
ब्रह्मभावं प्रपद्यैष यतिर्नावर्तते पुनः ॥ ५६९ ॥
अशाप्रकारे मरणोत्तर मोक्ष (विदेहकैवल्य) म्हणजे सद्‌रूप (ब्रह्म) स्थितीत असणे होय, संयमी पुरुष ब्रह्मस्वरूप झाल्यावर तो पुनः संसारात परत येत नाही.


विद्यमान जीवनात ब्रह्माशी एकरूप झालेला तो जीवन्मुक्त होय. पुढे प्रारब्धानुसार त्याचा देह नष्ट होतो. मरणोत्तर त्याला मोक्ष मिळतो म्हणजे तो ब्रह्मरूप होऊनच राहतो. तो पुनः संसारात येत नाही.

या श्लोकाचाच अधिक खुलासा पुढील श्लोक ५७० मध्ये केलेला आहे.


(५७०)

सदात्मैकत्व-विज्ञान-दग्धाविद्यादि-वर्ष्मणः ।
अमुष्य ब्रह्मभूतवाद् ब्रह्मणः कुत उद्भवः ॥ ५७० ॥
सत् ब्रह्म आणि प्रत्यग् आत्मा यांच्या एकत्वाच्या ज्ञानाने देह, अविद्या इत्यादी जळून गेले असल्यामुळे, त्या (यती) ला (अमुष्य) ब्रह्मरूपता प्राप्त झालेली असते. ब्रह्माला जन्म कोठून ?


ब्रह्म हे अज- जन्मरहित- आहे, स्वतः सिद्ध आहे. त्याला कुठून बरे जन्म उत्पत्ती असणार ? मग ब्रह्म झालेल्या यतीचा तरी पुनः संसारात कसा जन्म होईल ?


(५७१)

माया-कॢप्तौ बंध-मोक्षौ न स्तः स्वात्मनि वस्तुतः ।
यथा रज्जौ निष्क्रियायां सर्पाभास-विनिर्गमौ ॥ ५७१ ॥
ज्याप्रमाणे क्रियारहित रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा आभास तसेच निरास हे भ्रांतीने (मायेने, अविद्येने) कल्पिलेले असतात (त्यांचा रज्जूशी संसर्ग नसतो) त्याप्रमाणे सद्‌रूप आत्म्यावर बंध आणि मोक्ष हे मायेने/ अविद्येने कल्पिलेले आहेत. खरे तर वस्तुतः ते आत्म्याच्या बाबतीत मुळीच नसतात.


आत्म्याच्या बाबतीत बंध आणि मोक्ष हे शब्द निरर्थक आहेत. कारण ते अविद्याजन्य आहेत, ते कल्पित/अध्यस्त आहेत, त्यांचा आत्म्याशी काडीइतकाही संबंध येत नाही.


(५७२)

आवृतेः सदसत्त्वाभ्यां वक्तव्ये बंध-मोक्षणे ।
नावृतिर्ब्रह्मणः काचिदन्याभावादनावृतम् ।
यद्यस्त्यद्वैतहानिः स्याद् द्वैतं नो सहते श्रुतिः ॥ ५७२ ॥
(ब्रह्मावर अज्ञानजन्य) आवृती असेल तर बंध निर्माण होतो आणि ती नसेल तर मोक्ष होतो, असे म्हणावयास हवे (वक्तव्य). ब्रह्माला तर कोणत्याही प्रकारचे आवरण (आवृती) नाही. कारण ब्रह्माखेरीज अन्य काही नसल्याने अन्य-अभावात् ते ब्रह्म आवरणरहित/अनावृत आहे. (ब्रह्माखेरीज अन्य काहीतरी आहे असे) जर असेल (= असे म्हटले) तर ब्रह्म है अद्वैत, एकमेव एक आहे, या सिद्धांताची हानी होते आणि द्वैत आहे असे जर मानले तर श्रुतीला सहन होत नाही (म्हणजे श्रुतीला मान्य) नाही.


अज्ञानाजवळ आवृत्ती/आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत. आवरणशक्तीने ब्रह्म झाकले जाऊन विक्षेपशक्तीने ब्रह्माबर जगाचा आभास होतो आणि मग त्या जगात उपाधीत अडकलेल्या ब्रह्माला- जीवाला- बंध आणि मोक्ष आहेत, असे लौकिकदृष्ट्या मानले जाते. पण ते योग्य नाही. ब्रह्माखेरीज अन्य काही नसल्याने ब्रह्माला आवरण कोण घालणार ? कारण अज्ञान हे सदसद्‌निर्वचनीय असल्याने ते ब्रह्माच्या जोडीने स्वतंत्र असे दुसरे तत्त्व होऊ शकत नाही. ब्रह्माच्या संदर्भात श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. श्रुती ब्रह्माचे अद्वितीयत्व सांगते आणि द्वैताचा निषेध करते. श्रुती सांगते - इदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयम् । (छांदोग्य उपनिषद्, ६.२.९) 'नेह नानास्ति किंचन' ही श्रुती द्वैताचा निषेध करते.


(५७३)

बंधं च मोक्षं च मृषैव मूढा बुद्धेर्गुणं वस्तुनि कल्पयंति ।
दृगावृतिं मेघ-कृतां यथा रवौ यतोऽद्वयासंगचिदेतदक्षरम् ॥ ५७३ ॥
मेघाने केलेल्या दृष्टीच्या आवरणाला मृढ लोक सूर्याचे ठायी आहे असे मानतात. त्याप्रमाणे ब्रह्माचे ठायी मूढ लोक बुद्धीच्या गुणांनी बंध ब मोक्ष मानतात. ब्रह्मतर अद्वैत, असंग, चैतन्यरूप अक्षर आहे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी बंध व मोक्ष हे मुळीच नाहीत, ते खोटे आहेत.


ब्रह्मरूप जीवाला बंध आणि मोक्ष नाहीत. अध्यासजन्य बुद्धी, अहंकार, आसक्ती इत्यादींमुळे जीवाला बंध आला असे अडाणी लोक म्हणतात. जीव हा ब्रह्मच आहे असे ज्ञानी लोक म्हणतात. साहजिकच भ्रांतीमुळे मानले जाणारे ब्रह्मरूप जीवाचे बंध आणि मोक्ष हे मिथ्या, कल्पित आहेत. ब्रह्माप्रमाणेच जीव हा बंधमोक्ष-रहित आहे. तो नित्यमुक्त आहे.


(५७४)

अस्तीति प्रत्ययो यच यश्च नास्तीति वस्तुनि ।
बुद्धेरेव गुणावेतौ न तु नित्यस्य वस्तुनः ॥ ५७४ ॥
ब्रह्म या वस्तूच्या ठिकाणी बंध आहे किंवा बंध नाही, असे ते दोन प्रत्यय ते बुद्धीचेच गुण आहेत, ते नित्य वस्तुरूप ब्रह्माचे नाहीत.

याचाच अधिक खुलासा पुढील श्लोकात आहे -(५७५)

अतस्तौ मायया क्लृप्तौ बंध-मोक्षौ न चात्मनि ।
निष्कले निष्क्रिये शांते निरवद्ये निरंजने ।
अद्वितीये परे तत्त्वे व्योमवत् कल्पना कुतः ॥ ५७५ ॥
म्हणून बंध आणि मोक्ष हे मायेने कल्पिलेले आहेत: ते आत्म्याचे ठिकाणी नाहीत. अवयव-रहित, क्रिया-रहित, शांत, निर्दोष, निरंजन आणि अद्वितीय असा परमतत्त्व आत्मा हा आकाशाप्रमाणे असंग आहे; म्हणून त्याचे ठायी बंध आणि मोक्ष यांची कल्पना कशी करता येईल बरे ?


मायेमुळे/अविधेमुळे जगाचा आभास होतो. त्या अध्यास-जन्य जगात ब्रह्मरूप जीवाला बंध आणि मोक्ष आहेत असे भ्रांतीने मानले जाते. मुळात आत्मरूप/ब्रह्मात बंध आणि मोक्ष नाहीतच. (प्रस्तावना पहा). असंग आणि एकमेवाद्वितीय अशा आत्मतत्त्वाला/ब्रह्मतत्त्वाला बंध आणि मोक्ष कसे असणार ?


(५७६) खरी वस्तुस्थिती अशी आहे -

न निरोधो न चोत्पत्तिर्न बंधो न साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ ५७६ ॥
विश्वाची खरी उत्पत्ती नाही, त्याचा नाश नाही, जगातील तथा-कथित जीवाला बंध नाही, म्हणून बंधातून सुटून मोक्षाची आकांक्षा करणारा साधक नाही, मोक्षाची इच्छाच नसल्याने कोणी मुमुक्षू नाही, तसेच बंधातून मुक्त झालेला असाही कोणी नाही हेच खरे तत्त्व/सत्य गोष्ट आहे.


विश्वाची उत्पत्ती खरी असती तर विश्वातील जीवाला खरे बंध आणि मोक्ष मानावे लागले असते. पण तसे नाही. विश्व हे अध्यस्त आणि आभासात्मक असल्याने त्या असत्य जगात केल्या जाणाऱ्या बंध, साधक, मुमक्ष, मोक्ष इत्यादी केवळ कल्पना आहेत. हे सत्य आहे. निर्विकार, अद्वितीय, असंग असे ब्रह्म/आत्मा हे एकच एक सत्यतत्त्व आहे. अन्य काही नाही.


(५७७) इतके सांगून झाल्यावर पुढे गुरू शिष्याला सांगतो -

सकल-निगम-चूडा-स्वांत-सिद्धांत-रूपं
परमिदमतिगुह्यं दर्शितं ते मयाद्य ।
अपगत-कलि-दोषं काम-निर्मुक्त-बुद्धिं
स्वसुतवदसकृत् त्वां भावयित्वा मुमुक्षुम् ॥ ५७७ ॥
हे शिष्या कलियुगातील दोष तुझ्याजवळ नाहीत; तुझी बुद्धी वासना-रहित आहे. तू बंधनातून सुटण्याची इच्छा करीत आहेस. म्हणून तुला वारंवार आपल्या मुलाप्रमाणे मानून, सकल वेदातील निगम मुख्य भागांत म्हणजे उपनिषदांत जे मुख्य साररूप आणि सिद्धांतरूप आहे असे हे अतिगुह्य परमतत्त्व मी तुला आज दाखविले /सांगितले आहे.


कलिदोष म्हणजे कलियुगातील असत्य बोलणे इत्यादी दोष. प्रस्तुतचा शिष्य मुमुक्ष होता आणि ब्रह्मज्ञान ग्रहण करण्यास योग्य होता. म्हणन उपनिषदांतील सिद्धांताचे सार गुरूने शिष्याला सांगितले आहे. पुत्राला गुह्य गोष्टी सांगण्याची जुनी पद्धत होती.


(५७९) शिष्याला कृतार्थ केल्यावर गुरूही ब्रह्मवेत्त्याप्रमाणे आचरण करू लागला असे पुढील श्लोक सांगतो

गुरुरेवं सदानंद-सिंधौ निर्मग्न-मानसः।
पावयन् वसुधां सर्वां विचचार निरंतरम् ॥ ५७९ ॥
सत् अशा ब्रह्माच्या आनंदरूपी सागरात ज्याचे मन नेहमी मग्न झालेले होते असा तो गुरू शिष्याला बोध करून सर्व पृथ्वीला पवित्र करीत सतत संचार करू लागला.. 'सदानंदसिंधौ' या शब्दाचा अर्थ 'नेहमी आनंदरूपी सागरात' (मन निमग्न असणारा) असाही अर्थ होऊ शकेल.


मागे वर्णन केलेल्या ब्रह्मवेत्त्याप्रमाणे गुरू होताच. त्याचा शिष्यही आता ब्रह्मवेत्ता झाला आहे. ते दोघेही आता आपापल्या मार्गाने निघून गेले. ब्रह्मवेत्ता हा ब्रह्मरूप असल्याने तो स्वतः पवित्र आहे. त्याच्या सांनिध्यामुळे पृथ्वीवरील पदार्थही पवित्र होतात, अशी कल्पना आहे.


(५८०)

इत्याचार्यस्य शिष्यस्य संवादेनात्म-लक्षणम् ।
निरूपितं मुमुक्षूणां सुख-बोधोपपत्तये ॥ ५८० ॥
मुमुक्षूना सहजपणे (आत्म्याचे ब्रह्माचे) ज्ञान व्हावे यासाठी वर सांगितल्याप्रमाणे (इति) (ब्रह्मज्ञानी) आचार्य (आणि मुमुक्ष) शिष्य यांच्या संवाद-रूपाने या ग्रंथात आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करून सांगितलेले आहे.(५८१)

हितमिममुपदेशमाद्रियंतां विहित-निरस्त-समस्त-चित्त-दोषाः ।
भव-सुख-विरताः प्रशांत-चित्ताः श्रुति-रसिका यतयो मुमुक्षवो ये ॥ ५८१ ॥
शास्त्रविहित कर्मे करून ज्यांनी आपल्या/चित्तातील सर्व दोष दूर केले आहेत, जे संसारातील सुखांतून निवृत्त झाले आहेत, ज्याचे चित्त अतिशय शांत झालेले आहे, श्रुतीवर/वेदांवर ज्यांचे प्रेम/भक्ती आहे, जे मुमुक्षू आहेत, अशा संयमी (यतयः) पुरुषांनी (या गुरु-शिष्यसंवादातील) हा हितकारक उपदेश आदरपूर्वक घ्यावा.


काम इत्यादी विकार हे चित्तातील दोष होत. संसारातून सुख-दुःखापासून निवृत्ती म्हणजेच वैराग्य, शमामुळे चित्त शांत होते. वेदांवर भक्तिप्रेम म्हणजे वेदप्रामाण्य. मुमुक्ष म्हणजे संसारातून सुटण्याची इच्छा करणारा. संयमी/यति म्हणजे इंद्रिय निग्रह करणारा. अशा अधिकारी पुरुषांना येथे सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा उपयोग आहे.


(५८२)

संसाराध्वनि ताप-भानु-किरण-प्रोद्‌भूत-दाह-व्यथा-
खिन्नानां जल-कांक्षया मरु-भुवि श्रांत्या परिभ्राम्यताम् ।
अत्यासन्न-सुधांबुधिं सुख-करं ब्रह्माद्वयं दर्शय-
न्त्येषा शंकर-भारती विजयते निर्वाण-संदायिनी ॥ ५८२ ॥
संसाराच्या मार्गावर विविध तापरूपी सूर्यकिरणांपासून निर्माण झालेल्या दाहाच्या व्यथेने खिन्न झालेले, आणि थकवा आल्यामुळे (श्रांत्या) निर्जल प्रदेशात पाण्याच्या इच्छेने भटकणारे असे जे संसारी लोक त्यांना अतिशय समीप असलेल्या अद्वैत ब्रह्मरूप, सुखकारक अमृत-सागराला दाखवून देणारी आणि निर्वाण (= श्रेष्ठ आनंद) देणारी ही शंकरांची वाणी विजयी आहे.


संसारातील विविध तापाने पोळलेला माणूसच अध्यात्माकडे/परमार्थाकडे वळतो. त्याला सुखाचा मार्ग दाखविण्यास परमार्थ आहे. माणसाच्या अगदी जवळ म्हणजे माणसाच्या आतच सर्व सुख देणारा आत्मा/ब्रह्म आहे. त्याचे ज्ञान येथे आचार्य शंकरांनी करून दिलेले आहे. या ज्ञानाच्या यथायोग्य वापराने आणि आचरणाने सर्वश्रेष्ठ असा ब्रह्मानंद मिळणार आहे.

शंकराचार्यांच्या इतर ग्रंथांत त्यांचे नाव येत नाही, परंतु या ग्रंथाच्या अंतिम श्लोकात शंकराचार्यांनी आपले नाव दिले आहे. हे लक्षणीय आहे.


GO TOP