शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(५२६)

स्वमेव सर्वथा पश्यन् मन्यमानः स्वमद्वयम् ।
स्वानंदमनुभुंजानः कालं नय महामते ॥ ५२६ ॥
हे महाबुद्धिमान् शिष्या, सर्वत्र स्वतःलाच (आत्म्यालाच) पाहत आणि स्वतःलाच (आत्म्यालाच) अद्वितीय मानीत आणि स्वतःचा (आत्म्याचा) आनंद भोगीत काळ व्यतीत कर.


केवलाद्वैत वेदांतात 'स्व' म्हणजे 'आत्मा' असा अर्थ आहे.


(५२७)

अखंड-बोधात्मनि निर्विकल्पे विकल्पनं व्योम्नि पुर-प्रकल्पनम् ।
तदद्वयानंदमयात्मना सदा शांतिं परामेत्य भजस्व मौनम् ॥ ५२७ ॥
अखंड ज्ञानस्वरूप आणि निर्विकल्प अशा आत्म्याचे ठायी विकल्प म्हणजे भेद मानणे हे आकाशात नगराची कल्पना करण्यासारखे आहे. म्हणून हे शिष्या तू अद्वितीय अशा आनंदमय रूपाने (आनंदमयात्मना) श्रेष्ठ शांती प्राप्त करून घे आणि मौन धारण करून रहा.


अखंड ज्ञानरूप अशा आत्म्यात विश्व पाहणे हा विकल्प आहे, तो चूक आहे. तो विकल्प टाकून दे. तू म्हणजे फक्त अद्वयानंद असा आत्मा आहेस हे लक्षात ठेव, त्या आत्मस्वरूपात राहिल्यास तुला परम शांती/समाधान प्राप्त होईल. तसे झाल्यावर मग बोलण्याचे कारणच उरत नाही. म्हणून मौन धारण कर.


(५२८) मौन म्हणजे काय हे पुढील श्लोक ५२८ सांगतो :

तूष्णीमवस्था परमोपशांतिर्बुद्धरसत्कल्प-विकल्प-हेतोः ।
ब्रह्मात्मना ब्रह्मविदो महात्मनो यत्राद्वयानंद-सुखं निरंतरम् ॥ ५२८ ॥
असत्/मिथ्या पदार्थाच्या संकल्प-विकल्पाला कारणीभूत असणाऱ्या बुद्धीची श्रेष्ठ शांती हीच मौन अवस्था (तूष्णीमवस्था) आहे. हे मौन ज्याला प्राप्त झाले आहे अशा ब्रह्माला ब्रह्मस्वरूपाने जाणणाऱ्या महात्म्याला (ब्रह्मात) सततचे अद्वयानंद सुख मिळत राहते.



(५२९)

नास्ति निर्वासना-मौनात् परं सुखकृदुत्तमम् ।
विज्ञानात्म-स्वरूपस्य स्वानंद-रस-पायिनः ॥ ५२९ ॥
ज्याने आत्म्याचे (ब्रह्माचे) स्वरूप जाणले आहे आणि जो आत्मानंदाचा रस पीत आहे (अनुभवत आहे) अशा पुरुषाला वासनारहित मौनापेक्षा वेगळे (परं) उत्तम सुख देणारे अन्य काही नाही.


जो वासनारहित झाला आहे, त्याला आत्मानंद मिळतो. वासनारहित मौन हेच उत्तम सुख देणारे असते.


(५३०)

गच्छंस्तिष्ठन्नुपविशन् शयानो वान्यथापि वा ।
यथेच्छं च वसेद् विद्वानात्मारामः सदा मुनिः ॥ ५३० ॥
आत्म्यामध्येच आराम घेणारा आणि नेहमी मौन धारण करणारा शहाणा जीवन्मुक्त आपल्या इच्छेप्रमाणे जातो, उभा राहतो, बसतो, झोपतो आणि इतरही क्रिया करतो.


किंवा - जाताना, उठताना, बसताना, झोपताना अथवा अन्य काही करताना मौन धारण करणाऱ्या शहाण्या जीवन्मुक्ताने नेहमी इच्छेप्रमाणे आत्म्याचा आनंद (आत्माराम) घेत राहावे, असाही अर्थ होऊ शकेल. भावार्थ असा - आत्मसाक्षात्कारी पुरुष कोणतीही क्रिया करताना आत्मानंदच अनुभवत असतो.


(५३१)

न देश-कालासन-दिग्-यमादि-लक्ष्याद्यपेक्षाप्रतिबद्ध-वृत्तेः ।
संसिद्ध-तत्त्वस्य महात्मनोऽस्ति स्व-वेदने का नियमाद्यपेक्षा ॥ ५३१ ॥
ज्याच्या वृत्तीला कोणताही प्रतिबंध/अडथळा नाही आणि ज्याला आत्मतत्त्व सिद्ध/प्राप्त झाले आहे, अशा महात्म्या पुरुषाला देश, काल, आसन, दिशा, यम इत्यादी तसेच अन्य काही ध्येय (लक्ष्य) इत्यादींची अपेक्षा असत नाही. कारण स्वतःला (स्वतःच्या आत्म्याला) जाणताना नियम इत्यादींची काय जरुरी आहे ?


देश-विशिष्ट प्रकारचे स्थान, काल-विशिष्ट काळ, आसन म्हणजे शरीराची विशिष्ट स्थिती किंवा मृगाजिन वगैरे. दिशा म्हणजे विशिष्ट दिशा. यम पाच आहेत- अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरीचा अभाव), ब्रह्मचर्य, अपरिग्रह (अनावश्यक वस्तूंचा संग्रह), नियम पाच आहेत - शौच/शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याला ही सर्व लौकिक बंधने असत नाहीत.


(५३२)

घटोऽयमिति विज्ञातुं नियमः को न्वपेक्ष्यते ।
विना प्रमाण-सुष्टुत्वं यस्मिन् सति पदार्थ-धीः ॥ ५३२ ॥
योग्य इंद्रियप्रमाणाखेरीज 'हा घट आहे', हे जाणून घेण्यास कोणत्या नियमाची अपेक्षा केली जाते ? ते (इंद्रिय-प्रमाण) असताना (घट या) पदार्थाचे ज्ञान होते.


घट असला आणि कार्यक्षम डोळा असला की घटाचे ज्ञान होते. तेथे अन्य कशाची जरुरी नाही.


(५३३) श्लोक ५३२ चा संबंध पुढील ५३३ श्लोकाशी जोडावयाचा आहे.

अयमात्मा नित्य-सिद्धः प्रमाणे सति भासते ।
न देश नापि वा कालं न शुद्धिं वाप्यपेक्षते ॥ ५३३ ॥
हा आत्मा नित्य सिद्ध आहे. योग्य प्रमाण असेल तर तो दिसतो म्हणजे साक्षात्काराला येतो. त्यासाठी देश, काल, अथवा देहाची शुद्धी यांची अपेक्षा नसते.


आत्मसाक्षात्कारासाठी आत्म्याचे निदिध्यासन पुरे आहे. त्यासाठी विशिष्ट देश इत्यादींची जरुरी नाही.


(५३४)

देवदत्तोऽहमित्येतद् विज्ञानं निरपेक्षकम् ।
तद्‌वद् ब्रह्मविदोऽप्यस्य ब्रह्माहमिति वेदनम् ॥ ५३४ ॥
'मी देवदत्त आहे', हे ज्ञान निरपेक्ष आहे ते सिद्ध करण्यास अन्य प्रमाणांची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे 'मी ब्रह्म आहे', हे ब्रह्मवेत्त्याचे ज्ञान (वेदन) हे निरपेक्ष आहे.


श्रुती सांगते - ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो (ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति)


(५३५)

भानुनेव जगत् सर्वं भासते यस्य तेजसा ।
अनात्मकमसत् तुच्छं किं नु तस्यावभासकम् ॥ ५३५ ॥
सूर्याप्रमाणे असणाऱ्या ज्या आत्म्याच्या तेजाने सर्व जग प्रकाशमान होते, त्याला प्रकाशित करणारा पदार्थ हा अनात्मा, असत्/मिथ्या आणि तुच्छ कसा बरे असेल ?


किंवा - सूर्यामुळे सर्व जग प्रकाशित होते. त्याप्रमाणे ज्याच्या तेजाने सर्व अनात्म, जड आणि तुच्छ हे प्रकाशित होते, त्या आत्म्याला प्रकाशित करणारे काय असेल बरे ?


(५३६)

वेद-शास्त्र-पुराणानि भूतानि सकलान्यपि ।
येनार्थवंति तं किं नु विज्ञातारं प्रकाशयेत् ॥ ५३६ ॥
ज्या आत्म्यामुळे वेद, शास्त्रे, पुराणे आणि सर्वभूतेसुद्धा यांना काही अर्थ प्राप्त होतो. त्यांना जाणणाऱ्या ज्ञात्याला/आत्म्याला कोण बरे प्रकाशित करेल ? (५३६)


वेद चार आहेत - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद.
सहा शास्त्रे अशी -- शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण.
पुराणे मुख्य अठरा आहेत -
ब्राह्यं पाद्मं वैष्णवं च शैवं भागवतं तथा ।
तथान्यद् नारदीयं च मार्कंडेयं च सप्तमम् ॥
आग्नेयमष्टकं प्रोक्तं भविष्यन्नवमं तथा ।
दशमं ब्रह्मवैवर्तं लिंगमेकादशं तथा ॥
वाराहं द्वादशं प्रोक्तं स्कादं चात्र त्रयोदशम् ॥
चतुर्दशं वामनं च कौर्मं पंचदशं तथा ॥
मात्स्यं च गारुडं चैव ब्रह्मांडाष्टादशं तथा ॥

आत्म्यामुळेच वेद इत्यादींना अर्थ प्राप्त झाला आहे. पाच सूक्ष्म आणि स्थूल भूते आणि प्राणिमात्र आत्म्यामुळेच आपापले कार्य करतात.


(५३७)

एष स्वयंज्योतिरनंतशक्तिरात्माप्रमेयः सकलानुभूतिः ।
यमेव विज्ञाय विमुक्तबंधो जयत्ययं ब्रह्मविदुत्तमोत्तमः ॥ ५३७ ॥
हा आत्मा स्वयंप्रकाशी, अनंत शक्ती असणारा, प्रमाणांनी न कळणारा (किंवा - मोजता न येणारा) आणि सर्व वस्तूंचा अनुभवरूप आहे. त्याला जाणून सर्वोत्तम असा हा ब्रह्मवेत्ता संसाराच्या बंधनातून सुटून विजयी होतो. (५३७)


'मी' या स्वरूपात आत्मा सर्वांच्या अनुभवाला येत असतो.


(५३८) ब्रह्मवित् (आत्मवेत्ता) कसा असतो याचे वर्णन यापुढे श्लोक ५३८-५५६ यांमध्ये केलेले आहे.

न खिद्यते नो विषयैः प्रमोदते न सज्जते नापि विरज्यते च ।
स्वस्मिन् सदा क्रीडति नंदति स्वयं निरंतरानंद-रसेन तृप्तः ॥ ५३८ ॥
सततच्या (ब्रह्माच्या) आनंद-रसाने तप्त झालेला ब्रह्मवेत्ता हा विषयांच्या अभावामुळे खिन्न होत नाही, विषयांच्या प्राप्तीने आनंदित होत नाही; तो कुठेच आसक्त होत नाही आणि कुठेही विरक्त होत नाही. तो स्वतःच्याच स्वरूपात क्रीडा करतो आणि स्वतःच आनंदी होतो.


ब्रह्मवेत्ता हा लौकिक विकार आणि विचार यांच्या पलीकडे गेलेला असतो. तो सतत स्वतःच्या आत्मानंदात रममाण होत असतो.


(५३९)

क्षुधां देह-व्यथां त्यक्त्वा बालः क्रीडति वस्तुनि ।
तथैव विद्वान् रमते निर्ममो निरहं सुखी ॥ ५३९ ॥
भूक आणि शरीरपीडा यांना टाकून म्हणजे त्यांच्याकडे लक्ष न देता लहान मुलगा खेळण्याच्या वस्तूशी खेळत राहतो, त्याप्रमाणे अहंकार-रहित आणि ममता-रहित असा विद्वान् ब्रह्मवेत्ता हा स्वस्वरूपात रममाण होतो.



(५४०)

चिंता-शून्यमदैन्य-भैक्षमशनं पानं सरिद्-वारिषु
स्वातंत्र्येण निरंकुशा स्थितिरभीर्निद्रा श्मशाने वने ।
वस्त्रं क्षालन-शोषणादि-रहितं दिग् वास्तु शय्या मही
संचारो निगमांत-वीथिषु विदां क्रीडा परे ब्रह्मणि ॥ ५४० ॥
ब्रह्मवेत्त्या पुरुषांचे (विदां) भोजन (अशन) हे चिंतारहित आणि दैन्यरहित असे भिक्षेत मिळालेले अन्न असते. ते नदीचे पाणी पितात. स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांची स्थिती निरंकुश असते. ते निर्भयपणे स्मशानात अथवा अरण्यात निद्रा करतात. धुणे, वाळविणे इत्यादींनी रहित असे किंवा दिशा हेच त्यांचे दिशारूपी वस्त्र असते. भूमी हा बिछाना असतो. वेदांतरूपी (निगमांत) मार्गावर ते संचार करतात, आणि परब्रह्मातच ते क्रीडा करतात.



(५४१)

विमानमालंब्य शरीरमेतद् युनक्त्यशेषात् विषयानुपस्थितान् ।
परेच्छया बालबदात्मवेत्ता योऽव्यक्त-लिंगोऽननुषक्त-बाह्यः ॥ ५४१ ॥
ज्याला ओळखण्याची (जाती, वर्ण, इत्यादी) खूण प्रगट नसते आणि जो बाह्य विषयांत आसक्त असत नाही असा आत्मवेत्ता/ ब्रह्मवेत्ता हा या शरीररूपी विमानाचा (आधाराचा) आश्रय घेऊन, दुसऱ्याच्या इच्छेनुसार (परेच्छया) समोर उपस्थित झालेले विषय एखाद्या लहान मुलाप्रमाणे उपभोगीत असतो.


लहान मूल आईच्या इच्छेप्रमाणे खाते-पिते. तद्वत् ब्रह्मवेत्ता हा दुसऱ्याच्या इच्छेनुसार विषय उपभोगतो.


(५४२)

दिगंबरो वापि च सांबरो वा त्वगंबरो वापि चिदंबरस्थः ।
उन्मत्तवद् वापि च बालवद् वा पिशाचवद् वापि चरत्यवन्याम् ॥ ५४२ ॥
चैतन्यरूपी आकाशात राहणारा ब्रह्मवेत्ता हा दिगंबर अवस्थेत अथवा वस्त्रयुक्त अवस्थेत वल्कल नेसून, वेड्याप्रमाणे अथवा लहान मुलाप्रमाणे किंवा पिशाचाप्रमाणे पृथ्वीवर भटकत असतो.


ब्रह्मवेत्ता/आत्मवेत्ता पुरुष हा लहान मूल, वेडा मनुष्य अथवा पिशाच याप्रमाणे असतो.


(५४३)

कामान् निष्कामरूपी सन् चरत्येकचरो मुनिः ।
आत्मनैव सदा तुष्टः स्वयं सर्वात्मना स्थितः ॥ ५४३ ॥
आत्मस्वरूपानेच सदा संतुष्ट असणारा आणि स्वतःच सर्व रूपाने स्थित असणारा असा ब्रह्मवेत्ता मुनी हा एकटाच संचार करीत असतो आणि स्वतः निष्काम असूनही तो विषयांचा उपभोग घेत असतो.



(५४४)

क्वचित् मूढो विद्वान् क्वचिदपि महाराज-विभवः
कचिद् भ्रांतः सौम्यः क्वचिदजगराचार-कलितः ।
क्वचित् पात्रीभूतः क्वचिदवमतः क्वाप्यविदित-
श्चरत्येवं प्राज्ञः सततपरमानंद-सुखितः ॥ ५४४ ॥
सतत मिळणाऱ्या ब्रह्माच्या श्रेष्ठ आनंदाने सुखी असणारा शहाणा ब्रह्मवेत्ता कोठे मूर्ख होऊन तर कुठे विद्वान् होऊन, कुठे महान् राजाचे वैभव धारण करून तर कोठे भ्रमिष्ट (भ्रांत) होऊन, तर कुठे सौम्य (= सभ्य गृहस्थ) होऊन तर कुठे अजगरासारखी वृत्ती धारण करून, तर कुठे सन्मानास/आदरास पात्र होऊन तर कुठे अपमान पावून, तर कुठे इतरांना ओळखता येणार नाही अशा पद्धतीने पृथ्वीवर संचार करीत असतो.


अजगराप्रमाणे एके ठिकाणीच राहतो. कुठे स्वतःचे खरे स्वरूप इतरांना कळणार नाही अशा पद्धतीने ब्रह्मवेत्ता राहत असतो.


(५४५)

निर्धनोऽपि सदा तुष्टोऽप्यसहायो महाबलः ।
नित्यतृप्तोऽप्यभुंजानोऽप्यसमः सम-दर्शनः ॥ ५४५ ॥
ब्रह्मवेत्ता हा निर्धन असूनसुद्धा सदा संतुष्ट असतो. कोणी साहाय्य करणारा नसतानाही तो सामर्थ्यसंपन्न असतो. विषयांचा उपभोग न घेताही तो नेहमी तृप्त असतो. सर्वांपेक्षा वेगळा असूनही (असम) तो सर्वांकडे समदृष्टीने पाहणारा असतो. असम म्हणजे उपमारहित, विचित्र वागणारा असाही अर्थ घेता येईल.



(५४६)

अपि कुर्वन्नकुर्वाणश्चाभोक्ता फल-भोग्यणि ।
शरीर्यप्यशरीर्येष परिच्छिन्नोऽपि सर्वगः ॥ ५४६ ॥
ब्रह्मवेत्ता हा कर्म करीत असूनही अकर्ता असतो, फळांचा भोग घेत असूनही अभोक्ता असतो, देहधारी असूनही देहधारी नसतो, आणि मर्यादित असूनही सर्वव्यापक असतो.


ब्रह्मवेत्ता जीवन्मुक्त हा ब्रह्मरूप असल्याने तो अकर्ता, अभोक्ता, शरीररहित आणि सर्वव्यापक असतो. परिच्छिन्न म्हणजे शरीराने मर्यादित अथवा शरीराने स्थळकाळांनी मर्यादित.


(५४७)

अशरीरं सदा संतमिमं ब्रह्मविदं क्वचित् ।
प्रियाप्रिये न स्पृशतस्तथैव च शुभाशुभ ॥ ५४७ ॥
नेहमी शरीररहित म्हणजे शरीराचा अभिमान नसणाऱ्या ब्रह्मरूप ब्रह्मवेत्त्याला प्रिय आणि अप्रिय तसेच शुभ आणि अशुभ (इत्यादी) गोष्टी स्पर्श करू शकत नाहीत (म्हणजे त्यांचा त्याच्यावर परिणाम होत नाही).



(५४८)

स्थूलादि-संबंधवतोऽभिमानिनः सुखं च दुःखं च शुभाशुभे च ।
विध्वस्त-बंधस्य सदात्मनो मुनेः कुतः शुभं वाप्यशुभं फलं वा ॥ ५४८ ॥
या जगात ज्याचा स्थूल शरीराशी संबंध आहे आणि त्यावर ज्यांचा अभिमान आहे अशा माणसाला सुख तसेच दुःख आणि शुभ तसेच अशुभ हे लागू पडतात. परंतु जो नेहमी सत् अशा ब्रह्माच्या स्वरूपाचा आहे; आणि ज्याने अभिमानाचा आणि संसाराचा बंध नष्ट करून टाकला आहे, अशा ब्रह्म जाणणाऱ्या मुनीला शुभ आणि अशुभ फळे कोठून बरे मिळणार ?


पाप-पुण्यांची शुभ आणि अशुभ फळे असतात. ब्रह्मवेत्ता हा पाप आणि पुण्य यांच्या पलीकडे गेलेला आहे.


(५४९)

तमसा ग्रस्तवद् भानादग्रस्तोऽपि रविर्जनैः ।
ग्रस्त इत्युच्यते भ्रांत्या ह्यज्ञात्वा वस्तु-लक्षणम् ॥ ५४९ ॥
सूर्य हा (खराखुरा केतूने) ग्रासलेला नसतानासुद्धा तो तसा ग्रासल्यासारखा भासतो. वस्तूंचे खरे स्वरूप न जाणल्यामुळे भ्रांतीमुळे (अडाणी) लोक म्हणतात की सूर्य ग्रस्त झाला.



(५५०)

तद्वद् देहादि-बंधेभ्यो विमुक्तं ब्रह्मवित्तमम् ।
पश्यंति देहिवन्मूढा शरीराभास-दर्शनात् ॥ ५५० ॥
वरील सूर्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्याच्या बाबतीत आहे. श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता हा देह इत्यादी बंधनांपासून संपूर्णपणे विमुक्त असूनही, अडाणी/मूर्ख लोक हे (खरी परिस्थिती न जाणता, त्याच्या) शरीराचा आभास दिसतो, या कारणाने त्याला देह असणारा असे मानतात.



GO TOP