शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(१७६) वरील विवेचनाचाच अनुवाद पुढील श्लोक १७६ मध्ये आहे.

तस्मान्मनः कारणमस्य जंतोर्बंधस्य मोक्षस्य च वा विधाने ।
बंधस्य हेतुर्मलिनं रजोगुणैर्मोक्षस्य शुद्ध विरजस्तमस्कम् ॥ १७६ ॥
म्हणून या मानवप्राण्याच्या बंध आणि मोक्ष यांना कारण मन हेच आहे. रजोगुणाने (तसेच तमोगुणाने) मलिन झालेले मन हे बंधाचे कारण होते, तर रज आणि तम या गुणांनी रहित असे शुद्ध मन हे मोक्षाचे कारण होते.


अशुद्ध सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण माणसाला बंधनात पाडणारे आहेत. म्हणून 'रजोगुणैः' शब्दाने अशुद्ध सत्त्व आणि तम हे गुण सूचित होतात. (पहा भगवद्‌गीता १४.६ ). म्हणून 'विरजस्तमस्कम्' म्हणजे रज, तम तसेच अशुद्ध सत्त्व असा अर्थ द्यावा लागतो. या तीन गुणांनी रहित झालेले मन हे शुद्ध होते आणि ते मोक्षाप्रत नेते.


(१७७) मन शुद्ध कसे होते ते आता सांगितले आहे.

विवेक-वैराग्य-गुणातिरेकाच्छुद्धत्वमासाद्य मनो विमुक्तै ।
भवत्यतो बुद्धिमतो मुमुक्षोस्ताभ्यां दृढाभ्यां भवितव्यमग्रे ॥ १७७ ॥
विवेक आणि वैराग्य या गुणांचा सर्वोच्च उत्कर्ष झाला असता, शुद्धत्व प्राप्त करून घेऊन ते मन मोक्षाला कारणीभूत होते. म्हणून बुद्धिमान मुमुक्षूच्या बाबतीत ते (दोन गुण) दृढ होणे हे प्रथम (अग्रे) आवश्यक आहे.


विवेक म्हणजे आत्मानात्मविवेक (श्लोक २०-२१) आणि वैराग्य (श्लोक २१-२२) या गुणांचा अतिशय उत्कर्ष झाला की मन शुद्ध होते आणि ते मोक्षाप्रत नेते. अशुद्ध सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपासून वेगळे असणारे शुद्ध मन आहे. या गुणांचा प्रभाव दूर झाल्यावर चौथा गुण म्हणजे शुद्ध सत्त्वगुण उदयाला येतो, आणि तो असणारा ते शुद्ध मन होय. या चौथ्या गुणाला भगवद्‌गीतेने 'नित्य शुद्ध' असे म्हटले आहे. हे शुद्ध मन विवेक आणि वैराग्य यांच्या द्वारा सिद्ध होते.


(१७८) मन कसे आहे आणि ते काय करते हे श्लोक १७८-१८२ मध्ये सांगितले आहे -

मनो नाम महाव्याघ्रो विषयारण्य-भूमिषु ।
चरत्यत्र न गच्छंतु साधवो ये मुमुक्षवः ॥ १७८ ॥
विषयरूपी अरण्यातील जमिनीवर मन नावाचा भला थोरला वाघ फिरत असतो. म्हणून सज्जन मुमुक्षूंनी विषयारण्यात जाऊ नये.


येथे विषयांवर अरण्याचे रूपक आहे आणि मनावर वाघाचे रूपक आहे. शब्द, स्पर्श इत्यादी पाच विषय आहेत; त्या विषयांत इंद्रियांमार्फत मन वावरत असते. विषयांत माणूस गुंतला तर मनरूपी वाघ त्याचा नाश करील. विषयांमुळे भरकटलेले मन माणसांचे नुकसान करील, ते माणसाला जन्म-मरणाच्या फेऱ्यांत फेकून देईल. मन हे चांगले तसेच वाईट आहे. येथे वाईट मनाला वाघ म्हटले आहे.

श्लोकातील 'अत्र' म्हणजे विषयांमध्ये किंवा विषयलोलुप मनामध्ये. विषयांत लडबडणाऱ्या मनाच्या मागे लागू नये. विषयलोलुप मन काय करते ते आता पुढील श्लोकात सांगितले आहे.


(१७९)

मनः प्रसूते विषयानशेषात् स्त्थूलात्मना सूक्ष्मतया च भोक्तुः ।
शरीर-वर्णाश्रम-जाति-भेदान् गुण-क्रिया-हेतु-फलानि नित्यम् ॥ १७९ ॥
भोक्त्या जीवासाठी स्थूल स्वरूपाचे आणि सूक्ष्म स्वरूपाचे सर्व विषय हे मन निर्माण करते. तसेच शरीर, वर्ण, आश्रम, जातिभेद, गुण, क्रिया, कारण व त्यांची कार्ये (फलानि) हे मन नेहमी उत्पन्न करते.


या श्लोकात 'मन' म्हणजे 'अविद्या' असा अर्थ आहे (श्लोक १७१ ). प्रस्तावनेतील अध्यारोपप्रक्रियेत सांगितल्याप्रमाणे विश्व, विश्वातील स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ, शरीरे, (मानवी समाजात मानवी शरीरांचे) वर्ण, आश्रम, जातिभेद, इत्यादी सर्वकाही अविद्या/अज्ञान निर्माण करते. कल्पना अशी - जगातील स्थूल आणि सूक्ष्म वस्तू अज्ञानजन्य आहेत आणि त्या वस्तू भोक्त्या जीवाला उपभोग्य आहेत. अज्ञानापासून निर्माण झालेल्या पाच सूक्ष्म आणि स्थूल भूतांपासून सूक्ष्म आणि स्थूल शरीर बनतात. जन्मानुसार माणसाचा वर्ण ठरतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण पूर्वकाळी मानले जात. त्यांतील पहिल्या तीन वर्णांसाठी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम धर्मशास्त्रांनी सांगितले होते. प्राणी व जड पदार्थ यांच्या निरनिराळ्या जाती, सत्त्व-रज-तम या गुणांचे प्रगटीकरण, त्यांची कार्ये, त्यांची फळे हे सर्व काही मूळ अज्ञानापासून (=मनापासून) आहे असे म्हणता येते.

भोक्त्या जीवाचे सूक्ष्म आणि स्थूल शरीर आणि त्यांचे द्वारा उपभोगण्यास योग्य असे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ हेही अज्ञानापासूनच होतात.

वर्ण, आश्रम आणि त्यांचे धर्म हे ऋषींच्या मनातून प्रगट झाले असे म्हणता येईल. 'गुण' म्हणजे शरीर, वर्ण, आश्रम, आणि जाति यांचे गुण. ते ऋषींनी आपल्या मनाने ठरविले असे म्हणता येते. गुण म्हणजे सत्त्व, रज व तम हे तीन गुण; या अर्थाचा वर उल्लेख केला आहेच. गुणांनुसार पदार्थ हे सात्त्विक, राजस आणि तामस बनतात. शरीरातील कमेंद्रियांद्वारा क्रिया होतात. त्यांना प्रेरणा देणारे मन आहे. अमुक बी हे अमुक वृक्षाचे कारण असे निरीक्षणाअंती मनाने ठरविलेले असते. त्या वृक्षाचे फळ अमुक हा प्रकारही मनाने पाहिलेला असतो (निर्मिलेला नसतो).

अशाप्रकारे या श्लोकात मन म्हणजे अज्ञान/अविद्या आणि मन म्हणजे मानवी मन असे दोन अर्थ घ्यावे लागतात.


(१८०) मन माणसाला कसे गोत्यात आणते हे श्लोक १८० सांगतो.

असंग-चिद्‌रूपममुं विमोह्य देहेंद्रिय-प्राण-गुणैर्निबध्य ।
अहं ममेति धमयत्यस्रं मनः स्वकृत्येषु फलोपभुक्तिषु ॥ १८० ॥
असंग आणि चैतन्यरूप अशा या अंतरात्म्याला मन हे मोहित करून टाकते आणि ते मन देह, इंद्रिये व प्राण यांच्या दोऱ्यांनी (गुणैः) त्याला बांधून टाकून, 'मी/माझे' या अहंकाराद्वारे ते जीवरूप अंतराल्याला स्वतःच्या क्रियांमध्ये आणि त्यांची फळे भोगण्यामध्ये सतत फिरवत राहते.


येथे 'अमुम्' या पदाने प्रतिबिंबरूपी जीव अथवा प्रत्यगात्मा/अंतरात्मा सूचित होतो. अंतरात्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडताच अहंकार कार्यशील होतो आणि तो देह इत्यादींना मी माझे असे म्हणू लागतो. किंबहुना बुद्धीतील/मनातील अहंकाराने देह इत्यादीवर अंतरात्म्याचा अध्यास होतो (श्लोक १८१ ). मग मन हे इंद्रियांना बरी-वाईट कर्मे करण्याची प्रेरणा देते; माणसाला त्या कर्माची फळे भोगावी लागतात, मग माणूस मनाच्या प्रेरणेने होणारी कर्मे व त्यांची फळे यातच फिरत राहतो. देहातील अंतरात्मा हा असंग आणि चैतन्यरूप आहे. त्याच्यावर प्रत्यक्ष कर्मांचा व फळांचा भोग येत नाही. पण अहंकारामुळे तसे झाले असे वाटते.

येथे 'गुणैः' हा शब्द स्वतंत्रपणेही घेता येईल. मग 'गुणैः' म्हणजे सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या द्वारा असा अर्थ होईल.


(१८१) अध्यासाने काय होते ते आता सांगितले आहे.

अध्यास-दोषात् पुरुषस्य संसृतिरध्यास-बंधस्तमुनैव कल्पितः ।
रजस्तमोदोषवतोऽविवेकिनो जन्मादि-दुःखस्य निदानमेतत् ॥ १८१ ॥
अध्यास या दोषाने माणसाला संसार प्राप्त होतो. या अध्यासामुळे (अमुना) येणारा बंध हा कल्पित आहे. रजोगुण आणि तमोगुण या दोषांनी युक्त असणाऱ्या अविवेकी पुरुषाच्या जन्म इत्यादी दुःखाचे कारण हेच कारण (निदान) आहे.


अध्यास म्हणजे अध्यारोप. (अध्यारोपासाठी प्रस्तावना पहा.) 'अतस्मिन् तद्‌बुद्धिः' म्हणजे जे जसे नाही ते तसे वाटणे म्हणजे अध्यास (श्लोक १४० ). उदा., साप नसणाऱ्या रज्जूवर साप भासणे हा अध्यास आहे. अविद्येमुळे ब्रह्मावर विश्वाचा अध्यास होतो. विश्वात देह आहेत. त्या देह इत्यादींना अहंकाराने मी मानून जी कर्मे होतात, त्यांच्यामुळेच माणसाला संसार येतो म्हणजेच जन्ममरणाचा फेरा त्याच्या मागे लागतो. आता अध्यास हाच मुळात खोटा, भ्रामक असल्याने अध्यासामुळे येणारा संसार हा खरा न ठरता कल्पित ठरतो. पण हे सत्य ज्यांना कळत नाही अशा अविवेकी आणि रजतमगुणांच्या दोषांनी युक्त असलेल्या पुरुषाला हा अध्यास हाच जन्ममरण इत्यादी दुःखाचे कारण होतो.

''एतत्'' हा शब्द अध्यासाकडे घेता येतो. तो मनाकडे घेतला तर मन म्हणजे अविद्या हेच जन्ममरणादी दुःखाचे कारण बनते असा अर्थ होईल.

''अमुना'' या शब्दाचा संबंध काही लोक श्लोक १८० मधील 'मनः' शब्दाकडे घेतात. मग येथे मन = अविद्या (श्लोक १७१) असा अर्थ घ्यावा लागतो. मग मनामुळे म्हणजे अविद्येमुळे झालेल्या अध्यासाने आलेला बंध हा कल्पित आहे, असा अर्थ होतो.


(१८२) म्हणूनच मनामुळे/अविद्येमुळे माणसाला भ्रम होतो असे आता सांगितले आहे.

अतः प्राहुर्मनोऽविद्यां पंडितास्तत्त्वदर्शिनः ।
येनैव श्राव्यते विश्वं वायुनेवाभ्र-मंडलम् ॥ १८२ ॥
म्हणून तत्त्वदर्शी पंडित लोक मनालाच अविद्या म्हणतात. ज्याप्रमाणे वारा हा ढगांच्या समूहाला आकाशात फिरवीत असतो, त्याप्रमाणे या मनाकडूनच म्हणजेच अविद्येकडूनच विश्व भ्रमात पाडले जाते (अथवा संसारात फिरवले जाते).


श्लोक १७१ मध्ये मन म्हणजे अविद्या असे सांगितले होते तेच येथे पुनः जोर देण्यासाठी पुनरुक्त केले आहे. भावार्थ असा की, अध्यासाचे कारण असणारे मन म्हणजे अविद्या आहे. अध्यास करणारे मन हेच विश्वाला, सर्व प्राण्यांना भ्रमात म्हणजे मोहात पाडत असते आणि तेच त्याला संसारात - जन्ममरणात - फिरवीत असते. हा भ्रम/मोह म्हणजे विश्व सत्य आहे असे वाटणे. वास्तविक पाहता विश्व हे ब्रह्मावर अध्यास असल्याने ते मिथ्या/असत् आहे.


(१८३) अशुद्ध मन हे बंधाला कारण आहे, तर शुद्ध मन हे मोक्षाप्रत नेणारे आहे. म्हणून मुमुक्षूने मन हे शुद्ध करणे आवश्यक आहे.

तन्मनः शोधन कार्य प्रयत्‍नेन मुमुक्षुणा ।
विशुद्धे सति चैतस्मिन् मुक्तिः करफलायते ॥ १८३ ॥
म्हणून मुमुक्षू माणसाने प्रयत्‍नपूर्वक मनाची शुद्धी करावी. हे मन (एतस्मिन्) शुद्ध झाले असताना, हातातील फळाप्रमाणे मोक्ष हस्तगत होतो.


अशुद्ध सत्त्व, रज आणि तम या गुणांचा मनावरील प्रभाव कमी होऊन, शुद्ध झालेले मन हे मुमुक्षूला मोक्षाप्रत नेते.


(१८४) ज्या रज आणि तम गुणांनी मन शुद्ध होते त्यांचे निर्दालन कसे करावयाचे ते पुढील श्लोक १८४ सांगतो.

मोक्षैक-सक्त्या विषयेषु रागं निर्मूल्य संन्यस्य च सर्वकर्म ।
सच्छ्रद्धया यः श्रवणादि-निष्ठो रजः स्वभावं स धुनोति बुद्धेः ॥ १८४ ॥
फक्त मोक्षाची आसक्ती बाळगून, विषयांतील आसक्ती समूळ नष्ट करून आणि सर्व कर्मांचा त्याग करून, गुरू व वेदांत यांच्या वचनांवर दृढ श्रद्धा बाळगून, जो मुमुक्षू श्रवण इत्यादी करण्यात तत्पर होतो, तो बुद्धीतील - (=मनातील) रजोगुणाचा तसेच तमोगुणाचा प्रभाव धुवून /झटकून टाकतो.


मोक्षाची आसक्ती/इच्छा ही विषयांवरील आसक्तीप्रमाणे बंधनकारक नाही. मोक्षाप्राप्तीची इच्छा असेल, तर प्रथम विषय आणि त्यांचे भोग यांतील आसक्ती नष्ट व्हावयास हवी म्हणजे दृढ वैराग्य हवे. तसेच बऱ्यावाईट कर्मांनीही विषयांची आसक्ती वाढत असते. म्हणून मुमुक्षूने सर्व कर्मांचा त्याग करावयास हवा. हा त्याग कसा करावयाचा हे मागे सांगितले आहे. (श्लोक ७१ ). तसेच, गुरू आणि वेदांतवाक्ये यांच्या वाक्यांवर दृढ श्रद्धा हवी. तरच मुमुक्षू त्यांनी सांगितलेले श्रवण, मनन आणि निदिध्यासन करील. हे सर्व घडले तर रज आणि तम या गुणांचा मनावरील प्रभाव कमी होईल.


(१८५) येथपर्यंत मनोमय कोशातील मनाचे वर्णन झाले. महत्त्वाचे हे की हा मनोमय कोश हाही आत्मा नव्हे.

मनोमयो नापि भवेत् परात्मा ह्याद्यंतवत्त्वात् परिणामि-भावात् ।
दुःखात्मकत्वाद् विषयत्वहेतोर्द्रष्टा हि दृश्यात्मतया न दृष्टः ॥ १८५ ॥
मनोमय कोश हासुद्धा परमात्मा/प्रत्यगात्मा नाही. याची कारणे अशी - (१) या कोशाला आदि व अंत आहेत. (२) त्याच्यात परिणाम विकार घडत असतात. (३) तो दुःख स्वरूपाचा आहे. (४) तो ज्ञानाचा विषय होतो आणि या जगात द्रष्टा हा दृश्य स्वरूपाचा असतो असे दिसून येत नाही.


मनोमय कोश हा प्रत्यगात्मा नव्हे याची कारणे अशी - (१) मनोमय कोश हा पाच सूक्ष्म भूतांपासून उत्पन्न होतो म्हणजे त्याला आदी/प्रारंभ आहे आणि उत्पत्ती असल्याने त्याला नाशही आहे. (२) मनातील संकल्प व विकल्प हे सातत्याने बदलत असतात; म्हणून तो परिणामाविकार पावणारा आहे. (३) दुःख हे मनाला होत असते. दुःखाचे प्रमाण जास्त असल्याने तो दुःखस्वरूपाचा आहे असे येथे म्हटले आहे. (४) मन हे ज्ञानाचा विषय होते; ते दृश्य आहे तर आत्मा द्रष्टा आहे. आत्मा हा द्रष्टा आहे हे मागे सांगून झाले आहे (पहा श्लोक १२८ ).

मनाच्या विरुद्ध स्वभावाचा प्रत्यगात्मा आहे. त्याला आदी आणि अंत नाहीत; तो स्वतःसिद्ध आहे. आत्म्यात परिणाम (विकार) होत नाहीत. आत्मा हा पूर्णपणे सुख या स्वरूपाचा आहे. मन हे दृश्य आहे तर आत्मा द्रष्टा आहे. द्रष्टा हा कधीच दृश्य होत नाही.

अशाप्रकारे मन हे ज्यात मुख्य आहे असा हा मनोमय कोश हा कधीच प्रत्यगात्मा/अंतरात्मा होऊ शकत नाही.


(१८६) आता विज्ञानमय कोशाची माहिती सुरू होते.

बुद्धिर्बुद्धींद्रियैः सार्धं सवृत्तिः कर्तृ-लक्षणः ।
विज्ञानमयकोशः स्यात् पुंसः संसार-कारणम् ॥ १८६ ॥
निरनिराळ्या वृत्ती असणारी बुद्धी ही ज्ञानेंद्रियांसकट कर्ता हे स्वरूप असणारी असते, तीच विज्ञानमयकोश आहे आणि तीच माणसाच्या संसाराचे कारण आहे.


बुद्धींद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय. डोळा इत्यादी पाच ज्ञानेंद्रिये आहेत. वृत्ती म्हणजे अवस्था. बुद्धीच्या अनेक वृत्ती होतात; त्यांत निश्चय ही मुख्य वृत्ती आहे आणि जीवनात निश्चय हे सतत बदलत असतात. बुद्धी हीच स्वतःला कर्ता मानते (म्हणजे बुद्धीत प्रगट होणारा अहंकार हा कर्ता-भोक्ता होतो). ज्ञानेंद्रियासकट बुद्धी म्हणजे विज्ञानमयकोश आहे. विज्ञान म्हणजे बुद्धी. विज्ञानमयकोशात बुद्धी ही मुख्य असल्याने विज्ञानमयकोश असे नाव दिले जाते. ही बुद्धी निश्चयानंतर कर्मे करवून घेते आणि त्या कर्माअंती ती संसाराचे - जन्ममरणाचे कारण बनते.


(१८७)

अनुव्रजच्चित्-प्रतिबिंब-शक्ति-र्विज्ञान-संज्ञः प्रकृतेविकारः ।
ज्ञान-क्रियावानहमित्यजस्रं देहेंद्रियादिष्वभिमन्यते भृशम् ॥ १८७ ॥
चैतन्याच्या प्रतिबिंबाची शक्ती ज्याच्याबरोबर येत असते (अनुव्रजत्), जो प्रकृतीचा विकार आहे आणि जो विज्ञान हे नाव असणारा कोश आहे, तो ज्ञान आणि क्रिया यांनी युक्त आहे. हा सतत देह, इंद्रिये, इत्यादींच्या ठिकाणी 'मी' असा फार अभिमान बाळगत असतो.


विज्ञान म्हणजे बुद्धी. या बुद्धीत आत्मचैतन्याचे प्रतिबिंब उमटताच बुद्धीत अहंकार कार्यप्रवण होतो आणि तो देह, इंद्रिये इत्यादी म्हणजे 'मी' असा अभिमान धारण करण्याच्या प्रतिबिंबाच्या शक्तीमुळेच बुद्धीत ज्ञान प्रगटते आणि बुद्धी क्रिया करू लागते. विज्ञानमयकोश हा प्रकृतीचा विकार आहे. येथे प्रकृती शब्दाने अज्ञान/अविद्या अभिप्रेत आहे (श्लोक ११०). अज्ञान हेच जगाच्या अभासाचे कारण आहे. साहजिकच जगदाभासातील विज्ञानमयकोश हा प्रकृतीचा विकार आहे (प्रस्तावना पहा). चैतन्याच्या प्रतिबिंबाच्या शक्तीमुळे 'मी जाणतो' अशी भावना विज्ञानाला येते, आणि मग 'मी करतो' ही भावना अहंकारामुळे येते .बुद्धीतील अहंकार जे काही करतो ते विज्ञान/बुद्धी करते असे येथे गौणपणे म्हटले आहे.


(१८८) - (१९०/अ) बुद्धीतील चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव म्हणून विज्ञानमय कोशालाच जीव असे म्हणता येते असे श्लोक १८८-१९०/अ यांवरून कळते.

अनादि-कालोऽयमहंस्वभावो जीवः समस्त-व्यवहार-वोढा ।
करोति कर्माण्यपि पूर्व-वासनः पुण्यान्यपुण्यानि च तत्फलानि ॥ १८८ ॥
भुंक्ते विचित्रास्वपि योनिषु व्रजन्नायाति निर्यात्यध ऊर्द्धमेषः ।
अस्यैव विज्ञानमयस्य जाग्रत्-स्वप्ताद्यवस्था सुख-दुःख-भोगः ॥ १८९ ॥
देहादिनिष्ठाश्रम-धर्म-कर्म-गुणाभिमानं सततं ममेति ॥ १९०/अ ॥
अहंकार हे स्वरूप असणारा, अनादी कालापासून चालत आलेला, आणि या जगात सर्व व्यवहार करणारा (वोढा) असा हा (अयं) विज्ञानमयकोश म्हणजेच 'जीव' आहे. त्याचे ठिकाणी पूर्वीच्या वासना असल्याने, त्यांना अनुसरून हा पुण्य कर्मे अथवा पाप कर्मे करतो आणि त्यांची फळे भोगतो. विश्वातील नानाप्रकारच्या प्राण्यांच्या योनीमध्ये जात (वजन्) हा ऊर्ध्वलोकी अथवा अधोलोकी जातो. या विज्ञानमय कोशालाच जागृती, स्वप्न इत्यादी अवस्था असतात, आणि त्यालाच सुख आणि दुःख यांचा भोग भोगावा लागतो आणि देह इत्यादींच्या आधाराने/उपाधीने असणारे आश्रम, (आश्रम-) धर्म, कर्म, गुण इत्यादींचा अभिमान हा (जीव) सतत 'माझे' म्हणून बाळगीत असतो.


अज्ञानाने जगाचा अध्यास होतो. हे अज्ञान/अविद्या केव्हापासून आहे हे कुणालाच माहीत नसल्याने ती अनादी आहे असे मानले. अनादी अज्ञानातून प्रगट झालेला विश्वाचा पसारा हाही अनादीच ठरतो. आणि या अनादी विश्वाच्या पसाऱ्यात आढळून येणारा विज्ञानमय कोश हाही अनादीच ठरतो.

विज्ञानमय कोश म्हणजे जीव आहे, हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. कारण विज्ञानमय कोशात पाच ज्ञानेंद्रिये येतात. तर बुद्धीत पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. बुद्धीतील अहंकारामुळे हा जीव देह, इंद्रिये इत्यादींना 'मी 'म्हणतो. संपूर्ण विज्ञानमय कोश हा जीव नाही.

हा विज्ञानमय कोशच प्राण्यांच्या निरनिराळ्या योनीत जन्माला येत असतो, आणि तो केलेल्या पापपुण्यात्मक कर्मांनुसार जन्ममरणाच्या चक्रात गुंतून राहतो. कधी तो ऊर्ध्वलोकांत जातो तर कधी तो अधोलोकीही जातो. ऊर्ध्वलोक म्हणजे निरनिराळे स्वर्ग आणि अधोलोक म्हणजे पाताळ इत्यादी लोक. खरे म्हणजे माणसाचा सूक्ष्म देहच जन्ममरणाच्या चक्रात सापडतो. सूक्ष्म देहाचा घटक विज्ञानमय कोश आहे. म्हणून सूक्ष्म देह या अवयवीशी विज्ञानमय कोश या अवयवाचे ऐक्य मानून येथे विज्ञानमय कोश निरनिराळ्या योनीत जातो, असे म्हटलेले आहे.

माणसाच्या-व्यष्टि-जीवनात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. यातील जागृती अवस्थेत संपूर्ण विज्ञानमय कोश असतो. पण तो स्वप्न या अवस्थेत कार्यशील नसतो आणि सुषुप्ती अवस्थेत तो बीजरूपात गेलेला असतो. या विशिष्ट अर्थांनी विज्ञानमय कोश तीन अवस्थांत असतो असे गौणपणे म्हणावे लागते.

विज्ञानमय कोशालाच वर गौणपणे जीव असे म्हटल्याने आणि जीव हा कर्मांचे भोग भोगतो असे मानले जात असल्याने, विज्ञानमय कोश हा भोग भोगतो असे म्हणता येते.

विज्ञानमय कोशातील बुद्धीत प्रगटणारा अहंकार हा देह, इंद्रिये इत्यादींना मी म्हणतो. साहजिकच देहाशी संबंधित जे (चार वर्ण) चार आश्रम, त्यांची कर्तव्ये, धर्माचरण, बरीवाईट कर्मे तसेच सत्त्व इत्यादी गुण हे 'माझे' असे तो सतत म्हणत राहतो. माझा देह उंच आहे. मी ब्राह्मण आहे. मी गृहस्थ आहे. मी पुण्यकर्मे करतो. मी राजस आहे, अशाप्रकारे त्याचे कार्य चालू असते.


(१९०/ब - क)

विज्ञानकोशोऽयमतिप्रकाशः प्रकृष्ट-सांनिध्य-वशात् परात्मनः ।
अतो भवत्येष उपाधिरस्य यदात्मधीः संसरति भ्रमेण ॥ १९०/ब-क ॥
परमात्माच्या/प्रत्यगात्माच्या अतिशय सांनिध्यामुळे हा विज्ञानमय कोश हा अत्यंत प्रकाशमान आहे. म्हणूनच तो या परमात्म्याची उपाधी बनतो आणि या उपाधीला भ्रांतीने आत्मा मानल्यामुळे (यदात्मधीः) माणूस संसरण करीत राहतो.


बुद्धिरूपी गुहेत आत्मा आहे (श्लोक १३४) म्हणजे मानवी शरीरात प्रत्यगात्मा हा जास्तीतजास्त बुद्धीच्या जवळ आहे. चैतन्यरूप अंतरात्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते. मग अचेतन बुद्धी चैतन्याच्या प्रकाशाने उजळून निघते. जसे, आरशावर सूर्याचे प्रतिबिंब पडले की आरसा प्रकाशाने चमकू लागतो. आता बुद्धी ही जरी प्रत्यगात्माच्या प्रकाशाने युक्त झाली तरी ती मूलतः अचेतन आहे. म्हणून ती चेतन आत्मा होऊ शकत नाही. ती आत्म्याच्या जवळ असल्यामुळे ती आत्म्याची उपाधी बनते. म्हणून विज्ञानमय कोश हा आत्म्याची उपाधी बनतो, असे येथे म्हटले आहे. उदा., शुद्ध स्फटिकाजवळ ठेवलेले लाल फुल हे स्फटिकाची उपाधी बनते. पुढे अहंकारामुळे ही उपाधी म्हणजेच प्रत्यगात्मा असे जीव भ्रमाने मानू लागतो आणि मग केलेल्या कर्मांच्या परिणामाअंती तो संसारात भ्रमण करू लागतो.


(१९१) खरे म्हणजे विज्ञानमय कोश हा कर्ता, भोक्ता आहे (श्लोक १८६ ). पण भ्रमाने त्यालाच आत्मा मानल्याने आत्मा हा कर्ता-भोक्ता झाला असे वाटू लागते.

योऽयं विज्ञानमयः प्राणेषु हृदि स्फुरत्ययं ज्योतिः ।
कूटस्थः सन्नात्मा कर्ता भोक्ता भवत्युपाधिस्थः ॥ १९१ ॥
जो हा कूटस्थ, प्रकाशरूप (ज्योतिः) आत्मा आहे तो (देहाच्या) उपाधीत राहू लागतो आणि मग तो विज्ञानमय (कोश) होऊन, प्राणांचे ठायी तसेच हृदयामध्ये स्फुरण पावतो आणि कर्ता व भोक्ता होतो.


या श्लोकात 'स्फुरत्ययं ज्योतिः' या शब्दांचे स्थानी 'स्फुरत्स्व्ययं ज्योतिः' असा पाठभेद आहे. स्वयंज्योतिः म्हणजे स्वयंप्रकाशी.

प्रकाशमान, स्वयंप्रकाशी आत्मा/प्रत्यगात्मा हाच देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी इत्यादींच्या उपाधीत असतो (श्लोक १३१ ). पण या उपाधी अंती तो स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन अहंकाराने स्वतःला देह इत्यादी मानू लागतो. म्हणजे उपाधीच्या संसर्गाने कूटस्थ स्वयंप्रकाशी आत्मा हा जीव मानला जातो. मग तो स्वतःला कर्ता-भोक्ता मानू लागतो (श्लोक १९२-१९३) आणि कर्माअंती तो ऊर्ध्वलोकी व अधोलोकी गमन करतो (श्लोक १८७-१८९ ).

या संदर्भात उपनिषदातील पुढील वचन लक्षात घेण्यासारखे आहे - कतम आत्येति योऽयं विज्ञानमयः प्राणेषु हृदि अंतर्ज्योतिः पुरुषः स समानः सन् उभौ लोकौ अनुसंचरति...... । (बृहदारण्यक उपनिषद ४-३. ७)


(१९२) आत्माच स्वतःला जीवरूपाने वेगळे पाहू लागतो.

स्वयं परिच्छेदमुपेत्य बुद्धेस्तादात्म्य-दोषेण पर मृषात्मनः ।
सर्वात्मकः सन्नपि वीक्षते स्वयं स्वतः पृथक्तेन मृदो घटानिव ॥ १९२ ॥
असत्/मिथ्या स्वरूप असणाऱ्या बुद्धीशी तादात्म्य पावण्याच्या दोषाने हा प्रत्यगात्मा स्वतःच मर्यादित होतो (परिच्छेदं उपेत्य); आणि जरी तो सर्वांचा आत्मा/सर्वस्थित/सर्वव्यापक आहे तरी (माणूस ज्याप्रमाणे) घटांना मातीपेक्षा वेगळे पाहतो, त्याप्रमाणे तो (आत्मा) स्वतःच स्वतःला वेगळेपणाने पाहू लागतो.


आत्मा हा मूलतः सर्वांचा अंतरात्मा आहे. तथापि, तो शरीराच्या उपाधीत सापडला. बुद्धी इत्यादींसह शरीर हे अध्यस्त असल्याने ते मिथ्या आहे. मिथ्या असणाऱ्या बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडते; लगेच बुद्धीत अहंकार प्रगटतो. या अहंकारामुळे 'मिथ्या बुद्धी' म्हणजे 'मी' असे भान त्या आत्म्याच्या प्रतिबिंबाला येऊ लागते. साहजिकच त्याला बुद्धीची मर्यादा असते. आता, आत्मा हा जरी सर्व व्यापक आहे तरी 'मी म्हणजे बुद्धी' अशी त्याला मर्यादा येते, आणि मग 'मी आत्मापेक्षा/प्रत्यगात्मापेक्षा वेगळा आहे', असे तो पाहू लागतो. उदा., मातीचे घट हे खरे तर मातीरूपच आहेत. तथापि, माणूस त्या दोहोंना वेगळे मानतो. त्याप्रमाणे बुद्धीने मर्यादित झालेला प्रतिबिंबरूप प्रत्यगात्मा हा स्वतःला प्रत्यगात्मापेक्षा वेगळा असे मानू लागतो.


(१९३) मग उपाधीशी संबंधित झालेला आत्मा हा उपाधीच्या गुणांनी युक्त झाला असे वाटू लागते.

उपाधि-संबंध-वशात् परात्मा ह्युपाधि-धर्माननुभाति तद्‌गुणः ।
अयो-विकारानविकारि-वह्निवत् सदैकरूपोऽपि परः स्वभावात् ॥ १९३ ॥
परमात्मा (परः) हा जरी स्वभावतः निरंतर एकरूपच असतो, तरीसुद्धा तो उपाधीशी संबंध आल्याकारणाने त्या उपाधीच्या गुणांचे अनुकरण करतो आणि मग तो त्या उपाधीच्या गुणांनी युक्त आहे असा भासतो. जसे - विकार नसणारा अग्नी हा लोखंडाचे विकार धारण करतो, तद्‌वत्.


परमात्म्याला/प्रत्यगात्माला स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहांच्या उपाधी येतात. आता, तो जरी स्वभावतः/मूलतः सच्चिदानंद हे एकच स्वरूप असणारा आहे, तरी त्याचा उपाधीशी संबंध आल्यामुळे तो जणु त्या उपाधीच्या गुणांनी युक्त झाला आहे असे वाटते. उदा., देहाच्या उपाधीने 'मी उंच आहे', असे माणूस म्हणतो. मनाच्या उपाधीमुळे 'मी सुखी आहे' असे मानतो. पण तसे मानल्यामुळे त्याचे मूळचे सच्चिदानंद स्वरूप मात्र बदलत नाही. उपाधी मिथ्या असल्यामुळे, त्याचे उपाधिजन्य स्वरूप मिथ्या असते; ते त्याचे खरे स्वरूप नव्हे. याला दृष्टांत असा - लोखंड अग्नीत तापले. लोखंडात अग्नी शिरला. लोखंड ही त्याची उपाधी बनली. मग लोखंड या उपाधीप्रमाणे अग्नी हा लहान, मोठा, गोल, चपटा इत्यादी लोखंडाचे आकार धारण करतो असे वाटते. तथापि, प्रत्यक्षात लोखंड या उपाधीचे गुण अग्नीमध्ये शिरत नाहीत, अग्नी मुळातल्याप्रमाणेच अविकारी राहतो. दुसरे एक उदाहरण असे - शुभ्र स्फटिकांजवळ निरनिराळ्या रंगाचे पदार्थ ठेवले तर तो स्फटिक त्या त्या रंगाने युक्त आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात मात्र स्फटिकाचा मूळचा शुभ रंग बदलत नाही. तात्पर्य असे - परमात्माला/प्रत्यगात्माला नानाप्रकारच्या उपाधी आल्यावर, त्या त्या उपाधीचे गुण आत्म्यात आले असे अडाणी माणसाला वाटते. परंतु प्रत्यक्षात मात्र आत्म्याच्या मूळ रूपात कोणताही फरक पडत नाही.


(१९४) - (१९५) गुरूच्या या वचनावर शिष्याला ज्या काही शंका आल्या, त्या पुढील श्लोक १९४- १९५ मध्ये मांडलेल्या आहेत.

भ्रमेणाप्यन्यथा वास्तु जीव-भावः परात्मनः ।
तदुपाधेरनादित्वान्नानादेर्नाश इष्यते ॥ १९४ ॥
अतोऽस्य जीवभावोऽपि नित्यो भवति संसृतिः ।
न निवर्तेत तन्मोक्षः कथं मे श्रीगुरो वद ॥ १९५ ॥
(शिष्य म्हणतो -) परमात्म्याला जो जीवभाव आला आहे तो भ्रमाने असो अथवा अन्य काही कारणाने असो. त्या परमात्माला आलेली उपाधी ही अनादी असल्यामुळे, त्या अनादी उपाधीचा नाश होत नाही, असेच मानले जाते. म्हणून या जीवांचा जीवभाव नित्य ठरतो; म्हणून त्याचा संसारही नित्य ठरतो, न परतणारा, न संपणारा ठरतो. तर मग त्या जीवाला संसारातून सुटका कशी बरे प्राप्त होईल, हे श्रीगुरो, तुम्ही मला सांगा.


गुरूच्या भाषणाचे तात्पर्य होते की, परमात्मा हाच उपाधीमुळे जीवरूपाने भासतो. उदा., बुद्धीत पडलेले प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब हे अहंकाराने स्वतःला प्रत्यगात्मापेक्षा वेगळा असा जीव मानू लागते, व ते देह इत्यादींशी तादात्म्य पावते आणि प्रत्यगात्मावर स्वतःचा आरोप करून सर्व व्यवहार करते. यावर शिष्याची शंका अशी - अज्ञान या उपाधीने परमात्म्याला भिन्न देहांच्या उपाधी येतात. आणि परमात्मा जीव रूपाने भासू लागतो. आता, अज्ञान ही उपाधी अनादी आहे. जे अनादी असते ते अंतरहित- नाशरहित असते. म्हणून अज्ञान या उपाधीचा नाश होणार नाही. आता अज्ञान ही उपाधीच जर नष्ट होणार नसेल, तर त्या उपाधीअंती जीवाला येणारा संसार - जन्म मरणचक्र - कसा थांबेल ? आणि जीवाचा संसार जर संपणार नसेल, तर त्याला संसारातून सुटका म्हणजे मोक्ष कसा प्राप्त होईल ?

या शंकेनंतर गुरू सांगतो -


(१९६)

सम्यक् पुष्टं त्वया विद्वन् सावधानेन तच्छृणु ।
प्रामाणिकी न भवति भ्रांत्या मोहित-कल्पना ॥ १९६ ॥
हे शहाण्या शिष्या, तू योग्य तेच विचारले आहेस. आता मी सांगतो ते सावधानपणे ऐक. भ्रांतीमुळे मोहित झालेल्या माणसाची कल्पना ही प्रामाणिक म्हणजे खरी नसते.


समजा, एखाद्या माणसाला भ्रम झाला आणि त्या भ्रमापोटी-भ्रांतिपोटी- तो काहीतरी मानू लागला. पण ते त्याचे मानणे खरे नसते. उदा., जमिनीवर पडलेली दोरी न कळल्याने माणसाला भ्रम झाला आणि तो ती दोरी म्हणजे साप आहे असे समजू लागला. येथे भ्रमाने भासणारा साप खरा नाही हे उघड आहे. किंवा - आरशात चिमणीला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. आरशात दुसरी चिमणी आहे असा तिला भ्रम होतो आणि ती आरशातील प्रतिबिंबाला टोची मारू लागते. तथापि, आरशात दुसरी चिमणी नाही हे सत्य आहे. संक्षेपाने सांगायचे झाल्यास, भ्रमाने/भ्रांतीने माणसाला जे खरे वाटते/भासते, ते खरे नसते.


१९७ भ्रांतीमुळे आत्म्याचा संबंध उपाधीशी आला असे वाटते.

भ्रांति विना त्वसंगस्य निष्क्रियस्य निराकृतेः ।
न घटेतार्थ-संबंधो नभसो नीलतादिवत् ॥ १९७ ॥
आकाशाच्या बाबतीत निळेपणा इत्यादींचा संबंध ज्याप्रमाणे भ्रांती मानल्याशिवाय योग्य ठरत नाही (घटेत), त्याप्रमाणे असंग, क्रियारहित, आणि निराकार अशा परमात्म्याचा दृश्य अर्थाशी - उपाधीशी - संबंध (अर्थ संबंध) हा भ्रांति आहे असे मानल्यावाचून योग्य ठरत नाही.


आकाश म्हणजे अवकाश. त्याला रंग, रूप नाही. तथापि, भ्रांतीने/चुकीने माणसे 'आकाश निळे आहे' असे मानतात, म्हणजेच निळ्या रंगाचा आरोप आकाशावर करतात. या भ्रम-जन्य आरोपामुळे आकाश काही प्रत्यक्षात निळे होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा/प्रत्यगात्मा हा मूलतः निःसंग, क्रियारहित आणि निराकार आहे. पण त्याला देह इत्यादी उपाधी येते. मग त्या उपाधीशी आत्म्याचे तादात्म्य भ्रांतीने कल्पून, उपाधीचे गुणधर्म आत्म्यात आहेत असा आरोप अज्ञानी माणसे करतात. तथापि, हा भ्रांतिजन्य आरोप खोटा आहे. आत्मा हा उपाधीप्रमाणे किंवा उपाधीच्या गुणांनी युक्त असा कधीच होत नाही. उपाधीला काही तरी आकार, क्रिया वा संपर्क असतो. आत्म्याला तसे काहीही नसते. उपाधीचे गुणधर्म चुकीने आत्म्यावर लादले जातात, ते योग्य नाही. उपाधी आणि आत्मा हे अगदी वेगळे आहेत.


(१९८) याचाच अधिक खुलासा श्लोक १९८ मध्ये आहे.

स्वस्य द्रष्टुर्निर्गुणस्याक्रियस्य प्रत्यग्-बोधानंद-रूपस्य बुद्धेः ।
भ्रांत्या प्राप्तो जीवभावो न सत्यो मोहापाये नास्त्यवस्तु स्वभावात् ॥ १९८ ॥
द्रष्टा, निर्गुण, क्रियारहित, आंतर ज्ञानरूप आणि आनंदरूप असा जो स्वतःचा प्रत्यगात्मा, त्याचे भ्रांतीने बुद्धीशी ऐक्य मानले गेल्याने, जीवभाव (= जीव ही संकल्पना) प्राप्त होते, नाहीतर जीवभाव हा सत्य नाही. मोह किंवा भ्रांति दूर होताच (मोहापाये) स्वभावानुसार (अनात्म अशी) अवस्तू राहतच नाही.


अज्ञान ही उपाधी अनादी म्हणून अनंत असल्याने, अज्ञानजन्य उपाधीने आलेला जीवभाव हाही नित्य होईल, असे शिष्याचे म्हणणे होते (श्लोक १९५ ). याला गुरूचे उत्तर असे आहे - परमार्थदृष्ट्या एका प्रत्यगात्माखेरीज अन्य काहीही सत्य नाही. अज्ञानाने परमात्म्यावर अध्यस्त झालेल्या विश्वात देह, बुद्धी इत्यादी निर्माण झाले असे वाटते, पण तसे नाही. आत्मा ही एकच 'वस्तू ' आहे. वस्तू ती की जी तीनही काळांत सतत टिकून राहते. जीव तसा आहे का ? नाही. उपाधिजन्य बुद्धीमध्ये पडलेले प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव. बुद्धीतील अहंकारामुळे हा तथाकथित जीव हा स्वतःला देह इत्यादी तसेच प्रत्यगात्मा मानू लागतो. पण ते सर्व चुकीचे आहे. भ्रांतीमुळे प्रत्यगात्मा आणि जीव एकच आहेत असे वाटते, परंतु तसे नाही. जीव म्हणून सतत टिकून राहणारी अशी कोणतीही 'वस्तू' नाही. खरे म्हणजे एकच प्रत्यगात्मा ही सत्य 'वस्तू' आहे. बाकी सर्व आपोआपच 'अवस्तू' ठरतात. आणि 'अवस्तू' ही संकल्पना भ्रांती आहे तोपर्यंत टिकून राहते. जीव ही अशी 'अवस्तू' आहे, आणि म्हणून, हे शिष्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे जीवभाव हा सतत राहणारा असा मुळातच नाही. जीवभाव हा भ्रांतिजन्य आहे. भ्रांती संपताच जीवभाव संपून जातो, जीव म्हणून स्वतंत्र अशी काही 'वस्तू' नाही. एक उदाहरण देऊन या संकल्पनेचेच अधिक स्पष्टीकरण गुरू पुढील श्लोक १९९ मध्ये करतो.


(१९९)

यावद् भ्रांतिस्तावदेवास्य सत्ता मिथ्याज्ञानोज्जृंभितस्य प्रमादात् ।
रज्ज्वा सर्पो भ्रांति-कालीन एव भ्रांतेर्नाशेनैव सर्पोऽपि तद्वत् ॥ १९९ ॥
जोपर्यंत भ्रांती असते तोपर्यंतच या अवस्तू जीवाचे (अस्य) अस्तित्व असते. कारण चुकीमुळे (प्रमादात्) ती अवस्तू जीव मिथ्या ज्ञानाने निर्माण झालेली (= भासमान होणारी) भासते. जसे - (रज्जूवर भासणारा सर्प हा भ्रांतीने भासतो. साहजिकच भ्रांतिकाळापुरताच रज्जूवर सर्प दिसतो. भ्रांतीचा नाश झाल्यावर सर्पाचे अस्तित्व संपून जाते, तद्‌वत्.


चुकीमुळे/अज्ञानामुळे/मिथ्या ज्ञानामुळे भ्रांती होऊन जी अवस्तू अथवा जीव- भाव भासतो, तो कायमचा असू शकत नाही. जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंतच ती अवस्तू अथवा जीवभाव टिकून राहतो. उदा., रज्जूवर भ्रांतीने सर्प भासला. येथे खरा सर्प उत्पन्न झालेला नाही. तो सर्प भ्रांतीमुळे आहे. साहजिकच जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंतच रज्जूवर सर्पाचे भान होते. भ्रांती संपताच सर्पही संपून जातो. याचे खरे कारण तो सर्प खराखुरा निर्माणच झालेला नाही. तद्वत् भ्रांतीने भासणारा जीवभाव हा खरा नसल्याने भ्रांती संपताच तो जीवभावही संपून जातो.


GO TOP