शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(१५१) नेहमीच्या व्यावहारिक जीवनात परमात्माचे/प्रत्यगात्म्याचे ज्ञान होत नाही याचे कारण असे आहे -

कोशैरन्नमयाद्यैः पंचभिरात्मा न संवृतो भाति ।
निज-शक्ति-समुत्पन्नैः शैवल-पटलैरिवांबु वापिस्थम् ॥ १५१ ॥
स्वतःच्या शक्तीने उत्पन्न झालेल्या शेवाळाच्या जाळ्यांनी झाकून गेलेले विहिरीतील पाणी ज्याप्रमाणे दिसून येत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या स्वतःच्या (अज्ञान/माया या) शक्तीनी उत्पन्न झालेल्या अन्नमय इत्यादी पाच कोशांनी झाकून गेलेला प्रत्यक् आत्मा हा नेहमीच्या व्यवहारात प्रचितीला येत नाही.


पाण्याच्या शक्तीने निर्माण झालेल्या शेवाळ्याच्या जाळीने पाणी झाकले जाते आणि पाणी दिसेनासे होते. त्याप्रमाणे अन्नमय इत्यादी पाच कोशांनी झाकलेला प्रत्यक् आत्मा लौकिक जीवनात प्रत्ययाला येत नाही. हे पाच कोश असे - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. या पाच कोशांची माहिती पुढे श्लोक १५६-२११ मध्ये आलेली आहे.

कोश म्हणजे आच्छादक वस्तू . हे पाचही कोश आत्म्याच्या शक्तीने निर्माण झालेले आहेत. अविद्या/माया ही ईश्वराची शक्ती आहे. ती ईश्वराच्या अधिष्ठानावर भौतिक जग दाखविते. त्या जगात देह आहेत आणि मानवी देहात हे पाच कोश आहेत.


(१५२) - (१५३) शेवाळ दूर केले की पाणी दिसू लागते. तद्‌वत् हे पाच कोश बाजूला सारले की प्रत्यगात्माची प्रचिती येते.

तच्छैवालापनये सम्यक् सलिल प्रतीयते शुद्धम् ।
तृष्णा-संताप-हरं सद्य: सौख्य-प्रदं परं पुंसः ॥ १५२ ॥
पंचानामपि कोशानामपवादे विभात्ययं शुद्ध: ।
नित्यानंदैक-रसः प्रत्यगू-रूपः पर स्वयंज्योतिः ॥ १५३ ॥
ते शेवाळ दूर केल्यावर, माणसाची तहान आणि ताप दूर करून, तत्काळ चांगले (पर) सुख देणारे ते स्वच्छ पाणी योग्य रीतीने प्रचितीला येते. त्याप्रमाणे पाच कोशांचा अपवाद/निरास केला असता, शुद्ध, नित्य, आनंद हे एकच स्वरूप असणारा, श्रेष्ठ आणि स्वयंप्रकाश ज्योती असणारा, आणि देहाचे आत स्वरूप असणारा हा प्रत्यगात्मा प्रकाशित होतो.


'तृष्णा-संताप-हरं' म्हणजे तहानेचा ताप/त्रास दूर करणारे पाणी असाही अर्थ होईल. 'नित्यानंदैक-रसः ' म्हणजे नित्य आनंद हे स्वरूप असणारा असाही अर्थ होईल. अंतरात्मा हा देहाचे आत (प्रत्यक्ष) आहे; म्हणून त्याला प्रत्यगात्मा असेही म्हणतात. देह, कोश इत्यादी अनात्म पदार्थ हे परप्रकाशी आहेत. प्रत्यगात्मा मात्र स्वयंप्रकाशी आहे. या श्लोकातील संकल्पना पुढे श्लोक २१२-२१३ मध्ये आली आहे.


(१५४) आत्मानात्म-विवेक केल्याने माणूस आनंदी होतो.

आत्मानाल्म-विवेकः कर्तव्यो बंध-मुक्तये विदुषा ।
तेनैवानंदी भवति स्वं विज्ञाय सच्चिदानंदम् ॥ १५४ ॥
संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी शहाण्या मुमुक्षूने आत्मा आणि अनात्मा यांतील फरकाचे ज्ञान करून घ्यावयास हवे. तसे केल्यानेच आपण स्वतःच (स्व) सच्चिदानंद (प्रत्यगात्मा) आहोत हे कळल्यावर तो आनंदी होतो.


देह, पंचकोश इत्यादी सर्व अनात्मा आहे आणि आत्मा/प्रत्यगात्मा हा सच्चिदानंद असून तो एकमेव सत्यतत्त्व आहे हे कळल्यावर मुमुक्षूने अनात्म्याकडे दुर्लक्ष करून आत्म्याकडे लक्ष द्यावयास हवे. तसे केल्यावर संसाराच्या बंधनातून सुटका होऊन आपण स्वतःच सच्चिदानंद प्रत्यगात्मा आहोत हे कळते. प्रत्यागात्मा आनंदरूप असल्याने सच्चिदानंदस्वरूप झालेला मुमुक्षू आनंदी होतो.


(१५५) दृश्य जगात सर्वत्र अनात्म पदार्थ भरलेले आहेत; त्यांना व्यापून आत्मा आहे. म्हणून अनात्म पदार्थातून आत्म्याला बाजूला काढून त्याचे ज्ञान करून घ्यावयास हवे.

मुंजादिषीकामिव दृश्य-वर्गात् प्रत्यंचमात्मानमसंगमक्रियम् ।
विविच्य तत्र प्रविलाप्य सर्वं तदाल्मना तिष्ठति यः स मुक्तः ॥ १५५ ॥
मुंजामधून ज्याप्रमाणे बारीक तंतू (इषीका) वेगळा काढून घेतला जातो. त्याप्रमाणे सर्व दृश्य (अनात्म) पदार्थांतून असंग आणि क्रियारहित असा अंतर्गत (प्रत्यक्) आत्मा वेगळा काढून (विविच्य), आणि मग प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी (तत्र) सर्वांचा लय करून, प्रत्यगात्म-स्वरूपात जो एकरूप होऊन राहतो, तो माणूस जीवनमुक्त होय.


मुंज नावाचे गवत आहे. त्यातून बारीक तंतू वेगळा काढून घेतला जातो (असे वचन एका उपनिषदात येते). त्याप्रमाणे अनात्म पदार्थातून आत्मा वेगळा करणे हे कौशल्याचे काम आहे. हे सर्व दृश्य अनात्म, परस्पर-संगत आणि क्रियाशील आहे. आत्मा तसा नाही. तथापि, तो सर्व दृश्याचे अधिष्ठान आहे आणि तो दृश्याखाली झाकला गेला आहे (पहा श्लोक १५१) तोच प्रत्यगात्मा आहे. या प्रत्यगात्म्याला वेगळे काढणारा प्रत्यगात्मा-रूपच होतो. कारण तो मूलतः प्रत्यगात्माच आहे. प्रत्यगात्मरूप झालेला पुरुष हा तत्काळ जीवमुक्त होतो.

'तत्र सर्वं प्रविलाप्य' या शब्दांनी अपवादाची प्रक्रिया अभिप्रेत आहे. (तपशीलासाठी प्रस्तावना पहा).


(१५६) अनात्मा असणारे पदार्थ सांगण्यास गुरू आता प्रारंभ करतो. त्यापेक्षा आत्मा भिन्न आहे हेही तो सांगतो. प्रारंभ स्थूल देहापासून होतो.

'देहोपुयमन्न-भवनोऽन्नमयस्तु कोश -
श्चानेन जीवति विनश्यति तद्-विहीनः ।
त्वक्-चर्म-मांस-रुधिरास्थि-पुरीष-राशि-
र्नायं स्वयं भवितुमर्हति नित्य-शुद्धः ॥ १५६ ॥
हा स्थूल देह अन्नापासून उत्पन्न झाला आहे. तो अन्नानेच टिकून राहतो, आणि तो अन्नाविना नष्ट होऊन जातो. म्हणून तो अन्नमय कोश आहे. हा स्थूल देह म्हणजे त्वचा, चर्म, मांस, रक्त, हाडे आणि विष्ठा यांचा ढीग आहे. म्हणून तो अशुद्ध आहे. साहजिकच तो नित्य शुद्ध असणारा असा प्रत्यगात्मा होण्यास पात्र ठरत नाही.


श्लोक १५१ मध्ये पाच कोशांचा उल्लेख होता. त्यातील अन्नमय कोश म्हणजे माणसाचा स्थूल देह आहे. तो सर्वस्वी अन्नावर अवलंबून आहे. त्यात घाणेरडे पदार्थ - हाडे इत्यादी - असल्याने तो अशुद्ध आहे. साहजिकच हा अशुद्ध स्थूल देह म्हणजेच अन्नमय कोश हा शुद्ध असणारा असा आत्मा होऊ शकत नाही.

स्थूल देह अन्नापासून होतो, यातील कल्पना अशी आहे - ज्या मातापित्यांच्या रेतः संयोगाने स्थूल देह बनतो, ते रेत त्यांनी खाल्लेल्या अन्नापासूनच बनलेले असते. म्हणून दूरान्वयाने स्थूल देह हा अन्नापासून उत्पन्न होतो असे म्हणतात.


(१५७) स्थूल देह हा दृश्य, विकारी आणि नाशवंत आहे. आत्मा तसा नही. म्हणून स्थूल देह हा प्रत्यगात्मा होऊ शकत नाही.

पूर्वं जनेरपि मृतेरपि नायमस्ति
जातः क्षणं क्षण-गुणोऽनियत-स्वभावः ।
नैको जडश्च घटवत् परिदृश्यमानः
स्वात्मा कथं भवति भाव-विकार-वेत्ता ॥ १५७ ॥
हा स्थूल देह जन्मापूर्वी नव्हता आणि तो मृत्यूनंतरही असत नाही. तो फक्त चालू क्षणी वर्तमानकाळात असतो. याचे गुणधर्म क्षणिक असल्यामुळे त्याचे स्वरूप (स्वभाव) अनिश्चित आहे. हा एकच नसणारा म्हणजे अनेक रूपे असणारा आणि अचेतन आहे. घराप्रमाणे तो दृश्य/ज्ञेय वस्तू या स्वरूपात पाहिला जातो. या स्थूल शरीराचे भावविकार जाणणारा अंतरात्मा (स्वात्मा) हा स्थूल देह कसा बरे होऊ शकेल ?


स्थूल देह हा फक्त वर्तमानकाळात असतो. आत्मा हा तीन काळांत असतो. रोग, जखमा, इत्यादींनी देहाचे स्वरूप बदलत असते; आत्म्याचे स्वरूप बदलत नाही. शरीरात हात, पाय इत्यादी अवयव आहेत म्हणजे स्वगतभेद आहेत; आत्म्यात स्वगतभेद नाहीत; तो एकस्वरूपी आहे. देह हा जड/अचेतन आहे; आत्मा चेतन आहे. देह हा घटाप्रमाणे दृश्य/ज्ञेय, ज्ञानाचा विषय आहे, तर आत्मा हा द्रष्टा /ज्ञाता आहे. (श्लोक १३५, १३७ ). देहाला जन्म, वाढ, अपक्षय इत्यादी भावविकार असतात, ते जाणणारा आत्मा आहे. अशाप्रकारे स्थूल देह आणि आत्मा यांमध्ये फरक असल्याने स्थूल देह म्हणजे आत्मा असे म्हणता येत नाही.


(१५८) स्थूल देह हा नियम्य आहे; आत्मा हा नियामक आहे.

पाणि-पादादिमान् देहो नात्मा व्यंगेऽपि जीवनात् ।
तत्तच्छक्तेरनाशाच्च न नियम्यो नियामकः ॥ १५८ ॥
हात, पाय, (इत्यादी अवयव/भेद) असणारा स्थूल देह हा आत्मा नाही. देहाचा एखादा अवयव अथवा अंग हे नष्ट/निरुपयोगी झाले तरी आत्मा हा अखंडपणे असतोच (जीवनात्). देहाच्या त्या त्या अवयवांना शक्ती पुरवणाऱ्या त्या त्या शक्तीचा नाश होत नाही. देह हा नियम्य आहे, या उलट आत्मा हा नियम्य नसून नियामक आहे.


स्थूल शरीराला हात, पाय, इत्यादी अवयव आहेत, आत्मा निरवयव अखंड आहे. शरीराचा एखादा अवयव नष्ट/निकामी झाला तरी आत्मा निकामी होत नाही; तो आहे तसाच सच्चिदानंद राहतो (श्लोक १५४). जोपर्यंत देहाचे आत आत्मा असतो, तोपर्यंत देह आणि त्याचे अवयव कार्य करीत असतात; तसे करण्याची शक्ती त्यांना आत्माच पुरवीत असतो. देहाच्या अवयवाची शक्ती नष्ट झाली तरी आत्म्याची शक्ती नष्ट होत नाही. आत्म्याच्या अधिष्ठानामुळेच देह व त्याचे अवयव काम करीत असतात. म्हणून देह हा नियम्य म्हणजे नियमन केला जाणारा आहे; आत्मा तसा नियम्य नाही, उलट तो देहाचे नियमन करणारा आहे.


(१५९) देहाचे गुण इत्यादी सर्व बाबतीत प्रत्यगात्मा हा साक्षी आहे.

देह-तद्‌धर्म-तत्कर्म-सदवस्थादि-साक्षिणः ।
स्वत एन स्वतः सिद्ध तद् वैलक्षण्यमात्मनः ॥ १५९ ॥
देह, त्याचे गुणधर्म, त्याची कर्मे, त्याच्या अवस्था इत्यादींचा साक्षी असणाऱ्या आत्म्याचे त्या देहापासूनचे वेगळेपण हे स्वतःच स्वतःसिद्ध आहे.


देह हा दृश्य आहे (श्लोक १५७). गोरेपणा, उंची, जाडी, इत्यादी त्याचे गुणधर्म. हलणे, पडणे, बघणे इत्यादी देहाच्या क्रिया. बालपण, तरुणपण इत्यादी देहाच्या अवस्था इत्यादी सर्वांचा साक्षी/द्रष्टा आत्मा आहे. दृश्यापेक्षा द्रष्टा वेगळा असतो. दृश्य व द्रष्टा हे कधीही एक असत नाहीत. म्हणून स्थूल देहापेक्षा आत्मा निराळा आहे ही गोष्ट स्वतः सिद्धच आहे.

याचाच अनुवाद पुढील श्लोकात आहे.


(१६०)

कुल्य-राशिर्मांस-लिप्तो मलपूर्णोऽतिकश्मलः ।
कथं भवेदयं वेत्ता स्वयमेतद्-विलक्षणः ॥ १६० ॥
हाडांचा (कुल्य) समूह, मांसाने लडबडलेला, घाणीने भरलेला आणि अतिशय घाणेरडा असा हा स्थूल देह हा या सर्वांपेक्षा वेगळा असणारा असा ज्ञाता आत्मा कसा बरे होईल ?


स्थूल देह हा गलिच्छ वस्तूंनी युक्त आहे. आत्मा तसा नाही. स्थूल देह हा दृश्य/ज्ञेय आहे (श्लोक १५७); त्याचा ज्ञाता आत्मा आहे. दृश्य व द्रष्टा हे वेगळे असल्याने, दृश्य/ज्ञेय असणारा स्थूल देह हा द्रष्टा/ज्ञाता आत्मा होऊ शकत नाही.


(१६१) मूढ माणसे देहाला आत्मा मानतात. शहाणी माणसे तसे करीत नाहीत.

त्वङ्-मांस-मेदोऽस्थि-पुरीष-राशावहंमतिं मूढ-जनः करोति ।
विलक्षणं वेत्ति विचार-शीलो निज-स्वरूपं परमार्थ-भूतम् ॥ १६१ ॥
त्वचा, मांस, मेद, हाडे आणि विष्ठा यांच्या देहरूपी ढिगाला मूर्ख माणसे 'मी' (आत्मा) असे मानतात. पण विचार करण्याचा स्वभाव असणारा माणूस हा देहापेक्षा वेगळे असणारे, सत्य असणारे परमार्थभूत असे आपले आत्मस्वरूप जाणून घेतो.


'मी' शब्दाने अंतरात्मा सूचित होतो. तो सच्चिदानद आहे. गलिच्छ देहाला आत्मा मानणे हे मूर्खपणाचे आहे. विचारी माणूस तसे करीत नाही. देहापेक्षा वेगळे असणारे स्वतःचे आत्मस्वरूप तो जाणतो.


(१६२) अंतरात्मा म्हणजेच ब्रह्म 'मी' आहे हे विवेकी पुरुषाला कळते.

देहोऽहमित्येव जडस्य बुद्धिर्देहेच जीवे विदुषस्त्वहंधीः ।
विवेक-विज्ञानवतो महात्मनो ब्रह्माहमित्येव मतिः सदात्मनि ॥ १६२ ॥
'देह म्हणजे मी' अशी देहाच्या ठिकाणी बुद्धी अडाणी माणसाची असते. 'जीव म्हणजे मी' अशी जीवाच्या ठिकाणी बुद्धी शहाण्या माणसाची असते. परंतु ज्याला आत्मा आणि अनात्मा यांतील फरकाचे ज्ञान झाले आहे, त्या महात्म्या माणसाची स्वतःचे बाबतीत (आत्मनि) 'ब्रह्म मी आहे' अशी बुद्धी सतत असते.


अडाणी माणसे देहाला 'मी' म्हणजे आत्मा समजतात. त्यांच्यापेक्षा जरा शहाणी असणारी माणसे ही जीवाला आत्मा मानतात. ही दोन्हीही मते चूक आहेत. देह तसेच जीव म्हणजे अंतरात्मा नव्हे. जीव हे प्रत्यगात्म्याचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब आहे (श्लोक २२०, २२२ ). प्रतिबिंब म्हणजे बिंब नव्हे. म्हणून जीव म्हणजे प्रत्यगात्मा नव्हे. 'मी' म्हणजे प्रत्यगात्मा आहे. प्रत्यगात्मा हा ब्रह्मच आहे. म्हणून मी म्हणजे ब्रह्म आहे. आत्मा आणि अनात्मा यांतील भेद जाणणाऱ्या विवेकी पुरुषाला कळते की प्रत्यगात्मस्वरूप मी म्हणजे ब्रह्म आहे. अहं ब्रह्म अस्मि'असे उपनिषदेही सांगतात. म्हणून गुरू शिष्याला सांगतो -


(१६३)

अत्रात्म-बुद्धि त्यज मूढबुद्धे त्वङ्-मास-मेदोऽस्थि-पुरीष-राशौ ।
सर्वात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे कुलच शांतिं परमां भजस्व ॥ १६३ ॥
मन मूढ झालेल्या हे शिष्या, यावरील (अत्र) म्हणजे त्वचा, मांस, मेद, हाडे आणि विष्ठा यांचा केवळ ढीग असणाऱ्या अनात्म देहावरची आत्मबुद्धी सोडून दे. सर्वांचा आत्मा असणाऱ्या अशा निर्विकल्प ब्रह्माचे ठिकाणी (मी ब्रह्म आहे अशी बुद्धी) ठेव, आणि मग सर्वोच्च शांती प्राप्त करून घे.


घाणीने भरलेला स्थूल देह हा आत्मा आहे हा चुकीचा विचार सोडून देऊन, 'मी ब्रह्म आहे' हा विचार घट्ट धरावयास हवा. ब्रह्म हे अंतिम तत्त्व हे अंतर्यामी या स्वरूपात सर्वांचा आत्मा आहे आणि ते निर्विकल्प आहे. अंतरात्मरूपी मी ब्रह्मच आहे ही बुद्धी स्थिर झाली की ब्रह्माचे ठिकाणी असणारी परमोच्च शांती माणसाला प्राप्त होते.


(१६४) अनात्म्याला आत्मा मानण्याची वृत्ती असेपर्यंत मुक्ती मिळत नाही.

देहेंद्रियादावसति भ्रमोदितां विद्वानहंतां न जहाति यावत् ।
तावन्न तस्यास्ति विमुक्ति-वार्ताप्यस्त्वेष वेदांत-नयांतदर्शी ॥ १६४ ॥
देह, इंद्रिये इत्यादी (अनात्म आणि) असत्/मिथ्या पदार्थांवर भ्रमाने निर्माण झालेली 'अहं' (= आत्म) बुद्धी शहाणा माणूस जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत मोक्षाची वार्तासुद्धा नाही - मग तो माणूस वरवर वेदांत शास्त्राच्या सिद्धांतांत (नय) पारंगत असेना का ?


देह-बुद्धी संपून आत्मबुद्धी प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष नाही. समजा, एक माणूस केवलाद्वैत वेदांताचे - 'ब्रह्म सत्य आहे', 'मी ब्रह्म आहे', इत्यादी - सिद्धांत जाणतो. पण ते त्याचे ज्ञान केवळ शाब्दिक असेल तर ते निरुपयोगी आहे. भ्रमाने माणूस देह इत्यादींना आत्मा मानतो. ते संपून 'मी अंतरात्मा/ब्रह्म आहे', हे अनुभवजन्य ज्ञान होईपर्यंत तो मुक्त होत नाही.


(१६५) देहात्मबुद्धी कशी नको ते उदाहरण देऊन सांगितले आहे.

छाया - शरीरे प्रतिबिंब - गात्रे यत् स्वप्न-देहे हृदि कल्पितांगे ।
यथात्मबुद्धिस्तव नास्ति काचित् जीवच्छरीरे च तथैव मास्तु ॥ १६५ ॥
अरे शिष्या शरीराच्या छायेवर, प्रतिबिंबित शरीरावर, अथवा मनाने ज्या ज्या अवयवांची कल्पना केली आहे (कल्पितांगे) अशा स्वप्नातील शरीरावर ज्याप्रमाणे तुझी आत्मबुद्धी नसते, त्याप्रमाणे जिवंत शरीरावरही तुझी आत्मबुद्धी असू दे नको.


शरीराची सावली, पाणी इत्यादीमध्ये पडलेले शरीराचे प्रतिबिंब, अथवा स्वप्नात कल्पिलेले शरीर म्हणजे मी = आत्मा असे कुणालाही वाटत नाही. त्याप्रमाणे जागृती अवस्थेत हालचाल करणारे जिवंत शरीर म्हणजे मीआत्मा आहे अशी बुद्धी होता कामा नये.


(१६६) देह म्हणजे आत्मा ही बुद्धीच माणसाच्या जन्म इत्यादी दुःखाचे कारण आहे.

देहात्मधीरेव नृणामसद्‌धियां जन्मादि-दुःख-प्रभवस्य बीजम् ।
यतस्ततस्त्वं जहि ता प्रयत्‍नात् त्यक्ते तु चित्ते न पुनर्भवाशा ॥ १६६ ॥
ज्याअर्थी असत्/चुकीच्या/मिथ्या गोष्टी (खऱ्या) अशी ज्या माणसांची बुद्धी असते, त्यांच्या बाबतीत देह म्हणजे आत्मा ही बुद्धीच जन्म इत्यादी दुःखांच्या उगमाचे कारण (बीज) आहे, म्हणून (हे शिष्या) तू प्रयत्‍नपूर्वक ती देहात्मबुद्धी टाकून दे. देहबुद्धी ही मनातून काढून टाकली असता (त्यक्ते चित्ते) पुनः जन्माला येण्याची आशा (= संभव) उरत नाही.


देह म्हणजे मी = आत्मा असे मानून माणूस आसक्ती आणि अहंकार यांचे योगे बरीवाईट कर्मे करतो आणि त्या कर्मामुळे त्याला पुनर्जन्म येतो आणि मग त्याला जन्म, जरा इत्यादींची दुःखे भोगावी लागतात. म्हणून पुनर्जन्म, दुःख इत्यादी टाळण्यास देहात्मबुद्धी टाकावयास हवी. मनाने देहात्मबुद्धी टाकली की मग माणसाला पुनर्जन्म येत नाही.


(१६७) श्लोक १५६- १६६ पर्यंत अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह हे सांगून झाले. आता श्लोक १६७- १६८ मध्ये प्राणमय कोशाचे वर्णन आहे.

कर्मेंद्रियैः पंचभिरंचितोऽयं प्राणो भवेत् प्राणमयस्तु कोशः ।
येनात्मवानन्नमयोऽन्नपूर्णः प्रवर्ततेऽसौ सकल-क्रियासु ॥ १६७ ॥
पाच कर्मेन्द्रियांनी सहित (अंचित) असा (शरीरातील पंचविध) प्राण हा प्राणमय कोश आहे आणि त्याने युक्त झालेला (आत्मवान्), अन्नाने भरलेला हा अन्नमय (कोश) सर्व क्रिया करण्यास प्रवृत्त होतो.


स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे. त्याचे घटकात पाच प्राण तसेच पाच कर्मेंद्रिये येतात (श्लोक ९८). जड पाच महाभूतांनी बनलेला अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह हा मूलतः जड/अचेतन आहे. त्याला क्रियाप्रवण करणारा प्राणमय कोश आहे. पाच कर्मेंद्रिये आणि पाच प्राण यांच्या समूहाला प्राणमय कोश म्हणतात. या समूहात प्राण हा मुख्य असल्याने त्याला प्राणमय कोश ही संज्ञा दिली जाते. प्राणांच्या प्रेरणेने कर्मेंद्रियांच्या साहाय्याने स्थूल देहाचे कार्य चालते.

श्लोकातील 'आत्मवान्' म्हणजे 'युक्त असलेला' असा अर्थ भाषांतरात घेतला आहे. त्याचा अर्थ 'आत्म्याने युक्त' असाही घेता येईल. तसा घेतल्यास शरीरात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच त्या आत्म्याने युक्त असणारा प्राणमय कोश असा अर्थ होईल. असा प्राणमय कोशच स्थूल शरीराला क्रियेला प्रवृत्त करू शकतो. प्राणमय कोशाचे कार्य आत्म्यावरच अवलंबून असल्यामुळे त्याला पुढील श्लोक १६८ मध्ये 'परतंत्र 'असे म्हटले आहे.


(१६८)

नैवात्मापि प्राणमयो वायु-विकारो
गंतागंता वायुवदतर्बहिरेषः ।
यस्मात् किंचित- क्वापि न वेत्तीष्टमनिष्टं
स्वं वान्यंवा किंचन नित्य परतंत्रः ॥ १६८ ॥
प्राणमय कोश हासुद्धा आत्मा नाही. (कारण) तो केवळ वायूचा विकार/प्रकार आहे. वायूप्रमाणे तो शरीराचे आत-बाहेर येतो आणि जातो. इष्ट किंवा अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टींना अथवा स्वतःला किंवा अन्य कुणालाही तो कोठेही आणि केव्हाही जरासुद्धा जाणत नाही; तसेच तो सदा परावलंबी आहे.


अचेतन पंचमहाभूतांच्या विशिष्ट मिश्रणाने बनलेला स्थूल देह अचेतन आहे. साहजिकच त्याला स्वतःला कसलेही ज्ञान होत नाही. अचेतन स्थूल शरीराला चालवणारा प्राण पाच प्रकारांनी शरीरात कार्यरत असतो. पण प्राणही अचेतन आहे. कारण तो अचेतन वायू या भूताचा एक विशिष्ट प्रकार अथवा विकार आहे. वारा जसा इकडे तिकडे जात असतो. त्याप्रमाणे प्राणरूपी वायू शरीराच्या आत बाहेर येत जात असतो. तसेच प्राण हा अचेतन असल्याने तो इष्ट आणि अनिष्ट गोष्टी जाणू शकत नाही. तो स्वतःलाही जाणत नाही तसेच अन्य कुणालाही तो जाणीत नाही. आणखी असे - जोपर्यंत अंतरात्मा शरीरात आहे तोपर्यंतच प्राण शरीरात आपले कार्य करतो. अंतरात्मा शरीरातून गेला की प्राणाचे कार्य बंद पडते म्हणजे प्राण हा परतंत्र अंतरात्म्यावर अवलंबून असणारा आहे.


(१६९) आता मनोमय कोशाचे वर्णन श्लोक १६९-१८५ मध्ये दिलेले आहे.

ज्ञानेंद्रियाणि च मनश्च मनोमयः स्यात्-
कोशो ममाहमिति वस्तु-विकल्प-हेतुः ।
संज्ञादि-भेद-कलनाकलितो बलीयां -
स्तत्पूर्वकोशमभिपूर्य विजृंभते यः ॥ १६९ ॥
पाच ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय कोश होतो. कोणत्याही वस्तू विषयी (ती वस्तू म्हणजे) मी अथवा ती वस्तू माझी, अशा विकल्पाचे कारण तो आहे. नाव संज्ञा (रूप) इत्यादी भेदांच्या ज्ञानावरून तो कळून येणारा आहे. तो बलवान् आहे. तो पूर्वीच्या (अन्नमय व प्राणमय) कोशांच्या पूर्वीचा आहे. तो सतत वाढत असतो.


पाच बाह्य विषयांचे ज्ञान करून देतात ती ज्ञानेंद्रिये. ही ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय कोश होतो. यामध्ये मन हे मुख्य असल्याने या कोशाला मनोमय असे नाव दिलेले आहे. मन हे संकल्प-विकल्प करते. साहजिकच मी - मला - माझे, अशी वृत्ती मनात उत्पन्न होते. मी असा, दुसरा तसा , हे माझे , ते दुसऱ्याचे, इत्यादी विचार मनात येतात. म्हणून एखादी वस्तू म्हणजे मी, अमुक वस्तू माझी या संकल्पांचे कारण मन आहे, असे येथे म्हटले आहे. येथे मनाच्यामार्फत अहंकार हा 'मी-माझे' करतो असे मानावयास हवे. कारण 'मी-माझे' हे अहंकाराचे कार्य आहे.

इंद्रियांच्याद्वारा वस्तूंचे ज्ञान होताना त्यांचे नाव, रंगरूप, आकार इत्यादी मनाला कळतात आणि या ज्ञानावरूनच मनाच्या अस्तित्वाचे आकलन होते. येथे हे लक्षात घ्यावे - ज्ञानेंद्रिये जरी विषयांच्या संपर्कात येतात तरी त्यावेळी तेथे मन नसेल तर त्या त्या वस्तूचे निश्चित ज्ञान होतच नाही, असा आपला अनुभव असतो. म्हणून वस्तूचे नाव, रूप इत्यादींच्या ज्ञानावरून मनाचे अस्तित्व कळून येते असे येथे म्हटले आहे.

'पूर्वकोशमभिपूर्य' अथवा 'पूर्वकोशमनुपूर्य' असे पाठभेद आहेत. त्यानुसार पूर्वीच्या कोशात मन व्याप्त असते असा याचा अर्थ काहीजण करतात. येथे पूर्वकोश म्हणजे अन्नमय आणि प्राणमय कोश हे होत. आणि मग स्थूल देहाची सर्व कार्ये मनावर अवलंबून असतात, मनाच्या संकल्प विकल्पानुसार कर्मेंद्रिये कार्य करतात, प्राणाच्या कार्यावर मनाचा प्रभाव असतो, असा खुलासा दिला जातो. पण हा खुलासा तितकासा योग्य नाही. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचे बहुतांश कार्य मनामुळे होते हे मान्य करता येईल. पण देहाच्या विक्षिप्त क्रिया मनावर अवलंबून नसतात. उदा., विस्तवाने हात भाजताच हात चट्‌दिशी मागे घेतला जातो. प्राणायाम प्रक्रियेत काही प्रमाणात प्राण व अपान यांचेवर मनाचे नियंत्रण असते. पण अन्य तीन प्राणांवर मनाचे नियंत्रण असत नाही. म्हणून अन्नमय व प्राणमय या पूर्वीच्या दोन कोशांच्या अगोदर मनोमय कोश असतो, असा अर्थ करणे योग्य वाटते. कारण सूक्ष्म शरीरात विज्ञानमय, मनोमय, प्राणमय आणि अन्नमय कोश असा क्रम आहे.


(१७०)

पंचेंद्रियैः- पंचभिरेव होतृभिः प्रचीयमानो विषयाज्य-धारया ।
जाज्ज्वल्यमानो बहुवासनेंधनैर्मनोमयाग्निर्वहति प्रपंचम् ॥ १७० ॥
पाच इंद्रियरूपी होत्यांच्याद्वारा विषयरूपी तुपाच्या धारांनी वाढत जाणारा आणि अनेक वासनारूपी इंधनांनी (समिधानी) भडकलेला असा हा मनोमयकोश रूपी अग्नी प्रपंच वाहून नेतो.


येथे मनोमयकोशावर यज्ञीय अग्नीचे रूपक केले आहे. पूर्वकाळी यज्ञ केले जात. यज्ञामध्ये "होतृ" नावाचे पुरोहित असत. समिधांनी पेटलेल्या अग्नीमध्ये तुपाच्या आहुती देणे हे त्यांचे काम असे. येथे मनोमय कोश हा अग्नी, वासना या समिधा, विषयरूपी तूप यांच्याद्वारा पेटलेला अग्नी प्रपंचरूपी तूप जाळून टाकतो. या रूपकाचा अर्थ असा - वासनारूपी इंधनांनी मनोमय कोश हा अग्नी पेटतो. त्यांत विषयरूपी तूप घातले जाते. ते काम इंद्रियरूपी 'होते' करतात. यज्ञीय अग्नी हा आपल्यात पडेल ते सर्व जाळतो; त्याप्रमाणे मनोमय कोशरूपी अग्नी संसाराला पेटता ठेवतो. याचा अर्थ असा - पाच ज्ञानेंद्रिये मनाप्रत बाह्य विषयांच्या संवेदना पोचवतात. या संवेदनांनी निर्माण झालेल्या वासनांनी अग्नी पेटता राहतो. मग मनरूपी अग्नी संसाराला वाहून नेण्याचे म्हणजे वाढविण्याचे कार्य करतो.

मनोमय कोशात मुख्य असणारे मन सर्व प्रपंचाचा भार वाहते. हे वाक्य तीन अर्थांनी घेता येते - (१) सर्व लौकिक व्यवहार मनच इंद्रियांच्याद्वारा करीत असते. (२) मनामुळे प्रपंचाचे म्हणजे जन्म-मरणाचे चक्र चालू राहते. मनाच्या प्रेरणेनुसार आसक्ती आणि अहंकारपूर्वक कर्मेंद्रिये ही बरीवाईट कर्मे करतात आणि त्यांची फळे भोगण्यास जन्ममरणाच्या कचाट्यात जीव सापडतो. अशाप्रकारे जन्ममरणाला मन हेच मुख्यतः जबाबदार आहे. (३) यज्ञ संपेपर्यंत अग्नी पेटता ठेवला जात असे. त्याप्रमाणे वर्तमान जीवन संपेपर्यंत मन व्यवहारिक प्रपंच वाहत - चालवीत - असते, तडीला नेत असते.

येथे 'वहति' ऐवजी 'दहति' असा पाठभेद आहे. तो घेतल्यास मनोमय कोश 'प्रपंचं दहति' म्हणजे 'प्रपंच दहति' म्हणजे प्रपंच पेटता ठेवतो, चालू ठेवतो.


(१७१) मन म्हणजेच अविद्या आहे -

न ह्यस्तविद्या मनसोऽतिरिक्ता मनो ह्यविद्या भव-बंध-हेतुः ।
तस्मिन् विनष्टे सकलं विनष्टं विजृंभितेऽस्मिन सकलं विजृंभते ॥ १७१ ॥
मनापेक्षा वेगळी अशी अविद्या नाहीच. मन हीच अविद्या संसारबंधाचे कारण आहे. ते मन नष्ट झाले असता, सर्व काही लयाला जाते, आणि ते वाढले असता सर्व काही वाढते.


येथे मनालाच अविद्या म्हटले आहे; पण ते गौण अर्थाने आहे. प्रस्तावनेत पाहिल्याप्रमाणे, अविद्येची/अज्ञानाची उपाधी ब्रह्माला आली की विश्व भासू लागते, त्या विश्वात सूक्ष्म देह निर्माण होतो, त्यात मन असते. या मनाच्या प्रभावामुळेच माणसाचे जन्ममरण चालू राहते (श्लोक १७० ). म्हणून मनाला गौणपणाने अविद्या म्हणता येते. किंवा असेही म्हणता येईल :- अविद्या हे कारण आहे, आणि मन हे कार्य आहे. कार्यकारणाचे अनन्यत्व केवलाद्वैत वेदांत मानतो. त्याला अनुसरून मन म्हणजे अविद्या असे म्हणता येते.

या मनाचे कार्य वाढत गेले तर माणसाचा सर्व पसारा वाढत जातो. मनाला इंद्रियांमार्फत विषयांचे ज्ञान होते, आणि वासनांनी, अभिलाषेने मन विषयांमध्ये आसक्त होते. विषयांचे अधिष्ठान असणारे ब्रह्म हे इंद्रिये आणि मन यांना कळत नाही. या अज्ञानाने मन हे विषयांना मुख्य मानून त्यांतच रंगून जाते. ते इंद्रियामार्फत कामे करविते आणि कर्माअंती जन्ममरणरूप संसार येतो. म्हणजे मनच संसाराचे कारण बनते इतकेच नव्हे तर संसाराचा पसारा वृद्धिंगत करण्याचे कार्यही मनच करते. पण हेच मन विषयांत अनासक्त झाले, विषयांच्या संकल्प-विकल्पांनी रहित झाले, तर ते मन मन म्हणून राहत नाही; ते नष्ट झाल्यातच जमा होते. या स्थितीला 'अमनी' अथवा 'उन्मनी' असे म्हणतात. उन्मनी स्थितीत ब्रह्मच असते; त्यावेळी सर्व प्रपंचाचा लय झालेला असतो. संक्षेपाने सांगायचे झाल्यास - मन आहे तोवर सर्व विश्व आहे, संसार आहे. मन लयाला जाताच संसारही लयाला जातो; कारण 'अमनी' अवस्थेत मन ब्रह्मरूप होऊन गेलेले असते. अशाप्रकारे मन हे महत्त्वाचे आहे. म्हणून एक उपनिषद सांगते - मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः । बंधाय विषयासक्त मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥


(१७२) मन हे माणसांच्या जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांत कार्यप्रवण होते.

स्वप्तेऽथ धन्ये सृजति स्वशक्त्या भोक्त्रादि विश्वं मन एव सर्वम् ।
तथैव जाग्रत्यपि नो विशेषस्तत् सर्वमेतत् मनसो विजृभणम् ॥ १७२ ॥
तसे पाहिल्यास (अथ) काही नसताना (शून्ये) स्वप्नात मनच स्वतःच्या शक्तीने भोक्ता, भोग्य इत्यादी सर्व विश्व - पसारा उत्पन्न करते. त्याचप्रमाणे जागृतावस्थेतही ते (सर्व विश्व) निर्माण करते. (मन - उत्पादित स्थिती या दृष्टीने त्या दोन अवस्थांत) काही फरक (विशेष) नाही. म्हणून (तत) हे सर्व (विश्व) हे मनाचे कार्य/विस्तार (विजृंभण) आहे.


स्वप्न हे मनाचे कार्य आहे; भोक्ता, भोग्य इत्यादींनी युक्त असणारी स्वप्नसृष्टी म्हणजे स्वप्नातील विश्व हे मनाने निर्माण केलेले असते. जागृतीत झालेल्या संस्कारांनी/वासनांनी मन हे स्वप्न जगात आपणास पाहिजे ते निर्माण करते.

'जागृत अवस्थेत मन हे विश्व निर्माण करते, या वचनाला बौद्धांच्या विज्ञानवादाचा वास येतो. विज्ञानवादाप्रमाणे मनातील ज्ञान हेच बाहेर विषयरूपाने भासते. असा विज्ञानवाद येथे शंकराचार्यांना सांगावयाचा आहे काय ? येथे हे लक्षात घ्यावे की, ब्रह्मसूत्रावरील भाष्यात शंकराचार्यांनी विज्ञानवादाचे खंडन केले आहे. मग येथे अर्थ कसा करावयाचा ? तो असा - शंकराचार्यांच्या मते, अविद्येच्या शक्तीपासून विश्वाचा अध्यास होतो. आता अविद्या म्हणजे अज्ञान असे वर श्लोक १७१ मध्ये गौणपणे म्हटले आहे. अथवा कार्यकारणाच्या अनन्यत्वाला अनुसरून मन म्हणजे अविद्या असे म्हटले आहे. मग अविद्याजन्य विश्व म्हणजेच मनोजन्य विश्व असा अर्थ होईल. याच अर्थाने शंकराचार्यांनी असे विधान केलेले दिसते. कारण जागृतीतील विश्व हे मनोनिर्मित आहे, हे मत शंकराचार्यांना मान्य आहे का, हा प्रश्नच आहे.

येथे 'स्वप्नेऽ थ शून्ये' याचे ऐवजी 'स्वप्नेऽ र्थशून्ये' असा पाठ आहे. म्हणजे अर्थरहित म्हणजे विषयरहित म्हणजे पदार्थरहित (स्वप्नामध्ये) असा अर्थ होतो. हा पाठ अधिक स्पष्टपणे स्वप्नाला लागू पडतो.


(१७३) मनाचा लय झाल्यावर सर्व लयाला जाते. (श्लोक १७१) या विधानाचा अधिक खुलासा पुढील श्लोकात आहे.

सुषुप्ति-काले मनसि प्रलीने नैवास्ति किंचित् सकल-प्रसिद्धेः ।
अतो मनः कल्पित एव पुंसः संसार एतस्य न वस्तुतोऽस्ति ॥ १७३ ॥
सुषुप्तीच्या काळात मनाचा संपूर्ण लय झाला असता, (विश्व इत्यादी) काहीही (जाणिवेत) येत नाही, ही गोष्ट सर्वांच्या प्रतीतीला येते, हे प्रसिद्ध आहे. म्हणूनच या (एतस्थ) माणसाचा संसार हा मनाने कल्पिलेला आहे, तो वस्तुतः नाही.


जागृति-अवस्थेत मन कार्यशील असते. स्वप्न-अवस्थेत मन नवीन सृष्टी उत्पन्न करते (श्लोक १७२ ). निद्रावस्थेत मन निष्किय असते; तेथे त्याचे संकल्पविकल्प नसतात. साहजिकच निद्रेमध्ये जागृती आणि स्वप्न या अवस्थांतील काहीही नसते, पण ते त्या झोपी गेलेल्या माणसापुरते. त्यावेळी इतरांच्या दृष्टीने विश्व काही नष्ट होऊन जात नाही. निद्रावस्थेतील माणसाचे मन कार्यप्रवण नसल्याने तेथे विश्वाचे ज्ञान होत नाही.

'माणसाचा संसार हा मनाने कल्पिलेला आहे', या वाक्याचा नीट अर्थ समजून घ्यावयास हवा. शंकराचार्यांच्या दृष्टीने व्यवहारदृष्ट्या विश्व आहे. ते अज्ञान- कल्पित आहे. आता अज्ञान म्हणजेच मन असल्याने (श्लोक १७१) विश्व हे मनःकल्पित आहे हे गौण अर्थाने म्हणता येते. आणखी असे - संसार/विश्व हे अज्ञानामुळे ब्रह्मावर अध्यस्त आहे; ते मिथ्या आहे. ब्रह्म या अधिष्ठानाप्रमाणे ते टिकून राहणारे नसल्याने ते वस्तुतः/तत्त्वतः नाही, असा अर्थ आहे.


(१७४) मनामुळेच माणसाला बंध आणि मोक्ष आहेत.

वायुनानीयते मेघः पुनस्तेनैव नीयते ।
मनसा कल्पते बंधो मोक्षस्तेनैव कल्पते ॥ १७४ ॥
वायूने मेघ एकत्र आणले जातात (आनीयते) आणि वायूनेच ते दूर नेले जातात (नीयते ). (त्याप्रमाणेच) बंध हा मनाने कल्पिलेला आहे आणि मोक्षही त्यानेच कल्पिलेला आहे.


परमार्थदृष्ट्या बंध आणि मोक्ष हे कल्पित आहेत. पण व्यवहारदृष्ट्या मनामुळे बंध आणि मोक्ष आहेत. बाह्य विषयात आसक्त असणारे मन बंधाप्रत नेते, बंधात पाडते; याउलट निर्विषय झालेले मन मोक्षाप्रत नेते. म्हणून एक उपनिषद सांगते - मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः । बंधाय विषयासक्त मुक्त्यै निर्विषय मृतम् ॥ हीच गोष्ट पुढील श्लोकात सांगितली आहे.


(१७५)

देहादि-सर्व-विषये परिकल्प रागं
बघ्याति तेन पुरुष पशुवद् गुणेन ।
वैरस्थमत्र विषवत् सुविधाय पश्चा-
देवं विमोचयति तन्मन एव बंधात् ॥ १७५ ॥
एखादा पशू ज्याप्रमाणे (माणसाकडून) दाव्याने/दोरीने (गुणेन) बांधून टाकला जातो, त्याप्रमाणे देह इत्यादी विषयांच्या ठिकाणी प्रेम/आसक्ती निर्माण करून मन हे पुरुषाला (संसारात) बद्ध करते. नंतर विषय हे विषाप्रमाणे आहेत असा विषयांच्या बाबतीत निश्चय झाल्यावर आणि त्यांच्या बाबतीत नावड/वैराग्य/अनासक्ती निर्माण करून ते मन माणसाला बंधातून सोडविते.


जोपर्यंत मनामध्ये विषयांची आसक्ती आहे तोपर्यंत ते मन माणसाला कर्मांच्या बंधात पाडते; परंतु ही आसक्ती संपली की तेच मन माणसाला बंधनातून सोडविते.

येथे 'गुणेन 'शब्दावर श्लेष आहे. पशूच्या बाबतीत गुण म्हणजे दोरी/दावे, तर माणसाच्या बाबतीत सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण; हे गुण अविद्येचे आहेत. हे गुण माणसाला बंधनात पाडतात असे भगवद्‌गीता सांगते (१४. १५-१९ ). या तीन गुणांच्यामार्फत मन माणसाला बंधनात पाडत असते.


GO TOP