ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसुः ॥१६॥


१४१. भ्राजिष्णु
भ्राजिष्णु म्हणजे भास्कर, तळपणारा. परमात्मा हा आपल्या प्रचंड तेजाने तळपतो आहे. परमात्याचें हें तेज प्रचंड का आणि तळपतें कां म्हणावयाचें ? जगांतील यच्चयावत् तेजें ही परभृत आहेत, परप्रकाशित आहेत. परमात्म्याचे तेज हेच एकमेव स्वयंभू आहे. ' यत्आदित्यगतं तेजो जगद् भासयतेऽखिलम् | यत्चन्द्रमसि यत्चाग्नौ तत् तेजो विद्धिमामकम् ॥ ' गीता १५ - १२ इतर तेजे आंशिक आहेत आणि क्षयिष्णु आहेत. परमात्मतेज हें समग्र आणि शाश्वत आहे. " ज्योतिषां रविरंशुमान् " गीता १० - २१ म्हणून म्हटले आहे. पण असा तो सहस्ररश्मि सूर्य त्या तेजाच्या नखाची बरोबरी करूं पाकत नाही.

दिवि सूर्य-सहस्रास्य भवेद् युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः ॥ गीता ११ - १२

सूर्यादि तेजें कल्पान्ती लोपतात, कल्पारंभी उत्पन्न होतात. अर्थात् ती शाश्वत नाहीत.
’ सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्व अकल्पयत् ’
' इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहमव्ययम् '

परमात्मतेज हें
' ज्योतिषां अपि तत्ज्योतिस्तमस: परमुच्यते ”
’ ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ॥ ’ गीता १३ - १७ असें आहे.

परिव्राट्‌ योगानें सूर्यमंडलाचा भेद करून याच स्वयंभू शाश्वत सर्वव्यापी आणि म्हणून सर्वातिशायी तेजाला पोचत असतो. ह्याच तेजाचे ध्यान गायत्रींत केलें आहे.

१४२. भोजन
परमेश्वर भोक्ता आहे हे सहज समजू शकते. पण तो भोजन कसा ? तो ज्या अर्थी ज्ञेय आहे, त्या अर्थी सर्व जीवांचा तो भोज्यआहे, भोजन आहे. ज्ञेयाचे तत्त्वत: ज्ञान हेच खरें भोजन होय जेणे करून माणसाची क्षुधातृषा हरते आणि माणसाचा चिरंतन योगक्षेम चालतो. भगवान् जेव्हां म्हणतात "योग-क्षेमं वहाम्यहम् " तेव्हां तो हा योग-क्षेम अभिप्रेत असतो. "यत्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत्ज्ञातव्यं अवशिष्यते."-गीता ७.२ "पीयूषं अमृतं पीत्वा पातव्यं नावशिष्यते" भाग. ११ तसे हे भोजन आहे. आणि असे हे भोजन एक परमेश्वरच होऊ शकतो. "येनाहं नामृता स्यां किमहं तेन कुर्याम्' बृ. २.४.३ तसे विषय-भोग हें भोजन नसून तें विष-पान होय, असें संत सांगतात. भोजन जर कोणतें असेल तर तें "ज्ञानामृत-भोजन"च होय, ज्या योगें "क्षुधातृषा हरे, निजभाव जेणें तरे । "

व्यावहारिक अर्थानं हि आपलें भोजन हे साक्षात् परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या कृपेनेंच बीज अंकुरतें, वाढते आणि फळते. त्या अन्नानेंच सर्व जीव जगतात. असें हें जगज्जीवन अन्न जगासाठी उत्पन्न करणे आणि तदर्थच अन्न ग्रहण करणे आणि जगणे म्हणजेच यज्ञ होय. या अन्नोत्पत्तिरुप यज्ञांत सर्वगत ब्रह्म हणजे विश्व प्रतिष्ठित असल्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म होय.

१४३. भोक्ता
परमेश्वर हा चिद्घन आहे. यच्चयावत् विश्व त्याचा विषय आहे. त्यामुळे विश्व हे त्याचे भोजन म्हणजे भोज्य असून तो त्याचा भोक्ता आहे, विषयी आहे. ज्ञान हा चेतनाचाच धर्म असू शकतो. त्यामुळे जडमात्र चेतनविषय झालें, चेतनभोग्य झालें. अचेतन चेतनाचा विषय होणे योग्यच आहे. पण चेतन हि चेतनाचाच विषय होय, अचेतनाचा नव्हे. फार तर इतकेंच म्हणता येईल की अल्पचेतन महाचेतनाचा विषय होय. आणि म्हणूनच अष्टधाप्रकृति आणि जीव ह्या दोन्ही परमेश्वरी प्रकृति होत, असे म्हटले आहे. अर्थात् प्रकृति आणि जीव, जड आणि चेतन, दोन्ही परमेश्वराचे क्षेत्र आहे. त्याचे उपभोग्य आहे. तो परमेश्वरच क्षेत्रज्ञ आहे, भोक्ता आहे. जीवाला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. पण तें मर्यादित अर्थानच होय. वस्तुतः सारे जीव आपआपल्या देहासकट परमेश्वराचे देह होत. कारण केवळ चिद्घनच सर्व जीवांचा अंतर्यामी आहे.

१४४. सहिष्णु
सह म्हणजे जिंकणे. त्यावरून सहिष्णु म्हणजे जिष्णु होय. जें जें संकट येतें त्यावर तो मात करतो म्हणून तो सहिष्ण, देवांना संकट आले म्हणजे ते शरण गेलेच विष्णूला आणि त्याने त्यांचे संकट निवारण केलेंच ! पृथ्वीला पापाचा भार झाला म्हणजे ती गेलीच शरण विष्णूला की त्याने तिचे संकट निवारिलेंच ! साधूना दुर्जनांनी छळलें म्हणजे ते शरण गेलेच भगवंताला की त्याने त्यांचे रक्षण केलेंच ! अशा प्रकारें " दीनन दुख हरन" व "संकटमोचन" तो आहे. त्यामुळे तो सहिष्णु उर्फ जिष्णु म्हटला आहे. जी कांही सत्ता आहे ती सारी सताची आहे. सताच्या विरुद्ध उठलेलें कोणी हि आणि कांहीं हि केवढे हि प्रचंड असले तरी शेवटीं तें नेस्तनाबूदच व्हायचे आहे. म्हणून परमात्मा हा सर्वसहिष्णु होय. तो मांजर जसे उंदराला क्षणभर चळवळ करू देते त्या प्रमाणे तो असताला वळवळ करू देतो. त्या वळवळीने त्रस्त लोक अधीर होतात आणि देव आंधळा आहे, झोपला आहे, का, मेला आहे, असे म्हणतात. पण तत्त्वज्ञ ओळखून असतात की " सत्यमेव जयते, नानृतम् " आणि म्हणून ते सत्योपासना करीत सहन करीत राहतात. आणि भगवान् हि असताची वळवळ दरम्यान सहन करीत असतो. म्हणून हि तो सहिष्णु. God sees but waits म्हणून तो सहिष्णु.

१४५. जगदादिज
सृष्टीच्या आरंभी जन्मलेला जो तो जगदादिज होय, हा जगाचा पूर्वज कोण ? हा संकल्प होय. आधीं संकल्प उठतो, मग साधन होते आणि शेवटी सिद्धि येते. असा हा सृष्टीचा क्रम आहे. म्हणून जगाचा पूर्वज संकल्प वा काम म्हणावयाचा. म्हटलेंच आहे" कामस्तदग्रे समवर्ताधि | भूतस्य जातः पतिर्एक आसीत् । " या कामाला वा संकल्पालाच हिरण्यगर्भ अशी सृष्टि-शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञा आहे. हा संकल्प सर्वतोदिश सृष्टि करणारा असल्यामुळे तो चतुर्मुख कल्पिला, तें यथास्थितच होय. हा चतुर्मुख ब्रह्मा सृष्टीचा पूर्वज असून संबंध सृष्टि ही त्याची प्रजा होय. परमात्मा अज आहे, संकल्पात्मा ब्रह्मा पूर्वज आहे आणि समग्र सृष्टि ही प्रजा आहे. ब्रह्मदेवाला हि अज अशी संज्ञा आहे. पण ती तो ब्राह्म सृष्टि नाहीं एवढ्याच अर्थाने होय. तो अजात नाहीं; तो जात आहे. " भूतस्य जातः पतिः " म्हटले आहे त्याला.

१४६. अनघ
अघ म्हणजे पाप. पण पाप म्हणजे तरी काय ? पाप म्हणून एखाद्या कर्मावर, क्रियेवर, छाप का लागला आहे ? नाही. एखादें कर्म कधी पाप म्हणून तर कधी पुण्य म्हगून ओळखले जाईल. अर्थात् पाप-पुण्याची कांहीं कसोटी असली पाहिजे. ती कसोटी कोणती ? ती कसोटी सत्य होय. जें सत्यास अनुसरून ते पुण्य, जें सत्यापासून दूर जातें तें पाप. तेव्हां पाप म्हणजे सत्यापासून दूर जाणे, आडवाटेस जाणे होय. परमेश्वर सत्य-स्वरूप असल्यामुळे तो सत्य सोडून आडवाटेस जाऊच शकत नाही. त्यामुळेच तो अनघ म्हटला आहे. जीवांचें अनघत्व आणि परमेश्वराचे अनघत्व यांत महदंतर आहे. जीव सत्य-ज्ञानाच्या अभावी चाचपडत सत्यानुसरण करतो. ईश्वराला सत्यानुसरणाशिवाय दुसरे काही करतांच येत नाही. तेंच त्याला सहज आहे. डोळस सहजच सन्मार्गाने चालतो. परंतु गंद-दृष्टि, काणा अथवा आंधळा जीव मांद्यामुळे चांचपडत, ठेचाळत, कधी वाटेने, तर कधीं आडवाटेने चालतो त्यामुळे त्याला परमेश्वराप्रमाणे अनघ म्हणता येत नाही. कोणी असा केवळ अनघ झाल्यास तो परमेश्वरच होईल.

१४७. विजय
विजय म्हणजे प्रतिपक्षाचा पराभव करून संपादिलेला जय, स्वोत्कर्ष. सूर्य अंधारावर विजय मिळवतो. तसे सत्य असत्यावर विजय मिळवतें. वस्तुत: सत्य हे अप्रतिमल्ल मल्ल आहे. त्याला प्रतिमल्लाशी, असत्याशी, मुळी कुस्तीच करावी लागत नाही. सूर्याला का अंधाराशी दोन हात करावे लागतात ? तो अंधार मुळी त्याच्यासमोर ठरतच नाही. सूर्यापुढे त्याने आपले तोंड सदैव काळेंच केले आहे. तसा सत्यस्वरूप परमात्मा स्वभावत: विजयी आहे. जे सामान्य शूरवीर असतात त्यांना दोन हात करून विजय मिळवावा लागतो. परंतु महावीर ! "टङ्कारेणैव धनुष्यः स हि विघ्नान्यपोहति" तो धनुष्याच्या ज्या-घोषानेंच शत्रूंची दाणादाण करून टाकतो इतका त्याचा दरारा असतो. परमेश्वराला इतकेंहि करावें लागत नाही. तो भ्रूभंगहि न करतां विजयी होतो.

"यतो धर्मस्ततो जयः" असें असल्यामुळे स्वत: धर्म म्हणजे सत्य हे स्वयमेव विजय होय.

१४८ जेता
जगांत एकापेक्षां एक शूरवीर होऊन गेले आणि त्यांनी जयामागून जय मिळविले आहेत. परंतु त्यांना हि देहधर्मानी व मनोविकारांनी जिंकले आहे. ज्याला कोणी जिंकलें नाहीं, पण ज्याने मात्र सर्वांना जिंकलें आहे, असा एक परमात्माच आहे. कारण तो अव्यक्तमूर्ति आहे. व्यक्तमात्र गुणबद्ध आहे, गुणजित आहे. जिला क्षुत्‌त्रुट निद्राजागृति,रागद्वेष, शोकमोह वश करीत नाहीत अशी कोण व्यक्ति झाली आहे ? हा गुणजन्य पराभव व्यक्तीला क्षणोक्षणी खावाच लागतो. ' नहि सशरीरस्य सत: अपराभव: अस्ति '. परमात्माच एक निगुण असल्यामुळे व्यक्ति आणि तदनुगत पराभवमालिका यांपासून मुक्त आहे. आणि म्हणून तो जेता होय, आणि तोच एक जेता होय. अन्य सारे जित. प्रकृतीचे गुण हे कितीहि बलवान् असले, तरी ते हि पालटतात आणि निमतात. त्यामुळे निर्गुण परमात्मा त्यांना जिंकतो म्हणावयाचें. तो कूटस्थ नित्य आहे आणि म्हणून त्याला म्हणतात जेता. अन्य सारे हारच खातात.

१४९. विश्वयोनि (अविश्वयोनि)
परमात्मा हा विश्वयोनि म्हणजे विश्वाचें आदिकारण आहे, हे आपण मागें क्रमांक ११७ मध्ये याच वर्णसमाम्नायाचे विवेचन करतांना पाहिले आहे. तिथे तो षष्ठीतत्पुरुष आहे. इथे बहुव्रीहि घेऊ या. विश्व हेच ज्याची योनि महणजे उपलब्धिनिमित्त वा साधन आहे तो विश्वयोनि, परमात्मा. अनिर्देश्य अव्यक्त अचिंत्य परमात्मा नामरूपात्मक व्यक्ताच्या उपलब्धीमुळे सूचित होतो. व्यक्ताचा हा मोठाच उपकार आहे. कापराप्रमाणे अव्यक्तप्रकाशन करून व्यक्त विलीन होते, कारणाचा निर्देश करून कार्य कृतकार्य होते.

अथवा अष्टधाप्रकृतिरूप जें महद् ब्रह्म ते विश्व ज्याची योनि म्हणजे गर्भधानी आहे तो विश्वयोनि. "मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्" गीता १४.३ असे म्हटलेच आहे. ईश्वर जीवरूपाने प्रत्येक भूताच्या ठाईं निहित आहे, अंतर्यामी म्हणून संनिहित आहे. जीवांशरूप भगवद्वीर्य धारण केल्याशिवाय कोणतें हि भूत उद्भूत होत नाही.

अथवा अविश्वयोनि असा पाठ घ्यावा. विश्व म्हणजे हे नामरूपात्मक जगत् मिथ्या असल्यामुळे त्याचा कोणत्याहि प्रकारें परमात्म्याशी संबंध पोचू शकत नाही. म्हणून जो विश्वयोनि नव्हे तो अविश्वयोनि. रज्जूवर सर्पाचा, शुक्तीवर रजताचा, वा कनकावर कटकाचा आरोप हा आरोपच आहे. रज्जू शुक्ति आणि कनक वस्तुत: तज्जनक नव्हेत, योनि नव्हेत. स्वरूपाविषयींचे अज्ञानच त्याचे कारण होय, योनि होय.

१५०. पुनर्वसु
"पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी-जठरे शयनम्' असा ज्याचा कार्यक्रम आहे तो जीव होय. जीवरूपाने परमात्मा नाना योनींत अवतीर्ण होतो आणि त्या त्या योनींची संतति करतो. हे जें योन्यन्तरगमन आणि देहान्तरगमन तेंच पुनर्वसुत्व होय.

कल्पान्ती ही समग्र सृष्टि प्रलीन होते. त्यानंतर परत कल्पारंभी सृष्टीची पुनरुत्पत्ति होते. अशा प्रकारे वारंवार विश्व निर्मून त्यांत परमात्मा वसति करतो. आणि म्हणून हि तो पुनर्वसु म्हटला आहे.

सर्प ज्या प्रमाणे जुनी कात टाकतो आणि नवी धारण करतो. तसा हा परमात्मा पुराण पुरे टाकून नित्यनूतन घेत राहतो.परमात्याचें जें नित्यनूतनत्व तेच पुनर्वसन होय, पुनर्वसुत्व होय. परमात्मा पुनर्वसु आहे म्हणजे तो नित्यनूतन आहे. जो जुन्यालाच चिकटून राहतो तो जीर्ण होय. जीर्ण मरणधर्मी आहे, जो जीर्णाचा त्याग करून नवनव होतो तो पुनर्वसुच अजर आणि अमर होय.

उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः ।
अतीद्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ॥१७॥


१५१. उपेन्द्र
इंद्र म्हणजे परमात्म्याला इदंतया पाहणारी देवता. केन उपनिषदांत गोष्ट आली आहे. ब्रह्माने देवांसाठी विजय मिळविला. पण देव हा आमचाच विजय आहे आमचाच पराक्रम आहे, अशी बढाई मारूं लागले. तेव्हा त्यांच्या समोर एक यक्ष, यजनीय गूढ ब्रह्म, उभे ठाकलें आणि त्याने एक गवताची काडी टाकली आणि म्हटलें, तुमचे काय सामर्थ्य आहे ते अजमावा. भुवनभक्षक अग्नि सरसावला. त्याला ती काही काही जाळतां आली नाही. वायु, भुवनभंजन प्रभंजन, सरसावला त्याला ती काडी काही हलवता आली नाही. तेव्हा त्यांना कळलें की हा आपला पराक्रम नहे, हा आपला विजय नव्हे. तेव्हां ' किमिदं यक्षम् हा प्रश्न त्यांना पडला आणि इन्द्राने उमेच्या कृपेनें जाणलें की अरे हे तर ब्रह्म आहे. त्याच्याच सामर्थ्याने आपल्याला विजय मिळाला आहे. अशा प्रकारें इन्द्राला जवळून दर्शन देता झाला म्हणून परमात्मा हा उपेन्द्र म्हटला आहे.

श्रद्धेच्या कृपेनें जीवात्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. परमात्मा जीवात्म्याच्या संनिघच आहे. अगदी अंत:स्थ आहे. परंतु निरहं झाल्याशिवाय तों मोठमोठ्यांना आकळत नाही आणि निरहं बालकाला हि तो सुलभ आहे. तो अकिंचनगोचर आहे. सूरदासांनी याच आशयाने गाइलें आहे-'निर्बल के बल राम'.

१५२. वामन
देवांना जिंकून असुरेन्द्र बलि स्वर्गाधिपति होऊन बसला, तेव्हा देवमाता अदिति पुत्रांचे दैन्य पाहून दुःखित झाली आणि तिने परमेश्वराला व्रताने प्रसन्न करुन घेतलें. भगवान् विष्णु तिच्या पोटीं वामनरूपाने अवतरला आणि त्याने दैत्यदानवेन्द्र बलीपासून त्रिपाद भूमि मागून त्याला पाताळांत घातले व इन्द्राला आपले वैभव परत मिळवून दिलें, तेव्हां ब्रह्मदेवाने आणि प्रजापतींनी वामनाला यौवराज्याभिषेक केला. त्यामुळे तो उपेन्द्र झाला. अर्थात् जो उपेन्द्र तोच वामन होय आणि तोच त्रिविक्रम रूपानें प्रांशु हि म्हटला आहे. अशा प्रकारें "उपेन्द्रो वामनः प्रांशुः" हा संपूर्ण चरण वामनावताराचे वर्णन करतो.

परमात्मा सर्वव्यापी आहे. त्याचे सर्वव्यापकत्व विरुद्धार्थवाची विशेषणांच्या जोड्यांनी व्यक्त केलें जाते. ईशोपनिषदांत तें असें वर्णिलें आहे

तत्एजति तत्नैजति, तत्दूरे तद् उ अन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य, तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥

त्याचप्रमाणे इथे वामन आणि प्रांशु ही जोड विशेषणे आली आहेत. उच्चावच सर्वच तो आहे.

प्रांशुलभ्ये फले लोभात्उद्वाहुरिव वामनः
या कालिदासवचनांतहि ही जोडी आली आहे.

१५३. प्रांशु
ईश्वराची उंची किती आहे हे कोण मापू शकेल ? त्याहून उंच असेल तो. असा कोणी नसल्यामुळे त्याच्या उंचीची इयत्ता कोणाला आजपर्यंत काढतां आली नाही. त्याच्या उंचीचा अंदाज त्यांनाच लागला, जे नन आणि नम्रतर होत गेले. या नम्रतेच नांव भक्ति आहे. भगवंताने म्हटलेच आहे :

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुंच तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ गीता ११ - ५४

भक्त्या मां अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ गीता. १८ - ५५

बलि त्रिविक्रमापुढे विनम्र झाला आणि त्याने त्या प्रांशु परमेश्वराला आपल्या मुठीत ठेवले. त्याला आपल्या घरचा द्वारपाळ बनविलें. अर्थात् परमेश्वराहून हि परमेश्वराची भक्ति, ही प्रणति, परम आहे, प्रांशुतर आहे, बलिष्ठ आहे. बलिबन्धन खरें, पण बांधणार आणि बांधला जाणारा कोण आहे ? बलिबंधन तत्पुरुष की बहुव्रीहि ? बलि तर मुक्त झाला, देव मात्र द्वारपाळ बनून बांधला गेला ! बलिबंधन आरंभी तत्पुरुष आणि मागाहून बहुव्रीहि, वामन नम्र असल्यामुळे प्रांशु बलीचे बंधन झाला; पण पुढे जेव्हां तो प्रांशु झाला तेव्हां नम्र बलिच त्याचे बंधन झाला आहे.

देवाचे सर्वोत्तम नाम म्हणूनच नमः आहे, जें सहस्राधिक आहे, सहस्रातिशायी आहे.

' सर्वप्रहरणायुध ॐ नमः ' म्हणून सहस्राची समाप्ति झाली आहे. अर्थात् एकपरी नमः हा शेवटचा शब्द आहे, शेवटचे नाम आहे.

१५४. अमोघ
जे आसुर आहेत, म्हणजे ज्यांनी मोहमयी आसुरी प्रकृति अंगीकारिली आहे, ते मोघाश, मोघकर्म, मोघज्ञान म्हटले आहेत. त्या विरुद्ध ज्यांनी दैवी प्रकृति अंगीकारिली, ते सर्वांचे मूळ परमात्मा आहे हे ओळखून परमेश्वराची निष्काम भक्ति करतात. अर्थात् ते मुक्त्यधिक भक्तिरूप फळ पावतात, आणि अशा प्रकारें अमोघ होतात, कृतार्थ होतात. स्व-रूप परमेश्वराची जे भक्ति करतात, त्यांचे संकल्प व प्रयत्न अमोघ होतात. परंतु जे जाणून बुजूनच असत्य असलेल्या अर्थकाममय संसाराच्या मागे लागतात, ते मोघ होतात, विफल होतात.

यो धुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ॥

परमात्मा हा साक्षात् सत्य आहे. तो सत्यसंकल्प 'आहे, सत्यकाम आहे. आणि त्यामुळेच तो पूर्णकाम आहे. जो पूर्ण-काम तोच अमोघ होय. अमोघाची उपासना करणारा हि अमोघच होतो. म्हणून म्हटलें आहे:

धर्मे मतिर्भवतु व: सततोत्थिताना, स ह्येक एव परलोकगतस्य बन्धुः ॥
अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना नैवाप्तभावमुपयन्ति न च स्थिरत्वम् ॥ महाभारत

१५५. शुचि
शुचि माणजे शुद्ध. शुद्धि दोन प्रकारची आहे. एक कृत्रिम आणि दुसरी सहज, परमात्मा हा दुसऱ्या प्रकारे शुद्ध आहे. इतर सर्व पहिल्या प्रकारे शुद्ध होतात. वस्त्र मळतें. तें धुतलें म्हणजे शुद्ध होते. परंतु आकाश मळत हि नाही आणि शुद्ध केलें हि जात नाही. ते सहजशुद्ध आहे. कधी कोणाला मळवतां न येणारे असे निर्लेप शुद्ध आहे तें. म्हणून आकाशाला शुचि असें हि एक नांव आहे. आकाशाला वाऱ्याने सळ पडत नाहीं की खळ पडत नाही. पावसाने ते भिजत नाहीं की थंडीने थिजत नाही. सूर्यतापानें तें पाघळत नाहीं की जळत नाही. रात्रीचे अंधारे नि ढगांचे भारे सतत येतात जातात, पण त्यांचा डाग त्याला नाहीं. 'असें तें शुचि आहे. परंतु जसें हें आकाश शब्दगुण म्हटले आहे. गुण म्हटला की द्रव्यत्व आलेंच, आणि त्याबरोबर आले सारे उपाधि. परंतु परमात्मा हा निर्गुण असल्यामुळे तोच खरोखर शुचि आहे. त्याला त्रैगुण्याचा संपर्क नाही, गुणच दोषरूप आहेत. ते गुणच जियें संभवत नाहीत तें निर्गुणच निर्दोष होय आणि माणून तेंच शुचि. इतर सारे गुणांनी बरबटलेलें !

१५६. ऊर्जित
भगवद्विभूति दोन प्रकारच्या वर्णिल्या आहेत : १. श्रीमान्, २. ऊर्जित. जगांत हि आपण दोनच विभूति पहातों: १ स्त्री आणि २ पुरुष, स्त्रीतत्त्व हे श्रीमान् आहे, सौन्दर्यशाली आहे. पुरुषतत्त्व ऊर्जित आहे, बलशाली आहे. सारें वैभव या दोन प्रकारांत प्रकटले आहे. म्हणून या दोन प्रकारांना विभूति म्हटलें आहे. प्रत्येक स्पृहणीय गुण एकतर सौन्दर्योपकारी असेल, नाहीतर बलोपकारी असेल, तिसरा प्रकार नाही. सर्व सौंदर्याचा अर्क भक्ति आहे, सर्व बलाचा अर्क ज्ञान आहे. भक्तिमान् व्यक्ति आपल्या परमहृदयाल्हादक समर्पणानें सर्वभूतात्मभूत होऊन बसते. ज्ञानवान् व्यक्ति आपल्या प्रौढप्रताप परित्यागाने या विश्वाचा एकराट् बनते. एक तत्त्व मेणासारखें मऊ आहे, दुसरें वज्रासारखें कठिण आहे. दोन्ही विश्वविजयी आहेत बामनत्रिविक्रमवत्. दोन्ही भगवद्विभूति आहेत. विश्वाची घडामोड करणाऱ्या त्रिगुणांची मात्रा ज्याच्यावर चालत नाही आणि जो या आतापि-बातापि-इल्वलांना पचवून देकर देतो, त्या ज्ञानघन तुरीयाहून अधिक ऊर्जित कोण म्हणावा ?

१५७. अतीन्द्र
इन्द्राची जी उपकरणे ती इन्द्रियें होत. अर्थात् इंद्र म्हणजे देही होय. या देही जीवाच्या पलीकडचा तो अतीन्द्र परमात्मा होय. परमात्मा उपेन्द्र हि म्हटला आहे, आणि अतीन्द्र हि म्हटला आहे. परमात्मा जीवाच्या जवळ राहून त्याला हळूहळू आपल्याकडे खेंचीत असतो. त्याला ' स्वे महिम्नि ’ प्रतिष्ठित व्हायला मदत करीत असतो. म्हणून, म्हणजे "इन्द्र उपकरोति " म्हणून, तो उपेन्द्र झाला. पण हे उपकरण तो जीवाच्या अतीत राहून, दूर राहून, करीत असतो. म्हणून तो अतीन्द्र म्हटला आहे. पक्षिणी पिलाला उडायला कशी शिकविते ? ती जवळ राहून पिलाला भरवते. पण चटकन त्याच्या पासून जरा दूर उडून बसते. मग पिलू तिच्याजवळ फडफडत जाते. अशा प्रकारे आधीं जवळ, मग जरा दूर, त्यानंतर आणखी दूर उडायला शिकवून एके दिवशी ती त्याला झाड सोडून अंतराळात झेप घ्यायला लावते, भरारी मारायला शिकवतं. परमात्माहि त्याचप्रमाणे जीवाला जीवत्वाच्या अंडांतून बाहेर पडून ब्रह्मांडाच्या वृक्षावर फुदकायला आणि ब्रह्मांडाचा हि त्याग करून शिवत्वाच्या अनन्त आकाशांत भरारी मारायला शिकवतो. इंद्र आणि अतीन्द्र असे हे दोन सखे सुपर्ण होत. दोन्ही जोडीने राहतात म्हणून सखेसोबती आणि संचार करतात म्हणून सुपर्ण म्हणावयाचे. पण ती माय-लेकरें आहेत, किंबहुना बिंबप्रतिबिंबें.

१५८. संग्रह
शेतकरी आरंभी पेरणी करतो आणि शेवटी पिकाची सवंगणी करतो. सर्वगणी करतो तेव्हां प्रथम तो पुढील पेरणीसाठी बीजसंग्रह करुन ठेवतो. अशा प्रकारेंच परमेश्वर हि सृष्टीची पेरणी व सवंगणी यथाकाल सारखा करीत असतो. या त्याच्या व्यवसायांत रागद्वेष नाहीं. तो आपलें नियत कर्म मात्र करीत असतो. सारी सृष्टी जी निर्माण होते ती त्या परमेश्वरी संग्रहांतूनच होय. मुळांत जर काही संग्रह नसेल तर पेरणी होणार कशी आणि पीक तरी कुठून येणार ? म्हणून परमेश्वर हा संग्रहरूप आहे. सारी सृष्टि आरंभी बीजभूत परमेश्वरांत संग्रहीत होती आणि पर्यवसानीं हि ती समग्र त्यांतच संगृहीत होणार आहे, तद्रूपाने फलित होणार आहे. मध्यंतरींचा सारा प्रपंच कालौघाने उपजत निमत राहणारा अनित्य आहे. नित्य एक परमात्मा आहे, जो सर्वसंग्रह आहे, सर्वांचे मूळ आणि सर्वाचे फलित आहे.

१५९. सर्ग
संग्रह म्हणजे समूहन आहे, समाहार आहे, तर सर्ग म्हणजे त्याहून आहे, विहार आहे. परमात्म्याची जी अतर्क्य शक्ति आहे तिचा आविष्कार म्हणजे सर्ग होय. परमात्म्याच्या अप्रतर्क्य निगूढ शक्तीची अभिव्यक्ति म्हणजे ही जगद्व्यक्ति होय, हा सर्ग होय.. त्यामुळे ह्या सर्व व्यक्तीची जी जननी, आदिशक्ति, तीच सर्ग म्हटली आहे. आदिशक्तीपासूनच ही सारी अभिव्यक्ति झाली आहे हे जाणून भक्त त्या सर्गहेतु परमात्म्याला शक्तिरूपाने, मातृरूपाने ध्यातात आणि गातात.

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव-समन्विताः ॥ गीता १०- ८

संग्रह आणि सर्ग ही जोड कल्पना आहे. अस्तमनी संयमन आपले किरण समेटतो, उदयीं सूर्य ते विखरतो. परमात्मतेज हि तसें कल्पारंभी सृष्टिरूप आपले किरण पसरते आणि कल्पान्ती ते गुंडाळून घेतें. हे दोन्ही व्यापार ज्या तेजाच्या सत्तेने होतात त्या तेजाचे ध्यान करायला गायत्री सांगते.

१६०. घृतात्मा
परमात्मा हा धृतात्मा आहे. म्हणजे वशी आहे. त्याचे अन्त:करण त्याच्या स्वाधीन आहे. जीव आणि शिव यांच्यांत हेच अंतर आहे. जीवाचें अंत:करण त्याच्या अधीन रहात नाही. नको ते विचार आणि विकार त्याच्या मनात थैमान घालत असतात. तो असहायपणे त्यांनी झपाटला जात राहतो. परंतु परमात्म्याला असले विकार शिवत नाहींत. सूर्याला जसा अंधकार माहीत नाही, तसा परमात्म्याला मनोविकार माहीत नाही. परमात्म्याला मनोविकार माहीत नाहीत, कारण ते सारे उपाधिगत आहेत, आणि परमात्मा आहे निरुपाधि, घृतात्मा कोणी महात्मा असू शकेल, पण त्याचें तें घृतात्मत्व परमात्याच्याहून वेगळे. तें मित आणि अनित्यच असावयाचे, परमात्मा हा केवल धृतात्मा.

१६१. नियम
धृतात्मा म्हणजे संयमी. संपूर्ण संयमन करणारा. पण हा संयम यमनियमांच्या आधारेच सिद्ध होतो. म्हणून तो परमात्मा संयमोपायभूत नियमरूप आणि यमरूप आहे, असें क्रमश: म्हटले आहे. यम नियम आणि संयम ही त्रयी म्हणजे योग होय. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही सार्वभौम महाव्रतें ही मूळ होत. निपम शौचसंतोषादि हे स्फंध शाखोपशाखा होत, आणि धारणाध्यानसमाधिरूप संयम म्हणजे पुष्पफळ होय. असा हा आमूलचूल योग-वृक्ष आहे. अथवा हा योगशंकु आहे. यम त्याचा विशाल पाया आहे. नियम त्याच्या भुजा आहेत. संयम त्याचे शिखर आहे.

ईश्वर आणि त्याचे नियम दोन नाहीत. ईश्वराने सृष्टीला भौतिक, नैतिक, आध्यात्मिक नियम लावून . दिले आणि तो निश्चिन्त झाला. जो ईश्वरी नियमानुसार वागेल त्याला सुख आणि जो तद्विपरीत चालेल त्याला असुख होईल, अशा प्रकारे कर्मफलदायविभागानुसार सबंध सष्टि नियमबद्ध आहे. असुर समजतात त्याप्रमाणे हे जग असत्य म्हणजे संविधानरहित, अप्रतिष्ठ म्हणजे नियमनरहित आणि अनीश्वर म्हणजे शासकरहित अराजक नाही. हे सुव्यवस्थित ईश्वरी शासन आहे. ईश्वर सर्वाचे स्वभावसूत्राने नियमन करीत आहे.

१६२. यम
ईश्वर आणि त्याचे नियम दोन नाहीत म्हटले. पण जगांत आपण कायदे म्हणजे धर्म आणि राजा म्हणजे धर्मगोप्ता असे दोन विभाग पाहतो. राजा केव्हा केव्हां आपले कायदे बाजूला सारून कोणाला दया हि दाखवितो. म्हणजे कायद्यापेक्षां हि राजा हा वेगळा आणि वरिष्ठ दिसून येतो. ईश्वराबाबतहि मनुष्य तशी कल्पना करतो. आणि म्हणून तो ईश्वर आणि त्याचे नियम यांत भेद करतो. परंतु वस्तुतः ईश्वराचें ईश्वरत्व यांतच आहे की तो नियमरूपाने प्रकटून ईश्वररूपाने लोपला आहे. म्हणजे 'ईश्वर= नियम, नियम= ईश्वर असें समीकरण झाले ! (ईश्वरी नियम निरपवाद आहे. निरपवादत्व हीच त्याची दया आहे.) पण तत्त्व आणि व्यवहार या दोन्ही दृष्टींनी हे गळी उतरत नाही. कारण, नियमांहून नियमयिता वेगळाच असावयाचा. नियमयित्रधीन नियम असू शकतात, पण नियमाधीन नियमयिता असणार नाही. शक्तीहून शक्तिमान् वेगळा आणि वरिष्ठच असणार ना ? व्यवहारांत हि नियमयित्याशिवाय नुसते नियम उपलब्ध होत नाहीत, म्हणून नियमयिता कल्पावा लागतो. त्या दृष्टीने ईश्वर हा नियमच नव्हे तर यम म्हणजे नियमयिता हि आहे. ईश्वर हे नियमन वा शासन सर्वांतर्यामिरूपानें करतो.

वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥१८॥


१६३. वेद्य
वेद्य म्हणजे वेद-प्रतिपाद्य, ज्ञेय, ब्रह्म,

सर्वे वेदा यत् पदं आमनन्ति
तपांसि सर्वाणि च यद् वदन्ति ।
यद् इच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति
तत् ते पदं संग्रहेण ब्रवीमि ॥ .
ॐ इति एतत् । कठ २.१५

ब्रह्म स्वसंवेद्य असले तरी त्याचे प्रतिपादन प्रथम वेदांनीच केले आहे. जे अनुभवी पुरुष आहेत ते आपल्या गुरूंचा हवाला देतात. ते गुरु हि "इति शुश्रुम पूर्वेषां ये तस् तद् विचचक्षिरे' असेंच म्हणतात. या सर्व पूर्वजांचा पूर्वज म्हणजे अज परमेष्ठी प्रजापति होय. हा चतुर्मुख ब्रह्मा म्हणजे अनादि ज्ञानस्वरूप चार वेद होत. त्यांच्या गुरुमुखांतून हे ज्ञान परंपरेनें प्राप्त झालें म्हणून ते "वेद्य" म्हणावयाचें. म्हणून परमात्मा " वेद्य " म्हणावयाचा. माळयाकडून भाजीपाला मिळतो, पण रत्न घ्यायचे तर त्यासाठी जवाहिर्याकडेच गेले पाहिजे. त्याप्रमाणे आत्मज्ञानासाठी वेदांकडेच गेले पाहिजे.

१६४. वैद्य
(त्या ब्रह्म) विद्येचा .जो ज्ञाता तो वैद्य होय. ज्याच्यापासून विद्यावंश झाला तोच त्या विद्येचा आदिज्ञाता होय, गुरु होय, स्वामी होय, ही विद्या ज्ञाननिधान परमेश्वरापासून झालेली आहे. म्हणून तोच या विद्येचा म्हणजे वेदांचा स्वामी म्हणावयाचा.
वैद्य आपल्या आयुर्विद्येच्या योगें लोकांना रोगमुक्त करतो, परमात्मा 'वा गुरु त्याचप्रमाणे आपल्या आत्मविद्येच्या योगें मुमुक्षूना, भवरोगमुक्त करतो, अनामय करतो. म्हणून हि तो वैद्य होय,

जन्म मृत्यु जरा व्याधि हे सर्व भयाचे विविध भाव होत. आत्मविद्या या सर्व भयांतून सोडवते. म्हणून वैद्य म्हणजे आत्मविद्या-विशारद, हा वैद्यांचाहि वैद्य होय, किंबहुना तोच एक वैद्य असून इतर सारे आडनांवाचे होत, तोतया होत.

१६५. सदायोगी
स्वरूपावस्थिति माणजे योग होय. ती ज्याला सदैव असते तो सदायोगी म्हणावयांचा. जे योगी म्हणवले जातात त्यांचा योग म्हणजे समाधि तात्कालिक असतो. त्या समाधीतून त्यांचे व्युत्थान होते. हा समाधि कृत्रिम आहे. त्यामुळे तो साधावा लागतो आणि त्यांतून व्युत्थान होते. परंतु ज्ञान-समाधींत असा प्रकार नाही. ज्याला आपण मनुष्य आहों हे ज्ञान झाले ते त्याला आमरण केव्हां हि सोडून जात नाही. तें त्याला घोकावें लागत नाही.

त्याचा त्याला भार होत नाही. त्यातून त्याचे व्युत्थान होत नाही. तसे स्वरूपावस्थान ज्याचें केव्हां हि सृष्टीच्या सर्ग-स्थिति-निरोघ काली हि नाहीसे होत नाही. तो परमात्मा हा सदायोगी होय. ज्याला आत्मज्ञान झालें तो हि तसाच सदा-योगी म्हणावयाचा. म्हटलेंच आहे गीतेत :

"इदं ज्ञानं उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यवन्ति च ॥ " गीता. १४- २

१६६. वीरहा
वीरहा म्हणजे प्रति-वीरहा. जो कोणी परमेश्वराविरुद्ध उठतो त्याला त्याला परमेश्वर नेस्तनाबूद करतो. परमेश्वर हा सत्यस्वरूप आहे, धर्म-स्वरूप आहे. त्याच्याविरुद्ध उठलेला कोणीहि, तो किती का बलाढ्य असेना, अखेर जमीन-दोस्तच व्हावयाचा. हे आध्यात्मिक सत्य, हा सत्याचा शाश्वत विजय आणि अधर्माचा निश्चित पराजय, गायला अठरा पुराण झाली आहेत. ती संख्येच्या अंतिम म्हणजे अठराव्या स्थानाइतकी म्हणजे परार्धावधि झाली तरी ती हेच सांगणार : 'सत्यमेव जयते, नानृतम्".

१६७. माधव
उमा-धव आणि मा-धव, शिव आणि विष्ण, दोन्ही आदर्श अभिन्नच आहेत. शिव वैराग्यमूर्ति वा विरक्तिरूप आहे, त्याला उमा वरिती झाली. विष्णु निरिच्छता-मूर्ति वा अनासक्तिरूप, त्याला लक्ष्मी वरिती झाली. उभयत्र परम वैराग्य हे आत्मज्ञानाचे अव्यभिचारी लक्षण आहे. सूर्य जसा सौरी प्रभेनें आपल्या प्रकाशकिरणांनी, नित्य मंडित असतो तसा ज्ञान-सूर्य ज्ञान-प्रभेनें, वैराग्यादि ज्ञान-किरणांनी नित्य मंडित असतो. ज्ञान-वैराग्यांची ही अव्यभिचारिता, हा अविच्छेद, असा पति-पत्नीसंबंधानें चित्रित केला आहे मा-धव, उमा-धव म्हणून. वैराग्यप्रभा-भासुर शान शिव आणि विष्णु दोहोंच्या ठाई निजरूपाने विराजमान आहे. शिव हा कर्मसंन्यासाचा आदर्श आहे. विष्णु हां कर्मयोगाचा आदर्श आहे. तिसरा आदर्श नाहीं ,म्हणून "एको देवः केशवो वा शिवो वा". म्हणूनच त्रिदेवांतील ब्रह्मदेवाची उपासना नाही. तो काही स्वतंत्र आदर्श नाही. शिव आणि विष्ण हे दोन्ही आत्मज्ञानाचेच आदर्श असल्यामुळे शिवस्य हृदये विष्णुः, विष्णोश्च हृदये शिवः"असे म्हटलें आहे. शैव-वैष्णवांत उपासना-भेद असला तरी आदर्शात भेद नाही. म्हणूनच गीतेंत 'द्विविधा निष्ठा असा प्रयोग येतो. ’ द्वे निष्ठे ' असा भेद नाही, आणि म्हणून त्यांच्यांत विरोध नाही. तर आहे " साधु दिसती वेगळाले, परि ते स्वरूपी मिळाले " असें अद्वैत. सर्वधर्म-समन्वयाचा हा मार्ग आहे.

१६८.मधु
सामान्यत: उद्भिदाचें सार म्हणजे पुष्प वा फल. पण कित्येक उद्भिज्जाति अशा आहेत की त्यांचे सार त्यांच्या मुळांत, बुंध्यांत, त्वचेत, पानांत वा अन्य अंगोपांगांत आढळून येते. पण या सारवान् अंगोपांगांत असार भाग हि असतो. तो वगळून घेतलेला जो सारांश तो म्हणजे मधु होय, अर्थात् मधु म्हणजे तो अंश की ज्यांत असार कांहींच असत नाही आणि ज्याच्या संगोपनासाठी सारें जीव-जगत् धडपडत असतें. मोहोळांतील प्रत्येक जीव त्या मधूसाठी जन्मत जगत आणि मरत असतो. मधूवांचून अन्य उद्देश वा उद्योग त्यांना ठाऊक नाही. परमात्मा हा या विश्वकुलाचा तसा मधुकंद आहे. सर्व जीव जाणून वा नेणून त्याच्याच साठी जन्मून जगत आणि मरून जन्मत असतात, असा तो सर्वांचा परम प्रिय आहे. म्हणून तो मधु. ज्यावरून वेह-देहांतरांची कुरवंडी करून टाकावी असा तो सर्वांचा सर्वस्व आहे. त्याहून अधिक इष्ट, त्याहून अधिक मिष्ट दुसरे कांहीं नाहीं. म्हणून तो मधु, एवढ्यासाठीच मधुसूक्त गाइलें आहे.

१६९. अतीन्द्रिय
परमात्मा हा अतीन्द्रिय आहे. म्हणजे तो इन्द्रियांच्या आवाक्याबाहेरचा आहे. तो इन्द्रियांना अगोचर आहे. तो पंच ज्ञानेंद्रियांचा विषय नाहीच पण अतीन्द्रिय शब्दानें मुख्यत: तो मनाचा विषय नाहीं असें म्हणावयाचे आहे. कारण, सर्वेन्द्रियांत मन प्रमुख आहे. ' यत्मनसा न मनुते येन आहर्मनो मतम् । तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते ॥ " उपासना म्हणजे विषय-ध्यान, विषय स्वतः परिवर्तनशील आहेत. आणि इन्द्रियांसकट मनहि तसेंच चंचल आहे.

अशा स्थितीत विषयेन्द्रिय-संनिकर्षाने जें ज्ञान होतें तें ज्ञान या पदवीस पात्र नसून कल्पनामात्र होय. ईश्वरी ज्ञान हे वस्तुज्ञान आहे, विषयज्ञान ही कल्पना आहे. कल्पनेत ग्राह्य आणि ग्राहक दोन्ही अस्थिर आणि अविश्वसनीय आहेत. वस्तुजानांत ग्राह्य बोध आणि ग्राहक बुद्धि दोन्ही स्थिर आणि विश्वसनीय आहेत. म्हणूनच या ज्ञानाला "बुद्धिग्राह्यं अतीन्द्रियम्" म्हटले आहे. कोणते हि जान बुद्धीनेच ग्रहण व्हावयाचे मग ते विषयाकार असो की निर्विषय असो. इन्द्रियद्वारा होणारें ज्ञानमात्र विषयरूप असते. आणि ज्ञातृस्वरूप आत्मतत्त्व हे निर्गुण असल्यामुळे तें स्वभावत:च अतीन्द्रिय आहे. त्यामुळे परमात्मा हा अतीन्द्रिय म्हटला आहे.

१७०. महामाय
माया म्हणजे चातुर्य, इंद्रजाल, जादू. एखादा जादूगार आपले हातचलाखीचे खेळ दाखवून प्रेक्षकांना चकित करतो. त्याच्याजवळ पहाल तर साधन-सामग्री फारशी नसते. एक पोतडी, एक गडी आणि एक छडी. यांच्या साहाय्यानें तो अद्भुत खेळ करून दाखवितो. परंतु परमेश्वर ? " किमीहः किं कायः स खलु किमुपायस् त्रिभुवनं, किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च "-(शिवमहिम्न.) त्याच्याजवळ गडी, छडी, पोतडी कांहींच नसतांना तो एकटा एक हे अद्भुत विश्व कसें रचतो. आणि पुन: तें जादूच्या गोष्टीसारखें फसवें नव्हे. तर प्रत्यक्ष शाश्वत उपभोग्य असें, जीवांच्या संपूर्ण जीवनाची ज्यांत परिपूर्ण सोय आहे असें विश्व ! या सर्वाश्चर्यमय विश्वाहून अधिक मोठे अद्भुत लाघव कोणते ? म्हणून परमात्मा हा महामाय होय. मायाव्यांना हि त्याची ही माया समजत नाही, मग जमणे दूरच. म्हणून तो महामाय.

१७१. महोत्साह
सर्वाश्चर्यमय विश्वाच्या रचनेत जसें अतर्क्य बुद्धिवैभव दिसून येते, तसा अपार उत्साह हि दिसून येतो. एखाद्या महाकवीच्या ठाई अद्भुत कवित्व असणे पुरेसे नाही, महाकाव्य रचण्याची अजस्र स्फूर्ति हि त्याच्या मनांत हवी. मंद स्फूर्तीच्या कवीकडून महाकाव्याची रचना होऊ शकत नाही. किंचित्-काव्य प्रसवून त्याची काव्य-स्फूर्ति निपचित पडते. परंतु परमेश्वराची स्फूर्ति अपरंपार आहे. तो अनन्तकोटि-ब्रह्माण्डनायक आहे. त्याची विश्वरचना अव्याहत पूर्ण वेगाने सुरूच आहे. तो सर्गामागून सर्ग रचितच चालला आहे. त्याच्या इतके सर्ग अजून कोणाहि महा-कवीने रचले नाहीत हे उघड आहे. अशा स्थितीत त्याना उत्साह, त्याची स्फूर्ति तिती म्हणून वर्णाची, ती अगणितच आहे. म्हणून तो महोत्साह होय.

१७२. महाबल
एखादें महत्कृत्य संपादावयाचे म्हणजे त्यासाठी नुसते अफाट बुद्धिवैभव आणि अचाट उत्साह वा स्फूर्ति असून भागत नाही. तो ताण सहन करण्याला शारीरिक बळ हि असेंच भक्कम हवें असतें. परमेश्वराच्या ठाईं तें तसे आहे, म्हणूनच तो हे सर्वतोऽनन्तरूप विश्व निर्माण करू शकला, हे उघड आहे. अखिल भारतीय भूदानयज्ञ-कार्याची उभारणी करायला लागणारी विशाल बुद्धि, अदम्य उत्साह आणि कणखर शरीर दीक्षिताला नसते, तर तें महत्कार्य संपन्न झाले नसते. त्यापेक्षा हा सृष्टिरूप यज्ञ किती किती महान् म्हणावा ? कोणी हि म्हणेल " कशी तुळितसां तुम्ही प्रकट मेरुशी मोहरी ? "-(केकावलि) आणि तें ठीकच आहे. त्यांची तुलनाच होणारी नाही. परंतु या अप्रस्तुत प्रशंसेने परमेश्वराचे महाबळ चांगलेच प्रकट होते. तेंच तिचे प्रयोजन. परमेश्वराला महामाय महोत्साह आणि महाबळ 2 क्रमाने म्हटलें आहे, ते साभिप्राय आहे. विश्वसृष्टीसारखें महान् कर्म करणारा महामाय महोत्साह हि आणि महाबळच असला पाहिजे. त्याचे बुद्धिबळ मनोबल आणि शरीरबळ तसेंच महान् असले पाहिजे. ह्या त्रिगुण-संनिपाताशिवाय महत् कार्य संपन्न होत नाही, मग ते जीवाचे असो की ईश्वराचे असो.

महाबुध्दिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥१९॥


१७३. महाबुद्धि
महामाय आणि महाबुद्धि ही दोन नामें आली आहेत. ती उघडच भिन्नार्थक आहेत. त्यांत भिन्न वर्ण-समाम्नाय आहेत. ती असवर्ण आहेत. परंतु जीनामें सवर्ण आहेत, ती हि समानार्थक नाहींत. ती भिन्नार्थक म्हणूनच पुन: आली आहेत. नाहीतर ती निरर्थक होतील.

माया म्हणजे मय-विद्या, कल्पकता, रचना-कौशल्य, आणि बुद्धि म्हणजे वस्तुयाथार्थ्य हेरण्याची शक्ति, माया हे हस्तलाधव आहे, तर बुद्धि हे तत्त्वनिर्णयवैशारद्य आहे. कोणी किती हि कल्पक झाला, तरी त्याला ही सर्वाश्चर्यमय विश्वरचना करता यावयाची नाही. कोणी किती हि बुद्धिमान् झाला तरी, त्याला तिचे यथार्थ स्वरूप आकलन हावयाचें नाहीं. महाबुद्धिमान् म्हणविणारे तत्त्ववेत्तेहि त्याबाबत आपापल्या उपपत्ति बसवतात इतकेंच, त्यांत तत्वनिर्णयापेक्षा त्यांचा रुचि-निर्णयच अधिक, म्हणून महामाय आणि महाबुद्धि एक परमेश्वरच होय, त्याखालोखाल तो की जो परमेश्वराचें हें अनन्यसाधारणत्व ओळखून त्याची भक्ति करतो.

" अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधाः' भाव-समन्विता: । " गीता १० - ८.

जे परमेश्वराला भजतात ते परम बुद्धिमान् होत. 'बुद्धिमतां वरिष्ठ हनुमंताप्रमाणे जे महाभागवत तेच महाबुद्धिमान् होत.

१७४. महावीर्य
इष्ट कार्य घडवून आणण्याची क्षमता म्हणजे वीर्य होय. संतानोत्पादन- क्षमता म्हणजे वीर्य होय. कार्यक्षम बैजिक शक्ति म्हणजे वीर्य होय. बीजाच्या ठाई मौलिक शक्ति असते. कालशक्तीने परिपक्व झाले म्हणजे तें वीर्यवान् होते. पुढे त्याला योग्य भूमि, खत-पाणी आणि मशागत मिळाली म्हणजे तें समृद्ध होतें, वीर्यवत्तर होतें. एका तिळाचे दहा हजार तीळ होतात. तेव्हां त्या तिळाची वीर्यवत्ता दहा हजारपट वाढली असे म्हटले पाहिजे. पण ही वाढ मुळांत बैजिक शक्ति-संपन्न असा एक तीळ आहे म्हणून झाली. पोचट म्हणजे निर्वीर्य तिळाची तशी होणार नाही. तो स्वत:च कुजून माती व्हायचा. तेवढीच त्याची योग्यता. परमेश्वर जो या अनंत विश्वकदंबाचा बीजभूत आहे त्याचे वीर्य किती म्हणावें ? या विश्व-कदंबावर किती कदंबे लागतात ही गणति कोणी करू शकत नाही. आणि तो परमात्मा इतका वीर्यवान् आहे की त्याला त्याची खबर नाही. " किती उमलली, किती गळाली चिंता ही नच वेलीला| वीर्याची त्या ही लीला !" असा महावीर्य आहे तो परमात्मा

महाबुद्धि आणि महावीर्य या दोन क्रमिक नामांनी ब्रह्म आणि क्षत्र या दोन मुख्य वर्णाचें समाजांतील नेतृत्व सूचित होते.

१७५. महाशक्ति
शक्ति म्हणजे शक्यता प्रत्येक आम्र बीजाच्या ठाई आम्रफल निर्माण करण्याची शक्ति असते. पण प्रत्येकच बीजाच्या ठाईं फलोत्पत्ति होण्याचा संभव नसतो. ज्या बीजाच्या ठाई वीर्य आहे तिथेच फलसंभव होतो. अपक्व वा जीर्ण बीजाच्या ठाई ती क्षमता वा वीर्य नसते. परिणामावरून परिणामक्षमतेचें व क्षमतेवरून बैजिक शक्तीचें अनुमान होतें. शक्ति वीर्य विक्रम अशी ही उभारणी आहे. उत्तरोत्तर पूर्वपूर्वाधीन आहे. "अनन्तवीर्यामितविक्रमस् त्वम्' गी. ११-४०, असें विश्वरूपाचे वर्णन आले आहे त्यांत हाच क्रम आला आहे. आणि तो साभिप्राय आहे. हा तत्त्वविचार गृहीत धरून शक्ति शब्द सर्वार्थानं प्रयुक्त होतो. त्यामुळे महाशक्ति म्हणजे नि:शेष सर्व आणि सर्वविध रूपांत प्रकटणारी शक्ति होय, परमात्मा हा कर्तु-अकर्तु-अन्यथाकर्तु समर्थ आहे म्हणून तो महाशक्ति म्हणावयाचा.

१७६. महाद्युति
द्युति महणजे प्रकाश. हा विश्वरूप प्रकाश ज्याचा आहे तो महाद्युति म्हणावयाचा. हे विश्व परमात्मसत्तेची अभिव्यक्ति होय, प्रकाश होय, ज्याला प्रकाश म्हणतात तो हि परमात्मसत्तेच्या प्रकाशाचा एक किरणमात्र होय. म्हटलेच आहे

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत् तेजो विद्धि मामकम् ॥ गीता १५- १२

थोडक्यांत "तेजस् तेजस्विनामहम् । " हे सारें भौतिक तेज म्हणूनच अल्प होय आणि तें आत्मिक तेज महान् होय. ते ज्याचे अंगभूत आहे तो महाद्युति होय. जिथें तेज प्रकटते तिथें श्क्ति गृहीतच आहे. द्रव्याणूंचा स्फोट होतो तेव्हा प्रचंड शक्ति आणि तत्फलित तेज प्रकट होत असते. म्हणून महाशक्ति आणि महाधुति ही नामें कार्यकारणभावाने निगडित झाली आहेत. त्याचप्रमाणे महाबुद्धि आणि महावीर्य ही नामें हि. जियें बुद्धि आहे तिथेच वीर्य म्हणजे बल हि आहे. निर्बुद्ध शक्तीवर बुद्धिमान् जीव नेहमीच मात करीत असतात, हे आपण पाहातोच. म्हणूनच म्हटले आहे- " बुद्धिर्यस्य बलं तस्य ".

जिथे बुद्धि तिथें बल, जिथे बल तिथे सामर्थ्य, आणि जिथे सामर्थ्य तिथेच प्रभाव प्रकट होतो. म्हणून 'महाबुद्धि महावीर्य महाशक्ति महाद्युति' हा क्रम साभिप्राय होय.

१७७. अनिर्देश्य-वपु
व्यक्तीला ओळखायला त्याची काही खूण सांगतां येते. परंतु अव्यक्ताची अशी कांही खूण सांगतां येत नाही. अथवा अशी काही खूण सांगता न येणे हीच त्याची खूण. निर्देश्यमात्र बाह्यय होय, ज्ञेय होय. तद्विपरीत ज्ञातृ-स्वरूप हेच अन्तरतर आणि अनिर्देश्य म्हटले जाते. अनिर्देश्य-वपु नामाने हेच अभिप्रेत आहे. अनिर्देश्य-वपु म्हणजेच अव्यक्त-मूर्ति, अनिर्देश्य पदाने गीतेचे निर्गुण ब्रह्माचे वर्णन आठवतें.

ये त्वक्षरं अनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगं अचिन्त्यं च कूटस्थं अचलं धुवम् ॥ गीता १२ - ३

'या श्लोकांत अक्षर अनिर्देश्य अव्यक्त सर्वत्रग अचिन्त्य कूटस्थ अचल आणि धूव हे जें निर्गुणाचे नामाष्टक आलें आहे यापैकी कूटस्थ सोडून बाकीची सर्व नामें विष्णुसहस्रांत आली आहेत. सर्वत्रग ऐवजी सर्वम् आले आहे इतकेंच.

विष्णुसहस्रांत ऋषींनी परिगीत म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगांत आणि ग्रंथांत गाइलेली नामें एकत्र गुंफिली आहेत. हा सर्वसंग्रह आहे.

१७८. श्रीमान्
श्री म्हणजे संपत्ति. ज्यावर आपली मालकी असते त्याला म्हणतात संपत्ति, त्याला म्हणतात स्व. ज्यावर आपली खरी मालकी आहे, जे आपल्यापासून कोणी चोर, राजा वा मृत्यु हिरावून घेऊ शकत नाही असें आपलें धन म्हणजे आपले स्व-तत्त्व होय. तें कधी परहस्तगत होणे नाही. राजस्व राजा नेतो, देवस्व देव घेतो. पण ते खरे "स्व' नव्हे. ते अस्वच होय. जें "स्व" आहे तें देता घेता येत नाही. हे जो ओळखतो तो आत्मवान् च श्रीमान् होय. तो धनाच्या, अस्वाच्या, गतागतानें हर्षशोकाकुल होत नाही. तो सर्वकाळ समुद्रबत् परिपूर्ण असतो, अचलप्रतिष्ठ असतो. अशा श्रीमंत आणि भिकारी,पंडित आणि मूढ पुरुषाविषयी म्हटले आहे

हर्षस्थान-सहस्राणि भयस्थान-शतानि च ।
दिवसे दिवसे मूढ आविंशन्ति न पण्डितम् ॥ - भारतसावित्री

१७९. अमेयात्मा
जें मानविषय होतें तें मेय होय. परमात्मा हा असा कोणाला हि आणि कशाने हि मेय होत नाही, म्हणून तो अमेय-स्वरूप होय. तो स्वानुभूत्येकमान आहे. तो केवळ स्वसंवेद्य आहे. मेयमात्र दिक् काल आणि कार्यकारण-भाव यांच्या योगें अवच्छिन्न आहे. परमात्मा हा तसा नाही. तो सर्वतोनन्त आहे. मेयमात्र ज्ञेय होय, अमेय परमात्मा हा ज्ञातृस्वरूप आहे, केवळ चिद्रूप आहे. म्हणून कवि त्याचे वर्णन

दिक्-कालाद्यनवच्छिन्नानन्त-चिन्मात्र-मूर्तये
स्वानुभूत्येकमानाय नमः शान्ताय तेजसे - वैराग्य शतक

अशा शब्दांत करून त्याला नमन करीत असतात.

१८०. महाद्रिधृक् (धृत)
जगांत सर्व काही चळत असतें, स्थानच्युत होत असतें. जो चळत नाही, आपलें स्थान सोडत नाहीं तो डोंगर च अद्रि होय, अचल होय. पण हे डोंगर हि लहान-मोठे असतात. ज्याच्यापासून डोंगरांचे फाटे निघतात असे जे मूळ आणि मोठे पर्वत त्यांना महाद्रि वा कुलाचल म्हणतात. आणि जे त्यांचे शाखाभूत ते सामान्य अचल होत. भारतवर्षांत महेन्द्र, मलय, सह्य, शुक्तिमान्, ऋक्ष, विध्य आणि पारियात्र हे सात कुलाचल होत, धारण जसा तंबूला तसे ते या वर्षाला म्हणजे भूखंडाला धरून आहेत. कल्पान्ती मात्र हे सारे कुलाचल ढळतात व ढासळतात आणि ही अद्रिकीला पृथिवी एकार्णव झालेल्या सागरांत फुटलेल्या ढेकळाप्रमाणे विरून जाते. सर्व जीवांना धारण करते ती धरणी, तिला हि ताणून धरतो तो धरणीधर, म्हणजे महाद्रि, आणि त्याला हि धारण करतो म्हणजे आपल्या जागी खिळून ठेवतो, चळू देत नाहीं तो परमात्मा महाद्रिघृत वा महाद्रिधृक् होय. ' पर्वती. बैसका न संडावी । हे माझी आण ', ज्ञानदेवी परमेश्वराच्या आशेनें पर्वत स्थिर-स्थावर आहेत. त्याचे ते अंकित आहेत, म्हणून परमात्मा महाद्रिघृत् न्हटला आहे. मंदराचल वा गोवर्धन यांचे धारण ही तर त्याची एक अवतारलीला आहे. परमेश्वर पर्वतांना उत्रीप्रमाणें नाहीं धारण करीत, तर गुरुत्वाकर्षणरूप आपल्या स्वाभाविक शक्तीने धारण करीत आहे. हे झालें महाद्रिधृत्.

महाद्रिधृक् म्हणजे महाद्रीचे धर्षण करणारा, त्यांना तुच्छ लेखणारा. या धृष् धातु च्या पक्षीं हि वरील विवेचन उपयोगी होईल. महाद्रींना त्याने पाठकुळी घेतलें, छत्रीप्रमाणे धरले याचा अर्थ त्यांची खेळणी केली असा होतो. कल्पांती त्यांना ढेकळांप्रमाणे तो प्रलय-पयोधीत भिरकावून देतो. म्हणून तो महानिधृक् म्हणावयाचा.

धृक् हे रूप धृष् धातूचेच कल्पिण्याचे कारण नाहीं. तें धृ चेच धृत् प्रमाणे असलेले वेगळे रूप आहे. धृक् हा पाठ ग्राह्य.

महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गत्तिः ।
अनिरुध्दः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ॥२०॥


१८१. महेष्वास
महान् इष्वास, मोठे धनु, ज्याचें तो महेष्वास होय. लहान कमानीची फेक लहान, मोठीची मोठी. म्हणून ज्याचे धनुष्य मोठे त्याच्या बाणाची फेक लांब पल्ल्याची आणि जोरदार होणार. अर्थात् असे मोठे आणि दणकट धनुष्य पेलणारे भुजदंड हि तसेच मोठे बळकट असणार, ईश्वराहून अधिक बलशाही कोण आहे ? आणि त्याच्या संहारशक्तीला वश न होणारा कोण आणि कुठें आहे ? तो अंतकाचा हि अंतक आहे. म्हणून तो महेष्वास म्हटला आहे. सागरपार लंका, तिच्या कडेकोट बंदोबस्तांत राहणारा रावण, पण तो हि त्याच्या रामबाणाने गतप्राण झाला ना ! विश्वांत असें स्थान नाहीं की जिथे त्याची पोंच नाहीं, विश्वांत असें कांहीं नाहीं की जे त्याच्या कालशक्तीच्या तडाख्यांतून सुटलें आहे.

१८२. महीभर्ता
ही समुद्रवसना पर्वतस्तनमंडला विशाल पृथ्वी सर्व जीवांना धारण करणारी आणि त्यांचे भरण करणारी आहे. त्यामुळेच ती मही या महत्पदवीस पात्र झाली आहे, नाहीतर तिच्याहून मोठे ग्रहगोल काय कमी पडले आहेत ? पण तिथे जीव नाहीत. कारण तिथे जीवनोपाय नाही. तो या पृथ्वीवर आहे. अशी तिची महती आहे. म्हणून ती मही आहे. पण या महीहून हि तो परमात्मा महत्तर आहे. कारण तोच या महीचा भर्ता आहे. तिला निर्मिणारा, तिला उर्वर बनविणारा, तिच्या ठाई आपलें बीज पेरून तिला सस्यश्यामल बनविणारा आणि अशा प्रकारे तिचे भरण करणारा तो भर्ता आहे. तो सर्व जीवांचा पिता आहे, पृथ्वी ही त्याची भार्या सर्व जीवांची जननी आहे. "माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्याः" पण आमचा "बीजप्रदः पिता" तो परमात्मा आहे. म्हटलेच आहे " गां आविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । "

मही आणि महीभर्ता यांचे हे असें महिमान असल्यामुळे आम्ही गात असतो:

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादपर्श क्षमस्व में ||

१८३. श्रीनिवास
च्या अंगावर जितके अधिक अलंकार तितका तो अधिक श्रीमंत, श्रीनिवास, म्हटला जातो. तेंच ज्याच्या अंगावर जितके अधिक अलंकार तितका तो अधिक सुंदर हि म्हटला जातो. अशी ही दुहेरी श्री आहे. या दुहेरी अर्थानं परमेश्वर हा श्री-निवास आहे. हे श्री-निवासत्व दाखविण्यासाठी त्याच्या सर्वांगी अलंकार लेवविले जातात. कारण तो सर्वांगसुंदर आहे ना ? एखाद्या अंगोपांगावर अलंकार नसेल तर तेवढाच तो श्री-हीन व्हायचा ! परमेश्वराचें हें श्रीनिवासत्व चित्रित करण्यासाठी कवि त्याला सर्वाभरणभूषित वर्णितात, तसेंच कमलाकर म्हणून हि वर्णीत असतात. मुखकमल, नेत्रकमल, करकमल, पदकमल इत्यादि प्रकारे त्याचे शरीरगत निर्मलत्व, सुगंधत्व, सुकुमारत्व आणि रक्तत्व लक्षून त्याला सुषमाधाम म्हणून सर्वांगी कमलाने अलंकृत करीत असतात.

सर्व सत्ता सताची आहे आणि म्हणून विश्वांतील सर्व संपत्तीचा, सर्वस्वाचा, स्वामी तो परमेश्वर आहे. त्याच प्रमाणे सर्द शोभा हि, जो आहे त्याचीच आहे. असताला मुळी सत्ताच नाही. तो कसा प्रकाशणार, कसा शोभणार ? परमेश्वर हाच एकमात्र सत् असून बाकी सारे असत् आहे. . त्यामुळे परमेश्वर हा श्री-निवास होय.असताच्या दैन्याची आणि विशोभतेची, कुरूपतेची, कहाणी ज्ञानदेवाने " कांटयाच्या अणीवर वसले तीन गांव " या आपल्या अप्रतिम भारुडांत भरपूर गाइली आहे.

१८४. सतांगति
इह-जीवन संपवून जीव जिथे जातो, त्या पर-लोकाला गति असे म्हणतात. आतां ही गति सर्वांची समान असणार नाही. समान सर्वाची राख होईल. पण गति ? ती तर यथाकर्म यथावतच होणार. त्याबाबत "अन्ते मति: सा गति: " असा नियम आहे. जड भरत त्याचे उदाहरण आहे. ही अंतकालीन मति जीवनाने लक्ष्य निश्चित करून तव आमरण किंबहुना जन्म-जन्मांतरी जे झुंजत राहतात त्यांनाच प्राप्त होते. " मां अनुस्मर युध्यच " मध्ये गीतेने हाच आदेश दिला आहे. सामान्यत: सर्व जीव वासनाधीन होऊन जगत आणि मरत असतात. मनुष्य हि वासनाधीन असला तरी त्याच्या ठाई विचारोदय हि आहे. हे विचार वा संकल्प ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे अनन्त आहेत. त्यांतून. संत-सज्जनांच्या आवडी वा श्रद्धा, त्यांचे विचार, त्यांची जीवने यांची जी काय परिणति होते ती सारी "सतांगति" होय. सर्व जलप्रवाह जसे शेवटी समुद्रात एकवटतात तसे सर्व संतांचे जीवन-प्रवाह शेवटी जिथे एकवटतात तो सज्जीवन-एकार्णव म्हणजे परमेश्वर होय. परमेश्वराची याहून सुगम आणि सुंदर, निश्चित आणि व्यापक व्याख्या दुसरी काय बरे असू शकेल ? नदी पवित्र होय. दोन नद्यांचा संगम पवित्रतर होय आणि त्रिवेणी संगम परम पवित्र. पण जिथे सर्वच नद्या एकवटतात तो सर्व-संगम सागर महातीर्थ होय, तसा परमात्मा हा सर्व महात्म्यांचा महासंग्रह होय. हाच तो क्षीरसागर होय की ज्यांत भगवान् विष्णु पहुडला आहे.

१८५. अनिरुद्ध
योगाची व्याख्या चित्तवृत्तींचा निरोध अशी केली आहे. जिचा निरोध होतो ती निरुद्ध शक्ति नष्ट होते. शरीराचा नाश होतो हे आपण पाहतोच, पण दृश्य शरीर नाश पावलें तरी त्याबरोबर अदृश्य वासनामय लिंग शरीर नाश पावत नाही. तें लोकांतरास जातें, येते. पण ज्ञानाने त्या वासनाच नाहीशा झाल्या म्हणजे त्या अदृश्य पण लोकलोकांतरसंचारी लिंग शरीराचा हि निरोध होतो. पण परमेश्वरी संकल्प जोंवर आहे तोवर या लिंगशारीराच्या नाशानंतर हि उपादानभूत अव्यक्त असे कारण-शरीर शिल्लकच राहते. तें हि जेव्हा परमात्मा कल्पान्ती सबंध विश्वसृष्टि गिळून केवळ निरुपाधि होऊन स्वस्थ असतो तेव्हां निरुद्ध होते. आणि ही जी निरुपाधिक केवल-स्वरूप आत्मसत्ता तिचा निरोध केव्हां हि होत नाही. म्हणून तीच एकमात्र अनिरुद्ध होय. तदितर सारें आब्रह्मस्तंबपर्यंत निरुद्ध होय. कारण-शरीराचा निरोध हे परमेश्वरी क्षेत्र असल्यामुळे चित्तवृत्ति-निरोध, वासनाक्षय अथवा मनोनाश एवढेच पुरुषकाराचें क्षेत्र मानावे लागते. आणि म्हणून योगाची म्हणजे स्वरूपोपलब्धीची व्याख्या चित्तवृत्तिनिरोध अशी केली गेली आहे.

सात्वततंत्रांत अनिरुद्ध हा चतुर्व्यूहांपैकी एक मानिला आहे. तिथे हि तो तुरीयच आहे; १ वासुदेव, २. संकर्षण, ३. प्रद्युम्न आणि ४. अनिरुद्ध.

१८६. सुरानन्द
कोणी कितीहि दु:खी असला तरी केवळ निरानन्द असा जीव सांपडावयाचा नाही. कारण आनंद हा मुळी त्याचा स्वभावच आहे. त्याची उत्पत्ति, स्थिति आणि गति सर्व आनदांतच होत असते. पण हा आनंद सर्वांचा समान असत नाही. पशूंचा आनंद नि मानवांचा आनंद एक नाही. तसा मानवांचा आणि देवांचा हि एक नाहीं. पशूचा पाशव आनंद पिंड-पोषणपर, मानवांचा मानव आनंद इन्द्रियतोषणपर आणि देवांचा दैव आनंद आत्मप्रसादपर असतो. " सुखं आत्यन्तिकं यत् तत् बुद्धिग्राहयं अतीन्द्रियम् " म्हणून जे म्हटले आहे तोच सुरानन्द होय. " योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तयान्तर्ज्योतिरेव यः" तोच सुर होय, आणि त्याचा जो आनंद निर्वाणपर स्वास्थ्यरूप तोच सुरानन्द होय. परमात्माच जीवाचा परमानन्द होय. आणि तो दैवी गुणांची उपासना करणाऱ्या देवांना प्राप्त होत असतो. " नदीमुखेनैव समुद्र आविशेत्' या न्यायाने दैवी गुणोपासनेच्या द्वारे साधक आणि समाज सुखसागरांत प्रविष्ट होतात. व्यक्तीची साधना आणि समाजाचे शासन नव्हे तर अनुशासन दैवी गुणांच्या आधारे व्हायला पाहिजे. त्यायोगेंच " आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चोहिकडे."

सुरांचा आनंद तो सुरानंद, अथवा सुरांना आनंदवितो तो सुरानंद. कोणत्याहि प्रकारें समास सोडवला वा व्युत्पादिला तरी अर्थात फरक नाही. आध्यात्मिक सुख हेंच परमात्म्याचे स्वरूप होय. म्हणून तो म्हणायचा सुरानंद.

१८७. गोविन्द
गोविन्द शब्द गो नि विद् पदांपासून व्युत्पादिला जातो. आणि गो चे व विद् चे विविधार्थ घेऊन प्रतिपादिला जातो. गो म्हणजे गमनशील, चरणशील तत्त्व, आकाशांत गो म्हणजे किरणें, अंतरिक्षांत जलें आणि पृथ्वीवर गाई. आधिभौतिक अर्थ इन्द्रिये, आधिदैविक विविध वाणी, आध्यात्मिक बुद्धि वा ज्ञाने. विद् धातूचे जाणणे आणि मिळवणे असें मुख्य दोन अर्थ आहेत. दोहोंना एकवटून, शोधून हुडकून गोळा करणे, स्वाधीन करणे असा अर्थ होतो.

आत्मा हा इंद्रियांचा, वाणीचा आणि मनाचा शास्ता आहे. तो चरायला गेलेल्या इन्द्रियांना, वाणींना गाणि मनोवृत्तींना गोळा करुन स्वायत्त करतो, म्हणून तो गोविन्द होय.

परमात्मा हा गोधनाचा वाग्धनाचा आणि चित्तवित्ताचा अर्थात् सर्वस्वाचा स्वामी आहे, म्हणून तो गोविंद म्हटला आहे. गो म्हणजे पृथ्वी. तद्गत धन तें सारें गोधन होय, ' गा: विन्दते इति गोविन्दः ह्या व्युत्पत्तीबरोबर 'गोभिर् विन्द्यते इति गोविन्दः' अशी हि व्युत्पत्ति लावली पाहिजे. गाय गोठयांत परत येते, पक्षी घरट्यात परत येतो त्याप्रमाणे इन्द्रिये, वाणी, चित्तवृत्ति सर्व आत्म्याच्या ठाई येऊन विसांवतात, त्याला हुडकून काढतात म्हणून हि तो गोविन्द होय.

गोपाल कृष्णाने गाईंची अपरंपार सेवा केली. त्यामुळे तो गाईंना परमप्रिय झाला होता. त्या त्याला गोविंद म्हणून हाक मारीत. " गोभिर् निगदित-गोविन्यस्फुटनामानम् "-शंकराचार्य, अर्थात् गोविंद म्हणजे गोपेन्द्र, पशूत आणि पशुपालांच्या भाषेत गोपेन्द्र, गोविंद झालें आहे.

१८८, गोविदांपति
गो म्हणजे गूढ वाणी अर्थात् वेद. त्या गूढ वाणीचे जे वेत्ते ते गोविद् होत. अशा गोविदांचा जो पति म्हणजे पालक मालक चालक, तो गोविदा पति परमेश्वर होय. परमेश्वर केवळ गोविद् नव्हे किंवा गोविंदावर हि नव्हे. तो त्या सर्व गोविदांचा पति आहे, स्वामी आहे. सर्व गोविद् म्हणजे अध्यात्मवेत्ते त्याचे आज्ञाधारक आहेत. परमेश्वराचा मला असा आदेश झाला आहे असे म्हणून ते जे काय करायचे तें करतात. त्यांच्या लोकविलक्षण कृतीचे जगाला कोडे पडते. पण ते गोविद् परमेश्वरी आदेशाप्रमाणे चालत असतात. या गोविदांना कोणी संत, कोणी पैगंबर, कोणी मसीहा म्हणतात. परंतु ते सगळे असतात पवित्र अंत:करणांतून येणाऱ्या त्या अशब्द वाणीचे श्रोते, मन्ते, बोद्धे, विज्ञाते आणि कर्ते. या वेदवाणीचें, या परमेश्वरी आदेशांचे वर्णन वेदांनी 'सोमः पवित्रं अत्येति रेभन्' असें केले आहे. तो सोम, तो ईश्वरी आदेश पवित्र अंत:करणांतून जणू गर्जत येतो, दरडावत येतो. तो आदेश असा नसतो की त्याची कोणी अवज्ञा करूं शकेल, श्रोत्याला तो सर्वात्मना पाळावाच लागतो. संदेश म्हणजे निरोप. तो संदेष्ट्यांच्या द्वारा मिळतो. पण आदेश हा कोणा मध्यस्थाच्या द्वारा मिळत नाहीं, तो सरळच मिळत असतो. असे आदेश, अशी अशरीरिणी वाणी अनुगृहीत सत्-पुरुषांना, साक्षात्कारी पुरुषांना, प्राप्त झाल्याचे दाखले इतिहासांत अनेक आढळतात, थेट अनादि कालापासून आजतागायत.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP