PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ७१ ते ८०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७१ (ब्रह्मज्ञान प्रशंसासूक्त)

ऋषी - बृहस्पति आंगिरस : देवता - ज्ञान : छंद - ९ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ


बृह॑स्पते प्रथ॒मं वा॒चो अग्रं॒ यत् प्रैर॑त नाम॒धेयं॒ दधा॑नाः ।
यदे॑षां॒ श्रेष्ठं॒ यद॑रि॒प्रं आसी॑त् प्रे॒णा तदे॑षां॒ निहि॑तं॒ गुहा॒विः ॥ १॥

बृहस्पते प्रथमं वाचः अग्रं यत् प्र ऐरत नाम-धेयं दधानाः
यत् एषां श्रेष्ठं यत् अरिप्रं आसीत् प्रेणा तत् एषां नि-हितं गुहा आविः ॥ १ ॥

हे प्रार्थनासूक्तांच्या प्रभो बृहस्पते, (देवा, तुझ्या) दिव्य वाणींनी प्रत्येक वस्तुमात्राला नामाभिधान देऊन, जें कांही प्रथम आणि मूळ (स्फुरण) उत्पन्न केले, पण त्या (स्फुरलेल्या स्फूर्ति) मध्यें जें कांही श्रेष्ठ आणि निष्कलंक होते, ते त्यांच्यांत गुप्तच होते. पण देवा, तुझ्याच प्रेमामुळे तें (भक्तांना) प्रकट झाले १.


सक्तुं॑ इव॒ तित.अ॑उना पु॒नन्तो॒ यत्र॒ धीरा॒ मन॑सा॒ वाचं॒ अक्र॑त ।
अत्रा॒ सखा॑यः स॒ख्यानि॑ जानते भ॒द्रैषां॑ ल॒क्ष्मीर्निहि॒ताधि॑ वा॒चि ॥ २ ॥

सक्तुम्-इव तित-उना पुनन्तः यत्र धीराः मनसा वाचं अक्रत
अत्र सखायः सख्यानि जानते भद्रा एषां लक्ष्मीः निहिता अधि वाचि ॥ २ ॥

सातू ज्याप्रमाणे चाळणीने चाळून किंवा सुपाने घोळून निर्मळ करून घेतात, त्याप्रमाणे शुद्ध बुद्धीचे सत्पुरुष (प्रत्यक्ष न बोलतां) आपल्या अंत:करणानेंच भाषण करीत असतात; अश वेळीं [ईश्वराला] जें प्रिय झालेले असतात तेच त्या भाषणांतील त्यांतील मर्म (=रहस्य) ओळखतात. आणि अशा (सत्पुरुषां)च्याच वाणीच्या ठिकाणी मंगलरूप जी लक्ष्मी (यशस्वीता) ती राहिलेली असते २.


य॒ज्ञेन॑ वा॒चः प॑द॒वीयं॑ आय॒न् तां अन्व् अ॑विन्द॒न्न् ऋषि॑षु॒ प्रवि॑ष्टाम् ।
तां आ॒भृत्या॒ व्यदधुः पुरु॒त्रा तां स॒प्त रे॒भा अ॒भि सं न॑वन्ते ॥ ३ ॥

यजेन वाचः पद-वीयं आयन् तां अनु अविन्दन् ऋषिषु प्र-विष्टां
तां आभृत्य वि अदधुः पुरु-त्रा तां सप्त रेभाः अभि सं नवन्ते ॥ ३ ॥

यज्ञाच्या योगाने (सत्पुरुष) ज्ञानरूपवाणीच्या मार्गाला लागले. ती (दिव्य) वाणी त्या पुरुषांना ऋषींच्या (अंत:करणां)त प्रविष्ट झालेली आढळली. तिला तेथून आपल्या स्वाधीन करून घेऊन त्यांनी तिची निरनिराळ्या प्रकारांनी योजना केली म्हणून तिला अनुलक्षून सात कवि स्तोत्रगायन करीत असतात ३.


उ॒त त्वः॒ पश्य॒न् न द॑दर्श॒ वाचं॑ उ॒त त्वः॑ शृ॒ण्वन् न शृ॑णोत्येनाम् ।
उ॒तो त्व॑स्मै त॒न्व१ं वि स॑स्रे जा॒येव॒ पत्य॑ उश॒ती सु॒वासाः॑ ॥ ४ ॥

उत त्वः पश्यन् न ददर्श वाचं उत त्वः शृण्वन् न शृणोति एनां
उतो इति त्वस्मै तन्वं वि सस्रे जायाइव पत्ये उशती सु-वासाः ॥ ४ ॥

कोणी असा असतो कीं त्याला डोळ्यांनी इतर सर्व दिसत असूनसुद्धां दिव्य वाणी मात्र दिसत नाही. आणि एखादा मात्र पण तो क्वचितच-असा निघतो कीं ती दिव्य वाणी त्यालाच आपली काया नाना तर्‍हेने दाखवीत असते, की जणों काय उत्कण्ठित झालेली आणि वस्त्राभरणांनी मण्डित अशी पत्नीच पतीकडे जाते ४.


उ॒त त्वं॑ स॒ख्ये स्थि॒रपी॑तं आहु॒र्नैनं॑ हिन्व॒न्त्यपि॒ वाजि॑नेषु ।
अधे॑न्वा चरति मा॒ययै॒ष वाचं॑ शुश्रु॒वाँ अ॑फ॒लां अ॑पु॒ष्पाम् ॥ ५ ॥

उत त्वं सख्ये स्थिर-पीतं आहुः न एनं हिन्वन्ति अपि वाजिनेषु
अधेन्वा चरति मायया एषः वाचं शुश्रु-वान् अफलां आपुष्पाम् ॥ ५ ॥

असें घडलें म्हणजेच तो तिच्या प्रेमांत पक्का गढून गेला असे म्हणतात; इतका की कोणत्याहि सत्त्वपराक्रमाच्या कार्यापासून त्याला कोणीं परावृत्त करूं शकत नाही. परंतु दुसरा (इतरेजनांपैकी जो असतो तो) मात्र मायेने भुलून जाऊन नुसताच वणवण करीत भटकतो; त्याला नाना प्रकारची भाषणे ऐकू येतात. पण त्यांत फुलोरा नाही आणि फलप्राप्ति तर नाहीच नाही ५.


यस्ति॒त्याज॑ सचि॒विदं॒ सखा॑यं॒ न तस्य॑ वा॒च्यपि॑ भा॒गो अ॑स्ति ।
यदीं॑ शृ॒णोत्यल॑कं शृणोति न॒हि प्र॒वेद॑ सुकृ॒तस्य॒ पन्था॑म् ॥ ६ ॥

यः तित्याज सचि-विदं सखायं न तस्य वाचि अपि भागः अस्ति
यत् ईं शृणोति अलकं शृणोति नहि प्र-वेद सु-कृतस्य पन्थाम् ॥ ६ ॥

जो सत्यज्ञान जाणतो अशा मित्राचा ज्याने त्याग केला आहे त्याला दिव्य वाणी(च्या प्रेमां)मध्यें कांहीएक लभ्यांश प्राप्त होत नाही. तो जे कांही ऐकतो ते व्यर्थ बाष्कळ असेंच ऐकतो. सत्कर्माचरणाचा मार्ग तो जाणतच नाही ६.


अ॒क्ष॒ण्वन्तः॒ कर्ण॑वन्तः॒ सखा॑यो मनोज॒वेष्व् अस॑मा बभूवुः ।
आ॒द॒घ्नास॑ उपक॒क्षास॑ उ त्वे ह्र॒दा इ॑व॒ स्नात्वा॑ उ त्वे ददृश्रे ॥ ७ ॥

अक्षण्-वन्तः कर्ण-वन्तः सखायः मनः-जवेषु असमाः बभूवुः
आदघ्नासः उप-कक्षासः ओं इति त्वे ह्रदाः-इव स्नात्वाः ओं इति त्वे ददृश्रे ॥ ७ ॥

पुष्कळ (जण एकमेकांचे) मित्र असतात. त्या सर्वांना डोळे असतात. पण मनाच्या प्रवृत्तींत मात्र फरक असतो. त्या कारणानें त्या प्रत्येकाच्या महत्वामध्यें कमीजास्तपणा असतो. ज्याप्रमाणें कांही जलाशय गळ्याइतके खोल आणि कांही तर कमरेइतकेच असतात. परंतु दुसरे कांही बुडी मारून स्नान करण्याला योग्य अशा डोहांप्रमाणे अथांग खोल असलेले पाहण्यात येतात ७.


हृ॒दा त॒ष्टेषु॒ मन॑सो ज॒वेषु॒ यद्ब्रा॑ह्म॒णाः सं॒यज॑न्ते॒ सखा॑यः ।
अत्राह॑ त्वं॒ वि ज॑हुर्वे॒द्याभि॒रोह॑ब्रह्माणो॒ वि च॑रन्त्यु त्वे ॥ ८ ॥

हृदा तष्टेषु मनसः जवेषु यत् ब्राह्मणाः सम्-यजन्ते सखायः
अत्र अह त्वं वि जहुः वेद्याभिः ओह-ब्रह्माणः वि चरन्ति ओं इति त्वे ॥ ८ ॥

अन्त:करणाने ज्यांचा निश्वय ठरलेला असतो आणि मनाच्या सत्प्रवृत्तीमध्यें तल्लीन झाल्याने परस्परांचे मित्र असलेले असे विद्वान ब्राह्मण ज्यावेळी एकत्र मिळून (ज्ञान) यज्ञ करतात; तेव्हां ते आपल्या सत्य विद्येने अज्ञानांना सहजच मागें टाकतात आणि श्रेष्ठतम ज्ञान प्राप्त हो‍ऊन मग ते ठिकठिकाणी संचार करतात ८.


इ॒मे ये नार्वाङ् न प॒रश्चर॑न्ति॒ न ब्रा॑ह्म॒णासो॒ न सु॒तेक॑रासः ।
त ए॒ते वाचं॑ अभि॒पद्य॑ पा॒पया॑ सि॒रीस्तन्त्रं॑ तन्वते॒ अप्र॑जज्ञयः ॥ ९ ॥

इमे ये न अर्वाक् न परः चरन्ति न ब्राह्मणासः न सुते--करासः
ते एते वाचं अभि-पद्य पापया सिरीः तन्त्रं तन्वते अप्र-जजयः ॥ ९ ॥

आणि हे जे (अज्ञानी) असतात ते येथे (इह लोकीं) सुद्धां कांही साधून घेत नाहीत. आणि परलोकांसंबंधाने तर कांहीहि साधून घेत नाहीतच नाही. ते ब्राह्मण म्हणजे सत्यज्ञानी नसतात किंवा नुसते सोमपान (करून सेवा) करणारेहि नसतात, असे ते मूढजन (ईश्वरी) वाणीच्या सन्निध असून (म्हणजे ती माहित असून) देखील पापवासना उराशी बाळगून आपल्याच बुद्धीने कांही तरी तन्त्र चालवीत असतात ९.


सर्वे॑ नन्दन्ति य॒शसाग॑तेन सभासा॒हेन॒ सख्या॒ सखा॑यः ।
कि॒ल्बि॒ष॒स्पृत् पि॑तु॒षणि॒र्ह्येषां॒ अरं॑ हि॒तो भव॑ति॒ वाजि॑नाय ॥ १० ॥

सर्वे नन्दन्ति यशसा आगतेन सभासाहेन सख्या सखायः
किल्बिष-स्पृत् पितु-सणिः हि एषां अरं हितः भवति वाजिनाय ॥ १० ॥

पण जे कोणी प्रेमळ असतात, ते यशस्वी हो‍ऊन आणि सभा जिंकून मित्राने आगमन केले असता आनंदित होतातच. असा जो मित्र पापनाशक आणि सर्वांचे पालनपोषण करणारा होतो आणि ओजस्वी शौर्याचे महत्कृत्य करण्याला तो समर्थ होतो १०.


ऋ॒चां त्वः॒ पोषं॑ आस्ते पुपु॒ष्वान् गा॑य॒त्रं त्वो॑ गायति॒ शक्व॑रीषु ।
ब्र॒ह्मा त्वो॒ वद॑ति जातवि॒द्यां य॒ज्ञस्य॒ मात्रां॒ वि मि॑मीत उ त्वः ॥ ११ ॥

ऋचां त्वः पोषं आस्ते पुपुष्वान् गायत्रं त्वः गायति शक्वरीषु
ब्रह्मा त्वः वदति जात-विद्यां यजस्य मात्रां वि मिमीते ओं इति त्वः ॥ ११ ॥

(यज्ञामध्ये) एक ऋत्विज्‌ ऋच्यांच्या विनियोगांत निष्णात असतो, तो ऋचांचा प्रयोग उत्कृष्टपणे करतो. दुसरा एक ऋत्विज‌ (ऋचांचेच) सामगायन करतो. एक ऋत्विज्‌ ज्याला ब्रह्मा म्हणतात तो यज्ञकर्माच्या पद्धतीची माहिती सांगतो आणि एक ऋत्विज यज्ञाच्या तंत्राची योजना ठरल्याप्रमाणें करतो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७२ (अदिति आत्मकथन, सृष्ट्युत्पत्तिसूक्त)

ऋषी - बृहस्पति लौक्य अथवा बृहस्पति आंगिरस अथवा अदिति दाक्षायणी
देवता - देवगण : छंद - अनुष्टुभ्


दे॒वानां॒ नु व॒यं जाना॒ प्र वो॑चाम विप॒न्यया॑ ।
उ॒क्थेषु॑ श॒स्यमा॑नेषु॒ यः पश्या॒दुत्त॑रे यु॒गे ॥ १॥

देवानां नु वयं जाना प्र वोचाम विपन्यया
उक्थेषु शस्यमानेषु यः पश्यात् उत्-तरे युगे ॥ १ ॥

आम्हीं आतां विशेष प्रकारच्या (रम्य) स्तुतीने दिव्यजनांच्या उत्पत्तीचे वर्णन करणार आहोत. म्हणजे (त्या योगाने) जेव्हां सामगायन होईल, तेव्हां पुढील पिढींत (=युगांत) प्रत्येकाला त्याचे ज्ञान होत जाईल १.


ब्रह्म॑ण॒स्पति॑रे॒ता सं क॒र्मार॑ इवाधमत् ।
दे॒वानां॑ पू॒र्व्ये यु॒गेऽ॑सतः॒ सद॑जायत ॥ २ ॥

ब्रह्मणः पतिः एता सं कर्मारः-इव अधमत्
देवानां पूर्व्ये युगे असतः सत् अजायत ॥ २ ॥

कर्मकार ज्याप्रमाणे भट्टी फूंकून (हव्या त्या) वस्तू तयार करतो, त्याप्रमाणे ब्रह्मणस्पतीने ह्या सृष्टीची उत्पत्ति केली. (ती अशी कीं) दिव्यविबुधांच्या पहिल्याच युगांत "असत्‌" वस्तूपासून "सत्‌" निर्माण झाले (म्हणजे) अदृश्यापासून दृश्य, अव्यक्तापासून व्यक्त वस्तू निर्माण झाल्या २.


दे॒वानां॑ यु॒गे प्र॑थ॒मेऽ॑सतः॒ सद॑जायत ।
तदाशा॒ अन्व् अ॑जायन्त॒ तदु॑त्ता॒नप॑द॒स्परि॑ ॥ ३ ॥

देवानां पूर्व्ये युगे असतः सत् अजायत
तत् आशाः अनु अजायन्त तत् उत्तान-पदः परि ॥ ३ ॥

याप्रमाणे दिव्यविभूतींच्या पहिल्या युगांत "असत्‌" वस्तूपासून "सत्‌" असें विश्व उत्पन्न झाले, त्याच्या अनुरोधाने दिशा म्हणजे आकाश उत्पन्न झाले, ते अत्युच्च अशा उत्पादक शक्तीपासून उत्पन्न झाले ३.


भूर्ज॑ज्ञ उत्ता॒नप॑दो भु॒व आशा॑ अजायन्त ।
अदि॑ते॒र्दक्षो॑ अजायत॒ दक्षा॒द्व् अदि॑तिः॒ परि॑ ॥ ४ ॥

भूः जजे उत्तान-पदः भुवः आशाः अजायन्त
अदितेः दक्षः अजायत दक्षात् ओं इति अदितिः परि ॥ ४ ॥

त्याच उच्च शक्तीपासून पृथिवी उत्पन्न झाली. पृथिवीपासून (पूर्व-पश्चिम इत्यादि) दिशा झाली. नंतर अनिर्बंधता (अदिति); आणि त्याच्यापासून चातुर्यबल उत्पन्न झाले आणि त्याच बलापासून अदिति (म्हणजे स्वाधीनता) प्रकट झाली ४.


अदि॑ति॒र्ह्यज॑निष्ट॒ दक्ष॒ या दु॑हि॒ता तव॑ ।
तां दे॒वा अन्व् अ॑जायन्त भ॒द्रा अ॒मृत॑बन्धवः ॥ ५ ॥

अदितिः हि अजनिष्ट दक्ष या दुहिता तव
तां देवाः अनु अजायन्त भद्राः अमृत-बन्धवः ॥ ५ ॥

हे (चातुर्यबलरूप) दक्षा, तुझी कन्या जी अदिति ती त्यानंतर उत्पन्न झाली; नंतर दिव्यविबुध उत्पन्न झाले, ते मंगलस्वरूप आणि अमरत्वाचे बंधूच होत ५.


यद्दे॑वा अ॒दः स॑लि॒ले सुसं॑रब्धा॒ अति॑ष्ठत ।
अत्रा॑ वो॒ नृत्य॑तां इव ती॒व्रो रे॒णुरपा॑यत ॥ ६ ॥

यत् देवाः अदः सलिले सु-संरब्धाः अतिष्ठत
अत्र वः नृत्यताम्-इव तीव्रः रेणुः अप आयत ॥ ६ ॥

दिव्यविबुधांनो, जेव्हां तुम्ही त्या उदकामध्ये एकमेकांना अगदी चिकटून उभी राहिलां, तेव्हां नाचत असतांना पावलांनी धूळ उडावी त्याप्रमाणे तेथून दाट धूलिपटल वर उडाले ६.


यद्दे॑वा॒ यत॑यो यथा॒ भुव॑ना॒न्यपि॑न्वत ।
अत्रा॑ समु॒द्र आ गू॒ळ्हं आ सूर्यं॑ अजभर्तन ॥ ७ ॥

यत् देवाः यतयः यथा भुवनानि अपिन्वत
अत्र समुद्रे आ गूळ्हं आ सूर्यं अजभर्तन ॥ ७ ॥

हे दिव्यविबुधांनो, तुम्ही आत्मसंयमी सज्जनांप्रमाणे जेव्हां या भुवनांना (उपकारक वृत्तीने) भरून सोडलेंत, तेव्हांच समुद्रामध्यें, त्याच्या उदकांत गुप्त असलेल्या सूर्यालाही तुम्ही बाहेर आणलेत ७.


अ॒ष्टौ पु॒त्रासो॒ अदि॑ते॒र्ये जा॒तास्त॒न्व१स्परि॑ ।
दे॒वाँ उप॒ प्रैत् स॒प्तभिः॒ परा॑ मार्ता॒ण्डं आ॑स्यत् ॥ ८ ॥

अष्टौ पुत्रासः अदितेः ये जाताः तन्वः परि
देवान् उप प्र ऐत् सप्त-भिः परा मार्ताण्डं आस्यत् ॥ ८ ॥

अदितीच्या शरीरापासून जे आठ पुत्र उत्पन्न झाले त्यापैकी सात दिव्यविभूतींकडे गेले. आणि आठवा जो मार्तंड, त्याला (म्हणजे) सूर्याला मात्र त्यांनी वर आकाशांत फेकले ८.


स॒प्तभिः॑ पु॒त्रैरदि॑ति॒रुप॒ प्रैत् पू॒र्व्यं यु॒गम् ।
प्र॒जायै॑ मृ॒त्यवे॑ त्व॒त् पुन॑र्मार्ता॒ण्डं आभ॑रत् ॥ ९ ॥

सप्त-भिः पुत्रैः अदितिः उप प्र ऐत् पूर्व्यं युगं
प्र-जायै मृत्यवे त्वत् पुनः मार्ताण्डं आ अभरत् ॥ ९ ॥

याप्रमाणे अदिति आपल्या सात पुत्रांसह प्राचीन युगांत झाली. परंतु (प्राण्यांची) उत्पत्ति आणि मृत्यु हे निरंतर चालू रहावे यासाठी सूर्याला तिने पुन्हा (जगापुढे) आणले ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७३ (इंद्रसूक्त)

ऋषी - गौरिवीति शाक्त्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


जनि॑ष्ठा उ॒ग्रः सह॑से तु॒राय॑ म॒न्द्र ओजि॑ष्ठो बहु॒लाभि॑मानः ।
अव॑र्ध॒न्न् इन्द्रं॑ म॒रुत॑श्चि॒दत्र॑ मा॒ता यद्वी॒रं द॒धन॒द्धनि॑ष्ठा ॥ १॥

जनिष्ठाः उग्रः सहसे तुराय मन्द्रः ओजिष्ठः बहुल-अभिमानः
अवर्धन् इन्द्रं मरुतः चित् अत्र माता यत् वीरं दधनत् धनिष्ठा ॥ १ ॥

(दुष्टांना) झटपट दडपून टाकण्यासाठी तूं उग्र परंतु आनंदरूप, अत्यंत ओजस्वी परंतु बहुतांचा अभिमानी असा प्रकट झालास आणि या अतिविस्तीर्ण धरित्रीमातेनें तुज वीराला येथें धारण केलें तेव्हां मरुतांनीच (तुला) इंद्राला हर्षाने उत्फुल्ल केले १.


द्रु॒हो निष॑त्ता पृश॒नी चि॒देवैः॑ पु॒रू शंसे॑न वावृधु॒ष् ट इन्द्र॑म् ।
अ॒भीवृ॑तेव॒ ता म॑हाप॒देन॑ ध्वा॒न्तात् प्र॑पि॒त्वादुद॑रन्त॒ गर्भाः॑ ॥ २ ॥

द्रुहः नि-सत्ता पृशनी चित् एवैः पुरु शंसेन ववृधुः ते इन्द्रं
अभिवृताइव ता महापदेन ध्वान्तात् प्र-पित्वात् उत् अरन्त गर्भाः ॥ २ ॥

तसेंच जेव्हां तीव्रवेगाने धांवणार्‍या योद्ध्‌यांकडून पृश्नीने दुर्जनांना घेरून टाकले, तेव्हांही त्या वीरांनी स्तवन करून इंद्राची पुष्कळच स्तुति केली. त्या विशाल चरणांच्या (दुष्टांनी) ते (धेनूसमूह) जणूं झांकूनच टाकले होते; परंतु सायंकाळच्या अंध:कारातून ते (धेनू) समूह आणि (प्राण्यांची) लहन बालकेंही एकदमच बाहेर पडली २.


ऋ॒ष्वा ते॒ पादा॒ प्र यज् जिगा॒स्यव॑र्ध॒न् वाजा॑ उ॒त ये चि॒दत्र॑ ।
त्वं इ॑न्द्र सालावृ॒कान् स॒हस्रं॑ आ॒सन् द॑धिषे अ॒श्विना व॑वृत्याः ॥ ३ ॥

ऋष्वा ते पादा प्र यत् जिगासि अवर्धन् वाजाः उत ये चित् अत्र
त्वं इन्द्र सालावृकान् सहस्रं आसन् दधिषे अश्विना आ ववृत्याः ॥ ३ ॥

तुझे चरण देखील तूं गमन करतोस त्या वेळी धीरोद्धत आणि उच्च असेच दिसतात आणि (त्या योगाने) येथे जी जी सत्वाढ्यता असते, तिची अभिवृद्धि झाली आहे. इंद्रा, तूं सहस्त्रावधि लांडग्यांना (मृत्यूच्या) दाढेखाली देऊन पकडून धरतोस म्हणूनच अश्विदेव (इत्यादि विभूतींना) मी इकडे वळवून आणूं शकतो ३.


स॒म॒ना तूर्णि॒रुप॑ यासि य॒ज्ञं आ नास॑त्या स॒ख्याय॑ वक्षि ।
व॒साव्यां॑ इन्द्र धारयः स॒हस्रा॒श्विना॑ शूर ददतुर्म॒घानि॑ ॥ ४ ॥

समना तूर्णिः उप यासि यजं आ नासत्या सख्याय वक्षि
वसाव्यां इन्द्र धारयः सहस्रा अश्विना शूर ददतुः मघानि ॥ ४ ॥

(तकेंच काय पण) सत्यस्वरूप अश्विदेवांनादेखील इकडे घेऊन येतोस. हे इंद्रा, तूं सहस्त्रावधि दिव्यनिधींचे समूह (आपल्या हातांत) धारण करतोस (म्हणूनच हे वीरा, अश्विदेव आम्हांस वैभवें देतात ४.


मन्द॑मान ऋ॒तादधि॑ प्र॒जायै॒ सखि॑भि॒रिन्द्र॑ इषि॒रेभि॒रर्थ॑म् ।
आभि॒र्हि मा॒या उप॒ दस्युं॒ आगा॒न् मिहः॒ प्र त॒म्रा अ॑वप॒त् तमां॑सि ॥ ५ ॥

मन्दमानः ऋतात् अधि प्र-जायै सखि-भिः इन्द्रः इषिरेभिः अर्थं
आभिः हि मायाः उप दस्युं आ अगात् मिहः प्र तम्राः अवपत् तमांसि ॥ ५ ॥

सनातन सद्धर्मामुळे आनंदित झालेल्या इंद्राने मानवी प्रजांसाठी आपल्या प्रतापी (मरुत) मित्रांसह भक्तांचे उद्दिष्ट जो यज्ञ त्याच्याकडे गमन केले. त्याने आपल्या मायेनेंच अधार्मिक दुष्टाच्या मायेवर ताण केली आणि (राक्षसाच्या) मायेने उत्पन्न केलेले धुके आणि सर्वांना मरगळ आणणार्‍या अंध:काराचे पटल नष्ट केले ५.


सना॑माना चिद्ध्वसयो॒ न्यस्मा॒ अवा॑ह॒न्न् इन्द्र॑ उ॒षसो॒ यथानः॑ ।
ऋ॒ष्वैर॑गच्छः॒ सखि॑भि॒र्निका॑मैः सा॒कं प्र॑ति॒ष्ठा हृद्या॑ जघन्थ ॥ ६ ॥

स-नामाना चित् ध्वसयः नि अस्मै अव अहन् इन्द्रः उषसः यथा अनः
ऋष्वैः अगच्चः सखि-भिः नि-कामैः साकं प्रति-स्था हृद्या जघन्थ ॥ ६ ॥

(सज्जनांचे शत्रू हे) हे एकच समान नांव योग्य असलेल्या दोन्ही अधमांचा आपल्या भक्तासाठी तूं उच्छेद केलास. उषेचा जसा शकट (इंद्राने पूर्वी फेकून दिला होता) त्याप्रमाणे आतांहि इंद्रानेंच शत्रूला खाली आपटून ठार केले. (शत्रुवधार्थ) तळमळणार्‍या आपल्या उदात्त मित्रांसह तूं चालून गेलास आणि आपल्या निधड्या छातीने दुष्टांचा पार विध्वंस केलास ६.


त्वं ज॑घन्थ॒ नमु॑चिं मख॒स्युं दासं॑ कृण्वा॒न ऋष॑ये॒ विमा॑यम् ।
त्वं च॑कर्थ॒ मन॑वे स्यो॒नान् प॒थो दे॑व॒त्राञ्ज॑सेव॒ याना॑न् ॥ ७ ॥

त्वं जाघन्थ नमुचिं मखस्युं दासं कृण्वानः ऋषये वि-मायं
त्वं चकर्थ मनवे स्योनान् पथः देव-त्रा अजसाइव यानान् ॥ ७ ॥

आपल्याला (देव समजून) यज्ञ करावा, ह्यासाठी हापापलेल्या दुष्ट नमुचि (राक्षसा)च्या मायेच्या चिंधड्या उडवून तूं त्या राक्षसाला ऋषीकरितां ठार मारून टाकलेंस, आपल्या मनु भक्तांसाठी तूं नीतिमार्ग सुखमय केलेस, देवांकडे सरळ जातां यावे असें निर्वेध केलेस ७.


त्वं ए॒तानि॑ पप्रिषे॒ वि नामेशा॑न इन्द्र दधिषे॒ गभ॑स्तौ ।
अनु॑ त्वा दे॒वाः शव॑सा मदन्त्यु॒परि॑बुध्नान् व॒निन॑श्चकर्थ ॥ ८ ॥

त्वं एतानि पप्रिषे वि नाम ईशानः इन्द्र दधिषे गभस्तौ
अनु त्वा देवाः शवसा मदन्ति उपरि-बुध्नान् वनिनः चकर्थ ॥ ८ ॥

या गोष्टी तूं अगदी भरपूर केल्यास. हे इंद्रा, तूं विश्वाधीश आहेस, हे तुझे नांव तू आपल्याच हाती ठेवतोस. तुझाच मार्ग अनुसरून दिव्य विबुध उत्कट सामर्थ्याने हर्षित होतात. उदकपूर्ण मेघांना तूंच उर्ध्वमूल केलेंस ८.


च॒क्रं यद॑स्या॒प्स्व् आ निष॑त्तं उ॒तो तद॑स्मै॒ मध्व् इच् च॑च्छद्यात् ।
पृ॒थि॒व्यां अति॑षितं॒ यदूधः॒ पयो॒ गोष्व् अद॑धा॒ ओष॑धीषु ॥ ९ ॥

चक्रं यत् अस्य अप्-सु आ नि-सत्तं उतो इति तत् अस्मै मधु इत् चच्चद्यात्
पृथिव्यां अति-सितं यत् ऊधः पयः गोषु अदधाः ओषधीषु ॥ ९ ॥

त्याचे जे चक्र आहे ते उदकामध्ये गुप्त असते. म्हणून आमचा मधुर सोमरस त्याला प्रसन्न करो. पृथ्वीशी जणूं जखडूनच टाकलेला हा जो सोम तो एक प्रकाराने दुधाची कासच आहे. ते दुग्ध धेनूंमध्ये आणि औषधीमध्येंहि तूं ठेवले आहेस ९.


अश्वा॑दिया॒येति॒ यद्वद॒न्त्योज॑सो जा॒तं उ॒त म॑न्य एनम् ।
म॒न्योरि॑याय ह॒र्म्येषु॑ तस्थौ॒ यतः॑ प्रज॒ज्ञ इन्द्रो॑ अस्य वेद ॥ १० ॥

अश्वात् इयाय इति यत् वदन्ति ओजसः जातं उत मन्ये एनं
मन्योः इयाय हर्म्येषु तस्थौ यतः प्र-जजे इन्द्रः अस्य वेद ॥ १० ॥

व्यापक अशा आदितत्त्वापासून हा (परमात्मा इंद्र) अवतीर्ण झाला असें म्हणतात; परंतु मला वाटतें की तो ओजस्वितेपासूनच प्रकट झाला. भीषण मनापासून तो प्रादुर्भूत झाला आणि भक्तांच्या हृदयमंदिरांत राहिला. परंतु वास्तविक पाहतां तो कोठून उत्पन्न झाला हें एक स्वत: तो इंद्रच जाणतो १०.


वयः॑ सुप॒र्णा उप॑ सेदु॒रिन्द्रं॑ प्रि॒यमे॑धा॒ ऋष॑यो॒ नाध॑मानाः ।
अप॑ ध्वा॒न्तं ऊ॑र्णु॒हि पू॒र्धि चक्षु॑र्मुमु॒ग्ध्य१स्मान् नि॒धये॑व ब॒द्धान् ॥ ११॥

वयः सु-पर्णाः उप सेदुः इन्द्रं प्रिय-मेधाः ऋषयः नाधमानाः
अप ध्वान्तं ऊर्णुहि पूर्धि चक्षुः मुमुग्धि अस्मान् निधयाइव बद्धान् ॥ ११ ॥

उत्कृष्ट पंखांचे जसे पक्षी, त्याप्रमाणे नम्रपणाने प्रार्थना करणारे प्रियमेध ऋषि इंद्रासन्निध गेले. तर देवा, अंधकाराचे पटल दूर कर. आमच्या नेत्रांना तेजाने परिपूर्ण कर आणि (दौर्बल्य) पाशाने आम्हीं बद्ध झालो आहोत त्या पाशापासून आम्हांला मुक्त कर ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७४ (इंद्रसूक्त)

ऋषी - गौरिवीति शाक्त्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


वसू॑नां वा चर्कृष॒ इय॑क्षन् धि॒या वा॑ य॒ज्ञैर्वा॒ रोद॑स्योः ।
अर्व॑न्तो वा॒ ये र॑यि॒मन्तः॑ सा॒तौ व॒नुं वा॒ ये सु॒श्रुणं॑ सु॒श्रुतो॒ धुः ॥ १॥

वसूनां वा चर्कृषे इयक्षन् धिया वा यजैः वा रोदस्योः
अर्वन्तः वा ये रयि-मन्तः सातौ वनुं वा ये सु-श्रुणं सु-श्रुतः धुरितिधुः ॥ १ ॥

दिव्यनिधींच्या (प्रीत्यर्थ) यजन करण्याचे इच्छा धरोन मी एकाग्र ध्यानाने अथवा यज्ञांनी त्यांना रोदसींतून (=दिव्य लोकांतून) खाली आणतो; ते अश्वारूढ वीर आहेत आणि ऐश्वर्य संपन्नही आतेत, अथवा सर्व विख्यात अशा त्या (दिव्य विबुधां)नी (विजय) लाभाच्या प्रसंगी सर्व प्रसिद्ध अशीच यशस्विता (भक्तांपुढे) ठेविली १.


हव॑ एषां॒ असु॑रो नक्षत॒ द्यां श्र॑वस्य॒ता मन॑सा निंसत॒ क्षाम् ।
चक्षा॑णा॒ यत्र॑ सुवि॒ताय॑ दे॒वा द्यौर्न वारे॑भिः कृ॒णव॑न्त॒ स्वैः ॥ २ ॥

हवः एषां असुरः नक्षत द्यां श्रवस्यता मनसा निंसत क्षां
चक्षाणाः यत्र सुविताय देवाः द्यौः न वारेभिः कृणवन्त स्वैः ॥ २ ॥

ह्यांचा दिव्य घोष द्युलोकापर्यंत जाऊन भिडला आणि सद्यसोत्सुक मनाने त्याने पृथ्वीचेही चुंबन घेतले. या ठिकाणी विबुध भक्तकल्याणासाठी वाट पहात असतात आणि आकाश ज्याप्रमाणे उदकवृष्टींनी (भूमीला संतुष्ट करते) त्याप्रमाणे आपल्या वरदानांनी ते भक्तांना हर्षित करतात २.


इ॒यं ए॑षां अ॒मृता॑नां॒ गीः स॒र्वता॑ता॒ ये कृ॒पण॑न्त॒ रत्न॑म् ।
धियं॑ च य॒ज्ञं च॒ साध॑न्त॒स्ते नो॑ धान्तु वस॒व्य१ं असा॑मि ॥ ३ ॥

इयं एषां अमृतानां गीः सर्व-ताता ये कृपणन्त रत्नं
धियं च यजं च साधन्तः ते नः धान्तु वसव्यं असामि ॥ ३ ॥

हीच ह्या अमर दिव्यविभूतींची वाणी होय. देवसेवेमध्ये गढून गेलेल्या (भक्तावर) जे रत्नदानाची कृपा करतात, ते त्याची बुद्धि आणि यज्ञ ही दोन्ही परिपूर्ण करतात; तर ते आम्हांला अखंड वैध्यव देवोत ३.


आ तत् त॑ इन्द्रा॒यवः॑ पनन्ता॒भि य ऊ॒र्वं गोम॑न्तं॒ तितृ॑त्सान् ।
स॒कृ॒त्स्व१ं ये पु॑रुपु॒त्रां म॒हीं स॒हस्र॑धारां बृह॒तीं दुदु॑क्षन् ॥ ४ ॥

आ तत् ते इन्द्र आयवः पनन्त अभि ये ऊर्वं गो--मन्तं तितृत्सान्
सकृत्-स्वं ये पुरु-पुत्रां महीं सहस्र-धारां बृहतीं दुधुक्षन् ॥ ४ ॥

म्हणूनच हे इंद्रा, भक्तजन तुझी प्रशंसा करतात; कारण प्रकाशधेनूचे जे विस्तीर्ण आवार तें फोडून टाकण्याविषयी ते अगदी आतुर झालेले आहेत; एकदांच प्रसूत होणारी परंतु पुष्कळ पुत्र असलेली; सहस्त्रावधि दुग्धधारा सोडणारी पण प्रचंड आणि श्रेष्ठ अशी जी शक्ति, तिचे दोहन करण्यालाही ते उत्सुक झाले आहेत ४.


शची॑व॒ इन्द्रं॒ अव॑से कृणुध्वं॒ अना॑नतं द॒मय॑न्तं पृत॒न्यून् ।
ऋ॒भु॒क्षणं॑ म॒घवा॑नं सुवृ॒क्तिं भर्ता॒ यो वज्रं॒ नर्यं॑ पुरु॒क्षुः ॥ ५ ॥

शची-वः इन्द्रं अवसे कृणुध्वं अनानतं दमयन्तं पृतन्यून्
ऋभुक्षणं मघ-वानं सु-वृक्तिं भर्ता यः वज्रं नर्यं पुरु-क्षुः ॥ ५ ॥

तर हे शक्तिमान्‌ भक्तांनो, जो कधी कोणापुढें मान वाकवीत नाही, पण उलट अंगावर धांवून येणार्‍या सैन्याचा जो चुराडा उडवितो, जो ऋभूंच प्रतिपालक, जो वज्र आणि स्तुति ह्या दोहोंनाही धारण करतो आणि जो मानवहितकारी आहे अशा त्या भगवान इंद्राला त्याच्या अनुग्रहासाठी आपल्याकडे वळवा. तोच सर्वांमध्ये बलाढ्य आहे ५.


यद्वा॒वान॑ पुरु॒तमं॑ पुरा॒षाळ् आ वृ॑त्र॒हेन्द्रो॒ नामा॑न्यप्राः ।
अचे॑ति प्रा॒सह॒स्पति॒स्तुवि॑ष्मा॒न् यदीं॑ उ॒श्मसि॒ कर्त॑वे॒ कर॒त् तत् ॥ ६ ॥

यत् ववान पुरु-तमं पुराषाट् आ वृत्र-हा इन्द्रः नामानि अप्राः
अचेति प्र-सहः पतिः तुविष्मान् यत् ईं उश्मसि कर्तवे करत् तत् ॥ ६ ॥

(शत्रूंची) नगरे विच्छिन्न करणार्‍या पुरंदराने जेव्हां अत्यंत दुर्लभ अशा शत्रुदुर्गाचा विध्वंस केला, तेव्हांच त्या वृत्रनाशन इंद्राने आपली नांवे सार्थ केली. दुष्टांचे दमन करणारा हा सज्जनपालक समर्थ इंद्र पहा, आमच्या (मन:)चक्षूपुढे दिसत आहे. त्यानें जें जें करावे म्हणून आम्हीं इच्छा करूं ते त्यानें केलेच म्हणून समजा ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७५ (सिंधु नदीसूक्त)

ऋषी - सिंधुक्षित् प्रैयमेध : देवता - नदी : छंद - जगती


प्र सु व॑ आपो महि॒मानं॑ उत्त॒मं का॒रुर्वो॑चाति॒ सद॑ने वि॒वस्व॑तः ।
प्र स॒प्त-स॑प्त त्रे॒धा हि च॑क्र॒मुः प्र सृत्व॑रीणां॒ अति॒ सिन्धु॒रोज॑सा ॥ १॥

प्र सु वः आपः महिमानं उत्-तमं कारुः वोचाति सदने विवस्वतः
प्र सप्त-सप्त त्रेधा हि चक्रमुः प्र सृत्वरीणां अति सिन्धुः ओजसा ॥ १ ॥

हे आपोदेवींनो, तुमच्या उत्तम महात्म्याची प्रशंसा कविजन विवस्वताच्या यज्ञगृहांत करीत असतो. सर्व नद्या सातसातांच्या समूहांनी तीन्ही प्रदेशांत वाहून राहिल्या आहेत; परंतु वेगाने वाहणार्‍या त्या नद्यांमध्ये सिंधु हीच आपल्या प्रभावाने सर्वांत भारी आहे १.


प्र ते॑ऽरद॒द्वरु॑णो॒ यात॑वे प॒थः सिन्धो॒ यद्वाजा॑ँ अ॒भ्यद्र॑व॒स्त्वम् ।
भूम्या॒ अधि॑ प्र॒वता॑ यासि॒ सानु॑ना॒ यदे॑षां॒ अग्रं॒ जग॑तां इर॒ज्यसि॑ ॥ २ ॥

प्र ते अरदत् वरुणः यातवे पथः सिन्धो इति यत् वाजान् अभि अद्रवः त्वं
भूम्याः अधि प्र-वता यासि सानुना यत् एषां अग्रं जगतां इरज्यसि ॥ २ ॥

हे सिंधू, तुला वाहतां यावे म्हणून तुझ्यासाठी वरुणाने (ईश्वराने) मार्ग खोदून दिला आणि तूंही सर्वसामर्थ्यांनाच अनुलक्षून वहात असतेस. तूं या उच्च पर्वतशिखरावरून खोल जागेकडे धों धों वाहत जातेस, तेव्हां सकल वस्तूंच्याही अगोदर पुढें हो‍ऊन उत्साहाचा प्रवाह तूंच वाहवितेस २.


दि॒वि स्व॒नो य॑तते॒ भूम्यो॒पर्य॑न॒न्तं शुष्मं॒ उदि॑यर्ति भा॒नुना॑ ।
अ॒भ्रादि॑व॒ प्र स्त॑नयन्ति वृ॒ष्टयः॒ सिन्धु॒र्यदेति॑ वृष॒भो न रोरु॑वत् ॥ ३ ॥

दिवि स्वनः यतते भूम्या उपरि अनन्तं शुष्मं उत् इयर्ति भानुना
अभ्रात्-इव प्र स्तनयन्ति वृष्टयः सिन्धुः यत् एति वृषभः न रोरुवत् ॥ ३ ॥

ह्या सिंधूचा गर्जनाघोष आकाशामध्ये पृथ्वीच्या वरच्या प्रदेशांत घुमत असतो आणि उदकाच्या चकाकीबरोबरच आपल्या अपार सामर्थ्याचे फवारे वर सोडतो. आणि जेव्हां एखाद्या वृषभाप्रमाणे सिंधूचा प्रवाह डुरकणी फोडीत धांवत जातो, तेव्हां मेघमंडलांतून पर्जन्याच्या धाराच गडगडाट करीत आहेत कीं काय असे वाटते ३.


अ॒भि त्वा॑ सिन्धो॒ शिशुं॒ इन् न मा॒तरो॑ वा॒श्रा अ॑र्षन्ति॒ पय॑सेव धे॒नवः॑ ।
राजे॑व॒ युध्वा॑ नयसि॒ त्वं इत् सिचौ॒ यदा॑सां॒ अग्रं॑ प्र॒वतां॒ इन॑क्षसि ॥ ४ ॥

अभि त्वा सिन्धो इति शिशुं इत् न मातरः वाश्राः अर्षन्ति पयसाइव धेनवः
राजाइव युध्वा नयसि त्वं इत् सिचौ यत् आसां अग्रं प्र-वतां इनक्षसि ॥ ४ ॥

हे सिन्धू, बालकांकडे त्यांच्या माता त्वरेने जातात त्याप्रमाणे धेनू दुधाचा पान्हा सोडीतच हंबरत तुझ्याकडे धांवतात आणि जेव्हां तूं इतर नद्यांच्याही आघाडीला मोठ्या डौलाने चालतेस, तेव्हां एकाद्या झुंजार राजाप्रमाणे तूं आपले दोन्ही प्रवाह बरोबर घेतेस ४.


इ॒मं मे॑ गङ्गे यमुने सरस्वति॒ शुतु॑द्रि॒ स्तोमं॑ सचता॒ परु॒ष्ण्या ।
अ॒सि॒क्न्या म॑रुद्वृधे वि॒तस्त॒यार्जी॑कीये शृणु॒ह्या सु॒षोम॑या ॥ ५ ॥

इमं मे गङ्गे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमं सचत परुष्णि आ
असिक्न्या मरुत्-वृधे वितस्तया आज्र्जीकीये शृणुहि आ सु-सोमया ॥ ५ ॥

म्हणूनच हे गंगे, हे यमुने, हे सरस्वती, हे शुतुद्रि, हे परुष्णि तुम्ही हे माझे कवन मान्य करून घ्या. मरुत्‌विधे नदी, तूं असिक्नीसह आणि हे अर्जिकिये, वितस्ता नदी, आणि सुषोमानदीसह येऊन तूं माझी विनंती ऐक ५.


तृ॒ष्टाम॑या प्रथ॒मं यात॑वे स॒जूः सु॒सर्त्वा॑ र॒सया॑ श्वे॒त्या त्या ।
त्वं सि॑न्धो॒ कुभ॑या गोम॒तीं क्रुमुं॑ मेह॒त्न्वा स॒रथं॒ याभि॒रीय॑से ॥ ६ ॥

तृष्ट-अमया प्रथमं यातवे स-जूः सु-सर्त्वा रसया श्वेत्या त्या
त्वं सिन्धो इति कुभया गो--मतीं क्रुमुं मेहत्न्वा स-रथं याभिः ईयसे ॥ ६ ॥

तूं प्रथम तृष्टामा नदीला जाऊन मिळण्यासाठी उल्लसित झालीस, नंतर सुसर्तु, रसा आणि श्वेत्या ह्या नद्यांना तूं मिळालीस. हे सिंधू, ज्यांच्यासह तूं रथारूढ हो‍ऊनच की काय वहात जातेस त्या कुभा आणि मेहलु नद्यांच्यासह तूं गोमती आणि क्रमु यांच्याकडे वहातेस ६.


ऋजी॒त्येनी॒ रुश॑ती महि॒त्वा परि॒ ज्रयां॑सि भरते॒ रजां॑सि ।
अद॑ब्धा॒ सिन्धु॑र॒पसां॑ अ॒पस्त॒माश्वा॒ न चि॒त्रा वपु॑षीव दर्श॒ता ॥ ७ ॥

ऋजीती एनी रुशती महि-त्वा परि ज्रयांसि भरते रजांसि
अदब्धा सिन्धुः अपसां अपः-तमा अश्वा न चित्रा वपुषी-इव दर्शता ॥ ७ ॥

सरल धावणारी, श्वेतवर्ण आणि उज्ज्वल अशी सिंधू आपल्या महिम्याने आपले अफाट पात्र आणि अनेक प्रदेश उदकपूर्ण करते. ही सिंधु अपराजित आहे. चपलांमध्येही ती अत्यंत चपल, शीघ्रवेगी, उष:कालाप्रमाणे अद्भुतवर्ण आणि नवयुवतीप्रमाणे रमणीय आहे ७.


स्वश्वा॒ सिन्धुः॑ सु॒रथा॑ सु॒वासा॑ हिर॒ण्ययी॒ सुकृ॑ता वा॒जिनी॑वती ।
ऊर्णा॑वती युव॒तिः सी॒लमा॑वत्यु॒ताधि॑ वस्ते सु॒भगा॑ मधु॒वृध॑म् ॥ ८ ॥

सु-अश्वा सिन्धुः सु-रथा सु-वासाः हिरण्ययी सु-कृता वाजिनी-वती
ऊर्णावती युवतिः सीलमावती उत अधि वस्ते सु-भगा मधु-वृधम् ॥ ८ ॥

ती उत्कृष्ट अश्वांची आणि उत्कृष्ट रथांचीही स्वामिनी आहे. ती उत्तम वस्त्रविभूषित, सुवर्णवर्ण, पुण्यवती आणि सत्वसंपन्न आहे. ती तारुण्ययुक्त, उर्णावस्त्राने मंडित, आणि "सील" नांवाच्या तृणाने व्याप्त आहे; अशी ती भाग्यशालिनी सिन्धु जणु मनोहर वल्लींचेच वस्त्र नेसली आहे ८.


सु॒खं रथं॑ युयुजे॒ सिन्धु॑र॒श्विनं॒ तेन॒ वाजं॑ सनिषद॒स्मिन्न् आ॒जौ ।
म॒हान् ह्यस्य महि॒मा प॑न॒स्यतेऽ॑दब्धस्य॒ स्वय॑शसो विर॒प्शिनः॑ ॥ ९ ॥

सुखं रथं युयुजे सिन्धुः अश्विनं तेन वाजं सनिषत् अस्मिन् आजौ
महान् हि अस्य महिमा पनस्यते अदब्धस्य स्व-यशसः वि-रप्शिनः ॥ ९ ॥

सिंधूने आपल्या अश्वयुक्त सुखप्रद रथ जोडला आहे आणि त्याच्या योगाने ती आजच्या युद्धांत विजय संपादन करील. म्हणून त्या तिच्या अपराजित रथाची (=वेगाची) स्वयशाने विभूषित आणि प्रचंड घोषाने धांवणार्‍या त्या श्रेष्ठ रथाच्या महिम्याचीच महती लोक गातात ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७६ (सोमाभिषव ग्रावन्‌सूक्त)

ऋषी - ऐरावत जरत्कारु : देवता - ग्रावन् : छंद - जगती


आ व॑ ऋञ्जस ऊ॒र्जां व्युष्टि॒ष्व् इन्द्रं॑ म॒रुतो॒ रोद॑सी अनक्तन ।
उ॒भे यथा॑ नो॒ अह॑नी सचा॒भुवा॒ सदः॑-सदो वरिव॒स्यात॑ उ॒द्‌भिदा॑ ॥ १॥

आ वः ऋजसे ऊर्जां वि-उष्टिषु इन्द्रं मरुतः रोदसी इति अनक्तन
उभे इति यथा नः अहनी इति सचाभुवा सदः-सदः वरिवस्यातः उत्-भिदा ॥ १ ॥

उर्ज्वस्वितेच्या या प्रभातकाली, हे ग्राव्यांनो, मी तुम्हांला स्वच्छ करतो; तर तुम्हीं इंद्र, मरुत्‌ आणि द्यावापृथिवी यांना रसाने परिप्लुत करा म्हणजे एकदमच उत्पन्न झालेले जे रात्र आणि दिवस, ते आपल्या उत्कटत्वाने आमच्या घरोघर आम्हांला आशीर्वाद देतील १.


तदु॒ श्रेष्ठं॒ सव॑नं सुनोत॒नात्यो॒ न हस्त॑यतो॒ अद्रिः॑ सो॒तरि॑ ।
वि॒दद्ध्य१र्यो अ॒भिभू॑ति॒ पौंस्यं॑ म॒हो रा॒ये चि॑त् तरुते॒ यदर्व॑तः ॥ २ ॥

तत् ओं इति श्रेष्ठं सवनं सुनोतन अत्यः न हस्त-यतः अद्रिः सोतर् इ
विदत् हि अर्यः अभि-भूति पैंस्यं महः राये चित् तरुते यत् अर्वतः ॥ २ ॥

ग्राव्यांनो, तुम्ही आपले ते श्रेष्ठ सोमरसाचे स्तवन पूर्ण करा. ग्रावा म्हणजे सोम पिळणार्‍याच्या हस्तसंकेताप्रमाणे वागणारा जणुं विराश्व आहे. तो आर्यजनांना प्रिय आहे. अजिंक्य अशा पौरुषाची जाणीव तो उत्पन्न करतो; कारण अश्ववीराला उत्कृष्ट वैभवाकडेच तो दौडत नेतो २.


तदिद्ध्यस्य॒ सव॑नं वि॒वेर॒पो यथा॑ पु॒रा मन॑वे गा॒तुं अश्रे॑त् ।
गोअ॑र्णसि त्वा॒ष्ट्रे अश्व॑निर्णिजि॒ प्रें अ॑ध्व॒रेष्व् अ॑ध्व॒राँ अ॑शिश्रयुः ॥ ३ ॥

तत् इत् हि अस्य सवनं विवेः अपः यथा पुरा मनवे गातुं अश्रेत्
गो--अर्णसि त्वाष्ट्रे अश्व-निर्निजि प्र ईं अध्वरेषु अध्वरान् अशिश्रयुः ॥ ३ ॥

तेंच त्याचे रसनिष्कासन आमचे किल्मिष दूर करो. ज्याप्रमाणे पूर्वी मनूकरितां ह्याच मार्गाचा त्याने आश्रय केला, त्याप्रमाणे तो आतांहि करो. त्वष्टापुत्राच्या अश्वांच्या आणि (प्रकाश) धेनूंच्या अफाट समुदायांत, तसेंच (दुसर्‍या) अनेक अध्वरयागांमध्ये त्यांनी सोमविषयक अध्वरांचाच आश्रय केला ३.


अप॑ हत र॒क्षसो॑ भङ्गु॒राव॑त स्कभा॒यत॒ निरृ॑तिं॒ सेध॒ताम॑तिम् ।
आ नो॑ र॒यिं सर्व॑वीरं सुनोतन देवा॒व्यं भरत॒ श्लोकं॑ अद्रयः ॥ ४ ॥

अप हत रक्षसः भङ्गुर-वतः स्कभायत निः-ऋतिं सेधत अमतिं
आ नः रयिं सर्व-वीरं सुनोतन देव-अव्यं भरत श्लोकं अद्रयः ॥ ४ ॥

घातकी राक्षसांना पार ठार करा, अमंगलाचा निरोध करा. अविवेकाला जखडून टाका. वीरांनी अत्यंत परिप्लुत असें वैभव आपल्या रसाच्या रुपाने ओता; हे ग्राव्यांनो, देवलोकापर्यंत पोहोंचेल असें यश आम्हांकडे पाठवून द्या ४.


दि॒वश्चि॒दा वोऽ॑मवत्तरेभ्यो वि॒भ्वना॑ चिदा॒श्वपस्तरेभ्यः ।
वा॒योश्चि॒दा सोम॑रभस्तरेभ्योऽ॒ग्नेश्चि॑दर्च पितु॒कृत्त॑रेभ्यः ॥ ५ ॥

दिवः चित् आ वः अमवत्-तरेभ्यः वि-भ्वना चित् आश्वपः-तरेभ्यः
वायोः चित् आ सोमरभः-तरेभ्यः अग्नेः चित् अर्च पितुकृत्-तरेभ्यः ॥ ५ ॥

तुमच्या त्या द्युलोकापेक्षांही जे बलवान्‌ सर्वगामीपेक्षां जे कर्मकुशल, वायूपेक्षांही सोमाविषयी जे आसक्त आणि अग्नीपेक्षांही जे अन्न समद्धिकर, त्यांच्याप्रीत्यर्थ "अर्क" स्तोत्र मोठ्याने म्हण ५.


भु॒रन्तु॑ नो य॒शसः॒ सोत्वन्ध॑सो॒ ग्रावा॑णो वा॒चा दि॒विता॑ दि॒वित्म॑ता ।
नरो॒ यत्र॑ दुह॒ते काम्यं॒ मध्व् आ॑घो॒षय॑न्तो अ॒भितो॑ मिथ॒स्तुरः॑ ॥ ६ ॥

भुरन्तु नः यशसः सोतु अन्धसः ग्रावाणः वाचा दिविता दिवित्मता
नरः यत्र दुहते काम्यं मधु आघोषयन्तः अभितः मिथः-तुरः ॥ ६ ॥

ते यशस्वी ग्रावे आमची अभिवृद्धि करोत, आपल्या दिव्य आणि दिव्यलोकाला उचित अशा वाणीने मधुरपेय पिळून देवोत, अशा ह्या सोमयागांत मोठ्याने स्तोत्रघोष करणारे आणि परस्परांच्या चढाओढीने त्वरा करणारे शूर भक्त आपल्याला इच्छित जो मधुर रस तो पिळून घेतात ६.


सु॒न्वन्ति॒ सोमं॑ रथि॒रासो॒ अद्र॑यो॒ निर॑स्य॒ रसं॑ ग॒विषो॑ दुहन्ति॒ ते ।
दु॒हन्त्यूध॑रुप॒सेच॑नाय॒ कं नरो॑ ह॒व्या न म॑र्जयन्त आ॒सभिः॑ ॥ ७ ॥

सुन्वन्ति सोमं रथिरासः अद्रयः निः अस्य रसं गो--इषः
दुहन्ति ते दुहन्ति ऊधः उप-सेचनाय कं नरः हव्या न मर्जयन्ते आस-भिः ॥ ७ ॥

रथारूढ सैनिकांप्रमाणे हे शीघ्रवेगी ग्रावे (पहा) सोमरस पिळीत आहेत. (प्रकाश) धेनूंची प्राप्ति ज्यांना करून घ्यावयाची, तेच सोमरस पिळतात, (रसामध्ये) ओतण्यासाठीं दुग्धाचे दोहन करतात आणि हविर्भागाप्रमाणेच त्यालाही पवित्राच्या मुखाने (म्हणजे गाळण्याने) तो रस भक्तजन स्वच्छ करितात ७.


ए॒ते न॑रः॒ स्वप॑सो अभूतन॒ य इन्द्रा॑य सुनु॒थ सोमं॑ अद्रयः ।
वा॒मं-वा॑मं वो दि॒व्याय॒ धाम्ने॒ वसु॑-वसु वः॒ पार्थि॑वाय सुन्व॒ते ॥ ८ ॥

एते नरः सु-अपसः अभूतन ये इन्द्राय सुनुथ सोमं अद्रयः
वामम्-वामं वः दिव्याय धाम्ने वसु-वसु वः पार्थिवाय सुन्वते ॥ ८ ॥

हे शूरांनो, हे ग्राव्यांनो, तुम्ही इंद्राप्रीत्यर्थ सोमरस पिळतां, ते तुम्ही आतांही आपले कौशल्य दाखवा आणि त्यांतील प्रत्येक अभिलषणीय भाग दिव्यजनांच्या तेजस्वी स्थानाकडे आणि प्रत्येक उत्कृष्ट धन या भूलोकावरील भक्ताकडे पाठवून द्या ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७७ (मरुत्‌सूक्त)

ऋषी - स्यूमरश्मि भार्गव : देवता - मरुत् : छंद ५ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


अ॒भ्र॒प्रुषो॒ न वा॒चा प्रु॑षा॒ वसु॑ ह॒विष्म॑न्तो॒ न य॒ज्ञा वि॑जा॒नुषः॑ ।
सु॒मारु॑तं॒ न ब्र॒ह्माणं॑ अ॒र्हसे॑ ग॒णं अ॑स्तोष्येषां॒ न शो॒भसे॑ ॥ १॥

अभ्र-प्रुषः न वाचा प्रुष वसु हविष्मन्तः न यजाः वि-जानुषः
सु-मारुतं न ब्रह्माणं अर्हसे गणं अस्तोषि एषां न शोभसे ॥ १ ॥

पर्जन्यवृष्टीप्रमाणे आपल्या वाणीने (अभीष्ट) वर्षाव करणारे (मरुत्‌) हे यज्ञाप्रमाणे हविर्भागाने युक्त, विश्वाला जाणणारे आणि विश्वाला उत्पन्न करणारे असे आहेत. सूक्तज्ञांच्या समूहाप्र्माने ह्या (मरुतांच्या) श्रेष्ठ समुदायाची मी स्तुति करतो, ती त्यांच्या सन्मानासाठी करतो; नुसत्या देखाव्यासाठी नव्हे १.


श्रि॒ये मर्या॑सो अ॒ञ्जीँर॑कृण्वत सु॒मारु॑तं॒ न पू॒र्वीरति॒ क्षपः॑ ।
दि॒वस्पु॒त्रास॒ एता॒ न ये॑तिर आदि॒त्यास॒स्ते अ॒क्रा न वा॑वृधुः ॥ २ ॥

श्रिये मर्यासः अजीन् अकृण्वत सु-मारुतं न पूर्वीः अति क्षपः
दि वः पुत्रासः एताः न येतिरे आदित्यासः ते अक्राः न ववृधुः ॥ २ ॥

शूर पुरुषांनी शोभेसाठी वीरभूषणे बनविली. ती श्रेष्ठ मरुतांच्या समुदायाप्रमाणे पुष्कळ अहोरात्र प्रयत्न करून बनविली. द्यूचे पुत्र जे (मरुत्‌) त्यांच्याप्रमाणे (शूर भक्तांनीही) प्रयत्न केला तेव्हां भीषणस्वरूप असूनहि आदित्याप्रमाणे त्यांचीही उन्नति झाली २.


प्र ये दि॒वः पृ॑थि॒व्या न ब॒र्हणा॒ त्मना॑ रिरि॒च्रे अ॒भ्रान् न सूर्यः॑ ।
पाज॑स्वन्तो॒ न वी॒राः प॑न॒स्यवो॑ रि॒शाद॑सो॒ न मर्या॑ अ॒भिद्य॑वः ॥ ३ ॥

प्र ये दिवः पृथिव्याः न बर्हणा त्मना रिरिच्रे अभ्रात् न सूर्यः
पाजस्वन्तः न वीराः पनस्यवः रिशादसः न मर्याः अभि-द्यवः ॥ ३ ॥

ते जणूं द्युलोकाच्या आणि पृथिवीच्या देखील पलिकडे पोहोंचले. सूर्य जसा मेघमंडळांच्या पलीकडून जातो त्याप्रमाणे आपल्या स्वत:च्या महिम्याने ते तेथे जाऊन पोहोंचले. ते प्रशंसोत्सुक वीराप्रमाणे ओजोबलाने रसरसणारे आणि दिव्य लोकींच्या तेज:पुंज पुरुषाप्रमाणे शत्रुसंहारक आहेत ३.


यु॒ष्माकं॑ बु॒ध्ने अ॒पां न याम॑नि विथु॒र्यति॒ न म॒ही श्र॑थ॒र्यति॑ ।
वि॒श्वप्सु॑र्य॒ज्ञो अ॒र्वाग् अ॒यं सु वः॒ प्रय॑स्वन्तो॒ न स॒त्राच॒ आ ग॑त ॥ ४ ॥

युष्माकं बुध्ने अपां न यामनि विथुर्यति न मही श्रथर्यति
विश्व-प्सुः यजः अर्वाक् अयं सु वः प्रयस्वन्तः न सत्राचः आ गत ॥ ४ ॥

तुमच्या मार्गाने जातांना तुम्हीं उदकांच्या तळाशी असलां, तरी ही पृथ्वी थरथरां कांपते, एवढेंच नव्हे, तर अगदी जणूं मूर्छित पडते. हा विश्वरूप यज्ञ तुमच्याकरितांच इकडे चालू केला आहे; तर प्रेमळ अंत:करणाने तुम्ही सर्वजण मिळून एकदम आगमन करा ४.


यू॒यं धू॒र्षु प्र॒युजो॒ न र॒श्मिभि॒र्ज्योति॑ष्मन्तो॒ न भा॒सा व्युष्टिषु ।
श्ये॒नासो॒ न स्वय॑शसो रि॒शाद॑सः प्र॒वासो॒ न प्रसि॑तासः परि॒प्रुषः॑ ॥ ५ ॥

यूयं धूः-सु प्र-युजः न रश्मि-भिः ज्योतिष्मन्तः न भासा वि-उष्टिषु
श्येनासः न स्व-यशसः रिशादसः प्रवासः न प्र-सितासः परि-प्रुषः ॥ ५ ॥

तुम्ही यज्ञधुरेला जणूं रश्मींनीच संयुक्त झाले आहांत आणि दिशा उजळल्या असतां तजेस्वितेनेच दीप्तिमान्‌ आणि आपल्याच यशाने सुशोभित असून देखील तुम्ही श्येनपक्षाप्रमाणे दुष्टभक्षक आहांत आणि मार्गस्थाप्रमाणे तुमच्याजवळ रज्जूबंधने आणि झारी असते ५.


प्र यद्वह॑ध्वे मरुतः परा॒काद्यू॒यं म॒हः सं॒वर॑णस्य॒ वस्वः॑ ।
वि॒दा॒नासो॑ वसवो॒ राध्य॑स्या॒राच् चि॒द्द्वेषः॑ सनु॒तर्यु॑योत ॥ ६ ॥

प्र यत् वहध्वे मरुतः पराकात् यूयं महः सम्-वरणस्य वस्वः
विदानासः वसवः राध्यस्य आरात् चित् द्वेषः सनुतः युयोत ॥ ६ ॥

हे मरुतांनो तुम्ही जेव्हां दूरच्या (लोकांतून) अत्यंत अभिलषणीय धन इकडे घेऊन येतां, तेव्हां हे दिव्यनिधींनो, उत्कृष्ट वरदान कोणते ते तुम्हाला विदित असतेंच; तर जो दुष्ट मनुष्य आमचा द्वेष करीत असेल, त्याला तू दूर असतांनाच पार छाटून टाका ६.


य उ॒दृचि॑ य॒ज्ञे अ॑ध्वरे॒ष्ठा म॒रुद्‌भ्यो॒ न मानु॑षो॒ ददा॑शत् ।
रे॒वत् स वयो॑ दधते सु॒वीरं॒ स दे॒वानां॒ अपि॑ गोपी॒थे अ॑स्तु ॥ ७ ॥

यः उत्-ऋचि यजे अध्वरे--स्थाः मरुत्-भ्यः न मानुषः ददाशत्
रेवत् सः वयः दधते सु-वीरं सः देवानां अपि गो--पीथे अस्तु ॥ ७ ॥

जो अध्वरनिरत भक्त उत्कृष्ट ऋक्‌पठण चालणार्‍या यज्ञामध्ये सामान्य जनाप्रमाणे वागून देखील मरुतांना आहुति देतो, तो वैभवसंपन्न हो‍ऊन शूर सैनिकांना योग्य असे तारुण्य उपभोगितो. असा भक्त दिव्यजन जेथे सोमपान करतात तेथे वास करो ७.


ते हि य॒ज्ञेषु॑ य॒ज्ञिया॑स॒ ऊमा॑ आदि॒त्येन॒ नाम्ना॒ शम्भ॑विष्ठाः ।
ते नो॑ऽवन्तु रथ॒तूर्म॑नी॒षां म॒हश्च॒ याम॑न्न् अध्व॒रे च॑का॒नाः ॥ ८ ॥

ते हि यजेषु यजियासः ऊमाः आदित्येन नाम्ना शम्-भविष्ठाः
ते नः अवन्तु रथ-तूः मनीषां महः च यामन् अध्वरे चकानाः ॥ ८ ॥

ह्याच त्या (मरुतांच्या) सहाय्यक शक्ति यज्ञांमध्ये माननीय झाल्या, त्या आदित्यांच्या केवळ नांवा(च्या प्रभावा)नेंच अत्यंत कल्याणप्रद होतात. तर रथाप्रमाणे शीघ्रगामी मरुत्‌ आमचे मनोरथ पूर्ण करोत. कारण महासत्रामध्ये आणि अध्वरयागांमध्ये ते अगदी रमून जातात ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७८ (मरुत्‌सूक्त)

ऋषी - स्यूमरश्मि भार्गव : देवता - मरुत् : छंद २, ५-७ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


विप्रा॑सो॒ न मन्म॑भिः स्वा॒ध्यो देवा॒व्योख्प् न य॒ज्ञैः स्वप्न॑सः ।
राजा॑नो॒ न चि॒त्राः सु॑सं॒दृशः॑ क्षिती॒नां न मर्या॑ अरे॒पसः॑ ॥ १॥

विप्रासः न मन्म-भिः सु-आध्यः देव-अव्यः न यजैः सु-अप्नसः
राजानः न चित्राः सु-सन्दृशः क्षितीनां न मर्याः अरेपसः ॥ १ ॥

तुम्ही भाविक स्तोत्याप्रमाणे मननीय स्तोत्रांच्या योगाने उत्तम ध्यानाचे प्रेरक (आहांत); तसेंच देवभक्तांच्या यज्ञपद्धतिच्या योगाने सत्कर्मव्यापृत, राजाप्रमाणे अद्‌भुत आणि निष्कलंक पुरुषांप्रमाणे या भूमीवर दर्शनीय आहांत १.


अ॒ग्निर्न ये भ्राज॑सा रु॒क्मव॑क्षसो॒ वाता॑सो॒ न स्व॒युजः॑ स॒द्यऊ॑तयः ।
प्र॒ज्ञा॒तारो॒ न ज्येष्ठाः॑ सुनी॒तयः॑ सु॒शर्मा॑णो॒ न सोमा॑ ऋ॒तं य॒ते ॥ २ ॥

अग्निः न ये भ्राजसा रुक्म-वक्षसः वातासः न स्व-युजः सद्यः-ऊतयः
प्र-जातारः न ज्येष्ठाः सु-नीतयः सु-शर्माणः न सोमाः ऋतं यते ॥ २ ॥

अग्नीप्रमाणे दिसणार्‍या तेजस्वितेने युक्त अशी भूषणें जे हृदयावर वागवितात, जे प्रभंजनाप्रमाणे स्वत:च्याच वेगाने धांवून भक्तांना तत्काळ सहाय्य करतात, जे उत्तमोत्तम ज्ञानी म्हणूनच उत्कृष्ट नीतिमार्गाचे प्रवर्तन करतात, ते मरुत्‌, सद्धर्माने वागण्याचा जो प्रयत्न करतो त्या भक्ताला सुखकर आश्रय देतात २.


वाता॑सो॒ न ये धुन॑यो जिग॒त्नवो॑ऽग्नी॒नां न जि॒ह्वा वि॑रो॒किणः॑ ।
वर्म॑ण्वन्तो॒ न यो॒धाः शिमी॑वन्तः पितॄ॒णां न शंसाः॑ सुरा॒तयः॑ ॥ ३ ॥

वातासः न ये धुनयः जिगत्नवः अग्नीनां न जिह्वाः वि-रोकिणः
वर्मण्-वन्तः न योधाः शिमी-वन्तः पितॄणां न शंसाः सु-रातयः ॥ ३ ॥

झंझावाताप्रमाणे पाहिजे त्या वस्तूला हलवून जे वेगाने धांवतात, ज्यांच्या जिव्हा अग्नीप्रमाणे तेजोमय, जे कवचधारी योध्याप्रमाणे कर्तृत्वशालि, आणि पितरांना केलेल्या प्रार्थनेप्रमाणे जे उत्तम देणग्या (भक्तरूप बालकांना) देतात ३.


रथा॑नां॒ न येऽ॒राः सना॑भयो जिगी॒वांसो॒ न शूरा॑ अ॒भिद्य॑वः ।
व॒रे॒यवो॒ न मर्या॑ घृत॒प्रुषो॑ऽभिस्व॒र्तारो॑ अ॒र्कं न सु॒ष्टुभः॑ ॥ ४ ॥

रथानां न ये अराः स-नाभयः जिगीवांसः न शूराः अभि-द्यवः
वरे--यवः न मर्याः घृत-प्रुषः अभि-स्वर्तारः अर्कं न सु-स्तुभः ॥ ४ ॥

(तसेंच) रथचक्रांच्या अरांप्रमाणे जे परस्परांशी निबद्ध आहेत, द्युलोकच्या तेजस्वी शूराप्रमाणे जे विजयिष्णु आहेत; (वधूकडे निघालेल्या) वरांप्रमाणे जे घृताचे सिंचन करतात आणि ऋक्स्तोत्र मोठ्याने म्हणणार्‍या भक्तांप्रमाणे जे देवस्तोत्र उत्तम रीतीने म्हणतात ४.


अश्वा॑सो॒ न ये ज्येष्ठा॑स आ॒शवो॑ दिधि॒षवो॒ न र॒थ्यः सु॒दान॑वः ।
आपो॒ न नि॒म्नैरु॒दभि॑र्जिग॒त्नवो॑ वि॒श्वरू॑पा॒ अङ्गि॑रसो॒ न साम॑भिः ॥ ५ ॥

अश्वासः न ये ज्येष्ठासः आशवः दिधिषवः न रथ्यः सु-दानवः
आपः न निम्नैः उद-भिः जिगत्नवः विश्व-रूपाः अङ्गिरसः न साम-भिः ॥ ५ ॥

जे जातिवंत अश्वाप्रमाणे शीघ्रवेगी, द्रव्यनिधी जिंकणार्‍या रथोयोध्याप्रमाणे उदार, खोल जागेकडे धांवणार्‍या जलौघाप्रमाणे तीव्रवेगी असे मरुत्‌ सामगायक आहेत, आणि रसाप्रमाणे सर्व रूपधर आहेत ५.


ग्रावा॑णो॒ न सू॒रयः॒ सिन्धु॑मातर आदर्दि॒रासो॒ अद्र॑यो॒ न वि॒श्वहा॑ ।
शि॒शूला॒ न क्री॒ळयः॑ सुमा॒तरो॑ महाग्रा॒मो न याम॑न्न् उ॒त त्वि॒षा ॥ ६ ॥

ग्रावाणः न सूरयः सिन्धु-मातरः आदर्दिरासः अद्रयः न विश्वहा
शिशूलाः न क्रीळयः सु-मातरः महाग्रामः न यामन् उत त्व् इषा ॥ ६ ॥

सिंधु नदींत उत्पन्न होणार्‍या ग्राव्यांप्रमाणे जे प्रमुख, अशनिप्रमाणे केव्हांही चुराडा उडविण्यात जे पटाईत, प्रेमळ मातेच्या बालकाप्रमाणे जे खेळकर आणि एकदम जुळून जातांना जे दीप्तीने युक्त आहेत ६.


उ॒षसां॒ न के॒तवो॑ऽध्वर॒श्रियः॑ शुभं॒यवो॒ नाञ्जिभि॒र्व्यश्वितन् ।
सिन्ध॑वो॒ न य॒यियो॒ भ्राज॑दृष्टयः परा॒वतो॒ न योज॑नानि ममिरे ॥ ७ ॥

उषसां न केतवः अध्वर-श्रियः शुभम्-यवः न अजि-भिः वि अश्वितन्
सिन्धवः न ययियः भ्राजत्-ऋष्टयः परावतः न योजनानि ममिरे ॥ ७ ॥

आणि उष;कालाच्या प्रकाशध्वजाप्रमाणे जे अध्वरयागांना शोभा आणतात, असे ते (भक्त) कल्याणेच्छु मरुत्‌ आपल्या भूषणांनी सुप्रकाशित झाले, पहा ते सिंधूनदाप्रमाणे वेगाने धांवत धांवत दूरच्या (त्यू) लोकांतून आपले तेज:पुंज भाले चमकावीत पुढे येऊन योजनेच्या योजने अंतर तोडीत जातात ७.


सु॒भा॒गान् नो॑ देवाः कृणुता सु॒रत्ना॑न् अ॒स्मान् स्तो॒तॄन् म॑रुतो वावृधा॒नाः ।
अधि॑ स्तो॒त्रस्य॑ स॒ख्यस्य॑ गात स॒नाद्धि वो॑ रत्न॒धेया॑नि॒ सन्ति॑ ॥ ८ ॥

सु-भागान् नः देवाः कृणुत सु-रत्नान् अस्मान् स्तोतॄन् मरुतः ववृधानाः
अधि स्तोत्रस्य सख्यस्य गात सनात् हि वः रत्न-धेयानि सन्ति ॥ ८ ॥

तर हे दिव्यमरुतांनो, तुम्ही आनंदाने वृद्धिंगत हो‍ऊन आम्हां भक्तांना भाग्यशाली आणि रत्नसंपन्न करा. तुमच्याजवळ रत्नसंचय पूर्वीपासूनच आहे. तर तुमचे सख्य जोडाणार्‍या स्तोत्राकडे तुम्ही आगमन करा ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७९ (वैश्वानर अग्निसूक्त)

ऋषी - सौचिक अथवा वैश्वानर अग्नि अथवा सप्ति वाजंभर : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


अप॑श्यं अस्य मह॒तो म॑हि॒त्वं अम॑र्त्यस्य॒ मर्त्या॑सु वि॒क्षु ।
नाना॒ हनू॒ विभृ॑ते॒ सं भ॑रेते॒ असि॑न्वती॒ बप्स॑ती॒ भूर्य॑त्तः ॥ १ ॥

अपश्यं अस्य महतः महि-त्वं अमर्त्यस्य मर्त्यासु विक्षु
नाना हनूइति विभृतेइतिवि-भृते सं भरेतेइति असिन्वती इति बप्सती इति भूरि अत्तः ॥ १ ॥

या महाविभूतीचा महिमा मला दिसला. आम्हां मर्त्यजनांमध्ये हाच अमर होय. त्याचे ओष्ठप्रान्त नाना प्रकारचे दिसतात; ते कधी उघडलेले तर कधी घट्ट मिटलेले, कधी मुखांत कांही तरी चघळीत असणारे तर कधी भराभर गिळून टाकणारे आणि कधीं भरपूर खाणारे असे दिसतात १.


गुहा॒ शिरो॒ निहि॑तं॒ ऋध॑ग् अ॒क्षी असि॑न्वन्न् अत्ति जि॒ह्वया॒ वना॑नि ।
अत्रा॑ण्यस्मै प॒ड्भिः सं भ॑रन्त्युत्ता॒नह॑स्ता॒ नम॒साधि॑ वि॒क्षु ॥ २ ॥

गुहा शिरः नि-हितं ऋधक् अक्षी इति असिन्वन् अत्ति जिह्वया वनानि
अत्राणि अस्मै पट्-भिः सं भरन्ति उत्तान-हस्ताः नमसा अधि विक्षु ॥ २ ॥

ह्याचे मस्त्क गुहेंतच गुप्त राखलेले असते, तरी नेत्र मात्र निरनिराळ्या दिशांकडे पाहात असतात. तो आपल्या जिभेने चघळून अरण्येच्या अरण्ये फस्त करतो आणि म्हणूनच ऋत्विज हे आपले हस्त पुढे पसरून आणि त्याच्या समोर नम्र हो‍ऊन या मानवलोकांतील खाद्ये त्याच्या पुढे झटपट ठेऊन देतात २.


प्र मा॒तुः प्र॑त॒रं गुह्यं॑ इ॒च्छन् कु॑मा॒रो न वी॒रुधः॑ सर्पदु॒र्वीः ।
स॒मं न प॒क्वं अ॑विदच्छु॒चन्तं॑ रिरि॒ह्वांसं॑ रि॒प उ॒पस्थे॑ अ॒न्तः ॥ ३ ॥

प्र मातुः प्र-तरं गुह्यं इच्चन् कुमारः न वीरुधः सर्पत् उर्वीः
समं न पक्वं अविदत् शुचन्तं रिरिह्वांसं रिपः उप-स्थे अन्तरिति ॥ ३ ॥

मातेच्या पदराखाली दडण्याची इच्छा धरणार्‍या बालकांप्रमाणे तो लतावृक्षांच्या प्रचंड समुदायाकडे झपाट्याने गेला, तेव्हां तेथे भूमीच्या सन्निध तिच्या आंत ज्याचे मूळा गढलेले आहे असे, पण त्याला पक्व खाद्याप्रमाणेच वाटणारे असे एक शुष्क आणि तप्त झालेले काष्ट त्याला आढळले ३.


तद्वां॑ ऋ॒तं रो॑दसी॒ प्र ब्र॑वीमि॒ जाय॑मानो मा॒तरा॒ गर्भो॑ अत्ति ।
नाहं दे॒वस्य॒ मर्त्य॑श्चिकेता॒ग्निर॒ङ्ग विचे॑ताः॒ स प्रचे॑ताः ॥ ४ ॥

तत् वां ऋतं रोदसी इति प्र ब्रवीमि जायमानः मातरा गर्भः अत्ति
न अहं देवस्य मर्त्यः चिकेत अग्निः अङ्ग वि-चेताः सः प्र-चेताः ॥ ४ ॥

द्यावा पृथिवींनो, तुम्हांला मी सत्य आहे तेच सांगतो कीं हा बालक उत्पन्न होतांच दोन्ही मातांना खाऊन टाकतो. मी स्वत: मृत्युवश मानव आहे म्हणून देवाचे कर्तृत्व मला समजत नाही. पण ते या अग्नीलाच कळते. तोच लोकोत्तर ज्ञानवान्‌ आहे; केवळ ज्ञानमय आहे ४.


यो अ॑स्मा॒ अन्नं॑ तृ॒ष्व् आख्प् दधा॒त्याज्यै॑र्घृ॒तैर्जु॒होति॒ पुष्य॑ति ।
तस्मै॑ स॒हस्रं॑ अ॒क्षभि॒र्वि च॒क्षेऽ॑ग्ने वि॒श्वतः॑ प्र॒त्यङ्ङ् अ॑सि॒ त्वम् ॥ ५ ॥

यः अस्मै अन्नम् तृषुः दधातिः आज्यैः घृतैः जुहोतिः पुष्यतिः
तस्मैः सहस्रम् अक्ष-भिः विःचक्षेःअग्नेःविश्वतः प्रत्यङ् असिःत्वम् ॥ ५ ॥

जो भक्त ह्या अग्नीला तत्काळ हविर्भाग अर्पण तो, जो त्याला आज्य घृताने आहुति देतो, त्याला प्रसन्न करतो-अशा भक्ताला तो आपल्या सहस्त्र नेत्रांनी कृपादृष्टीने अवलोकन करील. हे अग्नि, सर्व दिशांनी तूं आमच्या सन्मुखच आहेस ५.


किं दे॒वेषु॒ त्यज॒ एन॑श्चक॒र्थाग्ने॑ पृ॒च्छामि॒ नु त्वां अवि॑द्वान् ।
अक्री॑ळ॒न् क्रीळ॒न् हरि॒रत्त॑वेऽ॒दन् वि प॑र्व॒शश्च॑कर्त॒ गां इ॑वा॒सिः ॥ ६ ॥

किं देवेषु त्यजः एनः चकर्थ अग्ने पृच्चामि नु त्वां अविद्वान्
अक्रीळन् क्रीळन् हरिः अत्तवे अदन् वि पर्व-शः चकर्त गाम्-इव असिः ॥ ६ ॥

दिव्यविबुधांसंबंधाने अगदी अक्षम्य असें पातक तरी तूं कोणतें केलेंस ? असा मला (कोणी) प्रश्न केला, तर हे अग्नि, ते उत्तर मी तुलाच विचारतो. कारण मला कांहींच कळत नाही. सिंह हा खाण्यासाठी सावजाशी केव्हां केव्हां खेळतो, केव्हां केव्हां खेळत नाही, पण शेवटी खातांना मात्र तरवारीने चिरल्याप्रमाणे बिचार्‍या रानांतील गव्याची खांडोळी करतो (ह्या सर्व गोष्टी तूंच जाणतोस) ६.


विषू॑चो॒ अश्वा॑न् युयुजे वने॒जा ऋजी॑तिभी रश॒नाभि॑र्गृभी॒तान् ।
च॒क्ष॒दे मि॒त्रो वसु॑भिः॒ सुजा॑तः॒ सं आ॑नृधे॒ पर्व॑भिर्वावृधा॒नः ॥ ७ ॥

विषूचः अश्वान् युयुजे वने--जाः ऋजीति-भिः रशनाभिः गृभीतान्
चक्षदे इत्रः वसु-भिः सु-जातः सं आनृधे पर्व-भिः ववृधानः ॥ ७ ॥

सर्व दिशांकडे धांवणारे आपल्या वन्य अश्व तूं रथाला जोडतोस. ते सरळ आणि तेजस्वी लगामांनी आंवरून धरलेले आहेत. अग्नि वसूंसह आमचा मित्र हो‍ऊन आपला हविर्भाग भक्षण करतो आणि आमच्या प्रत्येक अवयवांच्या ठिकाणी पुष्टता आणून अभिवृद्धि करतो ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८० (अग्निसूक्त)

ऋषी - सौचिक अथवा वैश्वानर अग्नि अथवा सप्ति वाजंभर : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


अ॒ग्निः सप्तिं॑ वाजम्भ॒रं द॑दात्य॒ग्निर्वी॒रं श्रुत्यं॑ कर्मनि॒ष्ठाम् ।
अ॒ग्नी रोद॑सी॒ वि च॑रत् सम॒ञ्जन्न् अ॒ग्निर्नारीं॑ वी॒रकु॑क्षिं॒ पुरं॑धिम् ॥ १ ॥

अग्निः सप्तिं वाजम्-भरं ददाति अग्निः वीरं श्रुत्यं कर्मनिः-स्थां
अग्निः रोदसी इति वि चरत् सम्-अजन् अग्निः नारीं वीर-कुक्षिं पुरम्-धिम् ॥ १ ॥

सत्वविजय प्राप्त करून देणारा असा "सप्ति" (म्हणजे धुरिण) अग्नि हा अर्पण करतो; विख्यात आणि सत्कर्मनिरत असा शूर पुत्र अग्निच देतो. अग्निच द्यावा पृथिवींना विभूषित करून संचार करतो आणि कुलस्त्रियेच्या पोटीं वीर्यशाली पुत्र होतील असा आशिर्वाद देतो १.


अ॒ग्नेरप्न॑सः स॒मिद॑स्तु भ॒द्राग्निर्म॒ही रोद॑सी॒ आ वि॑वेश ।
अ॒ग्निरेकं॑ चोदयत् स॒मत्स्व् अ॒ग्निर्वृ॒त्राणि॑ दयते पु॒रूणि॑ ॥ २ ॥

अग्नेः अप्नसः सम्-इत् अस्तु भद्रा अग्निः मही इति रोदसी इति आ विवेश
अग्निः एकं चोदयत् समत्-सु अग्निः वृत्राणि दयते पुरूण् इ ॥ २ ॥

कर्मप्रिय अग्नीची (ही) समिधा कल्याणदायिनी होवो. ह्या श्रेष्ठ द्यावापृथिवीमध्ये अग्निच प्रविष्ट झाला आहे. भक्त एकटाच असला तरी त्याला युद्धामध्ये अग्निच प्रोत्साहन देतो आणि शत्रू अगणित असले तरी अग्नि त्यांचा समचार घेतो २.


अ॒ग्निर्ह॒ त्यं जर॑तः॒ कर्णं॑ आवा॒ग्निर॒द्‌भ्यो निर॑दह॒ज् जरू॑थम् ।
अ॒ग्निरत्रिं॑ घ॒र्म उ॑रुष्यद॒न्तर॒ग्निर्नृ॒मेधं॑ प्र॒जया॑सृज॒त् सम् ॥ ३ ॥

अग्निः ह त्यं जरतः कर्णं आव अग्निः अत्-भ्यः निः अदहत् जरूथं
अग्निः अत्रिं घर्मे उरुष्यत् अन्तः अग्निः नृ-मेधं प्र-जया असृजत् सम् ॥ ३ ॥

स्तोतृजनांच्या कर्णाला अग्नीनेच संतुष्ट केले आणि जरूथ राक्षस पाण्यांत दडला होता तरी तेथून त्याला अग्निने हाकून देऊन जाळून टाकले. तापलेल्या घरांच्या आंत अत्रिऋषि अडकले असतां अग्नीनेंच त्यांची मुक्तता केली आणि अग्नीनेंच नृमेधाला संततीने युक्त केले ३.


अ॒ग्निर्दा॒द्द्रवि॑णं वी॒रपे॑शा अ॒ग्निरृषिं॒ यः स॒हस्रा॑ स॒नोति॑ ।
अ॒ग्निर्दि॒वि ह॒व्यं आ त॑ताना॒ग्नेर्धामा॑नि॒ विभृ॑ता पुरु॒त्रा ॥ ४ ॥

अग्निः दात् द्रविणं वीर-पेशाः अग्निः ऋषिं यः सहस्रा सनोति
अग्निः दिवि हव्यं आ ततान अग्नेः धामानि वि-भृता पुरु-त्रा ॥ ४ ॥

जे वीरालाच शोभेल असे अचल वैभव अग्निच देतो. जो सहस्त्रावधि सोमसवने करितो, असा ऋषि अग्निच देतो. (भक्ताचा) हविर्भाग दिव्यलोकापर्यंत अग्निच नेऊन पोहोंचवितो; (याप्रमाणे) अग्नीची जी तेजोमय रूपे आहेत ती सर्व ठिकाणी ’निरनिराळी’ परिपूर्ण आहेत ४.


अ॒ग्निं उ॒क्थैरृष॑यो॒ वि ह्व॑यन्तेऽ॒ग्निं नरो॒ याम॑नि बाधि॒तासः॑ ।
अ॒ग्निं वयो॑ अ॒न्तरि॑क्षे॒ पत॑न्तोऽ॒ग्निः स॒हस्रा॒ परि॑ याति॒ गोना॑म् ॥ ५ ॥

अग्निं उक्थैः ऋषयः वि ह्वयन्ते अग्निं नरः यामनि बाधितासः
अग्निं वयः अन्तरिक्षे पतन्तः अग्निः सहस्रा परि याति गोनाम् ॥ ५ ॥

अग्नीला सामसूक्तांच्या योगाने ऋषिजन नाना प्रकारांनी विनवीत असतात. सन्मार्गाने वागत असतांना जे नाडले जातात तेही अग्नीलाच परोपरीने आळवीत असतात. आकाशांत उडणारे पक्षीगण अग्नीचेच भजन करतात आणि हजारो धेनूंचे समुदाय अग्नीकडेच धांवतात ५.


अ॒ग्निं विश॑ ईळते॒ मानु॑षी॒र्या अ॒ग्निं मनु॑षो॒ नहु॑षो॒ वि जा॒ताः ।
अ॒ग्निर्गान्ध॑र्वीं प॒थ्यां ऋ॒तस्या॒ग्नेर्गव्यू॑तिर्घृ॒त आ निष॑त्ता ॥ ६ ॥

अग्निं विशः ईळते मानुषीः याः अग्निं मनुषः नहुषः वि जाताः
अग्निः गान्धर्वीं पथ्यां ऋतस्य अग्नेः गव्यूतिः घृते आ नि-सत्ता ॥ ६ ॥

तसेंच जे मानववंशातील आहेत तेही अग्नीचे स्तवन करतात. मनुवंशोत्पन्न आणि नहुषवंशोत्पन्न भक्त देखील अग्नीची सेवा करितात. सद्धर्माचा जो मार्ग, गंधर्वाचा जो मार्ग, तो मार्ग अग्नीच (दाखवितो), पण अग्नीचा जो मुख्य प्रदेश आहे, तो सर्वतोपरी घृताने आर्द्र असतो ६.


अ॒ग्नये॒ ब्रह्म॑ ऋ॒भव॑स्ततक्षुर॒ग्निं म॒हां अ॑वोचामा सुवृ॒क्तिम् ।
अग्ने॒ प्राव॑ जरि॒तारं॑ यवि॒ष्ठाग्ने॒ महि॒ द्रवि॑णं॒ आ य॑जस्व ॥ ७ ॥

अग्नये ब्रह्म ऋभवः ततक्षुः अग्निं महां अवोचाम सु-वृक्तिं
अग्ने प्र अव जरितारं यविष्ठ अग्ने महि द्रविणं आ यजस्व ॥ ७ ॥

हे प्रार्थनासूक्त अग्नीप्रीत्यर्थ ऋभूंनी रचले आहे, आणि आम्ही देखील श्रेष्ठ अग्नीला उद्देशून उत्कृष्ट स्तुति म्हटली आहे; तर हे यौवनाढ्या अग्निदेवा, स्तोतृजनांवर कृपा कर आणि अचल जे धन ते तुझ्या भक्तजनांना मिळेल असें कर ७.


ॐ तत् सत्


GO TOP