PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ५१ ते ६०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५१ (देव-अग्नि संवादसूक्त)

ऋषी -१, ३, ५, ७, ९ देव; अवशिष्ट सौचिक अग्नि
देवता - २, ४, ६, ८ - देव, अवशिष्ट - अग्नि
छं - त्रिष्टुभ्


म॒हत् तदुल्बं॒ स्थवि॑रं॒ तदा॑सी॒द्येनावि॑ष्टितः प्रवि॒वेशि॑था॒पः ।
विश्वा॑ अपश्यद्बहु॒धा ते॑ अग्ने॒ जात॑वेदस्त॒न्वो दे॒व एकः॑ ॥ १ ॥

महत् तत् उल्बं स्थविरं तत् आसीत् येन आविष्टितः प्र-विवेशिथ अपः
विश्वाः अपश्यत् बहुधा ते अग्ने जात-वेदः तन्वः देवः एकः ॥ १ ॥

ज्या आस्तरणानें परिवेष्टित हो‍ऊन तूं उदकांत प्रविष्ट झालास ते आस्तरण चांगले विस्तृत आणि जाड होते; आणि परमेश्वर जो एकच (अद्वितीय) आहे त्याने, हे अग्निदेवा, तुझी नाना प्रकारची सर्व रूपें अवलोकन केली १.


को मा॑ ददर्श कत॒मः स दे॒वो यो मे॑ त॒न्वो बहु॒धा प॒र्यप॑श्यत् ।
क्वाह॑ मित्रावरुणा क्षियन्त्य॒ग्नेर्विश्वाः॑ स॒मिधो॑ देव॒यानीः॑ ॥ २ ॥

कः मा दृर्श कतमः सः देवः यः मे तन्वः बहुधा परि-अपश्यत्
क्व अह मित्रावरुणा क्षियन्ति अग्नेः विश्वाः सम्-इधः देव-यानीः ॥ २ ॥

मला कोणी पाहिले म्हणतां ? ज्याने माझी नाना प्रकारची सर्व रुपें अवलोकन केली तो कोणता देव बरें ? मित्र वरुणांनो, अग्नीच्या ज्या यच्चयावत्‌ समिधा (भक्ताला) देवाची प्राप्ति करून देतात, त्या समिधा कोठें असतात ? २.


ऐच्छा॑म त्वा बहु॒धा जा॑तवेदः॒ प्रवि॑ष्टं अग्ने अ॒प्स्व् ओष॑धीषु ।
तं त्वा॑ य॒मो अ॑चिकेच् चित्रभानो दशान्तरु॒ष्याद॑ति॒रोच॑मानम् ॥ ३ ॥

ऐच्चाम त्वा बहुधा जात-वेदः प्र-विष्टं अग्ने अप्-सु ओषधीषु
तं त्वा यमः अच्चिकेत् चित्रभानो इतिचित्र-भानो दश-अन्तरुष्यात् अति-रोचमानम् ॥ ३ ॥

हे सकलवस्तुज्ञात्या अग्ने, तूं उदकांत आणि औषधींत प्रवेश केला आहेस असें समजल्यानें पुष्कळ ठिकाणीं आम्हीं तुझा शोध केला. परंतु हे अद्‌भुतदीप्ते देवा, (तूं कोणाला सांपडला नाहींस; पण) आपल्या अगदी गूढ अशा दहा निवास स्थानांमध्ये प्रज्वलित होतांना तुजला जगन्नियंत्याने मात्र पाहिलें ३.


हो॒त्राद॒हं व॑रुण॒ बिभ्य॑दायं॒ नेदे॒व मा॑ यु॒नज॒न्न् अत्र॑ दे॒वाः ।
तस्य॑ मे त॒न्वो बहु॒धा निवि॑ष्टा ए॒तं अर्थं॒ न चि॑केता॒हं अ॒ग्निः ॥ ४ ॥

होत्रात् अहं वरुण बिभ्यत् आयं न इत् एव मा युनजन् अत्र देवाः
तस्य मे तन्वः बहुधा नि-विष्टाः एतं अर्थं न चिकेत अहं अग्नि ः ॥ ४ ॥

हे वरुणा, मी येथे आलो तो होतृकर्माला त्रासून भिऊन आलो नाही (दुसर्‍या हेतूने आलो) म्हणूनच येथे दिव्यविबुधांनी माझी योजना केली; परंतु त्यामुळे (अनेक ठिकाणी प्रवेश केल्यानें) माझी स्वरूपे अनेक ठिकाणी निरनिराळी झाली आहेत असा त्याचा अर्थ नव्हे; आणि मी स्वत: अग्नि तसा अर्थ समजत नाहीं ४.


एहि॒ मनु॑र्देव॒युर्य॒ज्ञका॑मोऽरं॒कृत्या॒ तम॑सि क्षेष्यग्ने ।
सु॒गान् प॒थः कृ॑णुहि देव॒याना॒न् वह॑ ह॒व्यानि॑ सुमन॒स्यमा॑नः ॥ ५ ॥

एहि मनुः देव-युः यज-कामः अरम्-कृत्य तमसि क्षेषि अग्ने
सु-गान् पथः कृणुहि देव-यानान् वह हव्यानि सु-मनस्यमानः ॥ ५ ॥

(ठीक आहे), तर हे अग्ने, तूं इकडे ये. मनुष्य हा देवभक्तिप्रिय आहे; तो यज्ञप्रियही आहे, तर हे अग्नी तूं तेजो‍ऽलंकृत हो‍ऊन अंधकारांत प्रज्वलित हो‍ऊन रहा; देवाची प्राप्ति करून देणारे जे मार्ग आहेत ते सुगम कर आणि प्रसन्नान्त:करणानें आमचे हविर्भाग तूं देवाकडे पोहोंचीव ५.


अ॒ग्नेः पूर्वे॒ भ्रात॑रो॒ अर्थं॑ ए॒तं र॒थीवाध्वा॑नं॒ अन्व् आव॑रीवुः ।
तस्मा॑द्‌भि॒या व॑रुण दू॒रं आ॑यं गौ॒रो न क्षे॒प्नोर॑विजे॒ ज्यायाः॑ ॥ ६ ॥

अग्नेः पूर्वे भ्रातरः अर्थं एतं रथी-इव अध्वानं अनु आ अवरीवुरिति
तस्मात् भिया वरुण दूरं आयं गौरः न क्षेप्नोः आविजे ज्यायाः ॥ ६ ॥

मज अग्नीचे जे ज्येष्ठबंधू (म्हणजे पूर्वींचे अग्नि होते) त्यांनीही (काय केलें तर) एखादा रथी आपल्या योग्य असा विशिष्ट मार्ग पत्करतो त्याप्रमाणे हविर्भाग पोहोंचविण्याचाच मार्ग पत्करला; परंतु शरसंधान करणार्‍याच्या धनुष्याला पाहून काळवीट पळून जावा त्याप्रमाणें हे वरुणा, मी मात्र भिऊन दूर गेलों आहे काय ? ६.


कु॒र्मस्त॒ आयु॑र॒जरं॒ यद॑ग्ने॒ यथा॑ यु॒क्तो जा॑तवेदो॒ न रिष्याः॑ ।
अथा॑ वहासि सुमन॒स्यमा॑नो भा॒गं दे॒वेभ्यो॑ ह॒विषः॑ सुजात ॥ ७ ॥

कुर्मः ते आयुः अजरं यत् अग्ने यथा युक्तः जात-वेदः न रिष्याः
अथ वहासि सु-मनस्यमानः भागं देवेभ्यः हविषः सु-जात ॥ ७ ॥

यासाठींच तुझी आम्हीं सेवा करतो. तुझे आयुष्य कधी क्षीण होत नाही, म्हणूनच हे सकलवस्तुज्ञा, तुझी (यज्ञकार्यात) योजना झाली तरी तूं थकून जात नाहीस; पण उलट अत्यंत सौजन्याने (भक्ताचा) हविर्भाग दिव्यविबुधांकडे, हे सुप्रभवा देवा, तूं नेऊन पोहोंचवितोस ७.


प्र॒या॒जान् मे॑ अनुया॒जांश्च॒ केव॑ला॒न् ऊर्ज॑स्वन्तं ह॒विषो॑ दत्त भा॒गम् ।
घृ॒तं चा॒पां पुरु॑षं॒ चौष॑धीनां अ॒ग्नेश्च॑ दी॒र्घं आयु॑रस्तु देवाः ॥ ८ ॥

प्र-याजान् मे अनु-याजान् च केवलान् ऊर्जस्वन्तं हविषः दत्त भागं
घृतं च अपां पुरुषं च ओषधीनां अग्नेः च दीर्घं आयुः अस्तु देवाः ॥ ८ ॥

माझे प्रयाज (प्रथम द्यावयाचे हविर्भाग) आणि अनुयाज (मागाहून द्याव्याचे हविर्भाग) हे अगदी न चुकतां अर्पण करा. ओजस्विता आणणारा उत्कृष्ट हविर्भागही (देवाला) अर्पण करा; उदकांतील सारभूत आणि पुरुषाला प्रिय जें औषधींतील घृत (मला) अग्नीला अर्पण करा आणि हे दिव्यविबुधांनो, तुम्हांला (आणि भक्तांना) दीर्घायुष्य असो ८.


तव॑ प्रया॒जा अ॑नुया॒जाश्च॒ केव॑ल॒ ऊर्ज॑स्वन्तो ह॒विषः॑ सन्तु भा॒गाः ।
तवा॑ग्ने य॒ज्ञोऽ॒यं अ॑स्तु॒ सर्व॒स्तुभ्यं॑ नमन्तां प्र॒दिश॒श्चत॑स्रः ॥ ९ ॥

तव प्र-याजाः अनु-याजाः च केवले ऊर्जस्वन्तः हविषः सन्तु भागाः
तव अग्ने यजः अयं अस्तु सर्वः तुभ्यं नमन्तां प्र-द् इशः चतस्रः ॥ ९ ॥

(हे याजका) तुझे प्रयाज आणि अनुयाज हे अखंड असोत. तुझ्या हविर्भागाच्या आहुतिही ओजस्विता आणणार्‍या असोत. हे अग्निदेवा, हा सर्व यज्ञ तुजप्रीत्यर्थच होवो आणि चारही दिशा देखील तुजपुढे नम्र होवोत ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५२ (देव-अग्नि संवादसूक्त)

ऋषी - सौचीक अग्नि
देवता - विश्वेदेव
छंद - त्रिष्टुभ्


विश्वे॑ देवाः शा॒स्तन॑ मा॒ यथे॒ह होता॑ वृ॒तो म॒नवै॒ यन् नि॒षद्य॑ ।
प्र मे॑ ब्रूत भाग॒धेयं॒ यथा॑ वो॒ येन॑ प॒था ह॒व्यं आ वो॒ वहा॑नि ॥ १॥

विश्वे देवाः शास्तन मा यथा इह होता वृतः मनवै यत् नि-सद्य
प्र मे ब्रूत भाग-धेयं यथा वः येन पथा हव्यं आ वः वहानि ॥ १ ॥

अखिल विभूतींनो, काय करावयाचे ते मला सांगा. म्हणजे मला तुम्ही यज्ञसंपादक म्हणून मान्य केले आहे, तर येथे आसनावर आरोहण करून मी (यज्ञकार्याचे) मनन करीन. तुम्हाला कसकसा हविर्भाव द्यावयाचा तेही मला सांगा; म्हणजे त्या मार्गाने मी तुमचा हविर्भाग तुम्हांला पोहोंचवीन १.


अ॒हं होता॒ न्यसीदं॒ यजी॑या॒न् विश्वे॑ दे॒वा म॒रुतो॑ मा जुनन्ति ।
अहः॑-अहरश्वि॒नाध्व॑र्यवं वां ब्र॒ह्मा स॒मिद्‌भ॑वति॒ साहु॑तिर्वाम् ॥ २ ॥

अहं होता नि असीदं यजीयान् विश्वे देवाः मरुतः मा जुनन्ति
अहः-अहः अश्विना आध्वर्यवं वां ब्रह्मा सम्-इत् भवति सा आहुतिः वाम् ॥ २ ॥

हा पहा, मी माननीय यज्ञसंपादक म्हणून येथें अधिष्ठित झालो आहे, सकल दिव्य विबुध आणि मरुत्‌गण देखील मला अनुमति देत आहेत. अश्वीहो, तुम्हीही प्रतिदिनी अध्वर्यूचे काम त्याच्याकडून करून घ्या. हा ब्रह्मा-ऋत्विज्‌ आणि ही समिधा येथे आहे. तशीच तुमच्यासाठी आहुतीही येथे ठेविली आहे २.


अ॒यं यो होता॒ किरु॒ स य॒मस्य॒ कं अप्यू॑हे॒ यत् स॑म॒ञ्जन्ति॑ दे॒वाः ।
अहः॑-अहर्जायते मा॒सि-मा॒स्यथा॑ दे॒वा द॑धिरे हव्य॒वाह॑म् ॥ ३ ॥

अयं यः होता किः ओं इति सः यमस्य कं अपि ऊहे यत् सम्-अजन्ति देवाः
अहः-अहः जायते मासि-मासि अथ देवाः दधिरे हव्य-वाहम् ॥ ३ ॥

हा जो यज्ञसंपादक आहे, तो कोण ? तो यमाचा आहे कीं काय ? कारण की, तो जें कांही योजतो ते सर्व दिव्य विबुधांना (पोहोंचतें) मान्य होतें. तो प्रतिदिनी, प्रतिमासीं प्रकट होतो आणि म्हणून त्यालाच दिव्यबुधांनी यज्ञ संपादक केले आहे ३.


मां दे॒वा द॑धिरे हव्य॒वाहं॒ अप॑म्लुक्तं ब॒हु कृ॒च्छ्रा चर॑न्तम् ।
अ॒ग्निर्वि॒द्वान् य॒ज्ञं नः॑ कल्पयाति॒ पञ्च॑यामं त्रि॒वृतं॑ स॒प्तत॑न्तुम् ॥ ४ ॥

मां देवाः दधिरे हव्य-वाहं अप-म्लुक्तं बहु कृच्च्रा चरन्तं
अग्निः विद्वान् यजं नः कल्पयाति पच-यामं त्रि-वृतं सप्त-तन्तुम् ॥ ४ ॥

म्हणूनच, अतिशय गुप्त राहणारा, अनेक दुर्गम ठिकाणी संचार करणारा अशा मजला दिव्यविबुधांनी आपल्या यज्ञसंपादक केले आहे. अग्नि हा आमचा देखील यज्ञ (तडीस नेतो), आमचा पंचमार्गीय अथवा त्रिप्रकार, किंवा सप्तस्तुतिमय यज्ञ यथासांग तडीस नेतो ४.


आ वो॑ यक्ष्यमृत॒त्वं सु॒वीरं॒ यथा॑ वो देवा॒ वरि॑वः॒ करा॑णि ।
आ बा॒ह्वोर्वज्रं॒ इन्द्र॑स्य धेयां॒ अथे॒मा विश्वाः॒ पृत॑ना जयाति ॥ ५ ॥

आ वः यक्षि अमृत-त्वं सु-वीरं यथा वः देवाः वरिवः कराणि
आ बाह्वोः वज्रं इन्द्रस्य धेयां अथ इमाः विश्वाः पृतनाः जयाति ॥ ५ ॥

मी तुम्हासाठी यजन करून अमरत्व आणि उत्कृष्ट वीर्य यांची प्राप्ति करून दे‍ईन. हे दिव्यविबुधांनो, ज्या योगाने तुम्हांला अतिशय मनमोकळेपणा वाटेल असेंच मी करीन. इंद्राच्या खांद्यावर मीच वज्र ठेवून दे‍ईन, म्हणजे तो या सर्व शत्रुसेनेला पादाक्रांत करील ५.


त्रीणि॑ श॒ता त्री स॒हस्रा॑ण्य॒ग्निं त्रिं॒शच् च॑ दे॒वा नव॑ चासपर्यन् ।
औक्ष॑न् घृ॒तैरस्तृ॑णन् ब॒र्हिर॑स्मा॒ आदिद्धोता॑रं॒ न्यसादयन्त ॥ ६ ॥

त्रीणि शता त्री सहस्राणि अग्निं त्रिंशत् च देवाः नव च असपर्यन्
औक्षन् घृतैः अस्तृणन् बर्हिः अस्मै आत् इत् होतारं नि असादयन्त ॥ ६ ॥

तीन हजार तीनशें तीस आणि नऊ इतक्या दिव्यविभूतींनी अग्नीची सेवा केली. त्यांनी त्याला यज्ञसंपादक म्हणून त्या (आसना)वर अधिष्ठित केले ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५३ (देव-अग्नि संवादसूक्त)

ऋषी - ४, ५ - सौचीक अग्नि, अवशिष्ट - देव
देवता - ४. ५ - देव; अवशिष्ट - अग्नि
छंद - १-५, ८ - त्रिष्टुभ् , अवशिष्ट - जगती


यं ऐच्छा॑म॒ मन॑सा॒ सोऽ॒यं आगा॑द्य॒ज्ञस्य॑ वि॒द्वान् परु॑षश्चिकि॒त्वान् ।
स नो॑ यक्षद्दे॒वता॑ता॒ यजी॑या॒न् नि हि षत्स॒दन्त॑रः॒ पूर्वो॑ अ॒स्मत् ॥ १॥

यं ऐच्चाम मनसा सः अयं आ अगात् यजस्य विद्वान् परुषः चिकि त्वान्
सः नः यक्षत् देव-ताता यजीयान् नि हि सत्सत् अन्तरः पूर्वः अस्मत् ॥ १ ॥

ज्याची आम्हीं मनाने इच्छा केली तो हा आला; (जो) यज्ञाचा प्रत्येक अंगविभाग बारकाईने जाणणारा तो प्राप्त झाला आहे. या देवसेवारूप यज्ञांत तोच आमच्यासाठीं पूज्य विबुधांचे यजन करो आणि तो आमचा प्रमुख म्हणून येथे आमच्यामध्यें आसनावर अधिष्ठित होवो १.


अरा॑धि॒ होता॑ नि॒षदा॒ यजी॑यान् अ॒भि प्रयां॑सि॒ सुधि॑तानि॒ हि ख्यत् ।
यजा॑महै य॒ज्ञिया॒न् हन्त॑ दे॒वाँ ईळा॑महा॒ ईड्याँ॒ आज्ये॑न ॥ २ ॥

अराधि होता नि-सदा यजीयान् अभि प्रयांसि सु-धितानि हि ख्यत्
यजामहै यजियान् हन्त देवान् ईळामहै ईड्यान् आज्येन ॥ २ ॥

यज्ञसंपादक आणि अत्यंत पूज्य अग्नि आसनस्थ हो‍ऊन प्रसन्न(तेनें प्रज्वलित) झाला. त्याच्यापुढे ठेवलेल्या रुचिर हविरन्नाकडे त्याने दृष्टिक्षेप केला. वा! उत्तम! आतां तर आम्हीं आनंदाने दिव्यविबुधांचे यजन करूं आणि घृताहुतींनी त्या परमस्तुत्य देवांचे स्तवन करूं २.


सा॒ध्वीं अ॑कर्दे॒ववी॑तिं नो अ॒द्य य॒ज्ञस्य॑ जि॒ह्वां अ॑विदाम॒ गुह्या॑म् ।
स आयु॒रागा॑त् सुर॒भिर्वसा॑नो भ॒द्रां अ॑कर्दे॒वहू॑तिं नो अ॒द्य ॥ ३ ॥

साध्वीं अकः देव-वीतिं नः अद्य यजस्य जिह्वां अविदाम गुह्यां
सः आयुः आ अगात् सुरभिः वसानः भद्रां अकः देव-हूतिं नः अद्य ॥ ३ ॥

आमची देवोपासना आज त्याने सफल केली आणि गूढ अशी जी यज्ञाची (अग्निरूप) जिव्हा तिची अर्थात्‌ त्याच्या कृपेची आम्हांस प्राप्तिही झाली. तो आयुष्यरूप अग्नि सुगंधित द्रव्यें धारण करून येथे प्राप्त झाला आणि आज त्यानें आमची देवोपासना मंगलमय केली ३.


तद॒द्य वा॒चः प्र॑थ॒मं म॑सीय॒ येनासु॑राँ अ॒भि दे॒वा असा॑म ।
ऊर्जा॑द उ॒त य॑ज्ञियासः॒ पञ्च॑ जना॒ मम॑ हो॒त्रं जु॑षध्वम् ॥ ४ ॥

तत् अद्य वाच प्रथमं मसीय येन असुरान् अभि देवाः असाम
ऊर्ज-अदः उत यजियासः पच जनाः मम होत्रं जुषध्वम् ॥ ४ ॥

तर आज आम्ही असे शब्द उच्चारूं की आपणांस असुर म्हणविणारांना आम्हीं दिव्यजन आपल्या अंकित करून घेऊं; उर्जस्विता हेंच ज्यांचे अन्न अशा यज्ञार्ह दिव्यविबुधांनो आणि तसेंच पांचही संघांनो तुम्ही आमचा हविर्भाग संतोषाने ग्रहण करा ४.


पञ्च॒ जना॒ मम॑ हो॒त्रं जु॑षन्तां॒ गोजा॑ता उ॒त ये य॒ज्ञिया॑सः ।
पृ॒थि॒वी नः॒ पार्थि॑वात् पा॒त्वंह॑सोऽ॒न्तरि॑क्षं दि॒व्यात् पा॑त्व॒स्मान् ॥ ५ ॥

पच जनाः मम होत्रं जुषन्तां गो--जाताः उत ये यजियासः
पृथिवी नः पार्थिवात् पातु अंहसः अन्तरिक्षं दिव्यात् पातु अस्मान् ॥ ५ ॥

पांचही संघ माझ्या आहुतीचा स्वीकार करून संतुष्ट होवोत, त्याचप्रमाणे जे प्रकाशोत्पन्न आहेत, आणि जे यज्ञार्ह आहेत, तेही स्वीकार करोत; आणि भूलोकी घडणार्‍या पातकापासून पृथिवी आणि देवाविषयी घडणार्‍या दोषापासून अन्तरिक्ष आमचे संरक्षण करो ५.


तन्तुं॑ त॒न्वन् रज॑सो भा॒नुं अन्व् इ॑हि॒ ज्योति॑ष्मतः प॒थो र॑क्ष धि॒या कृ॒तान् ।
अ॒नु॒ल्ब॒णं व॑यत॒ जोगु॑वां॒ अपो॒ मनु॑र्भव ज॒नया॒ दैव्यं॒ जन॑म् ॥ ६ ॥

तन्तुं तन्वन् रजसः भानुं अनु इहि ज्योतिष्मतः पथः रक्ष धि या कृतान्
अनुल्बणं वयत जोगुवां अपः मनुः भव जनय दैव्यं जनम् ॥ ६ ॥

यज्ञरूप तंतू कांतीत असतां (हे अग्ने) तूं रजोलोकापासून येणार्‍या किरणपुंजाला (तेजोगोला)ला अनुसरून मार्गक्रमण कर आणि ध्यानबलाने जे तेजोमय मार्ग आंखलेले आहेत त्यांचे रक्षण कर. देवांनो, कवने करणारांची काव्यकृति प्रसादपूर्ण करा. (हे अग्ने,) तूं आतां मनु हो आणि दिव्यविबुधांना येथे प्रकट कर ६.


अ॒क्षा॒नहो॑ नह्यतनो॒त सो॑म्या॒ इष्कृ॑णुध्वं रश॒ना ओत पिं॑शत ।
अ॒ष्टाव॑न्धुरं वहता॒भितो॒ रथं॒ येन॑ दे॒वासो॒ अन॑यन्न् अ॒भि प्रि॒यम् ॥ ७ ॥

अक्ष-नहः नह्यतन उत सोम्याः इष्कृणुध्वं रशनाः आ उत पिं शत
अष्टावन्धुरं वहत अभितः रथं येन देवासः अनयन् अभि प्रियम् ॥ ७ ॥

सोमसेवन करणार्‍या उपासकांनो, रथाला जोडण्याचे अश्व जोडून टाका. त्यांचे लगाम घांसूनपुसून स्वच्छ चकचकित करा. ज्या रथांत आठ आसने आहेत असा रथ पुढें घेऊन या. अशा रथांतूनच दिव्यविबुधांनी आम्हांला ज्या वस्तू प्रिय असतात त्या आणल्या आहेत ७.


अश्म॑न्वती रीयते॒ सं र॑भध्वं॒ उत् ति॑ष्ठत॒ प्र त॑रता सखायः ।
अत्रा॑ जहाम॒ ये अस॒न्न् अशे॑वाः शि॒वान् व॒यं उत्त॑रेमा॒भि वाजा॑न् ॥ ८ ॥

अश्मन्-वती रीयते सं रभध्वं उत् तिष्ठत प्र तरत सखायः
अत्र जहाम ये असन् अशेवाः शिवान् वयं उत् तरेम अभि वाजान् ॥ ८ ॥

ही पहा खडकाळ अशी अश्मन्वती नदी वहात आहे. येथे एकमेकांना हात द्या आणि उभें राहून नदीच्या पार व्हा. जें कांही असुखप्रद असेल तें येथेंच मागें ठेवून आणि जीं जीं मंगलकारक सत्त्वसामर्थ्ये आहेत त्यांना अनुलक्षून आम्हीं (संकटरूप) नद्या तरून जाऊं ८.


त्वष्टा॑ मा॒या वे॑द॒पसां॑ अ॒पस्त॑मो॒ बिभ्र॒त् पात्रा॑ देव॒पाना॑नि॒ शंत॑मा ।
शिशी॑ते नू॒नं प॑र॒शुं स्वा॑य॒सं येन॑ वृ॒श्चादेत॑शो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ ॥ ९ ॥

त्वष्टा माया वेत् अपसां अपः-तमः बिभ्रत् पात्रा देव-पानानि शम्-तमा
शिशीते नूनं परशुं सु-आयसं येन वृश्चात् एतशः ब्रह्मणः पतिः ॥ ९ ॥

कुशलां मध्ये अत्यंत कुशल असा जो त्वष्टा त्याला सर्व प्रकारच्या माया म्हणजे अद्‌भूत युक्त्या अवगत आहेत. उत्तम पोलादाच्या फरशूला धार लावून त्या फरशूला देव पाजळून ठेवतो आणि त्या फरशूने एतश(रूप) ब्रह्मणस्पति हा (दुष्टांचे) तुकडे तुकडे उडवितो ९.


स॒तो नू॒नं क॑वयः॒ सं शि॑शीत॒ वाशी॑भि॒र्याभि॑र॒मृता॑य॒ तक्ष॑थ ।
वि॒द्वांसः॑ प॒दा गुह्या॑नि कर्तन॒ येन॑ दे॒वासो॑ अमृत॒त्वं आ॑न॒शुः ॥ १० ॥

सतः नूनं कवयः सं शिशीत वाशीभिः याभिः अमृताय तक्षथ
विद्वांसः पदा गुह्यानि कर्तन येन देवासः अमृत-त्वं आनशुः ॥ १० ॥

ज्ञानी कवींनो, तुम्हीं पुण्यशीलच आहांत. ज्या हत्यारांनी तुम्हीं अमरत्व प्राप्तीसाठीं अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण केल्यात तीं हत्यारें पाजळून ठेवा. तुम्हीं ज्ञाते आहात; तुम्हीं सर्व गुप्त मार्ग जाणत आहांत; तर तोच मार्ग अनुसरा; कारण अशाच (गुप्त) मार्गाच्या योगाने दिव्य विबुध देखील अमरत्व पावले १०.


गर्भे॒ योषां॒ अद॑धुर्व॒त्सं आ॒सन्य॑पी॒च्येन॒ मन॑सो॒त जि॒ह्वया॑ ।
स वि॒श्वाहा॑ सु॒मना॑ यो॒ग्या अ॒भि सि॑षा॒सनि॑र्वनते का॒र इज् जिति॑म् ॥ ११॥

गर्भे योषां अदधुः वत्सं आसनि अपीच्येन मनसा उत जिह्वया
सः विश्वाहा सु-मनाः योग्याः अभि ससासनिः वनते कारः इत् जितिम् ॥ ११ ॥

तुमचे कर्तृत्व असें आहे कीं, तुम्ही गर्भामध्ये एक सुंदर तरुणी आणि तिच्या मुखाच्या जवळ एक वत्स दिसेल असे केलेंत, आणि हा चमत्कार तुम्ही आपल्या दृढ मानसिक सामर्थ्याने आणि त्याचप्रमाणें आपल्या वाणीने घडवून आणलात; म्हणून तुमचा शुद्धांत:करणी भक्तगण हा त्याचे यथोचित अभीष्ट प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नांत असतो आणि स्वकार्यांत सिद्धि मिळावी अशी दृढ आकांक्षा तोच बाळगतो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५४ (इंद्रसूक्त)

ऋषी - बृहदुक्थ वामदेव्य
देवता - इंद्र
छंद - त्रिष्टुभ्


तां सु ते॑ की॒र्तिं म॑घवन् महि॒त्वा यत् त्वा॑ भी॒ते रोद॑सी॒ अह्व॑येताम् ।
प्रावो॑ दे॒वाँ आति॑रो॒ दासं॒ ओजः॑ प्र॒जायै॑ त्वस्यै॒ यदशि॑क्ष इन्द्र ॥ १॥

तां सु ते कीर्तिं मघ-वन् महि-त्वा यत् त्वा भीते इति रोदसी इति अह्वयेतां
प्र आवः देवान् आ अतिरः दासं ओजः प्र-जायै त्वस्यै यत् अशिक्षः इन्द्र ॥ १ ॥

हे भगवंता, त्या तुज्या प्रख्यातीची आठवण ठेऊन तुझ्या महिम्यानें भिऊन गेलेल्या द्यावापृथिवीही तुझा धांवा करीत आहेत; कारण तूं दिव्यविबुधांचे संरक्षण केलेस आणि अधामिकांच्या बलाला तूं पुरून उरलास; तसेंच नानाविध लोकांना तूंच (सन्मार्गाचे) शिक्षण दिलेंस १.


यदच॑रस्त॒न्वा वावृधा॒नो बला॑नीन्द्र प्रब्रुवा॒णो जने॑षु ।
मा॒येत् सा ते॒ यानि॑ यु॒द्धान्या॒हुर्नाद्य शत्रुं॑ न॒नु पु॒रा वि॑वित्से ॥ २ ॥

यत् अचरः तन्वा ववृधानः बलानि इन्द्र प्र-ब्रुवाणः जनेषु
माया इत् सा ते यानि युद्धानि आहुः न अद्य शत्रुं ननु पुरा विवित्से ॥ २ ॥

तूं आकाराने वृद्धिंगत हो‍ऊन जेव्हां भूलोकांमध्ये संचार केलास, आणि हे इंद्रा, ह्या पृथ्वीवर आपल्या सामर्थ्याची महती वदविलीस, त्यावरून हेंच निदर्शनास आलें कीं तूं पूर्वी जी युद्धे केलीस म्हणून म्हणतात तो नुसता देखावा, ती एक माया होती; कारण तुला आजही कोणी शत्रु नाही आणो पूर्वीही तुला कोणी शत्रु भेटला नाही २.


क उ॒ नु ते॑ महि॒मनः॑ समस्या॒स्मत् पूर्व॒ ऋष॒योऽ॑न्तं आपुः ।
यन् मा॒तरं॑ च पि॒तरं॑ च सा॒कं अज॑नयथास्त॒न्व१ः स्वायाः॑ ॥ ३ ॥

के ओं इति नु ते महिमनः समस्य अस्मत् पूर्वे ऋषयः अन्तं आपुः
यत् मातरं च पितरं च साकं अजनयथाः तन्वः स्वायाः ॥ ३ ॥

तुझ्या एकंदर महिम्याचा ज्यांना ठाव लागला, असे आमच्या पूर्वी कोणकोण ऋषि हो‍ऊन गेले आहेत तें तरी कळूं द्या; कारण भूमाता आणि द्यू पिता यांनाही तूं आपल्याच शरीरापासून उत्पन्न केलेंस ३.


च॒त्वारि॑ ते असु॒र्याणि॒ नामादा॑भ्यानि महि॒षस्य॑ सन्ति ।
त्वं अ॒ङ्ग तानि॒ विश्वा॑नि वित्से॒ येभिः॒ कर्मा॑णि मघवञ् च॒कर्थ॑ ॥ ४ ॥

चत्वारि ते असुर्याणि नाम अदाभ्यानि महिषस्य सन्ति
त्वं अङ्ग तानि व् इश्वानि वित्से येभिः कर्माणि मघ-वन् चकर्थ ॥ ४ ॥

तू जो सर्वशक्तिमान्‌ त्याची ईश्वरी सामर्थ्यदर्शक आणि निर्दोष अशी नांवे चार आहेत. पण हे देवा, तूं तुलाच माहीत आहेत; आणि हे भगवंता, तीं नांवे सार्थ करण्यासाठींच तू अद्‌भुत पराक्रम करतोस ४.


त्वं विश्वा॑ दधिषे॒ केव॑लानि॒ यान्या॒विर्या च॒ गुहा॒ वसू॑नि ।
कामं॒ इन् मे॑ मघव॒न् मा वि ता॑री॒स्त्वं आ॑ज्ञा॒ता त्वं इ॑न्द्रासि दा॒ता ॥ ५ ॥

त्वं विश्वा दधिषे केवलानि यानि आविः या च गुहा वसूनि
कामं इत् मे मघ-वन् मा वि तारीः त्वं आजाता त्वं इन्द्र असि दाता ॥ ५ ॥

जीं अद्वितीय आहेत, जी प्रकट आहेत, आणि जी गुप्त आहेत अशी सर्व दिव्य धनें तूंच धारण करतोस, (आपल्या हाती ठेवतोस). तर हे भगवंता, माझ्या इच्छा विफल हो‍ऊ देऊ नको. हे इंद्रा, आम्हाला आज्ञा करणारा तूं आहेस, तूंच आमचा दाता आहेस ५.


यो अद॑धा॒ज् ज्योति॑षि॒ ज्योति॑र॒न्तर्यो असृ॑ज॒न् मधु॑ना॒ सं मधू॑नि ।
अध॑ प्रि॒यं शू॒षं इन्द्रा॑य॒ मन्म॑ ब्रह्म॒कृतो॑ बृ॒हदु॑क्थादवाचि ॥ ६ ॥

यः अदधात् ज्योतिषि ज्योतिः अन्तः यः असृजत् मधुना सं मधूनि
अध प्रियं शूषं इन्द्राय मन्म ब्रह्म-कृतः बृहत्-उक्थात् अवाचि ॥ ६ ॥

ज्यानें तारकाप्रदेशांत नक्षत्रपुंज स्थापन केले, सुंदर लतावल्ली मधुररसाने युक्त केल्या, त्या इंद्राप्रीत्यर्थ ब्रह्मसूक्तें म्हणणारा जो बृहदुक्थ त्याच्यापाशी शिकलेले आणि मला प्रिय असे जे मननीय ओजस्वी स्तवन मी आतां म्हटलें ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५५ (सूर्यस्वरूपी इंद्रसूक्त)

ऋषी - बृहदुक्थ वामदेव्य
देवता - इंद्र
छंद - त्रिष्टुभ्


दू॒रे तन् नाम॒ गुह्यं॑ परा॒चैर्यत् त्वा॑ भी॒ते अह्व॑येतां वयो॒धै ।
उद॑स्तभ्नाः पृथि॒वीं द्यां अ॒भीके॒ भ्रातुः॑ पु॒त्रान् म॑घवन् तित्विषा॒णः ॥ १॥

दूरे तत् नाम गुह्यं पराचैः यत् त्वा भीते इति अह्वयेतां वयः-धै
उत् अस्तभ्नाः पृथिवीं द्यां अभीके भ्रातुः पुत्रान् मघ-वन् तित्विषाणः ॥ १ ॥

भ्यालेल्या द्यावापृथिवींनी (स्वत:च्या ठिकाणी) तारुण्याचा जोम प्राप्त होण्याकरितां ज्या नांवाने तुला हांक मारली, ते तुझे नांव तर अतिशय दूर(च्या लोकांत)ही गूढ आहे. (तुझें नांव घेतांच) हे भगवंता इंद्रा, आमचा भ्राता जो पर्जन्य त्याच्या धारारूप पुत्रांना दीप्तिमान्‌ करून पृथिवी आणि आकाश यांना तूंच सांवरून धरलेंस १.


म॒हत् तन् नाम॒ गुह्यं॑ पुरु॒स्पृग् येन॑ भू॒तं ज॒नयो॒ येन॒ भव्य॑म् ।
प्र॒त्नं जा॒तं ज्योति॒र्यद॑स्य प्रि॒यं प्रि॒याः सं अ॑विशन्त॒ पञ्च॑ ॥ २ ॥

महत् तत् नाम गुह्यं पुरु-स्पृक् येन भूतं जनयः येन भव्यं
प्रत्नं जातं ज्योतिः यत् अस्य प्रियं प्रियाः सं अविशन्त पच ॥ २ ॥

तें तुझे नांव श्रेष्ठ, गुह्य आणि सर्वव्यापकच आहे; आणि त्या नांवाकरिताच तूं पूर्वी हो‍ऊन गेलेले आणि पुढें होणारे जग निर्माण करतोस, आणि (त्याकरितांच) तुला प्रिय असें जें तेज पुरातनकालीं उत्पन्न झाले होते त्यात तुला प्रिय असलेल्या पांचही समूहांनी प्रवेश केला २.


आ रोद॑सी अपृणा॒दोत मध्यं॒ पञ्च॑ दे॒वाँ ऋ॑तु॒शः स॒प्त-स॑प्त ।
चतु॑स्त्रिंशता पुरु॒धा वि च॑ष्टे॒ सरू॑पेण॒ ज्योति॑षा॒ विव्र॑तेन ॥ ३ ॥

आ रोदसी इति अपृणात् आ उत मध्यं पच देवान् ऋतु-शः सप्त-सप्त
चतुः-त्रिंशता पुरुधा वि चष्टे स-रूपेण ज्योतिषा वि-व्रतेन ॥ ३ ॥

त्यानें भूलोक आणि आकाश हीं (आपल्या कर्तृत्वानें) ओतप्रोत भरून सोडली आणि तसेंच मधले अंतरालही भरून टाकलें. पांच तेजोगोल, त्याचप्रमाणें कालानुरूप सातसात आणि चौतीस पुंज एकाच प्रकारच्या प्रकाशाने परंतु भिन्नभिन्न गतीने असे नानातर्‍हेचे (स्वत: उत्पन्न करून) त्याने अवलोकन केले ३.


यदु॑ष॒ औच्छः॑ प्रथ॒मा वि॒भानां॒ अज॑नयो॒ येन॑ पु॒ष्टस्य॑ पु॒ष्टम् ।
यत् ते॑ जामि॒त्वं अव॑रं॒ पर॑स्या म॒हन् म॑ह॒त्या अ॑सुर॒त्वं एक॑म् ॥ ४ ॥

यत् उषः औच्चः प्रथमा वि-भानां अजनयः येन पुष्टस्य पुष्टं
यत् ते जामि-त्वं अवरं परस्याः महत् महत्याः असुर-त्वं एकम् ॥ ४ ॥

हे उषे तूं नाना प्रकारच्या तेजस्वी तार्‍यांमध्ये प्रमुखत्वाने प्रकाशमान होतेस, आणि आपल्या तेजाने तूं पृष्टतेलाही पुष्टि आणतेस; तुझें आप्तवात्सल्य अगदी हीन दीन मनुष्या पर्यंतही जाऊन पोहोंचते. म्हणून अत्यंत उच्च आणि श्रेष्ठ अशी जी तूं त्या तुझें हेच खरोखर श्रेष्ठ आणि अद्वितीय ईश्वरी सामर्थ्य होय ४.


वि॒धुं द॑द्रा॒णं सम॑ने बहू॒नां युवा॑नं॒ सन्तं॑ पलि॒तो ज॑गार ।
दे॒वस्य॑ पश्य॒ काव्यं॑ महि॒त्वाद्या म॒मार॒ स ह्यः सं आ॑न ॥ ५ ॥

विधुं दद्राणं समने बहूनां युवानं सन्तं पलितः जगार
देवस्य पश्य काव्यं महि-त्वा अद्य ममार सः ह्यः सं आन ॥ ५ ॥

भ्रमणशील चंद्राला. -पुष्कळ तारकांच्या समुहांत भिरीभिरी हिंडणार्‍या त्या युवकालासुद्धां शुभ्रकेशधारी वृद्धाने (कालपुरुषाने) गिळून टाकले. ही ईश्वराची अद्‌भुत घटना तूं अवलोकन कर. त्याच्या महिम्यानें होतें काय, कीं जो मृत असतो तोच उद्या जिवंत हो‍ऊन हालचाल करतो ५.


शाक्म॑ना शा॒को अ॑रु॒णः सु॑प॒र्ण आ यो म॒हः शूरः॑ स॒नादनी॑ळः ।
यच् चि॒केत॑ स॒त्यं इत् तन् न मोघं॒ वसु॑ स्पा॒र्हं उ॒त जेतो॒त दाता॑ ॥ ६ ॥

शाक्मना शाकः अरुणः सु-पर्णः आ यः महः शूरः सनात् अनीळः
यत् चिकेत सत्यं इत् तत् न मोघं वसु स्पार्हं उत जेता उत दाता ॥ ६ ॥

आपल्याच शक्तीने शक्तिमान्‌ असणारा असा एक अरुणवर्ण सुपर्ण आहे, तो प्रचंड आणि शूर आहे, पण त्याला पुरातन कालापासून घरटें असें नाहीच; तो जें जें जाणतो (जे मनांत आणतो) ते सत्यच होते; तें निरर्थक कधींही होत नाही; आणि स्पृहणीय असे जे धन आहे ते जिंकून आणणारा आणि (भक्तांना) देणारा तोच आहे. ६.


ऐभि॑र्ददे॒ वृष्ण्या॒ पौंस्या॑नि॒ येभि॒रौक्ष॑द्वृत्र॒हत्या॑य व॒ज्री ।
ये कर्म॑णः क्रि॒यमा॑णस्य म॒ह्न ऋ॑तेक॒र्मं उ॒दजा॑यन्त दे॒वाः ॥ ७ ॥

आ एभिः ददे वृष्ण्या पैंस्यानि येभिः औक्षत् वृत्र-हत्याय वज्री
ये कर्मणः क्रियमाणस्य मह्ना ऋते--कर्मं उत्-अजायन्त देवाः ॥ ७ ॥

ह्या प्रकारांनीच त्याने वीर्यशालित्व आणि पौरुष गाजविणारी सामर्थ्यें निदर्शनास आणली, आणि अशाच सामर्थ्यांनी वृत्राचा वध करण्यासाठी वज्रधर इंद्र एकदम पुढें सरसावला; आणि त्याच्या चालू असलेल्या कर्माच्या प्रभावाने, त्याच्या सत्यरूप कर्माच्या परिष्कारानेंच देव उत्पन्न झालें ७.


यु॒जा कर्मा॑णि ज॒नय॑न् वि॒श्वौजा॑ अशस्ति॒हा वि॒श्वम॑नास्तुरा॒षाट् ।
पी॒त्वी सोम॑स्य दि॒व आ वृ॑धा॒नः शूरो॒ निर्यु॒धाध॑म॒द्दस्यू॑न् ॥ ८ ॥

युजा कर्माणि जनयन् विश्वाओजाः अशस्ति-हा विश्व-मनाः तुराषाट्
पीत्वी सोमस्य दिवः आ वृधानः शूरः निः युधा अधमत् दस्यून् ॥ ८ ॥

आपल्या योजनेरूप कर्में घटविणारा; सकल ओजस्वितेचे अधिष्ठाण, सर्व दुर्वासनांचा नाशक, सकल विश्वाचा मनोदय आणि दुष्टांना तडाक्यासरशी लोळविणारा असा जो शूर इंद्र त्याने सोमरस प्राशन करून आणि विशाल रूप धारण करून अधार्मिक दुष्टांना द्युलोकांतून फुंकरास रशी खाली फेकून देऊन ठार केले ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५६ (विश्वेदेवांचे मृत्यूत्तर सद्‌गतिसूक्त)

ऋषी - बृहदुक्थ वामदेव्य
देवता - विश्वेदेव
छंद - १-३, ७ त्रिष्टुभ्; ४-६ जगती


इ॒दं त॒ एकं॑ प॒र ऊ॑ त॒ एकं॑ तृ॒तीये॑न॒ ज्योति॑षा॒ सं वि॑शस्व ।
सं॒वेश॑ने त॒न्व१श्चारु॑रेधि प्रि॒यो दे॒वानां॑ पर॒मे ज॒नित्रे॑ ॥ १॥

इदं ते एकं परः ओं इति ते एकं तृतीयेन ज्योतिषा सं विशस्व
सम्-वेशने तन्वः चारुः एधि प्रियः देवानां परमे जनित्रे ॥ १ ॥

तुझें एक रूप हें येथें आहे; तुझें दुसरें एक रूप फ़ार दूरच्या लोकीं आहे; तर आतां तूं तिसर्‍या तेजाशी संयुक्त हो‍ऊन स्वत:च्या त्या संयोगाने शुभप्रद हो आणि दिव्यविबुधांच्या अत्युच्य स्थानीं त्यांना प्रिय हो १.


त॒नूष् टे॑ वाजिन् त॒न्व१ं नय॑न्ती वा॒मं अ॒स्मभ्यं॒ धातु॒ शर्म॒ तुभ्य॑म् ।
अह्रु॑तो म॒हो ध॒रुणा॑य दे॒वान् दि॒वीव॒ ज्योतिः॒ स्वं आ मि॑मीयाः ॥ २ ॥

तनूः ते वाजिन् तन्वं नयन्ती वामं अस्मभ्यं धातु शर्म तुभ्यं
अह्रुतः महः धरुणाय देवान् दिवि-इव ज्योतिः स्वं आ मिमीयाः ॥ २ ॥

हे "वाजी’‍’ (हे सत्त्वाढ्या), तुझें शरीर स्वत: इकडे तिकडे वावरत असतांना तुम्हांला आणि तुला जे उत्कृष्ट, मंगल तें घडवून आणो. तूं कोणाकडूनहि पराभूत होणारा नव्हेस; तर श्रेष्ठ जे दिव्यविबुध त्यांच्या धारणासाठी आकाशांत जसे (सूर्याचे) तेज त्याप्रमाणें तूंहि स्वत: धोरण आंखून ठेव २.


वा॒ज्यसि॒ वाजि॑नेना सुवे॒नीः सु॑वि॒त स्तोमं॑ सुवि॒तो दिवं॑ गाः ।
सु॒वि॒तो धर्म॑ प्रथ॒मानु॑ स॒त्या सु॑वि॒तो दे॒वान् सु॑वि॒तोऽ॑नु॒ पत्म॑ ॥ ३ ॥

वाजी असि वाजिनेन सु-वेनीः सुवितः स्तोमं सुवितः दिवं गाः
सुवितः धर्म प्रथमा अनु सत्या सुवितः देवान् सुवितः अनु पत्म ॥ ३ ॥

तूं आतां वाजी (सत्त्वाढ्य) झालास, म्हणून सात्त्विकतेने अत्युत्कंठित झालेल्या (स्वर्गीय) युवतीजनाकडे गमन कर. तूं उत्साहाने स्तवनाकडे (लक्ष ठेव), उल्हासानें द्युलोकाकडे गमन कर. तूं जशा उल्हासाने आपल्या पहिल्या सत्यधर्माला अनुसरून वागतोस, तशाच उल्हासाने दिव्यविबुधांना आणि तशाच उल्हासाने त्यांच्या मार्गालाही अनुलक्षून वागत जा ३.


म॒हि॒म्न ए॑षां पि॒तर॑श्च॒नेशि॑रे दे॒वा दे॒वेष्व् अ॑दधु॒रपि॒ क्रतु॑म् ।
सं अ॑विव्यचुरु॒त यान्यत्वि॑षु॒रैषां॑ त॒नूषु॒ नि वि॑विशुः॒ पुनः॑ ॥ ४ ॥

महिम्नः एषां पितरः चन ईशिरे देवाः देवेषु अदधुः अपि क्रतुं
सं अविव्यचुः उत यानि अत्विषुः आ एषां तनूषु नि विविशुः पुनरित् इ ॥ ४ ॥

ह्यांच्या सामर्थ्याच्या जोरावरच पितरांनींही आपले वर्चस्व चालविले. कारण दिव्यविभूतीमध्ये कर्तृत्व दिव्यविभूतींनीच स्थापन केल आहे; म्हणून ज्या ज्या वस्तू (पितर) हे उज्ज्वल करतात, त्या त्या वस्तूंना ते व्यापूनच टाकतात; आणि नंतर ते ह्या (दिव्यविबुधां)च्या स्वरूपांतच पुन: प्रविष्ट होतात ४.


सहो॑भि॒र्विश्वं॒ परि॑ चक्रमू॒ रजः॒ पूर्वा॒ धामा॒न्यमि॑ता॒ मिमा॑नाः ।
त॒नूषु॒ विश्वा॒ भुव॑ना॒ नि ये॑मिरे॒ प्रासा॑रयन्त पुरु॒ध प्र॒जा अनु॑ ॥ ५ ॥

सहः-भिः विश्वं परि चक्रमुः रजः पूर्वा धामानि अमिता मिमानाः
तनूषु विश्वा भुवना नि येमिरे प्र असारयन्त पुरुध प्र-जाः अनु ॥ ५ ॥

आपल्या दमनबलानें यच्चयावत्‌ रजोलोकाचे त्यांनी आक्रमण करून टाकलें; पुरातन तेजोमय स्थानें जीं आक्रमण केलेली नव्हती, तीही त्यांनी व्याप्त केली; आपल्या वंशामध्ये सर्व भुवनांचा समावेश केला आणि नाना प्रकारांनी आपल्या प्रजांचा विस्तार केला ५.


द्विधा॑ सू॒नवोऽ॑सुरं स्व॒र्विदं॒ आस्था॑पयन्त तृ॒तीये॑न॒ कर्म॑णा ।
स्वां प्र॒जां पि॒तरः॒ पित्र्यं॒ सह॒ आव॑रेष्व् अदधु॒स्तन्तुं॒ आत॑तम् ॥ ६ ॥

द्विधा सूनवः असुरं स्वः-विदं आ अस्थापयन्त तृतीयेन कर्मणा
स्वां प्र-जां पितरः पित्र्यं सहः आ अवरेषु अदधुः तन्तुं आततम् ॥ ६ ॥

दोन "प्रकारांनी" दिव्य प्रकाश प्राप्त करून देणार्‍या आत्मसामर्थ्याची तिसर्‍या योजनेप्रमाणें पुत्रांनी स्थापना केली; आणि याप्रमाणें पितरांनी आपली संतति, आपले पितृतेज, अर्थात्‌ आपला वंशतंतु या भूप्रदेशामध्यें ठेवून दिला ६.


ना॒वा न क्षोदः॑ प्र॒दिशः॑ पृथि॒व्याः स्व॒स्तिभि॒रति॑ दु॒र्गाणि॒ विश्वा॑ ।
स्वां प्र॒जां बृ॒हदु॑क्थो महि॒त्वाव॑रेष्व् अदधा॒दा परे॑षु ॥ ७ ॥

नावा न क्षोदः प्र-दिशः पृथिव्याः स्वस्ति-भिः अति दुः-गानि विश्वा
स्वां प्र-जां बृहत्-उक्थः महि-त्वा अवरेषु अदधात् आ परेषु ॥ ७ ॥

उदकप्रवाह जसा नौकेच्या योगानें (तरून जावयाचा) त्याप्रमाणें पृथ्वीच्या सर्व दिशा आणि सर्व खडतर संकटे ही आम्हीं कल्याणकारक मार्गांनी तरून जाऊं. याकरितांच बृहदुक्थ भक्ताने आपल्या सामर्थ्याने आपल्या वंशजांना जसे येथे तसेंच नंतर उच्च लोकांतही ठेऊन दिले ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५७ (अभिचारसूक्त)

ऋषी - बंधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु गौपायन
देवता - विश्वेदेव
छंद - गायत्री


मा प्र गा॑म प॒थो व॒यं मा य॒ज्ञादि॑न्द्र सो॒मिनः॑ ।
मान्त स्थु॑र्नो॒ अरा॑तयः ॥ १॥

मा प्र गाम पथः वयं मा यजात् इन्द्र सोमिनः
मा अन्तरिति स्थुः नः अरातयः ॥ १ ॥

आम्हीं सन्मार्गापासून इकडे तिकडे जाऊं नये असे कर; तसेंच हे इंद्रा, सोमसेवन करणार्‍या भक्ताच्या यज्ञापासूनही आम्ही दूर जाऊं नये असे कर; दानधर्म न करणारे, आहुति न देणारे दुष्ट, आमच्यामध्यें कधींही उत्पन्नही हो‍ऊ नयेत असे कर १.


यो य॒ज्ञस्य॑ प्र॒साध॑न॒स्तन्तु॑र्दे॒वेष्व् आत॑तः ।
तं आहु॑तं नशीमहि ॥ २ ॥

यः यजस्य प्र-साधनः तन्तुः देवेषु आततः
तं आहुतं नशीमहि ॥ २ ॥

यज्ञाची सिद्धि करणारा असा जो (सत्कर्मरूप) तंतु कांतून जो दिव्यविबुधांपर्यंत नेऊन भिडविला आहे तो आहुतिरूप तंतु आम्हांला प्राप्त होवो २.


मनो॒ न्व् आ हु॑वामहे नाराशं॒सेन॒ सोमे॑न ।
पि॒तॄ॒णां च॒ मन्म॑भिः ॥ ३ ॥

मनः नु आ हुवामहे नाराशंसेन सोमेन
पितॄणां च मन्म-भिः ॥ ३ ॥

नाराशंस स्तोत्राने, सोमरसार्पणानें, आणि पितरांच्या मननीय स्तुतींनी, आहुति देऊन आम्हीं तुझ्या दिव्य मनाला पाचारण करतों ३.


आ त॑ एतु॒ मनः॒ पुनः॒ क्रत्वे॒ दक्षा॑य जी॒वसे॑ ।
ज्योक् च॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ ४ ॥

आ ते एतु मनः पुनरिति क्रत्वे दक्षाय जीवसे
ज्योक् च सूर्यं दृशे ॥ ४ ॥

तें तुझें दिव्य मन, (आमच्या) कर्तृत्वासाठीं, चातुर्यासाठीं, आयुष्यवृद्धिसाठी आणि (आम्हांला) निरंतर सूर्यदर्शन घडावे यासाठीं पुन: (आमचे) कडे प्राप्त होवो ४.


पुन॑र्नः पितरो॒ मनो॒ ददा॑तु॒ दैव्यो॒ जनः॑ ।
जी॒वं व्रातं॑ सचेमहि ॥ ५ ॥

पुनः नः पितरः मनः ददातु दैव्यः जनः
जीवं व्रातं सचेमहि ॥ ५ ॥

आमचा पितृसमूह, आमचा दिव्यविबुध समूह, ते दिव्य मन आम्हांला पुन: प्राप्त करून देवो, म्हणजे आम्ही आमच्या जिवलग मित्रसमूहाला घेऊन वास करूं ५.


व॒यं सो॑म व्र॒ते तव॒ मन॑स्त॒नूषु॒ बिभ्र॑तः ।
प्र॒जाव॑न्तः सचेमहि ॥ ६ ॥

वयं सोम व्रते तव मनः तनूषु बिभ्रतः
प्रजावन्तः सचेमहि ॥ ६ ॥

हे सोमा, तुझे मन आम्ही आमच्या शरीरांत धारण करून तुझ्या आज्ञेंत पुत्रपौत्रांसहवर्तमान वास करूं असें कर ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५८ (अभिचाराचे पालुपदसूक्त)

ऋषी - बंधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु गौपायन
देवता - मन आवर्तन
छंद - अनुष्टुभ्


यत् ते॑ य॒मं वै॑वस्व॒तं मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ १॥

यत् ते यमं वैवस्वतं मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ १ ॥

जें तुझें जीवात्मरूप मन वैवस्वत यमाकडें दूर गेलेलें आहे त्याला, तूं येथे (भूलोकीं) वास करावास, तूं जगावेंस म्हणून आम्हीं मागे परतवितो १.


यत् ते॒ दिवं॒ यत् पृ॑थि॒वीं मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ २ ॥

यत् ते दिवं यत् पृथिवीं मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ २ ॥

जे तुझे मन द्युलोकीं किंवा पृथिवीवर दूर गेलेले आहे, त्याला तूं येथे वास करावास, तूं जगावेस म्हणून आम्हीं मागे परतवून आणतो २.


यत् ते॒ भूमिं॒ चतु॑र्भृष्टिं॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ३ ॥

यत् ते भूमिं चतुः-भृष्टिं मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामस् इ इह क्षयाय जीवसे ॥ ३ ॥

जे तुझे मन भूमीवर चारी बाजूंस सैरावैरा दूर भटकत गेलेले असेल, त्याला, तूं येथे वास करावास, तूं जगावेस म्हणून आम्ही मागें परतवून आणतो ३.


यत् ते॒ चत॑स्रः प्र॒दिशो॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ४ ॥

यत् ते चतस्रः प्र-दिशः मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ ४ ॥

जे तुझे मन दुसर्‍या कोणत्याही चार दिशांकडे दूर गेलेले असेल, त्याला तूं येथें वास करण्याठी जगावेस म्हणून आम्हीं मागें परतून आणतो ४.


यत् ते॑ समु॒द्रं अ॑र्ण॒वं मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ५ ॥

यत् ते समुद्रं अर्णवं मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामस् इ इह क्षयाय जीवसे ॥ ५ ॥

जें तुझें मन लाटांनी उचंबळणार्‍या समुद्राकडे दूर गेलेले असेल त्याला, तूं येथे वास करण्यासाठी जगावेंस म्हणून आम्ही मागे परतवून आणतो ५.


यत् ते॒ मरी॑चीः प्र॒वतो॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ६ ॥

यत् ते मरीचीः प्र-वतः मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ ६ ॥

जें तुझे मन लकाकत धांवणार्‍या किरणावलींत गुरफटून दूर गेलेले असेल त्याला, तूं येथे वास करण्यासाठी जगावेस म्हणून आम्ही मागे परतवून आणतो ६.


यत् ते॑ अ॒पो यदोष॑धी॒र्मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ७ ॥

यत् ते अपः यत् ओषधीः मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामस् इ इह क्षयाय जीवसे ॥ ७ ॥

जे तुझे मन उदके आणि औषधि यांच्यामध्यें रमत रमत दूर गेलेले आहे, तें ह्या येथे (ह्या पृथ्वीवर) तूं राहावेस आणि जगावेस म्हणून आम्ही मागे फिरवून परत आणतो ७.


यत् ते॒ सूर्यं॒ यदु॒षसं॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ८ ॥

यत् ते सूर्यं यत् उषसं मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ ८ ॥

अथवा जे तुझे मन सूर्याकडे म्हणा किंवा उष:प्रकाशामध्यें म्हणा गुंतून दूर गेले असेल, तें तूं येथे (ह्या पृथ्वीवर) राहावेस आणि जगावेस म्हणून आम्ही फ़िरवून परत आणतो ८.


यत् ते॒ पर्व॑तान् बृह॒तो मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ९ ॥

यत् ते पर्वतान् बृहतः मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ ९ ॥

जे हे तुझे मन ह्या सर्व जगांत अडकून पडून दूर गेले असेल ते तूं येथे (ह्या भूमीवर) राहावेस आणि जगावेंस म्हणून मागे फ़िरवून आम्ही परत आणतो ९.


यत् ते॒ विश्वं॑ इ॒दं जग॒न् मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ १० ॥

यत् ते विश्वं इदं जगत् मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामस् इ इह क्षयाय जीवसे ॥ १० ॥

जे हे तुझे मन ह्या सर्व जगांत अडकून पडून दूर गेले असेल तेंतूं येथे ह्या भूमीवर राहावेस आणि जगावेंस म्हणून मागे फिरवून आम्ही परत आणतो. १०


यत् ते॒ पराः॑ परा॒वतो॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ ११॥

यत् ते पराः परावतः मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ ११ ॥

किंवा जे तुझे मन अत्यंत दूरच्या (म्हणजे) परलोकी गेले असेल, त्यालाहि तूं येथे इहलोकीं वास करावा आणि जगावेस म्हणून आम्ही मागे परतवून आणतो ११.


यत् ते॑ भू॒तं च॒ भव्यं॑ च॒ मनो॑ ज॒गाम॑ दूर॒कम् ।
तत् त॒ आ व॑र्तयामसी॒ह क्षया॑य जी॒वसे॑ ॥ १२ ॥

यत् ते भूतं च भव्यं च मनः जगाम दूरकं
तत् ते आ वर्तयामसि इह क्षयाय जीवसे ॥ १२ ॥

जे तुझे मन पूर्वी घडलेल्या किंवा पुढे होणार्‍या गोष्टींत गुरफटून दूर भटकले असेल, त्याला तूं (आमच्या) येथे वास करावास आणि जगावेस म्हणून आम्ही मागे परतवून आणतो १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५९ (अनेक देवतांचे अभिचारसूक्त, पालुपदसूक्त)

ऋषी - बंधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु गौपायन
देवता - १-३ - निर्ऋbति; ४ - निर्‌ऋति व सोम; ५-६ - असुनिति; ७ - लिंगोक्त देवता; ८-१० द्यावापृथिवी; १० पूर्वार्ध इंद्रद्यावापृथ्वी
छंद - ८ - पंक्ति; ९ - महापंक्ति; १० पंक्त्युत्तरा; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


प्र ता॒र्यायुः॑ प्रत॒रं नवी॑य॒ स्थाता॑रेव॒ क्रतु॑मता॒ रथ॑स्य ।
अध॒ च्यवा॑न॒ उत् त॑वी॒त्यर्थं॑ परात॒रं सु निरृ॑तिर्जिहीताम् ॥ १॥

प्र तारि आयुः प्र-तरं नवीयः स्थाताराइव क्रतु-मता रथस्य
अध च्यवानः उत् तवीति अर्थं परातरं सु निः-ऋतिः जिहीताम् ॥ १ ॥

कर्तृत्ववान्‌ कल्पकाने रथांतील दोन बैठकी प्रशस्त वाढावाव्या, त्याप्रमाणें तुझे नवीन आयुष्य पुष्कळ वाढविले आहे; अगदींच जो घसरला होता, तो आतां आपल्या उद्दिष्टाला जोमाने उचलून धरीत आहे; तर आतां दुरवस्था येथून काळें करून दूर पळून जावो १.


साम॒न् नु रा॒ये नि॑धि॒मन् न्व् अन्नं॒ करा॑महे॒ सु पु॑रु॒ध श्रवां॑सि ।
ता नो॒ विश्वा॑नि जरि॒ता म॑मत्तु परात॒रं सु निरृ॑तिर्जिहीताम् ॥ २ ॥

सामन् नु राये निधि-मत् नु अन्नं करामहे सु पुरुध श्रवांसि
ता नः विश्वानि जरिता ममत्तु परातरं सु निः-ऋतिः जिहीताम् ॥ २ ॥

सामस्तवन आमच्या वैभवासाठी आहे; अन्नही सांठवून ठेवलेले आहे; तर आम्हीं आतां आपले यश सर्वत्र गाजविणार. ही आमची सर्व यशस्वी कृत्यें कविजनाला हर्ष उत्पन्न करोत आणि दुरवस्था येथून काळें करून दूर पळून जावो २.


अ॒भी ष्व् अ१र्यः पौंस्यै॑र्भवेम॒ द्यौर्न भूमिं॑ गि॒रयो॒ नाज्रा॑न् ।
ता नो॒ विश्वा॑नि जरि॒ता चि॑केत परात॒रं सु निरृ॑तिर्जिहीताम् ॥ ३ ॥

अभि सु अर्यः पैंस्यैः भवेम द्यौः न भूमिं गिरयः न अज्रान्
ता नः विश्वानि जरिता चिकेत परातरं सु निः-ऋतिः जिहीताम् ॥ ३ ॥

आम्हीं आपल्या पौरुषानें, द्यू-आकाश जसें भूमीवर, पर्वत जसे मैदानावर वरचढपणा करतात, त्याप्रमाणें चांगल्या नाणावलेल्या लोकांनाही मागें टांकू; आणि ही आमची सर्व कृत्यें कविजन जाणतीलच. तर आतां आमची दुरवस्था तोंड काळे करून दूर पळून जावो ३.


मो षु णः॑ सोम मृ॒त्यवे॒ परा॑ दाः॒ पश्ये॑म॒ नु सूर्यं॑ उ॒च्चर॑न्तम् ।
द्युभि॑र्हि॒तो ज॑रि॒मा सू नो॑ अस्तु परात॒रं सु निरृ॑तिर्जिहीताम् ॥ ४ ॥

मो इति सु णः सोम मृत्यवे परा दाः पश्येम नु सूर्यं उत्-चरन्तं
द्यु-भिः हितः जरिमा सु नः अस्तु परातरं सु निः-ऋतिः जिहीताम् ॥ ४ ॥

हे सोमा, आम्हांला मृत्यूच्या स्वाधीन करूं नको; म्हणजे उदय पावणार्‍या सूर्याला आम्ही पाहूं, आम्हांला वार्धक्य केव्हां तरी येणारच, पण ते सुखकर आणि ;योग्य कालीं येवो; आणि ही दुरवस्था काळें तोंड करून दूर पळून जावोच ४.


असु॑नीते॒ मनो॑ अ॒स्मासु॑ धारय जी॒वात॑वे॒ सु प्र ति॑रा न॒ आयुः॑ ।
रा॒र॒न्धि नः॒ सूर्य॑स्य सं॒दृशि॑ घृ॒तेन॒ त्वं त॒न्वं वर्धयस्व ॥ ५ ॥

असु-नीते मनः अस्मासु धारय जीवातवे सु प्र तिर नः आयुः
ररन्धि नः सूर्यस्य सम्-दृशि घृतेन त्वं तन्वं वर्धयस्व ॥ ५ ॥

हे असुनीते, आमच्या (अंत:करणा) मध्यें आमचेंच मन दृढपणें ठेव, आमच्या उत्तम जीवनासाठीं आमचे शरीर घृतसेवनाने वृद्धिंगत कर ५.


असु॑नीते॒ पुन॑र॒स्मासु॒ चक्षुः॒ पुनः॑ प्रा॒णं इ॒ह नो॑ धेहि॒ भोग॑म् ।
ज्योक् प॑श्येम॒ सूर्यं॑ उ॒च्चर॑न्तं॒ अनु॑मते मृ॒ळया॑ नः स्व॒स्ति ॥ ६ ॥

असु-नीते पुनः अस्मासु चक्षुः पुनरिति प्राणं इह नः धेहि भोगं
ज्योक् पश्येम सूर्यं उत्-चरन्तं अनु-मते मृळय नः स्वस्ति ॥ ६ ॥

हे असुनीते, आमच्यामध्यें आमची (ज्ञान) दृष्टि पुन: परत आणून घाल; आमचा प्राणही पुन: परत आण, तसाच आम्हांला सुखोपभोगही पुन: घडूं दे; आणि उदय पावणारा सूर्य आम्हीं चिरकाल पाहूं असे कर. हे अनुमते देवी, आम्हांवर कृपा कर, आमचे (नेहमी) कुशल असूं दे ६.


पुन॑र्नो॒ असुं॑ पृथि॒वी द॑दातु॒ पुन॒र्द्यौर्दे॒वी पुन॑र॒न्तरि॑क्षम् ।
पुन॑र्नः॒ सोम॑स्त॒न्वं ददातु॒ पुनः॑ पू॒षा प॒थ्याख्प् ं या स्व॒स्तिः ॥ ७ ॥

पुनः नः असुं पृथिवी ददातु पुनः द्यौः देवी पुनः अन्तरिक्षं
पुनः नः सोमः तन्वं ददातु पुनरिति पूषा पथ्यां या स्वस्तिः ॥ ७ ॥

आमचा प्राणा आम्हांला पृथिवी पुन: परत देवो, आकाशरूप देवी आणि अंतरीक्षही तो परत देवो; आमचे शरीर आम्हांला सोम पुन: परत देवो आणि पूषा हाही आम्हांला जी गोष्ट हितकर असेल ती पुन: पुन: करो आणि आमचें कुशल होवो ७.


शं रोद॑सी सु॒बन्ध॑वे य॒ह्वी ऋ॒तस्य॑ मा॒तरा॑ ।
भर॑तां॒ अप॒ यद्रपो॒ द्यौः पृ॑थिवि क्ष॒मा रपो॒ मो षु ते॒ किं च॒नाम॑मत् ॥ ८ ॥

शं रोदसी इति सु-बन्धवे यह्वी इति ऋतस्य मातरा
भरतां अप यत् रपः द्यौः पृथिवि क्षमा रपः मो इति सु ते किं चन आममत् ॥ ८ ॥

दीनजनांच्या बंधु द्यावा पृथिवी आमचे मंगल करोत, त्या सत्यधर्माच्या प्रभावशाली माता होत; म्हणून जें कांहीं किल्मिष असेल, तें आकाशपृथिवी दूर करोत. जें कांही पातक असेल ते क्षमाशील पृथिवी दूर करो; आणि तुला कशापासूनही बाधा न होवे ८.


अव॑ द्व॒के अव॑ त्रि॒का दि॒वश्च॑रन्ति भेष॒जा ।
क्ष॒मा च॑रि॒ष्ण्व् एक॒कं भर॑तां॒ अप॒ यद्रपो॒ द्यौः पृ॑थिवि क्ष॒मा रपो॒ मो षु ते॒ किं च॒नाम॑मत् ॥ ९ ॥

अव द्वके इति अव त्रिका दिवः चरन्ति भेषजा
क्षमा चरिष्णुएककं भरतां अप यत् रपः द्यौः पृथिवि क्षमा रपः मो इति सु ते किं चन आममत् ॥ ९ ॥

दोनदोन तीनतीन ह्याप्रमाणे एकत्र झालेल्या दिव्य औषधि आकाशाच्या खाली (अंतरालांत) इकडून तिकडे गमन करीत असतात, पण पृथिवीवर मात्र एकेकच औषधी पसरलेली आढळते; तर जें कांही किल्मिष असेल ते आकाश आणि पथिवी ह्या दूर करोत, जें कांही पातक असेल ते सुद्धां क्षमाशील पृथिवी दूर करो, आणि तुला कशापासूनही बाधा न होवो ९.


सं इ॑न्द्रेरय॒ गां अ॑न॒ड्वाहं॒ य आव॑हदुशी॒नरा॑ण्या॒ अनः॑ ।
भर॑तां॒ अप॒ यद्रपो॒ द्यौः पृ॑थिवि क्ष॒मा रपो॒ मो षु ते॒ किं च॒नाम॑मत् ॥ १० ॥

सं इन्द्र ईरय गां अनडवढबदबद्रह्णाहं यः आ स्वहत् उशीनराण्याः अनः
भरतां अप यत् रपः द्यौः पृथिवि क्षमा रपः मो इति सु ते किं चन आममत् ॥ १० ॥

इंद्रा, गाड्याला जोडलेल्या वृषभाला पुढे धांवण्याची शक्ति दे. त्याने उशीनराणीची गाडी ओढून नेली. तर आतां जें कांही किल्मिष असेल, तें आकाश-पथिवी ह्या दूर करोत, जें कांही पातक असेल ते क्षमाशील पथिवी दूर करो, आणि तुला कशापासूनही बाधा न होवो १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६० (अभिचाराचे पालुपदसूक्त)

ऋषी - ६ - अगस्त्यभगिनी; अवशिष्ट - बंधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु गौपायन
देवता - १-४, ६ - असमाति; ५ - इंद्र, ७-११ - सुबंदु जिवाह्वान; १२ - जीवित सुबंधुस्पर्शन
छण्द - १-५ - गायत्री; ८-९ - पंक्ति; अवशिष्ट - अनुष्टुभ्


आ जनं॑ त्वे॒षसं॑दृशं॒ माही॑नानां॒ उप॑स्तुतम् ।
अग॑न्म॒ बिभ्र॑तो॒ नमः॑ ॥ १॥

आ जनं त्वेष-सन्दृशं माहीनानां उप-स्तुतं अगन्म बिभ्रतः नमः ॥ १ ॥

दीप्तिमान्‌ कांतीचा आणि थोर विभूतींमध्यें स्तुत्य अशा व्यक्तीला प्रणाम करीत आम्हीं येथे प्राप्त झालों आहो १.


अस॑मातिं नि॒तोश॑नं त्वे॒षं नि॑य॒यिनं॒ रथ॑म् ।
भ॒जेर॑थस्य॒ सत्प॑तिम् ॥ २ ॥

असमातिं नि-तोशनं त्वेषं नि-ययिनं रथं भजे--रथस्य सत्-पतिम् ॥ २ ॥

ती व्यक्ति कोण म्हणाल तर मोठा तीव्र आणि जाज्वल्य असमाति, त्याचा त्वरेने धांवणारा रथ, आणि भजेरथाचा जो महनीय स्वामी त्याला आम्ही प्रणाम करीत आहो २.


यो जना॑न् महि॒षाँ इ॑वातित॒स्थौ पवी॑रवान् ।
उ॒ताप॑वीरवान् यु॒धा ॥ ३ ॥

यः जनान् महिषान्-इव अति-तस्थौ पवीरवान् उत अपवीरवान् युधा ॥ ३ ॥

मोठमोठ्या पशूंना अडवावें त्याप्रमाणें त्यानें हातांत भाला घेऊन विरोधक लोकांना रोखून धरलें, आणि केव्हां केव्हां तर हत्यार घेतल्याशिवायही झुंज खेळून रोखून धरले ३.


यस्ये॑क्ष्वा॒कुरुप॑ व्र॒ते रे॒वान् म॑रा॒य्येध॑ते ।
दि॒वीव॒ पञ्च॑ कृ॒ष्टयः॑ ॥ ४ ॥

यस्य इक्ष्वाकुः उप व्रते रेवान् मरायी एधते दिवि-इव पच कृष्टयः ॥ ४ ॥

ज्याच्या आज्ञेंत ऐश्वर्यवान्‌ इश्वाकु जिवावर उदार हो‍ऊन देखील वागतो, आणि पांच दिव्यजनसमूह आकाशांत उत्कर्ष पावतात त्याप्रमाणें, येथे पृथ्वीवरही उत्कर्ष पावतो ४.


इन्द्र॑ क्ष॒त्रास॑मातिषु॒ रथ॑प्रोष्ठेषु धारय ।
दि॒वीव॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ ५ ॥

इन्द्र क्षत्रा असमातिषु रथ-प्रोष्ठेषु धारय दिवि-इव सूर्यं दृशे ॥ ५ ॥

तर हे इंद्रा, या असमाति लोकांत, या रथप्रोष्ठ लोकांत, तू क्षत्रियांचे बळ ठेव; आकाशामध्ये सूर्य ठेवावा त्याप्रमाणे ते निश्चल ठेव ५.


अ॒गस्त्य॑स्य॒ नद्‌भ्यः॒ सप्ती॑ युनक्षि॒ रोहि॑ता ।
प॒णीन् न्यक्रमीर॒भि विश्वा॑न् राजन्न् अरा॒धसः॑ ॥ ६ ॥

अगस्त्यस्य नत्-भ्यः सप्ती इति युनक्षि रोहिता
पणीन् नि अक्रमीः अभि विश्वान् राजन् अराधसः ॥ ६ ॥

अगस्त्याच्या भाच्यापासून मिळालेले दोन लाल घोडे तूं रथाला जोड आणि हे राजा सर्व अधार्मिक कंजुषांना धुळीस मिळवून दे ६.


अ॒यं मा॒तायं पि॒तायं जी॒वातु॒राग॑मत् ।
इ॒दं तव॑ प्र॒सर्प॑णं॒ सुब॑न्ध॒व् एहि॒ निरि॑हि ॥ ७ ॥

अयं माता अयं पिता अयं जीवातुः आ अगमत्
इदं तव प्र-सर्पणं सुबन्धो इतिसु-बन्धो आ इहि निः इहि ॥ ७ ॥

ही तुझी माता, हा पिता आणि हा पहा प्राणदाता येऊन ठेपला. ही तुझी हालचाल चालू झाली तर हे सुबंधु चल ये, इकडे निघून ये ७.


यथा॑ यु॒गं व॑र॒त्रया॒ नह्य॑न्ति ध॒रुणा॑य॒ कम् ।
ए॒वा दा॑धार ते॒ मनो॑ जी॒वात॑वे॒ न मृ॒त्यवेऽ॑थो अरि॒ष्टता॑तये ॥ ८ ॥

यथा युगं वरत्रया नह्यन्ति धरुणाय कं
एव दाधार ते मनः जीवातवे न मृत्यवे अथो इति अरिष्ट-तातये ॥ ८ ॥

ज्याप्रमाणे जोखड घट्ट राहाण्यासाठीं ते वादीने करकचून बांधतात, त्याप्रमाणें मरण्यासाठी नव्हे, तर उत्तम जीवनासाठी (देवाने) तुझा प्राण रक्षण केला आहे; तुझ्यावरील घातक संकटाचा नाश करण्यासाठी रक्षण केला आहे ८.


यथे॒यं पृ॑थि॒वी म॒ही दा॒धारे॒मान् वन॒स्पती॑न् ।
ए॒वा दा॑धार ते॒ मनो॑ जी॒वात॑वे॒ न मृ॒त्यवेऽ॑थो अरि॒ष्टता॑तये ॥ ९ ॥

यथा इयं पृथिवी मही दाधार इमान् वनस्पतीन्
एव दाधार ते मनः जीवातवे न मृत्यवे अथो इति अरिष्ट-तातये ॥ ९ ॥

ज्याप्रमाणे ह्या थोर पृथिवीने या मोठमोठ्या वृक्षांना धारण केले आहे; त्याप्रमाणे मरण्यासाठी नव्हे; तर उत्तम जीवनासाठीं देवाने तुझा प्राण रक्षण केला आहे, तुझ्यावरील अरिष्टाचा नाश करून रक्षण केला आहे ९.


य॒माद॒हं वै॑वस्व॒तात् सु॒बन्धो॒र्मन॒ आभ॑रम् ।
जी॒वात॑वे॒ न मृ॒त्यवेऽ॑थो अरि॒ष्टता॑तये ॥ १० ॥

यमात् अहं वैवस्वतात् सु-बन्धोः मनः आ अभरं
जीवातवे न मृत्यवे अथो इति अरिष्ट-तातये ॥ १० ॥

वैवस्वत यमापासून मी सुबंधूचा प्राण परत आणला तो कशासाठीं ? मृत्यूच्या जबड्यांत देण्यासाठी नव्हे तर त्याच्या उत्तम जीवनासाठी, आणि सर्व अरिष्टांचा नाश करण्यासाठी परत आणला १०.


न्य१ग् वातोऽ॑व वाति॒ न्यक् तपति॒ सूर्यः॑ ।
नी॒चीनं॑ अ॒घ्न्या दु॑हे॒ न्यग् भवतु ते॒ रपः॑ ॥ ११॥

न्यक् वातः अव वाति न्यक् तपति सूर्यः
नीचीनं अघ्न्या दुहे न्यक् भवतु ते रपः ॥ ११ ॥

वायु नीट खाली वाहातो; सूर्यही खाली जमिनीवरच खूप तापतो; धेनू खालच्या भांड्यांतच दूधाची धार सोडते, तसेंच तुझें पातकही येथे खालच्याखालींच सुटून दूर होवो ११.


अ॒यं मे॒ हस्तो॒ भग॑वान् अ॒यं मे॒ भग॑वत्तरः ।
अ॒यं मे॑ वि॒श्वभे॑षजोऽ॒यं शि॒वाभि॑मर्शनः ॥ १२ ॥

अयं मे हस्तः भग-वान् अयं मे भगवत्-तरः
अयं मे विश्व-भेषजः अयं शिव-अभिमर्शनः ॥ १२ ॥

हा माझा हात भाग्यवान्‌ आहे, आणि हा दुसरा हात त्याच्याहीपेक्षां अधिक भाग्यवान्‌ आहे. हा पहिला हात सर्व प्रकारच्या औषधी गुणांनी युक्त आहे आणि ह्या दुसर्‍या हाताचा नुसता स्पर्शदेखील मंगलप्रद आहे १२.


ॐ तत् सत्


GO TOP