|
ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ११ ते २० ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ११ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
उपा॑स्मै गायता नरः॒ पव॑माना॒येन्द॑वे ।
उप अस्मै गायत नरः पवमानाय इन्दवे अभि देवान् इयक्षते ॥ १ ॥
वीरांनों, देवांचें यजन करण्यास प्रवृत्त झालेल्या, आणि पवित्र रसाची धारा सोडण्यार्या ह्या सोमाप्रीत्यर्थ सूक्तगायन करा. १.
अ॒भि ते॒ मधु॑ना॒ पयो॑ऽथर्वाणो अशिश्रयुः ।
अभि ते मधुना पयः अथर्वाणः अशिश्रयुः देवं देवाय देव यु ॥ २ ॥
दिव्य आणि देवोत्सुक असें दुग्ध देवसेवेकरितां "अथर्व" ऋत्विजांनीं मधुर रसाशीं एकत्र मिसळून दिलें. २.
स नः॑ पवस्व॒ शं गवे॒ शं जना॑य॒ शं अर्व॑ते ।
सः नः पवस्व शं गवे शं जनाय शं अर्वते शं राजन् ओषधीभ्यः ॥ ३ ॥
हे सोमा तूं आमच्या धेनूंना सुख होईल अशा रीतीनें वहा, आमच्या मित्रांवर सुखप्रवाह लोट, आमच्या अश्वांना सुखकारक हो, आणि आमच्या ओषधिसाठीं सुखाचा प्रवाह वाहूं दे. ३.
ब॒भ्रवे॒ नु स्वत॑वसेऽरु॒णाय॑ दिवि॒स्पृशे॑ ।
बभ्रवे नु स्व तवसे अरुणाय दिवि स्पृशे सोमाय गाथं अर्चत ॥ ४ ॥
विचित्रवर्ण, स्वतःच्या बलावर अवलंबून राहणारा, द्युलोकापर्यंत जाऊन भिडणारा, आणि आरक्त अशा सोमाप्रीत्यर्थ उच्चस्वरानें स्तवन कर. ४.
हस्त॑च्युतेभि॒रद्रि॑भिः सु॒तं सोमं॑ पुनीतन ।
हस्त च्युतेभिः अद्रि भिः सुतं सोमं पुनीतन मधौ आ धावत मधु ॥ ५ ॥
ऋत्विजांनों, हातांनीं हलणार्या ग्राव्यांनीं पिळलेला सोमरस तुम्हीं गाळून स्वच्छ करा; आणि त्या मधुर रसांत मध मिसळा. ५.
नम॒सेदुप॑ सीदत द॒ध्नेद॒भि श्री॑णीतन ।
नमसा इत् उप सीदत दध्ना इत् अभि श्रीणीतन इन्दुं इन्द्रे दधातन ॥ ६ ॥
देवाला प्रणिपात करूनच त्या सोमाजवळ बसा, त्यांत घट्ट दुग्ध मिसळा, आणि तो आल्हादप्रद रस इंद्रापुढें ठेवा. ६.
अ॒मि॒त्र॒हा विच॑र्षणिः॒ पव॑स्व सोम॒ शं गवे॑ ।
अमित्र हा वि चर्षणिः पवस्व सोम शं गवे देवेभ्यः अनुकाम कृत् ॥ ७ ॥
तूं शत्रुनाशन सर्वद्रष्टा आहेस; हे सोमा, आमच्या धेनूंना सुखांत ठेव; तूं दिव्यविभूतींच्याहि इच्छा तृप्त करतोस. ७.
इन्द्रा॑य सोम॒ पात॑वे॒ मदा॑य॒ परि॑ षिच्यसे ।
इन्द्राय सोम पातवे मदाय परि सिच्यसे मनः चित् मनसः पतिः ॥ ८ ॥
हे सोमा. इंद्रासाठीं, त्यानें तुला प्राशन करावें ह्यासाठीं, त्याच्या हर्षोत्कर्षासाठीं, तूं पिळला जातोस. तूं भक्तांचें चित्त आहेस; तूंच त्यांच्या चित्ताचा स्वामी आहेस. ८.
पव॑मान सु॒वीर्यं॑ र॒यिं सो॑म रिरीहि नः ।
पवमान सु वीर्यं रयिं सोम रिरीहि नः इन्दो इति इन्द्रेण नः युजा ॥ ९ ॥
तर हे पावनप्रवाहा सोमा, हे आल्हादप्रदा, तूं इंद्राशीं संयुक्त होऊन आम्हांला उत्तम वीरप्रचुर असें ऐश्वर्य अर्पण कर. ९.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १२ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
सोमा॑ असृग्रं॒ इन्द॑वः सु॒ता ऋ॒तस्य॒ साद॑ने ।
सोमाः असृग्रं इन्दवः सुताः ऋतस्य सदने इन्द्राय मधुमत् तमाः ॥ १ ॥
हे आल्हादप्रद सोमबिन्दु, रुचीला अत्यंत मधुर लागणारे बिन्दु, सनातन धर्माच्या मंदिरांत इंद्राप्रीत्यर्थ पिळून सिद्ध केलेले आहेत. १.
अ॒भि विप्रा॑ अनूषत॒ गावो॑ व॒त्सं न मा॒तरः॑ ।
अभि विप्राः अनूषत गावः वत्सं न मातरः इन्द्रं सोमस्य पीतये ॥ २ ॥
माता धेनू जशी वत्साला कळवळ्यानें हांक मारते, त्याप्रमाणें स्तवनज्ञ भक्तांनीं इंद्राला सोमप्राशनार्थ मोठ्या आर्जवानें हांक मारिली आहे. २.
म॒द॒च्युत् क्षे॑ति॒ साद॑ने॒ सिन्धो॑रू॒र्मा वि॑प॒श्चित् ।
मद च्युत् क्षेति सदने सिन्धोः ऊर्मा विपः चित् सोमः गौरी इति अधि श्रितः ॥ ३ ॥
हर्षस्रावी, ज्ञानप्रद सोम, आपल्या सदनांत म्हणजे नदीच्या कल्लोळांत अधिष्ठित असतो; तो आतां भक्तांच्या वाणींमध्यें अधिष्ठित झाला आहे. ३.
दि॒वो नाभा॑ विचक्ष॒णो॑ऽव्यो॒ वारे॑ महीयते ।
दिवः नाभा वि चक्षणः अव्यः वारे महीयते सोमः यः सु क्रतुः कविः ॥ ४ ॥
अत्यंत सूक्ष्मदृष्टि सोम, द्युलोकाच्या मध्यभागीं म्हणजे ऊर्णावस्त्राच्या गाळण्यांतून गाळला जात आहे, तो हा सोम सत्कार्यप्रेरक कवि होय. ४.
यः सोमः॑ क॒लशे॒ष्व् आँ अ॒न्तः प॒वित्र॒ आहि॑तः ।
यः सोमः कलशेषु आ अन्तरिति पवित्रे आहितः तं इन्दुः परि सस्वजे ॥ ५ ॥
पवित्रावर ठेवलेला जो हा सोमरस पाझरून कलशाच्या आंत सांचला आहे त्याला प्रत्यक्ष चंद्रच कडकडून भेटतो कीं काय असें वाटतें. ५.
प्र वाचं॒ इन्दु॑रिष्यति समु॒द्रस्याधि॑ वि॒ष्टपि॑ ।
प्र वाचं इन्दुः इष्यति समुद्रस्य अधि विष्टपि जिन्वन् कोशं मधु श्चुतम् ॥ ६ ॥
हा सोमरस, अन्तरिक्षरूप समुद्राच्या अंतरंगांत मधानें ओथंबलेला जो सांठा आहे, तो सांठा हलवून ओतून देऊन, काव्यमय वाणीची प्रेरणा करतो. ६.
नित्य॑स्तोत्रो॒ वन॒स्पति॑र्धी॒नां अ॒न्तः स॑ब॒र्दुघः॑ ।
नित्य स्तोत्रः वनस्पतिः धीनां अन्तरिति सबः दुघः हिन्वानः मानुषा युगा ॥ ७ ॥
हा नित्य स्तविलेला वृक्षराज जो सोम तो बुद्धीच्या आंत काव्यामृत ओततो; आणि याप्रमाणें मानवांच्या पिढ्या न् पिढ्या त्याचें कार्य चालतें. ७.
अ॒भि प्रि॒या दि॒वस्प॒दा सोमो॑ हिन्वा॒नो अ॑र्षति ।
अभि प्रिया दिवः पदा सोमः हिन्वानः अर्षति विप्रस्य धारया कविः ॥ ८ ॥
ज्ञानी स्तोत्याला प्रिय अशी द्युलोकाचीं जीं स्थानें, त्यांच्यापर्यंत, हा काव्यस्फूर्तिदाता सोमरस, हलविला असतां, आपल्या धारेनें जाऊन पोहोंचतो. ८.
आ प॑वमान धारय र॒यिं स॒हस्र॑वर्चसम् ।
आ पवमान धारय रयिं सहस्र वर्चसं अस्मे इति इन्दो इति सु आभुवम् ॥ ९ ॥
तर हे पावनप्रवाहा सोमरसा, तूं अलोट ओजस्विता आणि व्यापक बलयुक्त असें ऐश्वर्य आमच्या ठिकाणी ठेव. ९.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १३ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
सोमः॑ पुना॒नो अ॑र्षति स॒हस्र॑धारो॒ अत्य॑विः ।
सोमः पुनानः अर्षति सहस्र धारः अति अविः वायोः इन्द्रस्य निः कृतम् ॥ १ ॥
सहस्रधारांनीं वहाणारा हा पावन सोमरस लोंकरीच्या पवित्रांतून, वायु आणि इंद्र यांच्या स्थानाकडे वहात. १.
पव॑मानं अवस्यवो॒ विप्रं॑ अ॒भि प्र गा॑यत ।
पवमानं अवस्यवः विप्रं अभि प्र गायत सुष्वाणं देव वीतये ॥ २ ॥
प्रसादात्सुक भक्तांनो, भक्तपावन, स्तवनस्फूर्ति देणारा, आणि मधुर नाद करणारा सोमरस देवानें प्राशन करावा म्हणून त्याची प्रशंसा करा. २.
पव॑न्ते॒ वाज॑सातये॒ सोमाः॑ स॒हस्र॑पाजसः ।
पवन्ते वाज सातये सोमाः सहस्र पाजसः गृणानाः देव वीतये ॥ ३ ॥
सत्वसामर्थ्याच्या लाभासाठीं अलोट ओजस्वी सोमरस आपल्या पवित्र प्रवाहानें वहात आहेत. आणि देवांनीं स्वीकार करावा म्हणून सोमरसाची प्रशंसाहि चालली आहे. ३.
उ॒त नो॒ वाज॑सातये॒ पव॑स्व बृह॒तीरिषः॑ ।
उत नः वाज सातये पवस्व बृहतीः इषः द्यु मत् इन्दो इति सु वीर्यम् ॥ ४ ॥
तर आम्हांला सत्वबलाचा लाभ व्हावा म्हणून, श्रेष्ठ उत्साह, आणि उत्कृष्ट तेजस्वी शौर्य यांचा, हे आल्हादप्रद रसा, तूं प्रवाह सोड. ४.
ते नः॑ सह॒स्रिणं॑ र॒यिं पव॑न्तां॒ आ सु॒वीर्य॑म् ।
ते नः सहस्रिणं रयिं पवन्तां आ सु वीर्यं सुवानाः देवासः इन्दवः ॥ ५ ॥
हे आल्हादप्रद सोमबिन्दु पिळले जात असतां सहस्रावधि वीरांनी युक्त अशा ऐश्वर्याचा प्रवाह आम्हांकडे लोटून देवोत. ५.
अत्या॑ हिया॒ना न हे॒तृभि॒रसृ॑ग्रं॒ वाज॑सातये ।
अत्याः हियानाः न हेतृ भिः असृग्रं वाज सातये वि वारं अव्यं आशवः ॥ ६ ॥
अश्ववीरांनीं दौडत चालविलेल्या चपळ अश्वांप्रमाणें शीघ्रप्रवाही सोमरस, आम्हांला सत्वाढ्यतेचा लाभ व्हावा म्हणून, लोंकरीच्या पवित्रांतून पाझरत आहेत. ६.
वा॒श्रा अ॑र्ष॒न्तीन्द॑वोऽ॒भि व॒त्सं न धे॒नवः॑ ।
वाश्राः अर्षन्ति इन्दवः अभि वत्सं न धेनवः दधन्विरे गभस्त्योः ॥ ७ ॥
धेनू वत्साकरितां हंबारतात त्याप्रमाणें सोमरसाचे बिंदू खळखळ शब्द करीत वहातात. ते आतां ह्या हातांतून त्या हातांतील पात्रांत ओतलेले आहेत. ७.
जुष्ट॒ इन्द्रा॑य मत्स॒रः पव॑मान॒ कनि॑क्रदत् ।
जुष्टः इन्द्राय मत्सरः पवमान कनिक्रदत् विश्वाः अप द्विषः जहि ॥ ८ ॥
तुझी प्रशंसा केली म्हणजे तूं इंद्राला हर्षोत्सुक करतोस; तर पवित्रप्रवाही सोमा, तूं गर्जना करून धर्मद्वेष्ट्यांना दूर हांकून देऊन त्यांचा नाश कर. ८.
अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः॒ पव॑मानाः स्व॒र्दृशः॑ ।
अप घ्नन्तः अराव्णः पवमानाः स्वः दृशः योनौ ऋतस्य सीदत ॥ ९ ॥
दानधर्म न करणार्यांना ठार करणार्या आणि भक्तांना स्वर्गीय प्रकाश देणार्या पावन सोमरसांनो, तुम्हीं सद्धर्माच्या आसनावर विराजमान व्हा. ९.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १४ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
परि॒ प्रासि॑ष्यदत् क॒विः सिन्धो॑रू॒र्माव् अधि॑ श्रि॒तः ।
परि प्र असिस्यदत् कविः सिन्धोः ऊर्मौ अधि श्रितः कारं बिभ्रत् पुरु स्पृहम् ॥ १ ॥
काव्यस्फूर्तिदाता सोमरस चोहों बाजूंनीं खालीं वाहूं लागला; आणि सर्वांना प्रिय असें कार्य आंगावर घेऊन सिंधूच्या कल्लोळांत तो विलिन झाला. १.
गि॒रा यदी॒ सब॑न्धवः॒ पञ्च॒ व्राता॑ अप॒स्यवः॑ ।
गिरा यदि स बन्धवः पच व्राताः अपस्यवः परि कृण्वन्ति धर्णसिम् ॥ २ ॥
बन्धुत्वाचें ज्यांचें नातें असे पांचहि ज्ञातीचे संघ कर्तव्यतत्पर होऊन जर ह्या जगद्धारक सोमाला स्तुतींनीं अलंकृत करतील; २.
आद॑स्य शु॒ष्मिणो॒ रसे॒ विश्वे॑ दे॒वा अ॑मत्सत ।
आत् अस्य शुष्मिणः रसे विश्वे देवाः अमत्सत यदि गोभिः वसायते ॥ ३ ॥
महाबलाढ्य सोमाच्या रसांत, त्या रसाला गोदुग्धानें आच्छादन करतील, तर सर्व दिव्यविभूति हर्षनिर्भर झाल्याच म्हणून समजा. ३.
नि॒रि॒णा॒नो वि धा॑वति॒ जह॒च् छर्या॑णि॒ तान्वा॑ ।
नि रिणानः वि धावति जहत् शर्याणि तान्वा अत्र सं जिघ्रते युजा ॥ ४ ॥
पवित्राच्या तंतुमय जाळींतून पाझरणारा रस पहा कसा खालीं धांवत वहातो आणि आपला प्राणमित्र जो इंद्र त्याच्या बरोबर हविर्भागांचा सुवास घेतो. ४.
न॒प्तीभि॒र्यो वि॒वस्व॑तः शु॒भ्रो न मा॑मृ॒जे युवा॑ ।
नप्तीभिः यः विवस्वतः शुभ्रः न ममृजे युवा गाः कृण्वानः न निः निजम् ॥ ५ ॥
तेजस्वी पुरोहिताच्या अंगुलींनीं, हा शुभ्र सोमरस, एखादा युवक युवतींकडून अलंकृत व्हावा, त्याप्रमाणें स्वच्छ होऊन आपलें स्वरूप गोदुग्धाप्रमाणें शुभ्र करतो. ५.
अति॑ श्रि॒ती ति॑र॒श्चता॑ ग॒व्या जि॑गा॒त्यण्व्या॑ ।
अति श्रिती तिरश्चता गव्या जिगाति अण्व्या वग्नुं इयर्ति यं विदे ॥ ६ ॥
अभिषव पात्रांत गोदुग्धाशीं मिश्र होण्याकरितां हा सोम आडव्या ठेवलेल्या पवित्रांतून पाझरत आहे, आणि हस्तांगुलीवरून पात्रांत पडतांना ऐकूं येईल असा निवाद करीत आहे. ६.
अ॒भि क्षिपः॒ सं अ॑ग्मत म॒र्जय॑न्तीरि॒षस्पति॑म् ।
अभि क्षिपः सं अग्मत मर्जयन्तीः इषः पतिं पृष्ठा गृभ्णत वाजिनः ॥ ७ ॥
ऋत्विजाच्या हस्तांगुली, त्या उत्साहाच्या प्रभूला सोमाला स्वच्छ करून त्याच्या सन्निध जातात आणि त्या सत्ववीराचा-त्या-वृक्षराजाचा-पल्लवरूप पृष्ठभाग हातीं धरतात. ७.
परि॑ दि॒व्यानि॒ मर्मृ॑श॒द्विश्वा॑नि सोम॒ पार्थि॑वा ।
परि दिव्यानि मर्मृशत् विश्वानि सोम पार्थिवा वसूनि याहि अस्म युः ॥ ८ ॥
ह्याप्रमाणें दिव्य आणि ऐहिक अशा सकल ऐश्वर्याचा परामर्श घेऊन, हे सोमा, आमच्याविषयीं वात्सल्य बाळगणारा तूं आम्हांकडे आगमन कर. ८.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १५ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
ए॒ष धि॒या या॒त्यण्व्या॒ शूरो॒ रथे॑भिरा॒शुभिः॑ ।
एषः धिया याति अण्व्या शूरः रथेभिः आशु भिः गच्चन् इन्द्रस्य निः कृतम् ॥ १ ॥
हा शूर सोम ध्यानस्तुतींनीं आणि हस्तांगुलींनी प्रेरीत होऊन शीघ्रगामी रथांसह इंद्राच्या निवासस्थानाकडे त्वरेनें जात आहे. १.
ए॒ष पु॒रू धि॑यायते बृह॒ते दे॒वता॑तये ।
एषः पुरु धियायते बृहते देव तातये यत्र अमृतासः आसते ॥ २ ॥
हा येथें देवयज्ञांसाठीं-ज्यांत अमर विभूति विराजमान होतात त्या महायज्ञांसाठीं-अगदीं ध्यान लावून राहिला आहे. २.
ए॒ष हि॒तो वि नी॑यतेऽ॒न्तः शु॒भ्राव॑ता प॒था ।
एषः हितः वि नीयते अन्तरिति शुभ्र वता पथा यदि तुजन्ति भूर्णयः ॥ ३ ॥
हा येथें ठेवलेला सोमरस, जर झटपट कार्य करणारे भक्त नेटानें प्रयत्न करतील तर शुभ्र निष्कलंक मार्गानें आंत देवाकडे खचित् नेला जाईल. ३.
ए॒ष शृङ्गा॑णि॒ दोधु॑व॒च् छिशी॑ते यू॒थ्यो३ वृषा॑ ।
एषः शृङ्गाणि दोधुवत् शिशीते यूथ्यः वृषा नृम्णा दधानः ओजसा ॥ ४ ॥
समुदायातील जणों वृषभच असा हा सोम आपलीं अणकुचीदार शिंगे हलवितो आणि ओजस्वितेनें आपलें पौरुष गाजवितो. ४.
ए॒ष रु॒क्मिभि॑रीयते वा॒जी शु॒भ्रेभि॑रं॒शुभिः॑ ।
एषः रुक्मि भिः ईयते वाजी शुभ्रेभिः अंशु भिः पतिः सिन्धूनां भवन् ॥ ५ ॥
हा सत्वबलाढ्य सोमवीर लकलकणार्या शुभ्र किरणांनी मण्डित होऊन नद्यांचा प्रभु म्हणून पुढें सरसावतो. ५.
ए॒ष वसू॑नि पिब्द॒ना परु॑षा ययि॒वाँ अति॑ ।
एषः वसूनि पिब्दना परुषा ययि वान् अति अव शादेषु गच्चति ॥ ६ ॥
आणि मोहक वस्तु आणि कठोर घोरकर्मे ह्या दोहोंनाहि न जुमानतां भक्तांकडे येऊन तो त्यांच्या यज्ञपात्रांत अधिष्ठित होतो. ६.
ए॒तं मृ॑जन्ति॒ मर्ज्यं॒ उप॒ द्रोणे॑ष्व् आ॒यवः॑ ।
एतं मृजन्ति मर्ज्यं उप द्रोणेषु आयवः प्र चक्राणं महीः इषः ॥ ७ ॥
धुवून स्वच्छ करण्यायोग्य आणि उच्चप्रतीचा उत्साह उत्पन्न करणार्या ह्या सोमाला भक्तजन द्रोणपात्रांत ओतून स्वच्छ करतात. ७.
ए॒तं उ॒ त्यं दश॒ क्षिपो॑ मृ॒जन्ति॑ स॒प्त धी॒तयः॑ ।
एतं ओं इति त्यं दश क्षिपः मृजन्ति सप्त धीतयः सु आयुधं मदिन् तमम् ॥ ८ ॥
अशा त्या सोमपल्लवांना दहा अंगुली आणि सात ध्यानप्रवण "होते" जाळून स्वच्छ करतात. उत्तम आयुधांनीं युक्त आणि हर्षोत्पादक अशा सोमाला स्वच्छ करतात. ८.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १६ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र ते॑ सो॒तार॑ ओ॒ण्यो३ रसं॒ मदा॑य॒ घृष्व॑ये ।
प्र ते सोतारः ओण्योः रसं मदाय घृष्वये सर्गः न तक्ति एतशः ॥ १ ॥
द्यावापृथिवीपासून ज्याप्रमाणें पर्जन्य, त्याप्रमाणें दर्पदलन आवेश उत्पन्न होण्यासाठीं रस पिळणारे भक्त, अश्वाप्रमाणें जोरानें उडणार्या सोमाची धार अभिषवणा फलकांतून पात्रांत सोडीत आहेत. १.
क्रत्वा॒ दक्ष॑स्य र॒थ्यं अ॒पो वसा॑नं॒ अन्ध॑सा ।
क्रत्वा दक्षस्य रथ्यं अपः वसानं अन्धसा गो सां अण्वेषु सश्चिम ॥ २ ॥
चातुर्यबलाचा धुरीण, आणि माधुर्यानें उदकांना आच्छादित करणारा असा जो सोमरस त्याला आम्ही कौशल्यानें आपल्या अंजलीमध्यें धारण करूं. २.
अन॑प्तं अ॒प्सु दु॒ष्टरं॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
अनप्तं अप् सु दुस्तरं सोमं पवित्रे आ सृज पुनीहि इन्द्राय पातवे ॥ ३ ॥
दोषांपासून अलिप्त आणि दुष्प्राप्य अशा सोमरसाला उदकांमध्यें ओतून दे, आणि इंद्रानें प्राशन करावा म्हणून पवित्रावर ठेऊन स्वच्छ कर. ३.
प्र पु॑ना॒नस्य॒ चेत॑सा॒ सोमः॑ प॒वित्रे॑ अर्षति ।
प्र पुनानस्य चेतसा सोमः पवित्रे अर्षति क्रत्वा सध स्थं आ असदत् ॥ ४ ॥
गाळून स्वच्छ करणार्या भक्ताच्या भावनेनें सोमरस हा पवित्रांतून वाहतो, आणि कौशल्यानें स्वच्छ होऊन पात्रांत स्थित होतो. ४.
प्र त्वा॒ नमो॑भि॒रिन्द॑व॒ इन्द्र॒ सोमा॑ असृक्षत ।
प्र त्वा नमः भिः इन्दवः इन्द्र सोमाः असृक्षत महे भराय कारिणः ॥ ५ ॥
आल्हादप्रद सोमबिंदू, कार्यकुशल सोमरस, हे इंद्रा, तुजला महायुद्धाला सज्ज करण्यासाठीं भक्तांनीं प्रणिपातपूर्वक पात्रांत ओतले आहेत. ५.
पु॒ना॒नो रू॒पे अ॒व्यये॒ विश्वा॒ अर्ष॑न्न् अ॒भि श्रियः॑ ।
पुनानः रूपे अव्यव्ये विश्वाः अर्षन् अभि श्रियः शूरः न गोषु तिष्ठति ॥ ६ ॥
लोंकरीच्या वस्त्रांतून स्वच्छ होणारा आणि यच्चावत् शोभांचे अधिष्ठान असा सोम हा योध्याप्रमाणें गोसमूहामध्यें उभा रहातो. ६.
दि॒वो न सानु॑ पि॒प्युषी॒ धारा॑ सु॒तस्य॑ वे॒धसः॑ ।
दिवः न सानु पिप्युषी धारा सुतस्य वेधसः वृथा पवित्रे अर्षति ॥ ७ ॥
पिळलेल्या सोमरसाची धार द्युलोकाच्या शिखराप्रमाणें फुगून उचंबळणारी जरी असली तरी ती या पवित्रावर सहज ओतली जाते. ७.
त्वं सो॑म विप॒श्चितं॒ तना॑ पुना॒न आ॒युषु॑ ।
त्वं सोम विपः चितं तना पुनानः आयुषु अव्यः वारं वि धावसि ॥ ८ ॥
सोमा, तूं तंतुवस्त्रानें स्वच्छ होऊन, आणि मानवामध्यें जो प्राज्ञ असेल त्याला पवित्र करून ह्या लोंकरीच्या वस्त्रांतून खालीं पात्रांत धांवत वहात जातोस. ८.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १७ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र नि॒म्नेने॑व॒ सिन्ध॑वो॒ घ्नन्तो॑ वृ॒त्राणि॒ भूर्ण॑यः ।
प्र निमेन इव सिन्धवः घ्नन्तः वृत्राणि भूर्णयः सोमाः असृग्रं आशवः ॥ १ ॥
नद्या सखल प्रदेशाकडे धांव घेतात त्याप्रमाणें हे खळखळणारे तीव्रवेगी सोमरस अज्ञानाचा विध्वंस करीत वहात जात आहेत. १.
अ॒भि सु॑वा॒नास॒ इन्द॑वो वृ॒ष्टयः॑ पृथि॒वीं इ॑व ।
अभि सुवानासः इन्दवः वृष्टयः पृथिवीं इव इन्द्रं सोमासः अक्षरन् ॥ २ ॥
पर्जन्य भूलोकावर वर्षाव करतात त्याप्रमाणें सोमपल्लव पिळले जात असतां त्यांनीं इंद्राप्रीत्यर्थ रसधारांचा प्रवाह सोडला. २.
अत्यू॑र्मिर्मत्स॒रो मदः॒ सोमः॑ प॒वित्रे॑ अर्षति ।
अति ऊर्मिः मत्सरः मदः सोमः पवित्रे अर्षति वि घ्नन् रक्षांसि देव युः ॥ ३ ॥
अतिशय उचंबळणारा, हर्षनिर्भर करणारा उत्तेजक सोमरस, देवांकरितां आतुर झालेला हा रस, राक्षसांना ठार मारून टाकून पवित्रांतून खालीं पाझरत आहे. ३.
आ क॒लशे॑षु धावति प॒वित्रे॒ परि॑ षिच्यते ।
आ कलशेषु धावति पवित्रे परि सिच्यते उक्थैः यजेषु वर्धते ॥ ४ ॥
हा रस वहात वहात कलशांमध्यें धांवतो, स्वच्छ होण्यासाठीं पवित्रावर ओतला जातो, आणि नंतर यज्ञांमध्यें उक्थ गायनानें वृद्धिंगत होतो. ४.
अति॒ त्री सो॑म रोच॒ना रोह॒न् न भ्रा॑जसे॒ दिव॑म् ।
अति त्री सोम रोचना रोहन् न भ्राजसे दिवं इष्णन् सूर्यं न चोदयः ॥ ५ ॥
सोमा, तिन्ही तेजस्वी लोक जणों काय भेदून जाऊन आणि द्युलोकावर आरोहण करून तूं तळपत आहेस, आणि आकाशांत संचार करून तूंच जणों सूर्याला प्रेरणा करीत आहेस. ५.
अ॒भि विप्रा॑ अनूषत मू॒र्धन् य॒ज्ञस्य॑ का॒रवः॑ ।
अभि विप्राः अनूषत मूर्धन् यजस्य कारवः दधानाः चक्षति प्रियम् ॥ ६ ॥
स्तवनकुशल आणि कार्यकुशल स्तोते यज्ञाच्या ऐन रंगांत तुझ्या मनोहर स्वरूपाला दृष्टीपुढें ठेऊन तुझी प्रशंसा करतात. ६.
तं उ॑ त्वा वा॒जिनं॒ नरो॑ धी॒भिर्विप्रा॑ अव॒स्यवः॑ ।
तं ओं इति त्वा वाजिनं नरः धीभिः विप्राः अवस्यवः मृजन्ति देव तातये ॥ ७ ॥
तसेंच शूर, स्तोत्रप्रवीण, आणि रक्षणेच्छु स्तोतृजन, आपल्या ध्यानबलानें तुज सत्वबलाढ्य सोमाला देवाप्रीत्यर्थ आरंभिलेल्या यज्ञांत गाळून स्वच्छ करतात. ७.
मधो॒र्धारां॒ अनु॑ क्षर ती॒व्रः स॒धस्थं॒ आस॑दः ।
मधोः धारां अनु क्षर तीव्रः सध स्थं आ असदः चारुः ऋताय पीतये ॥ ८ ॥
तर तूं आपल्या मधुररसाची धारा वहात राहील असें कर. तीक्ष्ण परंतु स्वदिष्ट असा तूं, सनातन धर्माच्या अभिवृद्धिसाठीं आणि दिव्यजनांनी प्राशन करावें म्हणून द्रोणकलशांत अधिष्ठित झाला आहेस. ८.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १८ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
परि॑ सुवा॒नो गि॑रि॒ष्ठाः प॒वित्रे॒ सोमो॑ अक्षाः ।
परि सुवानः गिरि स्थाः पवित्रे सोमः अक्षारिति मदेषु सर्व धाः असि ॥ १ ॥
पर्वतावर राहणारा सोमपल्लव पिळला असतां पवित्रांतून स्वच्छ होऊन पात्रांत वहात राहिला. हे सोमा, आपल्या तल्लीनतेंत तूं सकल अभीष्टांचा निधीच झाला आहे. १.
त्वं विप्र॒स्त्वं क॒विर्मधु॒ प्र जा॒तं अन्ध॑सः ।
त्वं विप्रः त्वं कविः मधु प्र जातं अन्धसः मदेषु सर्व धाः असि ॥ २ ॥
तूं स्तवनप्रेरक आहेस; तूं काव्यस्फूर्तिदाता आहेस; सर्व पेयांपासून उत्पन्न झालेलें मधुर पेय तूं आहेस म्हणून तुझ्या हर्षोत्कर्षांत तूं सकल अभीष्टाचा निधीच झाला आहेस. २.
तव॒ विश्वे॑ स॒जोष॑सो दे॒वासः॑ पी॒तिं आ॑शत ।
तव विश्वे स जोषसः देवासः पीतिं आशत मदेषु सर्व धाः असि ॥ ३ ॥
एक विचाराचे प्रेमळ देव तुजला प्राशन करतात, कारण तुझ्या तल्लीनतेंत तूं सकल अभीष्टांचा निधीच आहेस. ३.
आ यो विश्वा॑नि॒ वार्या॒ वसू॑नि॒ हस्त॑योर्द॒धे ।
आ यः विश्वानि वार्या वसूनि हस्तयोः दधे मदेषु सर्व धाः असि ॥ ४ ॥
जो यच्चावत् उत्तमोत्तम वस्तु आपल्या हातांत ठेवितो तो तूं आपल्या हर्षोत्कर्षांत सकल अभीष्टांचा निधीच आहेस. ४.
य इ॒मे रोद॑सी म॒ही सं मा॒तरे॑व॒ दोह॑ते ।
यः इमे इति रोदसी इति मही इति सं मातरा इव दोहते मदेषु सर्व धाः असि ॥ ५ ॥
ह्या जननीप्रमाणें परमथोर द्यावापृथिवींचें जो दोहन करतो तो तूं आपल्या हर्षोत्कर्षांत सकल अभीष्टांचा निधीच आहेस. ५.
परि॒ यो रोद॑सी उ॒भे स॒द्यो वाजे॑भि॒रर्ष॑ति ।
परि यः रोदसी इति उभे इति सद्यः वाजेभिः अर्षति मदेषु सर्व धाः असि ॥ ६ ॥
जो उभयतां द्यावा पृथिवींना आपल्या सामर्थ्यांनीं व्यापून टाकतो तो तूं आपल्या हर्षोत्कर्षांत सकल अभीष्टांचा निधीच आहेस. ६.
स शु॒ष्मी क॒लशे॒ष्व् आ पु॑ना॒नो अ॑चिक्रदत् ।
सः शुष्मी कलशेषु आ पुनानः अचिक्रदत् मदेषु सर्व धाः असि ॥ ७ ॥
तो हा महाप्रतापी सोमरस स्वच्छ गाळला जात असतां द्रोणकलशांमध्यें मोठी गर्जना करतो; तथापि हे सोमा तूं आपल्या तल्लीनतेंत असतांना सकल अभीष्टांचें निधान असतोस. ७.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १९ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
यत् सो॑म चि॒त्रं उ॒क्थ्यं दि॒व्यं पार्थि॑वं॒ वसु॑ ।
यत् सोम चित्रं उक्थ्यं दिव्यं पार्थिवं वसु तत् नः पुननः आ भर ॥ १ ॥
हे सोमा, अद्भुत प्रशंसनीय असें जे दिव्य आणि ऐहिक उत्कष्ट धन आहे तें तूं गाळला जात असतांना आम्हांकडे घेऊन ये. १.
यु॒वं हि स्थः स्वर्पती॒ इन्द्र॑श्च सोम॒ गोप॑ती ।
युवं हि स्थः स्वर्पती इतिस्वः पती इन्द्रः च सोम गोपती इतिगो पती ईशाना पिप्यतन् धियः ॥ २ ॥
हे सोमा, इंद्र आणि तूं असे दोघे दिव्यप्रकाशाचे अधिपति आहांत, आणि ज्ञान धेनूंचेहि अधिपति आहांत. तर हे जगन्नायकांनों, आमच्या ध्यानबुद्धींना विकसित करा. २.
वृषा॑ पुना॒न आ॒युषु॑ स्त॒नय॒न्न् अधि॑ ब॒र्हिषि॑ ।
वृषा पुनानः आयुषु स्तनयन् अधि बर्हिषि हरिः सन् योनिं आ असदत् ॥ ३ ॥
वीर्यशाली सोम हा स्वच्छ गाळला जात असतां भक्तसमुदायांमध्यें यज्ञमंडपांत गर्जना करतो, आणि आपल्या कुशासनावर विराजमान होतो. ३.
अवा॑वशन्त धी॒तयो॑ वृष॒भस्याधि॒ रेत॑सि ।
अवावशन्त धीतयः वृषभस्य अधि रेतसि सूनोः वत्सस्य मातरः ॥ ४ ॥
पुत्राच्या, वत्साच्या, जननीच्या ध्यानस्तुति, सोमवृषभ वीर्यभरांत असतांना त्याला अवलोकन करून मोठ्यानें हंबरतात. ४.
कु॒विद्वृ॑ष॒ण्यन्ती॑भ्यः पुना॒नो गर्भं॑ आ॒दध॑त् ।
कुवित् वृषन्यन्तीभ्यः पुनानः गर्भं आदधत् याः शुक्रं दुहते पयः ॥ ५ ॥
वीरपुंगवाच्या सहवासाची इच्छा करणार्या ज्या "वसतीवरी" त्यांच्यासह स्वच्छ गाळला जात असतां ह्यानें रसरूप गर्भ ठेवला कीं काय ? कारण पहा त्या "वसतीवरी" पांढरें शुभ्र दुग्ध देऊं लागल्या. ५.
उप॑ शिक्षापत॒स्थुषो॑ भि॒यसं॒ आ धे॑हि॒ शत्रु॑षु ।
उप शिक्ष अप तस्थुषः भियसं आ धेहि शत्रुषु पवमान विदाः रयिम् ॥ ६ ॥
जे दूर उभे आहेत त्यांना आमच्याजवळ घेऊन ये; आणि आमच्या शत्रूंच्या हृदयांत धडकी भरूं दे. हे पावनप्रवाहा, विजयश्री देणारा तूंच आहेस. ६.
नि शत्रोः॑ सोम॒ वृष्ण्यं॒ नि शुष्मं॒ नि वय॑स्तिर ।
नि शत्रोः सोम वृष्ण्यं नि शुष्मं नि वयः तिर दूरे वा सतः अन्ति वा ॥ ७ ॥
हे सोमा, धर्माच्या शत्रूंचें वीर्य नष्ट कर. त्यांचा प्रताप नाहींसा कर, त्यांची उमेद चिरडून टाक; मग ते शत्रू आम्हांपासून दूर असोत किंवा जवळ असोत. ७.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २० (पवमान सोमसूक्त)
ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र क॒विर्दे॒ववी॑त॒ये॑ऽव्यो॒ वारे॑भिरर्षति ।
प्र कविः देव वीतये अव्यः वारेभिः अर्षति सह्वान् विश्वाः अभि स्पृधः ॥ १ ॥
हा काव्यस्फूर्तिदाता सोम, देवसेवेसाठीं, ऊर्णावस्त्रांतून स्वच्छ प्रवाहानें वहात असतां स्तोत्रगायकांना सहस्रावधि गोधनांनीं युक्त असें सत्वबल अर्पण करतो. १.
स हि ष्मा॑ जरि॒तृभ्य॒ आ वाजं॒ गोम॑न्तं॒ इन्व॑ति ।
सः हि स्म जरितृ भ्यः आ वाजं गो मन्तं इन्वति पवमानः सहस्रिणम् ॥ २ ॥
तोच हा, कीं जो स्वच्छ प्रवाहानें वहात असतां स्तोत्रगायकांना सहस्रावधि गोधनांनीं युक्त असें सत्वबल अर्पण करतो. २
परि॒ विश्वा॑नि॒ चेत॑सा मृ॒शसे॒ पव॑से म॒ती ।
परि विश्वानि चेतसा मृशसे पवसे मती सः नः सोम श्रवः विदः ॥ ३ ॥
जो तूं सकलांचा परामर्श आपल्या अंतःकरणानें घेतोस, जो तूं आमच्या मननांनीं पवित्रांतून स्वच्छ प्रवाहानें वहातोस, तो तूं हे सोमा, आम्हांस सत्कीर्ति अर्पण कर ३.
अ॒भ्यर्ष बृ॒हद्यशो॑ म॒घव॑द्भ्यो ध्रु॒वं र॒यिम् ।
अभि अर्ष बृहत् यशः मघवत् भ्यः ध्रुवं रयिं इषं स्तोतृ भ्यः आ भर ॥ ४ ॥
उत्कृष्ट कीर्ति आणि अढळ ऐश्वर्य यांचा प्रवाह दानशील यजमानावर लोट; आणि स्तोत्रकर्त्याला मनोत्साह आण. ४.
त्वं राजे॑व सुव्र॒तो गिरः॑ सो॒मा वि॑वेशिथ ।
त्वं राजा इव सु व्रतः गिरः सोम आ विवेशिथ पुनानः वह्ने अद्भुत ॥ ५ ॥
तूं न्यायानुवर्ती राजाप्रमाणें आहेस. हे सोमा, हे अद्भुता हविर्वाहका, तूं स्वच्छ होतांना भक्तांच्या स्तवनांत मुरून जातोस. ५.
स वह्नि॑र॒प्सु दु॒ष्टरो॑ मृ॒ज्यमा॑नो॒ गभ॑स्त्योः ।
सः वह्निः अप् सु दुस्तरः मृज्यमानः गभस्त्योः सोमः चमूषु सीदति ॥ ६ ॥
उदकांतील प्रखर अग्नि तो सोमच होय. तो भक्तांच्या हस्तांनीं स्वच्छ गाळला जाऊन चमूपात्रांत स्थिर होतो. ६.
क्री॒ळुर्म॒खो न मं॑ह॒युः प॒वित्रं॑ सोम गच्छसि ।
क्रीळुः मखः न मंहयुः पवित्रं सोम गच्चसि दधत् स्तोत्रे सु वीर्यम् ॥ ७ ॥
हे सोमा तूं क्रीडाशील आहेस, यज्ञाप्रमाणें इच्छा पूर्ण करणारा आहेस. तूं स्तोत्रकर्त्यांत उत्कृष्ट शौर्य प्रकट करीत पवित्राकडे गमन करतोस. ७.
ॐ तत् सत् |